खंड ६ - अध्याय २६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ भुरुशुंडी म्हणे देवांसी । आतां सांगेन तुम्हांसी । भूषविती कमंडलूतटासी । त्यांतील मुख्य तीर्थांचें वर्णन ॥१॥
मुख्य एक गणेशकुंड ख्यात । त्याचें चरित्र संक्षेपें सांगत । त्यानंतर पंचतीर्थांचा महिमा अद्‍भुत । सांगेन तुम्हांस अपूर्व ॥२॥
मध्यभागीं गणेशतीर्थ असत । दोनशें धनुष्यें अंतर वर्तत । तेथ देव मुनिजन स्नान करित । नित्य प्रयत्नें तीथें हीं ॥३॥
त्या उभयतांच्या तीरावर स्थित । तीर्थें ब्रह्मकमंडलूच्या ज्ञात । तेथ जे स्नान करित । ते प्राणी गाणेश होती ॥४॥
त्यापुढती महातीर्थ कापिल असत । जेथ गणेश कपिल होत । कमलासुरनाशार्थ जगांत । मारिलें त्यानें त्या असुरासी ॥५॥
हया असुरासी मारून । महावीर्य जो महान । शंकारादींच्या साहाय्यें करून । त्याचें मस्तक धारण करी ॥६॥
कपिल गणेश मयूरक्षेत्रांत । तेथ ब्रह्मा अभिषेक करित । मुनिगणांच्या मान्निध्यांत । गणेशसूक्तें हर्षभरानें ॥७॥
तेथ नद्यांच्या संगमें होत । पंचामृत नामें तीर्थ विख्यात । तेथ स्नान करितां लाभत । कापिल सांख्यात्मक ज्ञान ॥८॥
कपिलरूप विष्णु संस्थित । त्या स्थानीं तो पुनीत । त्यापुढतीं व्यासतीर्थ वर्तात । सर्व अज्ञानाचें विनाशक ॥९॥
त्याच प्रमाणांत जाणावें । त्या तीर्थाचें क्षेत्र बरवें । व्यासें तप आचरिलें भक्तिभावें । तेथ शंभर वर्षे दारुण ॥१०॥
तदनंतर देवेशांनो त्यास देत । गणेश्वर वर प्रकटून पुढयांत । त्यायोगें भारत रचित । धमाधर्मयुक्त महान ॥११॥
ब्रह्म पद शास्त्र तें ज्ञात । व्यास तत्त्वज्ञान ग्रथित । त्या व्यासतीर्थी स्नान करित । मुक्त जाडयभावांतून तो ॥१२॥
धर्माधर्मं व्यवस्था जाणून । होईल त्या नरा बोधज्ञान । गणेशतीर्थाच्या पूर्वेकडे शोभन । भीमकुंड भीमकुंड भीमेश निर्मित ॥१३॥
भीमेशानें तेथ राहून । गणेशतप आचरिलें महान । प्रसन्न होतां गजानन । वरदान त्यास लाभलें ॥१४॥
त्या वरदानप्रभावें मारित । भीमासुरासी त्वरित । भीमेश नाम तीर्थ मुख्यत्वें ज्ञात । महाऐश्वर्यप्रदायक ॥१५॥
एकदा उन्हाळयांत जलहीन । तें भीमेशतीर्थ होत पावन । तीर्थयात्रेस्तव आगमन । भीमाचें तेथ जाहलें ॥१६॥
तो पांडूपुत्र स्नानार्थ । गदाप्रहारें तीर्थं खोदित । तेव्हां जलधारा उसळत । स्नान करी त्यांत भक्तिभावें ॥१७॥
बलात्मक ऐश्वर्य तयास प्राप्त । त्या तीर्थांच्या माहात्म्ये अद‍भुत । पुढें तो धृतराष्ट्रसुतांस मारित । ऐश्वर्यें संयुक्त होऊनियां ॥१८॥
त्यानंतर परम ऋषींस्तव होत । हें तीर्थ स्वधर्मप्रद प्रख्यात । त्याचा विस्तार इतर कुंडासम असत । महान असे हें कुंड ॥१९॥
ऐंशी हजार मुनि आचरित । ब्रह्मप्राप्त्यर्थ तपें अविरत । त्यायोगें ते ब्रह्मभूत समस्त । जीवन्मुक्त जाहले ॥२०॥
ते तेथ राहून भजत । लंबोदर देवासी भक्तियुक्त । पंचतीर्थीं असे प्रख्यात । हया मयूरक्षेत्रांत ॥२१॥
त्या पांच तीर्थांत करितां स्नान । ब्रह्मभूत होतात । जन । प्रथम गणेशतीर्थात स्नान । तदनंतर भैम तीर्थांत ॥२२॥
तदनंतर आर्ष व्यासतीर्थांत । त्यापुढें कपिलतीर्थीं स्नान करित । अंतीं पुनरपि गणेशतीर्थांत । स्नान करावें हा क्रम असे ॥२३॥
गणेशतीर्थाच्या पूर्वेस असत । एक उत्तम तीर्थ विस्तृत । छत्तीसशें धनुष्यें मर्यादा ख्यात । हया पापविनाशक क्षेत्राची ॥२४॥
दक्षिणतीरीं शिव वसत । आपुल्या शक्तिसमन्वित । तेथ तीर्थाचा आश्रय घेत । सर्वार्थाचें प्रवर्तंक जें ॥२५॥
उत्तर तीरावर स्थित । केशव रमेच्या सान्निध्यांत । सर्वधर्मंप्रदाता तो ज्ञात । क्षेत्रांतीं क्षेत्रधारक ॥२६॥
तें सर्व पापनाशक ख्यात । सहावें तीर्थक्षेत्रांत । स्नान करितां नर होत । दुःखमुक्त प्रसन्न ॥२७॥
गणेशतीर्थाच्या पश्चिमेस । तीर्थ उत्तम एक सरस । सर्व पुण्यप्रद नाम तयास । क्षेत्रांतीं तें स्थित असे ॥२८॥
तीर्थाच्या उत्तर तीरावर । भानुसंज्ञायुक्त तीर्थ थोर । भूषविती दक्षिण तीर । प्रकृति आणि पुरुषर ॥२९॥
तेथ स्नानमात्रें होत । भाविक नर पुण्यवंत । जें जें शुभ वांछीत । तें तें त्यास निश्चित लाभें ॥३०॥
सातवें तीर्थ पूर्वेस असत । चतुर्गुण जें प्रमाणांत । या सात तीर्थांत स्नान करित । त्यास सर्व शुभ लाभें ॥३१॥
आधीं गणेंशतीर्थांत स्नान । नंतर आर्षतीर्थांत करून । अघनाशन जें महान । पुण्यदेवीचें तीर्थं नंतर ॥३२॥
तदनंतर कापिल नीर्थांत । गाणप तीर्थी पुनः । स्नान करित । ऐसा क्रम येथें असत । सांगितला तुम्हां यथामति ॥३३॥
ऐसीं मुख्य सात तीर्थें वर्णिली । जीं मयूरक्षेत्रीं प्रसिद्ध झालीं । श्रवण करिता माहात्म्य लाभली । पापनाशक शक्ति अनेकांसी ॥३४॥
वाचका श्रोत्यांस समस्तांस । हया वाचनें पुण्य लाभून खास । सारें दुरित पाप जाय विलयास । विकट देवाच्या कृपेनें ॥३५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे षष्ठे खंडे विकटचरिते सप्ततीर्थीवर्णनं नाम षड्‍विंशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP