मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|
बृहस्पतिताराख्यान

कीर्तन आख्यान - बृहस्पतिताराख्यान

कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.


भूमिका -

देवगुरू बृहस्पती हे वृद्ध होते. त्यांची तरूण पत्‍नी तारानामे होती. ती तारा चंद्राचे घरी गेली व ती दोघे सुखाने विषयोपभोग सुख घेऊ लागली. बृहस्पतीस हे कळताच त्याने चंद्राकडे आपल्या पत्‍नीची मागणी केली. परंतु चंद्राने तिला देण्याचे नाकारले. पुढे बृहस्पती आपला पट्टशिष्य इंद्र याच्याकडे गेले. इंद्राने त्यांचे मन वळवून तारेला बृहस्पतीकडे आणून पोचविले, असा या आख्यानाचा कथाभाग आहे. या व्यक्ती खर्‍या नसून काल्पनिक रूपके आहेत, असे विद्वानांचे मत आहे.

या आख्यानाचे नाटकही झाले आहे. त्या नाटकाची मोडीत लिहिलेली प्रत माझे जवळ आहे व या नाटकापैकी एक प्रयोग कोठे झाला व त्यात पात्रे कोण होती याची सर्व हकीकत विष्णुदासचरितामृत खंड २ यात मी छापली आहे. त्या पार्टीपैकी अद्यापही एकदोन मंडळी हयात आहेत. अशी विष्णुदासांच्या आख्यानांची काही नाटके वर्‍हाडात होत होती.

पतित झालेलीचा स्वीकर करून बृहस्पतींनी सामाजिक कार्य मोठेच घडवून आणले आहे, हे विष्णुदासांनी उत्तर तर्‍हेने दाखविले आहे.

१ पद - (झाली ज्याची उपवर दुहिता ही चाल)

नाही ज्याची अनुकूल वनिता । त्याची प्रपंच कोण फजिता ॥ध्रु॥

निशिदिनी काळजी काळिज जाळीत-किमपि न स्वस्थ समाधान चित्ता ॥१॥

करितसे अपमान वचन उल्लंघुनी-संतापवी मन क्षोभवी पित्ता ॥२॥

रूपवति ती भरति पराचि, तप्त कुरुपवति केवळ पलिता ॥३॥

बाळगिता गृही सद्यश घालवी-कुळदिप मालवी ती मोकलिता ॥४॥

विष्णुदास म्हणे करितसे आनहित-किंचित नायके हित शिकविता ॥५॥

२ पद - (दासी ऐसे मानुनिया कार्य, चाल)

नाहि अनुकुल बाई सर्वथा पति जिला ॥

तो तिला न मान देति जो विशेष भाजिला ॥ध्रु॥

ज्या नराचे सर्व काळ लक्ष जारिणीवरी ।

त्याचे बायकोने कंटकाचिये आणि वरी ॥

राहावे सदैव जन्म कंठवूनि आपुला ॥१॥ नाही ॥

त्यांत वृद्धता विशेष किरकिर सर्वदा ॥

वक्रदृष्टि होत नाहि हास्यमुख एकदा ॥

चैन वाटेना जिवास थोर घोर लागला ॥२॥

नाही त्यात सुस्वरूप तरुण हे शरीर नावरे ।

रात्रंदिन पंचप्राण फिरतात भोवरे ॥

विष्णुदास बोले ताप जात नाही साहिला ॥३॥

दिंडी

पती नाही चांगला मनाजोगा ।

काय करू मी त्या वृद्ध पंडुरोगा ॥

आले माझे तारुण्य त्यात ओघा ।

आशा ठायी नाहीच सौख्य दोघा ॥१॥

कोरडेची फिरता जसे जाते ॥

तशी टोचे किरकिर काळजाते ॥

त्यात माझे तारुण्य व्यर्थ जाते ॥

उठोनिया चंद्राचे घरी जाते ॥२॥

पद

प्रियकरा मी भुलले तुला विरह सोसेना मला ॥ध्रु॥

सर्पतुल्य मदनबाण ॥

छळितो मला निरवाण ।

खरेंचि जाण तुझिच आण ॥

पंचप्राण वेधला ॥१॥ विरह

तळमळते दिवसरात्र ।

चैन नाही अणुमात्र ।

आसनि शयनि ध्यानि मनी ।

छंद तुझा लागला ॥२॥ विरह

भ्रमित चित्त जाहले ।

म्हणून येथ मी आले ॥

करून संग उडवू रंग ॥

हा प्रसंग चांगला ॥३॥ विरह

न करि कामना ही नाश ।

त्वरित शांतवी मनास॥

विष्णुदास म्हणे उदास ।

करि विनंती आबला ॥४॥ विरह

५. पद

चंद्रा काय करू तुजपाशी मन माझे जडले ॥ध्रु॥

होणार होते ते दैवगतीने गेले होवुन निश्चल परिने

घडू नये ते घडले ॥१॥ चंद्रा॥

आणिल बृहस्पति संकटे कोटि,

करिल सकोपे खटपट मोठी,

धैर्य धरी भय सोडुनी पोटी,

व्हावे सावध भविष्य हे तुजला,

श्रुत करिते पुढले ॥चंद्रा॥२॥

जो विश्वाचा तात विधाता सापडला तो विषयचि घाता,

दोघे संनिध स्त्रीनर असता देहजाति भिडले ॥चंद्रा काय॥३॥

आजवर शतशा मी खावुनि गोते ।

पावले इच्छित जे मनि होते ॥

विष्णुदास म्हणे उघडु नको ते,

जे या रम्य कुमुदिनीचे मुळ सुखपंकी गडले ॥चंद्रा०४॥

पद

चंद्रा काय वदु वदनी ॥

तारा नाही मम सदनी ॥ध्रु

कोठे गेली मला तरी त्यजुनि ॥

नाही चैनचि दिवस रजनी ॥

ती कामिनी सुंदर गजगमनी ॥

न पडे दृष्टीस मज मृगनयनी ॥

म्हणुनी पडलो संशय भुवनी ॥

विष्णुदास म्हणे शोधिली अवनी ॥१॥

७. दिंडी

सुखी आहे या मंदिरात तारा ॥

काळ क्रमण्यासी हाचि योग्य थारा ॥

फार तुमची सुज्ञानवंत दारा ।

नाही गेली परक्याचे पहा दारा ॥१॥

नाही केला सन्मान गृहाचार ॥

तशी वाटे लाविता अविचार ॥

तुम्ही जावे प्रस्तुत हा विचार ॥

राहु द्यावी येथेंचि दिवस चार

साकी

सद्‌गुरु कामी सावध व्हावे द्यावी सोडुन निद्रा ॥

बहु दिवस मी वाट पाहिली तुझी अविलंबे चंद्रा ॥

सुशिष्य शिरोमणी धाडुन द्यावी रमणी ॥१॥

पद

कल्याण जाण चंद्रा चिरकाल मी तुला ॥

चिंतितो परि बायको तू माझी दे मला ॥ध्रु॥

संसारसार सौख्यामधे मुख्य बायको ॥

ती सोड सोड कामिनी मम आडवू नको ॥

पाहुन कुल वर्ग धर्म मार्ग आपुला ॥कल्याण०॥१॥

विशाळ माळ कंटकवन कनक मंदिरा ॥

सुज्ञानि मानिताती जेथे नाही सुंदरा ॥

आल्या करि त्यजील कोण वय तरुणिला ॥क.२॥

कामात मात नाडति नर चतुर शाहणे ॥

तो दोष रोष आवलंबुन काय पाहाणे ॥

आल्या करि त्यजिल कोण वय तरुणिला ॥क.३॥

होणार पूर्वसंचित ते जाहले बरे ॥

होता ती कांतेविण प्राण फार घाबरे ॥

यास्तव म्हणे विष्णुदास शशी दे अबला ॥

कल्याण जाण ॥४॥

१०

पद

नाहि देव वनिता मि तुला परत जा गृहा ॥

जा धरू नको तू सोड या दुराग्रहा ॥ध्रु॥

काय नीट असे कामवासना ही यावया ॥

नाहि लाज कशी तीळमात्र येथे यावया ॥

मन कुटिल जटिल भार चमके शुभ्र हा ॥ना.॥

काय करशिल तरुण नार वृद्ध ब्राह्मणा ॥

अनहाति करताल धरूनि हरिहरि म्हणा ॥

करुनि स्वस्थ शुद्ध चित्त घे अनुग्रहा ॥२॥

नाहि झाले सुरु प्राप्त कधी जै अपेक्षिले ॥

यास्तव वाटे तिने तुज उपेक्षिले ॥

अविनय म्हणे विष्णुदास तरि समग्र हा ॥ नाही ॥३॥

११

पद (फटक्याची चाल)

धिक् चंद्रा रे शठ निपट कपट गहना ॥

कुटिल मना मधिका धिक् चंद्रा रे ॥ध्रु॥

पापधना धर्महिना - नयविहिना-धृत परकामिना-दुष्टजना स्मर भजना महा मीलान ॥

दे-ता-रा-ललना-छलना-चलना-म्हणे विष्णुदास पुन्हा ॥

न करी अधिका धिक् चंद्रा रे शठ निपट ॥१॥

१२

अंजनीगीत

आभिलाषावी गुरुची दारा,

अनुचित शिष्याचा हा धारा ॥ घातकि चंद्रा ॥

स्वकुलोद्धारा पातक हे मोठे ॥१॥

हरण करू नये स्त्री कोणाची ॥

त्यातुन सुर गुरु ब्राह्मणाची तीक्ष्ण विषवल्ली मरणाची ॥

केवळ जाणावी ॥२॥

सांगसी प्रौढी निजनावाची ॥

भ्रष्टविलासी का स्त्री भावाची ॥

आपण आपुल्या साक्ष मनाची ॥

विचारून पहावी ॥३॥

मुखी दुसर्‍याचे दोष गणावे ॥

आचरण करिता स्वये न शिणावे ॥

ते अपमतलबी ज्ञान म्हणावे ।

ऐकावे कोणी ॥४॥

१३

साकी

किती अविचाराने भावाच्या रतलासी का ममतेला ॥

तद्‌गुण कंपित विरक्त स्त्रीच्या झटसी काममतेला ॥

दृढ ती जोडावी ॥ इच्छा इची सोडावी

१४

दिंडी

कसी श्रमविली नार उतथ्याची ॥

म्हणून झाली ही गोष्ट यथार्थाची ॥

ग्रहण करिताची पथ्य कुपथ्याची ॥

दशा येते तत्काळ विपथ्याची ॥१॥

१५

पद (चाल - उद्धवा शांतवन)

देवेंद्रा सांगु मी काही मन माझे स्वस्थचि नाही ॥ध्रु॥

चिंतेच्या शरधारेने मज पडले उरक्षत मोठे ॥

रात्रंदिन जीव तळमळतो लागेना लक्षही कोठे ॥

कोणाला काय म्हणावे मुळ आपुले दैवचि खोटे ॥

चाल- ते झाल्यावर उफराटे ॥

पुष्पावर फुटती काटे ॥

आपुल्याची नेत्री बोटे ।

आपुलिच जाती पहा ।

देवेंद्रा सांगु मी काही ॥१॥

असावी अनुकुल जो ती ।

ती झाली प्रतिकुल दारा ॥

वल्लभासी अवमानूनी ।

जी गेली पराचे दारा ॥

मनरमणि गृहिणी कैची ।

ती व्याघ्रिण शरिरविदारा ॥

चाल- टाकुनी या लोकप्रचारे,

करिताति पाप अविचारे ।

न येतिल किती माघारे ।

रिती उत्तम नारी नरा ही ॥२॥

जो विद्या बोधित शिष्या ।

तो पुत्रामाजि गणावा ।

गुरुपत्‍नी त्याने माता मानुन गुरु बाप म्हणावा ॥

संपूजित माथा त्याते का लत्ताप्रहार करावा ॥

चाल- चंद्राने गैरचि केले ।

आपसामध्ये वैरचि झाले ॥

विष्णुदास यास्तव बोले ।

पुढे यासी करावे काही ॥३॥

१६ पद

देवेंद्रा माझी तारा चंद्राने घेतली,

देईना मातला तो ती तेसी मातली ॥ध्रु॥

दोघांची बोधिताही मति नाही परतली ॥

अन्याये वर्तला तो ती तैसी वर्तली ॥१॥

शिष्याचे काय नाते मुर्खाने राखिले ॥

निज गुरुच्या आजि काळे वदनाला माखिले ॥

सर्पाने गौतमीचे स्तन जैसे चाखिले ॥

मैदाने वज्रकंथी कशी माळा घातली ॥२॥

यासाठी येथे आलो कळवाया हे तुला ॥

देवेंद्रा पुरवावे या माझ्या हेतुला ॥

दंडोनी तस्कराला ॥ स्त्री माझी दे मला ।

म्हणे विष्णुदास वेळा निकराची पातली ॥३॥

१७

श्लोक (चामर)

काम क्रोध मोह त्यात चित्त मोहिले ।

त्वा परंतु यात मुख्य वर्म नाही पाहिले ॥

श्रीगुरूची अंगना ति सर्व मान्य आपणा ॥

सोड सोड व्यर्थ काय क्षोभवीसी ब्राह्मणा ॥

१८

श्लोक (शा.वि)

आज्ञापत्र सुरेश्वरा-मजकडे कार्याविना धाडसी ॥

साध्वीला नीति सांगता न वचके पण्यांगना धाडशी ॥

रक्षा लाविली त्या सुविप्र सतिच्या काया वयाला अशी ॥

चंद्रासन्मुख तू सहस्त्रनयना का यावया लाजसी ॥१॥

१९

पद (निज मख)

आठवण प्रेमाची, ठेवूनी नारी ॥

परतूनि जाय घरी ॥ध्रु॥

पडलिस या संकटी मजसाठी जाहले क्लेश तुला सखे भारी ॥

निर्दय यवन जसा मी तुज आज तसा कापितो कंठ कसा केली ॥

निराशा मी तुझी सारी नाही झाले सुख संसारी ॥

आठवण ॥१॥

शतशा मी केले उपाय चालेना करू तरी काय घेतला परतुनि पाय ॥

विष्णुदास म्हणे यास्तव जाणे आता सुंदरी पति अंगिकारी ॥२॥

२० पद

परत मी मंदिरी जाऊ कशी ॥

हे शुभवदना तू बोल मसी ॥ध्रु॥

कशी प्रीत जोडशी ॥

आधेमधे तोडशी ॥

दाटुन काय फशी ॥१॥

धड इकडे ना तिकडे ॥

घसरून पडले तोंडघशी ॥२॥

स्वपतिची कैची शेज सुखाची ॥

सर्पाची गार उशी ॥३॥

विष्णुदास म्हणे दैवचि खोटे ॥

बोलून काय फशी ॥ परत मी० ॥४॥

२१

घनाक्षरी -

भली मोडली ही खोड । काय मिळविली जोड ॥

आता मी जाते सोड । पुरे गोड बोलणे ॥१॥

सदा होईल सुख प्राप्त । ऐसि वाटुनिया भ्रांत ॥

तुझ्यासाठी निभ्रांत । प्राणनाथ सोडला ॥२॥

केली फजिती ही दुपट । जागी झाले मी निपट ॥

आला सर्वांसी विपट । तुझे कपट समजले ॥३॥

भला झाला देहदंड । काय बोलून वितंड ॥

कळा चंद्रा तुझी थंड । मी उदंड तापले ॥४॥

२२ पद - कोणि न कोणाचे देवा ॥

आपपर घरचे सर्व सुखाचे-निर्वाणीचे मामा-मामी न भाचे ॥ध्रु॥

जे साथी अनुकुल दिवसाचे, होता एकोणीस-विसाचे ॥

ते नर बदलुन पडतिल साचे, जिवलग प्राणाचे ॥देवा ॥१॥

जो वर आहे धन, कनकांबर ॥ तोवर पुढे हात जोडित शंभर ॥

ते सरल्यावर बांधिती कंबर । सेवक चरणाचे ॥देवा ॥२॥

संकटकाळी सोडुन देती । त्यांच्या प्रतापावर पडो माती ॥

विष्णुदास म्हणे धरि पद हाती । विश्वंभरणाचे ॥देवा.॥३॥

२३ पद

सोडुन राग प्राणसखे बोल सुंदरी ॥ध्रु॥

तोडुन प्रीत टाकु नको ठेव अंतरी ।

दाटुन अंत पाहु नको सर्वथा परी ॥

जोडुन हात प्रार्थितो चाल मंदिरी ॥ सोडुनि रा. ॥१॥

चित्तासमान प्राणसखा कोण जोडला ॥

होवोनि आंग संग मनोभाव वाढला ॥

निभ्रांत आमुचा तू प्रेमपाश तोडिला ।

कापून दोर मजसी लोटले कुपोदरिं ॥२॥

चंद्रासि एक चित्त प्रीत वाढली कशी ।

अखंड काळ काळजी ही लाविली मसी ॥

देवोनि शिष्यवर्ग धर्म पाडले फशी ॥

बांधोनि हात फिरविली काळिजी सुरी ॥३॥

येऊनि दावि एक वेळ मुखचंद्रमा ॥

संयोग माते पाहिलासी मुख चंद्रमा ॥

केलासि जाण अपराध सर्व तो क्षमा ।

विचित्र बोले विष्णुदास सुत्र ईश्वरी ॥४॥

(चाल - ललिताची)

२४ पद

राग-श्रीराग-किती करशील संसार ॥ग्रहाशा ॥

विसरुनि करुणाघन जगदीशा ॥ध्रु॥१॥

नजरबंद भवप्रपंच खोटा- हा लटपट गारुड तमाशा ।

वृद्ध वृषभवत मानिती स्त्री-सुत फटफट करिती

बटकी खाशा ॥२॥

गलितेंद्रिय तू होशिल रडशिल ।

खोकत बसशिल हाणशिल माशा ॥३॥

विष्णुदास म्हणे जरि स्मरशील हरी ।

तरि या तोडिल भवपाशा ॥४॥

N/A

References :

आख्यानकार - श्री.विष्णुदास

Last Updated : May 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP