स्कंध ६ वा - अध्याय ११ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


५६
पलायन दैत्य करिती तयांचा । पाठलाग साचा करिती देव ॥१॥
तदा क्रोधें वृत्र बोलला देवांसी । पळती तयांसी वधितां काय ॥२॥
माताउदरस्थ मळाचे हे गोळे । वधूनि साधिलें काय तयां ॥३॥
बोलतां तो गदा फेंकी वेगें इंद्र । झेली बळें वृत्र वामकरें ॥४॥
फोडूनि आरोळी ऐरावतावरी । गदा तीच मारी वृत्रासुर ॥५॥
सप्त धनु मागें होऊनि तैं गज । ओकूं लागे रक्त भळभळां ॥६॥
खिन्न इंद्राप्रति ताडी न असुर । फिरवी अमृतकर इंद्र तदा ॥७॥
युद्धार्थ तैं सज्ज होई ऐरावत । इंद्रासी हांसत वदला वृत्र ॥८॥
वासुदेव म्हणे व्यवहार घोर । अनिच्छेनें थोर घडती पापें ॥९॥

५७
वृत्र म्हणे इंद्रा, हे गुरुघातक्या । घेईन मी आतां प्राण तुझा ॥१॥
विश्वरुप माझा बंधु श्रेष्ठ ज्ञाता । इंद्रा, कवचदाता तुजा गुरु ॥२॥
होऊनि निर्लज्ज वधिलेंसी तया । त्रिभुवनीं ऐसा नीच कोण ॥३॥
अशुद्धासी ऐशा शिवेल न अग्नि । खातील तोडूनि गृध्रें तुज ॥४॥
सहाय्यक तेही कापीन मी सर्व । संतुष्ट भैरव होवो तेणें ॥५॥
कदाचित मम प्राण जरी जाई । कृतार्थता येई तरी मज ॥६॥
गदा जरी व्यर्थ गेली तरी वज्र । त्वत्कार्य साधील विष्णुतेजें ॥७॥
दधीचीचें तप येईल फळासी । मोक्षचि मजसी जाण तेणें ॥८॥
वासुदेव म्हणे ईश्वरप्रार्थना । करी दैत्यराणा तयावेळीं ॥९॥

५८
भगवंता, तव दासाचा मी दास । घडो सेवा हेंच इच्छीतसें ॥१॥
चिंतन-स्मरण घडो अहर्निश । इच्छितों मी हेंच कृपासिंधो ॥२॥
नको भूमि, राज्य, स्वर्ग वा मोक्षही । समागम देईं नित्य तुझा ॥३॥
पक्षहीन पक्षी जेंवी पक्षिणीतें । बालक मातेतें क्षुधित जेंवी ॥४॥
पतिव्रता परग्रामस्थ पतीची । प्रतीक्षा कीं जैसी करी नित्य ॥५॥
भक्तवत्सला, मी तैसाचि उत्सुक । झालों दर्शनार्थ चरण दावीं ॥६॥
वासुदेव म्हणे असुरही ऐसा । ईश्वरभेटीचा ध्यास घेई ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP