खंड ६ - अध्याय २४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । भ्रुशुंडी कथा पुढें सांगत । एकदा ब्रह्मा गणेशदर्शनास येत । महाकुंडांत स्नान करित । नंतर स्तोत्रें स्तवन करी ॥१॥
गणनायकाचें गणेशकुंड गणनातीत । अति प्राचीन अनंततीर्थाचा प्रभाव वर्तत । सेवकांसी ब्रह्मपद जें देत । त्या परमतीर्थास नमितों मीं ॥२॥
अभेदभेद आदि विहीन । चतुष्पद आद्यभूत जें शोभन । पंचम गणेशमायेनें ज्याचें दर्शन । त्या कैवल्यघनास नमितों मी ॥३॥
गणेशा तुमच्यापासून प्रसून । जें तुरीय आत्मरूप अद्‍भुत । तीर्थांमध्यें जें अरूप वर्तत । ज्याच्या दर्शनें शुद्ध मीं ॥४॥
जें तीर्थ मीं ब्रह्मकमंडलूंत । घेतलें अमृतोपम पुनीत । त्रैगुण्यमय भागीरथींत वर्तत । सरस्वतीस्थ जें असेल पावन ॥५॥
त्या गणेशतीर्थास मी विनत । वंदन करी भक्तियुक्त । सर्व नच्या ज्यापासून जन्मत । पापहारक तें असे ॥६॥
स्नान करितां पुण्य नद्यांत । पापाचा सर्व विनाश होत । पापी नर नित्य होत । शुद्ध हया जळामुळें ॥७॥
प्रयागतीर्थांत येतां मरण । प्राणी लाभे अभीप्सित । संपूर्ण । गणेशकुंडा तुझ्या दर्शनमात्रें पूर्ण । होते मनीप्सित तैसेंची ॥८॥
तुझ्या जलबिंदूचा स्पर्श होत । तयीं जें पुण्य होतें प्राप्त । तें असे वर्णनातीत । गणेश अंकुशाघातें जन्म तुझा ॥९॥
गणनायकाच्या कुंडा तुला नमन । तुझ्या दर्शनस्पर्शानें मी धन्य । तुझ्या तोयांत करितां निमज्जन । तुष्टि लाभें ब्रह्मसदृश ॥१०॥
तुझ्या तीरावर मरण येत । तरी तें सुमंगल वरिष्ठ । ब्रह्ममयप्रद तें नरास देत । श्रमावांचून पद शुकादींचें ॥११॥
तुझ्या जळाचा स्पर्श सतत । लाभो मजला पुनीत । स्नानपानादिक दर्शनें जगांत । धन्य व्हावें मी सर्वदा ॥१२॥
मी स्वल्पज्ञ किती वर्णन । करावें गणेशकुंडातें प्रसन्न । नमितों मी तुज पुनःपुन्हा विनीतमन । आम्हांस गणेशकृपा लाभो ॥१३॥
भ्रुशुंडी म्हणे जो नर । वाचील गणेशकुंडाचें हें स्तोत्र । त्यासस लाभे भुक्ति मुक्ति समग्र । श्रद्धेनें हो ब्रह्मरूपही ॥१४॥
हें ब्रह्मदेवरचित स्तोत्र । सर्व तीर्थप्रद पवित्र । भक्तिनें वाचितां सर्वत्र । शुभकारक पाठकांसी ॥१५॥
ब्रह्मा तदनंतर गणेशाय । हर्षभरें जाऊन त्यास पूजित । स्तवन करून प्रदक्षिणा घालीत । महेशांनो त्या वेळीं ॥१६॥
त्या गणेशाच्या पादस्पर्शानें वाहत । ब्रह्मकमंडलूतलें जळ उसळत । त्यापासून नदी उत्पन्न होत । ब्रह्मा वंदी विघ्नेशासी ॥१७॥
योगमायेनें युक्त तो ओढित । त्या नदीस कमंडलूंत । तेव्हां गणराज त्यास म्हणत । हर्षयुक्त वित्तानें ॥१८॥
सर्वतीर्थमयी या नदीस । नेऊं नको विधात्या या वेळेस । माझ्या नित्य सेवेस । अत्यंत लालस ती असे ॥१९॥
माझ्या इच्छेनें नदी होत । माझ्या क्षेत्रांत पावनचित्त । सर्वांस ती पावन करित । तें ऐकून ब्रह्मा तैं ॥२०॥
प्रणाम करून गणेशास विनवित । ब्रह्मा शंकर समन्वित । मी तीर्थहीन होईन जगांत । गजानना ऐसें करितां ॥२१॥
श्रीगजानन तें ऐकून म्हणत । योगमायाबळानें ओढूं नको सांप्रत । पितामहा कमंडलू भरून पुनीत । हिच्या जळानें तूं घेई ॥२२॥
कमंडलूंत तीर्थजळ भरून । स्वस्थानासी जा परतून । गणेशाची आज्ञा मानून । ब्रह्मदेवें अत्यंत ॥२४॥
ऐश्या त्या नदीचेम महिमान । कोण वर्णू शकेल अभिराम । देवेश विचारिती करून प्रणाम । प्रश्न पुनरपि मुनीसी ॥२५॥
चवथें ब्रह्मकमंडलूत । तीर्थ कैसें उत्पन्न होत । त्याचा सांग विप्रेशा वृत्तांत । सुखप्रद जो सर्वांसी ॥२६॥
भ्रुशुंडी म्हणे ब्रह्मनिर्मित । कामासी तेथ स्थापित । परी त्यास बघून विव्हल होत । पितामह स्वयं तैं ॥२७॥
सरस्वतीस पाहून कामबाणें पीडित । ब्रह्मदेव काममोहित । तिला पकडून स्ववश करित । मैथुनास्त व उद्युक्त झाला ॥२८॥
हाहारव सरस्वतीदेवी करित । गणनायकास मनीं स्मरत । तेव्हां ब्रह्मा मनीं शांत होत । ज्ञानयुक्त तैं जाहला ॥२९॥
तिज सोडून देऊन निन्दित । आपणासी ब्रह्मवेद चित्तांत । कैसा झालों म्हणे काममोहित । स्वतःचा क्रोध त्यास आला ॥३०॥
मदनास तैं विधि शाप देत । मज करून मोहयुक्त । आतां दुष्टा तूं क्रीडत । शंकर तुजला नष्ट करील ॥३१॥
शंकराच्या तृतीय नेत्रांतून । अग्नि बाहेर पडून । जाळील तुजला संपूर्ण । शाप माझा ऐसा असे ॥३२॥
कामास शापून स्मरत । ब्रह्मदेव देवमुनींस समस्त । ते भेटले पितामहा त्वरित । ऐकतां वृत्तांत शोक करिती ॥३३॥
प्रायश्चित्त ब्रह्मदेवास देण्यास । सर्व देवऋषि प्रयत्नास । करिती निर्मिती सर्व तीर्थांस । आपापल्या तेजें युक्त ॥३४॥
साडेतीन कोटी तीर्थें निर्मून । त्यांनी ब्रह्मदेवास घालिती स्नान । परी ब्रह्मदेवास न लाभे पावित्र्य म्हणून । तीर्थराजास ते स्मरती ॥३५॥
ब्रह्मदेवाच्या शुद्धीस्तव प्रकटत । तीर्थराज त्यांच्या पुढयांत । त्यांच्या इच्छेस मान देत ब्रह्मदेव त्यांत बुडी मारी ॥३६॥
परी ब्रह्मदेंव शुद्ध न झाला । तेव्हां सूर्यदेवें प्रसत्न केला । आपुल्या देहांतून यमुना नदीला । त्यानें निर्मिलें सत्वरीं ॥३७॥
तिच्यांत स्नान करित । परी ब्रह्मा पवित्र न होत । जादिमाया तेव्हां सुजित । सरस्वती नदीसी ॥३८॥
सरस्वतींत करी निमज्जन । परी ब्रह्मदेव शुद्ध न होय म्हणून । शिवें स्वप्रतापें करून । रेवा नदी निर्मिली ॥३९॥
त्या तीर्थरूप नदींत । ब्रह्मा जरी स्नान करित । तथापि तो शुद्ध न होत । तेव्हां विष्णूने निर्मिली गंगा ॥४०॥
विष्णूच्या देहांतून पावन । निर्माण झाली ती महान । त्या गंगानदींत स्नान करून । ब्रह्मा तरीही शुद्ध न झाला ॥४१॥
तेव्हां खेदसमायुक्त । मुनींसह विचार करित । त्रिगुणांचें बीजरूप तीर्थ । स्तवित । तेव्हां तें प्रसन्न झालें ॥४२॥
तुरीय तीर्थं देवपांनो प्रकटत । स्वतेजयुक्त नदीरूप होत । प्रकाशमय तें तीर्थं वाहत । देवऋषि तैं प्रणाम करिती ॥४३॥
हर्षभरें त्यास पूजून । नंतर करांजली जोडून । सर्वतीर्थ हें नांव शोभन । प्रख्यात होवो तुझें जगीं ॥४४॥
विधात्यासी करी पावन । तीर्थांच्या तीर्था तुज नमन । त्रिगुणमय तुज तीर्थें पावन । असती त्रैलोक्य पावक ॥४५॥
परी तीं अन्य तीर्थें होत । त्रिमूर्तीचें दोष दूर करण्या जगांत । द्विजापासून जी जन्मत । तीहीं तीर्थें असमर्थ ॥४६॥
म्हणून आम्हीं प्रर्थिलें । तुरीय तीर्था तुज वंदिलें । त्रिगुणांच्या हितार्थ पावन झालें । रूप तुझें तीर्थराजा ॥४७॥
म्हणून सर्वांचें करी हित । तीर्थस्वरूप तूं जगांत । ऐसें बोलून ते वंदित । पुनरपि त्या सर्वतीर्थास ॥४८॥
तेव्हां प्रसन्न होऊन । निजरूपाचें देत दर्शन । तें सर्वतीर्थ महान । तेव्हां ब्रह्मा शुद्ध झाला ॥४९॥
पापमुक्त होऊन प्रणाम करित । सर्वांसहित त्यास स्तवित । तीर्थोत्तम तें त्यास म्हणत । वर माग पितामहा ॥५०॥
तुझ्या मनातलें जें वांछित । तें पुरवीन मी तुष्ट । हया स्तोत्रें सृष्टिकर्तृत्व तुजप्रत । विधात्या आतां संकोच नको ॥५१॥
तेव्हां ब्रह्मा त्यास म्हणत । जरी तीर्था मज वर देण्या उद्युक्त । तरी राही माझ्या कमंडलूंत । सर्वदा तेणे कृतकृत्य मी ॥५२॥
भ्रुशुंडी म्हणे तें ऐकून । तथाऽस्तु म्हणे तीर्थ महान । त्याच्या कमंडलूत बैसलें सामावून । वरदान पूर्ण करावया ॥५३॥
तेथ राहून ध्यान करित । सर्वतीर्थ निरंतर चित्तांत । गणेशासी तें प्रार्थित । सेवा व्हावी म्हणून ॥५४॥
विघ्नराजास मनीं चिंतून । तयास म्हणे तें तीर्थवचन । दृश्यभाव घेऊन । न केली तुझी चरणसेवा ॥५५॥
वरदान प्रभावें ब्रह्मसदनांत । मी असें बंदिस्त सांप्रत । तुझ्या पदकमला समीप मजप्रत । नेई सत्वरी दयाळा ॥५६॥
ब्रह्मदेवास पवित्र केलें । आतां मयूरक्षेत्रीं पाहिजे नेलें । दृश्यभावें सेवाकार्यार्थ पहिलें । सोनें माझ्या जीविताचें ॥५७॥
पराधीनतमुळें स्वामी गणेश्वरा । काय करण्यार मीं मज उद्धरा । माझें विघ्न हरण करा । मीं भक्त एकनिष्ठ ॥५८॥
मीं दृश्याभाव धारण करून । नाही पाहिलें नयन भरून । मयुरक्षेत्र तेणें निरर्थक जीवन । वाटे मजला गजानना ॥५९॥
म्हणून तुजला मीं प्रार्थित । मज सोडवावें त्वरित । ऐसें नित्य प्रार्थित । गणेशासी तें तीर्थ ॥६०॥
तेव्हां गणेशानें संतुष्ट होऊन । स्थापिलें सन्निध तें तीर्थ पावन । देवेश विचारिती प्रश्न । पुनरपि त्या भ्रुशुंडीस ॥६१॥
जरी तीर्थराज प्रयागांत । स्नान करून पावन न होत । तरी त्याहून श्रेष्ठ कोणतें जगांत । तीर्थ सांगा मुनीश्वरा ॥६२॥
तरी राजा ऐसी संज्ञा तयाप्रत । कां दिली असे शास्त्रांत । हा संशय दूर करावा सांप्रत । योगींद्र तुम्ही प्राचीन ॥६३॥
भ्रुशुंडी तेव्हां तयास म्हणत । जैसा देवसमूहांचा राजा असत । राजेंद्र नामें तो ख्यात । इंद्राहून अन्य देव श्रेष्ठ नसे ॥६४॥
ब्रह्मादी न देव असत । गुणांचे आधार ते ख्यात । पूज्यत्वामुळें देवसंज्ञा लाभत । अंशत्वानें तयांसी ॥६५॥
साडेतीन कोटी तीर्थांचा असत । राजा प्रयागक्षेत्र जगांत । प्रयागाहून अन्य तीर्थ नसत । श्रेष्ठ कोठेही भूतलीं ॥६६॥
गंगादी नद्या तैशाच ज्ञात । गुणाधार या जगांत । तीर्थसंज्ञा मिळे त्यास । अंशात्सक ती जाणावी ॥६७॥
प्रार्थना तीर्थराज करित । तैं गंगायमुनांचा संगम होत । हया संगमस्नानें फळ लाभत । तो महिमा त्या दोघांचा ॥६८॥
नर्मदा वरदान लाभून होत । श्रेष्ठ जरी या जगांत । ती गुणरूपा न वर्णिली असत । शास्त्रांत याप्रमाणें ॥६९॥
आतां ऐका वृत्त प्रकृत । कमंडलूंस्थित म्हणून ख्यात । कथानक असे प्रख्यात । ब्रह्मकमंडलू तीर्थाचें ॥७०॥
ब्रह्मदेवाच्या कमंडलूंत । तें राहिलें वरदानें मुक्त । म्हणोनि ब्रह्मकमंडलू हें ख्यात । नांव तयाचें जाहलें ॥७१॥
पृथ्वीवर आली म्हणून । गंगा नांवही लाभून । कमंडलूंतून पूर्वदिशा धरून । वाहली ती थोर नदी ॥७२॥
ब्रह्मादींस सुदुर्लभ असत । तिच्या मुळीं ब्रह्मा वसत । लोकपितामह जो साक्षात । तो स्नान करी या नदींत ॥७३॥
स्नान करून गणेशास भजत । अनन्याचित्तें तो सतत । म्हणोनि स्नान करोनि या नदींत । प्रथम अर्चावें ब्रह्मदेवा ॥७४॥
ऐसें करतां विद्यायुक्त । होतो नर अंतीं मुक्त । त्या नदीच्या मध्यांत । शिव राहिला मयूरक्षेत्रीं ॥७५॥
मध्यमेश्वर नामें ख्यात । तो गणनायकास भजत । स्नान करी जो मध्यमेश्वर तीर्थात । त्यास सामर्थ्य लाभेल ॥७६॥
त्यायोगें पूज्येशाप्रत जाऊन । लाभेल तो मुक्ति पावन । अंतीं त्या तीर्थ नदीतीरीं विष्णु भगवान । ह्रषिकेश नामें राही ॥७७॥
तोही नित्य स्नान करून । अनन्यमनें करी भजन । अंतरीं स्मरून गजानन । ऐसें पुरातन वृत्त असे ॥७८॥
त्या तीर्थात स्नान करून । प्रथम करावें ह्रषीकेशाचें पूजन । त्यायोगें विपुल यश लाभून । अंतीं मुक्तिलाभ होतसे ॥७९॥
या तीथराजाच्या तीरावर । तीर्थें असती अपरंपार । उभयधा देवांनो समग्र । वर्णन त्यांचें अशक्य असे ॥८०॥
कमंडलूद्‍भवेचें दर्शन । घेतां होतें पापांचें निरसन । सर्व प्राणिमात्रांस पावन । करीन हें तीर्थजल ॥८१॥
संचित पाप जलबिंदुस्पर्शे हरत । अनेक जन्मांचें एकत्रित । तें सारें नष्ट होत । या तीर्थजलाच्या स्पर्शमात्रें ॥८२॥
ह्या तीर्थाचें जल जो पीत । तो इंद्रलोकीं स्वयं जात । स्नान करितां या तीर्थांत । मुक्ति लाभे इष्ट तदा ॥८३॥
मयूरक्षेत्रांत या कमंडलूतिर्थांत । देव होते स्नान करित । एकदाही त्यायोगें लाभत । ईप्सित मोक्षादिसहित सारें ॥८४॥
ऐसी महाभाग्यवान नदी वाहत । दहा योजनें ती विस्तृत । तिचें माहात्म्य हें अद्‍भुत । वाचितां ऐकतां इष्ट लाभ ॥८५॥
ओमिती श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे षष्ठे खण्डे विकटचरिते ब्रह्मकमंडलुप्रादुर्भावादिवर्णनं नाम चतुर्विशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP