मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निवडक अभंग संग्रह|
निवडक अभंग संग्रह १

निवडक अभंग संग्रह १

निवडक अभंग संग्रह १


सकळ मंगळनिधी । श्रीविठ्ठलाचें नाम आधीं ॥१॥
म्हण कां रे म्हण कां रे जना । श्रीविठ्ठलाचें नाम वाचे ॥२॥
पतीत पावन सांचे । श्रीविठ्ठलाचें नाम वाचे ॥३॥
बापरखुमादेविवरु साचें । श्रीविठ्ठलाचें नाम वाचे ॥४॥
-----------------------
आरंभी आवडी आदरें आलें नाम । तेणें सकळ सिध्दि जगीं झाले पुर्णकाम ॥१॥
रामकृष्ण गोविंद गोपाळा। तूं मायमाउली जीविंचा जिव्हाळा ॥२॥
तुझियेनि नामें सकळ संदेह फ़िटला । बापरखुमादेविवरु श्रीविठ्ठला ॥३॥
-----------------------
दोही बाहीं संतांची सभा । सिंहासनीं उभा श्रीविठ्ठल ॥१॥
गाती नारद तुंबर प्रेमे । हरीचीं नामें गर्जती ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु उभा । त्रैलाक्याची शोभा शोभतसे ॥३॥
-----------------------
पन्नास अक्षरीं करिसी भरोवरी । शेखीं तुझें तोंड तुज वैरी रया ॥१॥
यापरी नामाची वोळ मांडुनी । संसार दवडुनी घालीं परता ॥२॥
रकारापुढें एक मकार मांडीं कां । उतरसी सम तुका शंभूचिया॥३॥
बापरखुमादेविवरा विठ्ठलु ह्रुदयीं । आपुली आण वाही त्रिभुवनीं रया॥४॥
-----------------------
गाते श्रोते आणि पाहाते । चतुर विनोदी दुश्र्चिते । सोहं भावी पूर्ण ज्ञाते । या सकळांते विनवणी ॥१॥
करा विठ्ठलस्मरण । नामरुपी अनुसंधान । जाणोनि भक्तां भवलक्षण । जघनप्रमाण दावितो ॥२॥
पुंडलीकाच्या भावार्था । गोकुळींहूनि झाला येता । निजप्रेमभक्ति भक्तां । घ्या घ्या आतां म्हणतसे ॥३॥
मी माझें आणि तुझें । न धरीं टाकीं परतें ओझें । भावबळें फ़ळतीं बीजें । बापरखुमादेविवरु विठ्ठलीं ॥४॥
-----------------------
परिमळाची धांव भ्रमर ओढी । तैसी तुझी गोडी लागो मज ॥१॥
अविट गे माय विटेना। जवळींच आहे परि भेटेना ॥२॥
तृषा लागलिया जीवनातें ओढी । तैसी तुझी गोडी लागे या जीवा ॥३॥
बापरखुमादेविवरा विठ्ठलीं आवडी । गोडियेसी गोडी मिळोनि गेली ॥४॥
-----------------------
दिप दिपिका शशी तारा होतुका कोटीवरी रे । परि न सरे निशि नुगवे दिवसु दिनकरनाथें जयापरी रे ॥१॥
नुद्धरिजे नुद्धरिजे नद्धरिजे गोपाळेंविण नुद्धरिजे॥२॥
नगर भ्रमतां जन्म जावो परि प्रवेशु एक्या द्वारे रे । तैसें यजिजो भजिजो पूजिजो परि उकलु नंदकुमरु रे ॥३॥
सर्वावयवीं शरीर सांग परि विरहित एका जीवें रे । तैसा धिकू तो श्रोता धिकू तो वक्ता जो वाळिला विठ्ठलदेवें रे ॥४॥
गळित शिर हें कलेवर रे उद्केंविण सरिता भयंकर रे । रविशशिवीण अंबर तैसें हरिविण जिणें तें असार रे ॥५॥
अंत:करणीं रुख्मिणीरमणु परि त्या श्र्वपचाहि बंधन न घडे न घडे न घडे रे । येरु यति हो कां भलतैसा परि तो भवाग्निहूनि न सुटे न सुटे न सुटे रे ॥६॥
शिखिपक्षी पत्रीं डोळे जेविं अकाळ जळद पटल रे । तैसीं गोकुळपाळकबाळेंविण कर्में सकळ विफ़ळ रे ॥७॥
यम नियम प्राणायम प्रत्याहार हे सकळ उपाय परि अपाय रे। जंव तमालनील घन:सांवळा ह्रुदयीं ठाण मांडुनि न राहे रे ॥८॥
मी उत्तम पैल हीनु भुत द्वेषाद्वेष ठेले रे । केलेनि कर्में उफ़खां निपजे सुख तें दुरी ठेलें रे ॥९॥
आतां असोत हे भेदाभेद आम्ही असों एक्या बोधें रे । बापरखुमादेविवरु विठ्ठल निवृत्ती मुनिराया प्रसादें रे ॥१०॥
-----------------------
आंनदले वैष्णव गर्जती नामें । चौदाही भुवनें भरली परब्रम्हे ॥१॥
नरहरि नरहरि नारायणा । सनकसनंदन मुनिजनवंदना ॥२॥
गातां वातां वाचता प्रेमें उल्हासें । चराचरींचे दोष नाशियले अनायासें ॥३॥
हरि मनीं हरि चित्तीं हरि अंकु शरीरीं । तयातें देखोनि हरि चार्‍ही बाह्या पसरीं ॥४॥
अंध्रिरेणु ज्याचा उद्धरिते पतिता । प्राकृतवाणी केवि वानुं हरिंभक्ता ॥५॥
तीर्थें पावन जिहीं धर्म केला धडौती । कैवल्यकल्पद्रुम ते त्रिजगतीं ॥६॥
मत्स्यकूर्मादिक ज्याचे महिमेसी आले । धन्य वैष्णव तेज रविशशिसीं पाहाले॥७॥
बापरखुमादेविवरा पढयंती जिया तनु । तया संतचरणीं स्थिर हो कां मनु ॥८॥
-----------------------
संत भेटती आजि मज । तेणें मी झालों चतुर्भुज । दोन्ही भुजा स्थूळीं सहज । दोन्ही सूक्ष्मीं वाढल्या ॥१॥
आलिंगनें सुख वाटें । प्रेम चिदानंदीं घोटें । हर्षें ब्रम्हांड उतटे । समूळ उठे मीपण ॥२॥
या संतासी भेटतां । हरे संसाराची व्यथा । पुढतां पुढती माथां । अखंडित ठेवीन ॥३॥
या संतांचें देणें । कल्पतरुहूनि दुणें । परिसा परीस अगाध देणें । चितामणी ठेंगणा ॥४॥
या संतांपरीस उदार । त्रिभुवनीं नाहीं थोर । मायबाप सहोदर । इष्टमित्र सोईरे ॥५॥
कृपाकटाक्षें न्याहाळिलें । आपुलें पदीं बैसविलें । बापरखुमादेविवरें विठ्ठलें । भक्तां दिधलें वरदान ॥६॥
-----------------------
अकार उकार मकार करिती हा विचार । परि विठ्ठल अपरंपार न कळे रया ॥१॥
संताचे संगतीं प्रेमाचा कल्लोळ । आनंदें गोपाळ माजी खेळे ॥२॥
भाळे भाळे भक्त गाताती साबडे । त्यांचें प्रेम आवडे विठोबासी ॥३॥
बापरखुमादेविवरु परब्रम्ह पुतळा । तेथील हे कळा निवृत्ति जाणे ॥४॥
-----------------------
पूर्वजन्मीं सुकृतें थोर केलीं । तीं मज आजि फ़ळासि आलीं ॥१॥
परमानंदु आजि मानसीं । भेटी झाली या संतासी ॥२॥
मायबाप बंधु सखे सोयरे । यांतें भेटावया मन न धरे ॥ ३॥
एकएका तीर्थहूनी आगळें । तयामाजी परब्रह्म सांवळे ॥४॥
निर्धनासी धनलाभु झाला । जैसा अचेतनीं प्राण प्रगटला ॥५॥
वत्स बिघडलिया धेनु भेटली । जैसी कुरंगिणी पाडसा मिनली ॥६॥
हें पियुषा परतें गोड वाटत । पंढरीयाचे भक्त भेटत ॥७॥
बापरखुमादेविवरु विठ्ठले । संत भेटतां भव दु:ख फ़िटलें ॥८॥
-----------------------
उंच पताका झळकती । टाळ मृदंग वाजंती । आनंदे प्रेमें गर्जती । भद्र जाती विठ्ठलाचे ॥१॥
आले हरिचे विनट । वीर विठ्ठलाचे सुभट । भेणें जाहले दिप्पट । पळती थाट दोषांचे ॥२॥
तुळसीमाळा शोभती कंठीं । गोपीचंदनाच्या उटी । सहस्त्र विघ्नें लक्ष कोटी ।बारा वाटा पळताती ॥३॥
सतत कृष्णमूर्ति सांवळी । खेळे ह्रुदयकमळीं । शांति क्षमा तया जवळीं । जीवें भावें अनुसरल्या ॥४॥
सहस्त्र नामाचें हतियार । शंखचक्राचे शृंगार । अति बळ वैराग्याचें थोर । केला मार षडूवर्गा ॥५॥
ऎसे एकांग वीर । विठ्ठल रायाचे डिंगर । बापरखुमादेविवर । तिहीं निर्धारीं जोडीला ॥६॥

N/A

N/A
Last Updated : January 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP