मालिका ९ नवमी

श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे.


॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥
(॥ रुप पाहातां लोचनी॥  आणि ॥ राहो आतां हेचि ध्यान ॥)
अभंग - १
श्री तुकाराम महाराज वाक्य--
लक्ष्मीवल्लभा । दिनानाथा पद्मनाथा ॥१॥
सुख वसे तुझे पायी ॥ मज ठेवी तेची ठायी ॥२॥
माझी अल्प हे वासना ॥ तूं तो उदाराचा राणा ॥३॥
तुका ह्मणे भोगे ॥ पीडा केली धांव वेगें ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०६ - आमुचा हाचि लाभ अव्यंग ॥ जे तुझिया चरणांचा संग ॥ त्याचा न साहवे वियोग ॥ दहेभंग जाहलिया ॥३६९॥

अभंग - २
श्री तुकाराम महाराज वाक्य--
तान्हेल्याची धणी ॥ फिटे गंगा नव्हे उणी ॥१॥
माझे मनोरथ सिध्दी ॥ पाववावे कृपानिधी ॥२॥
तूं तो उदाराचा राणा ॥ माझी अल्पचि वासना ॥३॥
कृपादृष्टी पाहे ॥ तुका ह्मणे होई साहे ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०९ - तरी झड झाडोनी वाहीला नीघ ॥ इये भक्तीचीये वाटे लाग ॥ जीया पावसी आव्यांग ॥ नीजधाम माझे ॥५१६॥

अभंग - ३
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
माझे देई मजलागून ॥ ह्मणोनी दृढ धरिले चरण ॥१॥
भक्तीचे ऋण देवा ॥ देई माझे मज केशवा ॥२॥
माझें देतां जड काई ॥ अभिलाष धरीन पाई ॥३॥
एका अभिलाषे पावला । एका जनार्दनी उभा केला ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०७ - जे तो विषयाची मोठी झाडी ॥ माजी कामक्रोधाची सांकडी ॥ चुकावूनि आला पाडी ॥ सद्वासनेचिया ॥१२७॥
मग साधुसंगे सुभटा ॥ उजु सत्कर्मा चिया वाटा अप्रवृत्ती अव्हांटा डावलुनि ॥१२८॥

अभंग - ४
श्री तुकाराम महाराज वाक्य--
मी तो दिनाहूनि दीन ॥ माझा तुज अभिमान ॥१॥
मी तो आलो शरणांगत ॥ माझे करावें स्वहित ॥२॥
दिनानाथा कृपाळुवा ॥ सांभाळावें आपुल्या नांवा ॥३॥
तुका म्हणे आतां ॥ भले नव्हे मोकलिता ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०१२ - ते गेलिया संताच्या दारा ॥ धरुनि साधुच्या आधारा ॥ अवघी आली माझ्या घरा ॥ एवं परंपरा मत्प्राप्ती ॥३९॥
तैसी नव्हे सत्संगती ॥ संगे सकळ संगाते छेदीती ॥ ठाक ठोक माझी प्राप्ती ॥ पंगिस्त नव्हती आणिकाचे ॥४०॥

अभंग - ५
श्री तुकाराम महाराज वाक्य--
अहो कृपावंता ॥ होय बुध्दीचा ये दाता ॥१॥
जेणे पाविजे उदार ॥ होय तुझे पायी थार ॥२॥
वंदवी हे वाचा ॥ भाव पांडुरंगी साचा ॥३॥
तुका म्हणे देवा ॥ माझे अंतारी वसवा ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०१२ - करिता साधनें आपमतीसी ॥ तेथे विघ्ने उपजती ऐसी ॥ तीच साधनें साधू उपदेशी ॥ सर्वही सिध्दी पावती ॥६१॥
साधू न सांगतां निर्धारी नाना साधने हा काय करी ॥ कोण विधान कैशी परी । निजनिर्धारी कळेना ॥६२॥
न करितां साधन व्यप्तती ॥ केवळ जाण सत्संगती ॥ मज पावले नेणो किती ॥ ते मी तुजप्रती सांगेन ॥६३॥
 
अभंग - ६
श्री तुकाराम महाराज वाक्य--
कृपा करुनि देवा । मज साच ते दाखवा ॥१॥
तुम्ही दयावंत कैसे ॥ कीर्ति जगामाजी वसे ॥२॥
पाहोनियां डोळां ॥ हाती ओढवील काळा ॥३॥
तुका ह्मणे देवा ॥ माझा करावा कुढावा ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०१२ - एव भक्ती आपुले अंकी जाण ॥ करी ज्ञानादिकांचे लालन ॥ परमानंद पाजूनि पूर्ण ॥ करी पालन निजांगे ॥३९०॥
ते आतुडल्या माझी भक्ती ॥ ज्ञानादिके कामारी होती ॥ तेचि विखीची उपपती स्वये श्रीपती सांगत ॥३९१॥

अभंग - ७
श्री तुकाराम महाराज वाक्य--
प्राण समर्पिला आम्ही ॥ आतां उशीर कां स्वामी ॥१॥
माझे फेडावे उसणे ॥ भार न माना या ऋणे ॥२॥
जाला कंठ स्फोट ॥ जवळी पातले निकट ॥३॥
तुका ह्मणी सेवा ॥ कैसी बरी वाटे देवा ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०९ - जया देहाचेनि भद्भजने ॥ माझे शुध्द स्वरुप पावणें ॥ त्या देहासि विसरिजे तेणे ॥ मी माझेपणे देखे ना ॥५८९॥
जेवी का भाडियाचे घोडे ॥ आणिले निजधामा रोकडे ॥ ते आहे की गेले कोणीकडे हें स्मरेना पुढे तो जैसा ॥५९०॥
ए०भा०अ०९ - ऐसा मिया अथिला होसी ॥ तेथ माझियाचि स्वरुपा पावसी ॥ हे अंत:करणीचे तुज पासी ॥ बोलिजन असे ॥५१९॥

अभंग - ८
श्री तुकाराम महाराज वाक्य--
लाजे वाटे पुढें तोंड दाखविता ॥ परि जाऊं आतां कोणापाशी ॥१॥
चुकु निया काम मागतों मुशारा ॥ लाज फजित खोरा नाही मज ॥२॥
पाया सोडूनियां फिरतों बासर स्वामि सेवाचोर होऊनियां ॥३॥
तुका म्हणे मज पाहिजे दंडीले ॥ पुढे हे घडले न पाहिजे ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०८ - ऐसे निरंतर एकवटले । जे अंत:करणी मजशी लिगटले ॥ मीहि होऊनि आतले ॥ उपारिती ॥१२६॥
तयां देहावसान जै पावे । तै तिही मातें स्मरावें ॥ मग म्या जरी न पावावे ॥ तरी उपास्तित ते कायसा ॥१२७॥

अभंग - ९
श्री तुकाराम महाराज वाक्य--
ठकलोसे द्वारी ॥ उभा याचक भिकारी ॥१॥
मज भीक कांही देवा ॥ प्रेम भातुके पाठवा ॥२॥
याचकाचा भार ॥ घेऊ नये यरझारा ॥३॥
तुका ह्मणे दान ॥ सेवा घेतल्या वाचून ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०१२ - पाहातां केवळ जड मूढ ॥ रजतमयोनी जन्मले गूड । सत्संगती लागोनि दृढ ॥ माते सदृढ पावले ॥६४॥
दैत्य दानव निशाचर ॥ खरा मृग गंधर्व अप्सरा सिध्दचरण विद्याधर ॥ नाग विखार गुह्यक ॥६५॥

अभंग - १०
श्री एकनाथ महाराज वाक्य--
मागणे हेंचि माझी देवा ॥ दुजेपण दुरी ठेवा ॥२॥
मी तुं ऐसी नको उरी ॥ जनार्दना कृपा करी ॥२॥
रंक मी एक दीन ॥ माझे करावे स्मरण ॥३॥
नीच सेवा मज द्यावी ॥ एका जनार्दनी आस पुरवावी ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०६ - तेथ भजता भजन भजावे ॥ हे भक्तिसाधन जे आघवे ॥ तो मीचि जाहालो अनुभवे ॥ अखंडित ॥४८३॥
मग तया आह्मां प्रीप्तीचे ॥ स्वरुप बोली निर्वचे ॥ ऐसे नव्हे गा तों साचे ॥ सुभद्रापती ॥४८४॥

अभंग - ११
श्री ज्ञानदेव महाराज वाक्य--
परतोन न पाहासी न बोलसी आह्मासी ॥ तुझियारुपासी नांव नाही ॥१॥
सांगतां नवल पाहतां बरळ ॥ माया मृगजळ देखियेले ॥धृ०॥
ज्ञानदेवे ह्मणे उफराठिये दृष्टी ॥ परतोनिया भेटी देई क्षेम ॥२॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०१२ - ऐसा तुं मिळोनि ह्रदयस्थासू ॥ मी होऊनि मज पावसी ॥ माझी प्राप्ती उध्द्वा ऐशी निर्भयेसी निश्चित ॥२७०॥

अभंग - १२
श्री ज्ञानदेव महाराज वाक्य--
जैसी पुरऊनि आस पुरवावी । ऐसी भूक मज लागो द्यावी ॥१॥
तें अनुपम्य कैसेनी सांगावे । जीवा चोरुनि भोगिजे तें जीवे ॥॥धृ०॥
दृष्टी करी होय जरि निकें ॥ दृष्टा हो वेडावे जयाचेनि सुखें ॥२॥
ज्ञानदेवो ह्मणे करुनिया नीके विठठल परमात्मा भेटलयापावे ते ॥३॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०१२ - शरण भावें ह्र्दयस्थानी । अतो ह्र्दयस्थ कळे आह्मांसी ॥ उध्द्वा तूं ऐसें ह्मणती ऐक त्या स्वरुपासी सांगेन ॥२६५॥
सांडूनि रुपनामाभिमान ॥ स्फुरे जे का उध्वपण ॥ तें मज ह्र्दयस्थाचें रुप जाण ॥ त्यासी तुवा शरण रिघावें ॥२६६॥

अभंग - १३
श्री तुकाराम महाराज वाक्य--
हेचि दान देगा देवा ॥ तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्वे जोडी ॥२॥
नलगे मुक्ति आणि संपदा ॥ संत संग देई सदा ॥३॥
तुका ह्मणी गर्भवासी ॥ सुखे घालावे आम्हासी ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०९ - तैसे उत्तमत्व तेचि तरे । तेचि सर्वज्ञता सरे ॥ जै मनोबुध्दि भरे माझेनि प्रेमे ॥४५५॥
भजन
श्रीज्ञानदेवतुकाराम । श्रीज्ञानदेवतुकाराम ॥धृ०॥
आरत्या ---
१ झाले समाधान । तुमचे देखि०
२ करुन आरती । चक्र पाणी ओवाळी०  
३ प्रेम सप्रेम आरती ॥ गोविंदासि ओ०
४ आरती ज्ञानराज । महाकै० ॥धृ०॥
भजन ---
घालिन लोटांगण । वंदीन चरण । श्रीविठठल रखुमाई । विठोबा रखुमाई ॥धृ०॥
अभंग नाचाचे ----मागणे हे एक तुजप्रती ।
भजन----ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम
प्रसाद ----पाहे प्रसादाची वाट । पावला प्रसाद आतां वि० ॥
शेजआरती --१ शब्दाचिया रत्ने करुन अलंकार
२. चंदनाची ओवरी । आड केले देवद्वार ॥
पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम  

N/A

References : N/A
Last Updated : December 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP