मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|
येशु चरित्र

येशु चरित्र

कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.


आर्या -- इस्त्री देशीं धर्मग्लानी होवोनी लोपतां ज्ञान ।
निर्मी प्रभु धर्मात्मा दीं हितबोधे करो जनत्राण ॥१॥
म्लेंच्छ कुळीं जरि झाला प्रभुचा प्रिय भक्त येशु या नांवे ॥
सन्मतिस्तुत यश त्याचे प्रेमे परमादरें न कां गावें ॥२॥
कथिती चरित्रग्रंथी व्याधिहरण उदधितारणादि कथा ॥
न बहु मज त्या गमती मानो जन त्यासि तथ्य कीं वितथा ॥३॥
व्याधि असाध्यही शमवी शीघ्र भिषकूजन अपूर्व उपचारें ॥
अध्यात्मरोगवारण वाटे अत्यद्‍भुत युक्ति करुनि कुशलजन ॥
परि दुष्कर भवतारण वाटे वळवोनि विषयलुब्ध मन ॥५॥
धूर्तहि करिती लोकी बहुत चमत्कार काय ते साच ॥
भुलती अज्ञ परि सुधी कैसा मानील रत्नसम कांच ॥६॥
दाविती अद्‍भुत गोष्टी अनुपम उपकारकारिता संती ॥
ही काय उणी उपकृति वळविति जनचित्त सतत भगवंती ॥७॥

दिंड्या --- असो येशु कृतविद्य आला परि वाटे परमार्थ सार त्याला॥
मति बाल्यांतचि होय अति विरक्त।रमे कैसे विषयांत साधुचित्त ॥१॥
जनक जननी त्यावरी फार प्रिती । करिते करि तोही त्यांसि तुष्ट चित्तीं ॥
परी वैराग्ये जिंकूनी सकल माया । निघे स्थिरधी तो तपोवना जाया ॥२॥
म्हणे सेवू एकांत कांहि काळ । ध्यानमननें आठवूं प्रभु कृपाळ ॥
जोडुं सान्निध्यें दुर्लभा अचल भक्ति । सुदृढ जेणें होतसे मनिं विरक्ति ॥३॥

श्लोक ---- राहे शिरोनि गहनी गिरीकंदरांत । सेवूनि कंदफलमूल जयीं क्षुधार्त ॥
वारी तृषा पिउनि निर्झर वारि नेमे । चित्तीं स्मरोनि जगदीशपदासि प्रेमें ॥१॥
एके दिनी फार क्षुधार्त झाला । आहार कांही न मिळे तयाला ॥
बैसोनि तैसाचि मनीं अजातें । चित्ती म्हणे रक्षक तूचि माते ॥२॥
महामोह त्याची परीक्षा कराया । मनीं ये म्हणे स्पर्श तूं प्रस्तराया ॥
जरी देव आहे तुझा सत्य त्राता । शिळेपासुनि अन्न निर्मील आतां ॥३॥
तयातें म्हणे भाव माझा न काचा । प्रभू रक्षिता होय सर्वांस साचा ॥
वृथा प्रेरिशी तूं मला कां अभागी । सुखे जाइ तूं स्वस्थळालागिं वेगी ॥४॥
मिळो वा न वा अन्न जें प्राण रक्षी । कृपाळू खरा देव तो सर्वसाक्षी ॥
पडो देह हा वाटतो तुच्छ मातें । न पाळीन तो मी कधी आत्मघातें ॥५॥
प्रभू ठेंवि तैसे समाधान चित्तें । असावे मनीं आठवोनी तयातें ॥
न घालीन मी आपुल्या जीवनाचा । कधी त्यावरी भार देहावनाचा ॥६॥

साक्या ---- मोह पराजित होउनि जातां लोभ मनोहररुपें ॥ प्रगट होउनि म्हणे सांगतो मी तुज साधन सोपें ॥१॥
सोडी तपस्या जाई गृहाप्रति धनजन लौकिक साधीं ॥ करुनि पराक्रम राजपदहि मी मिळविन धरिं अशी बुद्धि ॥२॥
ऐकुनि बोले स्थिरमति सकळहि वाटे मज हे अल्प ॥ थोर भाग्य वैराग्य संपदा हा माझा संकल्प ॥३॥
लोभा हा तव यत्न विफल बा होइं न मी तव दास ॥ प्रभुवरी ज्याचा भाव न दृढ तो करि इतरांची आस ॥४॥

दिंडी ---- असो, जिंकुनि अध्यात्मपरिपुराणाला । धन्य विजयी वंद्य तो जगीं झाला ॥
त्यजुनि गेहादिक सर्वही संग लोकीं । फिरे दीनां शांतवी दु:खसोकीं ॥१॥
सरळ वचनें बोधुनी भाविकांतें । म्हणे अनुतापें शोधुनी पातकांते ॥ करा निर्मळ आपली मलिन बुद्धि । करिल देव कृपा हरुनि सर्व
आधी ॥२॥

श्लोक --- ऐकोनि बोध अमृतासम तो तयाचा ॥ कित्येक भाविक जनां अनुताप साचा ॥ होवोनि त्यासि म्हणति कधिं धर्मसार ॥
जो आचरोनि उतरूं भवसिंधु पार ॥१॥
म्हणे प्रेमें देवा विमलहृदयीं चिंतुनि सदा । जिवें भावे सेवा त्यजुनि विषयाशा असुखदा ॥ करा प्रीती सर्वांवरि जशी सजीवी खरि वसे । अशा मार्गे जातां मग उभय लोकीं भय नसे ॥२॥

अभंग - धन्य ते लीनता वसे ज्यांच्या चित्तीं । होय स्वर्ग प्राप्ती तयांसची ॥१॥
धन्य ते करीती शोकांते सहन । करी समाधान देव त्यांचे ॥२॥
धन्य ते सौम्यता वसे ज्यांच्या अंगी । महत्व ते जगीं पावतील ॥३॥
धन्य ते पुण्याची जया भूकतान । इच्छा त्यांची पूर्ण देव करी ॥४॥
ते करीती कृपा करी तयांवरी । देव कृपा करी तयावरी ॥५॥
धन्य ते अंतर निर्मळ जयांचे । दर्शन देवाचें होय त्यांते ॥६॥
धन्य तेचि शांती जगी वाढवीती । देवाची संतती म्हणती त्यास ॥७॥
धन्य ते सोशिति छ्ळ सत्वालागीं । स्वर्गाचे विभागी तेची होती ॥८॥
क्रिस्त म्हणे सोसा सत्यासाठीं छळ । स्वर्गी मिळे फळ अमोलीक ॥९॥
अभंग - हिंसा ती निंदेच्या वचनें ताडन । द्वेषाने चिंतन अपकारार्‍याचे ॥१०॥
तोचि व्यभिचार करी दुष्ट मन । रागें अबलोकन परनारीचे ॥२॥
तीच निर्दयता प्रति अपकार । शत्रुभावें वैर वैरीयांचें ॥३॥
क्रिस्त म्हणे यत्नें चित्त हें रक्षावें । सदा शांत भावें वागोनियां ॥४॥
अभंग - आता सांगूं तुम्हं दयेचे लक्षण । सप्रेम वर्तन वैरीयांशी ॥१॥
क्रोधे बोले तुम्हां जो शाप वचन । कल्याण चिंतन करा त्याचें ॥२॥
द्वेषी जो तुम्हांसी त्याचे करा हीत । तरी दयावंत तुम्ही लोकीं ॥३॥
छळिती तुम्हां जे त्यासाठी विनवा । मनोभावें देवा क्षमे लागीं ॥४॥
देवाचीं अपत्ये तरी तुम्ही व्हाल । दयाचि कराल सर्वांठायी ॥५॥
सूर्याचा प्रकाश सुष्टां दुष्टां सम । देवासी विषम भाव नाहीं ॥६॥
देव पर्जन्याते पाडी सर्वाठायी । न्यायी कीं अन्यायी असो जन ॥७॥
देव पिता कैसा गुणसत्वनिधी । तैसी साधा सिद्धि क्रिस्त म्हणे ॥८॥

ओव्या--- जें जें काहे साधन करणें । तें करावे गुप्तपणे ॥
देव संतुष्ट होय तेणें । सर्व साक्षी परमात्मा ॥१॥
सव्य हस्ते करिता दान । वाम हस्तासी न व्हावे अज्ञान ॥
ऐसे पुण्य कर्माचे गोपन । यत्ने करोनि करावें ॥२॥
लोकांती देवाची प्रार्थना । करिता देवासि मानेना ॥
एकांती करिता आराधना । शुद्ध भावा देव पावे ॥३॥
जरी करणे उपोषण । लोकां न दावा म्लान वदन ।
जिवेभावें पुण्याचरण । केलिया देव संतोषे ॥४॥
भावें देव स्मरोनि अंतरी । बाह्य चिंता सोडोनि सारी ॥
दृष्टी ठेवोनि शाश्वतावरी । सुखें धर्मी वर्तावें ॥५॥
देवाचें होणे दास । तरी सोडावें लोभास ॥
धरितां दोहीचा हव्यास । एकही साध्य न होय ॥६॥
सांडोनि सकळही पैशुन । नित्य करावें आत्मपरीक्षण ॥
दोष आपुले शोधोन । यत्नें दूर करावे ॥७॥
ऐसी धर्माची कठिण वाट । अधर्म मार्ग सुगम सपाट ॥
देवासि शरण जातां अरिष्ट । सर्वही टाळी कृपाळू ॥८॥

सांकी --- यापरि ज्याचा भाव प्रभुवरि । भक्तिही विमल अनन्य ॥
शुद्धशील परि परम दयाळु । कां तो न होय धन्य ॥१॥

श्लोक -- दिव्य भाव प्रभुचा न कळे जया । बाह्य दृष्टि नच ओळखिती तया ॥
ते असे चरित पाहूनि मानिती । हाच देव न दुजा पृथिवीपती ॥१॥
असो या परी ख्याति होतां तयाची । रुचेना जनां भावहीनांसि साचि ॥
म्हणे हा कसा आपणां देव मानी । कसा भूप याची कुठें राजधानी ॥२॥
दिंड्या -- राजपुरुषा कळवूनी निज कुभांड । म्हणति याला उचित कीं राजदंड ॥
देव सुत हा म्हणवितो आपणाते । तसे राजाही म्हणति शिष्य मातें ॥१॥
म्हणे अधिकार नच दिसे दोष याचा । परी तुम्हां वाटतो दंड्य साचा ॥
तरी नेउनि तुम्हि याजला शुळी द्या । पाप घोरहि हे आपुल्या शिरीं त्या ॥२॥

साकी - नानापरि त्या छळुनि शेवटी नेति शुळावरि द्याया ॥ चढवुनि स्तंभी खिळिता देवा स्मरुनि म्हणे प्रभुराया ॥१॥
क्षमा करी या दीनावरी हे नेणति निजपापातें ॥ ये धाउनिं घे पदरीं मजला हरुनि शिघ्र तापाते ॥२॥

श्लोक --- संताते छळिती कधी परि न ते क्रोधे त्यां शापिती ।
सर्वांचे उपकार सोसुनि तयां सन्मार्गचीए दाविती ॥
ऐसे जे सुकृती हरीसि भजती तो एक जाची गती ।
त्यां रक्षीं हरि तोचि नित्य अशुभीं त्यांची नसे कीं रती ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : December 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP