मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|
बकासुराख्यान

कीर्तन आख्यान - बकासुराख्यान

कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.


भूमिका -

पांडव वनवासात असताना एकचक्रा या गावी गेले व एका ब्राह्मणाचे घरी राहिले. त्या घरचा ब्राह्मण, त्याची पत्‍नी, लहान कन्या, पुत्र रात्रभर रडत होते. ते पाहून कुंतीचे ह्रदय तळमळले. तिने चौकशी केली. त्यात समजले की, त्या नगरीचा राजा फार बळहीन व मंत्री भेकड आहेत. यामुळे नगराबाहेर एक बकासुर नावाचा राक्षस आहे, त्यास रोज गाडाभर अन्न, शंभर बकरी, रेडा व एक माणूस द्यावा लागत असे. ब्राह्मणीने कुंतीस सांगितले की, उद्या आमचेवर पाळी आहे. आम्हांपैकी कोणास बळी द्यावयाचे? फार कठीण प्रसंग आहे. ब्राह्मणावर आलेले संकट दूर करण्याचे आवाहन कुंतीने दिले व सकाळी अन्नाचे गाड्यावर भीमदादा आरूढ झाले. हा धाडशी मुलगा पाहून ग्रामस्थास आश्चर्य वाटले. भीमाने बकरी वगैरे परत केली. अन्नाचा गाडा घेऊन बकासुराजवळ गेला व ते सर्व अन्न खाऊन बकासुराचे प्राणही घेऊन त्यास यमसदनास पाठवून भीमाने सर्व नगर सुखी केले.

१. पद (चाल - ये धावत माझे आई)

जो निश्चळ रत हरिनामी - हारि तत्कामी तत्पर साचा ।

प्रिय माधव भक्तिरसाचा ॥ध्रु०॥

खल मातुल शकुनिमताने, आंध सुताने, मंदमतियोगे ।

बळे केले पंच हारि जागे ॥

लाक्षागृही कृत्रिम वैभव, जाणूनी पांडव, निघती वेगे ।

दुर्योधन मनोरथ भंगे ।

हे होता श्रुत धृतराष्ट्रा, वाटे आरिष्टा, संशय न लगे ।

म्हणे धरिला डाव भुजंगे ॥

सोडुनिया लाक्षसदनाते, आले पांडव घोर वनाते ।

हा वृत्तांत श्रुत न जनाला, जाहाला साचा ॥प्रिया॥१॥

वृक्षातळि निद्रित होता, बांधव माता, भीमसेनाला ।

ते वाटे दुःख मनाला ॥

हर हर शिव उच्चारुन, अति धिक्कारुन, मधुसुदनाला ।

आक्रोशे करी रुदनाला ॥

ते ऐकुन राक्षस बोका, भीम हारि तो का, करि रुदनाला ।

तो पावे यमसदनाला ॥

तद्‌भगिनी हिडंबा भामा, मनि भुलली रमली भीमा ।

सुत होय घटोत्कच नामा ॥ नातु पंडूचा ॥प्रिय१ ॥

निजराज्य पदच्युत भ्रमले । फिरुनी वनी श्रमले, दिवस आणि रात्री ।

त्वरे ठाव न देत धरित्री ॥

आले एकचक्र नगरात, विप्रगृहि राहात, झाले परतंत्री ।

चळ न पडे कधि विधिसूत्री ॥

ते राजपुत्र माधुकरी, मागत नगरी, भास सर्वत्री ।

जन म्हणती ब्राह्मण भत्री ॥चाल॥

जरी आड रवी लपला, तरी झाकी प्रकाश न आपुला,

गुण पुरुषाचा प्रिय ॥३॥

त्या नगरप्रदेशी भ्यासूर, नामे बकासुर, निर्दय, कपटी ।

बहु मानव नित्य चपेटी ॥

गज हय सहदावणी पशुच्या, जन काळाच्या, वाढले ताटी ॥

कैकाचि लागली ताटी ॥

राजा म्हणे यापुढे न चले, धैर्यचि खचले, वाटे भय पोटी,

हा करिल सकल गट सृष्टी ॥

चाल- ही आली प्रजेवर धाडी, हारी यास्तव पांडव धाडी ।

भवभयसागर नावाडी । विष्णुदासाचा ॥प्रि०४॥

२. पद - (चाल चंद्रकांत राजाची)

मदनमस्त माजला बकासुर याने ताडिले कैकाला ।

येकचक्र नगराश्रित ग्रासी टाकुनी आवघ्या लोकाला ॥ध्रु॥

तो नर पारधी कठीण त्याचे सुटणे फाशाचे बिरडे ।

पंचशरानली नरतनु करवत भाजी कुणबी जसे हुरडे ॥

आता वाते बहु गोड परंतू येइल परिणामासि रडे ।

तुमची तीच गती कशास करिता प्रस्तुत स्मशानशोकाला ॥१॥

मांसरुधिर दुर्गंध कुंदमळ ये घ्राणी त्या कुवनाची ।

चर्म हाडांचे तुकडे चहुकडे हिंसक शाळा यवनाची ॥

मुख-अवलोकन केल्या आगमन प्राप्ति सुलभ यमसदनाची ।

अहो शहाणे हो आजुन त्याच्या सोडा आवडी भजनाची ॥

कथा काय इतरांची त्याच्या वाहाती सुरवर धाकाला ॥२॥

पंचशराचीजखम लागली मग तो सोडीना बघा तुम्हा ॥

शोधून काढिल पारधी जरि तरी घेतिल पर्वती दीर जागा ।

नवदाढी वाढविली लाविली सफेद राखोंडी अंगा ॥

भगवे कपडे बदलुन रुपडे केला भजनाचा दंगा ।

सापडल्या जसे ससे फाशामध्ये व्याध सोडिना येकाला ॥३॥

मंदबुद्धि अति प्रधान भूपति मेष एक शत दे खाया ।

नियमित रथ अन्नाचा देऊन त्यावर तो येक नर काया ।

विष्णुदास म्हणे जातिल जाती गेले जन्मुन बहु वाया ।

अजरामर नर होतिल जरि तरि येईल सुदया गुरुराया ॥

आला भीम भय- संकट-नाशक विसरा दुःखाला ॥४॥

३. श्लोक-

दे आर्ध भाग निज तशा वृकोदराते ।

वाढीत तदर्थ उरल्या सहोदरते ॥

देवोनि अन्न आतितासी मग माय जेवी ।

सीता सुतासह मुनी सदनात जेवी ॥१॥

४. दिंड्या -

अशा परिने क्रम नित्य भोजनाचा ।

सत्य धर्माने प्रेम बहुजनाचा ॥

काळ टपला बक चोर जिवधनाचा ।

तया नगरी सण नित्य फाल्गुनाचा ।

जेथे बुद्धिबळहीन मंत्रि राव ।

तेथे न्याय-अन्याय येक भाव ॥

असो जाणा तो भला नसे गाव ।

जिवा हानी फूटकी जशी नाव ॥

५. साकी -

प्रतिदिवशी एक प्रतीगृहातुन पुरुष अथवा नारी ।

देणे लागे बकासुराला ऐसी राज मुनारी ॥१॥

६. पद -

आता हारी सांभाळी सांभाळी ।

आली बकासुर पाळी ॥ध्रु॥

दाखल झाली स्वारी आधी केली नाही हुषारी ॥आ.१॥

येथे राहुन फसलो परनगरा का नाही गेलो ॥आ.२॥

रडती बाबा काका म्हणती आमुचा गेला आबा का ॥आ.३॥

पुसती अधिसुत बाइल सांगा आमुची कशि गत होइल ॥आ.४॥

जावे नृपाप्रति शरण, तरि तो इच्छी जिव धन हरण ॥आ.५॥

विष्णुदास म्हणे कोणी हारिविण त्राता नसे निरवाणी ॥आ.६॥

७. साक्या -

द्विजधन वेष्टुन भुजंग पांडव जेथे राहत ।

धनलोभाने चोर बकासुर तेथे घाली हात ॥१॥

अहो भटजी तुम्ही किंवा तुमचे स्त्री, सुत अथवा कन्या ।

चौघांतुन येक राक्षस आहारा उदयिक जावे वन्या ॥२॥

८. कामदा

काळमृत्यूची झाली सूचना ।

यामुळे मला काही सुचेना ॥

लेकरे ही सांभाळी सुंदरी ।

जातो मी बकासुर-मंदिरी ॥

९. ओवी -

कोण्या कारणे ब्राह्मण ।

आज शोक करितो दारुण

राहून दूर उभे आपण ।

श्रवण आधी करावे ॥१॥

१०. पद - (चाल- इस तनधनकी)

तो शोक वदवेना वाचा ।

करि ब्राह्मण जो वेद वाचा ॥ध्रु॥

साश्रु सुता सूत स्त्री कवटाळुन ।

काय हा कोप शिवाचा ॥१॥

या चौघांतुन तरि म्या करावा ।

कोणाच्या घात जिवाचा ॥२॥

विप्र म्हणे तरी क्षिप्रचि जातो ।

राहा तुम्हि तिघेजण वाचा ॥३॥

विष्णुदास म्हणे श्रीहरीस्मरणे ।

आटेल सिंधु भवाचा ॥४॥

११. साकी -

रक्षण करि शिशु पिता परंतु संरक्षण करि माय ।

यास्तव राक्षस-भक्ष्य मी होतो यांत गैर ते काय ॥

१२. पद-

आहो प्राणपति तुम्ही जाता कशाला

राहून रक्षावी ही लोकशाला ।

पतिविण पद्मिण जी जीवरक्षा ।

चंदनगत गंध निर्जीव रक्षा ।

मरण न ये तिने भ्यावे विषाला ॥

मिळवुन धन तुम्ही लेकुरे पाळा ।

काय मी उपयोगी हाड कपाळा ।

कारण होईन मी आपेशाला ॥राहुनि.॥२॥

तुम्ही प्रतिपालक स्वकुल स्वहिता ।

त्रैलोक्य धन्यचि दान दुहिता ।

पुत्रनिधान हे दीपवंशाला ॥राहून॥३॥

यास्तव राहा तुम्ही कुमर कुमारी ।

शीघ्रवरा स्त्री दुजी सुकुमारी ।

कोणती अडचण आहे आशाला ॥राहून. ४॥

विष्णुदास म्हणे ज्या गृही पांडव ।

भाव अनुभव देवकृपार्णव ।

काय उणे मग तेथे यशाला ॥राहून. ५॥

१३. पद - (चाल- थोर तुझे उपकार)

पराची पोषक धन दुहिता ॥ध्रु॥

दो दिवसांची तजविज आजची, जाहल्या न आनहिता ॥१॥

राहा गृही धनी तिघे परकी मी चौथी, कन्या करारहिता ॥२॥

युक्तचि असता युक्ति उगेची- का नेत्र जळे धुता पराची ।

विष्णुदास म्हणे दैवी विधाता । वचकेना मनी लिहिता ॥

१४. पद -

बाबा का ललता आललता । शोक नका कलु भलता ।

बाबा या कालीनं उद्या त्याला मी घालीन ॥बाबा॥

कोथे राक्षस आहे, त्याच्या बाचे खाल्ले काय ॥बाबा॥

विष्णुदास म्हणे साचा, लागे गोडचि बोबडि वाचा ॥बाबा॥

१५. ओव्या -

व्याकुळ शोकाने द्विजवर । नावरे कुंतीसी गहिंवर ।

म्हणे दया सोडून परमेश्वर । आज आम्हांवर कोपला ॥

बुद्धि बोधिता चौघांसी । सिद्धि नोव्हेचि कार्यासी ॥

यास्तव द्विजपत्‍नी येकलीसी । पाचारीत आग्रहे ॥

कोण्या कारणाचे दुःख, प्राप्त होवून घडला शोक ।

सांगे माय वैकुंठनायक । कृपा करिल तुजवरी ॥

१६. दिंडी

तुम्ही आम्ही विचार करून बोलू ।

माय माझे वचनासि नको कोलू ।

तुझे वोझे तोलेल तरी तोलू ।

तुझ्या कामी आम्ही बळे उडी घालू ॥१॥

१७ पद (चाल-असा धरी छंद)

आघटित बाई, हे सांगुन सार्थक नाही ॥ध्रु॥

पडला दुःखाचा डोंगर । आला बकासूर आजगर ।

गिळल्यावाचुन माझे घर । सोडीना काही सांगून ॥

येथला वृत्तांत हो माते । बकासुर वदत कुंड होमाते

प्रतिदिनी येक नर नेमाते । जातो मुखखाई ॥हे सांगून ॥

आम्हांवरी आली त्याची पाळी । उदइक जाणे प्रातःकाळी ।

अशा दीन अनाथा सांभाळी । कोण या समयी? ॥ हे सांगून॥

नपुंसक केवळ निर्बळ राव । भयाने उजाड करितो गाव ॥

विष्णुदास म्हणे हरि पाव । धाव लवलाही ॥ हे सांगून ॥४॥

१८ साक्या -

भ्रतार मी आणी ही द्वय बाळे मिळुनी चवघे घरात ।

यातुन कोणाला टाकावे काळाच्या पदरात ॥१॥

तुमच्या चिंताज्वरव्याधीचे कळले सकळ हवाल ।

मात्रा याची देते परंतु सांभाळा हरवाल ॥२॥

माते मज परमेश्वरकृपेने पाच पुत्र आहेत ।

त्यातुन एकाला संतोषे द्यावा ऐसा हेत ॥३॥

हार हार म्हणुनी द्विजसति जेव्हा घाली आंगुल्या कानी ।

फार कठिण की माते नराचा न विके जीव दुकानी ॥४॥

१९. दिंडी

रडे जे तो युक्तिने समजावा ।

कोणी कोणाच्या साठि जीव द्यावा ।

आम्ही कैशा परी शोक आठवावा ।

निकट येवुनी सोडती काळ बोवा ।

२०. साकी

आम्हाकरिता म्हणता जिवासी देतो जिव बदला मी ।

तरि या कर्मे मरणापेक्षा आधीक की बदनामी ॥

२१. दिंडी -

बाई माझे बोलासि राजि होई । सोडी चिंता तू स्वस्थ मने राही ।

ग्रंथकर्ते ग्रंथात देति ग्वही । परोपकारासारखे पुण्य नाही व

२२. पद (चाल - चंद्रकांत राजाची)

आला मूळ बैसला उशाला काळ मोजि घटका ।

आता कोणाचे कोण आवघे आशापाश लटका ॥ध्रु॥

तो सकलांचा सखा जिवाचा ज्याचा दिवस चलता ।

नलगे त्याला नाते वाला साह्य होय भलता ।

ज्याचे घडीची रती बदलली झाली प्रतीकुलता ।

ज्याची मैत्री न धरी कोणी सखा बाप चुलता ।

हे रहा दारु तव सेजारी यासि न तुम्ही हटका ।

आता कोणाचे ॥१॥

भीम म्हणे सहकुटुंब ब्राह्मण रडे तो आता का ।

हितकर अमृतरस दुर टाकुन करितो आता का ।

माते आणिक जावुनि त्यांच्या वारी भय-शोका ।

खरे कर असे पुन्हा न बैसे बोलण्यास धोका ।

अनुभव घेऊनी निर्भय होऊनी कोणीकडे भटका आता ॥२॥

या शोकाचे सांगा कारण पुनरपि का घडले ।

सहसा मोडू नये पहिले जे घडले ते घडले ।

निश्चय तुमचे आम्हि पतकरितो कठिण कार्य आडले ।

बघा प्रचीति मघा व्यर्थची नाही बडबडले ।

स्वस्थ राहा मनी चिंताग्निचा लावु नका चुटका आता कुणाचे ॥३॥

२३ कामदा

बोलता तुम्ही खरे द्विजोत्तमा । पुत्र आधिकींचे नाही की आम्हा ॥

नाहि या सुता जीव भिती जरा । वधिल सिंह हा बक मांजरा ॥१॥

२४ श्लोक (शा.वि)

तो आम्हा बळधी सुपुत्र मजसी झाला असे दूसरा ।

भोक्ता वज्रतनु आटीव सुभूजा तेजासि इंदूसरा ।

धाडायासि उद्या वनासि नयेचि आपेश काळांतरी ।

आता हे रडणे नको पुनःपुन्हा सांगू कितीदा तरी ॥१॥

श्लोक

आज्ञा भूपाची परिसवत अम्हा ।

वोढून न्यावे नतक्रार कामा ।

वेगे चला भाषण आटपावे ।

आहे उपासी बक वाट पाहे ॥२॥

२५ पद (चाल-चंद्रकांत)

प्रातःकाळी स्नान करोनी भीम रथावरि वेगे ।

बकासुराचे वनमार्गाकडे तो दवडी वेगे ।

ते पाहुन नरनारी म्हणती धीट कोण हा गे ।

मरण्याला हा येवढा झाला उतावीळ का गे ।

विष्णुदास म्हणे सत्संग नर दे तयाला झटका; आता कुणा ॥१॥

२६ पद (चाल- ये धाव्त)

भीमाने बकासुर वधिला, चुकला घाला ।

जन कंटक समुळ निघाला ॥

विप्रावर राक्षस पाळी आलि ज्या काळी ।

भिम वदला निघे त्या काळी ।

ते आघटित कौतुक पाहाया येती लवलाह्या ।

नृप मंत्रि शिशू नर बाया ।

म्हणति हा धीट मूल केवढा झाला वेडा ।

आले फुकट मरण या द्वाडा ॥

चाल -

बळी जातो जो नित्याचा । आज किंचितही नूर याचा ।

नाहिंस सुकला ॥जनकंटक॥१॥

तो राक्षस खळ हाननाला जाता वनाला ।

किति भाविति कुशल मनाला ॥

ग्रामस्थाप्रति भिम सांगे परता मागे ॥

आज त्यजिले तुम्हां भव रोगे ।

पुढे स्वकरे गादी ओढी, वृषभा सोडी, सहमेष पुराकडे धाडी ।

चाल - मनी भावे कौंतेय दुसरा । बक मेष वधू आज करा ॥

आधि क्षुधेसि करू आसरा । उशिर कशाला व्जन०॥

२७ वोवी -

पश्चात वस्तुचा उपभोग । घेता चौर्यकर्माचा डाग ।

म्हणून राक्षसाचा भाग । तया समक्ष भक्षावा ॥१॥

हाका मारी भीमसेन । संकल्प सोडावा यजमान ।

क्षुधित करतो मी भोजन । विलंब आता सोसेना ॥२॥

२८ पद ((चाल पुरवणी)

मनी इच्छा आधी जेवावे मग या वधावे । परी अन्न न हे बाधावे ॥

बसे मुरडुन राक्षस पाठी अन्न सपाटी ।

जणु क्षुधार्त आयत्या ताटी ।

सक्रोध लक्षुन दृष्टी, वृकोदर पृष्टी ।

बळे हाणी बकासुर मुष्टी ॥चाल॥

पात्राहुन राक्षस ओढी, परि भोजन भीम ना सोडी ।

काय लाज भीड ना थोडी ।

त्या दोघाला । जन संकट समुळ निघाला ॥

२९. ओव्या -

राक्षस क्रोधे पिटीत मुष्टी । भीम न करीची दृष्टादृष्टी ।

ग्रासा ग्रासा पावे पाठी । अधिक अधिकचि घेतसे ॥१॥

३०. पद (पुरवणी) -

चट जेवुनी भीम बलवान वीररसपान ।

बकप्राणदक्षिणादान ।

दाबि पद पदिं धरी शेंडि मान मधी वोढी ।

देह इक्षुदंडवत मोडी ।

शव भक्षक जमल्या फौजा म्हणति यमराजा ।

आधी जीव भाग द्या माझा ।

बक मांस शुनी वृक खाता । मनि म्हणति भला हा दाता ।

विष्णुदास तव गुण गाता भवनिधि तरला । जनसंकट समुळा ।

३१. साक्या -

विशेष न मानुनि शशि भिम माझे भांडुन मूर्खा परते ।

टिकेल कशी विकण्याचि सरारी सोन्यासी खापर ते ॥१॥

मौनेचि गेला आघटित करुनी रक्षण सकल जिवाचे ।

सुकृत यशगुण आपुले न वदति घोर थोरपण वाचे ॥२॥

N/A

References :

आख्यानकार - श्री.विष्णुदास

Last Updated : May 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP