अध्याय ६३ वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


ततस्तिर्यड्मुखो नग्नामनिरीक्षन्गदाग्रजः । बाणश्च तावद्विरथश्छिन्नधन्वाऽविशत्पुरम् ॥२१॥

तिर्यड्मुख होतां हरि । विरथ निःशस्त्र बाण समरीं । प्राणधाकें शोणितपुरीं । अतिसत्वरीं प्रवेशला ॥९४॥
गदाचा अग्रज जो कां कृष्ण । तेणें पळतां देखूनि बाण । दैत्य प्रमथ भूतसैन्य । अवशिष्ट संपूर्ण त्रासिलें ॥९५॥
ऐकें राया कुरुनरेन्द्रा । जृंभणास्त्रें मोहिलें रुद्रा । विरथ निःशस्त्र बाणासुरा । सांडूनि समरा पळविलें ॥९६॥

विद्राविते भूतगणे ज्वरस्तु त्रिशिरास्त्रिपात् । अभ्यधावत दाशार्ह दहन्निव दिशो दश ।
अथ नारायणो देवस्तं दृष्ट्वा व्यसृजज्ज्वरम् ॥२२॥

बळभद्राच्या मुसळप्रहारीं । कुम्भाण्ड कूपकर्ण पडले समरीं । शार्ङनिर्मुक्त तीक्ष्णशरीं । सेना आसुरी विध्वंसिली ॥९७॥
दर्प बाणाचा गळाला । प्रमथभूतगण पळाला । यादवसमुदाय मिळाला । विजय साधिला बळकृष्णीं ॥९८॥
तये समयीं रौद्रज्वर । त्रिशिरा त्रिपाद प्रळयांगार । भंगला देखूनि शाम्भवभार । कृष्णासमोर उठावला ॥९९॥
दाही दिशा जाळील ऐसा । रौद्रज्वर सताप वळसा । यादवसैन्यामाजी आपैसा । हाहाकार ओढवला ॥२००॥
वीर ज्वरें संतप्त झाले । कित्येक रथावरी लोटले । एक भूतळीं उलंडले । ज्वरें त्रासिले बहुसाल ॥१॥
रौद्रज्वरें तापले बळी । कोणी कोणा न सांभाळी । मत्स्य जैसे निर्जरस्थळीं । तेंवि भूतळीं तळमळती ॥२॥
यानें मोकळीं समरांगणीं । प्रेतप्राय योद्धे रणीं । कृष्णप्रद्युम्नसंकर्षणीं । ज्वर अते क्षणीं संचरला ॥३॥
गळालीं हातींचीं हतियारें । देह तापले रौद्रज्वरें । पाणी मागती दावूनि करें । न दिसे दुसरें जलदाना ॥४॥
बळरामाचा प्रताप प्रबळ । रौद्रज्वरें केला विकळ । गळालें हातींचें नांगर मुसळ । पडिला व्याकुळ ज्वरतापें ॥२०५॥
त्रिजगज्जेता रणरंगधीर । त्या प्रद्युम्नाआंगीं ज्वर । संचरोनि केला किर । पडिला विसर शस्त्रांचा ॥६॥
जो दैत्यारि मधुसूदन । रौद्रज्वरें तापला पूर्ण । गळालें हातींचें धनुष्य बाण । सहित कृपाण कौमोदकी ॥७॥
चक्र उचलूं पाहे करीं । ज्वरें शक्ति नसे शरीरीं । परम संताप दाटला गात्रीं । पडती नेत्रीं जळबिंदु ॥८॥
वणवयाच्या जैशा वाफा । मुखीं नासिकीं तैसिया धापा । रौद्रज्वरें पावले तापा । समरप्रतापा आंचवले ॥९॥
ऐसा त्रिपाद त्रिशिरा ज्वर । जेणें त्रासिले रामश्रीधर । यादवसैन्यें सांडिला धीर । पडिले झुंझार ज्वरतापें ॥२१०॥
ऐसिये समयीं श्रीभगवान । ज्ञानीं पाहे जंव विवरून । रौद्रज्वराचें विंदान । अंतःकरणीं ओळखिलें ॥११॥
ज्वरें व्यापिले यादव समरीं । देखूनि नारायण दैत्यारि । वैष्णवज्वर उत्पन्न करी । अभ्यंतरीं योगबळें ॥१२॥
संतापरूपी रौद्रज्वर । कृष्णें निर्मिला शीतज्वर । तेणें त्रासिला माहेश्वर । झाले विज्वर यदुवर्ग ॥१३॥
उभय ज्वरांमाजी रण । राया आरंभलें दारुण । तया दोघांची आंगवण । ऐकें श्रवणसौभाग्या ॥१४॥

माहेश्वरो वैष्णवश्च युयुधाते ज्वरावुभौ । माहेश्वरः समाक्रंदन्वैष्णवेन बलार्दितः ॥२३॥

माहेश्वरनामक ज्वर । त्रिशिरा त्रिपाद भयंकर । एक द्व्याहिक त्र्याहिक अपर । चातुर्थिक सेनानी ॥२१५॥
जीर्णज्वर अस्थिगत । नवज्वर काळज्वर संतत । वात पैत्तशैत्यजनित । मेहसंभूत असाध्य ॥१६॥
कायिक वाचिक मानसिक । वियोगविरहज्वर सशोक । अशीति यूथपति मुख्य । क्षुद्र अनेक ज्वरसेना ॥१७॥
ऐसा रौद्रज्वराच्या भार । त्यावरी वैष्णव शीतज्वर । उठावला अति सत्वर । दांत करकर खाऊनी ॥१८॥
ग्रीष्मीं पर्वता प्रदीप्त वणवा । माततां तद्गत जंतुकणवा । माततां तद्गत जंतुकणवा । भगवत्प्रेरित मेघ उठावा ॥१९॥
किंवा प्रेतपूर्णा धरणी । देखूनि दैत्यां समराङ्गणीं । शुक्र प्रेरितां संजीवनी । सवेग चैतन्यीं विनियोजे ॥२२०॥
नातरी जैसा स्पर्शमणि । पालटी स्पर्शें लोह सुवर्णीं । तेंवि रौद्रज्वरें संतप्त रणीं । ते शीतळ केले वैष्णवें ॥२१॥
वैष्णवज्वराचें बळ प्रचंड । रौद्रज्वर नुधवी तोंड । करूं पाहे खंडविखंड । पिंडब्रह्माण्ड व्यापुनी ॥२२॥
वैष्णवज्वर बळें करून । रौद्रज्वरेंसीं करितां कदन । येरू आदरी पलायन । तंव निर्भय स्थान लक्षेना ॥२३॥
पळोनि जावें जया ठायां । तेथ पाविजे महाभया । ऐसें हृदयीं जाणूनियां । मग यदुवर्या आश्रयिलें ॥२४॥

अलब्ध्वाऽभयमन्यत्र भीतो माहेश्वरो ज्वरः । शरणार्थी हृषीकेशं तुष्टाव प्रयतांजलिः ॥२४॥

लोकत्रयासी भयंकर । तो मी माहेश्वर ज्वर । वैष्णवज्वरें त्रासितां क्रूर । निर्भय अन्यत्र स्थळ न दिसे ॥२२५॥
सर्व लोकांसी संतापकर्ता । यालागीं विश्वीं मम शत्रुता । ऐसिया मज अभयदाता । कोण तत्त्वता हों पाहे ॥२६॥
एवं अन्यत्र न पवोनि अभय । ज्वर माहेश्वर भयभीत पाहे । सर्वेंद्रियाचा जो कां राय । शरण जाय तयाप्रति ॥२७॥
स्वयें होऊनियां शरणार्थीं । दीनवदनें कृष्णाप्रति । जाऊनिया करिता झाला स्तुति । बद्धहस्तीं ते ऐका ॥२८॥
परमविनीत नियतेन्द्रिय । अंजलिबद्ध करद्वय । श्रीकृष्णातें स्तविता होय । तें श्लोकचतुष्टय शुक वर्णी ॥२९॥

ज्वर उवाच - नमामि त्वाऽनंतशक्तिं परेशं सर्वात्मानं केवलं ज्ञप्तिमात्रम् ।
विश्वोत्पत्तिस्थानसंरोधहेतुं यत्तद्ब्रह्म ब्रह्मलिंगं प्रशान्तम् ॥२५॥

रौद्रज्वर श्रीकृष्णातें । तावूं गेला स्वसामर्थ्यें । तंव नारायणज्वरें त्यातें । संतापातें पावविलें ॥२३०॥
मग तो त्रिपाद त्रिशिरा ज्वर । करिता झाला दीर्घ विचार । म्हणे श्रीकृष्ण परमेश्वर । आत्मा सर्वत्र सदोदित ॥३१॥
श्रीकृष्ण चिन्मात्र वस्तु एक । येर अवस्तु विवर्त अशेष । संकल्पजनित त्रिगुणात्मक । दृश्य मायिक जडभ्रांति ॥३२॥
त्यामाजी तमोगुणात्मा रुद्र । तज्जनित मी त्रिशिरा ज्वर । माझी शक्ति किमन्मात्र । कृष्ण स्वतंत्र परमात्मा ॥३३॥
कृष्णास्तिक्यें जग आभासे । कृष्णप्रकाशें संव्त विलसे । कृष्णानंदें वेधकदशे । विषयीं भासे आनंद ॥३४॥
त्या कृष्णातें संतापपीडा । करितां तापलों मीचि रोकडा । त्यालागीं कृष्णप्रताप गाढा । नये परिपाडा गौण तया ॥२३५॥
ऐसें विवरूनि अंतःकरणीं । निर्भय स्थान कृष्णचरणीं । ज्वरें माहेश्वरें लक्षूनी । नमनीं स्तवनीं प्रवर्तला ॥३६॥
अतिन्त्यानंतशक्तिमंता । तूंतें नमितों श्रीभगवंता । सगुण होसी सुरकार्यार्था परेशा परता परेश तूं ॥३७॥
ब्रह्मादि गुणत्रयांच्या मूर्ति । परेश ऐसें त्यांस म्हणती । त्यांची ही जे ईशनशक्ति । तिची प्रवृत्ति तव सत्ता ॥३८॥
येथ म्हणसी हेतु काय । तरी सर्वात्मा तूं सर्वमय । चराचर चेतयिता चिन्मय । स्फुट आम्नाय प्रकाशिती ॥३९॥
तेंही कैसें घडेल म्हणसी । तरी या विवर्तविश्वाभासीं । केवळ ज्ञप्तिमात्र तूं होसी । चैतन्यघन शुद्धात्मा ॥२४०॥
तेंचि सर्वत्र चेतयितार । तो तूं परिपूर्ण परमेश्वर । विश्वसृजनावनाप्ययकर । हेतु साचार सर्वांचा ॥४१॥
ऐसें ब्रह्म निर्गुण म्हणसी । मे तंव जन्मलों देवकीकुशी । तरी हें सहसा हृषीकेशी । प्राकृतासी न चाळवीं ॥४२॥
इत्यादि ईशनसामर्थ्यवंत । तत्ब्रह्म या पदें प्रस्तुत । केला श्रुतींहीं सिद्धान्त । इत्थंभूत परेशा ॥४३॥
म्हणसी ब्रह्म तें कैसें काय । तरी ब्रह्म वेदाचें नामधेय । वेदप्रतिपाद्य निरामय । जें अमळ अद्वय अविनाश ॥४४॥
तया अविनाशत्वा हेतु । सर्व विक्रियारहित प्रशान्त । यालागीं नेति मुखें सिद्धान्त । करूनि मौनस्थ श्रुति झाल्या ॥२४५॥
सविशेष आणि निर्विशेष । अप्रशान्त आणि प्रशान्त । अक्रिय आनि क्रियावंत । तूं या हेतु दोहींचा ॥४६॥
जेथवरी सविशेष वस्तु । तेथ प्रभवों आम्ही समस्त । तूं जो केवळ विशेषातीत । अप्रभूत अकारण ॥४७॥
समस्तांचा तूं प्रभविता । तुजवर नसे प्रभवनकर्ता । यालागीं सर्वप्रभु तूं तत्वता । समर्थ सत्तायोगबळें ॥४८॥
ज्ञाप्तिमात्रत्व तुझें कैसें । यथामति तें कथिजेत असे । करुणानिधे कारुण्यवशें । तें तूं परिसें साकल्यें ॥४९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP