मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
महाराज गवरीनंदना अमरवंद...

रामजोशी - महाराज गवरीनंदना अमरवंद...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


महाराज गवरीनंदना अमरवंदना दैत्यकंदना हे मंगलमूर्ती ।

ठेवी कृपादृष्टि एकदंत दीनावर पुर्ती ॥

हे शुभदायका हे गणनायका गीतानायका अढळ दे स्फ़ूर्ति ।

भवसमुद्र जेणेंकरुन सहजगति तरती ।

म्हणउन लागतो चरणी गजमुखा ।

दे देवा निरंतर स्मरणींच्या सुखा ।

दूर करी अंत:करणींच्या दु:खा ।

जय हेरंब लंबोदर स्वरुपसुंदरा स्वामीसहोदरा हे विघ्ननिवारी ।

मज रक्षीं रक्षीं सहकुटुंब सहपरिवारीं ॥ध्रु०॥

हे गणेश हे माधवा हे गवरीधवा लोकबांधवा मित्र तमारी ।

उदयोस्तु अंबे आदिकुमारी. ॥१॥

जय गोविंद जनार्दन हे मुरमर्दना दु:खकर्दना साधुसहवासा ।

वांछितों भ्रमर मी तव चरणांबुजवासा ।

हे त्रिभुवनप्रतिपालका हे ऋषिबाळका चित्तचालका हे क्षीरनिधिवासा ।

हे रमारमण गरुडध्वजा जगन्निवासा ।

हे सर्वसाक्षी मधुसूदना श्रीपती ।

तुज दानव सुहास्यवदना कांपती ।

किति गेले त्यजुनि यमसदना संपती ।

जयजय गुरुपरमानंद विश्वमूळकंद लागो मज छंद रामनिर्धारीं ।

मागणें हेंचि भगवान पितांबरधारी ।

हे गणेश हे माधवा हे गवरीधवा लोकबांधवा मित्र तमारी ।

उदयोस्तु अंबे जगदंबे आदिकुमारी ॥२॥

हे रामनामघोषणा विश्वशोषणा मदननाशना हे भूप्रतिपाळा ।

हे स्मशानवासा कैलासाद्रिपाळ ॥

हे पापदग्धदर्शना विषप्राशना भस्म-भूषणा हे सांब कृपाळा ।

उठे दिव्य जटेंतून निर्मळ उदकउमाळा ॥

हे व्याघ्रांबरपरिधाना शंकरा ।

कैलासब्रह्मांडनिधाना किंकरा ।

हे प्रसन्नकर्मनिधाना सुखकरा ।

हे पंचानन दशभुजा हे वृषभध्वजा भावें करी पुजा राम निर्धारीं ।

हे भालचंद्र गंगाधर हर त्रिपुरारी ।

हे गणेश हे माधवा गवरीधवा लोकबांधवा मित्र तमारी ।

उदयोस्तु अंबे जगदंबे आदिकुमारी ॥३॥

हे नारायण दिनकरा हे कमलाकरा भानुभास्करा हे अगणितकिरणा ।

करिं शंखचक्र देदिप्यतेजविस्तीर्णा ।

पुढें गरुडाग्रज सारथी विराजित रथीं परम पुरुषार्थी भक्तउध्दरणा ।

कल्याण इच्छिसी सदैव उत्तमवर्णा ॥

वासरमणि प्रकाशगहना तूं ।

दासाशीं सदय हयवदना पाव तूं ।

दे देवा जवळ रिपुदहना ठाव तूं ।

आलों अनन्यभावें शरण दाखवीं चरण त्वरित करिं हरण दुष्कृतें सारी

पावलों कष्ट मी बहुत या संसारीं ।

हे गणेश हे माधवा हे गवरीधवा लोकबांधवा मित्र तमारी ।

उदयोस्तु अंबे जगदंबे आदिकुमारी ॥४॥

नमो नमो हे माहेश्वरी हे जगदेश्वरी मुख्य ईश्वरी आदि भवानी ।

मांडिलें नृत्य कौतुकार्थ विष्णुशिवांनीं ।

तिन्ही त्रिकाळ गणगंधर्व न करितां गर्व साधुनी पर्व सर्व देवांनी ।

केली प्रसन्न तुजला गाऊन मधुरावाणी ।

हे प्राणी प्राण तव स्मरणीं जगवती ।

शशीसूर्य तुझा बळभरणीं उगवती ।

हे धन्य धन्य अन्नपूर्णे भगवती ।

कविराय असा हा दक्ष सेवेमधी लक्ष तयाचा पक्ष धरुन तूं तारीं ।

महादेव प्रभाकर रक्षी या अवतारीं ।

हे गणेश हे माधवा हे गवरीधवा लोकबांधवा मित्र तमारी ।

उदयोस्तु अंबे जगदंबे आदिकुमारी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : February 16, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP