मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|
सीताहरणाख्यान

कीर्तन आख्यान - सीताहरणाख्यान

कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.


भूमिका -

वनवासात असताना श्रीराम, लक्ष्मण व सीता माहूर क्षेत्रात अत्रिआश्रमात येऊन पोचले. अनसूयामातेने सीतेचे अत्यंत कौतुक करून तिला बोधाच्या गोष्टी सांगितल्या. तेथून श्रीराम पंचवटीत गेले. तेथे खर-त्रिशिरादि राक्षसांचा नाश करून व लक्ष्मणाकरवी शूर्पणखेचे नाक व स्तन कापून तिला रडावयास लावले. तिने लंकेस जाऊन रावणाला ही हकीकत सांगितली व सीता हस्तगत करून तू घेऊन ये असे त्याला सांगितले. रावणाने आपल्या मारिच नावाच्या मामाला हरणाचा वेष घेऊन रामाला त्याच्या आश्रमापासून दूर ने असे सांगितले. त्याप्रमाणे मारिच सुवर्ण हरणाचा वेष घेऊन रामाच्या पर्णकुटीजवळ आला. सीता त्याला पाहून रामास म्हणाली, याचे चर्म सोन्याचे आहे ते मला द्या; म्हणजे त्याची चोळी करून मी अयोध्येला जाताना अंगात घालीन. रामाने हा मृग नसून राक्षस आहे असे पुष्कळ सांगितले; पण पुढे होणारे भवितव्य अटळ असल्यामुळे तिने हट्ट सोडला नाही. रामाने सीतेच्या रक्षणास लक्ष्मणास ठेवून ते त्या मृगाच्या मागे गेले. त्या हरणाला मारताना मारीचरूपी हरीण एकदम ओरडला, 'लक्ष्मणा, धावत ये व माझी सोडवणूक कर' असे रामाच्या शब्दात बोलला. हे ऐकून सीता फार घाबरी झाली व रामावर फार संकट आले आहे, तरी लक्ष्मणभावोजी, तुम्ही रामाच्या सहायार्थ धावत आताच्या आता जा, असे तिने सांगितले. लक्ष्मणाने सीतेस सांगितले की, रामास भीती नाही. ही राक्षसाची वाणी आहे. हे त्याचे शब्द ऐकून सीतेने लक्ष्मणावर उलट घाणेरडे आरोप केले. ते ऐकून लक्ष्मण निराश होऊन पर्णकुटीतून निघून गेला. इकडे रावण संन्यासी भिक्षुकाचा वेष घेऊन सीतक्डे भिक्षेसाठी आला. येथे हे आख्यान संपावयास पाहिजे होते; पण सीतेबद्दल रामाच्या अंतःकरणात झालेल्या वेदना पाहून पार्वतीस राम हा साधाच मनुष्य आहे; आपले पती शंकर त्याला गुरू मानतात; हा बायकोसाठी रडणारा हा राम गुरू कसा असणार? अशी शंका प्रदर्शित करून सीतेचे रूप घेऊन पार्वती रामाजवळ आली. रामाने तिचे रूप ओळखून तिच्या पायांवर मस्तक ठेवले. या वेळची कविता व तुकाबाईचे अष्टक अत्यंत बहारीचे आहे.

१ दिंडी

सोडुन त्रिकुटाचल राम पुढे झाला ॥

देखताती विचित्र वनलीला ॥

कठिण मार्ग बहु देव दानवाला ॥

नाहिं जेथे संचार मानवाला ॥१॥

सिंह व्याघ्र अस्वल गज जाति ।

पशुपक्षी भ्यासूर हिंडताती ॥

भुते यक्ष वेताळ नाचताति ।

राक्षसांचे किंकाट शब्द होती ॥२॥

नाना वृक्ष दाटले घनदाट ।

सूर्यबिंबापर्यंत ते अचाट ॥

तळी किरणं यावया नाही वाट ।

ठायीठायी वाहती जळपाट ॥३॥

रामसीता सौमित्र पुढे चाले ।

भ्रमत आत्री आश्रमाप्रति आले ॥

दत्तमूर्तीसी आधी नमन केले ।

अनसूया जानकीप्रति बोले ॥४॥

पराकाष्ठे श्रमलीस सिताबाई ।

कधी पायी फिरण्याची सवय नाही ।

तुला झाला वनवास कशापायी ।

मजपाशी तू सांग लवलाही ॥५॥

२ पद

सीता-गति बाई अनसूये काय सांगू आपली ।

ती कैकइ सासुबाई पतिवरती कोपली ॥

त्यायोगे वनी आम्ही त्रयवर्षे लोटली ॥

तू येथे सत्य आई मजला भेटली ॥१॥

अनसूया - कशासाठी कैकेसी कोप आला ।

तिच्या दशरथ अंकीत कसा झाला ॥

कसे त्याने धाडिले वनी तुम्हाला ।

वाटते हे आश्चर्य बहु आम्हाला ॥

सीता - निजपतिचा कैकईला वर झाला कंदनी ।

तिने दिधला बाई होता कर आपुला स्यंदनी ॥

तो पडला भूपतिच्या वचनाच्या बंधनी ॥

भरताला राज्य द्याया बहु रडली फुंदुनी ॥

स्वामीला वनवासा धाडाया तडफडली ॥

अनसूया -

नसे कैकयिच्या मत्सरासि लेखा ।

जसे पात्री दुर्विष वाढले खा ॥

तैसे म्हणती घे राज्यभाग लेका ॥

परी भरताते योग्य वाटेल का ॥१॥

सीता-

ती जेव्हा पडली होती कैकयी या आग्रही ।

तो तेव्हा भरत होता निजमातुलगृही ॥

पुढे त्यासी दूःखवार्ता कळताचि साग्रही ।

त्यागुनी या राज्य गेला तपोवनि तो निग्रही ॥

मग सारी कैकेयीची किरकिरची संपली ॥१॥

अनसूया -

उपेक्षिता भरताने राज्यभाग ।

सहज रामासी घेणे आले भाग ।

कार्य झाले निर्विघ्न यथासांग ।

तरी का हा वनवास आता सांग ।

सीता -

कैकयिने आधी आम्हा वनवासा धाडिले ।

त्यायोगे श्वशुर माझे परधामा पावले ॥

परी आज्ञा-वचन त्यांचे शिरि तैसे राहिले ॥

म्हणुनिया वनी आलो ही पाहाया पाऊले ॥

बहु जन्मोजन्मींची ही श्रमबाधा हरपली ॥१॥

सीता -

आई धरणी जनक माझा धर्माचा बाप तो ।

लग्नाला विघ्न आला लंकेचा भूप तो ॥

परि पडला भार्गवाचे उचलीता चाप तो ॥

स्वामींनी दूर केला आवघाही ताप तो ।

मग प्रभुच्या म्याही कंठी वरमाला घातली ॥

अनसूया -

चंदनाची उटि माळ सुमनाची घेई मोहे, आरद्रता मनाची ॥

समाधानि कशी बाई करणे मनाची । विष्णुदास म्हणे काही करमनाची ॥

कवीचा अभिप्राय -

ती गंगा जान्हवीला भेटली गंगा हिला ।

की भूकलेली तान्ही पान्हवल्या गाईला ॥

प्रेमाची भरति प्रेमे पावली रंगाइला ॥

म्हणे विष्णुदास प्रेमादर प्रेमे गाइला ॥

की दुहेरी कंठी एक्या सूत्राने गुंफिली ॥१॥

३ पद (चाल - उद्धवा शांतवन कर जा)

श्रीरामा रघुविरा राजकुमारा वनवास कठिण सुकुमारा ॥ध्रु॥

पुढे मोठे कंटकवनं माळवसानं येतील आसुर वासानं ॥

कोमल ही तुझी काया वनवासानं क्षीण होईल उपवासानं परतुनिया भेटशिल किती दिवसानं ॥

मशि बोल विश्वासानं ॥

चाल- कुठे दाट तरूंची छाया, कुठे झाड नसे बैसाया,

शीत उष्ण-काळ सोसाया, सतत तुला लागतिल वर्षे बारा ॥

कधि होइल भेटि दुबारा ॥१॥

अनसूया म्हणे सखया वर्षे बाराही ॥

आमुच्याचि सदाश्रमि राही ॥

परि तुमची कृति कळली म्हणुनी काही ।

बहु आक्षेप करीत मी नाही ॥

जानकिला सांभाळुन सत्वर येई ॥

परतुनि भेट मज देई ॥

चाल - अनसूया मुख कुरवाळी ।

दृढ ह्रदयी अत्रि कवटाळी ।

दत्तात्रय वाजवी टाळी ।

प्रभु विष्णुदासाच्या सत्य आधारा ॥

प्रगटलासी जगदोद्धारा ॥२॥

४ पद

रघुविर राहात गंगातिरी ॥ध्रु॥

पत्र तृणकुटी पंचवटीच्या आश्रमी वास करी ॥रघु॥१॥

वल्कलमंडित, विजयी अखंडित, कोदंडचाप करी ॥२॥

भक्तांसाठी तो जगजेठी तापसरूप धरी ॥३॥

विष्णुदासा करि पुरुषोत्तम, ठेवुनि हात शिरी ॥४॥

६ पद

पंचवटिच्या आश्रमवासी भिल्लिणी एकमेकिसी ॥

म्हणती पाहू चला ग रामासी ॥

सीताकांत रघुनाथ दयाघन सदार सानुज आला ॥

धन्य हा सुदीन अजि ऊगवला ॥

सुरवर मुनिजन ब्रह्मदेवही चिंतिताती पाऊला ॥

सदाशिव सदानंद पावला ॥

ज्याच्या नामस्मरणे केले शीतळ शरिर हलहला ।

वाला वाल्मीक मुनि जाहला ॥

काय भेटीचा योग लाभला अकस्मात आम्हांसी, आली जणू कामधेनू गृहासी ॥१॥

सकळहि ऋद्धिसिद्धी राबती, पुढे तिष्ठति आमर ।

वारिती नृपगण शिरी चामर ॥

पतित पातकी अनाथ केवळ जड मूढनर पामर ॥

तरि तो करितो अजरामर ॥

गौतमजाया मानव केली, शिळा होती आजवर ।

लागता पदधुळ वरच्या वर ।

निजभक्तांची ह्रदयी तळमळ कळवळ मायबापसी ॥

होऊनी फिरतो वनी तापसी ॥२॥

तो गंगेच्या काठी राहिला तृणसदनी रघुपति, भक्षुनि फळ मूळ वनस्पती ॥

श्रीरामाच्या भेटीसाठी काही न्यावे बोलती ॥

जाउ नये बाई रिकाम्या हाती ॥

यापरी बोलुनी भिल्लिणी बदरी वृक्षातळी नाचती आनंदे मग बोरे वेचती ॥

हिरवी आंबट चिवट खाता गोड लागल चव कशी ॥

करिती निजबुद्धीने चौकशी ॥३॥

नाहि आणिकांची उच्छिष्ट बोरे स्वामि तुझी आण की ॥

आता काय बोलावे आणखी ॥

मुखी न लाविता बोरे पाहिली टोचुनि आपल्या नखी ॥

आहेत की मधाळ पिकली सुकी ॥

अनंत ब्रह्मांडाचा चालक पालक झाला सुखी ॥

समर्पूनि बोरे आपल्या मुखी ॥

विष्णू स्वामि म्हणे तत्पदकमली मति जडली भ्रमरसी करिल खळ गंगाजळ समरसी ॥४॥

६ पद (चाल लावणीची)

पंच प्राण प्रियकरा सुंदरा तुला वराया आले, तुझ्याकडे मन माझे लागले ।

चंद्र जसा गगनात तसा तू वनात मज भेटला ।

प्रीतीचा मनात पुर दाटला ।

डोलती केतकी मालती, चंपक, सुगंध वायु सुटला ।

आटोपी कामानळ पेटला ।

रतिसुखसंगास्तव अंगा मधे आनंगरंग दाटला ।

स्तनाचा युग्म कोम उमटला ॥

यथासांग तरी रमवाया हे रम्य स्थळ चांगले ॥तुझ्या ॥

श्रेष्ठ लग्न गंधर्व आठांमधे श्रेष्ठ पाठ चालती ॥

शास्त्रीजन शास्त्रामधे बोलती ॥

परपुरुषांच्या नामस्मरणे थरथर तनु कांपती ।

साक्ष शिवशंकर गिरिजापति ॥

दुराग्रहाची सिमाच झाली किंचित वळेना मति ।

राजसा विनती करु मी किती ॥

हात जोडता वरचेवर या पायांपुढे भागले ।

तुझ्याकडे मन माझे लागले ॥२॥

अहा काय भरवसा येईना पहा तुम्हां राजसा, कशाला कंकणासि आरसा ॥

करितो विनंती लोहांगना मी सुंदर नर परिसा ।

वराया उशीर नको फारसा ॥

पृष्ठीवरी तो स्पष्ट राघवे मजकुर लिहिला जसा, आदरे वर्तावा क्रम तसा ॥

विष्णुस्वामी म्हणे शूर्पणखेचे कृत्य कृत्रिम भंगले । तुझ्याकडे ॥३॥

७ श्लोक -

पत्र वाचिता शस्त्र घे हाती ।

केश ओढुनि पाडिली क्षिति ॥

नाक थान ते कापी चरचरा ।

घाबरी उठे धावे झरझरा ॥

८ साकी-

खर दूषण त्रिशिरादि बुडवुनी रडत जाय लंकेला ।

कळी लावुनिया दशाननाचा सर्व कुळक्षय केला ॥१॥

अक्षय धरिला भरि भरिला अनुसरला निच कामाला ।

जानकीहरणास्तव कपटी करी स्वर्णमृग मामाला ॥२॥

९ - पद (चंद्रकांत राजाची)

पंचवटीच्या आश्रमी दादा दिव्य एक रत्‍न ।

तुजसाठी मी गेले कराया जपुनी थोर यत्‍न ॥

तत्‌पतीने मम नासिक स्तन हे चरचर चिरिले ।

प्राणच घेईल म्हणुनि माझे बहु मन दरदरले ।

चाल -

खळ दूषण त्रिशिरा काळासी वाहिला ॥

मम वंशतरुवर सान तो उपडिला ॥

धावत आले तुज सांगाया ॥

काही करी यत्‍न ॥१॥

१० श्लोक

म्हणे क्रोधे रावण अहो मामा ।

असावा हा अभिमान तुम्हा आम्हा ।

सहाय्य व्हावे जानकी-हरण आम्हा ।

वृथा वाद घालिता का रिकामा ॥

११ पद

राक्षसी कपटी हरिणाला हरिणाला जानकी भुलली ॥ध्रु॥

कंठिता प्राप्त वनवास, वनवासकाळ दुःखाचा ॥

मानिला परंतु गंगा, तो गंगाठाव सुखाचा ॥

ठाकला कनकमृग मामा तो मामा दहा मुखांचा ॥

चाल -

अवलंबुन चित्र मृगकाय ।

हळुहळू उचलित पाय ।

मनी भावा दुष्ट अपाय ।

आपाय काम खडी जमली ।

राक्षसी ॥१॥

जानकी म्हणे श्रीरामा, श्रीरामा या हरणाची ।

अनुपम दिसे ही काया, ही काया सुवर्णाची ॥

फाकली प्रभा जणु पिवळ्या, जणु पिवळ्या रविकिरणाची ॥

त्यासाठी यासी धरावे ।

अथवा जीवेची वधावे ।

हे माझे प्रिय पुरवावे ।

ठेविते शिर पदकमली ॥२॥

श्रीराम म्हणे सीते तू, सीते स्वस्थचि राहे ॥

निःसंशय हा मृग नाही ।

मृग नाही राक्षस आहे ।

हे सत्य तू मानुनिया, मानुनिया स्वस्थचि राहे ।

यासाठी करिते विनंति विनंति प्रभुचरणाची ॥

चाल - द्या चर्म वधुनि मृग आता कंचुकि करीन रघुनाथा ।

मी घालीन अयोध्ये जाता ।

आशा ही मनिची पुरवावी ॥३॥

१२ पद (चाल- इस तन दनकी)

राक्षस घातकी टपलेत प्राणा ।

लक्ष्मणा तुज का न ये करुणा ॥ध्रु॥

व्याकुळ जानकी म्हणे दीनवाणी ।

लक्ष्मणा येई कोणाची वाणी ॥

वाटते निर्जन घोर ठिकाणी ॥

संकटी पडलेत कोदंडपाणी ।

जो शीघ्र सजवुनि धनुष्यबाणा ॥

लक्ष्मणा तुज का न ये करुणा ॥

व्यापिले मन तुझे पाप कुभावे ।

ओळखिले अंतर सहज स्वभावे ।

वाटते रामासी विपरित व्हावे ।

माझेचि पाणिग्रहण करावे ।

म्हणे विष्णुदास हे कटुशब्द कर्णी ।

लक्ष्मणा तुज का न ये करुणा ॥

१३ पद

जानकी निर्फळ बोललीस मला ॥ध्रु॥

माय सुमित्रेहुन शतमात्रे, अधिक मानिले तुला ॥१॥

मधुरामृत खडीसाखर थुंकुनि चघळीसी का सोमला ॥२॥

षण्मास बंदीत पडशील सुटशील रघुविर घनःश्यामला ॥

विष्णुदास म्हणे वनी लक्षूमण जाय मनी शरमला ॥जानकी ॥३॥

१४ पद

खळ रावण लंकापती, जाहाला यति, कमंडलु हाती धरी नवी काया ॥

आला कपट धरूनि रूप जानकी हरण कराया ॥ध्रु॥

स्वहितार्थ कामसंन्यास दावि, अन्यास करांगुलीन्यास,

हाती जपमाळा, हाती जपमाळा ॥

अति निर्मळ वरी, परी आंतरिं दुर्जन काळा ॥

शिरि जटाभार वाढला ॥

नेसुनि वल्कला, यतीची कला बरोबर शिकला ॥

बरोबर शिकला ॥

कपटात निपुण तो तिळभर नाही चुकला ॥

जाहला शुद्ध भिकारी, दुष्ट अविकारी, आलख पुकारी, म्हणे जीव थकला ॥

म्हणे जीव थकला, बहु रंगढंग सोंगाड्या दावी नकला ॥

चाल - म्हणे अतिक्षुधित मी आहे भिक्षा द्यावी ॥

आशीर्वाद साधूंची वचने घ्यावी ॥ चित्तांत धर्मवासना असो द्यावी ॥

लावण्यदीप राजसा, कमळडोळसा, सांग लालसा, कुणाची जाया, कुणाची जाया ॥

एकली काळ कंठीशी कशी या ठाया ॥१॥

सद्‌भावे नमुनि यतिराज, अहो महाराज, कुणीकडे आज पाय हे वळले, पाय हे वळले ॥

अनंत जन्मोजन्मीचे सुकृत फळले ॥

प्रख्यात नाम मी सीता, जनक मम पिता, देही असता विदेहपण वरले ॥

विदेहपण वरले, सासरे धुरंधर दशरथ ते गुजरले ॥

तत्पुत्र प्रथम रघुपति माझे ते पति, दैवे दुर्गति, वनाप्रति आले, वनाप्रति आले, यापरी पूर्ववृत्तान्त जानकी बोले ॥

तो म्हणे क्षोभुनि हूं हूं, वाट किती पाहू, क्षुधा किति साहुं ,काहिं दे खाया काही दे खाया ॥

म्हणे विष्णुदास ते कपट न ये ओळखाया ॥

१५ दिंडी

सिता माझी लावण्यरत्‍नखाणी, वनामाजी, चोरून नेली कोणी ।

रडू लागे अनाथ दीनवाणी ।

अनाथाचा जो बाप चापपाणी ॥१॥

१६ पद

कोणि माझी आज प्राणवल्ली चोरली ॥ध्रु॥

स्वयंभू सिद्ध जी विराजे ॥

रक्षिली ति जनकराजे ॥

धरणिं जठरिं होति बिजे ॥

वीण पेरिली वाणी ॥१॥

कोमल कोवळे स्वरूप ।

कवळु पाहे वृक्षरूप ॥

भिन्न करूनि अन्य भूप ॥

मजसि कवळिली ॥२॥

वाढली ती माझे लगट ॥

जानकी हे नाम प्रगट ॥

अग्रदेठ मुळासकट ॥

समुळ उपटिली ॥३॥

भावे बोले विष्णुदास ॥

ज्याचे चिंतने पदास ॥

तोचि होय प्रभु उदास ॥

ही लीला भली ॥४॥

१७ पद -

फिरुनि वनि सीता मज संगे फार श्रमली ॥

आता मज टाकुन दूर गेली ॥ध्रु॥

रुसुन मजवरति, बसलीस जनकतनये ॥

नको करू विनोद परतुनी ये ॥

आजुन तरी तुझिया नेत्री रुदन नये ॥

मला हा विरहचि सोसू नये ॥

कळेल तसे करी, किति सांगु तुला सुनये, अंत निकराने पाहु नये ॥

प्रीत आज पहिली मजवरची विसरली ॥

प्रतारणा मनात अनुसरली ॥१॥

आठविता तुजला, मन प्राण कंठी दाटे ॥

युगासम घटका पळ वाटे ॥

सोडूनि तुजला दुर नाही गेलो कोठे ॥

नाही कधी बोललो मी खोटे ॥

चुकवुनि मजला, जरी जाशी आडवाटे ॥

तुझ्या पदीच मोडतील काटे ॥

रुतती धरणी ॥

निजु देई पर्णशाली ॥

तुझ्या मृदु अंकि झोप आली ॥२॥

आलिंगुनी काया, मुखचुंबन मृगनयने ॥

जरा मसि बोल, चंद्रवदने ॥

अंत किती पाहसी, ये धावत गजगमने ॥

चल रमू वनी सुखशयने ॥

विनवितो तुजला, अतिव्याकुळ दीन मने ॥

करी अन्याय क्षमा ललने ।

स्वप्नवत्‌ सारी तुझी संगत मज झाली ॥

नाही नेत्राचि आशा पुरली ॥३॥

तुझ्या विरहाचा तप्ताग्नि जाळी शरिरा ॥

विषासम विषय वाटे सारा ॥

उष्ण मज गमति, जरी असती थंडगारा ॥

काय या जाळु पुष्पहारा ॥

ह्रदयी पदराने मज घातलासी वारा ॥

बोलता नेत्री वाहती धारा ॥

विष्णुकवि बोले, गती कर्माची नाही चुकली प्रभूवर वेळ कठीण आली ॥४॥

१८ पद (चाल - विनंती करून चित्त वळवा)

भक्तजनपाद पंकज तरी ॥

रघुविर हिंडे कांतारी ॥ध्रु॥

व्यापिला विरहज्वर अंगा ॥

सोडिली शीतल जलगंगा ॥

आठवुनि जानकिअनुसंगा ।

क्षणोक्षणी पावे मनभंगा ॥

जाहली गोष्ट ही होणारी म्हणे हा नारी हा नारी ॥१॥

वनजहो का धरिला दावा ॥ येकदा जानकी मज दावा ॥

राम हा येथून हाकावा, कळला तुमचा हा कावा ॥

करि ना मृगया मी न मारी ॥

भेटवा माझी सुकुमारी ॥२॥

क्षितिज हो, बोला बोला, विनोदास्तव पुरे अबोला ॥

चेवला बाईल दादोला, मागे पुढे जाय जणु दोला ॥

जाहलों कामुक अविचारी, म्हणुन मज आली लाचारी ॥३॥

आयुरदा स्नेहतंतु सरला, प्राणदीप कंठामधे उरला ॥

धावुनी दृढ ह्रदयी धरिला ॥

जटायु पक्षी उद्धरिला ॥

कृपेने भाव संकट वारी ॥

विष्णुदासाचा कैवारी ॥४॥

१९ पद (चाल - माझा कृष्ण देखिला काय)

आदि श्रीजगदंबा गिरिजा जानकी रूपधारी ॥ध्रु॥

हरिणामागे बळेच पिटाळी ॥

तिच्यासाठी तरु कवटाळी ॥

पडला मायेच्या घोटाळी ॥

तो मनि चिंती मदनारी ॥१॥

वाहती नेत्रांतुनी जलधारा ॥

हिंडे धुंडित जंगल सारा ॥

दावा म्हणे मज माझी दारा ॥

हा हा नारी हा नारी ॥२॥

यास्तव आता हे विरूपाक्षा ॥

पाहते जावुनी त्याची परीक्षा ॥

ऐसा कल्पुनी चित्ति अपेक्षा ॥

आलि वनामध्ये श्री गौरी ॥३॥

आपण जाता दूर वनी रामा ॥

मागे राक्षस येवुनि धामा ॥

नेता मजला हे घनःशामा ॥

झाले वनामधे श्रम भारी ॥४॥

बोले जनकाचा जावाई ॥

येथे कोठे सांग तुकाई ॥

विष्णुदास म्हणे तुळजाबाई ॥

ये लवलाही मज तारी ॥५॥

२० साकी

यत्‍नचि हरला अंतचि पुरला ।

उरला कंठी प्राण ।

सर्व सुखाचा पुर ओसरला ।

प्राणसखे तुझी आण ॥

कामदा - या मृगापरी शुद्ध पाहणे ।

त्या गजाकृती मंद चालणे ही तिच्या परी बोले कोकिळा ।

गेली सोडून जानकी मला ।

अंकी ठेवुनि शीर नीजली ।

प्रेमळा मला काय बोलली ॥

हा कसा आजी शोक लागला ।

गेली सोडूनी जानकी मला ॥

२१ दिंडी

जरी व्हावे श्रम मार्ग चालताना ॥

तरी उजडावि रात्र बोलताना ॥

परि झाल्या पूर्ण सर्व गोष्टी ॥

कधी पाहिन तुज प्राणसखे दृष्टी ॥

N/A

References :

आख्यानकार - श्री.विष्णुदास
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP