मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|
अर्जुनतीर्थयात्राख्यान

कीर्तन आख्यान - अर्जुनतीर्थयात्राख्यान

कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.


भूमिका -

स्वयंवराचा पण पूर्ण करून अर्जुनाने द्रौपदीस आपल्या बिर्‍हाडी आणले. भिक्षा आणली आहे, असे माता कुंतीस सांगितले. काय भिक्षा आहे हे न पाहताच पाचजण बंधूनी वाटून घ्या, असे ती बोलली. व्यास महर्षींनी पाचही बांधवास ही द्रौपदीची भिक्षा वाटून दिली. दोन महिने बारा दिवस एकेकाकडे असावे असे ठरले. त्या मुदतीत पतिपत्‍नी एकांतात असता जर दुसरा तेथे गेला तर त्याने बारा वर्षे तीर्थाटण करावे हे प्रायश्चित्त ठरविले.

एका ब्राह्मणाच्या गाई चोरांनी पळविल्या. ब्राह्मण ओरडत अर्जुनाकडे आला-गाई सोडवाव्यात; पण शस्त्रास्त्रे ज्या खोलीत होती तेथे धर्मराज व द्रौपदी एकांतात होते. अर्जुनाने तीर्थयात्रा पत्करून शस्त्रे घेतली व ब्राह्मणाच्या गाई सोडविल्या व बारा वर्षे तपश्चर्येसाठी तो निघून गेला. तो रामेश्वराजवळ पोचला. तेथे श्रीमारूतीची भेट झाली. वालीचा सेतु पाडून अर्जुन मारुतीस म्हणाला- हे काय? रामांनी दगडाचा सेतू बांधला तो मोडून जाईल. यावरून दोघांची बोलणी होऊन अर्जुनाने सेतू मोडल्यास मारुतीने त्याचे जन्मभर दास्य पत्करावे व न मोडल्यास अर्जुनाने अग्निप्रवेश करावा असे ठरले. अर्जुनाने बाणाचा सेतू केला. मारुतीने त्यावर उडी मारताच बाणाचा सेतू मोडून पडला. प्रतिज्ञेप्रमाणे अर्जुनाने अग्नी पेटविला व श्रीकृष्णाची मनोमन प्रार्थना केली. तेथे विप्ररूपाने श्रीकृष्ण आले व यास साक्षी कोणी नव्हते म्हणून पुन्हा अर्जुनास, सेतू बाणाचा करावा, मी साक्षी आहे, असे सांगितले. अर्जुनाने बाणाचा सेतू केला. त्यात श्रीकृष्णांनी सुदर्शन घातले. मारुतीने त्यावर जोराची उडी मारली; पण सेतू मोडला नाही. मग तेथे श्रीकृष्ण प्रगट झाले व मारुतीस 'मीच राम व कृष्णही मीच' सांगून अर्जुनाचे ध्वजावर बसून युद्धात साह्य करावे असे ठरले. यात दोन भक्तांचे मीलन व दोघांवर श्रीप्रभूची कृपा पूर्ण आहे त्यामुळेच मारुती व अर्जुनाकडून मोठे पराक्रम होण्याचे कार्य झाले.

१ साकी -

सति पति रतिमंदिरी - असता कैसे आत शिरावे ।

द्विज परि कोपुन निश्चल शापिल-यासी काय करावे ॥

(चाल-माझा कृष्ण देखिला)

२. पद -

आले संकट मजवर फार । याला काय करू ॥धृ॥

भांडून खांडव अग्निस दिधले । दुष्ट कष्ट म्या नष्टचि केले ।

आज विप्रावर संकट पडले । आसुनी काय मागे सरू ॥१॥

मजपासुन द्विजरक्षण न घडे । जरि तरि रवीमार्गचि मोडे ।

अहि गरुडाचे चाविल नरडे । फुटतिल जाण शुष्क तरू ॥२॥

शत्रुनाशकर अक्षय भाते । तूणिर शरासन आहे जेथे ।

धर्म द्रौपदी निजली तेथे । कैसा आत शिरू ॥३॥

हरि संकट हे सहज निवारी । दिन उपकारी भार उतारी ।

विष्णुदासाचा कैवारी । परात्पर जो परम गुरू ॥४॥

३. साक्या -

द्विजकार्यास्तव स्त्रीपुरुषाचे दोष मला बाधावे ।

पुढे कसेही असो परंतु कार्य आधी साधावे ॥१॥

नर शर गांडिव घेउनि गेला कळले नच उभयाला ।

पर उपकारी दोष घडे, जरि चिंतिती शुर शुभ याला ॥

४. आर्या -

पार्थ म्हणे तस्करहो मज बाणाच्या पुढे पळाल कसे ।

त्यजिति न शर हे तुम्हाला पडले मुषकावरी बिडाल कसे ॥१॥

धरले कितिक पळाले किति तस्कर मृत्युमागि बोळविले ।

गाई समग्र देऊनि विप्राचे चित्त फार तोषविले ॥२॥

५. श्लोक -

ज्या मंदिरी दंपति नीजलि हे ।

असोनिया श्रुतमनी न जात आहे ॥

करावे कसे लागला दोष गात्रा ।

तीर्थाटणे द्वादश वर्ष यात्रा ॥१॥

६. साक्या -

तीर्थाटण मी करून येतो मजवर लोभ असो द्या ।

मम विरहाचा शोक न करिता अंतरी धैर्य असो द्या ॥१॥

भ्रमत भ्रमत पथ पार्थ पुढे आला सिंधुतिरासी

कृष्णस्मरण करी चरण निरंतर आठवी सन्मति राशी ॥२॥

राम भक्त कपी पूर्ण धनंजय प्रिय दास कृष्णाचा ॥

समान गमती समान दोघे आश्रय प्रभुचरणाचा ॥३॥

७. श्लोक

(अर्जुन) हा सेतू वद गा शिला आणुनिया कोणी असा बांधिला ।

(मारुती) इंद्राचा रिपु इंद्रजीत सपिता ज्याने बळे मर्दिला ॥

(अर्जुन) बाणाचा त्यजुनी किमर्थ तरि या व्यर्थ श्रमा पावला ।

मोठे रीसकपि विशाल म्हणूनी मोडेलसा भासला ॥१॥

८. दिंड्या

कपी बोले रघुवीर चापपाणी ।

पूर्ण ब्रह्म समर्थ एकबाणी ॥

एक शय्या निश्चये एक वाणी ।

ज्याचे नाम पावती मोक्ष प्राणी ॥१॥

पार्थ बोले अनंत कृष्ण माया ।

नामे ज्याची अनंत गूण गाया ।

मौन पडले वेदासि कपिराया ।

ब्रह्मदेव वंदितो सदा पाया ॥२॥

एक बाणे मारिले ताटिकेला ।

कृष्ण सांगे पुरुषार्थ काय केला ।

वश झाला गोकुळी गोपिकेला ।

पुढे गेला भेऊन द्वारकेला ॥३॥

नव्हे वीर स्त्रीवरी हात घाली ।

वीण बाणा वाचून असुर मारी ।

म्हणून ऐसे बोलती पूतनारी ।

सर्व गोपी भोगून ब्रह्मचारी ॥४॥

उद्धरिली लागता सिळा पायी ।

मुनी केला वाल्मीक मूढ देही ॥

जयाचे गूण शंकर स्वये गाई ।

जगी देव पाहता अन्य नाही ॥५॥

मच्छ कछ जड मूढ पशु प्राणी ।

कृष्णे केले खेळता मुक्त रानी ।

दयासिंधू कैवल्य मोक्षदानी ।

विष्णुदासाचा पूर्ण अभिमानी ॥६॥

९. साकी -

टिकेल कसा मजपुढे शरांचा बांध सेतु पाहू दे ॥

भंगुन गेल्यावरी मनाचा संशय दुर राहु दे ॥१॥

१० श्लोक

तू हा सेतु माझा जरी भंग केला ।

पुरुषार्थ सारा तरी व्यर्थ गेला ॥

कपी साच मी भक्षितो पावकाला ।

संकल्प भंग न घडे हरी सेवकाला ॥

म्हणे मारुती मी चिरंजीव देही ।

मला जाण सर्वथा मृत्यु नाही ॥

तुझा दास हे नामची सत्य राहो ।

जरी बाण सेतू नच भंगला हो ॥

श्लोक - ज्याचे हे शर आर्बुदादि सुटती येका क्षणा भीतरी ।

केला बाहुबळे तदा सिंधुच्या सेतू जळा अंतरी ॥

त्याते भंग करी कपी उठ कसा पाहू मला दे तरी ।

सेतू न तुटल्यावरी मग तुझी होईल रे खातरी ॥१॥

श्लोक - जयश्री जयश्री रघुवीर समर्थ म्हणुनी गर्जुनी झेपावला ।

निमिषार्धे निजतात शीघ्र गतिने तारांगणी पातला ॥

चंद्राचा तुटला कपीच गमला तारा आला भासला ।

मेरू कोसळला तळी ढवळला सेतू निधी नासला ॥१॥

११. पद - (चाल - चंद्रकांत राजाची)

ये रे ये रे त्वरे मुकुंदा गोविंदा फसलो ।

तुजकडे लाउनी लक्ष दिनांपरी वाट पाहत बसलो ॥

पण पुरता मम सिद्ध न झाला मरण आले कळले ।

मजवर पाहे आरि दुःखाचे पर्वत कोसळले ॥

हाका मारिता मुकाचि राहसि ब्रीद तुझे कळले ।

दीनदयाळा आझुन का तव चित्त न कळवळले ॥

चाल -

हे योग्य वाटते काय तुला माधवा ।

मज विपरित घडले कळले जरि बांधवा ॥

मग राज्य टाकुनी त्यजितिल आपुल्या जिवा ।

दोष घडे हा तुला जरी मी अग्निमधे फसलो ॥१॥

करुणा वाणी ऐकुन श्रवणी चक्रपाणी आला ।

द्विजरूपाने आवलंबुनिया बोलतसे कपिला ॥

यत्‍न वाटे कसा तुम्ही हा असाक्ष पण केला

यास्तव साक्षी असुन पाहिजे पुन्हा यत्‍न केला ॥

चाल - ते मान्य जाहाले भाषण दोघांजणा ।

मग बांधि धनंजय सेतु शराचा पुन्हा ॥

तळी घाली सुदर्शन न कळे याची खूण ।

पवनसुत वर उडी घालुनी मीच म्हणे फसलो ॥२॥

कैवारी हा प्रभु वनमाळी कळले प्रार्थासी ॥

ह्रदयी धरुनी-हारि नर कपिसी शांतवी दोघांसी ॥

आजपासुनि त्वा रथि पार्थाचे व्हावे ध्वजवासी ।

यापरि कथुनी हारि मग निघुनी गेला द्वारकेसी ॥

चाल - श्रीहरिने पूर्विच वृत्तांत त्या कळविला ।

मग वीर धनंजय प्रभास क्षेत्री आला ॥

घ्या हारण सुभद्रा कथा सुधा मासला ।

विष्णुदास म्हणे हारि कौतुक हे गाता सुखी जाहलो ॥

तुजकडे लावुनी लक्ष दिनापरी वाट पाहात बसलो ॥३॥

N/A

References :

आख्यानकार - श्री.विष्णुदास
Last Updated : May 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP