अध्याय २ रा - श्लोक १६ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


भगवानपि विश्वात्मा भक्तानामभयंकरः । आविवेशांशभागेन मन आनकदुंदुभेः ॥१६॥

सातवा झाला गर्भपात । ऐशी नगरीं पसरली मात । परंतु योगमायेचा वृत्तांत । कोणा विदित असेना ॥५९॥
शुक म्हणे गा अर्जुनपौत्रा । परीक्षिते विराटदौहित्रा । श्रवणामृताच्या सदृढ पात्रा । ऐकें चरित्रा हरीच्या ॥१६०॥
एक गर्भ दोघीं पोटीं । कैसा म्हणोनि पुशिलिया गोष्टी । तें हें ऐकूनि कर्णपुटीं । संशयतुटी झाली कीं ॥६१॥
मग विश्वीं विश्वात्मा श्रीभगवान । भक्तांसि ज्याचें अभयदान । तो वसुदेवाचें वसवी मन । अच्युत पूर्ण अंशभाग ॥६२॥
अंशभाग ये व्याख्यानीं । पूर्णचैतन्यस्वरूपेंकरूनि । आनकदुंदुभीचे शुद्ध मनीं । चक्रपाणि प्रवेशला ॥६३॥
अंशभाग हे व्याख्यान । केलें असतां पुढती जाण । पुनरुक्तीचें काय कारण । हें निरूपण संकेतें ॥६४॥
पूर्वकर्माच्या संस्कारीं । प्राकृत जीव पितृशरीरीं । अब्दार्धार्ध वसति करी । धातूमाझारीं अन्नरसें ॥१६५॥
तैसा नोहे हा अच्युत । गुणपरिपूर्ण गुणातीत । भक्तानुग्रहें विग्रहें धरित । कर्मातीत अयोनिज ॥६६॥
तो निजभक्ताचे मनीं । प्रवेशोनी राहिला ध्यानीं । तेणें वसुदेव आसनीं शयनीं । ठेला होऊनि तन्मय ॥६७॥

स बिभ्रत् पौरुषं धाम भ्राजमानो यथा रविः । दुरासदोऽतिदुर्धर्षो भूतानां संबभूव ह ॥१७॥

धरितां श्रीमूर्ति अंतःकरणीं । वसुदेव तेजस्वी जैसा तरणि । निर्भय कळिकाळापासूनि । कोणा मनीं शंकेना ॥६८॥
विश्व पाहे आत्मप्रतीती । द्वितीयाद्वै भयं भवति । हा अनुभव श्रुतिसंमतीं । सहजस्थितीं तो पावे ॥६९॥
जैसी चंडकिरणाची दीप्ति । सचंद्र तारागणें लोपती । कायशी दीपाची तेथ ख्याति । कैंचि खद्योतीं वल्गना ॥१७०॥
तैसे अविद्याजनितविकार । कंसभयाचे अंकुर । ते हरपले स्वप्नाकार । जेवीं जागर झळकतां ॥७१॥
तैसा सर्वीं सर्वत्र दुर्घर्ष । वसुदेव झाला स्वप्रकाश । तेजोविशेष आदिपुरुष । हृदयकोश वसविता ॥७२॥

ततो जगन्मङ्गलमच्युतांशं समाहितं शूरसुतेन देवी । दधार सर्वात्मकमात्मभूतं काष्ठा यथाऽऽनन्दकरं मनस्तः ॥१८॥

ऐसा वसुदेवचित्तीं हरि । तेजःपुंज वसति करी । तदुपरि देवकीच्या अंतरीं । वसुदेव करी निक्षेप ॥७३॥
सकळ जगाचें मंगळ । झालें मूर्तिमंत केवळ । ऐश्वर्यादि अंश सकळ । जेथें प्रांजळ अच्युत ॥७४॥
ज्याच्या अंशासि नाहीं च्युति । यालागीं अच्युत श्रीपति । ज्ञानैश्वर्यादि संपत्ति । जेथें वसती अविच्युत ॥१७५॥
तो वसुदेवहृदयीं अच्युतांश । आविर्भवला स्वप्रकाश । तेणें यथाविधि उपदेश । देवकीस पैं केला ॥७६॥
अंतरीं बाणली जे प्रतीति । ते ओपिली देवकीप्रति । तिणें धरूनि आपुले चित्तीं । निजविश्रांति पावली ॥७७॥
आपुली पूर्ण सुखाची प्राप्ति । सद्गुरु सच्छिष्याच्या चित्तीं । सांठवी तेवीं ध्यानस्थिति । देवकीप्रति दीधली ॥७८॥
क्षीराब्धिजठरीं पूर्ण शशी । बिंबोनि राहे स्वप्रकाशीं । तैसा देवकीचे मानसीं । हृषीकेशी सांठवला ॥७९॥
अलिप्तपणें हिमकरासी । पूर्वदिशा धरी जैशी । तैशी देवकी निजमानसीं । जगदात्म्यासि सांठवीं ॥१८०॥
गंगोदकीं मेघोदक । जैसें अभेदें पावे ऐक्य । कीं पन्हरें पन्हरां सम्यक । होय एक अभेदें ॥८१॥
कीं व्यष्टिचैतन्याचा वाच्यांश । सांडूनि निवडिला जो लक्ष्यांश । तो समष्टिचैतन्यीं शुद्धांश । पावे समरस एकत्वें ॥८२॥
एवं उत्तमीं उत्तमचि सामावे । शुद्धीं शुद्धचि सांठवे । देवकी द्योतमान दैवें । विश्व सद्भावें कळवळिलें ॥८३॥
जैसे हिमाद्रीचे हिमकण । ग्रीष्मीं विघरूनि होय जीवन । तेंचि शारदीं घनावोन । कठिणपणें आवगे ॥८४॥
तैसें महताहूनि जें महनीय । अणूहूनि जें अणीय । वरिष्ठाहूनि गरीय । तें स्वकीय आत्मत्वा ॥१९५॥
सर्व सर्वैकगुहाशय । व्याप्यव्यापक जें अविक्रिय । स्वप्रकाश ज्योतिर्मय । स्वयमेव होय आत्मभूत ॥८६॥
तरी तो धरिला म्हणाल कैसा । जयाच्या विचारें ठाव दृश्या । तया अविस्मर स्वप्रकाशा । हृदयकोशामाजीं धरी ॥८७॥
धारणा बुद्धीचा एक अंश । जेथ कृतनिश्चयाचा विशेष । धरूनि व्यवहारे प्रकाश । सावकाश संसारीं ॥८८॥
जयासि म्हणती विपरीत ज्ञान । जें विषयव्यावहारिकचिंतन । तें धारणेमाजीं धारण्य । तेणें भवभान अध्यस्त ॥८९॥
दैवी संपत्ति भाग्योदयीं । सर्वात्मकत्वें स्वप्रत्ययीं । ठसावली धारणालयीं । जैशी हृदयीं शिवाचे ॥१९०॥

सा देवकी सर्वजगन्निवासनिवासभूता नितरां न रेजे ।
भोजेन्द्रगेहेऽग्निशिखेव रुद्धा सरस्वती ज्ञानखले यथा सती ॥१९॥

शुक म्हणे राया औत्तरा । ऐशी देवकी गरोदरा । जगन्निवास आला उदरा । ज्यामाजीं थारा सर्व जगा ॥९१॥
अनंत जगाचें वसतिस्थान । त्याचें निवासभूत जें पूर्ण । परंतु अत्यंत शोभायमान । नव्हेचि जाण देवकी ॥९२॥
काय निमित्त म्हणसी ऐसें । सावध होऊनि परियेसें । अहंकंसाचे बंधनीं असे । तेणें न दिसे कोणासी ॥९३॥
जे जे अंतरीं भगवन्मूर्ति । धरूनि पावले विश्रांति । देहअहंतेभेणें लपती । नित्य एकांतीं साधक ॥९४॥
यमदमाचे राखणाईत । नियमें दशधा ते जागत । शमकुलुपें घालूनि आंत । केला एकांत निबद्ध ॥१९५॥
अहंकंसाचें भय भारी । यालागीं स्वसुख निजांतरीं । धरूनि बाह्यलौकिकाचारी । कवणेपरी व्यवहारे ॥९६॥
शरीर कृश स्वधर्माचरणें । कंदमूलादि प्राणधारणे । अष्टभोगां कैचें जिणें । संभाषण अनोळख ॥९७॥
बाह्य अकिंचन अनाथ रंक । अंतरीं स्वानुभवाचें सुख । तैसाचि देवकीचा विवेक । सज्ञान लोक जाणती ॥९८॥
अंतरीं धरूं म्हणे भगवंता । इंद्रियां रहाटवी अहंता । तरी तो नागवे परमार्था । नित्य अनर्था आतुडे ॥९९॥
अहंकंसाचा जेव्हां मृत्य । साधनबंधन तेव्हांचि मुक्त । पूर्ण तेव्हांचि परमार्थ । सर्व पुरुषार्थ ते क्षणीं ॥२००॥
कंस असतां जिवें जिवंत । गर्भीं धरितांही अनंत । नोहे बंधनापासूनि मुक्त । राहे गुप्त न शोभतां ॥१॥
अहंकाराचा झंजावात । स्वानंददीपातें झडपीत । म्हणोनि एकांत गेहीं बुद्धिमंत । परम गुप्त रक्षिती ॥२॥
शांत झालिया महावात । ईप सबाह्य प्रकाशवंत । तैसाचि देवकीचा वृत्तांत । बाह्य अत्यंत न शोभे ॥३॥
कीं खलज्ञाची सरस्वती । जैशी विराजे देहाभोंवतीं । छात्रद्वारा प्रकाशकीर्ति । जेवीं दिगंतीं प्रकटेना ॥४॥
तेवीं पावोनि समाधान । स्वयें झाली आनंदघन । बाह्यप्रवृत्तिबंधन । यालागीं जन नेणती ॥२०५॥
प्रवृत्तीची गरोदरी । अहं संभवे जिचे उदरीं । विराजमान इंद्रियद्वारीं । मिरवे नगरीं निजगजरें ॥६॥
निवृत्ति गुर्विणी तैशी नोहे । जे कां स्वानंदातें प्रसवे । प्रवृत्तीमाजीं नोहे ठावें । निजानुभवें संतृप्त ॥७॥
कोणी मानील श्रीनायक । प्राप्त होतां कैचें दुःख । देवकीनिर्बंधनाचें अटक । आध्यात्मिक न वदावें ॥८॥
तरी यत्तदग्रे विषमिव । भगवद्गीते वासुदेव । आत्मसुखाचा प्रादुर्भाव । होतां आडव हे बोले ॥९॥
असो देवकी अंतर्निष्ठ । स्वसुखानुभवें झाली पुष्ट । बाह्यसाधनाचे कष्ट । देखती स्पष्ट पौरजन ॥२१०॥
नाना दोहदविलास । न वाटे आप्तलोकां हर्ष । झणीं ऐकेल दुष्ट कंस । हृदयीं त्रास सर्वांचे ॥११॥

तां वीक्ष्य कंसः प्रभया जितान्तरां विरोचयन्तीं भवनं शुचिस्मिताम् ।
आहैष मे प्राणहरो हरिर्गुहां ध्रुवं श्रितो यन्न पुरेयमीदृशी ॥२०॥

देवकीतें पाहोनि कंस । म्हणे इचा हृदयकोश । आश्रयोनि हृषीकेश । स्वप्रकाश राहिला ॥१२॥
ते देवकी म्हणाल कैशी । जिच्या दर्शनें कंसासी । शंका उपजली मानसीं । देहभावासी विसरला ॥१३॥
हें पांचां श्लोकीं निरूपण । शुक रायासी सांगोन । पुढें गर्भस्तुतीचें कथन । करील पूर्ण अध्यायीं ॥१४॥
तैं देवकीचें तेज फांके । जिसी देखोनि कंस धाके । हास्यवदनाच्या आलोकें । अवघा झांके भूगोल ॥२१५॥
परंतु रुद्ध कारागृहीं । म्हणोनि प्रकाश तेचि ठायीं । दाटला जैसा सूर्योदयीं । क्रीडालयीं ऐंद्रीच्या ॥१६॥
कीं क्षीराब्धीच्या अंतरावकाशीं । पूर्ण प्रकटोनि धवली शशी । तैशी देवकी स्वप्रकाशीं । बंदिशाळेसी शोभवी ॥१७॥
मग कंस आपुले मनीं । म्हणे जे बोलिली गगनवाणी । तो हा माझी प्राणहानि । चक्रपाणि करूं आला ॥१८॥
हा निर्धारें होय हरि । वदली नारदाची वैखरी । तो निश्चयें माझा वैरी । इचे उदरीं संभवला ॥१९॥
ऐकोनियां गगनवाणी । मी प्रवर्त्तलों इच्या हननीं । तेव्हां होती दीनवदनी । भासे ये क्षणीं दुर्धर्षा ॥२२०॥
पूर्वीं मारिलें गर्भषट्क । तेव्हां नव्हती भयानक । आतां ध्रुव म्हणजे निष्टंक । माझा अंतक गुहाश्रित ॥२१॥
देवकीदर्शनें कंस दैत्य । ठेला विस्मयें तटस्थ । जैसा सर्पदर्शनें वस्त । पावे अस्त स्मृतीचा ॥२२॥
समीप देखोनि अंतकाळ । विचार हरपला सकळ । न चले कांहीं उपायबळ । बोले विकळ मनेशीं ॥२३॥
असतां सामादि उपाय । कांहीं न चले करूं काय । या शत्रूचा भंग होय । तो व्यवसाय सुचेना ॥२४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP