मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|
नरनारायणाख्यान

कीर्तन आख्यान - नरनारायणाख्यान

कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.


पूर्वी नारायण या नावाचा एक ऋषि होऊन गेला. त्याने बद्रिकाश्रमात राहून तप आरंभिले; तेव्हा त्याचे उग्र तप पाहून इंद्राला आपल्या पदाविषयी शंका आली व त्याने काम क्रोध वगैरे मंडळी अप्सरांसह त्याच्याकडे त्याच्या तपाचा भंग करण्याकरिता रवाना केली. त्याप्रसंगी नारायणाने आपली शांति ढळू न देता त्यास फजित केले अशी कथा त्या आख्यानात आहे.

ओव्या

जे अ-जन्मा नित्य त्रि-भुवनी ॥

जो न जन्मोनि जन्मला योनी ॥

तेणे धर्माची धर्म-पत्‍नी ॥

केली जननी दक्ष-कन्या मूर्ती ॥१॥

ते मूर्ती मातेच्या उदरी ॥

नर-नारायण अवतारी ॥

एकचि दो रूपे करी ॥

धर्माच्या घरी अवतरले ॥२॥

तेणे नारदादिकांस जाण ॥

निरूपिले नैष्कर्म्यलक्षण ॥

स्वये आचरला आपण ॥

ते कथन ऐक राया ॥३॥

नारायण म्हणसी कोणे देशी ॥

तो बदरिकाश्रमी आश्रम-वासी ॥

नारद-सनकादिक ऋषि ॥

अद्यापि त्यापाशी सेवे असती ॥४॥

त्यासि स्वरूपाचे लक्ष ॥

सहजी असे प्रत्यक्ष ॥

ते स्वरूप-निष्ठेचा पक्ष ॥

अलक्ष्याचे लक्ष प्रबोधी स्वये ॥५॥

तया स्वरूपाचा निज-बोध ॥

स्वये पावावया विशद ॥

अद्यापवरी ऋषि-वृंद ॥

नित्य संवाद करिताती त्यासी ॥६॥

जे स्वरूप लक्षेना जनी ॥

ते विशद करून दे वचनी ॥

तेचि अनु-ग्रहे करूनी ॥

अनु-भवा आणी तत्काळ ॥७॥

ज्ञाते बहुसाळ ऋषीश्वर ॥

त्यामाजी नारायण अवतार ॥

तेथे वर्तले जे चरित्र ॥

अति विचित्र ऐक राया ॥८॥

ऐसा नारायणाचा प्रताप ॥

देखोनि निष्ठा दृढ तप ॥

तेणे इंद्रासि आला कंप ॥

म्हणे स्वर्ग निष्पाप घेईल माझा ॥९॥

त्याचे तप देखोनि परम ॥

म्हणे गेले गेले स्वर्ग-धाम ॥

इंद्र कोपे प्रेरिला काम ॥

अप्सरा-संभ्रमसमवेत ॥१०॥

कामसमवेत अप्सरा ॥

सवे वसंतही दूसरा ॥

क्रोध अवघिया पुढारा ॥

जो तापसांते पुरा नागवी सदा ॥११॥

तीर्थोतीर्थींच्या अनुष्ठाना ॥

क्षमा नुपजे अंतःकरणा ॥

कोप येताच जाणा ॥

करी उगाणा तपाचा ॥१२॥

क्रोध तापसांचा उघड वैरी ॥

तापसा नागवी नाना-परी ॥

तोही नारायणावरी ॥

अवघ्या अग्नी चालिला ॥१३॥

ऐशी मिळोनि विरुदाइते ॥

आली बदरिकाश्रमा समस्ते ॥

नारायण तप करी जेथे ॥

उठावली तेथे अनुक्रमेसी ॥१४॥

वसते श्रृंगारिले वन ॥

कोकिळा कलारावे गायन ॥

सुगंध शीतळ झळके पवन ॥

पराग संपूर्ण वर्षती सुमने ॥१५॥

शस्त्रे तोडिता आकाशासी ॥

आकाश स्वये सावकाशी ॥

तेवी कामे छळिता नारायणासी ॥

तो निज-संतोषी निर्द्वद्व ॥१६॥

नेणता नारायण-महिने ॥

धावोनि घाला घातला कामे ॥

तेव्हा अवघीच पराक्रमे ॥

स्व-निंद्यकर्मे लाजली ॥१७॥

तेथे अवघी झाली पराङ्‌मुखे ॥

पाठमोरी निघाली अधोमुखे ॥

तेव्हा त्यांची गती निःशेखे ॥

नारायण देखे खुंटली ॥१८॥

इंद्रियनियंता नारायण ॥

नेणूनि छळू गेली आपण ॥

यापुढती पुनरागमन ॥

सर्वथा जाण करवेना ॥१९॥

मागे न निघवे निश्चिते ॥

ऐसे जाणोनि समस्ते ॥

थोर गजबजिली तेथे ॥

भय-चकिते व्याकुळ ॥२०॥

जाणोनि नारायण-प्रताप ॥

आत कोपून देईल शाप ॥

येणे धाके म्लानरूप ॥

अति स-कंप भय-भीते ॥२१॥

ऐशी देखोनि त्यांची स्थिती ॥

कृपेने तुष्टला कृपा-मूर्ती ॥

अणुमात्र कोप न ये चित्ती ॥

अभिनव शांती नारायणाची ॥२२॥

इंद्रे केला अपराध ॥

तरी नारायणासी न येचि क्रोध ॥

बाप निज शांती अ-गाध ॥

न मानी विरुद्ध कामादिकांचे ॥२३॥

न येचि कामादिकांवरी कोप ॥

इंद्रासही नेदीच शाप ॥

नारायणाच्या ठायी अल्प ॥

कदा विकल्प नृपजेची ॥२४॥

अपकार्‍यावरी जो कोपला ॥

तो तत्काळ कोपे नागविला ॥

अपकार्‍या जेणे उपकार केला ॥

तोचि लाधला परमार्था ॥२५॥

अपकार्‍या उपकार करिती ॥

त्याचि नाव गा परम शांती ॥

ते शांतीची निज स्थिती ॥

दावी लोकांप्रती आचरोनी ॥२६॥

परमार्थाची मुख्यत्वे स्थिती ॥

पाहिजे गा परम शांती ॥

ते शांतीची उत्कट गती ॥

दावी लोकांप्रती आचरोनी ॥२७॥

भय-भीत कामादिक ॥

अप्सरा-गण साशंक ॥

त्यांते अ-भय दाने सुख ॥

देऊनिया देख नारायण बोले ॥२८॥

आहो कामवसंतादिक स्वामी ॥

कृपा करून आलेत तुम्ही ॥

तुमचेनि पदागमी ॥

आश्रम-भूमि पुनीत झाली ॥२९॥

तुमचे झालीया आ-गमन ॥

अवश्य करावे आम्ही पूजन ॥

हेचि आमुचे अनुष्ठान ॥

काही बळि-दान अंगीकारा माझे ॥३०॥

अहो अप्सरा देवकांता ॥

तुम्ही भिऊ नका सर्वथा ॥

एथे आलिया समस्ता ॥

पूज्य सर्व तुम्ही मज ॥३१॥

आश्रमा आलिया अतिथी ॥

जे कोणी पूजा न करिती ॥

त्यांची शून्य पुण्य-संपत्ती ॥

आश्रम-स्थिती शून्य होय ॥३२॥

तुम्ही नांगी-कारिता पूजन ॥

काही न घेता बळि-दान ॥

गेल्या आश्रम हा होईल शून्य ॥

यालागी कृपा करून पूजा घ्यावी ॥३३॥

आश्रमा आलिया अतिथी ॥

तो पूज्य सर्वांस सर्वार्थी ॥

अतिथी आश्रमी जे पूजिती ॥

ते आश्रम-कीर्ती शिववानी ॥३४॥

व्याही रुसलिया पाया पडती ॥

तेवि वि-मुख जाता अतिथी ॥

जे वंदूनिया सुखी करिती ॥

ते सुख पावती स्वानंदे ॥३५॥

व्याही रुसलिया कन्या न धाडी ॥

अतिथी रुसलिया पुण्य-जोडी ॥

पूर्वापर जे का जोडी ॥

तेही रोकडी क्षय पावे ॥३६॥

वैकुंठी ज्याची निज-स्थिती ॥

तो त्या आश्रमा ये नित्य वस्ती ॥

जे आश्रमी अतिथी ॥

पूजिती प्रीती ब्रह्मात्म-भावे ॥३७॥

ऐसे बोलिला तयांप्रती ॥

परी माझी हे अ-गाध शांती ॥

हेही नारायणाचे चित्ती ॥

गर्व-स्थिती असेना ॥३८॥

ऐक राया अति-अपूर्व ॥

असोनि निज-शांती अनुभव ॥

ज्याच्या ठायी नाही गर्व ॥

तोचि देवाधिदेव निश्चयेसी ॥३९॥

जो नित्य नाचवी सुर-नरांसी ॥

ज्या भेणे तप सोडिले तापसी ॥

त्या अ-भय देवोनि काम-क्रोधांसी ॥

आपणापासी राहविले ॥४०॥

एवं अ-भय देत नारायण ॥

स्व-मुखे बोलिला आपण ॥

तेणे कामादि अप्सरा-गण ॥

लाजविरोन अधोमुख झाली ॥४१॥

निर्विकार पूर्ण क्षमा ॥

श्री-नारायण हा परमात्मा ॥

कळो सरले वसंतादि-कामा ॥

त्याचाचि महिमा वर्णिती स्वये ॥४२॥

ऐके नर-देव-चक्रवर्ती ॥

विदेहा सार्वभौमा भू-पती ॥

त्या नारायणाची निज-स्तुती ॥

कामादि करिती सद्भावेसी ॥४३॥

जे सदा सर्वाते छळिती ॥

त्याही देखिली पूर्ण शांती ॥

तेचि शांतीची स्तुती करिती ॥

नारायणप्रती कामादि क्रोध ॥४४॥

जेणे संतोष श्री-नारायण ॥

त्यासी कृपा उपजे पूर्ण ॥

ऐशिया परीचे स्तवन ॥

मांडिले संपूर्ण परमार्थ-बुद्धी ॥४५॥

जय-जय देवाधिदेवा ॥

तुझिया अ-विकार-भावा ॥

पाहता न देखे जी सर्वा ॥

देवा मानवा माझारी ॥४६॥

मज मन्मथाचा यावा ॥

न साहवे देवा दानवा ॥

मग तेथे इतरा मानवा ॥

कोण केवा सहावयासी ॥४७॥

त्या मज कामा न सरते केले ॥

शांतीचे कल्याण पाहिले ॥

हे तुवांचि एके यश नेले ॥

स्व-भाव जिंकिले निज-शांति-योगे ॥४८॥

तो मी न सरता केला काम ॥

क्रोधा आणिला उप-शम ॥

वासनेचा संभ्रम ॥

नित्य निर्भ्रम त्वां केला ॥४९॥

हे नारायणा तुझी निष्ठा ॥

न ये आणिका तपोनिष्ठा ॥

केला अनुभवाचा चोहटा ॥

शातीचा मोठा सु-काळ केला ॥५०॥

मागे तपस्वी वाखाणिले ॥

म्हणती काम-क्रोधा जिंकले ॥

त्यांसिही आम्ही पूर्ण छळिले ॥

ऐक ते भले सांगेन ॥५१॥

कपिला ऐसो तेजोराशी ॥

क्रोधे तत्काळ छळिले त्याशी ॥

शाप देतांचि सगराशी ॥

तोही क्रोधासी वश्य झाला ॥५२॥

जो सर्वदा विघ्नाते आकळी ॥

विघ्नेशाते कोप छळी ॥

तेणे अति कोपे कोपानळी ॥

चंद्रासी तत्काळी दिधला शाप ॥५३॥

कोप आला दुर्वासासी ॥

शाप दीधला अंबरीषासी ॥

देव आणिला गर्भ-वासासी ॥

क्रोधे महा ऋषी छळिले ऐसे ॥५४॥

जे दुजी सृष्टी करू शकती ॥

तेही काम-क्रोधे झडपिजेती ॥

सागरी पडे इंद्र-संपत्ती ॥

हे क्रोधाची ख्याती पुराण-प्रसिद्ध ॥५५॥

इतरांची गोष्टी कायसी ॥

क्रोधे छळिले ईश्वरासी ॥

तेणे क्षिता द्विज-दक्षासी ॥

शिर-च्छेदासी करविता झाला ॥५६॥

जेथे मी काय काम स्वये वसे ॥

तेथे क्रोध वसे सावकाशे ॥

काम-क्रोध असताचि नसे ॥

नारायण ऐसे तुवा केले ॥५७॥

हे परमाद्‍भुत तूझे ॥

वीर्य आणिका एवढे नाही धैर्य ॥

यालागी तुझे परिचर्य ॥

सदा मुनि-वर्य सेविती चरण ॥५८॥

शांतीच्या चाडे देवाधिदेवा ॥

जे नित्य करिती तुझी सेवा ॥

ते काम-क्रोधादि स्व-भावा ॥

स्मरता तव नावा जिंकिती सुखे ॥५९॥

जेथे सन्माने काम पुरत ॥

तेथे आदरे अनु-ग्रहो करीत ॥

काम सन्माने जेथे अ-तृप्त ॥

तेथे शाप देत अति-क्रोधे ॥६०॥

यालागी शापानुग्रह-समर्थ ॥

ते सर्वदा कामक्रोधयुक्त ॥

परी नवल तुझे सत्वोचित ॥

केले अंकित काम-क्रोध ॥६१॥

मज गर्व नाही सर्वथा ॥

हेही तुज नाही अहंता ॥

छळवाद्या द्यावी लघुता ॥

अथवा उपेक्ष्यता न करिसी ॥६२॥

पृथ्वी दुःखी करिती नांगरी ॥

ते पिकोनी त्याते सुखी करी ॥

तेवी अपकार्‍या जो उपकार करी ॥

तो मोक्षाच्या शिरी मुगुत ॥६३॥

तुजमाजी निर्विकार शांती ॥

हे नवल नव्हे कृपा-मूर्ती ॥

तुझ्या स्व-रूपाची स्थिती ॥

आजि निश्चिती कळली आम्हा ॥६४॥

तू निर्गुण निरुपम ॥

मायातीत पूर्ण ब्रह्म ॥

तुझे स्व-भावे स्मरता नाम ॥

स-कामाही काम स्पर्शो न शके ॥६५॥

जो नित्य स्मरे तुझे नाम ॥

त्यासी मी कामचि करी निष्काम ॥

क्रोधचि करी क्रोधा शम ॥

मोह तो परम प्र-बोध होय ॥६६॥

धीर-वीर निज-शांती ॥

त्यांस परमानंदे नित्य तृप्ति ॥

ऐशियाचिया अ-मित पंक्ति ॥

पाया लागती तूझिया ॥६७॥

तुज करावया नमस्कार ॥

पुढे सरसे महा-सिद्धींचा संभार ॥

त्यांसही न लभे आवर ॥

तू परात्पर परमात्मा ॥६८॥

तुझिया सेवकांकडे ॥

विघ्न रिघता होय बापुडे ॥

ते रिघावया तुजपुढे ॥

कोण्या परिपाडे रिघेल ॥६९॥

तापसा बहु विघ्न अपावो ॥

आम्ही करावा अंतरावो ॥

हा आमुचा निज-स्वभावो ॥

नव्हे नवलावो नारायणा ॥७०॥

ह्रदयींचा मुक्त करोनि काम ॥

बाह्य जप-तप भक्ति-संभ्रम ॥

ऐसे जे का शठ परम ॥

विघ्नांचा आ-क्रम त्यावरी चाले ॥७१॥

ते आमची विघ्न-स्थिती ॥

न चले तुझिया भक्तांप्रती ॥

तू रक्षिता भुत-पती ॥

तेथे विघ्नाची गती पराङ्‍मुख ॥७२॥

माझिया निज-भक्तांसी ॥

विघ्ने कैची म्हणसी यांसी ॥

एक त्याहि अभिप्रायासी ॥

सांगेन तुजपाशी देवाधिदेवा ॥७३॥

पावावया निज-पदाते ॥

लाता हाणून स्वर्ग-भागाते ॥

जे नित्य निष्काम भजती तूते ॥

नाना विघ्ने त्याते सुर-वर चिंती ॥७४॥

उल्लंघूनिया आमुते ॥

हे पावती अच्युत-पदाते ॥

यालागी सुर-वर त्याते ॥

अति-विघ्नाते प्रेरिती ॥७५॥

बळी नेदूनि आम्हांसी ॥

हे जाऊ पाहती पूर्ण-पदासी ॥

एणे क्षोभे इंद्रादिक त्यांपाशी ॥

नाना-विघ्नांसी मोकलिती ॥७६॥

यालागी त्यांच्या भजनापाशी ॥

विघ्ने छळू धावती अपैसी ॥

विघ्नी अभिभव नव्हे त्यांसी ॥

तू ह्रषीकेशी रक्षिता ॥७७॥

सांडूनि स-काम कल्पना ॥

जे रतले तुझ्या चरणा ॥

त्यांस आठही प्रहर जाणा ॥

तू नारायणा रक्षिसी ॥७८॥

भक्त विघ्नी होती कासावीसी ॥

धांवधांव म्हणती ह्रषीकेशी ॥

तेव्हा तू धावण्या धावसी ॥

निष्ठुर नव्हसी नारायणा ॥७९॥

विघ्न न येता भक्तांपासी ॥

आधीच भक्त-संरक्षणासी ॥

तू भक्तांचे चौपासी ॥

अहर्निशी सं-रक्षिता ॥८०॥

विघ्न छळू धावे सकोप ॥

तव विघ्नी प्रगट तुझे स्व-रूप ॥

यालागी भक्तांसि अल्प ॥

विघ्न प्रताप बाधू न शके ॥८१॥

कामे छळावे हरि-भक्तांसी ॥

तव हरि कामाचा ह्रदय-वासी ॥

तेव्हा विघ्नची निर्विघ्न त्यांसी ॥

भय भक्तांसी स्वप्नी नाही ॥८२॥

विघ्न उपजवी वि-रोध ॥

तव विरोधा स-बाह्य गोविंद ॥

मग वि-रोध तोचि महा-बोध ॥

स्वानंद-कंद निज भक्ता ॥८३॥

ज्यांचि तुझ्या चरणी भावार्थ ॥

त्यांसि विघ्नी प्रगटे परमार्थ ॥

ऐसा भावबळे तू समर्थ ॥

साह्य सतत निज भक्ता ॥८४॥

यापरि समर्थ तू सं-रक्षिता ॥

ते जाणोनि विघ्ना समस्ता ॥

पाय देऊनि इंद्र-पद-माथा ॥

पावती परमार्था तुझिया कृपे ॥८५॥

देव संरक्षिता ज्यांसी ॥

विघ्ने छळू धावती त्यासी ॥

मग सकामांची गती कायसी ॥

वि-देहा म्हणसी ते ऐक ॥८६॥

विषय-काम धरोनि मनी ॥

इंद्रादि देवा बळि-पूजनी ॥

जे भजले याग-यजनी ॥

देव त्यांलागोनी करिती विघ्न ॥८७॥

इंद्र याज्ञिकांचा राजा ॥

स-काम याज्ञिक त्याच्या प्रजा ॥

यज्ञ-भाग अर्पिती वोजा ॥

पावल्या बळि-पूजा न करिती वि ॥८८॥

म्हणसी कामादिक विटंबिती ॥

ते निष्काम कदा नातळती ॥

सहज कामा वश्य असती ॥

सदा कर्मे करिती स-काम ॥८९॥

जे मज कामासी वश होती ॥

ते तप वेचून भोग भोगिती ॥

जे आतुडले क्रोधाच्या हाती ॥

ते वृथा नागवती तापसी ॥९०॥

प्राणायामे प्राणापानी ॥

निज प्राणाते आकळोनी ॥

वात वर्ष शीत उष्ण साहोनी ॥

जे अनुष्ठानी गुंतले ॥९१॥

जे अल्प अभिमाना हाती ॥

जे क्रोधासी वश होती ॥

ते शाप देऊनि तप-संपत्ती ॥

व्यर्थ नागविती निज-निष्ठा ॥९२॥

जे अ-पार सागर तरती ॥

ते गोष्पदोदकी बुडती ॥

तेवी गज कामाते जिणोनि जाती ॥

तेही नागवती निज-क्रोधे ॥९३॥

मज कामाची अ-पूर्ण काम-वृत्ती ॥

तेची क्रोधाची दृढ स्थिती ॥

काम-क्रोध अ-भक्ता बाधिती ॥

हरि-भक्तांप्रती ते न चले ॥९४॥

तुझ्या भक्तांप्रती जाण ॥

न चले काम-क्रोध-बंधन ॥

तो तू भक्त-पती नारायण ॥

तुज आमुचे कामपण केवि बाधी ॥९५॥

नेणता तुझा महिमा ॥

आम्ही करू आलो निज धर्मा ॥

तुजपासी नित्य निज-क्षेमा ॥

पुरुषोत्तमा कृपाळुवा ॥९६॥

अपकार्‍या उपकार करिती ॥

या नाव निर्विकार निज-शांती ॥

तेचि शांतीची परि-पाक-स्थिती ॥

विप्रकर्त्याप्रती हरि दावी ॥९७॥

सांगोनिया आपुली स्थिती ॥

कामादिक स्तुति करिती ॥

तव परमाश्चर्य देखती ॥

स्त्रिया अत्यद्भुती अकस्मात ॥९८॥

रूप वैभव अलंकार ॥

श्रियेहूनिया सुंदर ॥

सेवेलागी अति-तत्पर ॥

सदा सादर सावधाने ॥९९॥

नवल लाघव नारायणा ॥

कैसे या दाखविले विंदाना ॥

त्या स्त्रिया सकळ स्वर्गांगना ॥

दिवा खद्योत जाणा तैशा दिसती ॥१००॥

देखोनि त्यांचिया स्वरूपासी ॥

अप्सरा दिसती जैशा दासी ॥

अत्यंत लज्जा झाली त्यांसी ॥

काळिमेसी उतरल्या ॥१०१॥

त्यांचे अंगीचा सु-गंध-वात ॥

तेणे भुलला वसंत ॥

मलयानिल झाला भ्रांत ॥

त्यांचा अंग-वात लागता ॥१०२॥

नारायणासी विद्या कैसी ॥

जे भूलवु आले आपणासी ॥

भुली पाडिली तयांसी ॥

योगमायेसी दावुनी ॥१०३॥

सुंदरत्वे रंभा तिलोत्तमा ॥

जियां मंदर-मथनी जिंतली रमा ॥

रंभेहुनिया उपमा ॥

उत्तमोत्तमा अति-रूपे ॥१०४॥

ते आत-आश्चर्य देखोन ॥

झाले कामादिक मूर्छायमान ॥

तयांप्रती नारायण ॥

काय हासोनी बोलिला ॥१०५॥

आम्ही अवश्य पूजावे तुम्हांसी ॥

काही अर्पावे बलिदानासी ॥

संतोषावया इंद्रासी ॥

यातील एकादी दासी अंगीकारा तुम्ही ॥१०६॥

यांचे सौंदर्य अति-थोर ॥

म्हणाल होईल अपमान-कर ॥

तुम्हांसमान जे सुंदर ॥

तिचा अंगीकार करावा तुम्ही ॥१०७॥

म्हणाल यात नाही हीन ॥

आवघ्या सौंदर्य संपूर्ण ॥

कोणी न दिसे आम्हा-समान ॥

केवी आपण अंगीकारावी ॥१०८॥

जरी नाही तुम्हांसमान ॥

सकळ सौंदर्य अति-संपन्न ॥

तरी एकीचे करावे अंगीकरण ॥

होईल भूषण स्वर्गासी ॥१०९॥

ऐसे नारायणाचे वचन ॥

ऐकोनि हरिखली संपूर्ण ॥

करूनिया साष्टांग नमन ॥

मस्तकी वचन वंदिले ॥११०॥

ऐकोनि नारायण-वचन ॥

मस्तकांबुजी करूनिया नमन ॥

ऊर्वशी पुढारून ॥

कामादिगण निघती वेगी ॥१११॥

नारायणाचे ऊरु-स्पर्शी ॥

उभी होती नारायणापाशी ॥

तेचि नाव झाले तिसी ॥

म्हणती ऊर्वशी स्वर्गागना ॥११२॥

ते देवाचे-दूत ॥

स्वर्ग पावले समस्त ॥

मग शक्राचे सभे आत ॥

सांगती अद्भुत नारायण-शक्ति ॥११३॥

तिही नारायणाचे चरित्र ॥

सांगीतले अति-विचित्र ॥

तेणे अवघेचि सुर-वर ॥

झाले थोर वि-स्मित पै ॥११४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP