मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीभक्तविजय| अध्याय ३७ श्रीभक्तविजय ॥ मंगलाचरणम् ॥ आरती श्रीविठ्ठलाची युगें ... अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ३७ संतकवी महीपतीबोवा ताहराबादकर विरचित Tags : bhakta vijaymahipatipuranपुराणभक्त विजयमराठीमहिपती अध्याय ३७ Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः ॥ श्रीरुक्मिणीवल्लभाय नमः ॥ श्री भीमातीरवासी रुक्मिणीकांता ॥ तूं निजबुद्धीचा प्रकाशिता ॥ तुजविण आणिक अनंता ॥ वक्ता वदविता नसेचि ॥१॥जैसें वृक्षासी कारण मूळ ॥ कीं धान्य पिकवित एक जळ ॥ तेवीं भक्तकथा अति रसाळ ॥ तूं घननीळ वदविसी ॥२॥नातरी जलचरांसी कारण उदधी ॥ कीं उडुगणांसी असे आकाशसंधीं ॥ तेवीं माझी अत्यंत मंदबुद्धी ॥ तूं कृपानिधी प्रकाशिता ॥३॥कीं सूत्रधारी धरून दोरी ॥ बाहुल्यानाचवी सभेभीतरीं ॥ तेवीं तूं रिघोनी हृदयमंदिरीं ॥ निजभक्तथोरी वर्णविसी ॥४॥तुझे न वर्णितां गुण ॥ उदंड कवित्व केलें लेखन ॥ तरी व्यर्थ वाचेसी आणिला शीण ॥ ऐसें दिसोन येतसे ॥५॥म्हणोनियां पुढतपुढती ॥ तुज प्रार्थितसें श्रीपती ॥ सप्रेम चित्तें महीपती ॥ मागे ग्रंथ वदावया ॥६॥मागिले अध्यायीं निरूपण ॥ सुरदास भक्त मदनमोहन ॥ त्याचें चरित्र अति गहन ॥ केलें श्रवण सकळिकीं ॥७॥आतां रसिकमुरार भक्त थोर ॥ तो संतसेवेसी अति तत्पर ॥ मथुराप्रांतीं साय नगर ॥ तेथें निरंतर वसतसे ॥८॥यमुनातीरीं करूनि स्नान ॥ त्यावरी करी श्रीकृष्णपूजन ॥ षोडशोपचार साहित्य करून ॥ पुष्पें तुळसी अर्पीतसे ॥९॥मग बोलावून वैष्णवजन ॥ स्वहस्तें करी चरणक्षालन ॥ तें तीर्थ निजमुखीं घेऊन ॥ मग संतपूजन करीतसे ॥१०॥नानापरींचीं पक्वान्नें करून ॥ नित्य संतांसी घाली भोजन ॥ संतमूर्ति विष्णुसमान ॥ मानित मनें निजप्रीतीं ॥११॥शिष्यसंप्रदायी केले बहुत ॥ ते साहित्य करिती नित्यनित्य ॥ आपण एकांतीं बैसोनि निवांत ॥ भजन करीत सप्रेम ॥१२॥तंव कोणे एके दिवसीं ॥ वैष्णव आले मंदिरासी ॥ मग तृणासनें सकळांसी ॥ बैसावयासी दिधलीं ॥१३॥ शिष्यासी सांगे ते अवसरीं ॥ संतपूजन करावें सत्वरीं ॥ तीर्थ आणून आपुले करीं ॥ द्यावें झडकरीं मजलागीं ॥१४॥आज्ञा होतांचि ते समयीं ॥ संतपूजेसी चालिला पाहीं ॥ आळस विकल्प धरूनि देहीं ॥ चरण लवलाहीं धूतसे ॥१५॥तंव एक कोडी कुश्चळ ब्राह्मण ॥ पाय फुटके अति मलिन ॥ वस्त्र फाटकें बहुत जीर्ण ॥ अमंगळवाणें नेसला ॥१६॥तो दृष्टीं देखतांचि जाण ॥ चिळसलें त्याचें तत्काळ मन ॥ म्हणे याचे धुवोन घेतां चरण ॥ होईल वमन तत्काळ ॥१७॥जे सज्ञान शुचिर्भूत दिसती ॥ त्यांचे चरण धूतसे प्रीतीं ॥ पूजा करूनि यथापद्धती ॥ केली आरती संतांसी ॥१८॥चरणतीर्थ घेऊनि सत्वरी ॥ सद्गुरूसी दिधलें त्या अवसरीं ॥ मग मुरारदास झडकरी ॥ प्राशन करी तेधवां ॥१९॥तेव्हां सकळ संप्रदायी बोलावून ॥ त्यांस सांगे जीवींची खूण ॥ आजिचें तीर्थ केलें प्राशन ॥ परी त्याजकारण चवी नाहीं ॥२०॥कोणी संशय चित्तीं धरून ॥ घेतलें असेल तीर्थ जाण ॥ मजला कळली अंतरखूण ॥ ऐसें वचन बोलिला ॥२१॥आजि फिकें लागलें चरणामृत ॥ ऐसें व्हावया काय निमित्त ॥ विचार करून तुम्ही समस्त ॥ सांगा त्वरित मजपासीं ॥२२॥ऐकोनि सद्गुरूची वाणी ॥ सकळांसी विचार पडिला मनीं ॥ त्यांत जो लागला होता संतपूजनीं ॥ तो आपुलें मनीं चमत्कारला ॥२३॥मग पुढें होऊनि सत्वर ॥ उभा ठाकला त्यासमोर ॥ जोडोनियां दोन्ही कर ॥ वृत्तांत साचार सांगतसे ॥२४॥म्हणे ऐका स्वामी यथार्थ वचन ॥ मी करीत होतों संतपूजन ॥ त्यांत एक कोडी कुश्चळ ब्राह्मण ॥ देखोनि मन कंटाळलें ॥२५॥मानसीं चिळस वाटली फार ॥ मग त्याचा करूनि अव्हेर ॥ सकळ पूजोनि वैष्णववीर ॥ आलों सत्वर स्वामिया ॥२६॥मग मुरारस्वामी तये वेळीं ॥ तत्काळ गेला त्याजवळी ॥ नमस्कार घालोनि भूमंडळीं ॥ चरण प्रक्षाली निजकरें ॥२७॥स्वहस्त्रें पुसोनियां चरण ॥ हृदयीं धरिला प्रेमेंकरून ॥ चरणांगुष्ठ नेत्रांसी लावून ॥ तीर्थ प्राशिलें आवडी ॥२८॥म्हणे आतां तीर्थासी लागली चव ॥ ऐकोनि आश्चर्य करिती वैष्णव ॥ म्हणती मुरारस्वामीचा भाव ॥ न कळे स्वयमेव कोणासी ॥२९॥ऐसें गुरुकृपेचें महिमान ॥ एक सच्छिष्य जाणे खूण ॥ कीं चंद्रामृताचा अनुभव पूर्ण ॥ चातकां धडून येतसे ॥३०॥कां निजपतीच्या मनोगता ॥ जाणे एक ते पतिव्रता ॥ नातरी प्रेमळ भक्तांची ऐकतां कथा ॥ अनुभव विरक्तां जाणवे ॥३१॥कां कमलपुष्पांचा स्वाद ॥ अनुभवें जाणता एक मिलिंद ॥ कीं गायत्रीचा महिमा अगाध ॥ गाधिसुत जाणतसे ॥३२॥कीं श्रीरामनामाची प्रचीत ॥ जाणतसे एक कैलासनाथ ॥ कीं भागवतधर्ममहिमा अद्भुत ॥ विष्णुभक्त जाणती ॥३३॥तेवीं संततीर्थींची निजगोडी ॥ मुरारस्वामीसी कळली फुडी ॥ याजऐसी आणिका आवडी ॥ न लागे चोखडी सर्वथा ॥३४॥ऐसें म्हणूनि वैष्णवभक्त ॥ मस्तकीं ठेविती वरदहस्त ॥ म्हणती तुज साह्य श्रीकृष्णनाथ ॥ होईल त्वरित निजनिष्ठें ॥३५॥भाव धरूनि संतचरणीं ॥ तीर्थस्वाद कळला मनीं ॥ रसिकमुरार तैंपासूनी ॥ नाम सकळांनीं ठेविलें ॥३६॥त्याचा गुरु दयार्णव जाण ॥ तो ब्रह्मज्ञानीं अति निपुण ॥ अर्चन पूजन यथाविधीन ॥ करीतसे जाण निजप्रीतीं ॥३७॥गंडकीशिळेची मूर्ति सुंदर ॥ तिजला पूजोनि षोडशोपचार ॥ वस्त्रें भूषणें अलंकार ॥ लेववी साचार निजभावें ॥३८॥तेथें एक राजा दर्शनासी येऊन ॥ पूजा देखोनि संतुष्टमन ॥ चार ग्राम तयालागून ॥ दिधले लिहून तेधवां ॥३९॥दयार्णवासी म्हणे नृपनाथ ॥ हे ग्राम पूजार्थ दिधले तुम्हातें ॥ याचें द्रव्य उकळोनि समस्त ॥ साधुसंत पूजावे ॥४०॥ऐसें बोलोनि सत्वरीं ॥ राजा गेला आपुलें नगरीं ॥ दयार्णव निजअंतरीं ॥ आश्चर्य करी तेधवां ॥४१॥म्हणे आपुले पूजेसी त्वरित ॥ उपाय करी श्रीकृष्णनाथ ॥ यापरी संतोष मानूनि मनांत ॥ अर्चन करीत हरीचें ॥४२॥बहुत दिवस चालिलें व्रत ॥ तों विघ्न ओढवलें अकस्मात ॥ एक दुष्ट होता उन्मत्त ॥ आला अवचित त्या ग्रामा ॥४३॥द्रव्य देऊनि राजद्वारा ॥ केला देशींचा इजारा ॥ सदना घेऊनि सत्वरा ॥ वैष्णवनगरा पैं आला ॥४४॥दयार्णवाची जहागीर ऐकून ॥ जप्त करी तो दुर्जन ॥ जेवीं धर्माचें राज्य दुर्योधन ॥ घेत हिरून पापिष्ठ ॥४५॥उदंड सांगती धर्मनीती ॥ परी कोणाचें न ऐके तो कुमती ॥ मायालोभानेम पडली भ्रांती ॥ अधोगति जावया ॥४६॥कृपणासी नावडे धर्मवार्ता ॥ अभक्तासी नावडे हरिकथा ॥ व्यभिचारिणीसी निजभर्ता ॥ दृष्टीं देखतां कष्ट होती ॥४७॥तया रीतीं तो दुर्जन ॥ नायके कोणाचेंही वचन ॥ म्हणे वैरागियासी ग्राम कोण ॥ व्यर्थ लिहून दिधला ॥४८॥ऐकोनि अभक्ताची वाणी ॥ दयार्णव विचार करी मनीं ॥ रसिकमुरारास ते क्षणीं ॥ पत्र लिहून पाठविलें ॥४९॥म्हणे जेवीत असलासी जरी तेथ ॥ तरी तैसेंच टाकूनि यावें येथ ॥ ऐसें लिहून सद्गुरुनाथ ॥ वाट पाहात राहिले ॥५०॥तों रसिकमुरार ते अवसरीं ॥ जेवीत बैसला आपुलें घरीं ॥ तों मनुष्य पत्र घेऊनि सत्वरीं ॥ आला झडकरी लवलाहें ॥५१॥सद्गुरूचा मनुष्य पाहतां दृष्टीं ॥ परम संतोष पावला पोटीं ॥ जेवीं सुकत्या झाडा अति नेहटी ॥ मेघवृष्टि जाहली ॥५२॥कीं सासुरवाणिसीस माहेराहून ॥ मायेनें मूळ पाठविलें जाण ॥ तैशा रीतीं उल्हासोन ॥ वर्तमान पुसतसे ॥५३॥म्हणे काय आज्ञा सद्गुरुनाथ ॥ देऊन पाठविलें तुम्हांतें ॥ तेणें पत्र काढूनि हातें ॥ टाकिलें त्वरित त्यापासीं ॥५४॥वामहस्तें घेऊन सत्वरीं ॥ वांचून पाहे ते अवसरीं ॥ तैसीच आज्ञा वंदोनि शिरीं ॥ उठिला झडकरी जेवितां ॥५५॥कोणासीं न बोलतां वचन ॥ तेथूनि सत्वर केलें गमन ॥ म्हणे सांगती तें तत्काळ करीन ॥ उल्हास निजमनीं धरियेला ॥५६॥जाऊनि तया नगरांतरीं ॥ प्रवेशले सद्गुरूचें मंदिरीं ॥ दृष्टी देखतां झडकरी ॥ नमन करी साष्टांग ॥५७॥उच्छिष्टें तैसाचि भरला हस्त ॥ देखोनि पुसती सद्गुरुनाथ ॥ मुखासी अन्न लागलें किमर्थ ॥ सांगें त्वरित मजपासीं ॥५८॥येरू म्हणे सद्गुरुनाथा ॥ तुमची आज्ञा प्रमाण तत्त्वतां ॥ पत्र वाचूनियां पाहतां ॥ उठिलों जेवितां लवकरी ॥५९॥ऐसें ऐकूनियां वचन ॥ आश्चर्य करिती सकळ जन ॥ म्हणे सद्गुरुभक्तीची निजखूण ॥ न कळे तुजविण कोणासी ॥६०॥मग मुरारीसी सद्गुरुनाथ ॥ सांगती सकळ वृत्तांत ॥ म्हणे देवपूजेचे ग्राम समस्त ॥ दुर्जनें निश्चित वर्जिले ॥६१॥उदंड सांगितली धर्मनीती ॥ परी तो नायकेच कुमती ॥ तुवां जाऊनियां सतरगती ॥ उपदेश त्याप्रति करावा ॥६२॥सोडवूनियां आपुलें गांव ॥ कार्य साधूनि शीघ्र यावें ॥ घेऊनि श्रीकृष्णाचें नांव ॥ गमन करावें आतांचि ॥६३॥सद्गुरुआज्ञा वंदोनि शिरीं ॥ तेथोनि निघाला झडकरी ॥ जाऊनियां नगरांतरीं ॥ ठाव बिराडीं घेतला ॥६४॥तेथें भाविक होते सज्जन ॥ तयांसी सांगे वर्तमान ॥ म्हणे तुमच्या गांवचे अधिकार्यान ॥ इनाम हिरून घेतलें ॥६५॥मज आज्ञा करून त्वरितें ॥ यास्तव पाठविलें सद्गुरुनाथें ॥ तरी आतांचि जाऊन त्वरितें ॥ साधूं कार्यार्थ आपुला ॥६६॥लोक म्हणती तो परम खळ ॥ वैष्णवद्रोही अति चांडाळ ॥ तरी आपण होऊन उतावेळ ॥ तेथें तत्काळ नवजावें ॥६७॥तुम्ही केवळ सात्विक भक्त ॥ तुमचा उपदेश न चाले तेथ ॥ कनकाची भाल कूपांत ॥ कासया व्यर्थ टाकावी ॥६८॥सन्निध लोह नसतां पाहें ॥ खापरासी परीस घांसों नये ॥ कामधेनूची सरी पाहें ॥ बरड गाय करीना ॥६९॥तृषा लागतां अगस्तीसी ॥ जाऊं नये थिल्लरापासीं ॥ कल्पतरु म्हणोनि बाभुळेसीं ॥ कामना मानसीं न धरावी ॥७०॥परावें बाळ क्षुधित होये ॥ तरी वांझ स्त्रियेसी पान्हा न ये ॥ तेवीं सद्भक्तांचें वचन पाहें ॥ दुर्जन काय मानिती ॥७१॥तरी आतां निजांगें त्वरित ॥ आपण कदापि न जावें तेथ ॥ आम्ही हळूचि युक्तिपंथ ॥ साधू कार्यार्थ आपुला ॥७२॥ऐसें बोलतां गृहस्थ थोर ॥ मग रसिकमुरार देत उत्तर ॥ मजला गुरुआज्ञा साचार ॥ कीं कार्य सत्वर साधावें ॥७३॥त्यांची आज्ञा प्रमाण पाहीं ॥ म्हणोनि जातों तया ठायीं ॥ नेदीच तरी आमुचा कांहीं ॥ उपाय नाहीं सर्वथा ॥७४॥तों इकडे त्या दुर्जनाकारण ॥ कोणीं सांगितलें वर्तमान ॥ कीं ग्राम सोडवावयाकारण ॥ रसिकमुरास येतसे ॥७५॥त्याची दृष्टीं पडतां जाण ॥ खळासी तत्काळ पडतें मोहन ॥ ऐसें ऐकूनियां वचन ॥ विस्मितमन जाहला तो ॥७६॥मग विचारूनियां युक्ती ॥ काय करिता जाहला कुमती ॥ मदोन्मत्त आणवूनि हस्ती ॥ पैलवानासी एकांतीं सांगतसे ॥७७॥म्हणे रसिकमुरास उठाउठीं ॥ आजि येतसे आमुचे भेटी ॥ तरी त्वां वारण उभा करूनि नेहटीं ॥ जाऊनि चोहटीं मारावा ॥७८॥हें कार्य साधितांचि जाण ॥ कांहीं तुज देईन धन ॥ ऐसें ऐकूनि पैलवान ॥ अवश्य म्हणे तेधवां ॥७९॥वारणासी मद्य पाजूनि बहुत ॥ उभा केला राजबिदींत ॥ तंव रसिकमुरार कीर्तन करीत ॥ येत त्वरित संभ्रमें ॥८०॥शिष्यसंप्रदायी बहुत जन ॥ घेतले असती समागमेंकरून ॥ टाळ मृदंग प्रेमें घेऊन ॥ गात नाम गुण आवडीं ॥८१॥जय जय रुक्मिणीकांता विश्वव्यापका ॥ विधिजनका कंसांतका ॥ निजभक्तांसी तुजविण सखा ॥ वैकुंठनायका नसेचि ॥८२॥तूं नससी कोणे ठायीं ॥ ऐसा ठाव अणुमात्र नाहीं ॥ जेवें आकाश व्यापक पाहीं ॥ परी मलिन नाहीं सर्वथा ॥८३॥कीं चंदन आणि हिंगण ॥ या काष्ठीं पेटलिया कृशान ॥ सुगंध दुर्गंध दोहींत जाण ॥ असे समान सारिखा ॥८४॥ते वीं दुर्जन सज्जन दोघे जाण ॥ यांत सारिखा तूं जगज्जीवन ॥ तुज विश्वरूपा माझें नमन ॥ निजप्रीतीनें येतसे ॥८५॥ऐसियापरी स्वानंदभरित ॥ श्रीहरीचे गुण वर्णीत ॥ नगरवासी लोक समस्त ॥ कौतुक पाहात निजदृष्टीं ॥८६॥तों उन्मत्त वारण बिदींतूनी ॥ पुढें येतसे त्वरेंकरूनी ॥ ग्रामींचे लोक देखती नयनीं ॥ उमजले मनीं आपुल्या ॥८७॥रसिकमुरारासी प्रीतीं ॥ कानीं येऊनि हळूंचि सांगती ॥ कीं दुर्जनें तुम्हांवरी धरूनि कुमती ॥ पाठविला हस्ती मारावया ॥८८॥ऐसें सांगतां तयासी ॥ कांहीं भय न वाटे मानसीं ॥ म्हणे हें नश्वर रक्षितां यासी ॥ काळ ग्रासी अंतसमयीं ॥८९॥तें सद्गुरुकारणीं ॥ लावितां जाण ॥ तत्काळ पळती सकळ विघ्नें ॥ ऐसें बोलोनियां वचन ॥ पुढें गमन करीतसे ॥९०॥तों पुढें उन्मत्त वारण ॥ संमुख येतां देखिला दुरून ॥ शिष्यसंप्रदायी तयाकारण ॥ बोलिले वचन तें ऐका ॥९१॥पुढें संमुख येतो काळ ॥ आतां येथूनि काढावा पळ ॥ नाहीं तरी आम्ही सकळ ॥ जीवें तत्काळ जाऊं कीं ॥९२॥रसिकमुरार तयांप्रती ॥ काय बोलिले वचनोक्ती ॥ सद्गुरुउपदेश तुम्हीं निश्चितीं ॥ घेतला प्रीतीं निजनिष्ठें ॥९३॥आतां निजदेहाचा लोभ धरूनी ॥ जाऊं म्हणतसां येथोनी ॥ तरी आधींच कां तुळसी गळां बांधोनि ॥ व्यर्थ गोंवूनि पडावें ॥९४॥ऐसें वचन ऐकूनि कानीं ॥ माळा काढिल्या सकळांनीं ॥ सद्गुरु म्हणती तये क्षणीं ॥ तुम्हांपासोनि सूटलों ॥९५॥ऐसें वचन बोलोनि देख ॥ तत्काळ पळाले सकळिक ॥ रसिकमुरार एकटा एक ॥ राहिला निष्टंक त्या ठायीं ॥९६॥जेवीं उष्णकाळ येतां जाण ॥ मेघ टाकोनि देतीं गगन ॥ कीं शीतकाळाचें होतां आगमन ॥ सरिता संपूर्ण ओहटती ॥९७॥कीं परचक्रें वेढितां नृपवर ॥ देहलोभी पळोन जाती सत्वर ॥ कीं विषम काळ पडतां साचार ॥ दांभिक अनाचार सांडिती ॥९८॥नातरी वार्धक्यदशा येतां जाण ॥ इंद्रियें सांडिती विषयध्यान ॥ कीं गृहस्थ पीडितां दरिद्रेंकरून ॥ त्यागिती पिशुन तयासी ॥९९॥भिक्षा मागतां शंकराचारी ॥ तों कांचरस आला हातावरी ॥ शिष्य पळूनि गेले झडकरी ॥ तैसी परी जाहली कीं ॥१००॥नगरवासी लोक समस्त ॥ अवघे दुरून कौतुक पाहात ॥ म्हणती ग्रामींचा अधिकारी उन्मत्त ॥ मारितो व्यर्थ यालागीं ॥१॥रसिकमुरास प्रेमेंकरून ॥ करीतसे श्रीहरीचें भजन ॥ शिष्यसंप्रदायी ठाकून ॥ पाहाती दुरून तेधवां ॥२॥पैलवान उन्मत्त कुमती ॥ तेणें लोटूनि पेलिला हत्ती ॥ परी याचा भाव सर्वां भूतीं ॥ असे श्रीपति व्यापक ॥३॥ऐसी ज्याची स्थिति पाहें ॥ त्यासीं कदापि नव्हेच अपाये ॥ वारण येउनियां लवलाहें ॥ धरी पाय तयाचे ॥४॥तामसगुणी उन्मत्त वारण ॥ त्याणें केलें साष्टांग नमन ॥ ऐसें कौतुक देखोन ॥ आश्चर्य मनीं करिताती ॥५॥म्हणती गज हा अति उन्मत्त ॥ जीव मारित असंख्यात ॥ आणि मुरारस्वामीस दंडवत ॥ घालितो अद्भुत नवल कीं ॥६॥सकळ शिष्यांनीं टाकिल्या माळा ॥ तितुक्याही निजकरें केल्या गोळा ॥ एके ठायीं करूनि सकळा ॥ घातल्या गळां वारणाच्या ॥७॥रामकृष्णनारायण ॥ उपदेश दिधला त्याजकारण ॥ म्हणे टाकून उन्मत्तपण ॥ संतसेवन करावें ॥८॥काया वाचा मन ॥ भक्तांस रिघालिया शरण ॥ मग गेलियाही प्राण ॥ गुरुआज्ञा निल्लंघावी ॥९॥ऐसें सांगतां तयाप्रती ॥ वारणें सात्विक धरिली वृत्ती ॥ इजारदारासी सत्वरगती ॥ सेवक सांगती कौतुक ॥११०॥म्हणती गज पाठविला मारावयासी ॥ त्यानें दंडवत घातलें तयासी ॥ वृत्तांत ऐकूनि मानसीं ॥ आश्चर्य तयासी वाटलें ॥११॥चित्तीं अनुताप धरूनियां ॥ चालत आले तया ठाया ॥ म्हणे अद्भुत महिमा नेणोनियां ॥ छळण वायां म्यां केलें ॥१२॥तुम्ही वैष्णवभक्त निश्चित ॥ म्हणोनि घातलें दंडवत ॥ काय अपेक्षित तुमचें चित्त ॥ ते आज्ञा त्वरित मज करा ॥१३॥रसिकमुरास म्हणे यावरी ॥ आणिक इच्छा नाहीं अंतरीं ॥ श्रीगुरुवचन वंदोनि शिरीं ॥ पूजेचे ग्राम सोडवावे ॥१४॥आणि उपदेश केला वारणातें ॥ तोही सोडून द्यावा मातें ॥ ग्रामाधिकारी अवश्य म्हणत ॥ मागुती दंडवत घातलें ॥१५॥घेतलीं लिहूनि सनदापत्र ॥ सवें वारण घेतला त्वरित ॥ श्रीगुरूपासीं कीर्तन करीत ॥ साधोनि कार्यार्थ पातला ॥१६॥पशुयातींत हस्ती उन्मत्त ॥ तोही जाहला ज्ञानवंत ॥ हें देखोनि आश्चर्य मनांत ॥ लोक समस्त करिताती ॥१७॥वारणासी झालें पूर्ण ज्ञान ॥ तो रात्रीं ऐके हरिकीर्तन ॥ दिवसास अरण्यांत जाऊन ॥ इंधनें घेऊन येतसे ॥१८॥वैष्णवां जेवावया सकळी ॥ नित्य पाहिजेत पत्रावळी ॥ अरण्यांत जाऊनि ते वेळीं ॥ पानें तत्काळीं आणीतसे ॥१९॥उच्छिष्ट पात्रें देती टाकून ॥ तीं प्रीतीनें भक्षी वारण ॥ त्याजवांचूनि पदार्थ आन ॥ न भक्षीच सर्वथा ॥१२०॥ठाकुरद्वारीं श्रीभागवत ॥ नित्य वाचिती वैष्णवभक्त ॥ श्रवण करितां नित्य नित्य ॥ वैराग्य अद्भुत मानसीं ॥२१॥म्हणे पशुयातींत अति उन्मत्त ॥ वारणदेह लाधला येथ ॥ कृपा करितां सद्गुरुनाथ ॥ संतसमागम लाधला ॥२२॥पूर्वजन्मीचें होतें सुकृत ॥ तें फळासी आलें त्वरित ॥ ऐसें वारण स्वमनांत ॥ नित्य कल्पीत निजआवडीं ॥२३॥ऐसें बहुत दिवस लोटतां ॥ तों रसिकमुरार ॥ चालिले तीर्था ॥ आनंद झाला वैष्णवभक्तां ॥ उल्हासले निजमानसीं ॥२४॥समागमें घेऊनि गज ॥ तीर्थासी चालिले वष्णवराज ॥ वस्त्र पात्र सकळ ओझें ॥ घालिती सहज त्यावरी ॥२५॥वाटेसी कोणी तस्कर मिळून ॥ विष्णुभक्तांचें करिती छळण ॥ तेव्हां सक्रोध होऊनि वारण ॥ टाकी मारून त्यांलागीं ॥२६॥मुखीं जपे जो रामनाम जान ॥ कंठी असे तुळसीभूषण ॥ याविरहित जवळी कोण ॥ येऊं नेदीच सर्वथा ॥२७॥ऐसा अनुताप धरूनि चित्तांत ॥ दृष्टीसी तीर्थें देखिलीं बहुत ॥ मग कुरुक्षेत्रीं यावया त्वरित ॥ धरिला हेत बहुतांनीं ॥२८॥पंथ क्रमितां सत्वरगती ॥ वाटेसी लागली अरुणावती ॥ तेथें उभा करूनि हत्ती ॥ केलें संतीं वास्तव्य ॥२९॥त्रिरात्र राहावें तेथ ॥ ऐसा समस्तीं धरिला हेत ॥ तों अविंधराज अति उन्मत्त ॥ कळला वृत्तांत तयासी ॥१३०॥दूत सांगती जाऊनि त्वरित ॥ बैरागी उतरले नगरांत ॥ त्यांनीं वारण उन्मत्त बहुत ॥ आहे सांगातें घेतला ॥३१॥त्याचें उत्तम ठाणमाण ॥ आपुलें राज्यासी होईल भूषण ॥ तरी आपण बलात्कारें जाऊन ॥ घ्यावा मागून त्यांपासीं ॥३२॥ऐसें दूतांनीं सांगतां ॥ अभिलाष पडला नृपनाथा ॥ म्हणे राजभूषण कासया वृथा ॥ त्या अतीतां पाहिजे ॥३३॥दूतांसीं आज्ञा केली त्वरितें ॥ गज हिरूनि आणावा येथें ॥ बैरागी जरी न देती तुम्हांतें ॥ तरी शिक्षा त्यांतें करावी ॥३४॥ऐकोनि दुर्बुद्धीचें वचन ॥ पायीक धांवले त्वरेंकरून ॥ वैष्णवमेळीं तो वारण ॥ स्वस्थमन बैसलासे ॥३५॥संतांसी सेवक बोलती ॥ नृपवरें पाठविलें आम्हांप्रती ॥ कीं तुम्हांजवळी आहे हत्ती ॥ त्यावरी प्रीती बैसली ॥३६॥हा आम्हांसी दिधला पाहिजे सत्वर ॥ नातरी नेऊं बलात्कारें ॥ ऐकोनि दुर्बुद्धीचें उत्तर ॥ वैष्णव थोर चिंतावले ॥३७॥एकमेकांतें उत्तर बोलती ॥ उन्मत राजा अविंध कुमती ॥ यासी सांगतां धर्मनीती ॥ तरी तो कल्पांतीं नायके ॥३८॥पिंजर्यांत घालोनि काग पढवितां ॥ तो कृष्णनाम न म्हणेचि सर्वथा ॥ कीं कृपणासीं द्रव्य मांगतां ॥ तरी शब्द वृथा जाईल ॥३९॥शेरासी पाणी घालिता पाहें ॥ अमृतफळ कदापि नये ॥ कसावासी मोहें चाटितां गाय ॥ रक्षील काय तिजलागीं ॥१४०॥तुलसीमाहात्म्य ऐकूनि कानीं ॥ बोकडासी दया नुपजे मनीं ॥ मद्यपियासी ब्रह्मज्ञानी ॥ देखतां नयनीं कंटाळे ॥४१॥बोलका रावा देखोन पाहें ॥ त्यासी ससाणा रक्षील काये ॥ जळाविण मत्स्य तळमळिताहे ॥ तरी करुणा नये बकासी ॥४२॥तेवीं अभक्तांसी सांगतीं धर्मनीती ॥ परी त्यांसी कदापि न रुचे ती ॥ ऐसा विचार करूनि संतीं ॥ उत्तर देती दूतांसी ॥४३॥म्हणती विष्णुभक्तांविण वारण ॥ कोणासी धरूं नेदीच जाण ॥ तुम्ही स्पर्शतां यालागून ॥ टाकील मारून क्षणमात्रें ॥४४॥ऐसें बोलतां वैष्णवभक्त ॥ धरूं पाहाती राजदूत ॥ गज नाटोपेच निश्चित ॥ मारूं पाहात निजक्रोधें ॥४५॥राजयापासीं जाऊन ॥ सकळ सांगती वर्तमान ॥ म्हणती विष्णुभक्तांवांचून ॥ नाकळे वारण कोणासी ॥४६॥वचन ऐकूनि नृपनाथ ॥ माहातासी सांगतसे युक्त ॥ तूं वैष्णववेष धरून निश्चित ॥ जाईं त्वरित त्यापासीं ॥४७॥अवश्य म्हणोनि तये वेळां ॥ कंठीं घातल्या तुळसीमाळा ॥ लावूनि गोपीचंदनटिळा ॥ कृष्णा गोपाळा जपतसे ॥४८॥यात्रेकर्यांस लुटावयासी ॥ मार्गीं मैंद होती तापसी ॥ कां मृगासी पाश घालावयासी ॥ गौरी कीर्तनासी बैसती ॥४९॥नातरी करावया उदरपोषण ॥ बहुरूपी घेती संन्यासग्रहण ॥ कीं मत्स्य धरावयाकारण ॥ मांडिती ध्यान बक जैसे ॥१५०॥तैशापरी तो उन्मत्त ॥ कपटें झाला विष्णुभक्त ॥ वारणापासीं जाऊनि त्वरित ॥ मुखीं जपत कृष्णनाम ॥५१॥वारणापासीं येऊनियां ॥ धरूं पाहातसे लवलाह्या ॥ अंतर्यामीं कळलें तया ॥ कीं कपटें काया पालटली ॥५२॥परी मुखीं नाम जपतो पाहीं ॥ म्हणूनि उपाय न चले कांहीं ॥ वारणें शांति धरितां ते समयीं ॥ कपटें लवलाहीं आकळित ॥५३॥राजद्वारीं नेतां जाण ॥ अति अद्विग्न झालें मन ॥ म्हणे संतसेवा आजपासून ॥ मजकारणें अंतरली ॥५४॥ठाणीं बांधितां नेऊन ॥ न खाय कण अथवा तृण ॥ सप्त दिवस लोटतां जाण ॥ वैकुंठभुवन पावला ॥५५॥जीवनास जातां अकस्मात ॥ देह ठेविला गंगेंत ॥ हरिस्वरूपीं धरूनि हेत ॥ सायुज्यमुक्ति पावला ॥५६॥धरितां साधूंचा समागम ॥ पशु उद्धरला न लागतां क्षण ॥ मग मनुष्यासी लागावया सद्गुण ॥ नवल कोण तयाचें ॥५७॥मैलागिरीभोंवत्या सकळा ॥ उगवल्या होत्या बोरी बाभुळा ॥ त्या भिन्न दिसती परिमळा ॥ न्यून सर्वथा नसती कीं ॥५८॥तैसा खळ हीन यातीचा ॥ दुर्बुद्धि असेल जरी साचा ॥ परी शेजार घडतांचि संतांचा ॥ तरी उद्धार त्याचा होईल ॥५९॥म्हणूनि भक्तकथा सुरस वाणी ॥ सभाग्य श्रोते ऐका कर्णीं ॥ पुढें मिराबाईस चक्रपाणी ॥ संकट देखोनि पावतील ॥१६०॥तेचि रसाळ कथेची उत्पत्ती ॥ वाढीन सभाग्य श्रोतयांचें पंक्तीं ॥ श्रोतयां विनवी महीपती ॥ होय सुखप्राप्ति स्वानंदें ॥६१॥स्वस्ति श्रीभक्तवि० ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविकभक्त ॥ सप्तत्रिंशा० रसाळ हा ॥१६२॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP