खंड ६ - अध्याय २२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ भ्रुशुंडी पुढें कथा सांगत । मयूरक्षेत्रीं जातां लाभत । जें महत्पुण्य अद्‍भुत । वृत्त त्याचें तें ऐका ॥१॥
अंगिरस कुलीं देवप्रिय नामें ख्यात । धर्मात्मा एक निवसत । त्याचीं गणेशावर प्रीत । गाणपत्यप्रिय तो झाला ॥२॥
विधानपूर्वक कर्में करित । मुक्तिकाम तो द्विज सतत । त्यायोगें त्यास बुद्धि होत । तीर्थयात्रा करण्याची ॥३॥
शास्त्रविधीचा आश्रय घेऊन । मुख्य तीर्थक्षेत्रें करून । यात्रा समस्त पूर्ण करून । स्वगृहीं तो परतला ॥४॥
सहकुटुंब गणेशाय भजत । भक्तियुक्त त्याचें चित्त । तदनंतर तो विचार करित । मयूरक्षेत्रयात्रेचा ॥५॥
तेथेंच जाऊन रहावें । जीविताचें सोनें करावें । बायकामुलांसही न्यावें । मयूरक्षेत्रीं निरंतर ॥६॥
त्याचा हा विचार जाणत । माया तैं त्यास पीडा देत । मयूरक्षेत्रवास विचार होत । डळमळीत त्या द्विजाचा ॥७॥
यात्रेसाठीं जें धन संचित । तें चोराकरवी लुटवित । तेव्हां त्या मायाप्रभावें विस्मित । खेदयुक्त तो झाला ॥८॥
मनीं ऐसा विचार करित । मी असेन पापी अत्यंत । म्हणोनि हें विघ्न अवचित । उपस्थित झाले मार्गांत ॥९॥
शुक्लवृत्तीने परी मयूरीं जाईन । ऐसा विचार करी ब्राह्मण । परी ताप फार येऊन । क्षीण जाहला अत्यंत ॥१०॥
परी शुक्लवृत्ती स्वीकारून । तैसाचि निघाला घरांतून । इंद्रियें नियंत्रित करून । तिसर्‍या दिवशीं आश्चर्य घडलें ॥११॥
विघ्नेशानें कृपा केली । विघ्नें सारीं दर झालीं । ज्वरपीडा नष्ट झाली । ब्राह्मणरूपें गणेश भेटे ॥१२॥
त्याच्या पुत्रास बोलावून । दिलें द्रव्य बहु आणून । नंतर पावला अंतर्धान । पुत्र सांगे पित्यासी तैं ॥१३॥
पुत्रमुखांतून तो वृत्तांत ऐकतां । आंगिरस द्विज विचार करित । स्वस्थचित्तें तो जाणत । मयूरेश आला द्विजरूपें ॥१४॥
तदनंतर तो विप्र जात । त्वरेनें मयूरेशक्षेत्रांत । यात्रादिक सारें करित । गर्भागारीं आश्रय घेई ॥१५॥
गणराजाचें करी भजन । अंतीं जाहला तल्लीन । अन्य तीर्थक्षेत्रयात्रा पुण्यें करून । मयूरक्षेत्रीं परत येई ॥१६॥
देवेशा पुनरपि भ्रुशुंडीप्रत । प्रश्न एक विचारित । चोरादींही कां लाभत । मयूरक्षेत्रीं मरण सांगा ॥१७॥
कोणतें पुण्य त्यांनीं केलें । म्हणून मयूरक्षेत्रीं निधन पावले । तैं भ्रुशुंडी तयांस बोले । पूर्वजन्मप्रभाव हा ॥१८॥
पूर्वजन्मांत त्यांनी जें ऐकिलें । मयूरक्षेत्रमाहात्म्य स्मरलें । अन्तकाळीं ह्रदयांत भलें । त्यायोगें मयूरक्षेत्रलाभ ॥१९॥
अंतकाळीं स्मरण होत । त्यायोगें पापीजनां लाभत । मृत्यु मयुरक्षेत्रांत । लयलाभ तेणें गणेश्वरांत ॥२०॥
गाणेशमार्गाचें किंचित्‍ श्रवण । जरी करिती पापीजन । तरी त्याचें होत स्मरण । अंतकाळीं ह्रदयांत ॥२१॥
ते पुढच्या जन्मीं लाभत । वास मयूरक्षेत्रांत । अज्ञानानें सेवन घडत । तरीही पुण्य लाभतसे ॥२२॥
जाणून जरी नर करित । एकदां वास या मयूरक्षेत्रांत । तरी तो होत ब्रह्मभूत । ऐसा प्रभाव देवेंद्रांनो ॥२३॥
परी संस्कारहीन जे असत । गाणेश अधिकार त्यास न प्राप्त । त्याचा प्रवेश न होत । अन्तकाळीं मयूरक्षेत्रीं ॥२४॥
ऐसेंचि एक वृत्त । सांगतों ऐका देऊन चित्त । सुलभ नांवाचा क्षत्रिय असत । पृथिवीपति अंगदेशाचा ॥२५॥
तो धर्मनीति राज्य करित । मयूरेशाचें माहात्म्य ऐकत । क्षेत्रमहिमा जाणता चित्त । त्या नृपाचें मोहून गेलें ॥२६॥
पुत्रावरी राज्य सोपवून । मयूरक्षेत्रीं वासार्थ प्रसन्न । जाता झाला नृप तत्क्षण । शास्त्रविधानें यात्रा करी ॥२७॥
द्वारादिचिन्हित यात्राकरित । वार्षिक विविध प्रत्ययरत । क्षेत्रस्थ देवादींच्या यात्रा समस्त । पूर्ण केल्या तयानें ॥२८॥
नंतर क्षेत्रसंन्यास घेण्या उत्कंठित । जाहलें त्या नृपाचें चित्त । सर्वांस तो आज्ञापित । राहिला स्त्रीसहित मयूरक्षेत्रीं ॥२९॥
तेव्हां भैरव मायाकरित । त्या नृपाचा बुद्धिभेद घडवित । संशय त्याच्या मनीं येत । हें क्षेत्र सर्वोत्तम असे का ? ॥३०॥
काशीसमान अन्य क्षेत्र नसत । या समस्त ब्रह्मांडमंडळांत । हा गणेश शिवाचा सुत । मयूरेश निःसंशय ॥३१॥
ब्रह्म सर्वत्र योगें वर्तत । म्हणून वेदादींत यास म्हणत । गणेशान ब्रह्मरूपी सांप्रत । न मुख्यत्वें हा देव ॥३२॥
पुराणवाणी ऐकून । मीं झालीं की भ्रमित मन । म्हणोनि आतां भ्रम सोडून । जाईन मीं काशीक्षेत्रीं ॥३३॥
ऐसा विचार करून । नृप गेला मयूरक्षेत्र सोडून । काशीयात्रेत मार्गी रोगमग्न । मरण पावला तो भूपति ॥३४॥
परी पूर्वसंस्कारयोगें जन्मत । ब्राह्मणकुळीं तो काशींत । धर्मयुक्त तो करित । काशीवास हितकराणें ॥३५॥
त्या जन्मीं मरणकाळांत । विघ्नेश्वर त्याची दया करित । स्वयं प्रकट होऊन देत । गणेश एकाक्षर मंत्र त्यासी ॥३६॥
त्या मंत्राचें नाम तारक । तें ऐकतां विचारी शौनक । सूता तूं कथा निःशंक । सांगितली हर्षदायक आम्हां ॥३७॥
परी मनांत संशय असत । तो दूर करावा सांप्रत । रामनाम मंत्र तारक ज्ञात । तैसाचि शिवपंचाक्षर ॥३८॥
कोणी ॐ कार सांगती । शक्तिसूर्यात्मक मंत्र जगतीं । परी गणेश एकाक्षर मंत्राची शक्ति । कोठें सांगितली निश्चयें ॥३९॥
तैं आम्हांसी न ज्ञात । म्हणोनि संशयनाश करावा त्वरित । तुझ्याविण अन्य जगीं नसत । संशयहर्ता अधिकारि ॥४०॥
सूत तेव्हां शौनकास सांगत । बिंबरूप महद्‍ब्रह्म चतुरनन असत । गकाराक्षरीं तो अंतर्भूंत । गणेशएकाक्षर मंत्रांत ॥४१॥
त्याच्या पालकभावें विष्णु ज्ञात । अकारांत अंतर्भूत । त्यांच्या संहारकर्ता वर्तत । अनुस्वारीं शिवशंकर ॥४२॥
गणेशाच्या वरदानें ते विलसत । तीनही देव गं मंत्रांत । त्या तीन देवांचा मनोमय भानु वर्तत । मंत्रात सानुनासिकरूपें ॥४३॥
चारांची देहरूप शक्ति ख्यात । वाणीमयी प्रकटत । संधि गकार अकार । अनुस्वारयुक्त । अनुनासिकासहित तो ॥४४॥
हयांनी निर्मिलें सर्व जगत । ॐ कार आकृति सुप्रतिष्ठित । तेथ ते सर्व क्रीडारत । म्हणोनि मंत्र हा ॐ कारयुक्त ॥४५॥
हया सर्वांच्या अर्थभावें करीर्तित । गणेशदेवता वेदोक्त । गणेशमंत्रांत अंतर्भूत । देवेश सर्व शंकरादी ॥४६॥
जग नानाविध ब्रह्म । तैसें तें सर्वत्र स्थित उत्तम । गणपाच्या कलांशें देव परम । गणेशाकार रूपें मंत्रीं प्रकटले ॥४७॥
काशींत नानाविध जन । विविध देवांचे करिती पूजन । हयांत जे स्वधर्मनिष्ठ पावन । यथाविधि काशींत राहती ॥४८॥
त्यांना शंकर तारकमंत्र देत । शाक्तांसी शक्तिमय तारक सांगत । सौरांसी सौरभावाख्य कथित । शिवरूपक शैवांसी ॥४९॥
वैष्णवतारक विष्णुभक्तांस देत । तारक मंत्र शास्त्रोक्त । स्वधर्मनिरत ते करित । आपापलीं कर्में भक्तीनें ॥५०॥
कर्मांग देवतेच्या प्रीतीस्तव । ॐ कार उपदेशी सदाक्षिव । गणेशास पूर्णतारक अपूर्व । गणेश एकाक्षर मंत्र देई ॥५१॥
ते सर्वही तारक मंत्र लाभून । कैलासांत राहती प्रसन्न । योगभावें शिवसन्निध एकमन । मंत्रध्यानपरायण ॥५२॥
त्यांस साक्षात्कार होत । मंत्ररूपें ब्रह्माचा पुनीत । तेथ तल्लीनभावैं संचार करित । योगीजन सर्वदा ॥५३॥
महाप्रलयीं महेशशरीरीं लीन । होती पुनरपि उत्पन्न । योगरत जन महान । मंत्रातीत मंत्रार्थातीत ॥५४॥
ऐश्या स्थितींत ब्रह्मयांत स्थित । आपापल्या इष्टजनांत । काशींत जे पापी मरत । त्यांस न देई तारक मंत्र ॥५५॥
ते पापीजन भैरवाच्या हस्तें भोगत । यातना बहुविध जगांत । तदनंतर कैलासीं येत । लय होता जगताचा ॥५६॥
ते जन मरती परी पुनः जन्मती । शौनक म्हणे सूताप्रती । मुनी ब्रह्मवादी सांगती । क्षेत्रांत मरतां मुक्तिलाभ ॥५७॥
तीर्थांत स्नान करितां प्राप्त । मुक्ति होते जनांप्रत । व्रतादि बहुविध ज्ञात । नानामतानुसार ॥५८॥
सकास कर्मे जे करिती । त्यांसी तीं तीं फळें लाभती । त्या कर्मांचे कर्ते लाभती । काहीं जन फळें या जगीं ॥५९॥
कांहीस कर्मफळ परलोकांत । लाभतें ऐसें असे ख्यात । कांहींस अल्प फळ प्राप्त । कांहींस लाभे पुष्कळ ॥६०॥
हें कौतुक काय असत । तें सांगा सुता आम्हांप्रत । काशींत विशेष मुक्त जन लाभत । तरी पुनर्जन्म जनां कैसा ॥६१॥
सूत तेव्हां त्यांस सांगत । शब्दब्रह्मस्वरूप गुरु एथ असत । सर्व विविध शिष्यांस यांत । संशय कांहीं असेना ॥६२॥
चार प्रकारचे शिष्य ख्यात । उत्तम मध्यम अधम अधमाधम जगांत । जे विषयासक्तचित्त । पापकर्मपरयण ॥६३॥
ते अधमाधमस्वरूप ज्ञात । दुःखयुक्त सदा अत्यंत । त्यांस स्वल्प फळ लाभत । हललोकीं तैसें परलोकीं ॥६४॥
त्यांस स्वल्प फळही न देत । जरी प्रभु तरी सत्कर्मांत । त्यांना रुचि ना वाटत । म्हाणोनि थोडें फळ त्या मूर्खां ॥६५॥
दुसर्‍यांच्या लाजेनें वा भयास्तव । कर्म करिती जे सदैव । ते अधम शिष्य वास्तव । त्यांसी अधिक फळ लाभे ॥६६॥
सकास जे स्वधर्मरत । कर्म करिती आपुलें सतत । ते मध्यम शिष्य असत । कालानुसार फळ भोगिती ॥६७॥
जे निष्काम कर्में करिती । ते उत्तम शिष्य जगतीं । अक्षय फळ ते भोगिती । आकल्पान्त निःसंशय ॥६८॥
कर्माच्या फळाविषयीं ज्ञात । युगमानाचा प्रभाव निश्चित । कृतयुगीं केलें कर्म होत । त्वरित फलदायी जगीं ॥६९॥
त्रेतायुगिं जें कर्म घडत । कालांतरें फळ देत । अन्य कर्म बाधा तयाप्रत । म्हणोनि विलंब होतसे ॥७०॥
द्वापरयुगीं अन्यकर्मबाधा होत । त्यायोगें इहलोकांत । अथवा भोगिती परलोकांत । फळ केल्या कर्मांचें ॥७१॥
धर्महीनप्रभावें कलियुगांत्त । परलोकीं वा पुढील जन्मांत । कृतकर्मांचें फळ लाभत । ऐसा प्रभाव कालमानाचा ॥७२॥
आसुरादि स्वभावें होत । प्राणी सत्ताविवर्जित । त्यायोगें रुचि अनुसार वर्तत । भिन्न फळ कर्मांचें ॥७३॥
जरी कर्म यथाविधि घडत । तरीच संपूर्ण फळ लाभत । अन्यथा कर्त्यासी प्राप्त होत । आसुरी फळ त्या कर्माचें ॥७४॥
कृतयुगांत एकदां कर्म करित । तरी त्याचें फळ लाभत । त्रेतायुगांत द्विगुण आचरित । निष्फळ एकदा करून ॥७५॥
द्वापरयुगीं त्रिगुण कर्म करित । तेव्हां लाभे फळ निश्चित । कलियुगीं चौपट कर्म उचित । फळ लाभण्या इहलोकीं ॥७६॥
सत्कर्म एकदाच करून । मानव लाभे फळ पावन । अथवा युगधर्मानुसार चतुर्गुण । कर्म करितां फळ लाभे ॥७७॥
काशी आदि क्षेत्रांत । माहाम्य जें असे ख्यात । त्याचा विपरीत अनुभव येत । कां तें आतां सांग ॥७८॥
जो नर आत्मानुभवविहीन । त्यास मोक्षलाभ अशक्य जाण । हें मुख्य असें कारण । अन्यत्र सारें । भ्रममात्र ॥७९॥
सारे देव अमर ख्यात । परी ब्रह्मदेवाच्या दिवसान्तीं ते होत मृत । मानवांचे हया अवधींत । होती असंख्या जन्म जाणा ॥८०॥
ह्या तुलनेनें देवांस अमर । म्हणती शास्त्रांत पंडितवर । तथापि पांच देव ते ईश्वर । वर्णिले असती शौनका ॥८१॥
ते महाप्रलयांत मृत्यु पावत । त्रिगुणांसह हें निश्चित । ब्रह्मादि देव अनीश असत । त्यांच्या लोकीं मुक्तिही तैसी ॥८२॥
त्या देवांच्या लोकांत । तैसेच क्षेत्रीं जी लाभत । ती मुक्ति ती यथार्थ नसत । अक्षर अव्यय मोक्षगती ॥८३॥
इंद्रादी देव महाप्रलयांत । प्रथम विनाश पावत । म्हाणोनि पंचदेवांचा मृत्युअ न दिसत । अन्य कोणा देवासी ॥८४॥
म्हणोनी त्यांचें जन्ममरण । कोणीही अन्य न बधे म्हणून । ह्या पांच देवांचें ईश्वरत्व सुजाण । अमरत्वही कथिलें असे ॥८५॥
ते जन्ममृत्युविहीन वर्णित । हया अर्थानें शास्त्रांत । कथिला वेदपुराणशास्त्रांत । लयवर्जित स्वानंद ॥८६॥
सदा स्वानंद ब्रह्ममय असत । म्हणोनि मुक्ति विशेषयुक्त । स्वानंदानें जें लाभत । तेंचि ब्रह्म सौख्यप्रद ॥८७॥
पात्रहीनप्रभावें वर्णित । द्विज जे अज्ञानें अन्यत्र भ्रमयुक्त । अन्य तीर्थक्षेत्रेंही असत । मुक्तिप्रद ऐसें शास्त्रवचन ॥८८॥
सप्त पुरीमाजीं सहापुरींत । जातां नर मृत्युंगत । तो काशीपुरींत जन्मत । तेथ मरणें तारक लाभ ॥८९॥
तारक मंत्र ज्ञानयुक्त । लाभतां नर पुनर्जन्मांत । योगी होऊन प्राप्त करित । इष्ट ब्रह्मपद निःसंशय ॥९०॥
गणेशयोग ऐकून । नंतर करी पापकर्म दारुण । परी मृत्युकाळीं होता स्मरण । मयूरक्षेत्रीं जन्म पावे ॥९१॥
जेथे कोठें तो नर असे । तेथून मयूरक्षेत्रीं विशेषें । येऊनिया मरतसे । महात्पापीअ असला तरी तो ॥९२॥
अथवा क्षेत्रमाहात्म्य ऐकत । नंतर कोठेही असो राहत । जरी मरणकाळीं स्मरत । तरी तो तैसाही होईल ॥९३॥
अथवा मयूरक्षेत्रीं यात्रा करित । नंतर कोठेही मृत्यु पावत । जरी अंतीं तो स्मरत । तरी तैसाचि होईल ॥९४॥
किंवा संगतीनें निर्माण । गणेशप्रेम ज्याच्या मनीं महान । त्यास मयूरक्षेत्रीं मरण । येतें यांत न संशय ॥९५॥
शिवविष्णु आदिअ लोकांत । जरी कोणी भक्त वसत । परी असेल गणेशप्रीतियुक्त । तो मयूरीं जन्मतो ॥९६॥
अति संस्कारेंसंयुक्त । जो क्षेत्रांत धर्म आचरित । जो क्षेत्रसंन्यास भावें लाभत । मरण मयूरक्षेत्रांत ॥९७॥
योगी शांतिरूप जे जोडित । आपुलें चित्त गणेश्वरीं विनत । ते जेथेंही होतील मृत । ते गणेशरूप होती ॥९८॥
योग्यांच्या मरणकाळीं स्मरण । जैसें असेल तैसी गति लाभून । तो ब्रह्मांत होतो लीन । ऐसा महिमा जाणावा ॥९९॥
अंतकाळीं जैसी मति । तंसी लाभते मग गति । हा न्याय तयांप्रति । मृत्यु पावती जे मयुरक्षेत्रांत ॥१००॥
हें सर्व तुज सांगितलें । आतां कथानक मागचें ऐक भलें । त्या राजाचें वृत्त ऐकिलें । मुद्‍गलमुखांतुनी जें मीं ॥१०१॥
भ्रुशुंडी म्हणे देवांप्रत । मयूरक्षेत्रीं निवास करित । परी तो नृप सोडून जात । काशीनगरींत रहावया ॥१०२॥
तेथ जेव्हां तो मृत्यु पावत । तेव्हां मयूरक्षेत्र स्मरत । त्यायोगें महेश्वर त्यास देत । गाणेश्वर मंत्र महान ॥१०३॥
स्त्रीसहित तो शिवरूप राहत । कैलासावरी आनंदांत । महालयीं शिवांत लीन होत । पुनरपि जन्मला मयूरक्षेत्रीं ॥१०४॥
तो ब्राह्मणकुळांत जन्मला । त्याचा योग्य काळीं विवाह झाला । स्त्रीसहित तो राहिला । भक्तिसंयुत मयूरगांवीं ॥१०५॥
तेथ स्वल्प काळें होत । तो ब्राह्मण योगयुक्त । जिवंत असतांच ब्रह्मभूत । तैं मरणानंतर काय कथा ॥१०६॥
ऐशापरी संस्कारयोगें राहत । कांहीं काळ जे मोरगावांत । ते जगीं कुठेंही वसोत । अंतीं जाती मयूरग्रामीं ॥१०७॥
क्षेत्रसंन्याश्यांचा मार्ग सांगत । देवांनो आतां तुम्हांप्रत । आधीं द्वारयात्रा करित । संन्यासकारणें गणेशयोगी ॥१०८॥
नंतर क्षेत्रांत राहून । पाळावे सारे नियम पावन । जाऊं नये क्षेत्र सोडून । बाहेर कोठें कदापि ॥१०९॥
ऐसें जरी तो करित । तरी संन्यासव्रत भंग होत । नाना सुखें जरी येत । तरीही त्याग न करावा ॥११०॥
ऐसें जरी योगी करित । तरी तो गणेशतुल्य होत । देवागाराची यात्रा करित । द्वारयात्रेसहित तो ॥१११॥
अंत्यायात्रा न करित । क्षेत्रबाहय प्रवेश वर्ज्य असत । क्षेत्रसीमेंत जे असत । त्या देवांची यात्रा करावी ॥११२॥
यात्राविचार तो निरंतर । योग्यांचा गुरु थोर । याविषयीं इतिहास क्षेत्रपर । सांगेन पुन्हां सांप्रत ॥११३॥
जामदग्न्य ब्राह्मण सोमदत्त । बाल्यापासून त्यास असत । विघ्नेशाची भक्ति अत्यंत । तारूण्यांतही ती वाढवी ॥११४॥
विवाहानंतर पत्नीसहित । तो आश्रम सोदून जात । मयूरक्षेत्रीं आश्रय घेत । यात्रा करी द्वारादि सहित ॥११५॥
नंतर मयूरक्षेत्रीं करण्या वास । दृढ करी तो मानस । घेऊनियां क्षेत्रसंन्यास । राहिला मयूरक्षेत्रांत ॥११६॥
तेथ एकदां राक्षससेना येत । दारुण राक्षस हल्ला करित । त्या राक्षसां पाहून पळत । क्षेत्रनिवासी जन सारे ॥११७॥
परी दृढ आग्रह करून । तो सोमदत्त राही एकनिष्ठ मन । मयूरेशपरायण । देवांनो क्षेत्रसंन्यासी ॥११८॥
त्या महाभागास पकडिती । राक्षस क्रोधभरल्या चित्तीं । त्यास अत्यंत ताडिती । कर्मंखंडन करावया ॥११९॥
तथापि तो स्वधर्म न सोडित । सोमदत्त तो गणेशभक्त । मद्यमांसादिक त्यास देत । राक्षस बलात्कारनें ॥१२०॥
तथापि धैर्य धरून । विघ्नेश्वराचें करी स्मरण । मयूरेशाचें करी पूजन । भयसंकुल चित्तानें ॥१२१॥
ते राक्षस त्यास बांधून नेती । खर राक्षसाच्या पुढें उभा करिती । त्यास कारागृहीं टाकिती । खरराक्षसाच्या आज्ञेनें ॥१२२॥
तो मयूरेशपरायण करित । उपोषणपर मानस पूजा सतत । अतिशोकें होत संतप्त । ध्यात ह्रदयांत गजाननासी ॥१२३॥
तदनंतर भख्तास्तव होत । विघ्नेश्वर प्रसन्न अत्यंत । तो त्या राक्षसेशास पीडित । विघ्न दारुण निर्मूनिया ॥१२४॥
शूर्पणखा त्या खर राक्षसाप्रत । येऊन सांगे करुण वृत्तान्त । छित्र नासिका ती दिसत । तें पाहून खर क्रुद्ध झाला ॥१२५॥
तो रामावरी चालून जात । राम त्यास वधी राक्षसांसहित । जो पीडा देत गणेशभक्ताप्रत । त्याचें मरण ओढवतें ॥१२६॥
नंतर क्षेत्रनिवासी जाऊन । आणिती सोमदत्तास सोडवून । अति हर्षित होऊन । पुनरपि मयूरक्षेत्रांत ॥१२७॥
ऐसा नानाविध दुःखांनी पीडित । परी तो क्षेत्रत्याग न करित । त्या मुनिसत्तमा साहाय्य करित । गणेश्वर देव भक्तितुष्ट ॥१२८॥
तो सोमदत्त त्यासी पूजित । गणेश त्यास ईप्सित देत । गणेशाजवळी तो मागत । सतत सान्निध्य देवांचें ॥१२९॥
म्हणे देवा तुझ्या समीप राहून । स्वानंद मार्ग परयण । करीन नित्य तुझें भजन । मयूरेश तथास्तु म्हणे ॥१३०॥
महेशांनोअ तो योगप्रिय ख्यात । जाहला सोमदत्त । गणेशभक्त । ऐसे नाना जन घेत । क्षेत्रसंन्यास त्या जागीं ॥१३१॥
अनेक महाभागांस सिद्धि लाभत । त्यांचें वर्णन शब्दातीत । परी संक्षेपें सांगितलें सारभूत । उत्कंठ तुमची जाणूनी ॥१३२॥
हें क्षेत्रसंन्यासमहिमान । वाचनें श्रवणें सौख्यद पावन । त्यानें भक्ति वाढून । अंतीं गणेशसायुज्य लाभे ॥१३३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे षष्ठे खण्डे विकटचरिते क्षेत्रसंन्यासादिवर्णनं नाम द्वाविंशतितमोऽध्यायः
समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP