स्कंध ६ वा - अध्याय ९ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


४४
सोमपीथ, सुरापीथ, तैं अन्नाद । विश्वरुपा स्पष्ट शिरें तीन ॥१॥
सोम, सुरा, अन्न, भक्षी एकेकानें । अर्पी आनंदानें हवि देवां ॥२॥
गुप्तरुपें मातामहादि असुरां । अर्पी हविर्द्रव्यां कळलें इंद्रा ॥३॥
असुरांचें बल वृद्धिंगत होतां । घातचि देवांचा निश्चयानें ॥२॥
जाणूनियां ‘विश्वरुप’ शिरच्छेद । करितां नवल होई तेथें ॥५॥
कपिंजल, कलविंक, तैं तित्तिर । होई पक्षित्रय तयास्थानीं ॥६॥
ब्रह्महत्यादोष निवारणाविण । वसतां त्या जन निंदिताती ॥७॥
ब्रह्मघ्ना, हे इंद्रा, ऐशा जन हांका । मारितांचि इंद्रा खेद होई ॥८॥
वासुदेव म्हणे विभाग पापाचे । करुनि चौघांतें देई इंद्र ॥९॥

४५
भूमि, वृक्ष, स्त्रिया, उदकां एकेक । भाग अर्पी इंद्र दक्षतेनें ॥१॥
नाकारितां पृथ्वी हेतु करी पूर्ण । येतील भरुन खळगे सर्व ॥२॥
तेंचि पाप क्षारभूमि उकिरडे । अध्ययन तेथें करुं नये ॥३॥
छेदितां अंकुर दिधले वृक्षांसी । डिंकचि तयांसी पापरुप ॥४॥
आप्रसवान्त संभोगें न गर्भ । व्हावा न सदोष म्हणती स्त्रिया ॥५॥
रजोदर्शन त्यां देऊनियां पाप । इच्छित तयांस दिधला वर ॥६॥
ऋतुमती वर्ज्य यास्तव भोगार्थ । पदार्थाचें रुप उदक इच्छी ॥७॥
बुद्‍बुद फेन हे दोश उदकाचे । करी वृत्त ऐसें वासुदेव ॥८॥

४६
विश्वरुपवधें त्वष्टा होई क्रुद्ध । यज्ञें वृत्रासुर निर्मियेला ॥१॥
अक्राळ विक्राळ शरीर तयाचें । प्रतिदिनीं वाढे बाणवेगें ॥२॥
दावानलदग्ध गिरीसम उंच । सायंकाळ मेघ कृष्णवर्ण ॥३॥
शिखा, श्मश्रु, नेत्र, आरक्त तयाचे । सत्रिशूल नाचे क्रूरपणें ॥४॥
पृथ्वी स्वर्ग तेणें कांपे थरथर । पाहूनि असुर भय देवां ॥५॥
तमोरुपें व्यापी सकल विश्वासी । संज्ञा ‘वृत्र’ ऐसी तेणें तया ॥६॥
शस्त्रास्त्रें सकळ गिळिलीं देवांचीं । निराश तैं होती इंद्रादिक ॥७॥
वासुदेव म्हणे आदिपुरुषातें । देव शांतचित्तें प्रार्थिती तैं ॥८॥

४७
तुजविण आम्हां देवां नसे गति । विश्वाचा तूं पति आमुचाही ॥१॥
कालरुपें आम्हां तूंचि देसी आज्ञा । नानाविध कर्मां करितों तेणें ॥२॥
कालनियंताही तूंचि एक देवा । करीतसों धांवा संकटीं या ॥३॥
अन्य कोणी आम्हां तारील म्हणणें । श्वानपुच्छें तेणें तरणें सिंधु ॥४॥
होऊनियां मत्स्य तारिलें मनूसी । कल्पांतीं ब्रह्म्यासी संरक्षिलें ॥५॥
वृत्रापासूनियां संरक्षीं आम्हांसी । तूंचि रक्षिलेंसी आजवरी ॥६॥
प्रभाव मायेचा अतर्क्य ईश्वरा । आम्हीचि कर्ते हा अहंभाव ॥७॥
मायेपासूनियां मुक्त तूंचि एक । अवतार अनेक धरिलेसी त्वां ॥८॥
अभेदरुपें तूं विश्व नटलासी । परी अलिप्तचि राहूनियां ॥९॥
रक्षण आमुचें अशक्यचि अन्या । करावी करुणा सर्वाधारा ॥१०॥
वासुदेव म्हणे प्रार्थना ही ऐसी । ऐकूनि देवासी दया देई ॥११॥

४८
प्रथम अंतरीं भरे ईशतेज । पुढती प्रगट होई ईश ॥१॥
शंख-चक्रधारी मूर्ति पाहियेली । प्रतीची ती झाली तेजोमय ॥२॥
षोडश पार्षद सेवेंत निमग्न । भगवंतासम रुप त्यांचें ॥३॥
श्रीवत्सलांछन कौस्तुभ त्यां नसे । रुप गोजिरें तें बघती देव ॥४॥
अत्यानंदें त्यांचें हरपलें भान । करिती स्तवन पुन:प्रेमें ॥५॥
वासुदेव म्हणे स्तुति तेचि पूजा । काय अधोक्षजा पूजा अन्य ॥६॥

४९
ईश्वरा, यज्ञांत सामर्थ्य तुझेंचि । अर्पिसी स्वर्गादि याज्ञिकांतें ॥१॥
यज्ञविध्वंसक असुरां शासन । करिसी सुदर्शन योजूनियां ॥२॥
सगुण रुप हें पाहियेलें आम्हीं । प्रवेश निर्गुणीं नसे आम्हां ॥३॥
ईशा वासुदेवा, नारायणा अजा । हे महापुरुषा जगदाधारा ॥४॥
परम दयालो, परम कल्याणा । ऐश्वर्यनिधाना जगत्पते ॥५॥
अगणित नामें घेतांही वर्णन । यथार्थ होई न काय करुं ॥६॥
निर्गुण निरिच्छ असूनि तूं देवा । रचिलें या विश्वा सगुणरुपें ॥७॥
अन्वयें तूं देवा, सुखदु:ख भोक्ता । व्यतिरकें पाहतां अलिप्त तूं ॥८॥

५०
स्वतंत्रता तव ईश्वरा चिंतितां । वितर्क विकल्पा विचाराही ॥१॥
प्रमाणाभासा वा वाव नसे कांहीं । अमर्यादा नाहीं मर्यादाही ॥२॥
अपरिमिता हे अतर्क्या तुजसी । कार्यकारणेंसी मापिती जे ॥३॥
कदाही न तयां तव आकलन । द्वंद्वातीत जन तेचि ज्ञाते ॥४॥
रज्जूसी रज्जूच संबोधी तो ज्ञाता । अज्ञ, भ्रमें सर्पा अवलोकी त्या ॥५॥
तेंवी ज्ञाते तुज म्हणती गुणातीत । सगुणचि तुज म्हणती अज्ञ ॥६॥
सर्वठायीं वास नारायणा, तव । तेणेंचि प्रत्यय सकलांचा ॥७॥
गुणशक्ति तेही तुझीच दयाळा । मान्य तूं वेदांला एकमात्र ॥८॥
निवृत्त हे माया होईल बा जेव्हां । ज्ञान तुझें तेव्हां परमेश्वरा ॥९॥
वासुदेव म्हणे मायेची निवृत्ति । होई केंवी तेंचि कथिती देव ॥१०॥

५१
मायानिवृत्ति ते चरणसेवेनें । सकल साधनें व्यर्थ अन्य ॥१॥
सुधाबिंदु जरी माहात्म्यसिंधूचा । लाभे तरी कैंचा भवबंध ॥२॥
सुखाचे पाझर नित्य तेणें चित्तीं । विषयविरक्ति सहज जेणें ॥३॥
माहात्म्यांत दंग तुझ्या जे सर्वदा । ‘कनवाळु विश्वाचा’ जाणिती ते ॥४॥
सकलांचा आत्मा तूंचि ते मानिती । स्वार्थहि जाणिती तेचि सत्य ॥५॥
सर्वत्र वास्तव्य पाहूनियां तुझें । प्राणिमात्रीं वसे प्रेम त्यांचें ॥६॥
ऐसे त्वद्रूप जे होऊनियां जाती । बंध ते छेदिती संसाराचा ॥७॥
वासुदेव म्हणे बोलले पुढती । हर्षूनियां चित्तीं ऐका देव ॥८॥

५२
विश्वाधिपते हे भवविनाशका । आधार विश्वाचा तूंचि एक ॥१॥
वामनावतारीं तीनचि पाउलीं । अवनी व्यापिली स्वर्गासवें ॥२॥
देवदानवांचा उत्कर्षाकर्ष । देवा, तूंचि एक करिसी स्वयें ॥३॥
मातला हा वृत्र संरक्षीं आम्हांसी । वधूनि दुष्टासी दयावंता ॥४॥
प्रगट होऊनि भेटलासी आम्हां । विनंती चरणां हेचि आतां ॥५॥
कृपाकटाक्षेंचि चिंताज्वर नाशीं । अंतर्बाह्य तूंचि स्थूल-सूक्ष्म ॥६॥
मृत्तिकाचि एक कारण घटासी । तैसा जगतासी कारण तूं ॥७॥
देशकालादिकां अनुभव जे जे । तुजप्रति ते ते कळती तेणें ॥८॥
सर्वांतर्यामी तूं असूनि अलिप्त । कथावें अधिक काय तुज ॥९॥
वृत्रवधावीण मार्ग न आम्हांसी । वंदन तुजसी पुण्यकीर्ते ॥१०॥
वासुदेव म्हणे तोषूनियां देव । वृत्रवधोपाय कथी देवा ॥११॥

५३
देव म्हणे तुम्हीं कथिलें तें सत्य । भक्तचि विमुक्त होती माझे ॥१॥
भक्तीविण अन्य अपेक्षा न त्यांची । अभिलाषापूर्ति न करीं मीही ॥२॥
इच्छितील तें तें पुरवितां, येई । अज्ञानत्व पाहीं माझ्या माथीं ॥३॥
असो, दधीचीतें मागावें शरीर । निर्मूनियां वज्र कार्य साधा ॥४॥
अश्विनीकुमार मुक्त केलें तेणें । ज्ञानें, ख्यात नामें ‘अश्वशिर’ ॥५॥
अभेद्य कवच नारायणनामें । दधीचि तो जाणें सकलां पूर्वी ॥६॥
अश्विनीकुमार मागतां शरीर । आनंदें अर्पिल ज्ञाता मुनि ॥७॥
वासुदेव म्हणे भक्तांसी अभय । देऊनि माधव गुप्त झाला ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP