मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीभक्तविजय| अध्याय ४८ श्रीभक्तविजय ॥ मंगलाचरणम् ॥ आरती श्रीविठ्ठलाची युगें ... अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ४८ संतकवी महीपतीबोवा ताहराबादकर विरचित Tags : bhakta vijaymahipatipuranपुराणभक्त विजयमराठीमहिपती अध्याय ४८ Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः ॥ श्रीपंढरीनाथाय नमः ॥ जय जय करुणासागरा आनंदघना ॥ भक्तवत्सला राजीवनयनां ॥ विधिजनका दानवभंजना ॥ जगज्जीवना जगदीशा ॥१॥जय जय विश्वव्यापका कमलापती ॥ सज्जनजीवना अनंदमूर्ती ॥ निगुणसगुण विश्वपती ॥ अतर्क्यगति वेदशास्त्रा ॥२॥जय जय विश्वबाहो अपरिमिता ॥ विश्वचक्षूनें तूं देखता ॥ विश्वपादें गमनकर्ता ॥ निगम वार्ता बोलिले ॥३॥जय जय चित्स्वरूपा आत्मारामा ॥ गुणनिधाना उत्तमोत्तमा ॥ स्वानंदप्रकाशा पुरुषोत्तमा ॥ अनुपम महिमा पैं तुझा ॥४॥तुझी ध्यानांत आणितां मूर्ती ॥ श्रुती परतल्या म्हणोनि नेति नेती ॥ कुंठीत झाली पुराणव्युत्पत्ती ॥ शास्त्रसंपत्ति लज्जित ॥५॥करितां तपें तीर्थाटनें ॥ प्राप्त नव्हेचि अनुष्ठानें ॥ तो तूं निजभक्तांचीं ऐकोनि कीर्तनें ॥ जाशी धांवून त्या ठायीं ॥६॥करूनि योगाची आटणी ॥ साधक बैसले वज्रासनीं ॥ त्यांसी नेणतां चक्रपाणी ॥ भाविक धुंडोनि पाहासी ॥७॥तूं सर्व देवांत मुकुटमणि श्रेष्ठ ॥ सकनादिकांसी पूज्य वरिष्ठ ॥ तो तूं भाविकांचें घरीं कष्ट ॥ करिसी स्पष्ट निजांगें ॥८॥निजभक्तांचें काम करितां ॥ लज्जा न वाटे तुझिया चित्ता ॥ मानापमान नेणवे सर्वथा ॥ पंढरीनाथा तुजलागीं ॥९॥तुझ्या निजभक्तांची ऐसी निष्ठा ॥ कदा न घालिती तुज संकटा ॥ प्रपंचदुःखाचे दावूनि कष्टा ॥ वैराग्य वरिष्ठा त्या देशीं॥१०॥त्या वैराग्याचें निजबळ ॥ तुझें भजन करिती सर्वकाळ ॥ कीर्तन गाती भक्त प्रेमळ ॥ सांडोनि तळमळ चित्ताची ॥११॥तूं अभक्तांच्या हृदयीं रिघोन ॥ त्या भक्तांचें करविसी छळण ॥ मग आपणचि निजांगें उडी घालून ॥ राखिसी सन्मान दासांचा ॥१२॥अघटित दावूनि करणी ॥ कीर्ति वाढविसी त्रिभुवनीं ॥ ऐसा निजभक्तांचा ऋणी ॥ तूं चक्रपाणी गोविंदा ॥१३॥त्यांचें वर्णावया सगुण चरित्र ॥ कोणासी करिसी निमित्तमात्र ॥ मी तंव मंदबुद्धि स्वतंत्र ॥ तूं राजीव नेत्र प्रकाशिता ॥१४॥अनाथनाथा रुक्मिणीपती ॥ आतां नमूं तुज पुढतपुढती ॥ ऐसेंही म्हणतां निजप्रीतीं ॥ कुंठित मति होतसे ॥१५॥तुझी कृपा न होतांचि जाण ॥ कदापि न करवे तुज नमन ॥ जें त्या काळीं येईल घडोन ॥ तें तुझे सत्तेविण नव्हेचि ॥१६॥क्षणक्षणा पालटोनि मती ॥ संकल्प विकल्प येतील चित्तीं ॥ तूं तर साक्ष जाणसी श्रीपती ॥ सांगों किती निजसुखें ॥१७॥न सांगों जरी रुक्मिणीकांता ॥ परी करुणा नयेचि तुज सर्वथा ॥ तान्हें बाळक रुदन न करितां ॥ धरीतसे माता दूर तयासी ॥१८॥तैशा रीतीं चक्रपाणी ॥ भक्त आळविती तुज करुणावचनीं ॥ मग कृपादृष्टीं विलोकूनी ॥ सप्रेमभजन त्यां देसी ॥१९॥ऐसीच तुझ्या गृहींची रीती ॥ मागें वर्णिली सभाग्य संतीं ॥ त्या निजभक्तांची अद्भुत कीर्ती ॥ तूंचि श्रीपति वदवीं कां ॥२०॥मागिले अध्यायीं कथालाघव ॥ रामदासाचा निश्चय दृढभाव ॥ देखूनियां पंढरीराव ॥ जाहले रामराव निजांगें ॥२१॥आतां सादर होऊनि प्रेमळजनीं ॥ निरूपण रसाळ ऐकावें श्रवणीं ॥ दीड योजन अलकापुरीहूनी ॥ देहू गांग धरणीं पुण्यक्षेत्र ॥२२॥तेथील निजभक्त तुका वाणी ॥ आंबळे उपनाम त्यालागोनी ॥ तरी व्यवसाय करीत असतां जनीं ॥ असत्य सर्वथा न बोले ॥२३॥दोघी कांता तयासी असती ॥ घरीं उदंड धनसंपत्ती ॥ परी त्याची अखंड विदेहवृत्ती ॥ स्मरण एकांतीं करीतसे ॥२४॥माता पित क्रमलियावर ॥ दुःखरूप जाहला संसार ॥ दुष्काळ देशीं पडला थोर ॥ तेणें द्रव्य समग्र आटलें ॥२५॥ धन धान्य जें कांहीं होतें ॥ तें आटोनि गेलें जेथिंच्या तेथें ॥ जैसें पौर्णिमेचें भरतें ॥ सागराआंत सामावे ॥२६॥कीं वर्षाऋतूचें अभ्र पाहें ॥ शीतकाळीं नाहींसें होय ॥ नातरी होतां सूर्योदय ॥ नक्षत्रें गगनींचि हरपती ॥२७॥कीं वार्धक्य अंगीं येतां पाहीं ॥ तारुण्यदशा न दिसे देहीं ॥ नातरी उष्णकाळ येतां ठायीं ॥ तृणें सर्वही नासती ॥२८॥तेवीं स्वदेशीं पडतां दुष्काळ ॥ धनधान्य आटोनि गेलें सकळ ॥ मुलेंमाणसें करिती तळमळ ॥ परी अन्न न मिळे सर्वथा ॥२९॥ज्येष्ठ कांतेसी पुत्र दोघे जण ॥ कनिष्ठेसी नव्हेतें संतान ॥ भाजीपाला खाती उकडोन ॥ परे दृष्टीसी कण दिसेना ॥३०॥तरी होणार न चुकेचि सर्वथा ॥ ज्येष्ठ निर्वतली अन्नअन्न करितां ॥ तेणें लज्जित होऊनि चित्ता ॥ प्रपंचममता नाठवे ॥३१॥संपत्ति वैभव हरपतां जाण ॥ त्यांसवेंचि गेला सन्मान ॥ देखतां हांसती सोयरे पिशुन ॥ तेव्हां लज्जित मन तुकयाचें ॥३२॥जे राखीत होते बहु मर्यादा ॥ तेचि स्वमुखें करिती निंदा ॥ अन्नवस्त्राची सदा आपदा ॥ उदीमधंदा चालेना ॥३३॥पुरुष झालिया द्रव्यहीन ॥ त्यासी न पुसती सोयरे पिशुन ॥ जेवीं वृक्षाचीं पत्रें गेलिया झडोन ॥ तेथें विलासी जन न रमती ॥३४॥कीं रणीं पडतांचि नृपती ॥ देहलोभी रण टाकूनि पळती ॥ तेवीं दरिद्र येतां पुरुषाप्रती ॥ पिशुन करिती अपमान ॥३५॥हा कठीण काळ येतांचि देखा ॥ परम लज्जित झाला तुका ॥ प्रपंचीं कोणी न दिसे सखा ॥ मग चित्तीं विवेका आठविलें ॥३६॥कांहीं करितां उदीमाची हातवटी ॥ तंव तेथें अधिक होतसे तुटी ॥ हा कठीण काळ पडतां संकटीं ॥ अनुताप पोटीं उपजला ॥३७॥म्हणे प्रपंच लटिका मिथ्या माया ॥ नरदेह केवळ नाशवंत काया ॥ म्यां जन्म दवडिला वायां ॥ पंढरीराया विसरोनि ॥३८॥ढेंकुणांचे बाजे करितां शयन ॥ तेथें सुखनिद्रा न लागेचि जाण ॥ कीं विष कालवूनि रांधिलें अन्न ॥ तें उत्तम भोजन म्हणूं नये ॥३९॥तेवीं प्रपंचीं म्हणती विषयसुख ॥ ते केवळ म्हणावे अति मूर्ख ॥ जैसा वांझेचा पुत्र उपजतां देख ॥ वायांचि हरिख मानावा ॥४०॥ऐसा विवेक करूनि मानसीं ॥ वैराग्य जाहलें तुकयासी ॥ सुख दुःख दोनी मानूनि सरशीं ॥ भजन अहर्निसीं करीतसे ॥४१॥पांडुरंगाचें देऊळ पुरातन ॥ बहुतां दिवसांचें होतें जीर्ण ॥ निजांगें तें लिंपोनि जाण ॥ केलें सारवोन सोज्ज्वळ ॥४२॥सकळ साधनांमाजी श्रेष्ठ ॥ एकादशीव्रत वरिष्ठ ॥ तें आरंभूनियां एकनिष्ठ ॥ जागरण वरिष्ठ करावें ॥४३॥कीर्तन करावें निजमतें ॥ परी आधीं अभ्यासीं नव्हतें चित्त ॥ कोणी सप्रेम गाती संत ॥ धरावें ध्रुव त्यांमागें ॥४४॥मागील संत झाले श्रेष्ठ ॥ त्यांचीं वचनें केलीं पाठ ॥ त्याहूनि मार्गं नाहीं वरिष्ठ ॥ भाव एकनिष्ठ धरियेला ॥४५॥भूतमात्रासी देखोनि दृष्टीं ॥ त्यांची करुणा येतसे पोटीं ॥ त्यासी परोपकारें काया कष्टीं ॥ संतप्त पोटीं निववित ॥४६॥ते जरी म्हणाल कैसिया रीतीं ॥ सकळीक ऐका मथितार्थी ॥ कोणी प्रवासी पाहतां वस्ती ॥ त्यांसी मंदिराप्रति आणावें ॥४७॥क्षुधार्थियासी असल्या अन्न ॥ तरी घालावें त्यासी भोजन ॥ नसेल तरी कष्ट करून ॥ आणावें मेळवून त्यासाठीं ॥४८॥ कोणी तृषाक्रांत झालिया वनीं ॥ त्यासी नेऊनि पाजावें पाणी ॥ कोणी चालत आले दुरूनी ॥ त्यांसी रबडूनि निववावें ॥४९॥कोणाचे मस्तकीं असला भार ॥ तो आपण घ्यावा सत्वर ॥ तें ओझें वाहूनि पाठीवर ॥ विसांवा क्षणभर त्या द्यावा ॥५०॥कोणी रोगी प्रवासीं असला भार ॥ जवळी नसतां सुहृद आप्त ॥ त्यावरी होऊनि कृपावंत ॥ औषध देऊन पथ्य करवीं ॥५१॥गाईवृषभांसी निर्बळपणीं ॥ मोकलूनि देती निर्दय धनी ॥ ते निजकरें कुरवाळोनी ॥ चारा पाणी त्यांस द्यावें ॥५२॥ गृहासी येतां वैष्णवजन ॥ तयांसी घालूनि लोटांगण ॥ सद्भावें धुवोनियां चरण ॥ तीर्थ प्राशन करावें ॥५३॥हें शारीरतप करितां निश्चितीं ॥ यावरी जाहली कवित्वाची स्फूर्ती ॥ जे श्रुतिशास्त्रांनीं वर्णिली कीर्ती ॥ ते प्राकृतमतीं बोलत ॥५४॥येथील मागील निरूपणासरिसें ॥ दृष्टांतीं आलें अनायासें ॥ तें कथानक अतिसुरसें ॥ श्रोती सावकाशें परिसावें ॥५५॥एकदां नामा वैष्णवभक्त ॥ पांडुरंगासी वचन बोलत ॥ शतकोटि कवित्व प्राकृत ॥ तुझी कीर्ति वर्णीन मी ॥५६॥ऐकोनि म्हणे रुक्मिणीकांत ॥ नामया त्वां प्रतिज्ञा केली व्यर्थ ॥ कलीमाजी आयुष्य वर्षें शत ॥ त्यांतही आघात सर्वथा ॥५७॥आणी प्रतिज्ञा करूनि बोलसी आतां ॥ परी सिद्धीस न जाय हे सर्वथा ॥ मग नामदेव चरणीं ठेवूनि माथा ॥ रुक्मिणीकांता विनवित ॥५८॥मी तुझ्या आश्रयें बोलिलों देवा ॥ तो निजांगें पण सिद्धीस न्यावा ॥ तूं काय एक न करसी देवा ॥ आमुचा केवा तो किती ॥५९॥ऐकूनि नामयाचें करुणाउत्तर ॥ प्रसन्न जाहला शारंगधर ॥ मस्तकीं ठेवूनि अभयकर ॥ सरस्वतीस काय आज्ञापी ॥६०॥तुवां बैसोनि जिह्वाग्रीं ॥ कवित्व वदवावें अति कुसरी ॥ जे श्रुतीचे गर्भ आहेत अंतरीं ॥ ते प्राकृत वैखरी वदावे ॥६१॥मग ब्रह्मतनया करी विनवणी ॥ नामदेव वदतील प्रसादवाणी ॥ परी याचा चपळत्वें लिहिणार कोणे ॥ चक्रपाणी योजावा ॥६२॥मुखांतूनि निघतांचि अक्षरें ॥ तत्काळ लिहावीं निजकरें ॥ परतोनि पुसिल्या उत्तरें ॥ तरी नयेचि सर्वथा ॥६३॥यावरी म्हणे घननीळ ॥ मी लिहित बैसेन सर्वकाळ ॥ आणिक लेखक तों ये वेळ ॥ न दिसे चपळ सर्वथा ॥६४॥मग विलास भोग सर्व टाकूनी ॥ नामयाचें कवित्व चक्रपाणी ॥ हातीं घेऊनि दऊत लेखणी ॥ निजांगें लिहित बैसले ॥६५॥ज्याची वेदशास्त्रें करिती स्तुती ॥ व्यासवाल्मीकादि वर्णिती ॥ तो नामयाचें कवित्व लिही निश्चितीं ॥ नवल मजप्रती वाटलें ॥६६॥सांडोनियां वैकुंठभुवन ॥ सांडोनि क्षीरसागर शेषशयन ॥ हातीं घेऊनि दऊत लेखण ॥ जगज्जीवन तिष्ठती ॥६७॥काय निघेल मुखांतूनी ॥ तेथें अवधान देत चक्रपाणी ॥ निद्रा आळस सर्व टाकूनी ॥ असती निशिदिनीं सावध ॥६८॥ऐसे बहुत दिवस श्रीपती ॥ नामयाचे बैसोनि संगतीं ॥ तों कवित्वसंख्येची पाहतां गणती ॥ जाहली किती ऐका ते ॥६९॥चाळीस लक्ष चौर्याण्णव कोटी ॥ नवलक्ष लळित आलें शेवटीं ॥ इतुकी संख्या देखोनि दिठी ॥ जाहले जगजेठी विस्मित ॥७०॥म्हणती धन्य नामयाचा प्रेमा ॥ अद्भुत वर्णिला माझा महिमा ॥ सर्वथा पार न लागे निगमा ॥ त्या मज पुरुषोत्तमा वश केलें ॥७१॥ऐसें म्हणूनि जगजेठी ॥ निजकरें नामयाची पाठी थापटी ॥ म्हणे कांहीं प्रेमा राहिला पोटीं ॥ तो पुढें गोष्टीं वदवीन ॥७२॥आतां माझें स्वरूप आठवोनि मनीं ॥ सप्रेम पहा दृष्टी भरोनी ॥ ऐसें बोलतां चक्रपाणी ॥ नामा चरणीं लागला ॥७३॥त्वां शतकोटींचा केला पण ॥ तो सिद्धीसी न्यावया जगज्जीवन ॥ बाकी राहिलें कवित्वलेखन ॥ तें करीं संपूर्ण निजांगें ॥७४॥मग नामयाचा धरूनि हात ॥ तुकयाचें स्वप्नीं आले त्वरित ॥ म्हणे वाउगें न बोलावें निश्चित ॥ करावें कवित्व ममाज्ञा ॥७५॥प्रमाणाची संख्या शतकोटी ॥ ते सिद्धी पाववीं तूं शेवटीं ॥ ऐसें म्हणोनि जगजेठी ॥ पाठ थापटी निजकरें ॥७६॥जागृत होऊनि जंव पाहात ॥ तंव दृष्टीसी न दिसे रुक्मिणीकांत ॥ नामदेवही नाहीं तेथ ॥ चमत्कार अद्भुत देखिला ॥७७॥मग तेचि आज्ञा वंदोनि शिरीं ॥ आरंभिली कवित्वकुसरी ॥ त्याविण वाउगी वैखरी ॥ गोष्टी दुसरी न बोले ॥७८॥ कीर्तन करितां प्रेमेंकरूनी ॥ प्रासादिक रसिक वदे वाणी ॥ प्रेमळ भक्त आवडीकरूनी ॥ ऐकती श्रवणीं सद्भावें ॥७९॥कोणी विकल्पी जे विचक्षण ॥ ते म्हणती हें कवित्व नूतन ॥ आम्हांसी न वाटे प्रमाण ॥ न करूं श्रवण सर्वथा ॥८०॥मागील संतांचीं टाकूनि वचनें ॥ आपुलीं कासया दाविसी भूषणें ॥ आइतीं टाकोनि पक्वान्नें ॥ हात पोळवणें कासया ॥८१॥म्हणाल आज्ञाकर्ता रुक्मिणीरमण ॥ त्याचें कवित्व कां निंदिती जन ॥ तरी भाविकांपाठीं पुरातन ॥ विकल्पी असती बहुसाल ॥८२॥मागें त्रेतायुगीं वाल्मीकीन ॥ भविष्य केलें रामायण ॥ तेव्हांही होते अभक्त जन ॥ ते अप्रमाण मानिती ॥८३॥मग अवतार घेऊनि जानकीपती ॥ लीला दाविली तैशाचि रीतीं ॥ ते अनुभवासी येतां प्रचीती ॥ यथार्थ मानिती सकळिक ॥८४॥द्वापारीं बोलिले कवि व्यास ॥ परी कौरवांसी न वाटे विश्वास ॥ मग घडोनि आलिया अनायास ॥ धृतराष्ट्र संजयास नमस्कारी ॥८५॥एवं भावार्थियामागें विकल्पी नर ॥ लागले असती अपरंपार ॥ म्हणोनि तुकयाचे अभंग साचार ॥ निंदिती पाम निजमुखें ॥८६॥सूर्याचा प्रकाश देखोनि दृष्टी ॥ डुडुळ उगेचि जल्पती पोटीं ॥ कीं पूर्वेसी चंद्र येतां निकटी ॥ तस्करांसी भेटी नावडे ॥८७॥दातयाची ऐकोनि कीर्ती ॥ कृपण उगेचि त्या धिक्करिती ॥ कीं दिच्य औषधी चमकतां रातीं ॥ रोग तळमळती चित्तांत ॥८८॥पंडिताची देखोनि वक्तृता ॥ अजापाळ म्हणती हे बडबड वृथा ॥ कीं गंधर्व सुस्वर गायन करितां ॥ तेथें गर्दभ भुंकतां न राहती ॥८९॥बकुळीचा सुगंध येतां पाहे ॥ तो पुंगळवेलीस मानेल काये ॥ सुंदर कपिला असली गाय ॥ तरी यवन काय पूजिती ॥९०॥ब्राह्मण प्रतिमेची पूजा करिती ॥ आणि अविंध तिये फोडूं पाहाती ॥ तेवी भाविक तुकयाचें कीर्तन ऐकती ॥ विकल्पी निंदिती निजमुखें ॥९१॥परी दोनी मानून तै समान ॥ करीतसे तो श्रीहरिभजन ॥ कोणी हरिदास करितां कीर्तन ॥ तरी सादर श्रवणीं ऐकावें ॥९२॥दिवसेंदिवस अधिकचि प्रीतीं ॥ या नांवें चढती वाढती भक्ती ॥ निद्रा किंचित न लागे रातीं ॥ करितां एकांती हरिभजन ॥९३॥आषाढी कार्तिकी पंढरीसी ॥ नेमें वारी धरिली ऐशी ॥ मग पंधरा दिवशीं एकादशीसी ॥ जाय दर्शनासी निजभावें ॥९४॥निरपेक्षिता तरी किती ॥ एके दिवसीं शिवाजी नृपती ॥ तुकोबाची ऐकूनि कीर्ती ॥ दर्शनाप्रति पातले ॥९५॥तेथें अविंधांचें प्राबल्य थोर ॥ सिंहगडीं होता नृपवर ॥ कोणासी न कळतां साचार ॥ पुण्यासी सत्वर पातला ॥९६॥तेथें एका वाणियाचें घरीं ॥ तुका वैष्णव कीर्तन करी ॥ राजयासी कळतां सत्वरी ॥ संतोष अंतरीं वाटला ॥९७॥मग निशीमाजी कोणा न कळत ॥ लपोनि आले नगरांत ॥ यवनांचें भय वाटे बहुत ॥ कीं नेती त्वरित धरूनि ॥९८॥तुकोबाचें घेऊन दर्शन ॥ गडावरी जावें परतोन ॥ ऐसा मनीं हेत धरून ॥ आला लपोन नृपनाथ ॥९९॥रुप्याचें तबक सोज्ज्वळ जाण ॥ तयांत घातल्या मोहरा होन ॥ तुकयापुढें द्रव्य ठेवून ॥ केलें नमन साष्टांग ॥१००॥तें राजद्रव्य देखोनि त्वरित ॥ थरथरां कांपे विष्णुभक्त ॥ मग शिवाजीसी काय बोलत ॥ तें परिसा संट भाविक हो ॥१॥कासया पाहिजे द्रव्यठेवा ॥ एक विठ्ठलचि आम्हांसी व्हावा ॥ त्याविण आणिक प्रपंचहेवा ॥ आमुच्या जीवा नावडे ॥२॥जैशा जोहारियाच्या साटोवाटी ॥ गारा आणिल्या उठाउठीं ॥ तेवीं आमुची घ्यावया भेटी ॥ कनकओंटी आणिली ॥३॥तुझी विशाळ ऐकतों मती ॥ आजि उदारत्व कळलें नृपती ॥ आम्हां वैष्णवांसी नावडे चित्तीं ॥ तें पुढें निजप्रीतीं ठेविलें ॥४॥तुवां आणिलें द्रव्य होन ॥ हें आम्हां गोमांसासमान ॥ ऐसें ऐकोनि निर्वाणवचन ॥ लज्जित मनीं नृपनाथ ॥५॥पुढती रायासी बोले वचन ॥ आमचें व्हावें समाधान ॥ ऐसें इच्छित असेल तुझें मन ॥ तरी ते ऐकें खूण सांगतों ॥६॥तुम्हीं करावें विठ्ठलनामस्मरण ॥ तेणेंचि आम्ही सुखसंपन्न ॥ येर संपत्ति देशील धन ॥ तें मृत्तिकेसमान नृपनाथा ॥७॥गळ्यांत कंठी मिरवा तुळसी ॥ व्रत करावें एकादशी ॥ तेणेंचि समाधान आम्हांसी ॥ द्रव्यराशी न घेतां ॥८॥चित्तीं धरूनि प्रेम उल्हास ॥ म्हणावें विठोबाचा दास ॥ हेचि आमुची आहे आस ॥ पुरवा सावकाश धणीवरी ॥९॥ ऐसी निरपेक्ष देखोनि स्थिती ॥ मनांत आश्चर्य करी नृपती ॥ मग अनन्यभावें लोटांगण प्रीतीं ॥ नृपें मागुती घातलें ॥११०॥ते दिवसीं असे हरिदिनी ॥ कीर्तन ऐके प्रेमेंकरूनी ॥ तों दोन सहस्र पठाण चाकणाहूनी ॥ अविंधें त्वरित पाठविले ॥११॥हेर ठेविले होते पाळती ॥ त्यांनीं सांगितलें यवनांप्रती ॥ कीं पुण्यासी आला नृपती ॥ दर्शनासी रातीं तुकयाचें ॥१२॥मग स्वार पाठविले त्या दुर्जनीं ॥ कीं त्यासी आणावें शीघ्र धरूनी ॥ नानापरींचीं शस्त्रें घेऊनी ॥ आले धावूनि अर्धरात्रीं ॥१३॥जेथें मांडिली होती कथा ॥ तो वाडा वेढिला सभोंवता ॥ आंतील मनुष्य बाहेर निघतां ॥ ते जाऊं सर्वथा न देती ॥१४॥म्हणती शिवाजीसी ओळखोनि सत्वर ॥ बांधोनि आणावें बाहेर ॥ रायासी कळला समाचार ॥ कीं वेढिलें मंदिर परचक्रें ॥१५॥कोणी म्हणती नृपवरासी ॥ आतां उठोनि पळा वेगेंसीं ॥ तेणें भय उपजलें मानसीं ॥ विचार तयासी पडियेला ॥१६॥देखोनि श्रोतयांचें दुश्चित चित्त ॥ तुकयासी कळला वृत्तांत ॥ म्हणें काय गुजगुज करितां मनांत ॥ सांगा त्वरित मजपासीं ॥१७॥ऐकोनि तुकयाचें वचन ॥ हळूचि सांगती सज्ञानी जन ॥ कीं राजयासी न्यावयाकारण ॥ परचक्र दारुण पातलें ॥१८॥ म्हणोनि आतां सत्वरगती ॥ येथोनि पळवावा नृपती ॥ आज्ञा द्याल आम्हांप्रती ॥ तरीच वांचती प्राण याचे ॥१९॥तयांसी तुका बोले काय ॥ कीर्तनांतूनि सर्वथा उठों नये ॥ धर्मनीति तों ऐसी आहे ॥ नेणतां काय सकळिक ॥१२०॥ऐसें ऐकोनि नृपती ॥ निश्चय करूनि बैसला एकचित्तीं ॥ म्हणे तारिता मारिता रुक्मिणीपती ॥ त्याविण त्रिजगतीं असेना ॥२१॥आजि एकादशी पर्वकाळ सुदिन ॥ संनिध संत वैष्णवजन ॥ येथें कीर्तनांत आले जरी मरण ॥ तरी भाग्य धन्य पैं माझें ॥२२॥इकडे बाहेरी परदळ विचार करिती ॥ कीं धरूनि आणावा सत्वर नृपती ॥ वाड्यांत हेर उदंड येती ॥ परी कोणीच नोळखती रायासी ॥२३॥यवनासी सांगती जाऊन ॥ कीर्तनीं बैसले बहुत जन ॥ तयांत शिवाजी आहे कोण ॥ आम्हांकारण कळेना ॥२४॥ऐकोनि पायिकांचें वचन ॥ क्रोधें संतापला तो दुर्जन ॥ म्हणे कथेत बैसले जितुके जन ॥ तितुकें मारून टाकावे ॥२५॥त्यांत सहजचि राजा सांपडला ॥ ऐसा निश्चय दृढ केला ॥ तों अंतरसाक्ष तुकयाला ॥ वृत्तांत कळला ते समयीं ॥२६॥मग ध्यानांत आणोनि पंढरीनाथ ॥ नामापरींची करुणा भाकीत ॥ जय जय अनाथनाथ कृपावंट ॥ धांवें सत्वर ये समयी ॥२७॥तुझ्या कीर्तनासी आले सज्जन ॥ तयांसी तत्काळ ओढवलें विघ्न ॥ आतां हें अरिष्ट निवारण ॥ तुजविण कोण करील ॥२८॥जेथें तुझें नामसंकीर्तन ॥ तेथून विघ्नें जाती पळोन ॥ ऐसें संत बोलिले वचन ॥ तें असत्य होऊन आलें कीं ॥२९॥माझें चित्त पाहासी जगज्जीवना ॥ परी मी भीत नाहीं आपुल्या मरणा ॥ परी दुःख होईल संतसज्जनां ॥ तें माझिया नयना न देखवे ॥१३०॥आमुची जातिपरंपरा ऐसी ॥ रुक्मिणीपती तूं काय नेणसी ॥ विक्षेप झाला जो भजनासी ॥ याहूनि मरण आम्हांसी कोणतें ॥३१॥ऐसें ऐकोनि करुणावचन ॥ तत्काळ आले जगज्जीवन ॥ तुकयासी देऊनि आलिंगन ॥ म्हणे त्वां कीर्तन करावें ॥३२॥परचक्र आलें महाविघ्न ॥ तें मी निजांगें करितों निवारण ॥ तूं स्वस्थ करूनि आपुलें मन ॥ सप्रेम भजन करावें ॥३३॥ऐसें म्हणोनि घनसांवळा ॥ शिवाजी राजा आपण जाहला ॥ अश्वारूढ होऊनि ते वेळां ॥ सत्वर चालिला बाहेरी ॥३४॥कीर्तनीं बैसले लोक समस्त ॥ तयांसी न कळतां हा वृत्तांत ॥ कौतुक मांडिलें अत्यद्भुत ॥ तें परिसा निजभक्त भाविक हो ॥३५॥ज्या वाडियांत होतें हरिकीर्तन ॥ तेथें अकस्मात प्रकटले जगज्जीवन ॥ आपणचि स्वमुखें हांक मारून ॥ म्हणे जातो पळून नृपनाथ ॥३६॥दोनसहस्र पठाणीं वेढोनि वाडा ॥ घातला होतां त्यांनीं गराडा ॥ तितकेही होऊनि मागांपुढां ॥ पाहाती रोकडा नृपनाथ ॥३७॥क्षण एक पडोनि तयांचे दिठीं ॥ चपळत्वें चालिले उठाउठीं ॥ सैन्य लावूनि आपुले पाठीं ॥ लाघव जगजेठी दावित ॥३८॥नगरवासी लोक समस्त ॥ जागृत होऊनि अति त्वरित ॥ माड्या माळवदीं उभे राहात ॥ काय बोलत परस्परें ॥३९॥राजा पुढें जातो पळोन ॥ तयामागें लागले यवन ॥ आतां न वांचतील त्याचे प्राण ॥ अनर्थ होईल दिसताहे ॥१४०॥अविंधाच्या सैन्यांतून ॥ पाळती हेर जे ठेविले जाण ॥ त्यांसी दिसे जगज्जीवन ॥ जैसा नृपवर शिवाजी ॥४१॥एक म्हणती धरा धरा ॥ राजा पळोन जातो खरा ॥ हडबड झाली महावीरां ॥ म्हणोनि सत्वरा धांवती ॥४२॥एकाजवळीच दिसे पाहीं ॥ धरूं जातां कांहींच नाहीं ॥ एक म्हणती पळोनि कायी ॥ आतांच लवलाहीं मारावा ॥४३॥एक म्हणती घाला वेढा ॥ काय पाहतां रे मागांपुढां ॥ एक म्हणती तुम्हां भ्याडां ॥ वीर रोकडा धरवेना ॥४४॥आपण दोन सहस्र शूर ॥ इतक्यांतूनि पळतो एकला वीर ॥ कासया वागवितां हतियार ॥ प्राण सत्वर द्याना कां ॥४५॥एक म्हणती उगवेल दिवस ॥ मग राजयास धरूं सावकाश ॥ आतां आमुचे डोळां न दिसे ॥ व्यर्थ कासावीस कां होतां ॥४६॥क्षण एक ठायीं राहिले स्थिर ॥ तांव कौतुक करी शारंगधर ॥ आपण प्रकट झाले सत्वर ॥ म्हणती धरा रे सांपडला ॥४७॥मागुती सकळ लागले पाठी ॥ तरी तयांसी नातुडे जगजेठी ॥ क्षण एक संनिध पडोनि दृष्टी ॥ धरितां निकटीं आतुडेना ॥४८॥मग शुक्लपक्षींचें पडिलें चांदण ॥ त्या प्रकाशें धांवती यवन ॥ प्रहररात्रींत पांच योजन ॥ अरण्यांत नेऊन घातले ॥४९॥ज्या डोंगरीं लागलें कंटकवन ॥ महाभयानक ओसाड अरण्य ॥ त्या स्थळाप्रति नेऊनि सैन्य ॥ मग जगज्जीवन परतले ॥१५०॥तेथें सकळ वीर सभोंवतें पाहाती ॥ तों कोठेंचि न दिसे शिवाजी नृपती ॥ म्हणती आपुल्यास पडली भ्रांती ॥ धांवलों रातीं व्यर्थचि ॥५१॥एक म्हणती तरळली दृष्टी ॥ तेणें वायांचि झालों कष्टी ॥ एक म्हणती सन्निध स्पष्टी ॥ आम्ही तंव दृष्टी देखिला ॥५२॥परतोनि चालिले मागुती ॥ तंव मावळोनि गेला निशापती ॥ अंधारीं कांहींच न दिसे रातीं ॥ मार्ग निश्चितीं सांपडेना ॥५३॥एकापुढें एक अश्व हांकिती ॥ अडखळोनि तेचि ठायीं पडती ॥ येरयेरांसी काय बोलती ॥ बरवी गति दिसेना ॥५४॥अंगासी लागतां काटवण ॥ तेणें वस्त्रें गेलीं फाटून ॥ एक दीर्घस्वरें करिती रुदन ॥ जातील प्राण म्हणोनि ॥५५॥हिंव सुटलें अति प्रबळ ॥ तेणेंचि सैन्य झालें विकळ ॥ ओसाड अरण्यांत करिती तळमळ ॥ अश्व तंव सकळ पळाले ॥५६॥अद्भुत केलें जगज्जीवनें ॥ कोणासी न मारितां जीवेंप्राणें ॥ नागडे फिरती यवन ॥ आली नागवण सकळांसी ॥५७॥शस्त्रें हातींचीं पडलीं सत्वरी ॥ अश्व तों जाहले रानभरी ॥ कांटवणीं राहिलीं वस्त्रें दूरी ॥ केले भिकारी सकळिक ॥५८॥ऐसा दुर्जनांसी दंड करूनी ॥ परतोनि आले चक्रपाणी ॥ तुकयाचें कीर्तनीं येऊनी ॥ प्रेमरंगणीं नाचती ॥५९॥श्रवणासी बैसले लोक समस्त ॥ तयांसी न कळतां हा वृत्तांत ॥ विघ्न टाळीत पंढरीनाथ ॥ माव अघटित करूनियां ॥१६०॥तुकयाचे कानीं जगज्जीवन ॥ येऊनि सांगे वर्तमान ॥ आतां निर्भय करून मन ॥ करावें कीर्तन आवडी ॥६१॥मग जयजयकारें पिटोनि टाळी ॥ हरिनामें गर्जती सकळ मंडळी ॥ वैष्णव नाचती कीर्तनमेळीं ॥ तुष्टला वनमाळी म्हणोनि ॥६२॥रायासी सांगती सकळ जन ॥ परचक्र आले होतें दारुण ॥ तयाचें न करितां निवारण ॥ गेलें पळोन आपोआप ॥६३॥आश्चर्य करी नृपवर ॥ म्हणे मज पावला रुक्मिणीवर ॥ अरिष्ट आलें होतें थोर ॥ आम्हां अनिवार सकळांसी ॥६४॥यापरी मानूनि समाधान ॥ श्रवण करिती हरिकीर्तन ॥ चार प्रहर झालें जागरण ॥ तों उदयासी अरुण पातला ॥६५॥मग उजळोनि मंगळारती ॥ ओंवाळिला रुक्मिणीपती ॥ हरिनामें गर्जोनि क्षितीं ॥ दंडवत प्रीतीं घातलें ॥६६॥बिर्हाडासी हातां नृपनाथ ॥ ग्रामांत नरनारी काय बोलत ॥ तुम्हांऐसाचि रात्रीं पळत ॥ गेला त्वरित नगरांतूनि ॥६७॥हें यवनांनीं देखोनि दृष्टी ॥ पळतचि गेले त्याचिया पाठीं ॥ कैसे वांचलेत संकटीं ॥ आश्चर्य पोटीं वाटतें ॥६८॥राजा चमत्कारला मनीं ॥ म्हणे ईश्वराची अघटित करणी ॥ वांचविलें अरिष्टापासोनि ॥ चक्रपाणी कृपाळें ॥६९॥एके दिवसीं शिवाजी नृपती ॥ विचार करीं आपुलें चित्तीं ॥ तुकोबासी देतां धनसंपत्ती ॥ परीं ते न घेती सर्वथा ॥१७०॥परी दीनरूप धरूनि आपण ॥ नेऊनि द्यावें त्याचें घरीं धान्य ॥ येरवीं तों माझें राजान्न ॥ तें तो न घेचि सर्वथा ॥७१॥ऐसी युक्ती योजूनि जाण ॥ वस्त्रें नेसला फाटकीं जीर्ण ॥ वृषभावरी धान्य दोन मण ॥ चालिला घेऊन तेधवां ॥७२॥दोन घटिका लोटतां यामिनी ॥ तुकोबाचिया पातला सदनीं ॥ तों ते बैसले होते वृंदावनीं ॥ हातीं स्मरणी घेऊनियां ॥७३॥तों राजा येऊनियां सत्वरी ॥ गोणे लोटोनि टाकिली द्वारीं ॥ म्हणे स्वामी म्यां करूनि मजुरी ॥ धान्य मेळवूनि आणिलें ॥७४॥तुमचे चरणीं दह्रूनि हेत ॥ येथें घेऊनि आलों किंचित ॥ मी अनाथ दीन आहें बहुत ॥ हें सांठवा गृहांत आपुल्या ॥७५॥मग नमन करूनि सत्वरीं ॥ राजा गेला ते अवसरीं ॥ तुकयासी कळलें निजअंतरीं ॥ कृत्रिम परी म्हणोनियां ॥७६॥म्हणे ओळख सांगतां रायाकारण ॥ त्याचें प्रेमाचें होईल खंडन ॥ म्हणोनि उगेंचि धरून मौन ॥ नामस्मरण करितसे ॥७७॥मग निजकांतेप्रति बोलत ॥ धान्य आणिलें तों नृपनाथें त्वरित ॥ गृहांत ठेविलें जरी समस्त ॥ तरी खंडेल सुकृत आपुलें ॥७८॥जरी एका दिवसापुरतें अन्न ॥ निजकरें घेसील त्यांतून ॥ वरकड द्विजांसी बोलावून ॥ त्यांजकारणें अर्पावें ॥७९॥ऐसी ऐकोनियां गोष्टी ॥ कांता सक्रोध जाहली पोटीं ॥ आपुल्या करें ललाट पिटी ॥ म्हणे मी करंटी अभाग्य ॥१८०॥अवचित गोणी आली घरा ॥ तें धान्य खाऊं नेदीच पोरां ॥ वांटिली गांवींचिया द्विजवरां ॥ म्यां काय संसारा करावें ॥८१॥यावरी कांतेसी उत्तर देत ॥ जैसें आपुलें आहे संचित ॥ तो वांटा टाकोनि निश्चित ॥ घ्यावें बहुत कोठोनि ॥८२॥एके दिवसीं देवालयांत ॥ तुकोबा आनंदें कीर्तन करीत ॥ तों नवल वर्तलें अद्भुत ॥ तें परिसा चरित्र भाविक हो ॥८३॥टाळ मृदंग वाजविती सुस्वर ॥ तेणें नादें कोंदलें अंबर ॥ तटस्थ होऊनि नारीनर ॥ ऐकती सादर हरिलीला ॥८४॥तेथें एक कांसार भाविक सज्जन ॥ ऐकावया येतसे कीर्तन ॥ त्याचिया मुलास व्यथा दारुण ॥ होताती प्राण कासाविस ॥८५॥कांता म्हणे तयासी ॥ आजि तुम्हीं न जावें हरिकीर्तनासी ॥ तेणें नायकोनि तिचें वचनासी ॥ गेला कीर्तनासी सत्वर ॥८६॥तों मागें लेंकुराचे जातां प्राण ॥ माता दीर्घस्वरें करी रुदन ॥ तैसेंच प्रेत खांद्यावरी घेऊन ॥ कीर्तनांत आणोन टाकिलें ॥८७॥कांसारीण म्हणे तुकोबासी ॥ त्वां आमची पाठ घेतली कैसी ॥ वेड लावूनि भ्रतारासी ॥ मायालोभासी सांडविलें ॥८८॥तुझी कथा ऐकिलियानें ॥ माझे बाळकाचे गेले प्राण ॥ आमचें गह्रीं पूर्वींपासून ॥ नाहीं धारजिण हरिनाम ॥८९॥ऐसें बोलोनि उद्धत ॥ कीर्तनरंगीं ठेविलें प्रेत ॥ तेणें श्रोतयांचें दुखवोनि चित्त ॥ राहिले निवांत अवघेचि ॥१९०॥जैसें भणंग पक्वान्न जेवित ॥ त्यांत मृत्तिका पडली अकस्मात ॥ तेवीं कीर्तनामाजी आणितां प्रेत ॥ रंग समस्त वितुळला ॥९१॥लोक म्हणती ऐक कांसारिणी ॥ तूं येथें कुणप आलीस घालूनी ॥ परी याजपासीं नाहीं मृतसंजीवनी ॥ मग लेंकरूं उठवूनि देईल ॥९२॥ऐसें बोलतां सकळ लोकां ॥ प्रतिउत्तर देतसे तुका ॥ हरिनामापरिस सुधारस फिका ॥ जो इंद्रादिकां दुर्लभ ॥९३॥विश्वास न मानी तुमचा जीव ॥ तरी तत्काळ पाहा याचा अनुभव ॥ ऐसें म्हणोनि भक्त वैष्णव ॥ अपूर्व लाघव दाविलें ॥९४॥श्रोतयांसी म्हणे तये क्षणीं ॥ विठ्ठल विठ्ठल वदा वाणीं ॥ हेचि अमृतसंजीवनी ॥ विकल्प मनीं न धरावा ॥९५॥ऐसें बोलतां सभारंगणीं ॥ विठ्ठलनामाच्या उठल्या ध्वनी ॥ नादें ब्रह्म मुसावोनि ॥ गगन भरोनि कोंदलें ॥९६॥मंडप तिवाशा गालिचे ॥ विठ्ठलनाम गर्जती वाचे ॥ खडे पाषाण ते भूमीचे ॥ बोलती वाचे हरिनाम ॥९७॥दिंड्या पताका टाळांतूनी ॥ विठ्ठलनामाच्या निघती ध्वनी ॥ तेव्हां सुरवर आकाशीं येउनी ॥ तो आनंद नयनीं पाहाती ॥९८॥ जाणते नेणते थोर लहान ॥ विठ्ठल म्हणती प्रेमेंकरून ॥ भाळे भोळे सकळ जन ॥ प्रेमेंकरून डुल्लती ॥९९॥एकमेकांकडे लोक पाहाती ॥ तंव अवघ्या दिसती विठ्ठलमूर्ती ॥ याती वर्ण वेगळे न दिसती ॥ अद्भुत स्थिती बाणली ॥२००॥तंव अद्भुत नवल वर्तलें तेथ ॥ प्रेत उठोनि बैसलें सावचित्त ॥ मग सावध म्हणती लोक समस्त ॥ देखतां विस्मित ते जाहले ॥१॥सन्निध होती त्याची माता ॥ संतोष वाटला तिचिया चित्ता ॥ म्हणे मी अज्ञानपणें नेणतां ॥ निंदिलें वृथा तुकयासी ॥२॥कौतुक देखिलें सकळ जनीं ॥ विश्वास बैसला त्यांचें मनीं ॥ म्हणती अमृतसंजीवनी ॥ हरिनामाहूनि असेना ॥३॥पुढिले अध्यायीं कथा सुंदर ॥ वदविता श्रीरुक्मिणीवर ॥ महीपतीसी देवोनि अभयकर ॥ बैसविलें अंतर निजकृपें ॥४॥स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ अष्टचत्वारिंशाध्याय रसाळ हा ॥२०५॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगार्पणमस्तु ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ श्रीरस्तु ॥ ॥ ॥ ॥ ॥ ॥ ॥श्रीभक्तविजय अष्टचत्वारिंशाध्याय समाप्त N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP