अध्याय २ रा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - प्रलंबबकचाणूरतृणावर्त्तमहाशनैः । मुष्टिकारिष्टद्विविदपूतनाकेशिधेनुकैः ॥१॥

प्रलंबनामा महादैत्य । रामहस्तें ज्याचा घात । पूतनेचे बंधु ख्यात । महाशन वका दुसरा ॥३०॥
महाशन तो अघासुर । मल्ल मुष्टिक आणि चाणूर । ज्यांचा कंसासि आधार । महा थोर मानला ॥३१॥
तृणावर्त्त तो चक्रवात । अरिष्ट वृषभाकृति दैत्य । पूतना ते जगद्विख्यात । बालकृतांतमारिका ॥३२॥
धेनुकनामा रासभाकार । द्विविद रामदळींचा वानर । आणीकही महाश्रूर । दैत्यभार मेळविला ॥३३॥

अन्यैश्चासुरभूपालैर्बाणभैमादिभिर्युतः । यदूनां कदनं चक्रे बल्ली मगवसंशयः ॥२॥

आणीक आसुरी भूपाळ । दळें बळें जे विशाळ । जयांच्या धकें कांपे काळ । महा प्रबळ आंगवणें ॥३४॥
शोणितपुरींचा राजा बाण । जो शिवाचा वरदनंदन । भौम नरकासुर दारुण । महा निर्घृण दुरात्मा ॥३५॥
इत्यादि जे दैत्यवंशी । कंसें सख्य करूनि त्यांशीं । कदन मांडिलें यांदवांशीं । अहर्निशी दुर्वैर ॥३६॥
मगधदेशींचा मागध । नामें बोलिजे जरासंध । ज्यासि शरीरसंबंध । जो सासुरा प्रसिद्ध कंसाचा ॥३७॥
अस्ति प्राप्ति मागधसुता । ज्या कंसाच्या मुख्य कांता । त्यांच्या स्नेहवादें पिता । पक्षपाता प्रवर्ते ॥३८॥
मागधाश्रयें महावळी । कंस अजिंक भूमंडळीं । यादवकुळांची रवंदोळी । करूनि दुळी मिळविले ॥३९॥

ते पीडिता निविविशुः कुरुपांचालकैकयान् । शस्त्रान्विदभान् निषधान् विदेहान् कोसलानपि ॥३॥

यादव त्रासले कंसभयें । न चले कोणाचा उपाय । मग सोडूनि वृत्तिठाय । नाना राय सेविले ॥४०॥
कित्येक रिघाले कौरवदेशीं । कित्येक झाले पांचाळवासी । कित्येक केकयदेशनिवासी । शाल्वप्रदेशीं पैं एक ॥४१॥
विदर्भ आणि नैषधप्रांतीं । एक रिघालें मिथिलेप्रति । एकीं कोसलविशक्षिती । जीविकावृत्ति सेविली ॥४२॥
सांडूनि पौरुष अभिमान । निर्लज्ज करूनि पलायन । अनाथ वृत्तिहीन दीन । प्राण रक्षूनि राहिले ॥४३॥

एके तमनुरुंधाना ज्ञातयः पर्युपासते । हतेषु षट्सु बालेषु देवक्या औग्रसेनिना ॥४॥

एक प्राणधाकें अनन्यशरण । होऊनि करिती कंससेवन । राजोपचारसमर्पण । विभागें जाण ओळगती ॥४४॥
एक स्वगोत्र स्वजाति । करूनि राहिले सेवावृत्ति । त्यांच्या आश्रयें कुटुंबें किती । ठेवूनि दिगंतीं पसरले ॥४५॥
हे यादवांची कथा । शुक सांगोनि कौरवनाथा । आतां कंसाची व्यवस्था । सांगे व्यवस्था गर्भांची ॥४६॥
पूर्वीं ऐकोनि नारदवचन । वसुदेवदेवकींसि बंधन । करूनि मारिला नंदन । जो होता आपण वांचविला ॥४७॥
ऐसा मारिला कीर्तिमंत । दुसरा सुषेण नामा सुत । त्यांचा कंसें केला घात । तैसाचि वधीत भद्रसेन ॥४८॥
चौथा मृदु जो उदारधी । संतर्दन पांचवा वधी । भद्रही मारी क्रूरबुद्धि । जैसा पारधी पाडसा ॥४९॥
परीक्षिती म्हणे जी योगींद्रा । आशंकाअभ्रें प्रमेयचंद्रा । झांकुळिलिया चित्तचकोरा । श्रवणचारा रुचेना ॥५०॥
कंसें मारिलें गर्भषट्क । स्वामी बोलिले निष्टंक । एथ आशंका उपजली एक । तो विवेक विवरावा ॥५१॥
कंसें केला परम अन्याय । परि त्या गर्भांचें पातक काय । केव्हां ठेविलीं नामधेयें । हें विदित होय तें कीजे ॥५२॥
जातमात्रचि कंसें वधिले । ऐसें स्वामींहीं बोधिलें । कीर्तिमंतादि नामाथिले । जीवंत कीं मेले हें सांगा ॥५३॥
हें ऐकोनि बादरायणि । जैसा भास्कर शार्वरहरणीं । संशयसागराच्या शोषणीं । कुंभजमुनि दुसरा ॥५४॥
तो भूदेव म्हणे मनुष्यदेवा । पुशिला प्रश्न ऐकें वरवा । पुढें अध्यायीं पंचायशीव्या । वृत्तांत आघवा हा तेथें ॥५५॥
श्रेष्ठीं केलें युक्तायुक्त । त्यासि कनिष्ठ उपहासित । तेणें पावे अधःपात । हा वृत्तांत तेथींचा ॥५६॥
स्वकन्येशीं रमतां विधि । मरीचषट्पुत्र दुर्बुद्धि । हंसले तेणें कृतापराधीं । आसुरी योनि पावले ॥५७॥
कालनेमीचिये उदरीं । साही जन्मले पापकारी । ते हे नामें दैत्याघरीं । जन्मांतरें त्यां होती ॥५८॥
तो कालनेमि म्हणसी कोण । जो हिरण्यकशिपूचा ज्येष्ठ नंदन । महामायावी आंगवण । असाधारण पैं ज्याची ॥५९॥
तारकमयसमारांगणीं । त्यातें वधूनि चक्रपाणी । तोषविल्या निर्जरश्रेणी । ही कहाणी हरिवंशीं ॥६०॥
तोचि कालनेभि एथ । कंस द्रुमल्यदैत्यसुत । उग्रसेनाचा क्षेत्रजात । गर्भां वधित हरिद्वेषें ॥६१॥
जातमात्रचि कंस मारी । मग नामकरणें कोण संस्कारी । ज्येष्ठोपहासें ऐशी परी । दुराचारी पावले ॥६२॥
हरिआज्ञेनें योगमाया । ती या कालनेमितनयां । देवकीउदरीं घालूनिया । कंसराया क्षोभवी ॥६३॥
ऐसें देवकीगर्भ सहाही । कंसें मारिले असतां पाहीं । विष्णुप्रतापतेज जो अहि । नामधेयें अनंत ॥६४॥
तो श्रीआदिपुरुषाची कला । आधार जयाचा भूगोला । जयाच्या आंगींच्या प्रतापबला । तुलना काळा असाम्य ॥६५॥
ऐशापुढें कंस किती । ऐशी आशंका कोणी करिती । तरी अवतारचरित्र याची रीति । भक्तपति संपादी ॥६६॥
प्रबुद्ध बाळकाचेनि मेळें । अज्ञान होऊनि खेळ खेळे । तैसें क्रीडिजे गोपाळें । मनुष्यलीलें नटकाट्य ॥६७॥

सप्तमो वैष्णवं धाम यमनंतं प्रचक्षते । गर्भो बभूत देवक्या हर्षशोकविवर्धनः ॥५॥

तो देवकीगर्भीं राम । जो स्वयें वैष्णवधाम । राहिला तेणें तोष श्रम । गुणसंभ्रमें वाढविला ॥६८॥
राम रहातां देवकीपोटीं । आनंदप्रचुर जहाली सृष्टि । तेणें आनंदें गोरटी । चित्सुखपुष्टि पावली ॥६९॥
चंद्रबिंबीं न रिघे ताप । जाह्नवीजळीं न वसे पाप । तो हा वस्तूचा प्रताप । रामरूप सुखवृद्धि ॥७०॥
स्वयें रामचि पूर्णकाम । सर्व सुखांचा आराम । तो गर्भीं धरितां कैवल्यधाम । पावली विश्राम देवकी ॥७१॥
हा तो चिन्मात्रवस्तुमहिमा । आता ऐका भक्तिप्रेमा । देहभाव पुरुषोत्तमा । निष्काम काम अर्पिणें ॥७२॥
स्नान नाहीं घडलें देवा । वस्त्रावीण देवा नागवा । हें तों लागलें देहभावा । देव आघवा वेगळा ॥७३॥
देव पुजूनि रत्नकोटी । भक्त धाके आपुले पोटीं । झणीं लागेल कोणाची दृष्टि । म्हणोनि कष्टी होतसे ॥७४॥
तैशी देवकी आपण । प्रेमें कळवळूनि पूर्ण । म्हणे कंस हा दारुण । हें गर्भरत्न मारील ॥७५॥
सहा गर्भ मारिले येणें । आतां याचा घेईल प्राण । मज पापिणीचें भाग्य उणें । धिक् जिणें पैं माझें ॥७६॥
गर्भा येतां फनिनायक । ऐसा वाढला हर्षशोक । येरां गर्भांपरी दुःख । मानी देवकनंदिनी ॥७७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP