मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|
भीष्मप्रतिज्ञाख्यान

कीर्तन आख्यान - भीष्मप्रतिज्ञाख्यान

कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.


भूमिका -

आज भारतीय युद्धाचा नववा दिवस आहे. भीष्माचे सेनापतिपद दहा दिवसांचे ठरले होते; पण भीष्माचार्यांकडून पांडव मारले गेले नाहीत. कौरवांचे पुत्र बरेच नाहीसे झाले; म्हणून अत्यंत संचित होऊन दुर्योधनाने आपली चौकडी दुःशासन, शकुनी आणि कर्ण यांची गुप्‍त सभा भरविली. त्यांत कर्णाने सांगितले की, म्हातारे भीष्म मनाने पांडवांच्या बाजूचे आहेत; म्हणून त्यांच्या हातून पांडव मरणे शक्य नाही. तरी तू मजला सेनाधिपत्य दे. मी पांडवांसुद्धा श्रीकृष्णासही नाहीसा करुन टाकीन. हे त्याचे भाषण ऐकून दुर्योधन भीष्माचार्यांकदे गेला. आणि त्यांना दुरुत्तरे बोलला. तुम्ही पांडव मारा; नाही तर शरम त्याग करा. असे वचन ऐकताच भीष्माचार्य अत्यंत खवळले व त्याची व कर्णाची निर्भत्सना करुन ’गर्जोनी भीष्म म्हणे उदईक आम्हां हेंचि करणे । पांडव मारणें ।’ त्यावर दुर्योधन म्हणाला, ’आजोबा, उद्या पांडवांना जर तुम्ही मारले नाही तर तुम्ही काय कराल ?’ असे म्हणताच आजोबांना अत्यंत वाईट वाटले व हा दुर्योधन सबंध कुल भस्म करणार असे वाटून ते जोराने म्हणाले, उद्या पांडव मारले नाहीत तर मी मरुन जाईन. उद्या मी पांडव मारणार किंवा मी मरणार. ही आजोबा भीष्मांची प्रतिज्ञा ऐकून नातू दुर्योधन यास फार आनंद झाला. भीष्मांनी उद्या निःपांडव पृथ्वी करीन अशी प्रतिज्ञा केली. ही त्यांची प्रतिज्ञा हेराकडून पांडवांना कळली असे बहुतेक आख्यानकारांनी लिहिले आहे. परंतु विष्णुदास महाराजांनी श्रीकृष्णाचे अंतःकरणात असलेले भक्‍तवात्सल्य येथे सहज प्रकट केले आहे. ते निःपांडवी पृथ्वी करीन ही भीष्मांनी प्रतिज्ञा उच्चारताच श्रीकृष्णाला चिंतेचा ज्वर उत्पन्न झाला व आपला खास सारथी जो दारुक, त्याला बोलावले व सांगितले की, उद्या शस्त्रास्त्राने सिद्ध असा माझा रथ तयार ठेव. त्यावर सुदर्शनही ठेव. भीष्माने आंधळ्या धृतराष्ट्राच्या मुलांच्या मंदबुद्धीने उद्या निःपांडवी पृथ्वी करीन अशी प्रतिज्ञा केली आहे. कदाचित भीष्मांनी घोर प्रसंग आणला तर तू तिथे प्रगट हो. मग माझ्या सुदर्शनाच्या घायाने सर्वांचा-शत्रुसैन्याचा निःपात करीन. मी हातात शस्त्र धरणार नाही अशी प्रतिज्ञा केली आहे. तथापि भक्‍तरक्षणार्थ माझी प्रतिज्ञा मोडून रक्षण करीन.

यानंतर पांडव कृष्णाजवळ आले. ती वेळ सायंकाळची प्रहर रात्रीचा सुमार होता. पांडव म्हणाले, भीष्मांनी निःपांडवी पृथ्वी करीन अशी प्रतिज्ञा केली आहे; तरी यातून आमचे संरक्षण करणार प्रभू तूच समर्थ आहेस. त्यावर कृष्ण म्हणाले, भीष्माचे अतिशय मोठे बळ आहे. उद्या तुम्हांला माझ्या हातून काही एक सहाय्य होऊ शकणार नाही. तुझ्याकडे राजे वगैरे पुष्कळ लोक जमले आहेत, त्यांच्याकडून उद्या युद्ध कर. मी राजा नाही व हातात शस्त्र घेत नाही. तेव्हा माझा उपयोग उद्या काही एक नाही. हे त्याचे कठोर भाषण ऐकताच पांडवांनी हात जोडून प्रार्थना केली, देवा, उद्या आमचा नाश व्हावा हे तुझ्याच इच्छेत दिसते; तर उद्या रणांगणावर मरण्यापेक्षा आत्ताच आमची शिरे काटून टाक. हे ऐकताच श्रीकृष्ण म्हणाले, क्षत्रियांना लढाईत मृत्यू येणे हे फार भाग्याचे लक्षण आहे; तरी तुम्ही परत जा व तुम्हांला वाटेल तसे करा. रोजच्याप्रमाणे पांडव आपल्या शिबिरात आले. त्यांचे सुकलेले चेहरे पाहून द्रौपदीने हकीगत विचारली. धर्मराजाने सांगितले की, आमचे प्रयत्‍न काही ऐक चालू शकत नाहीत. उद्या आम्हा पांडवांचा मृत्यू अटळ आहे. द्रौपदी म्हणाली, माझ्या श्रीकृष्णाचे पाठबळ असता तुम्ही निराश का होता ? धर्मराज म्हणाले, आम्हांस श्रीकृष्ण वळत नाही, तेव्हा तू जाऊन त्याची प्रार्थना कर.

द्रौपदी श्रीकृष्णाकडे गेली व तिने माझे सौभाग्य उद्या मला दे अशी प्रार्थना केली. परंतु कृष्णाने तिलाही जुमानले नाही. इथे एक विनोदाचा प्रसंग विष्णुदासांनी असा रंगविला आहे की ’देवा, तुझ्या या भगीनीस उद्या वैधव्य आलेले पाहाणार ना ?’ हे ऐकताच श्रीकृष्ण म्हणाले, उद्या तुझ्या एकटीवरच हा प्रसंग नाही. माझ्या सोळा सहस्त्र अष्टनायका त्यांच्यावरही हाच प्रसंग आहे. कारण की उद्या अर्जुनाबरोबर माझाही नाश होणार आहे. तेव्हा तुझ्या एकटीचाच वैधव्यनाश नसून माझ्याही स्त्रिया तुझ्या बरोबरीने आहेत. द्रौपदीने अत्यंत करुणास्वराने कृष्णाशी भाषण केले. ही करुणपर पदे अत्यंत चांगली आहेत.

नंतर श्रीकृष्ण म्हणाले, रात्र फार झाली आहे. भीष्माचार्यांच्या शिबिरात येतेस का ? चल, मी तुझ्या बरोबर येतो व काय होईल ते पाहू, असे म्हणून द्रौपदीला बरोबर घेऊन निघाले. तो रस्ता चांगला नव्हता. थोडासा पाऊस पडल्यामुळे चिखल झालेला, वाटेने पायात सराटे मोडत होते; अशा अवस्थेत द्रौपदीला चालवेना. द्रौपदीच्या पायातील पादत्राणे श्रीकृष्णांनी आपल्या जवळ घेतली व भक्‍ताच्या श्रेष्ठ पादुका म्हणून आपल्या डोक्यावर घेतल्या. द्रौपदीने वारंवार प्रार्थना केली-’कृष्णा, मला चालवेना रे ! जरा हळू चाल.’ या वेळची पदे हृदयाला पाझर फोडणारी आहेत. भीष्माचार्यांच्या शिबिराजवळ जाताच कृष्णांनी द्रौपदीला भीष्माचार्यांकडे जाऊन नमस्कार करण्यास सांगितले. द्रौपदी म्हणाली, मी एकटीच कशी जाऊ ? पण त्यांच्या शिबिरात संतपुरुष व सौभाग्यवती स्त्री यांचेखेरीज कोणासही सोडीत नसत. द्रौपदी शिबिरात गेली. नंतर श्रीकृष्ण चोर किंवा हेर आहेत असे समजून द्वाररक्षकांनी त्याला बांधुन टाकले. द्रौपदी आत गेली तो भीष्माचार्य बसून हातात जपमाळ घेऊन नेत्र झाकून ’श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण स्मरण’ करीत होते. ’प्रथम घालोनि लोटांगणीं । भावें मस्तक ठेवोनि चरणीं । भीष्म म्हणे शुभकल्याणी । सौभाग्यवति अष्टपुत्रा ।’ नंतर तिने मी द्रौपदी आहे असे आजोबास कळविले. भीष्माचार्यांनी श्रीकृष्णास सोडवून आणले. त्याची पूजा करुन उद्या युद्धात होणारा सर्व बेत ठरविला व त्याप्रमाणे भीष्माचार्य शरपंजरी पडले व पांडवांचे रक्षण होऊन द्रौपदीस सौभाग्यदान मिळाले. आजोबा उद्या मरणार हे ऐकून दुर्योधनास समाधान वाटलें हे एक दृश्य व दुसरे आम्हांस राज्य मिळेल पण आम्हांस सर्वतोपरी वडील तुम्ही आजोबा, आमचेपासून नाहीसे होणार, हे द्रौपदीचे भाषण, प्रत्येकाचे डोळे पाण्याने भरुन आणणारे आहे. हे मुळातच पाहावे.

१.

ओवी

भीष्मपर्व नवमे दिनीं । अस्ता गेलीया वासरमणि ॥

दुर्योधन सशोक मनीं । काय करिता जाहला ॥१॥

दुर्योधन दुःशासन । शकुनी आणि वीर कर्ण ॥

येकांत विचारें चौघेजण । येकांत स्थळीं बैसले ॥२॥

२.

कटाव

पांडव वैरी दुराभिमानी । कौरव पडले संकटभुवनीं ॥

दुर्योधन दुःशासन शकुनी । कर्णसहित एकांती बैसुनी ॥

बोले सुयोधन सशोक वचनीं । विश्‍वासे मशी भीष्मद्रोणी ॥

परोपरीनें फंद देऊनीं ॥ सबंधु मजला युद्धिं गोवुनी ॥

द्वंद्व वाढलें युद्ध लागलें । वैरचि पडलें गैरचि झालें ।

बांधव आजवर शतशा मेले । भीष्मपर्व दिननवम संपलें ॥

यशस्वी पांडव यशवत झाले ॥ परंतु यश मसि नाहींच आलें ।

भीष्में समरीं कृत्रिम केलें । वरिवरि लटकें युद्ध दाविलें ।

पांडव शत्रु मुख्य रक्षिले ॥ अन्य विराला व्यर्थ गांजिले ।

गज रथ घोडे बहुत मारिले । पदाति मृत्युलागीं धाडिले ।

असोत कौन्तेय परंतु वहिले ॥ परंतु माद्रिय नाहींच खपले ।

वृद्ध चित्त सत्धर्मीं भ्रमलें ॥ क्षात्रधर्म तो सर्व विसरले ।

काय करावें कांहीं न चले ॥ युक्‍ती अयुक्‍ति प्रयत्‍न खुटले ।

माझें बुद्धीबळचि खचलें । हाय हाय करि राय तयाचे ।

शांतवन करि कर्ण मनाचें ॥ पुढील कथेचे कटिबंध पदाचे ।

विष्णु कविचे छंद रसाचे ॥ परिसा साचें, पर्व हें शांत वनाचें ।

तारक हें जहाज भवाचें ॥

३.

आर्या

कर्ण म्हणे करितों मी हें कार्य सत्य तुझें न अन्यास ।

जाऊन सांगा भीष्मा, घ्यावा आतांचि शस्त्रसंन्यास ॥१॥

४.

श्‍लोक -

पांडवादि करुनी रिपु संहरि तो ।

रक्षी जरी समरिं त्या बळी तो हरि तो ।

न सोडी कदापि धरि धीर राजा ।

परि दूर काढी रणांतूनी आजा ।

४.

आर्या

स्वकुल ग्रास कराया गेला शिबिरासी भूप आजाच्या ।

चरणीं मस्तक ठेवी परि करी हृदयांत कोप आजाचा ॥

भीष्मासी म्हणे राजा आले नवही दिसांत यश न मला ।

कुंतितनय असो परि एकहि नसे माद्रिचा तनय शमला ॥२॥

युद्धी अजिंक्य पांडव वज्रधरा सामरा अशी वाणी ।

बहु वेळा तुज कथिलें परि तुजला लागली अशी वाणी ॥३॥

गांगेय म्हणे राया टोचती वाग्बाण काळजाला की ।

समरीं श्रम असतांही तुज कथिता फार काळ झाला कीं ॥४॥

५.

साक्या

पांडव मारिन अथवा मरणें नेम असे हा माझा ॥

सत्य जाण मम गोष्ट खरी ही सुयोधना तव काजा ॥१॥

तेव्हां तुमच्या बळ कर्णाचें कोठें गेलें होतें ॥

तुम्हांसी जेव्हा गंधर्वानें बांधुनी नेलें होतें ॥२॥

जिकडे आहे कृष्ण धनजंय शेवटी जयही तिकडे ॥

तुजसाठीं आम्ही करुन घेऊं निजशरिराचे तुकडे ॥३॥

पाचहि पांडव मारा किंवा शस्त्रत्याग करावा ॥

दशमदिनीं हें खचित उद्यांची नको दिवस अकरावा ॥४॥

६.

आर्या

भीष्म म्हणे रे राया पथ्यहित गुरुवचन का न आयकसी ॥

अहितचि कथिलें म्हणसी सांगें स्वसुता अहीत आइ कशी ॥

७.

ओवी

सक्रोधें भीष्म गर्जोनी म्हणे । उदईक संग्रामीं हेंची करणें ।

पांडव मारणें किंवा मरणें । हेचि प्रतिज्ञा माझी ॥

८.

पद

निःपांडवी हें करीन क्षितितल भीष्म वचन बोलला ॥

हरीला चिंताज्वर लागला ॥

तळमळमळें मन चंचल झालें पळभर निज येईना ।

चैनचि नाहीं नारायणा ॥

उद्धट भट तो शकटभटासह कटक करिल मर्दना ।

यश ओपील कुरुनंदना ॥

सारथी पाचारुनी एकांतीं यदुपति सांगे खुणा ।

निकट तूं राहे समरंगणा ॥

चाल - दारुका राहवर सिद्ध उद्या राहु दे ।

शरचाप सुदर्शन तयावरति राहुं दे ॥

निःपांडवी करितो कसा भीष्म पाहुं दे ।

अंधसुताचे मंदबुद्धीनें वृद्ध नाहीं दचकला ।

अघटीत भलतेची बरळला ॥१॥

समर करीन अरी हरीन नराधिप, कटके पाडीन क्षिति ।

सहाय्य होऊनी अर्जुना प्रति ॥

भीष्मद्रोण कृपकर्ण सुयोधन शल्य वीर महारथी ।

भगदत्तादि बहुत भूपति ॥ नररथ दवडिन अश्‍व पिटाळीन,

प्रतोद धरुनि हातीं । अरुण तरणिचा जसा सारथी ॥

चाल- इतुक्यावरी जरी दिसेल जय पारखा ।

तरी आण बसाया वेगें रथ दारुका ।

मग विचित्र पाहे पुढें माझे कौतुका ॥

सुदर्शनाचे घायें करुनि निवटित कौरवकुळा ।

अशी परी कथुनी या युक्‍तीला ॥२॥

इतुक्यामाजि पांडव येउनी म्हणति दीनबांधवा ।

रक्षी तूं आम्हां दीन पांडवा ॥

आनंदकंदा ब्रह्मानंदा गोविंदा माधवा ।

अच्युता नारायण केशवा ॥

दुर्जय गतवय तनय गंगेचा विजयी योद्धा नवा ।

कसा पावेल समरी बा शिवा ॥

चाल - आलों शरण तुझिया पदीं आम्ही श्रीपती ।

आतां कळेल तैसें करि विनविणें किती ॥
तूं म्हणसी मी निजभक्‍तांचा सारथी ।

यास्तव प्रार्थुंनी विष्णुदास मग वंदितसे पाऊला, कसा ।

दासासी हरि पावला ॥३॥

९.

दिंडी

कृष्ण म्हणे तुम्हांसी कळेल जैसें ।

विचारुनी मानसीं करा तैसें ।

भीष्म आम्हां जिंकील आनयासे ।

जगामाजी होईल व्यर्थ हसें ॥१॥

वृद्ध बळ तें अधिक युद्ध मोठें ।

कोण त्याचे वचनासि करि खोटें ॥

शौर्य ज्याचें ऐकुनी भीति वाटे ।

भयें त्रासें कृतान्त ऊर फाटें ॥

१०.

साकी

तुमबिन हमको कौन प्रभूजी माता पिता गुरु भाई ।

दीन दास को रछन करके पूरन करौ कमाई ॥१॥

अंजनी गीत -

नदी गेली सिंधूपाशीं । त्यानें अव्हेरिलें तिशी ।

जावें तिनें कोणापाशी । सांगा यदुराया ॥१॥

अभंग -

आपुलिया हातें कापावी ही मान ।

जगांत अपमान करुं नको ॥

श्‍लोक-

चित्तीं तुझ्या पांडव हे मरावे ।

आतांचि ऐसे तरी त्वां करावें ।

छेदोनि टाकी स्वकरेचि शीरें ।

मरणें आम्हांसी बहुधा बरे रे ॥१॥

तदा श्रीहरी म्हणे धर्मराया ।

जगी जन्मला साच प्राणी मराया ॥

परी क्षात्रधर्मा न करा हानि हो ।

मरणें बरें हें समरंगणीं हो ॥२॥

नृपति बहुत आले साह्यहि तूजला जे ।

वृत्त कळवी त्यासी सांगसी मला जे ॥

नव्हे भूप मी ना शस्त्राधिकारी ।

रिकामाचि आहे नव्हे शस्त्रधारि ॥३॥

११.

कामदा

बोलतां असें वचन श्रीहरी । थोर खोचले बाण अंतरीं ॥

दुःख-अश्रू ते नेत्रीं दाटले । पांचहीजणें मागे परतले ॥१॥

१२.

साकी

धर्म म्हणे हरी काय करावें आम्हां वळतची नाहीं ।

द्रौपदि तूं तरी प्रार्थुंन पाहे उठ जाय लवलाही ।

१३.

पद

द्रौपदी म्हणे त्या समयीं, निजलासि कांहीं उठ कृष्णा बा लवलाही ॥

पांडव आज संकटीं पडले, तुजला कळले ।

निष्ठुर त्वां कसें मन केलें ॥

दुर्योधन मजला छळितां ।

तूंचि अनंता पातलासि लक्ष्मीकांता ॥

आतांची कां हृषिकेशी आम्हां दिनासि ।

सोडाया संकटपाशीं ॥

चाल -

हें योग्य तुला वनमाळी । वाटलें कसें या काळीं ।

दुःखाचे डोहीं पांचाळी । बुडते पाही ।

निजलासी कांही ॥उठ॥१॥

दुर्योधन नृप संतोषें गांगेय तापें ।

बोलला प्रतिज्ञा कोपे ॥

करिन मी स्वकरशर निकरें।

निजनिर्धारें । निःपांडव क्षितीतळ सारें ॥

चाल -

दारुण उद्यां रण करितों । रक्षी जरी विधिहरिहर तो ।

संकट हें वारी श्रीहरी ॥ करुणाकर कृष्ण मुरारी ।

भवसागर पार ऊतारी । तारक होई । निजलासि कांहीं ॥२॥

श्‍लोक -

अढळपदीं त्वां ध्रुवा नेऊनी बैसविलें ।

पयनिधी उपमन्या देऊनी तोषविलें ॥

व्यसनिं ग्रथित केला त्या गजा सोडविलें ।

कुरुपतीसभेमाजींही मला गौरविलें ॥१॥

तुजविण मज त्राता कोण आहे जगत्रीं ॥

भवभय हरतांहि तारितां तूं परत्री ॥

समर करुनी रक्षी पांडवा श्रेय देई ।

आजी सती दानाचें पुण्यही तूंची घेई ॥

कृष्ण म्हणे द्रौपदी सत्त्व पाहे ।

मला रक्षितां तो दुजा कोण आहे ।

नसे आप्‍त बंधु पिता सूत माता ।

पाहा संकटीं या असे कोण त्राता ॥

१४.

साकी

सहस्त्र सोळाष्टनायका इतुक्या सुंदर अबला ।

विपरित होता मजला कांहीं विटतिल सौभाग्याला ॥१॥

१५.

दिंडी

छांड दियो प्रभूजी मेरी दैया ।

निकर ऐक हो काहेको कन्हैया ॥

और नाही कहत परत पैय्या ।

तुम बिन हामसे तात मैया ॥

१६.

पद

निष्ठुर कां बा झालासी । कृष्णा अंत किती पाहासी ॥ध्रु॥

पांडव धाकिती बहु हृदयी । नकळे भीष्म करील कांहीं ।

वारि संकट या समयीं । रक्षण करुनि लवलाही ॥

म्हणुनी प्रार्थितसे तुजला ॥ कृष्णा अंत किती पाहसी ॥१॥

प्रार्थितां दया न ये तुजला । अविनय काय असा जाहला ॥

कोणता राग मनीं आला ॥ कशास्तव कोप असा केला ।

मजला सांग हृषीकेशी । कृष्ण अंत किती पाहसी ॥२॥

थोडी उरली बा रजनी । स्वस्थ कां बसलासी अजुनी ॥

उदईक भीष्मासह पृथुनी । येईल युद्धाला सजुनी ॥

मग तूं पांडव काय त्यजसी । कृष्णा अंत किती पाहसी ॥३॥

भावें जोडोनिया पाणी । प्रार्थितें तुला दीनवाणी ।

करुणा करी चक्रपाणी ॥ इच्छा इतुकी ही चरणीं ।
भक्‍ती जडो विष्णुदासीं । कृष्णा अंत किती पाहसी ॥४॥

श्‍लोक

दिनानि दश भीष्मेन भारद्वाजानि पंच च ।

दिनद्वयंतु कर्णानि शैल्यं नार्धं दिनं तथा ।

दिनार्धात् गदायुद्धं च एतत् भारतमुच्यते ॥१॥

पद-

मेरी लाज रखो मैं शरण आयि ॥ध्रु.॥

जलदी करो अब ऊठ प्रभुजी ।

रात तो पिछली थोडी रही ॥१॥

ढुंढ न लकडी घडी प्रहर लगता,

क्या करना तो मोर भयी ॥२॥

दीनदयाल तुम हो किसनजी ।

थारा ब्रीद मैं तो समझ गयी ।

विष्णुकवि कहे धीर मत छोडो ॥

अब खुष उनकी मर्जी भयी ॥३॥

१८.

दिंडी

कृष्ण म्हणे द्रौपदी चाल जाऊं ।

कौरवांचे तें कटक कसें पाहूं ।

परतूनि अविलंबें मागें येऊं ।

नको कांहीं मानसीं दुःख साहूं ॥

१९.

पद

मंदगती चलिये प्रभुजी । मंदगति चलिये ॥ध्रु॥

साथ तुम्हारे चल न सकत हूँ । पैया मोरी फट गये ॥१॥

रात आंधरी बाट बुरी है, फेर पलट जाइये ॥२॥

विष्णुदास कहे गिरिधर प्रभुके । दये भय दूर गये ॥३॥

२०.

पद

कृष्णा थांब तरी मला येऊं दे ॥ध्रु॥

काय दुःख सांगुं मनिं । फिरसी कां वनोवनीं ॥

क्षणभर मधुर वचनीं बोलुं दे । कृष्णा थांब तरी मला येऊ दे॥

अंधकार कठिण वाट । कंटकादि फार दाट ।

मोडति रुतति सलति चरणिं काढुं दे ॥कृष्णा ॥२॥

मंद सुगंध शीत पवन । सुटुन आकस्मात ढळुन ।

गेला पदर सावरुन घेवुं दे । कृष्णा थांब तरी मला येऊं दे ॥३॥

दुर्जनाच्या अवगुणा । आठवलें दुःख मना ॥

खळमत सकल तुला सांगुं दे ॥ कृष्णा थांब तरी मला ॥४॥

वारंवार तुजसी हरि । मागणें मज हेंचि तरी ।

विष्णुदास सतत पदीं राहूं दे । कृष्णा थांब तरी मला येऊं दे ॥५॥

२१.

दिंडी

भीष्माचार्य मंदिरीं असति जागे ।

तरी तूंही द्रौपदी आतां जा गे ॥

उगी राहे नमून पुढें उगे ।

पाहूं कैसें होईल दैवयोगें ॥

२२.

पद

पराच्या जाऊ कशी मी कटकीं ॥ध्रु॥

मनिं भय वाटे एकटी, माझ्या सोबत नाहींत बटकी ॥१॥

जागोजागीं चौकी पहा रे । असतिल जागे भट की । पराच्या ॥२॥

इतुक्या रात्रीं जातां मजला । म्हणतिल केवढी धिट की ॥३॥

विष्णुदास प्रभु गात जात पदीं । करुनि मनातें धीट की ।

पराच्या जाऊ कशी मी कटकीं ॥४॥

२३.

श्‍लोक

बरी घोंगडी ती हातीं एक काठी ।

फटी पागुटी पागुटया बहुत गांठी ।

खुजा ठेंगणा देखणा थोर शहाणा ।

जुन्या चाकराचा धरी थेट बहाणा॥१॥

महा चोरटा कोण हा बैसला रे ।

दिसे घोंगडया कोण तैसा पहा रे ।

धरा काय पाहातां मारा हाणा रे ।

धरोनि हातीं दूर दवडून द्या रे ॥२॥

जुना दास मी गा आहे द्रौपदीचा ।

नव्हे चोरटा कानकोंडा पतीचा ।

भेद्या नव्हे मी सोद्या न भेद्या ।

क्षणभर स्थिरता येथ मजला बसू द्या ॥३॥

२४.

ओवी

प्रथम घालोनि लोटांगणीं ।

भावें मस्तक ठेवोनि चरणीं ॥

भीष्म म्हणे शुभ कल्याणी ॥

सौभाग्यवती अष्टपुत्रा ॥१॥

२५.

साकी

द्रुपदसुता मी कृष्णाभगिनी पंडुनृपाची सून ।

आलें पतिदाना घ्याया या पदकमलांपासून ॥

२६.

दिंडी

हरीचरणीं गांगेय ठेवी माथा ।

काढी युक्‍ती ताराया या अनाथा ॥

उभय वचना संपूर्ण करुनी या ।

समरीं विजयी करी सख्या यदुराया ॥१॥

पांडुपुत्र जिवंत हे असावे ।

माझे समरंगणीं शीर हें बसावें ।

शौर्य माझें किमपि न हें असावें ॥

शौर्य गावें लोकांनी न हंसावें ॥

असा हेतु हा पूर्ण करी माझा ।

तारी तारी संकटीं दास तूझा ॥

तुजवांचुनियां देव नसे दूजा ।

आता शेवटली घेई शब्दपूजा ॥

२७.

आर्या

राहो अशीच तुमची परि आठांसमही उणी न वाचा हो ।

येतों जसा समानची अंक जसा दरगुणी नवाचा हो

२८.

कामदा

कमदिढी चढो ये मदावरी । फिरुनी आपल्या ही पदावरी।

धरी वसुंधरे श्रृंग अंबरीं । फिरुन आपल्या ही पदावरी ॥

N/A

References :

आख्यानकार - श्री.विष्णुदास

Last Updated : May 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP