स्कंध ६ वा - अध्याय ८ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


(नारायण कवच)
परीक्षितीप्रश्नें शुक तयाप्रति । प्रेमें निवेदिती विष्णुविद्या ॥१॥
नारायण नामें वचन तें थोर । संकटसंहार करी वेगें ॥२॥
करुनियां हस्तपाद प्रक्षालन । बैसावें होऊन उद्‍ड्‍मुख ॥३॥
आचमनोत्तर पवित्रकयुक्त । होऊनि सुचित्त व्हावें मौनें ॥४॥
पाद जानू ऊरु उदर हृदय । वक्षस्थल मुख तेंवी शिरीं ॥५॥
ॐ नमो नारायणाय हा न्यास । पुढती करन्यास द्वादशाचा ॥६॥
ॐ कार हृदयीं विकार मस्तकीं । षकार भ्रूमध्यीं शिखेंत ‘ण’ ॥७॥
वेकार नयनीं संधींत नकार । चिंतावा मकार अस्त्ररुप ॥८॥
ॐ नम: फट्‍ इति करितां दिग्बंध । होई मंत्रयुक्त साधक तो ॥९॥
वासुदेव म्हणे नारायणध्यानें । कवचपठणें धन्य व्हावें ॥१०॥

४२
गरुडवाहन अष्टभुज देव । शंख चक्र ढाल खड्‍ग गदा ॥१॥
बाण धनुष्य तैं पाशाधारी सदा । सेविती सर्वदा सिद्धी जया ॥२॥
श्रीहरी तो सर्वकाळ सर्व ठाईं । संरक्षण पाहीं करो माझें ॥३॥
जलचररुपी वरूणाचे पाश । निवारील मत्स्यावतार ॥४॥
भूमीवरी मज रक्षील वामन । ईश्वर तो जाण गगनामाजी ॥५॥
अट्टहास्यें ज्याच्या दणाणल्या दिशा । असुरस्त्रियांचा गर्भपात ॥६॥
हिरण्यकशिपुसंहारक देव । काननीं रक्षील समरहीं तो ॥७॥
मार्गांत वराह, पर्वतशिखरीं - । रक्षी परशुधारी राम नित्य ॥८॥
राम-लक्ष्मण प्रवासीं रक्षोत । जारणादि मंत्र महा उग्र ॥९॥
निवारुनि मातें रक्षो नारायण । अहंभाव शून्य ‘नर’ करो ॥१०॥
योगहानी टळो श्रीदत्तकृपेनें । कर्मबंध ज्ञानें कपिल हरो ॥११॥
सनत्कुमार ते निवारोत काम । देवतावमान घडला तरी ॥१२॥
संरक्षण माझें करो हयग्रीव । चुकतां पूजाकार्य नारद तो ॥१३॥
नरकपतनीं त्राता देव कर्म । अपथ्यांत जाण धन्वंतरी ॥१४॥
द्वंद्वभयादिकीं ऋषभ योगींद्र । वारील अपवाद यज्ञमूर्ति ॥१५॥
लोकोपद्रव ते हरील बलराम । सर्पादि वारण शेष करो ॥१६॥
अज्ञान सकळ निवारोत व्यास । निवारील बुद्ध पाखंडयांतें ॥१७॥
कलिदोष माझा हरो कल्कीदेव । सगद केशव प्रात:काळ ॥१८॥
पुढती गोविंद रक्षो वेणुधारी । पुढती शक्तिधारी नारायण ॥१९॥
चक्रधार विष्णु मधुसूदन तैं । माधव पुढती संरक्षील ॥२०॥
प्रदोषकालीं तो रक्षो हृषीकेश । पुढती अर्धरात्र पद्मनाभ ॥२१॥
संरक्षो पुढती श्रीवत्सलांछन । रक्षो जनार्दन अरुणोदयीं ॥२२॥
पुढती दामोदर संध्या विश्वेश्वर । उगवला सूर्य नाहीं तावत्‍ ॥२३॥
पंच पंच घटी क्रमें ऐशापरी । संरक्षो श्रीहरी सर्वकाळ ॥२४॥
सुदर्शना, सभोंवार तूं आमुच्या । फिरावें हे आज्ञा भगवंताची ॥२५॥
प्रलयाग्नीसम आमुच्या शत्रूंची । राखोंडी करावी प्रखर तेजें ॥२६॥
गदे, स्पर्शमात्रें इंद्रवज्राघात । सहज सामर्थ्य ऐसें तव ॥२७॥॥
गोविंदप्रिया तूं मीही त्याचा दास । वैनायक यक्ष कूष्मांड ते ॥२८॥
राक्षसभूत तैं ग्रहशत्रु माझे । पीठ करीं त्यांचें लीलामात्रें ॥२९॥
पांचजन्या ईशें फुंकितां तुजसी । नादें त्या कांपती अरिहृदयें तीं ॥३०॥
यातुधानप्रेत प्रथम मातृगण । राक्षस दारूण पिशाच्चेंही ॥३१॥
ब्रह्मराक्षसादि पिटाळूनि लावीं । खड्‍गा, ही खंडावी शत्रुसेना ॥३२॥
शतचंद्रचर्मा, दिपवीं अरीतें । अंध पातक्यातें करीं वेगें ॥३३॥
प्रभो, सूर्यादिक ग्रह उल्कापात । केतु दुष्ट, सर्प, वृश्चिकादि ॥३४॥
व्याघ्रसिंह भूत-प्रेत पापोद्भव । सकलही भय हरीं माझें ॥३५॥
इष्टकार्या विघ्नरुप जे जे कोणी । तयां निर्दाळूनि यश देईं ॥३६॥
नाम रुप अस्त्र उच्चारेंचि दग्ध । सकल होवोत वैरी माझे ॥३७॥
वेदमूर्ति वैनतेय विश्वकसेन । पार्पद रक्षण करोत ते ॥३८॥
नामें रुपें तव वाहनें आयुधें । बुद्धि प्राणादीतें संरक्षोत ॥३९॥
दृश्य-अदृश्यही ईश्वरचि जरी । नष्ट होवो तरी सकळ पीडा ॥४०॥
असूनियां एक बहुरुपधारी । रक्षो आम्हां हरी सर्वदा तो ॥४१॥
शब्दमात्रें सर्व भय जो निवारी । स्वतेजेंचि हरी सकल तेज ॥४२॥
महापराक्रमीं नृसिंह तो ऊर्ध्व । अध सभोंवार अंतर्बाह्य ॥४३॥
सर्व दिशांप्रति संरक्षो तो आम्हां । वंदितो चरणां वासुदेव ॥४४॥

४३
विश्वरुप म्हणे इंद्रा, हें कवच । लेवूनि दैत्यांस सहज जिंकीं ॥१॥
कवचें या भीति लवमात्र नुरे । विप्र एक स्मरे कवच नित्य ॥२॥
कौशिक नामक मरुधन्वदेशीं । त्यागूनि देहासी सुखें गेला ॥३॥
स्थानावरी त्याचि येतां चित्ररथ । सविमान तेथ पतन पावे ॥४॥
वालखिल्य तदा बोलले तयासी । नेईं विप्राअस्थि पुण्यक्षेत्रीं ॥५॥
पूर्ववाहिनी ते सरस्वती जेथ । गंधर्व त्या तेथ अस्थि टाकी ॥६॥
विधियुक्त कर्म होतां तें गंधर्व । पावला तत्काळ सर्व भूतें ॥८॥
सर्वभयनिवारण या कवचें । विद्या हें इंद्रातें प्राप्त झाली ॥९॥
दैत्यपराभव करुनियां इंद्र । पावला ऐश्वर्य सहज येणें ॥१०॥
वासुदेव म्हणे श्रेष्ठ या कवचें । सकल संकटें दूर होती ॥११॥
(नारायणकवच समाप्त)

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP