अध्याय २ रा - श्लोक ३३ ते ३४

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तथा न ते माधव तावकाः क्कचिद्भ्रश्यन्ति मार्गात्त्वयि बद्धसौहृदाः ।
त्वयाभिगुप्ता विचरन्ति निर्भया विनायकानीकपमूर्धसु प्रभो ॥३३॥

तुझिया चरणा शरणागत । सतत जे कां प्रेमभरित । ते न पवती अधःपात । जैसें अभक्त पावले ॥९९॥
भक्तिमार्ग अत्यंत सोपा । छाया सुशीतळ तुझिया कृपा । प्राशन करिती प्रबोध - आपा । पाप - आतपा नेणिजे ॥६००॥
नाहीं योगाचा अवघड घांट । विधिनिषेध न पाडिती वाट । आश्रमचौकीची नाहीं कटकट । संग चोखट संतांचा ॥१॥
श्रवणकीर्त्तनाचिया वसती । नवविधसुखांची विश्रांति । जेथें चालतां विघ्नपति । चळीं कांपती हरिनामें ॥२॥
ऐशिये चालतां भक्तिमार्गीं । भक्तांसि विघ्न नातळे अंगीं । लेइले भजनाची वज्रांगी । विघ्नभंगीं प्रवर्त्तले ॥३॥
म्हणसी विघ्नकर्त्ते कोण । ऐक तयांचें लक्षण । कनक कांता विषयगण । आणि त्रिगुण विघ्नपति ॥४॥
बळेंचि रिघोनि अंतःकरणीं । चित्तचतुष्टयीं घालूनि ठाणीं । इंद्रियमार्गें करिती धांवणी । आब्रह्मभुवनीं राजिक ॥६०५॥
कामक्रोध महाघोर । यांचे अवघड देव्हढे मार । दंभ लोभ आणि मत्सर । महा क्रूर दुरात्मे ॥६॥
अविवेक वीर अष्टमद । करिती विवेकासि द्वंद । मोहसेना हे प्रसिद्ध । चाळी विरोध ज्ञानासी ॥७॥
कांताकामिनी सन्नद्धदळें । घेऊनि काम समरीं खवळे । क्रोधलोभाचे देव्हढे मेळे । बळें अबळां घोळसिती ॥८॥
कामें जिंकिलिया अंगें । लोभ ठाणें घालूनि जागे । कामा मोडूनि घालितां मागें । क्रोध सवेगें झोंबाडे ॥९॥
मोह ममतेची घेऊनि सेना । मोडूनि परमार्थसाधना । बळेंचि नागवूनि जना । करी उगाणा स्वहिताचा ॥६१०॥
ऐसे विघ्ननायक सेनापति । सकळ साधकां नागविती । यांचे मस्तकीं पाय भक्ति । ठेवूनि ख्याति लाविली ॥११॥
शत्रु जिंकोनि लाविले भजनीं । अगाध हरिभक्तांची करणी । पायें रगडोनि शत्रु मूर्धीं । निर्भय जनीं विचरती ॥१२॥
कामें कामिती हरिप्रेम । क्रोधें दमिति इंद्रियग्राम । लोभ सुकृतीं निष्काम । कैवल्यधामप्रापक ॥१३॥
मोह भूतदयापर । मदें पापाचे डोंगर । भंगोनि संसारेशीं वैर । महामत्सर चाळिती ॥१४॥
ममता बांधिली सद्गुरुपायीं । आशा तृष्णा पडिल्या ठायीं । जल्पना कीर्तनप्रवाहीं । कल्पना तेहीं रांडावली ॥६१५॥
बळेंचि जिंकूनि शत्रुभार । वेठीं धरिले महावीर । त्यांचे शिरीं देऊनिया भार । भक्तगजर मांडिला ॥१६॥
ऐसें चालतां कीर्त्तनपंथीं । यमनियमांची न पडे गुंती । अंत्यजादि सकळ यातीं । अहोरातीं सुपंथें ॥१७॥
ठाणीं उठविलीं शत्रूंचीं । वसति नवविध पट्टणांची । देणीं घेणीं आनंदाचीं । नाहीं काळाची कांचणी ॥१८॥
जिंकूनि शत्रूंचा समुदाय । त्यांचे मूर्ध्नीं ठेवूनि पाय । भक्त विचरती निर्भय । लोकत्रय निज राज्य ॥१९॥
सकळ कांपती शत्रुभेणें । भक्त निर्भय कवणे गुणें । ‘ त्वयाभिगुप्ता ’ या व्याख्यानें । शंका करणें न लागे ॥६२०॥
सप्रेम करिती नामस्मरण । नामामाजीं श्रीभगवान । तेणें भक्तां न बाधी विघ्न । अभिरक्षण तूं कर्त्ता ॥२१॥
तुवां रक्षिले सबाह्य भक्त । म्हणोनि निर्भय ब्रह्मांडांत । विघ्नकर्त्ते पादाक्रान्त ।करूनि विचरत स्वानंदें ॥२२॥
माझेनि स्मरणें पळे विघ्न । एथ म्हणसी काय कारण । तरी माधव म्हणॊनि संबोधन । पूर्वींच जाण केलेंसे ॥२३॥
मायाजनित गुणत्रय । गुणकार्य अवघें विकारविषय । भवसागर हा मायामय । तूं अद्वय परमात्मा ॥२४॥
मायाभर्त्ता तूं माधव । तुझिया दासां कैंचा भव । काय सिंहाचे अवयव । धरिती भेव हांकेचें ॥६२५॥
म्हणसी विश्वीं माझा वास । विघ्नें बाधती कीं विश्वासा । त्यांचें भय नाहीं भक्तांस । कारण यास कोणतें ॥२६॥
भक्त त्वयि बद्धसौहृद । म्हणोनि विसरले भेदाभेद । नित्य नूतन भजनानंद । स्वानंदकंद पैं झाले ॥२७॥
अभक्त भरले विकारणा । सुहृद मानिलें स्त्रीपुत्रस्वजना । तेणें पावले अधःपतना । झाले विघ्ना वरपडे ॥२८॥
म्हणोनि प्रभुत्वें तूं गोसांवी । तुझिया नामाची अगाध एदवी । स्मरणें विघ्नां पराभवी । भक्तां गौरवी चित्सुखें ॥२९॥
तूं निर्विकार निर्गुण । भक्तांलागीं होसी सगुण । तेव्हां तुझें प्रकाशे भजन । जें जीवन स्वसुखाचें ॥६३०॥

सत्त्वं विशुद्धं श्रयते भवान् स्थितौ शरीरिणां श्रेयौपायनं वपुः ।
वेदक्रियायोगतपःसमाधिभिस्तवार्हणं येन जनः समीहते ॥३४॥

तूं जगदात्मा जगद्गुरु । विशुद्धसत्त्वात्मक शरीर । धरूनि करिसी जगदुद्धार । तो प्रकार अवधारीं ॥३१॥
तूं विश्वाच्या पाळणासाठीं । धरूनि विशुद्धसत्त्वाची अंगयष्टि । करिसी प्राण्यांची रहाटी । भजनासाठीं सुफळित ॥३२॥
देहवंतांचें कल्याण । जेणें तें तुझें स्वरूप सगुण । सगुणरूपें भवभंजन । करिती जन तव भजनें ॥३३॥
चहुं आश्रमीं पृथग्वर्ण । यथाधिकारें करिती भजन । त्यांमाजीं मुख्य जे ब्राह्मण । त्यांचें लक्षण अवधारीं ॥३४॥
ब्रह्मचर्यीं वेदाध्ययन । गृहस्थें कीजे क्रियाचरण । अग्निहोत्रादि महायज्ञ । तपाचरण वनस्थें ॥६३५॥
यतीनें मनातें जिंकोनी । समाधि साधिजे एकासनीं । ऐसें स्वधर्माचे अनुष्ठानीं । चौघीं जणीं तुज भजिजे ॥३६॥
एवंस्वरूप जें सगुण । तेंचि भक्तांचें सौभाग्य पूर्ण । तेथ कायसे चार्‍ही वर्ण । सर्वही जन उद्धरती ॥३७॥
जरी तूं न होतासि सगुण । तैं कोठूनि जाणते अज्ञान । अज्ञानासि निर्गुण भजन । कैसेंनि जाण आकळतें ॥३८॥
भजनावांचूनिया कर्मा । फलसिद्धि कैंची मेघश्यामा । तैं विषयासक्त भवभ्रमा । पावले श्रमा कैं मुकती ॥३९॥
या तिहीं श्लोकीं भगवद्भक्तां । मोक्ष निरोपिला श्रीअनंता । तरी कर्मफलाची सिद्धता । न घडे तत्त्वतां भक्तीविणें ॥६४०॥
परंतु ज्ञानावांचूनि न घडे मोक्ष । हा मुख्य वेदांतियांचा पक्ष । किमर्थ भक्तीचें साक्षेप । तरी हा पक्ष न म्हणावा ॥४१॥
शुद्ध भक्ती तें अपरोक्ष ज्ञान । ज्ञानप्रकाशक तुझे गुण । सगुणसद्गुरुभजनाविण । ज्ञानविज्ञान प्रकटेना ॥४२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP