मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
व्यास भारती कथन भांडती...

रामजोशी - व्यास भारती कथन भांडती...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


व्यास भारती कथन भांडती पांडवकौरववीर ।

पार्थरथीं सारथी यदुवीर ॥ध्रु०॥

कुरुक्षेत्राचे ठायीं लढाया युध्दसमयी म्हणऊन ।

महा महा वीर उभे येवून ।

सात क्षोणी पांडव कौरव आकरा क्षोणी जमऊन ।

दोन्ही दळें सिध्द होऊन ।

अठरा क्षोणी म्हणती परी एकाचे एक ऐकून ।

कुणी न पाहती शोधून ।

काय बोल ग्रंथाला वाचिक अर्थ काढिना नीर ।

पदार्थी काय फिरुन परवीवर ॥१॥

भीष्म शंतनुपुत्र उभा रणांगणीं प्रणयानळ ।

दुसरा पार्थ प्रतापी बळ ।

बाणांचा मंडप आकाशीं रविचा रथ आडकळ ।

आसन इंद्राचें डळमळ ।

एकच गर्दी कडकड उसळली मिळाली दोन्ही दळें ।

मांडली हातघाई तुंबळ ।

वीर विरास भिडती उडती चेंडूसारखीं शिरं ।

रक्त लोहांत वाहती कुंजर ॥२॥

अठरा दिवसामधीं समाप्त झालें रणकंदन ।

जसें ( ग बाई ) बंगाली दृष्टबंधन ।

महा महा वीर मेले शेवटीं वधिला दुर्योधन ।

आटपलें राज्याचें साधन ।

आटली दोन्ही दळें त्यांत राहिले सप्तशंदन ।

पांडव कृपा गुरुनंदन ।

अश्वमेघ मग केला जिकडे तिकडे झालें स्थीर

पटीं बैसविला युधिष्ठिर ॥३॥

दोन्ही दळें किती क्षोणी होत्या याची चौकशी करा ।

शोधुनिया तरी लावावा बरा ।

गजरथ घोडे कुंजर वीर गणती पायदळाची धरा ।

किती त्याखालीं आटली धरा ।

किती कोश गज तसू एकांतर बोलावें उत्तरा ।

आळस कविराया करुं नये जरा ।

कविराय गुणी करीत कवन हें नाथ कृपेचा धीर ।

शास्त्रसंमत अर्थाचे तीर ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP