मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
दो दिवसांची तनु ही सा...

रामजोशी - दो दिवसांची तनु ही सा...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


दो दिवसांची तनु ही साची, सुरतरसाची करुनि मजा ।

गमजा करितां मनिं उमजाना हें सुख न पुढें पडेल वजा ।

भाई सावध व्हा ॥ध्रु०॥

आज उद्यांचा पूर नद्यांचा वलयगद्यांचा बहर नवा ।

उलट्या झाल्या कुलटा रांडा मग कोठिल हो मालपुवा ।

पाट बसाया ताट रुप्याचें दाट त्यामध्यें दुध-रवा ।

धनावयाला बसेल घसरा मग विसरा हो गोड खवा ।

रांडा पोरे वंचक चोरे जंवर मिळवितां तंवर थवा ।

शितें तंवर तीं भुतें भोवतीं कोण कुणाचा सखा जिवा ।

जोंवरि पैसा तोंवरि बैसा मंचकिं म्हणतिल घ्याल हवा ।

बेटा बेटी हातीं नरोटी देतिल हा खूप समज ठिवा ।

पातकांत कीं घात होतसे हात जोडितों हरिसि भजा ।

फ़ुका सुखाला मुकाल कथितों न कालचा दिन आज दुजा ।

दो दिवसांची तनु ही साची भाई सावध व्हा ॥१॥

कनकधनाचा मद मदनाचा वोसरल्यावर रंग फ़िका ।

रुका न पदरीं विकाल घर मग विलास भरजरी कुठुन हुका ।

गजरथ घोडा कलगी तोडा पायीं जोडा लालझुका ।

तोडा जाउनि खोडा येईल बसेल एखादा धरमधका ।

सुगंधशाला नरम दुशाला गरम मसाला पान पका ।

हार तुरे हे बरे न पुढती बुरे हाल खेळाल बुका ।

कोकशाला नाटकशाला दासी यांचा घ्याल मुका ।

कामुक होऊनि का मूकतां परमार्थ सुखाला देह विका ।

कदममुलाजा यांत भुला जा तुम्हां न लाजा मनिं समजा ।

दुत यमाचे मूत आणितील नेला तुमचा बाप आजा ।

दो दिवसांची० ॥ भाई सावध व्हा ॥२॥

पुरे करा या मौजा तेथुनि फ़ौजा झाल्याचि रवाना ।

यमदुताची ढाल बिनीवर बालसफ़ेदी देखाना ।

पुढें यमाचे खडे दुत हे बडे हरामी समजाना ।

मार मारतिल फ़ार कुणी मग मामा काका गौसेना ।

रांडा आतां मांडा चारिति खांडा म्हणतिल करा चुना ।

मूल कुणाचें भूल तुम्हाला चूल चालती तंवर म्हणा ।

तडका येतील सारे अडका हुडकायाला मरतांना ।

पीठ गिळेना मीठ मिळेना ऐसें करितील ऐकाना ।

वेडा होईल परिजन वेडा म्हणतिल, पेढा आठिव जा ।

अडाल भूवरि पडाल मग तुम्हि रडाल न म्हणा काळ खुजा

दो दिवसांची० ॥ भाई सावध व्हा ॥३॥

सुभा करुनि मनसुभा येखादा उभा करा परिवार भरा ।

काय तुम्हाला यांत सांचले आंत वांचले आयुधरा ।

दार-जनांला हार नगांचे भार मुलिस मुलग्यांस तुरा ।

द्याल पुन्हा जरि घ्याल न देतिल तुम्हांसि त्यांतिल जरा चुरा ।

कां मरतां धनलोभें फ़िरता पुरता याचा शोध करा ।

कोण तुम्हालां वाली तो वनमाली लाविल पैलतिरा ।

लोहधनाच्या जाड कवाडा आड बसा कीं बाड चिरा ।

काळ सखत पाताळतळांतुनि काढिल अंबुधिमाजि शिरा ।

फ़ार कशाला सार सांगतो बारबार जन्मा न वजा ।

कविरायाचा बोल नव्हे की फ़ोल डोल ध्यानीं उमजा ।

दो दिवसांची० ॥ भाई सावध व्हा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP