अध्याय ६३ वा - श्लोक २६ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


कालो दैवं कर्म जीवः स्वभावो द्रव्यं क्षेत्रं प्राण आत्मा विकारः ।
तत्संघातो बीजरोहप्रवाहस्त्वन्मायैषा तन्निषेधं प्रपद्ये ॥२६॥

जें कां निर्गुणनिरामय । केंवि बाणे तत्प्रत्यय । केवळ ज्ञप्तिमात्र जें होय । ऐक सोय तयाची ॥२५०॥
सत्तास्फुरणमात्र काळ । गुणक्षोभक जो केवळ । गुणक्षोभें कर्म अखिल । निमित्त शील सृजनादि ॥५१॥
यथाकाळें रजोगुण । क्षुब्ध होवोनि करी सृजन । तैसाचि यथाकाळें क्षोभून । सत्वगुण प्रतिपाळी ॥५२॥
रजें सृष्ट सत्वें पुष्ट । तमःक्षोभें तें प्रळयाविष्ट । एवं त्रिविध हें कर्म स्पष्ट । निमित्त श्रेष्ठ या म्हणती ॥५३॥
फळाभिमुख तेंचि कर्म । दैव ऐसें पावे नाम । स्वभाच एक विदुषोत्तम । म्हणती निस्सीम संस्कारा ॥५४॥
संस्कारवंत बोलिजे जीव । अविद्या बिंबत चैतन्यप्रभुव । चिदाभास हें ज्याचें नांव । वदती स्वमेव वेदान्ती ॥२५५॥
यांत जीवाची स्पष्टता । द्रव्यें क्षेत्रें सूत्र अहंता । विकारेंसीं या संघाता । ऐक तत्वता पृथक्त्वें ॥५६॥
द्रव्यें अंतःकरणपंचका नाव । क्षेत्र शरीर सावयव । सूत्र प्राणांचा समुदाव । अहंभाव तो आत्मा ॥५७॥
विकार म्हणिजे इंद्रियें अकरा । सहित महाभूतांचिया निकरा । एतत्संघात तो देह खरा । प्रवाह अवधारा पैं याचा ॥५८॥
बीजरोहरूपें जाण । प्रवाह अखंड दंडायमान । उत्तरोत्तर कार्यकारण । सांख्य सर्वज्ञ जाणती ॥५९॥
कर्मसंस्कारवंत जीव । तत्कार्य देह सावयव । बीजामाजूनि अंकुरप्रभव । तेंवि सावयव स्थूळवपु ॥२६०॥
अंकुरपरिपाकीं बीज निफजे । बीजामाजूनि अंकुर उपजे । एवं मायाप्रवाह उमजे । तैसिये ओजे तुज कथिला ॥६१॥
ते हे प्रवाहरूप तुझी माया । तिचा निषेध म्हणिजे लया । जेथ जाय तया ठाया । ब्रह्माद्वया मी शरण ॥६२॥
तूं म्हणसी मी देवकीसुत । मज कां वर्णिसी एवंभूत । तरी सगुणविग्रह हा काय निमित्त । धरिला यथार्थ तें ऐका ॥६३॥

नानाभावैर्लीलयैवोपपन्नैर्देवान्साधूंल्लोसेतून्बिभर्षि ।
हंस्युन्मार्गान्हिंसया वर्तमानाञ्जन्मैतत्ते भारहाराय भूमेः ॥२७॥

तरी निर्विशेषपदें ख्यात । सर्वोपाधिविनिर्मुक्त । ऐसाही तूं सुरकार्यार्थ । भाव अनंत अवगसी ॥६४॥
मत्स्यकच्छवराहप्रमुख । यथास्वलीला धरूनि वेष । देवा रक्षूनि देसी तोष । स्वधर्म विशेष स्थापूनी ॥२६५॥
वर्णाश्रम धर्माचार । लोकसेतु हा उत्तरोत्तर । यांच्या लक्षणें चराचर । त्रिजग सामर पाळिसी ॥६६॥
निर्जरचक्ररक्षणासाठीं । वर्णाश्रमधर्मराहटी । अनुलक्षूनि तत्परिपाटी । लोकसेतूतें स्थापिसी ॥६७॥
लोकसेतूचें संरक्षण । ज्या ओगें त्या अनुलक्षून । तदनुष्ठाते साधुजन । त्यांतें संपूर्ण रक्षिसी ॥६८॥
त्यांतें रक्षावयाकारणें । असाधु दैत्यांतें मारणें । सेतु भंगिती उत्पथाचरणें । हिंसकपणें निर्भय जे ॥६९॥
नानावतारीं युगीं युगीं । लीलेकरूनि ऐशिये भंगी । सुरवर साधु स्वधर्ममार्गी । रक्षुनि अमार्गी संहरिसी ॥२७०॥
तो हा तुझा लीलावतार । उत्पथभूभारहरणपर । साधु सन्मार्ग सह सुरवर । रक्षणीं सादर पैं यांचे ॥७१॥
तूं कोणाचा नव्हसी पुत्र । अथवा नव्हसी शत्रु मित्र । विरुद्धाविरुद्ध यथाचार । होती पात्र शुभाशुभा ॥७२॥
ऐसिया तूंटें न जाणून । करूं आलों तुजसी कदन । मनुष्यबुद्धि तुज भावून । सामर्थ्य पूर्ण प्रकटिलें ॥७३॥
माझें नाम रौद्रज्वर । जगत्त्रयातें संतापकर । करितां तव देहीं संचार । पावलों दुस्तर संताप ॥७४॥
तुझें ऐश्वर्य इत्थंभूत । आतां झालें प्रतीतिगत । म्हणोनि आलों शरणागत । रक्षीं अंकित स्वामिया ॥२७५॥
रौद्रज्वर शरणागत । होवोनि कृष्णातें विनवीत । त्याची विनंति इत्थंभूत । सावध समस्त अवधारा ॥७६॥

तप्तोऽहं ते तेजसा दुःसहेन शांतोग्रेणात्त्युल्बणेन ज्वरेण ।
तावत्तापो देहिनां तेंऽघ्रिमूलं नो सेवेरन्यावदाशाऽनुबद्धाः ॥२८॥

तुझिया तेजें करूनि तप्त । झालों म्हणोनि शरणागत । पातलों मी तवाङ्कित । रक्षीं निवान्त निज शरण ॥७७॥
तुझें तेज नारायणा । दुःखें साहों न शके कोणा । तेणें तापलों करुणाघना । रक्षीं शरण्या शरणातें ॥७८॥
माझ्या तेजें न तपती कोणी । तूं कां करिसी एव्हडी ग्लानि । तरी ऐकावें चक्रपाणि । माझी करणी मज बाधी ॥७९॥
तूं सच्चिदानंदघन । जैसा सुरद्रुम सुखसंपन्न । फळे कामितयाचे इच्छेकरून । नाहीं दूषण त्या आंगीं ॥२८०॥
कामितां कल्याणेच्छा करी । तो त्या फळे तैसिया परी । अनीष्ट इच्छा ज्या अंतरीं । फळे निर्धारीं त्या तैसा ॥८१॥
तेंवि तवाङ्गीं नसे ताप । परंतु म्यां दीधला संताप । त्याचें फळही तदनुरूप । यथासंकल्प पावलों ॥८२॥
त्वां जो सृजिला वैष्णवज्वर । तेंचि तव तेज साचार । अग्रीं शान्त पश्चात् क्रूर । शीतज्वर ज्या म्हणती ॥८३॥
तेणें तापलों बहुसाळ । प्राण होताती व्याकुळ । तुजवीण नसे निर्भय स्थळ । रक्षीं कृपाळशिरोमणे ॥८४॥
म्हणसी परसंतापक जे होती । संताप देणें त्यां तदुचिती । हेंही यथार्थ जी श्रीपति । परि सेवकांप्रति अनुचित ॥२८५॥
ज्म्ववरी तुझें चरणारविंद । न सेवितां प्राणिवृंद । आशापाशीं झाले बद्ध । संतापखेद तंववरी त्यां ॥८६॥
मी स्वामीच्या चरणकमळा । शरण आलों श्रीगोपाळा । कृपापाङ्गें वर्षोनि जळा । तापा वेगळा मज रक्षीं ॥८७॥
ऐशा रौद्रज्वराच्या उक्ति । ऐकूनि कृपाळू कमलापति । काय बोलिला तयाप्रति । तें तूं कुरुपति अवधारीं ॥८८॥

श्रीभगवानुवाच - त्रिशिरस्ते प्रसन्नोऽहं व्येतु ते मज्ज्वराद्भयम् ।
यो नौ स्मरति संवादं तस्य त्वन्न भवेद्भयम् ॥२९॥

हरि म्हणे रे महाक्रूरा । त्रिशिरानामक रौद्रज्वरा । तुझी ऐकूनि स्तवनगिरा । प्रसन्न झालों ये काळीं ॥८९॥
माझे आज्ञेचें पाळण । करूनि स्वेच्छा वर्तें पूर्ण । आज्ञापालक तुज देखून । न करी विघ्न मम ज्वर ॥२९०॥
म्यां तुज दीधलें पूर्ण अभय । यावरी मम ज्वर न करी भय । आज्ञा पाळूनि लोकत्रय । विचरें निर्भय होत्साता ॥९१॥
कोणती आज्ञा ऐसें पुससी । तरी ऐकावें इयेविषीं । तुझा आमुचा जे इतिहासीं । संवाद झाला जो आतां ॥९२॥
तया इतिहासाचें श्रवण । अथवा हृदयीं करील स्मरण । तयासी भय तुजपासून । सहसा जाण न व्हावें ॥९३॥
जेंवि तूं झालासि मत्पदशरण । तैसें देखूनि प्रणत जन । त्यांतें संताप देखून । आज्ञापाळण हें कीजे ॥९४॥
ऐशिया ऐकूनि श्रीकृष्णबोला । रौद्रज्वर निर्भय झाला । पुढें वृत्तान्त जो वर्तला । तो भूपाळा अवधारीं ॥२९५॥

इत्युक्तोऽच्युतमानम्य गतो माहेश्वरो ज्वरः । बाणस्तु रथमारूढः प्रागाद्योत्स्यञनार्दनम् ॥३०॥

कृष्णें आज्ञापिला ज्वर । करूनि अच्युता नमस्कार । जाता झाला अतिसत्वर । माहेश्वरनामक जो ॥९६॥
कृष्णनाम ज्यांचिये वाचे । हृदयीं कृष्णध्यान ज्यांचे । कृष्णभजनीं तत्पर साचे । दास्य त्यांचें मज उदित ॥९७॥
एवं ज्वराची संपली कथा । तंव बाणासुरें ऐकिली वार्ता । ज्वरें यादवां दिधली व्यथा । विकळ सर्वथा वीर पडिले ॥९८॥
ऐसिये समयीं समराङ्गणा । जाऊनि धरावें रामकृष्णां । मग समस्ता यादवगणा । बांधिजे तृणापडिपाडें ॥९९॥
ऐसा करूनि दृढ विचार । रथीं चढला बाणासुर । कृष्णाप्रति अतिसत्वर । झाला तत्पर युद्धासी ॥३००॥
प्रमथ म्हणती बाणासुरा । हर्षें प्रार्थूनियां शंकरा । युद्धीं निववी बाहुभारा । ऐसिया वीरा याचिलें ॥१॥
तो वर आजि सफळ झाला । इच्छे सारिखा वीर आला । कंडू वर्ते तव भुजांला । करितो वहिला प्रशान्त ॥२॥
ध्वज भंगूनि पडिला क्षिती । तेव्हांचि फळली शिववरोक्ति । आतां जाऊनि समराप्रति । इच्छा पुरी करीं आपुली ॥३॥
तव रक्षणा गेला शिव । तोही पावला पराभव । यादवीं भंगिले महाशाम्भव । हा गौरव तव वरें ॥४॥
ऐसें नोकिती प्रमथगण । तें ऐकोनि क्षोभला बाण । पाचारूनि जनार्दन । दावी आंगवण ते ऐका ॥३०५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP