अध्याय २ रा - श्लोक २६

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


सत्यव्रतं सत्यपरं त्रिसत्यं सत्यस्य योनिं निहितं च सत्ये ।
सत्यस्य सत्यमृतसत्यनेत्रं सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्नाः ॥२६॥

सत्यसंकल्पी गोविंद । ब्रह्मादिदेवा होऊनि वरद । भूभारहरणीं आनंदकंद । अभयप्रद अवतरला ॥२८०॥
सत्य केलें पैं प्रतिश्रुत । तेणें देवांसि आनंद प्राप्त । म्हणोनि सत्यत्वें त्यासि स्तवित । सत्यव्रत म्हणोनि ॥८१॥
जो श्रीप्रभु सत्यसंकल्प । सत्यप्रकाशक चिदात्मदीप । ज्यावरी असत्प्रपंचारोप । जो सद्रूप सत्यव्रत ॥८२॥
सत्यावेगळें श्रेष्ठ साधन । ज्याचे प्राप्तीसि नाहीं जाण । यालागीं ब्रह्मादिदेवतागण । म्हणती भगवान सत्यपर ॥८३॥
त्रिसत्य म्हणजे कालत्रयीं । विकार नातळे ज्याच्या ठायीं । जो कां उत्पत्तिस्थितिप्रलयीं । अविक्रिय त्रिसत्य ॥८४॥
उत्पत्तीपूर्वीं सत्य साचार । साद्यंतस्थितीं जो अविकार । प्रलयाअंतीं जो निर्विकार । तो परात्पर त्रिसत्य ॥२८५॥
हाचि तिहीं पदीं झाडा । येचि श्लोकीं बोलिला पुढां । तो व्यासोक्तिनिवाडा । श्रोतीं रोकडा परिसावा ॥८६॥
जो कां सत्याचीही योनि । पूर्वीं विद्यमान सत्याहूनि । सत्यशब्दाचिये व्याख्यानीं । ही कहाणी उमजेल ॥८७॥
सत्शब्दें भूजलहुताश । त्यत्शब्दें वायुआकाश । एवं पंचमहाभूतांस । सत्यनाम वेदोक्त ॥८८॥
पंचभूतांचें कारण । भूतांआधीं विद्यमान । तसें सत्यचि योनि म्हणोन । व्यास भगवान वाखाणी ॥८९॥
एवं विद्यमान स्रुष्टीपूर्वीं । ते हे सत्याची योनि म्हणोनि गुर्वी । वाणी बोलिली सुपर्वीं । मान्य सर्वीं सर्वत्र ॥२९०॥
आतां पंचभूतात्मकें प्रपंचीं । निहित म्हणजे व्यपति ज्याची । असोनि अविकार अलिप्तची । हे स्थितिकाळींची अविक्रियता ॥९१॥
जो प्रपंचा सबाह्यांतरीं । प्रपंच भासला ज्यावरी । अंतरी असोनि निर्विकारी । जेवीं सर्प दोरी अस्पृष्ट ॥९२॥
एवं स्थितिकालीं निर्विकार । ऐसें वर्णूनियां सुरवर । आतां महाप्रजा अविकार । तो प्रकार बोलती ॥९३॥
जें कां सत्याचेंही सत्य । तेथींचा ऐसा वृत्तांत । पंचभूतांसि झालिया अंत । जें निवांत संचलें ॥९४॥
पंचभूतात्मक प्रपंचभान । त्याचें जेणें परिज्ञान । तया नांव विपरीत ज्ञान । त्याचें कारण सन्मात्र ॥२९५॥
ज्याच्या विसरें भूतात्मक । सत्य म्हणती वेदांतिक । त्यांचेही जें पारमार्थिक । सत्यात्मक सत्य जें ॥९६॥
भूतविलयीं उर्वरित । त्यासि सत्याचें सत्य म्हणत । एवं पंचभूतां झालिया अंत । जें निवांत अविनाश ॥९७॥
ऐसें कालत्रयीं अबाधित । तेंचि बोलिलें जें हें त्रिसत्य । तिहीं पदीं तोचि अर्थ । केला श्लोकोक्त मोकळा ॥९८॥
आतां ऋतसत्यनेत्र । म्हणोनि देवीं केलें स्तोत्र । त्याची व्युत्पत्ति विचित्र । श्रोते पवित्र परिसोत ॥९९॥
ऋत तें मूनृत भाषण । सत्य म्हणजे समदर्शन । हेंचि भाष्यकारव्याख्यान । शंकर भगवान बोलिला ॥३००॥
ज्या वस्तूसि नाहीं गमनागमन । त्या वस्तूचें प्रवर्त्तन । हेंचि दोन्ही मुख्य साधन । नेत्राभिधान या हेतु ॥१॥
वैखरीव्यापारी जें सत्य । तेंही शास्त्रेंकरूनि पूत । तयासि श्रुति म्हणति ऋत । येर अनृत वडवड ॥२॥
श्रवण करितां वाढे तोष । वाढे तोष । अर्थें झडती महादोष । अनृताचा नातळे लेश । ऋत निर्दोष तें म्हणिजे ॥३॥
स्वामिकाजीं दीजे प्राण । हें सत्यचि परी कठिण साधन । कां मर्मोच्चारें दोषकथन । विषाहूनि कडवट ॥४॥
सत्यवाचेचें भाषण । परी नाहीं शास्त्राची शिकवण । सत्यचि परि तें सदूषण । विचक्षण बोलती ॥३०५॥
ब्राह्मण दुर्दैव सापराध । साक्षी पुसोनि करितां वध । सत्य साक्षी परि विरुद्ध । दोष प्रसिद्ध हत्त्येचा ॥६॥
भर्तृक्षोभाचिये क्षणीं । प्रतीपादी जो व्यभिचारिणी । साक्ष देऊनि करी विघडणी । दोषदानी तें सत्य ॥७॥
चोरव्याघ्राकुळें पथीं । अथवा देशकाळें अनु पतीं । अनाचार उत्तम यातीं । जो सत्योक्ति प्रख्यापी ॥८॥
विवाह यज्ञ कां महायात्रा । साधावया अनृत वक्त्रा । आणितो तेथें सत्य शत्रा - । सारिखें क्रूर जो बोले ॥९॥
तेणें त्याची कार्यहानि । तेव्हां जोडिती पापश्रेणी । तें सत्यचि परि नरकदानीं । अशास्त्र करणी म्हणोनियां ॥३१०॥
पतिव्रतेवरी बलात्कार । दुष्ट दुरात्मे करिती जार । तिसी होतां पलायनपर । सत्य साचार जो दावी ॥११॥
ऐसें अशास्त्र अनेक । सत्यचि परि दोषदायक । सत्यव्रती जे निष्टंक । व्यावें मूक तिहीं तेथें ॥१२॥
नुलंघोनि शास्त्रमर्यादा । नुच्चारोनि दोषनिंदा । जनांतर न पवे खेदा । ते सूनृतवाक् सत्य ॥१३॥
दोषकथनीं न वदिजे सत्य । तेथें राहिजे मूकवत् । प्रिय भाषणें न कीजे घात । तें सूनृत बोलिजे ॥१४॥
सत्य प्रिय आणि हितकर । विशेष शास्त्राचा आधार । ऐसा जो कां वाग्व्यापार । तें साचार ऋत म्हणिजे ॥३१५॥
आतां जें कां समदर्शन । त्याचें यथार्थ व्याख्यान । श्रोतीं होऊनि सावधान । कीजे श्रवण मनयुक्त ॥१६॥
एकचि अद्वितीय ब्रह्म । विश्वाभास हा मिथ्याभ्रम । मायानिर्मित गुण कर्म । रूप नाम भ्रममात्र ॥१७॥
मृगजळ भरलें दिसे डोहीं । प्रबुद्ध तेणें न विहे कांहीं । निश्चय जाणे कां जळचि नाहीं । तैसा सर्व देहीं विवर्त्त ॥१८॥
संकल्पविकल्पात्मक मन । तेथें उमटलें आब्रह्मभुवन । तें मनचि जैं होय उन्मन । पाहे परतोन आपणया ॥१९॥
तेव्हां लटकें हारपलें स्वप्न । तद्वत् जागृतीं दृश्यभान । सुषुप्तीं जड मूढ अज्ञान । वृत्तिशून्यभ्रमगर्भीं ॥३२०॥
जैसा कोणीएक वनवासी । पडिला गिरिकंदरीं उद्वसीं । दुःखें होय कासाविसी । म्हणे आप्तासि अंतरलों ॥२१॥
माता पिता बंधु मित्र । धनधान्यादि पुत्र कालत्र । सुहृद स्वजन कुल गोत्र । वृत्ति क्षेत्र कल्पित ॥२२॥
कल्पना अंतरली अध्यस्त । म्हणोनि शोकें दुःखी होत । एर्‍हवीं समस्तही तेथें आप्त । त्रिगुण भूतपंचक ॥२३॥
तैसें चैतन्यही एकचि । तरी कायशी खंतीं वियोगाची । सवें लागली अध्यस्ताची । तेच ज्याची आठवण ॥२४॥
तैसें सुषुप्तीगर्भीं कांहीं । प्रपंचाचें स्मरण नाहीं । म्हणोनि गाध मूढ शून्य पाहीं । मोह - प्रवाहीं बोलती ॥३२५॥
जरी सुषुप्ति असती शून्य । तरी जागृति येती कोठून । आत्मा सच्चिदानंदघन । सर्व व्यापूनि अलिप्त ॥२६॥
अध्यस्त कांहीं नाठवे । सुषुप्ति म्हणिजे येणें भावें आत्मा परिपूर्ण स्वानुभवें । तो नागवे अज्ञाना ॥२७॥
नाहीं स्वात्मानुसंधान । नाठवे प्रपंचाचें भान । ऐसें केवळ विस्मरण । तेंचि अज्ञान गाढ मूढ ॥२८॥
अज्ञानगर्भीं विपरीत ज्ञान । मनचि त्याचें अधिष्ठान । लयविक्षेप हें अभिधान । या दोहोंसी ठेविलें ॥२९॥
स्वप्रपंच तें अन्यथा ज्ञान । जागृतिप्रपंच तें विपरीत ज्ञान । ऐसें द्विविध प्रपंचभान । विक्षेप अभिधान पैं याचें ॥३३०॥
मूर्च्छना आणीक सुषुप्ति । ही द्विविध लयाची व्युत्पत्ति । एवं कल्पना मायाभ्रांति । आत्मविस्मृति हे मिथ्या ॥३१॥
आत्मा अद्वितीय नित्य सत्य । द्वैत अनित्य हें असत्य । येणें बोधें नित्य तृप्त । जे संतत समदर्शी ॥३२॥
मृगजळ कां प्रतिमंडळ । दिसतांहि मिथ्याचि केवळ । ऐसें देखती मायाजाळ । त्यांचें शीळ समदर्शन ॥३३॥
शास्त्रपूत प्रिय हित । ऐसें भाषण त्या नांव ऋत । आणि समदर्शन तें सत्य । हें ऋतसत्य नेत्रद्वय ॥३४॥
इही साधनीं प्रकटतां । होय जयाची तत्परता । तरी त्यातें नेत्र ऐसें म्हणतां । शंका श्रोतीं न धरिजे ॥३३५॥
समदर्शनें प्रर्‍हादासी । स्तंभीं प्रकटला हृषीकेशी । दैत्य म्हणूनि अनारिसीं । गोष्टी तयाशीं न करवे ॥३६॥
विरोचन आणि ब्राह्मण । प्राणत्यागाचा घालूनि पण । पुसतां ज्याचें ऋत भाषण । न धरी पूर्ण सुतममता ॥३७॥
ऋतसत्यांचें अनुष्ठान । तेथें प्रकटे श्रीभगवान । यालागीं ऋतसत्यनेत्र म्हणोन । करी व्याख्यान शुक योगी ॥३८॥
इत्यादि विशेषणीं सत्यात्मक । त्या तूंतें आम्ही वृंदारक । शरण पातलों सम्यक । होईं रक्षक शरण्या ॥३९॥
म्हणसी तुम्हीहि लोकेश्वर । मत्तुल्यचि प्रभुत्वें थोर । मज शरण यावयाचा प्रकार । कोण विचार हा केला ॥३४०॥
ऐसें न म्हणिजे पुरुषोत्तमा । तूं एक जगाचा जगदात्मा । आम्ही तुझिया अंशप्रतिमा । गुणसंभ्रमा मायिक ॥४१॥
तूं मायादिसृष्टिकारण । आम्हांसि मायाचक्रीं परिभ्रमण । म्हणोनि एकांतें तुज शरण । मायानिरसन व्हावया ॥४२॥
ते माया म्हणसी कैशी । जे अद्वैतीं द्वैत प्रकाशी । वृक्षाकाररूपकेंशीं । निरूपणासि अनिर्वाच्य ॥४३॥
ते वृक्षरूपें निरूपण । करिती ब्रह्मादि सुरगण । परीक्षितीसि शुक आपण । म्हणे श्रवण करीं राया ॥४४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP