अध्याय ६३ वा - श्लोक ४१ ते ४५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


देवदत्तमिमं लब्ध्वा नृलोकमज्तेंद्रियः । यो नाद्रियेत त्वत्पादौ स शोच्यो ह्यात्मवंचकः ॥४१॥

देवदत्त कोण्ही एक । पूर्वकर्माचा परिपाक । भोगवावया तत्प्रेरक । कर्माध्यक्ष जो कां तूं ॥३९०॥
त्याच्या कर्माच्या परिपाकें । अधोगतीचीं भोगिती दुःखें । ऊर्ध्वौन्मज्जनावेशें । दिधलें संतोषें नरदेहा ॥९१॥
तो हा नरदेह पावूनि मूढ । तव पदकंज न भजे दृढ । आत्मवंचक तो शोकारूढ । होवोनि अवघड दुःख भोगी ॥९२॥
किमर्थ शोकारूढ म्हणसी । तरी कारण ऐक इयेविषीं । अमृत सांडूनि विषातें प्राशी । मूळ दुःखासी तेंचि नव्हे ॥९३॥

यस्त्वां विसृजते मर्त्य आत्मानं प्रियमीश्वरम् । विषर्ययेंद्रियार्थार्थं विषमत्त्यमृतं त्यजन् ॥४२॥

आत्मा सच्चिदानंदघन । प्रियतम जो तूं ईश्वर पूर्ण । त्या तूंतें जो विसर्जून । विपरीत ज्ञान अवलंबी ॥९४॥
विपरीत ज्ञानें काय केलें । तुज हृदयस्था अंतरविलें । इंद्रियीं विषय जे दाविले । सुख भाविलें तद्योगें ॥३९५॥
देह गेह वधू धन क्षेत्र । एवं अवघेंचि दृश्यमात्र । सुखार्थ मानूनि हें सर्वत्र । जो होय पात्र क्लेशाचें ॥९६॥
विपरीतज्ञानें विपरीत केलें । आत्मया हृदयस्था विसरविलें । नश्वरां विषयांतें भजविलें । ऐसें उमजलें त्यां नाहीं ॥९७॥
तो मग टाकूनि परमामृता । विषयविषातें होय सेविता । वधूसुत देहगेहां भजतां । शोकावर्तामाजी पडे ॥९८॥
असो तयाची किमर्थ गोठी । विशुद्धमानस मुनिजन सृष्टि । मी ब्रह्मा आणि विबुधकोटी । करूं राहटी ते ऐका ॥९९॥

अहं ब्रह्माऽथ विबुधा मुनयश्चामलाशयाः । सर्वात्मना प्रपन्नास्त्वामात्मानं प्रेष्ठमीश्वरम् ॥४३॥

मी ब्रह्मा आणि विबुद्ध मुनि । विशुद्धमानस तव चिंतनीं । वृत्तिसमुच्चय एकवटूनी । तवपदभजनीं अनुसरलों ॥४००॥
तो तूं आत्मा सच्चिद्घन । प्रियतम ईश्वर सुखनिधान । ऐसिया तूंतें होवोनि शरण । विषयभवभान नातळलों ॥१॥
करूनि अभक्तां धिक्कार । देऊनि स्वकीयां परिहार । भगवंतावीण भजनीय अपर । नसे हें रुद्र प्रतिपादी ॥२॥

तं त्वा जगत्स्थित्युदयांतहेतुं समं प्रशान्तं सुहृदात्मदैवम् ।
अनन्यमेकं जगदात्मकेतं भवापवर्गाय भजाम देवम् ॥४४॥

ऐसा जो तूं प्रकाश आत्मा । सुखतम सुसेव्य भूतग्रामा । तूतें आम्ही पुरुषोत्तमा । कल्याणार्थ भजतसों ॥३॥
कल्याण म्हणसी कवणेपरी । इहामुष्मिक भवव्यापारीं । अपायरहित निजाधिकारीं । वर्तत असतां क्षेमार्थ ॥४॥
अपवर्ग म्हणिजे स्वरूपबोध । मायावरण न पवे रोध । गुणव्यापारीं वर्ततां शुद्ध । स्वसंवेद्य निर्लेप ॥४०५॥
अथवा भवाचा निरास । अपवर्ग ऐसें म्हणिजे त्यास । तदर्थ आम्ही तव पदास । होवोनि दास भजतसों ॥६॥
तुम्ही गुणकार्यीं समर्थ । असतां मद्भजन किमर्थ । ऐसें म्हणसी तरी हा अर्थ । इत्थंभूत अवधारीं ॥७॥
जगाची स्थिति उदय अंत । त्या तिहींचा तूंचि हेत । सम म्हणिजे विषमातीत । विश्वीं संतत वर्तसी ॥८॥
समत्वाचें कारण काय । प्रशान्तपदें बोलिलें होय । सुसेव्य म्हणिजे सुष्ठु हृदय । कैसें काय तें ऐका ॥९॥
सुहृत्बुद्धीचा प्रवर्तणार । आत्मा सर्वात्मक साचार । एवंभूत जो ईश्वर । दैव परतर तूं एक ॥४१०॥
त्या तुज ईश्वराविण कोण । पृथक् भजनीय असे आन । नास्ति ऐसा निश्चय पूर्ण । तो तूं अनन्य एकात्मा ॥११॥
समानासमानजातिरहित । तूं अखिलात्मा सर्वगत । कैसा म्हणसी तरी तो अर्थ । ऐक निश्चित जगदीशा ॥१२॥
जगाचें आणि आत्मयाचें । निकेत म्हणिजे स्थान साचें । एवं अधिष्ठान तूं सर्वांचें । आन कैंचें तुजवीण ॥१३॥
विवर्तरूप जें हें जग । चिदाभास आत्मे अनेग । यांचें अधिष्ठान तूं चांग । त्या तुज अव्यंग भजों आम्ही ॥१४॥
भवापवर्गाचि कारणें । ऐसिया तूतें आम्ही भजणें । एवं तव पदाराधनें । आमुचीं वर्तनें सफळित पैं ॥४१५॥
स्वयें इच्छूनि हा भक्तिप्रेमा । यावरी भक्ताच्या अभीष्टकामा । प्रार्थितसें पुरुषोत्तम । कुरुसत्तमा तें ऐक ॥१६॥

अयं ममेष्टो दयितोऽनुवर्ती मयाऽभयं दत्तममुष्य देव ।
संपाद्यतां तद्भवतः प्रसादो यथा हि ते दैत्यपतौ प्रसादः ॥४५॥

श्रीकृष्णा हा बाणासुर । माझा इष्ट प्रियतम फार । प्रणत मद्भजनीं सादर । केवळ अनुचर मन्निष्ठ ॥१७॥
ऐसियातें सर्वांपरी । अभय दिधलें म्यां श्रीहरि । तूंही तेंचि यथार्थ करीं । प्रसाद मजवरी करूनियां ॥१८॥
तुझिया प्रसादाचें पात्र । जाणोनि हा बाणासुर । प्रसन्न होवोनि माझा वर । करीं साचार प्राग्दत्त ॥१९॥
माझिया प्रसादा भाजन । तूं जरी म्हणसी कैसा बाण । यदर्थीं पूर्वपरिज्ञान । देतों स्मरण करूनियां ॥४२०॥
प्रह्राद तुझा अनन्य भक्त । त्याच्या ठायें तव प्रसाद नित्य । बाण त्याचाचि प्रपौत्र सत्य । जाणोनि स्वाङ्कित कृपा करीं ॥२१॥
प्रह्रादाच्या ठायीं जैसा । तुझा प्रसाद द्वारकाधीशा । बाणावरीही करीं तैसा । जाणोनि स्वदासांमाजि आपुल्या ॥२२॥
म्यां बाणातें दिधलें अभय । तें संरक्षीं कृपाळु होय । ऐसें प्रार्थितां गिरिजाप्रिय । श्रीकृष्ण काय बोलतसे ॥२३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP