स्कंध ६ वा - अध्याय ४ था

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१८
राव म्हणे मुने, स्वायंभुव नामें । मन्वंतर प्रेमें कथिलें पूर्वी ॥१॥
संक्षेपें, परी तें कथावें संपूर्ण । विस्तारले जन केंवी कथा ॥२॥
मुनि म्हणे राया, प्राचीनबर्हीचे । पुत्र ते प्रचेते दशसंख्य ॥३॥
सिंधूंतूनि येतां पृथ्वी वृक्षमय । पाहूनियां क्रोध येई तयां ॥४॥
निर्मियेला तदा अग्नि तैं अनिल । कराया निर्मूल वृकराजी ॥५॥
औषधिनाथ तैं सोम प्रगटला । शांत व्हा बोलला प्रचेत्यांसी ॥६॥
वासुदेव म्हणे सोमाची तैं वाणी । संपूर्ण ऐकूनि घ्यावी आतां ॥७॥

१९
प्रचेतेहो, तुम्ही श्रेष्ठ प्रजापति । कां दीन वृक्षांसी संहारितां ॥१॥
स्थावर ते जाणा जंगमांचें भक्ष्य । तृणादि तें भक्ष्य सपादांचें ॥२॥
हस्तरहित तें सहस्तांचेम भक्ष्य । चतुष्पाद द्विपादांचें ॥३॥
ऐसे उपयुक्त सृष्टिरक्षणासी । जाणूनि वृक्षांसी संरक्षावें ॥४॥
पक्ष्म ते नेत्रांसी, माता-पिता बाळां । पतीचि पत्नीला संरक्षण ॥५॥
गृहस्थ यतींचे, ज्ञाते अज्ञान्यांचे । प्रचेते प्रजांचे रक्षक तैं ॥६॥
ज्ञातेहो, सर्वत्र भरला ईश्वर । वृक्षांचा संहार दु:खद त्या ॥७॥
अनावरही त्या जिंकील जो क्रोधा । तोचि गुणातीता पावे ईशा ॥८॥
वासुदेव म्हणे कन्या प्रम्लोचेची । अर्पी प्रचेत्यांसी पत्नी सोम ॥९॥

२०
अप्सराकन्येचा स्वीकार सविधि । करितां तयांसी पुत्र झाला ॥१॥
प्राचतेस तोचि दक्ष प्रजापति । सकल तयांची संतति हे ॥२॥
देवादिक तेणें प्रथम संतति । निर्मियेली साची मानसिक ॥३॥
मानूनि ते अल्प तीर्थ ‘अघमर्षण’ । विंध्याचलीं स्थान शोधी तपा ॥४॥
हंसगुह्य स्तोत्र जपूनि त्या स्थानीं । तोषविलें मनीं ईश्वरातें ॥५॥
वासुदेव म्हणे हंसगुह्यसार । कथितों साचार ऐका आतां ॥६॥

२१
वंदूं सर्वश्रेष्ठ चिच्छक्ति जयाची । येई प्रत्ययासी सर्वकाळ ॥१॥
जीव मायाधीश, जीवांसी अदृश्य । त्रिगुण ज्यां सत्य भासली त्यां ॥२॥
देशकालातीत स्वयंभू ईश्वर । तया नमस्कार असो सदा ॥३॥
दौर्बल्यें तो जीव, ईश्वरा नोळखी । दोघेही मित्रचि, एक प्रभु ॥४॥
दुर्बल तो दीन जीव पराधीन । ईश्वराचें ध्यान वासुदेवा ॥५॥

२२
इंद्रियादिकांचें ज्ञान ज्या जीवासी । जाणे न तो, त्यासी नमस्कार ॥१॥
स्मरणेंचि ज्ञान मनासी ज्या तेंही । न जाणेचि पाहीं नमन तया ॥२॥
हृदयवासीही न कळे अज्ञासी । तया ईश्वरासी नमस्कार ॥३॥
मंत्र प्रकाशित अग्नीसम ज्ञाते । सद्विचारें ज्यातें जाणिताती ॥४॥
आश्चर्यकारक पदार्थ ते माया । मायाधीशा तया नमस्कार ॥५॥
सकलांचें मूळ असूनि अव्यक्त । तया व्यक्ताव्यक्त ईशा नमूं ॥६॥
वादविवादाचा विषय तूं एक । तूंचि ब्रह्म तप नमन घेई ॥७॥
अनंत अपार सामर्थ्ये दयेनें । भक्तांस्तव प्रेमें जन्म घेसी ॥८॥
वायूसम उपासकानुरोधानें । विविध रुपानें भासतोसी ॥९॥
अव्यक्ता, तुजसी प्रार्थितो हो तुष्ट । करीं मनोरथ पूर्ण माझे ॥१०॥
वासुदेव म्हणे गरुडवाहन । पुरवी तो काम दर्शनानें ॥११॥

२३
अष्टभुज पीतांबरधारी देव । स्वरुप अपूर्व विराजलें ॥१॥
पार्षदगण ते सभोंवतीं त्याच्या । अत्यानंद दक्षा पाहूनियां ॥२॥
सद्‍गदित तया पाहूनि भगवान । बोलला वचन हेतुज्ञ तैं ॥३॥
तपश्चर्या माझें हृदयचि दक्षा । तेंवी जाण विद्या मम देह ॥४॥
ध्यान ते आकृति अवयव यज्ञ । धर्म मम मन प्राण देव ॥५॥
पंचजन नामें प्रजापतिकन्या । आसिक्नी हे धन्या कांता वरी ॥६॥
स्त्रीचि मम माया जाणावी या लोकीं । होईल तिजसी प्रजा बहु ॥७॥
स्वधर्मे ते मज तोषवील जाण । पावे अंतर्धान वदूनि देव ॥८॥
वासुदेव म्हणे भक्तांस्तव हरि । नाना रुपें धरी स्वमायेनें ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 08, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP