मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २ रा| श्लोक ३९ ते ४० अध्याय २ रा प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ ते ३४ श्लोक ३५ श्लोक ३६ श्लोक ३७ ते ३८ श्लोक ३९ ते ४० श्लोक ४१ ते ४२ अध्याय २ रा - श्लोक ३९ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३९ ते ४० Translation - भाषांतर न तेऽभवस्येश भवस्य कारणं विना विनोद्रं बत तर्कयामहे । भवो निरोधः स्थितिरप्यविद्यया कृता यतस्त्वय्यभयाश्रयात्मनि ॥३९॥संचित प्रारब्ध क्रियमाण । ऐसें त्रिविध कर्मबंधन । तेणें जीवासि जन्ममरण । कर्माधीन आविद्यक ॥६९॥तूं मायानियंता पूर्ण । म्हणोनि ईश हें संबोधन । त्या तुज संसारबंधन । मूर्ख कोण मानील ॥७७०॥मृगजळशैत्यें सूर्य कांपे । पावकप्रतिभे कालाग्नि तापे । स्वच्छायेनें मेरु दडपे । तैं परमात्मा गुंते संसारीं ॥७१॥तो तूं असंसारी श्रीकृष्ण । तुज कैंचें कर्मबंधन । लीलाविग्रहें क्रीडाचरण । हेंचि कारण तर्किजे ॥७२॥अनंत भक्तांचा प्रेमादर । नाना दुष्टांचा संहार । क्रीडाविनोद तदनुसार । जगदुद्धार करावया ॥७३॥अभयाश्रय हें संबोधन । करावया हेंचि कारण । भेद भयाचें जन्मस्थान । तूं अभेद पूर्ण परमात्मा ॥७४॥तूं अभेद पूर्ण जगदात्मा । तुज नियमन करवे कर्मा । यालागीं नित्यमुक्त या नामा । अभयाश्रय संबोधन ॥७७५॥तुज जन्मासि नाहीं कारण । हें कायसें प्रशंसन । आधीं जन्म स्थिति आणि मरण । हें मिथ्या जाण आविद्यक ॥७६॥तुझ्या ठायीं विन्मुखपण । हेंचि अविद्येचें जन्मस्थान । जनन मरण अभिवर्धन । हें करणें जाण तयेचें ॥७७॥तुझ्या ठायीं सन्मुख सदा । त्यासि नाहीं जन्ममरणांची बाधा । त्या प्रत्यक्ष तुज गोविंदा । संसृतिशब्दा कें वदिजे ॥७८॥जीवासि जन्मादि वास्तव नाहीं । तें अविद्याकृत मिथ्या पाहीं । तें जैं घडे वस्तूच्या ठायीं । तरी तरणोपायीं कां श्रमिजे ॥७९॥वास्तवचि जरी जन्ममरण । तरी मग कैंचें निस्तरण । यालागीं ऐसें अप्रमाण । सहसा व्याख्यान न करावें ॥७८०॥तुझिया नामस्मरणापुढें । अविद्या सकार्य समूळ उडे । जन्ममरण कोणीकडे । मग बापुडें उरेल ॥८१॥अविद्याभ्रमीं भक्त बुडे । त्यासि तरावयाचिये चाडे । नानावतारपवाडे । केले रोकडे ते ऐकें ॥८२॥स्वधर्माचें संस्थापन । लोकत्रयपरिपालन । लीलावतार धरिले पूर्ण । ते सुरगण बोलती ॥८३॥मत्स्याश्वकच्छपनृसिंहवराहहंसराजन्यविप्रविबुधेषु कृतावतारः ।त्वं पासि नस्त्रिभुवनं च यथाऽधुनेश भारं भुवो हर यदूत्तम वन्दनं ते ॥४०॥दीपप्रकाशें क्रमिजे राती । तेवीं अविद्येमाजीं श्रुति । ज्ञानप्रकाशें स्वधर्मेपथीं । प्राणी येती आत्मत्वा ॥८४॥तेथ महामोहशंखासुर । श्रुतिरत्नांचा तस्कर । आश्रयूनि अकूपार । भयंकर लपाला ॥७८५॥विश्वीं झाला हाहाकार । लोपला वर्णाश्रमयज्ञाचार । भंगला धर्माचा विचार । अधर्म थोर दाटला ॥८६॥तैं मत्स्यरूप धरूनि हरि । शंख मारूनि वाहसी करीं । विश्व रक्षिलें सदाचारीं । धर्मा करी एकछत्र ॥८७॥कूर्मरूपें श्रीअनंता । पृष्ठभागीं पृथ्वी धरितां । सुकर होऊनि दाढेवरुता । घेसी तत्त्वता भूभार ॥८८॥हिरण्यकशिपुअहदैत्य । सद्भावप्रर्हादा गांजित । सुरवर केले पदच्युत । दुःखावर्ती त्रैलोक्य ॥८९॥दुर्मदस्तंभातें करूनि भग्न । स्वयें प्रकटे सिंहवदन । हिरण्यकशिपु विदारून । स्थापी त्रिभुवन स्वधर्मीं ॥७९०॥ब्राह्मणभजनभाग्यें बळी । बळेंचि त्रिदशतिं आकळी । निर्जर मिळविले धुळी । असुरां कुळीं आनंद ॥९१॥देव निर्दैव ब्राह्मणकोपें । बळि सभाग्य भक्तिप्रतापें । ब्राह्मणकृपेच्या साक्षेपें । चळी कांपे कळिकाल ॥९२॥ब्राह्मणांचे आशीर्वाद । तेंचि लेऊनि कवच विशद । समरींजिंकोनि निर्जरवृंद । विजयानंद बलि पावे ॥९३॥शुक्र बळीसि करी बोध । देव न टाकिती विरोध । त्यांचा करूनिया शोध । परम सावध असावें ॥९४॥कल्याण व्हावें आपणासी । ऐशी इच्छा जया मानसीं । तेणें सावध अहर्निशीं । रहाटी ऐशी करावी ॥७९५॥अतिथि देखोनि ऐकोनि । सन्मानिजे अभ्युत्थानीं । करितां उपेक्षा हेळणी । महाविघ्नीं आतुडवी ॥९६॥आपुलें आराध्य दैवत । तेथ असावें परम नियत । तेथ दुश्चित्त होतां चित्त । ये अकस्मात अरिष्ट ॥९७॥मैत्री करावी सज्जनांशीं । सलगी न दावी दुर्जनांशीं । यथोपचारें समयासी । दोहीं ठायीं भजावें ॥९८॥ईश्वर अथवा नरेश्वर । सेवेसि असावें सादर । तेथें होतां तंद्रापर । नाश सत्वर कार्याचा ॥९९॥नित्यकर्माचें अनुष्ठान । श्रौत स्मार्त औपासन । यथाकाळीं सावधान । नसतां विघ्न प्रमादें ॥८००॥देवमनुष्यपितृऋण । अथवा कोणी उत्तम वर्ण । यांचे परिहारीं आपण । सावधान असावें ॥१॥जन्मकाळापासूनि ग्रह । क्रूर सौम्य दशासमूह । जाणोनि शांतीचा लवलाहो । करितां मोह न धरावा ॥२॥आणि आपुलें वसतिस्थान । उटज हो कां हेमसदन । निवेशनिर्गमींचें विघ्न । सावधान रक्षावें ॥३॥नातरी जैसा कोशकीट । सदन रचूनि बळकट । ठेवूं विसरला निर्गमवाट । शेवटीं कष्ट पावला ॥४॥नातरी जैसा मंदमति । मूषकबाधेचि निवृत्ति । लवणें भरूनि पाया भिंती । केली वरतीं त्रिमाळिकें ॥८०५॥प्रावट्काळीं पडतां घन । लवण विघरोनि झालें जीवन । त्रिमाळिका होतां पतन । मग यमसदन सकुटुंबा ॥६॥तैसें न होऊनि बुद्धिमंद । वातवृष्टि आतपभेद । जलाग्नितस्करांचे बाध । सदनीं सावध चुकवावे ॥७॥मंदिर केलें रत्नखचित । शय्या केली तूळिकायुक्त । दीपक जाळी होतां पतित । अग्नि अद्भुत चेतला ॥८॥अग्निद्रव्याची सांडण । पेटतां उडोन गेलें सदन । कुटुंबासहित सोहळा पूर्ण । सभाग्य म्हणोनि भोगिला ॥९॥खचलें विसंचलें पहावें । पडलें झडलें सांभाळावें । नित्य नूतन सांवरावें । सदनीं राहावें यापरी ॥८१०॥तैसेंचि रोगांचें भांडार । नाशिवंत स्थूलशरीर । म्हणोनि आहारव्यवहार । करितां सविचार असावें ॥११॥पथ्य भेशज रोगचिकित्सा । सावधपणें कीजे वत्सा । भुलोनि क्षणिकां विषयां तुत्सां । पात्र कुत्सां न व्हावें ॥१२॥बालपालनीं सावधान । पतनदंशसंरक्षण । यथाकाळीं अन्नपान । निरीक्षण क्रीडेचें ॥१३॥तैसेंचि कामिनीचें मन । संरक्षावें सावधान । न कीजे गुह्यसंभाषण । दीर्घताडण न करावें ॥१४॥अशनशयनमनवस्त्राभरणीं । गौरविजे अलंकरणीं । विहरभाषणनिरीक्षणीं । सावधान रक्षावी ॥८१५॥स्त्रीसि नाहीं स्वतंत्रपण । बालत्वीं पित्राज्ञापालन । भर्त्ताराआज्ञेनें तारुण्य । पुत्राधीन वार्धक्यीं ॥१६॥येणें नियमें पतिव्रता । नियमें होय स्वतंत्रता । पातक भर्ताराचे माथां । दैत्यनाथा तें ऐक ॥१७॥पाणिग्रहणें स्वधर्मनेम । अग्निसेवन गृहस्थाश्रम । पंचमहायज्ञ षट्कर्म । कीजे निष्काम सद्भावें ॥१८॥अतिथिअभ्यागतपूजन । हव्य कव्य विप्रार्चन । मातृपितृदेवार्चन । गुरुपूजन विधियुक्त ॥१९॥आश्रमत्रयासि आधार । गृहस्थाश्रमचि साचार । म्हणोनि गृहस्थाश्रम थोर । रक्षणपर सर्वांसी ॥८२०॥वैश्यें दोहावीं गोधनें । क्षत्रियें दोहावीं उभय भुवनें । गृहस्थें आश्रमत्रयपूजनें । सुकृत घेणें दोहोनी ॥२१॥नित्यनैमित्तिक कर्मांसाठीं । स्त्री बांधोनि घेतली गांठी । तेथ भांबावलिया रहाटी । पापकोटि गृहस्था ॥२२॥यालागीं परम सावधान । करावें स्त्रीसंरक्षण । रतिकाळीं रतिसेवन । प्रजोत्पादन करावें ॥२३॥सावधानपणें दासदासी । नियोजावीं निजसेवेसी । दुश्चित असतां अनर्थासि । अकस्मात मिलविती ॥२४॥ अश्वगजोष्ट्रधेनुमहिषी । इत्यादि पाळिल्या प्राणियांसी । सावधपणें अहर्निशीं । सांभाळासी न चुकावें ॥८२५॥वृक्षवाटिका वनोपवनें । नानाकृषि देवसदनें । जलाशयादि प्रवाहजीवनें । सावधानें रक्षावीं ॥२६॥न्यायनीतीचें संरक्षण । आयव्ययाचेम परिज्ञान । राष्ट्रप्रजापरिपालन । सावधान करावें ॥२७॥गुरूपदिष्ट जे कां विद्या । विवरूनि निरसावी अविद्या । सावध सेवूनि अक्षरा आद्या । जगद्वंद्या भजावें ॥२८॥सर्व सांगावयाचें कारण । इतुकेंचि एथ महाविघ्न । शत्रुदमनीं विलंबन । असावधान हें मूळ ॥२९॥आंतरशत्रूंचा करूनि जय । ज्ञानलाभें मोक्षोपाय । बाह्यशत्रूंच्या पराजयें । लोकत्रय साधावें ॥८३०॥तुवां करोनि प्रताप थोर । समरीं जिंकिलें निर्जर । आतां करीं महासत्र । जेणें अमर नुधवती ॥३१॥निर्जर करिती तपश्चर्या । हिरोनि घेती लोकत्रया । यालागीं तूंही यज्ञकार्या । असुरराया संपादीं ॥३२॥ऐसा शुक्रबोधें बळी । यज्ञ करितां भूमंडळीं । आक्रांत देवांचे मंडळीं । श्रीवनमाळी चिंतिती ॥३३॥तेव्हां होऊनि वामन । मागोनि त्रिपादभूमिदान । केलें बळीसि बंधन । त्रिदशां त्रिभुवन अर्पिलें ॥३४॥बळि ब्राह्मणभजननिष्ठ । आशीर्वादें महाबलिष्ठ । समरीं हरिहर पावतां कष्ट । योद्धा वरिष्ठ जिणवेना ॥८३५॥मग मागोनि भूमिदान । केलें कपटें बलिच्छलन । न चले बळीसि आंगवण । ब्राह्मणभजनप्रसादें ॥३६॥ताक मागोनि धेनु देणें । एक्या सुमनें वन अर्पणें । तैसें केलें श्रीवामनें । द्वाररक्षण बळीचें ॥३७॥या इंद्राचें भरतां मान । बळीस ओपीन इंद्रासन । जमान होऊनि वामन । द्वार रक्षूनि राहिला ॥३८॥बळीची भजनभीड मोठी । सुरकार्याचिये संकटीं । बळी छळितां कृपा पोटीं । धरूनि काठी द्वार राखे ॥३९॥कृतवीर्याचा कार्त्तवीर्य । धेनुलोभें परमान्याय । करूनि मारिला मुनिवय । तपोवीर्यप्रतापी ॥८४०॥तेव्हां प्रकटोनि परशुपाणि । सहस्रार्जुन मारिला रणीं । करूनि निःक्षत्रिय धरणी । द्विजांलागीं अर्पिली ॥४१॥आपुल्या पित्यासि जो संहारी । पुत्र सूडें त्यासि मारी । त्याची वृत्ति स्वयें स्वीकारी । परशुधारी तैसाचि ॥४२॥पितृघाती निर्दाळून । पृथ्वी घेतली आपण । शौनकभृगुवंशा भूषण । तदर्पण भू केली ॥४३॥भार्गव निर्विकार वितृष्ण - । न्यायें केलें पृथ्वीहरण । न करी औपाधिक शासन । शौनकार्पण या हेतु ॥४४॥मारूनिया क्षत्रियांचे गण । त्यांचेनि रक्तेंकरूनि तर्पण । पितरांसहित निर्जरगण । जेणें संपूर्ण तोषविले ॥८४५॥सनकादिकीं करितां प्रश्न । ब्रह्मा धरूनि ठेला मौन । तैं हंसावतारें श्रीभगवान । गुह्यज्ञान प्रबोधी ॥४६॥ब्रह्मा केवळ रजोगुण । रागलो भतृष्णावरण । पडोनि झालें विपरीत ज्ञान । गुह्य प्रश्न उगवेना ॥४७॥लीलाविग्रही मराळ - । रूपें अवगला गोपाळ । आत्मसंवेदन बहळ । बोधी निजबाळ विधाता ॥४८॥निर्जर जिंकोनि रावणें । केलीम निगडीं दृढबंधनें । तैं धराधरधरास्तवनें । अवतार धरणें रघुकुळीं ॥४९॥भानुकुलीं दशरथसदनीं । वतरोनि पंकजपाणि । केली अलौकि करणी । जे शंकर स्मरणीं स्मरतसे ॥८५०॥ताटिका मारिली एके बाणें । विश्वामित्राध्वररक्षणें । कोटि राक्षसेंशीं सुबाहुप्राणें । घेऊनि उडविणें मारीचातें ॥५१॥अहल्या उद्धरिली पदरजस्पर्शें । गौतम पूजिला पूर्णतोषें । त्र्यंबकधनु भंगूनि कीर्त्तिघोषें । ब्रह्मांड यशें ढवळिलें ॥५२॥रावण केला गर्वहत । राजे केलें लज्जान्वित । सीतास्वयंवरें त्रिजगांत । सुधाजीमूत वर्षला ॥५३॥भार्गवरामें अवतारशक्ति । वीरश्रीतोषें ओपिली हातीं । रामनामाची हे ख्याति । त्रिजगीं गाती सुरसिद्ध ॥५४॥निज जनकाचें भाषरक्षण । पाळिलें सापत्नमातृवचन । बंधुकांतेशीं दंडकारण्य । वसवी मुनिजनसहवासें ॥८५५॥सत्यव्रताच्या रक्षणें । पितृममता त्यजिली जेणें । जटावल्कलभस्माभरणें । तापसपणें विचरत ॥५६॥वाल्मीकभविष्य प्रमाण । करूनि केलें क्रियाचरण । विराधसादि निर्दाळून । वसतिस्थान पंचवटी ॥५७॥विरूप केली शूर्पनखी । खरदूषणत्रिशिराप्रमुखीं । समरीं प्राण अर्पूनि सुखी । केली त्रिलोकी निष्पाप ॥५८॥शूर्पनखीनें वदनानिळ । श्रवणीं फुंकितांचि तत्काळ । रावणालयीं मदनानळ । प्रळयकाळ खवळला ॥५९॥तेणें करितां सीताहरण । रुक्ममृगत्वें मारीचमरण । जटायूचें उद्धरण । शापमोचन कब्रंधा ॥८६०॥पंपे भेटला हनुमंत । तेणें सुग्रीववृत्तांत । कथितां श्रीराम करुणावंत । केला सनाथ वरदानें ॥६१॥वाळिसुग्रीवजन्मकथन । उभयवैराचें कारण । परिसोनिया रघुनंदन । प्रताप गहन दाखवी ॥६२॥एकबाणें विपट ताळ । छेदूनि दुंदुभिप्रेत । विशाळ । पायें उडवूनि तत्काळ । वाळी प्रबळ खवळिला ॥६३॥कश्यपवरदमाळे भेणें । वाळी मारिला विमुखपणें । ब्राह्मणवराच्या सन्मानें । आपणा उणें स्वीकेलें ॥६४॥दाराकुमारीसहित राज्य । पावोनि सुग्रीव झाला पूज्य । पुढें सीताशुद्धीचें काज । वानरपुंज मिळविले ॥८६५॥यथाविभागें दिशाचक्र । शोधिला भूगोल अवक्र । दधि म्हणोनि मथितां तक्र । न लभेचि सार जानकी ॥६६॥दक्षिणकाष्ठेशीं एकनिष्ठ । मारुति शोधूनि संतुष्ट । शुद्धि आणूनि हरिले कष्ट । मग चालिले स्पष्ट लंकेसी ॥६७॥सागर प्रसन्न करितां स्तुति । सन्मुख न होता क्षोभे चित्तीं । भस्म करितां शरणवृत्ति । नम्रगति पातला ॥६८॥रत्नीं पूजूनि रघुनंदना । कथी नळासी सेतुरचना । करितां रामनामलेखना । शिळा जीवनावरी तरती ॥६९॥अभित्रबंधु आला शरण । सिंधु उतरूनि वानरसैन्य । सुवेळे जाऊनि रघुनंदन । लंकाभुवन रोधिलें ॥८७०॥शिष्टाई धाडिला अंगद । साम न मानी बुद्धिमंद । सेना आणि मंत्रिवृंद । महादुर्मद मारिले ॥७१॥कुंभकर्ण निद्राभरीं । जागवूनि धाडिला समरीं । श्रीरामचिया निर्वाणशरीं । रणचत्वरीं पहुडला ॥७२॥कुंभकेतादि राजकुमार । अतिकायादि योद्धे थोर । युद्धीं मारूनि वानरभारें । श्रीरामचंद्र तोषविला ॥७३॥श्रीरामाचिया निर्वाणबाणें । पावले संग्रामीं निर्वाणें । तेव्हां रावणाच्या मनें । पहा अनर्थ मानिला ॥७४॥इंद्रजितें रावणासी । वारूनि आला संग्रामासी । रामसौमित्रां नगपाशीं । कपिसेनेशीं पाडिलें ॥८७५॥तैं वातपुत्रें द्रोणाचळ । आणूनि उठविलें वानरदळ । यज्ञ भंगूनि रावणबाळ । सौमित्रवीरें मारिला ॥७६॥पुढें अहिरावण महिरावण । करूनि अद्भुत आंगवण । चोरूनियां रघुनंदन । पाताळभुवनीं टाकिले ॥७७॥तेथें प्रवेशोनि मारुति । अहिमहींची केली शांति । विजयघोषें श्रीरघुपति । सुवेळेप्रति आणिला ॥७८॥शक्ति भेदूनि रावणे । वीरसौमित्र घेतला प्राणें । आजि इंद्रजिताचें उसनें । फिटलें मनें भाविलें ॥७९॥श्रीराममारणाचिया काजा । करूनि महाकालीपूजा । महामृत्युंजयमंत्रबीजा । जपोनि हवनीं बैसला ॥८८०॥तंव बिभीषणसुषेणमंत्रें कपि । आणूनि द्रोणाद्रि प्रतापी । लक्षण जीववूनि रावण कोपी । दाराछळणें खवळिला ॥८१॥दुःखें पातला निर्वाणसमरा । शक्रें श्रीरामा निजरहंवरा । देतां भरला क्रोधभरा । दाढा करकरां खादल्या ॥८२॥निर्वाणशस्त्रीं करितां युद्ध । विरोधभजनें ध्यानावबोध । चापवाणें ठाणबद्ध । श्रीराम प्रसिद्ध देखिला ॥८३॥रामरंगें रंगले नेत्र । राम देखती दृश्यमात्र । राममयचि देखे गात्र । प्रेम विचित्र द्वेपाचें ॥८४॥रामीं भिडतां रामबाणीं । रावण पडला निर्वाणरणीं । पुष्पें वर्षिजे अमरगणीं । विजयध्वनि लागल्या ॥८८५॥पडिले रावणाचे मौळी । त्यावरी रामायणाच्या ओळी । आश्चर्य देखोनि अमरपाळीं । माथें सकळीं तुकिलें ॥८६॥वर्षोनि अमृत कृपाघन । रामें उठविलें वानरसैन्य । जानकी आणूनि दिव्यदान । प्रेमालिंगन श्रीरामीं ॥८७॥फोडिली सुरांची वांदवडी । नव ग्रहांची तोडिली वेडी । रामराज्याची आनंदगुढी । झालें ब्रह्मांडीं एक छत्र ॥८८॥बिभीषणा लंके राज्याभिषेक । रावणपत्न्यांसि दीर्घ शोक । रामकीर्तींचा विजयघोक । ब्रह्मादिक पठताती ॥८९॥प्रायश्चित्तार्थ रामेश्वर । स्थापूनि गेला रामचंद्र । ज्याच्या दर्शनें जगदुद्धार । यावच्चंद्र अघशांति ॥८९०॥भिल्लटीचीं उच्छिष्ट बोरें । अंगीकारिलीं श्रीरामचंद्रें । भरता भेटॊनि प्रेमादरें । अयोध्यापुरा प्रवेशले ॥९१॥वसिष्ठाज्ञेनें राज्याभिषेक । स्वधर्मसोहळा भोगिती लोक । शंकरहृदयीं भरिला हरिख । नामें त्रैलोक्य धवळिलें ॥९२॥केलें स्वधर्मसंस्थापन । मारिले अन्यायी दुर्जन । वैकुंठासि अयोध्याभुवन । गेला घेऊनि श्रीराम ॥९३॥मत्स्य कच्छ वराह हंस । नृसिंह वामन भार्गववेष । क्षात्रवंशीं रामपरेश। रक्षी त्रिजगास अमरेंशीं ॥९४॥केवळ आम्हांसीच रक्षिलें ऐसें नाहीं वाखाणिलें । लोकत्रया प्रतिपाळिलें । संस्थापिलें धर्मातें ॥८९५॥आतां तैसेंचि श्रीपरेशा । गोकुळीं धरूनि गोपवेशा । मारूनि उत्पथां राक्षसां । आम्हां निजदासां रक्षावें ॥९६॥हेचि विनति यदूत्तमा । दैत्यभारें दाटली क्ष्मा । तो भार - उतरूनिया विश्रामा । मेघश्यामा पाववीं ॥९७॥ऐसें विनवूनि निर्जरगणीं । सकळही माथे ठेविती चरणीं । मग आश्वासिली देवकी जननी । तें शुकमुनि बोलतो ॥९८॥ N/A References : N/A Last Updated : April 25, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP