मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीभक्तविजय| अध्याय २ श्रीभक्तविजय ॥ मंगलाचरणम् ॥ आरती श्रीविठ्ठलाची युगें ... अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय २ संतकवी महीपतीबोवा ताहराबादकर विरचित Tags : bhakta vijaymahipatipuranपुराणभक्त विजयमराठीमहिपती अध्याय २ Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगोपालकृष्णाय नमः ॥ यावरी व्यासासी सांगे राजीवनयन ॥ त्वां कथिलीं पुराणें संपूर्ण ॥ त्यांचा अर्थ न कळे गहन ॥ अज्ञानजनां कलियुगीं ॥१॥तूं जयदेवरूपें अवतार ॥ घेऊनि करीं जनांचा उद्धार ॥ ऐसें ऐकूनि नमस्कार ॥ व्यासें घातला साष्टांग ॥२॥जगन्नाथक्षेत्रासमीप जाण ॥ तुंदुबिल्व ग्राम नामाभिधान ॥ ब्राह्मणवंशीं अवतार पूर्ण ॥ तेथें घेतला श्रीव्यासें ॥३॥वर्णांमाजी उत्तम वर्ण ॥ चारी वर्णांत मुख्य ब्राह्मण ॥ तेथें पराशरनंदन ॥ अवतरलासे निजलीलें ॥४॥दिवसेंदिवस थोर झाला ॥ मायबापीं व्रतबंध केला ॥ अभ्यास न करितां झाला ॥ सर्व शास्त्रीं निपुण पैं ॥५॥तारागणांत न लोपे चंद्र ॥ कीं पक्षियांमाजी जैसा खगेंद्र ॥ कीं देवांमाजी इंद्र ॥ न लोपेचि सर्वथा ॥६॥तापसियांमाजी शंकर जाण ॥ कीं यादवांमाजी रुक्मिणीरमण ॥ कनकामाजी जैसें रत्न ॥ लोपविलिया लोपेना ॥७॥सेनेमाजी प्रतापशूर ॥ कीं आकाशांत जैसा दिनकर ॥ कीं थिल्लरांत समुद्र ॥ झांकिलिया झांकेना ॥८॥ अज्ञानांत निपुण श्रोता ॥ कीं हरिकीर्तनीं जैसा वक्ता ॥ पक्षीयांत राजहंस तत्त्वतां ॥ दुरूनि ओळखिती सुजाण ॥९॥रंकांमाजी जैसा राव ॥ कीं सकळ साधनांत शुद्धभाव ॥ तैसा ब्राह्मणवंशीं जयदेव ॥ निपुण वक्ता दिसतसे ॥१०॥श्रुती शास्त्रें धुंडाळून ॥ पाहिलीं पुराणें संपूर्ण ॥ तयांमाजी मुख्य साधन ॥ हरिकीर्तन कलियुगीं ॥११॥उद्धवासी सांगे रुक्मिणीरमण ॥ कलियुगीं करावें माझें भजन ॥ म्हणोनि जयदेवकवीनें कवन ॥ गीतगोविंद ग्रंथ केला ॥१२॥पद्मपुराणींचा इतिहास ॥ त्यांत वर्णिला राधाविलास ॥ गोकुळीं क्रीडला जगन्निवास ॥ कृष्णावतारीं निजलीलें ॥१३॥आधींच श्रीहरीचे गुण जाणा ॥ त्यावरी जयदेवें केली पद्मरचना ॥ सुवर्णाचिया कंकणा ॥ रत्नकोंदणीं बसविलें ॥१४॥गीतगोंविंद ग्रंथ केला ॥ तो सकळ लोकीं लिहून नेला ॥ पाठ करूनि हरीची लीला ॥ घरोघरीं गाताति ॥१५॥पुष्पें असतीं एके स्थळीं ॥ परी सुवास धांवे भूमंडळीं ॥ तैसाच ग्रंथ उर्वीस्थळीं ॥ गीतगोविंद प्रगटला ॥१६॥तों जगन्नाथीं राजा एक ॥ नाम तयाचें सात्विक ॥ त्याणेंही ग्रंथ केला एक ॥ जयदेवस्वामीसारिखा ॥१७॥त्या ग्रंथाच्या करूनि प्रती ॥ लोकांस पाठवी भूपती ॥ म्हणे पाठ करावा समस्तीं ॥ या ग्रंथाचा निर्धारें ॥१८॥ऐसें ऐकोनि वर्तमान ॥ पंडित कोपले सर्वज्ञ ॥ जगन्नाथीं मिळूनि सर्व जन ॥ राजयासी बोलती ॥१९॥म्हणती तुवां जो ग्रंथ केला ॥ तो तुझा तुजचि मानवला ॥ जयदेवाचे साम्यतेला ॥ आहे म्हणोनि जल्पसी ॥२०॥तरी सर्वज्ञ जे का होती ॥ ते स्वमुखें कीर्ति न वर्णिती ॥ तूं सांगतोसी जनांप्रती ॥ माझा ग्रंथ पाथ करा ॥२१॥विद्या आणि हरिकीर्तन ॥ गुरुमंत्र आणि ब्रह्मज्ञान ॥ पुष्पहार आणि महारत्न ॥ घ्या घ्या म्हणतां मोल तुटे ॥२२॥कस्तूरी आणि मैलागिरी चंदन ॥ केशर आणि जवादी जाण ॥ उत्तम कविता चतुरपण ॥ स्वमुखें वर्णितां मूर्खत्व ये ॥२३॥ कन्या आणि मुक्ताफळ ॥ पुस्तक आणि उंच वस्त्र केवळ ॥ कृष्णागरु आणि मलयानिल ॥ लावणी लावितां मोल तुटे ॥२४॥ब्राह्मण म्हणती नृपनाथा ॥ तुवां ग्रंथ केला वृथा ॥ चित्तीं धरिली अहंता ॥ जगन्नाथा न माने ॥२५॥मग म्हणे नृपवर ॥ दोन्ही ग्रंथ आणा सत्वर ॥ श्रीजगन्नाथासमोर ॥ रात्रीं ठेवूं नेऊनि ॥२६॥जयदेवें वर्णिले हरीचे गुण ॥ मीही तैसेंचि बोलिलों जाण ॥ जो हरीसी होईल अमान्य ॥ बाहेर टाकून देईल तो ॥२७॥दोन्ही ग्रंथ आणोनि सत्वर ॥ ठेविले जगन्नाथासमोर ॥ कुलुप्तें घालोनि बाहेर ॥ पुजारी आले तेधवां ॥२८॥दुसरे दिवशीं प्रातःकाळीं ॥ अवघी मिळोनि विप्रमंडळी ॥ कांकड आरतीसी ते वेळीं ॥ पुजारी आले राउळांत ॥२९॥तों जयदेवाचा ग्रंथ उत्तम ॥ जवळी ठेवी पुरुषोत्तम ॥ राजाचा अवमानूनि परम ॥ टाकिला बाहेर देखती ॥३०॥जयजयकारें पिटिली टाळी ॥ आनंदली विप्रमंडळी ॥ अधोवदन ते वेळीं ॥ खालीं पाहे नृपनाथ ॥३१॥पंडित म्हणती राजयाला ॥ क्षीरनीरांचा निवाडा झाला ॥ वेदांत आणि कोकशास्त्राला ॥ साम्यता कैसी येईल ॥३२॥राजहंस आणि काग ॥ कीं सर्वज्ञ पंडित आणि मांग ॥ बेगड आणि सुवर्ण चांग ॥ साम्यता कैसी येईल ॥३३॥बाभूळ आणि चंदन ॥ कीं मैलागिरी आणि हिंगण ॥ सज्जन आणि दुर्जन ॥ साम्यता कैसी येईल ॥३४॥साधु आणि निंदक ॥ कीं कपटी आणि भाविक ॥ इंद्र आणि रंक ॥ साम्यता केवीं होईल ॥३५॥तैसें तुझें हें कवित ॥ आणि जयदेवाचा गोविंदगीत ॥ साम्यतेसी न ये निश्चित ॥ जगन्नाथें टाकिला ॥३६॥ऐसें ऐकोनि नृपवर ॥ लज्जायमान झाला थोर ॥ श्रीजगन्नाथासमोर ॥ जाऊनि उभा राहिला ॥३७॥जोडोनियां बद्धांजली ॥ देवासी म्हणे ते वेळीं ॥ आज तुझी बिरुदावली ॥ जगन्नाथा कळलीसे ॥३८॥नाम तुझें पतितपावन ॥ तें असत्य वाटलें मजकारण ॥ एकाचा अव्हेर करून ॥ एकासी आपुलें म्हणविसी ॥३९॥तूं सर्वां घटीं समसमान ॥ व्यापक अससी नारायण ॥ भक्त अभक्त दोघे जण ॥ तुझे सत्तेनें वर्तती ॥४०॥सर्वां घटीं बिंबला अर्क ॥ कीं गाईव्याघ्रांसी जैसें उदक ॥ तैसा तूं यदुनायक ॥ सर्वां घटीं सारिखा ॥४१॥शलभा आणि गरुडास ॥ समान जैसें आकाश ॥ तैसाचि तूं जगदीश ॥ सर्वां घटीं सारिखा ॥४२॥अज्ञानी आणि शहाणे जाण ॥ मातेसी बाळक समान ॥ तैसा तूं पतितपावन ॥ सर्वां घटीं सारिखा ॥४३॥राजा आणि रंग दीन ॥ दोघांसी सारिखें चांदणें जाण । तैसा तूं रुक्मिणीरमण ॥ सर्वां घटीं सारिखा ॥४४॥जयदेवाचें मुखें बोलता ॥ तूंचि होसी जगन्नाथा ॥ आणि माझे देहीं चाळविता ॥ कोण अनंता सांगें मज ॥४५॥ऐसें असतां जगन्नाथा ॥ तुवां टाकिलें माझिया ग्रंथा ॥ तरी मी प्राण देईन आतां ॥ ऐसें बोले नृपवर ॥४६॥ऐसें ऐकोनि करुणावचन ॥ प्रसन्न झाला नारायण ॥ राजयाचें ग्रंथांतून ॥ चोवीस श्लोक घेतले ॥४७॥जयदेवाचे ग्रंथीं लिहून ॥ तत्काळ ठेवी जगज्जीवन ॥ राजयाचें समाधान ॥ इतुकेन झालें तेधवां ॥४८॥यावरी जगन्नाथक्षेत्रीं ॥ एक ब्राह्मण होता अग्निहोत्री ॥ त्याचे उदरीं पद्मावती ॥ कन्यारत्न जन्मलें ॥४९॥पद्माक्षीऐसें जाण ॥ तिचें दिसे रूप लावण्य ॥ म्हणोनियां द्विजोत्तम ॥ नाम ठेवी पद्मावती ॥५०॥ब्राह्मण विचारी मानसीं ॥ कन्या लावण्यगुणराशी ॥ तरी हे जगन्नाथासी ॥ मनोभावें अर्पावी ॥५१॥रूपलावण्य देखोन ॥ तीस मागों येती द्विजोत्तम ॥ तयांसी सांगे ब्राह्मण ॥ कृष्णार्पण हे केली ॥५२॥ऐसें कळलें सकळांस ॥ थोर जाहली दिवसेंदिवस ॥ स्वप्नीं जाऊनि जगन्निवास ॥ ब्राह्मणासी काय बोले ॥५३॥जगन्नाथ म्हणे विप्रासी ॥ कन्या अर्पिली तुवां मजसी ॥ तरी मी बौद्धरूपें जनांसीं ॥ कलियुगांत राहिलों ॥५४॥आतां जयदेव कवि पूर्ण ॥ माझाच अंश असे जाण ॥ सालंकृत कन्या दान ॥ तयालागीं अर्पावें ॥५५॥ऐसें होतांचि स्वप्न ॥ चित्तीं हर्षला ब्राह्मण ॥ जयदेवस्वामीस पाचारून ॥ लग्ननिश्चय पैं केला ॥५६॥ब्राह्मणीं घटितार्थ पाहिले ॥ गुण छत्तीसही उतरले ॥ सवेंच सकळ साहित्य केलें ॥ अलंकारांसमवेत ॥५७॥देवाकतिष्ठा ब्राह्मण भोजन ॥ केलें निर्विघ्नाचें पूजन ॥ अंतःपट धरूनि ब्राह्मण ॥ मंगलाष्टकें बोलती ॥५८॥केशवा नारायणा माधवा ॥ गोविंदा गोपाळा देवाधिदेवा ॥ मधूसूदना रे माधवा ॥ वधूवरांसी रक्षीं तूं ॥५९॥कृष्णा विष्णो वामना रामा ॥ भक्त कैवारिया गुणधामा ॥ बलिबंधना त्रिविक्रमा ॥ वधूवरांसी रक्षीं तू ॥६०॥गोकुळपातला द्वारकावासी ॥ पंढरीशा हृषीकेशी ॥ जगत्पालका सद्गुणराशी ॥ वधूवरांसी रक्षीं तूं ॥६१॥वैकुंठवासिया रुक्मिणीरमणा ॥ क्षीरसागरीं शेषशयना ॥ भक्तपालका गुणनिधाना ॥ वधूवरांसी रक्षीं तूं ॥६२॥राघवेशा अयोध्यावासी ॥ संकटीं रक्षिता निजभक्तांसी ॥ अष्टकें म्हणूनि ऐसीं ॥ लग्न लाविलें ब्राह्मणीं ॥६३॥झाला एकचि जयजयकार ॥ वाद्यें वाजती अपार ॥ सोहळा करून दिवस चार ॥ जन वर्हाडी गौरविले ॥६४॥असो आतां जगन्नाथीं ॥ जयदेवस्वामींनीं केली वस्ती ॥ नित्य हरीचे गुण वर्णिती ॥ कीर्तन करिती सप्रेम ॥६५॥तंव एक होता सावकार ॥ प्रेमळ भाविक अति उदार ॥ जयदेवें पाहूनि अधिकार ॥ तयासी अनुग्रह दिधला ॥६६॥अविश्वासी आणि कृपण ॥ पाहे लोकांचे दोषगुण ॥ परद्रव्याभिलाषी पूर्ण ॥ ऐसा शिष्य करूं नये ॥६७॥अनाचारी परम खळ ॥ पितृद्रोही अति चांडाळ ॥ परदारालुब्ध केवळ ॥ ऐसा शिष्य करूं नये ॥६८॥अति वाचाळ बहुभाषण ॥ जयासी नावडे हरिकीर्तन ॥ अनुभवाविण सांगे ब्रह्मज्ञान ॥ ऐसा शिष्य करूं नये ॥६९॥वेदशास्त्रांचा विश्वास नाहीं ॥ संतवचन नायके कांहीं ॥ सर्वां भूतीं दया नाहीं ॥ ऐसा शिष्य करूं नये ॥७०॥तैसा नव्हे सावकार ॥ परम भाविक अति उदार ॥ गुरुसेवेस्सी अति तत्पर ॥ कायावाचामनेंसीं ॥७१॥जयदेवस्वामीसी विनंति करी ॥ तुम्हीं चलावें माझिये घरीं ॥ स्वामीस बैसवूनि रथावरी ॥ नगरा नेला आपुल्या ॥७२॥श्रीहरीचें गुणकीर्तन ॥ आत्मचर्चा ब्रह्मज्ञान ॥ सत्समागमावांचून ॥ प्राप्त नव्हे सर्वथा ॥७३॥क्षमा शांति दया पूर्ण ॥ निष्कामबुद्धि यज्ञ दान ॥ सत्समागमावांचून ॥ प्राप्त नव्हे सर्वथा ॥७४॥औदार्य धैर्य निष्ठा ज्ञान ॥ प्राणायाम वज्रासन ॥ सत्समागमावाचून ॥ प्राप्त नव्हेचि सर्वथा ॥७५॥म्हणोनि जयदेवस्वामींस ॥ सावकारें नेलें घरास ॥ सेवा करी रात्रंदिवस ॥ अति उल्हासेंकरूनियां ॥७६॥जयदेवस्वामी तया नगरीं ॥ रात्रंदिवस कीर्तन करी ॥ जड अज्ञान दुराचारी ॥ तेही भक्तीसी लाविले ॥७७॥एक मास तेथें राहून ॥ सावकारासी बोले वचन ॥ निरोप द्यावा आम्हांलागून ॥ जगन्नाथासी जावया ॥७८॥जयदेवासी बोले सावकार ॥ माझे मस्तकीं ठेवा जी कर ॥ कृपा असों द्या सेवकावर ॥ निरंतर ऐसीच ॥७९॥बैसवूनि कनकासनीं ॥ पूजा केली प्रेमेंकरूनी ॥ सावकार विचारी मनीं ॥ गुरुदक्षिणा काय द्यावी ॥८०॥रत्नें रुपें आणि सुवर्ण ॥ स्वामींसी मृत्तिकेसमान ॥ परी गुरुमातेकारण ॥ कांहीं द्रव्य पाठवावें ॥८१॥स्वामींसी न कळतां जाण ॥ नानापरींचीं दिव्य रत्नें पूर्ण ॥ मुक्ताहार भूषणें सुवर्ण ॥ रथावरी घातलीं ॥८२॥त्यावरी घालूनि आसनें ॥ जयदेवासी बैसविला सन्मानानें ॥ सवें मनुष्य देऊनि शाहाणे ॥ बोळवीत चालिला ॥८३॥सेवकासी सांगे ते अवसरीं ॥ तुवां जाऊनि यांचे घरीं ॥ पद्मावतीच्या चरणांवरी ॥ नमन माझें सांगिजे ॥८४॥स्वामींसी न कळतां जाण ॥ म्यां दिधलीं वस्त्रें भूषणें ॥ हीं गुरुमातेसी समर्पून ॥ मागुती येईं सत्वर ॥८५॥बोळवूनि जयदेवासी ॥ सावकार आला नगरासी ॥ तों दोघें चोर ते दिवशीं ॥ तयामागूनि चालिले ॥८६॥तस्करांसी कळलें वर्तमान ॥ जयदेव गेला येथून ॥ सावकारें केलें गुप्तदान ॥ म्हणूनि दोघे चालिले ॥८७॥सवें मनुष्य दिधला सावकारें ॥ तो जयदेवासी काय बोले ॥ माझें घरीं अति जरूरें ॥ कार्य असें आजि एक ॥८८॥ऐसें ऐकोनि वचन ॥ जयदेव बोले त्यालागून ॥ तुवां मागें परतोनि जाऊन ॥ कार्यसिद्धि करावी ॥८९॥दासी दास आणि कांता ॥ पशु वृक्ष जाण तत्त्वतां ॥ किडा मुंगी योनी हिंडतां ॥ पराधीन जिणें कीं ॥९०॥म्हणोनियां जयदेवासी ॥ दया उपजली चित्तासी ॥ आज्ञा देऊनि मनुष्यासी ॥ मागुता घरासी पाठविला ॥९१॥एकालाचि रथ हांकीत ॥ जात असे अरण्यांत ॥ तों दोघे चोर अकस्मात ॥ मागोनि आले तेधवां ॥९२॥येऊनि जयदेवासमोर ॥ तस्करीं केला नमस्कार ॥ बक जैसे गंगातीर ॥ वेष्टोनियां बैसती ॥९३॥तैसे अकस्मात दोघे जण ॥ दोहींकडे न्चालिले त्वरेन ॥ जयदेवासी कळलें चिन्ह ॥ तस्करांचे तेधवां ॥९४॥कुटिल कपटी दुराचार ॥ शठ तस्कर आणि जार ॥ अभाविक निंदक खल नर ॥ दुरूनि सुजाण ओळखिती ॥९५॥जयदेवासी कळलें चिन्ह ॥ तस्करांसी बोले वचन ॥ काय इच्छी तुमचें मन ॥ तें पुरवीन ये कालीं ॥९६॥वस्त्रें अलंकार भूषणें ॥ नानापरींचीं दिव्य रत्नें ॥ रथावरी आहेत जाणें ॥ तुम्हांसी अर्पण हीं केलीं ॥९७॥द्रव्यापासीं अति अनर्थ ॥ द्रव्यामुळें प्राणघात ॥ म्हणोनि जयदेव टाकूनि रथ ॥ पुढें सत्वर चालिला ॥९८॥तस्कर विचारिती स्वमनीं ॥ जयदेव गेला रथ टाकूनी ॥ पुढें सावकारासी सांगुनी ॥ आम्हांसी शिक्षा करवील ॥९९॥तरी याचा अक्रूनि प्राणघात ॥ आपण घेऊनि जाऊं रथ ॥ ऐसें म्हणोनि त्वरित ॥ समीप आले धांवूनि ॥१००॥मागुती दोघे विचार करित ॥ याचा न करावा प्राणघात॥ दोनी चरण आणि हात ॥ तोडोनि पेवांत टाकिला ॥१॥रथ घेऊनियां चोर ॥ नगरा गेले सत्वर ॥ जयदेवें अंतरीं श्रीधर ॥ प्रेमभावें आठविला ॥२॥ज्ञानदृष्टीं विचार करीत ॥ म्हणे देहासीच असे घात ॥ आत्माराम तो अलिप्त ॥ सुखदुःखावेगळा ॥३॥देह सकळ रोगांचें घर ॥ देह कामक्रोधांचें मूळ साचार ॥ त्रिगुणांचे विकार ॥ देहापासून उठती पैं ॥४॥याकारणें देहातीत ॥ जयदेव होऊन त्वरित ॥ अंतरीं आठविला श्रीभगवंत ॥ क्षीरसागरविलासी जो ॥५॥तों क्रौंचराजा तये दिवशीं ॥ वनांत आला शिकारीसी ॥ रात्र झाली तयासी ॥ अरण्यांत हिंडतां ॥६॥तंव त्या पेवातं ते वेळां ॥ अकस्मात प्रकाश देखिला ॥ राजा सत्वर चालिला ॥ पहावयासी तेधवां ॥७॥तों परम तेजस्वी देदीप्यमान ॥ विष्णुभक्त बैसला धरूनि ध्यान ॥ मुखें करित नामस्मरण ॥ राम कृष्ण गोविंद ॥८॥ऐसें देखोनि नृपवर ॥ तयासी घातला साष्टांग नमस्कार ॥ न्याहाळूनि पाहे सत्वर ॥ तों करचरण छेदिले ॥९॥ राजा भयभीत झाला ॥ जयदेवासी काय बोलिला ॥ स्वामी ऐसी आपणांला ॥ कां अवस्था घडली हे ॥११०॥जयदेव राजासी बोलत ॥ ऐसाच आहें मी उपजत ॥ करचरणांविरहित ॥ सकळ इंद्रियांवेगळा ॥११॥राजा विचारीत मनीं ॥ विष्णुभक्त आहे पूर्ण ज्ञानीं ॥ शिबिकेंत स्वामीस बैसवूनी ॥ नगरासी नेला आपुल्या ॥१२॥बैसवूनि कनकासनीं ॥ पूजा केली प्रीतींकरूनी ॥ जयदेवास विनीत होऊणी ॥ त्याचा अनुग्रह घेतला ॥१३॥आपुले सिंहासनीं बैसवूनि ॥ सेवकासी सांगे ते क्षणीं ॥ स्वामींची सेवा प्रतिदिनीं ॥ ममा ज्ञेनें करावी ॥१४॥सेवक म्हणती नृपनाथा ॥ भाग्योदय झाला आतां ॥ संतदर्शन कीर्तन कथा ॥ श्रवणीं पडेल आमुचे ॥१५॥तंव कोणे एके दिवशीं ॥ राजा विचारी मानसीं ॥ कांहीं साधन स्वामीसी ॥ पुसावें आजि जाऊनि ॥१६॥जयदेव बैसले सिंहासनीं ॥ राजा विनवी कर जोडोनी ॥ कांहीं सेवा मजलागूनी ॥ कृपा करूनि सांगावी ॥१७॥जयदेव म्हणे राजयास ॥ त्वां भजावें संतांस ॥ याहूनि साधन विशेष ॥ नसे आणिक नृपनाथा ॥१८॥घरास येती संतसज्जन ॥ तयांसी द्यावें इच्छाभोजन ॥ वस्त्रें द्रव्य सुवर्ण भूषण ॥ मागती तीं अर्पावीं ॥१९॥ऐसी करितां संतसेवा ॥ संतोष वाटे वासुदेवा ॥ संतसेवक आवडती देवा ॥ लक्ष्मीहूनि विशेष ॥१२०॥राजा म्हणे स्वामीसी ॥ कैसें ओळखावें संतांसी ॥ हें सर्वथा न कळे मजसी ॥ अज्ञानदशेंकरूनियां ॥२१॥यावरी पद्मावतीरमण ॥ म्हणे ऐक संतचिन्ह ॥ ऊर्ध्वत्रिपुंड्र द्वादश टिळे जाण ॥ कंठीं भूषण तुलसींचें ॥२२॥ऐसे चिन्हीं ते वैष्णवजन ॥ त्यांसीं रिघावें अनन्य शरण ॥ ऐसें ऐकोनियां वचन ॥ अवश्य म्हणे नृपनाथ ॥२३॥गुरुआज्ञा वंदोनि शिरीं ॥ राजा संतांची सेवा करी ॥ कीर्ति ऐकोनि ते अवसरीं ॥ वैष्णव येती घरासी ॥२४॥वृक्ष देखोनि छायेसी ॥ पांथ येती वस्तीसी ॥ कीं चारा देखोनि पक्षी ॥ उल्हासें येती त्या ठायीं ॥२५॥दातयाची कीर्ति ऐकून ॥ धांवूनि येती याचकजन ॥ कीं पिपीलिका साखर देखोन ॥ अति उल्हासें धांवती ॥२६॥धेनु येतां रानांतून ॥ वत्सें धांवती त्वरें करून ॥ कीं महापर्वत देखोन ॥ मेघ आनंदें वर्षती ॥२७॥घनगर्जना ऐकोनि कानीं ॥ मयूर नाचती आनंदेंकरूनी ॥ कीं युद्ध देखोनि रणकंदनीं ॥ प्रतापी शूर धांवती ॥२८॥तैसें रायजाचें भक्तिचिन्ह ॥ पहावया येती संतजन ॥ आधीं जयदेवासी भेटोन ॥ राजदर्शन मग घेती ॥२९॥राजा देखोनि संतजन ॥ तयांसी घाली लोटांगण ॥ चातुर्मास्य घरीं नेऊन ॥ इच्छाभोजन देतसे ॥१३०॥जें जें वैष्णव मागत ॥ तें तें तयांसी देत नृपनाथ ॥ वस्त्रें भूषणें अपरिमित ॥ द्रव्य देत मागती तें ॥३१॥असो ऐसें वर्तमान ॥ तस्करांसी कळलें जाण ॥ जयदेवाचे करचरण ॥ ज्यांणीं तोडून टाकिले ॥३२॥म्हणती आपण होऊनि संत ॥ दृष्टी पाहूं नृपनाथ ॥ द्रव्य देईल अपरिमित ॥ ऐसी युक्ती योजिली ॥३३॥जयदेव आहे तये ठायीं ॥ हें तयांसी ठाऊक नाहीं ॥ संतवेष धरिला पाहीं ॥ कपटियांनीं तेधवां ॥३४॥घेऊनि गोपीचंदन ॥ द्वादश टिळे रेखिले जाण ॥ तुळसीमाळा गळां घालून ॥ घवघवीत दिसताती ॥३५॥मुनीश्वरापरीस जाण ॥ बकाचें सुंदर दिसे ध्यान ॥ कीं कर्दळीपरीस दुरून ॥ शेर हिरवे दिसती कीं ॥३६॥सुवर्णापरीस लखलखित ॥ बेगड जैसें दुरूनि दिसत ॥ नातरी केशरी रंगात ॥ पंतगी दिसत आगळा ॥३७॥हरिदासांपरीस जाण ॥ गोरियांचें सुंदर गायन ॥ कीं रुप्यापरीस दुरून ॥ शिंपले उन्हांत चमकती ॥३८॥तैसे दुरोनि धवधवीत ॥ तस्कर दिसती साधुसंत ॥ परी कपट आहे अंतरांत ॥ हें कोणासी कळेना ॥३९॥नगरासी येऊनि दोघेजण ॥ राजदर्शनासी चालिले त्वरेन ॥ हातीं माळा धरून ॥ विरक्तपण दाविती ॥१४०॥राजमंदिरासी जाऊनी ॥ पुढें पाहाती विलोकूनी ॥ तों जयदेवस्वामी सिंहासनीं ॥ अवचित त्यांनीं देखिला ॥४१॥जीवीं झोंबला चिंताग्नीं ॥ दोघे खुना दाविती नयनीं ॥ म्हणती अग्निकुंडांत येऊनी ॥ आपल्या आपण पडलों कीं ॥४२॥ज्याचे छेदिले हातपाये ॥ तो जयदेवकवि येथें आहे ॥ आपुलें कपट आपुल्यासी पाहें ॥ फळा आलें तत्काळ ॥४३॥कपोता आणि कपोतीस ॥ पारधी गेला मारावयास ॥ तों महासर्पें डंखिलें तयास ॥ तैसें होईळ वाटतें ॥४४॥पुढें होतांचि दोघेजण ॥ जयदेवें ओळखिलें दुरून ॥ दृष्टादृष्ट होतांचि जाण ॥ खूण परस्परें बाणली ॥४५॥निर्वैर होऊनि सर्वांभूतीं ॥ जयदेव वर्ते सहजस्थितीं ॥ झ्याचे अंगी क्षमा शांतीं ॥ मूर्तिमंत वसतसे ॥४६॥शत्रु भासती मित्रासमान ॥ परांचे नेणे दोषगुण ॥ ब्रह्मरूप भासे जन ॥ हेंचि लक्षण संतांचें ॥४७॥आपली संपदा आणि धन ॥ तस्करीं नेलें ऐकून ॥ चित्तीं वाटे समाधान ॥ हेंचि लक्षण संतांचें ॥४८॥आपुलें आणि पराचें बाळ ॥ रडतां देखोनि तत्काळ ॥ दोहोंची सारिखी कळवळ ॥ हेंचि लक्षण संतांचे ॥४९॥रायें दिधलें वस्त्रभूषण ॥ कीं रंकें आणिलें भाजीचें पान ॥ दोहींचा संतोष समान ॥ हेंचि लक्षण संतांचें ॥१५०॥असो जयदेव स्वामी तये वेळीं ॥ शत्रु येता देखी जवळी ॥ सत्वर उडी टाकिली ॥ सिंहासनाखालतीं ॥५१॥तंव त्यांनीं सत्वर येऊन ॥ धरिले जयदेवाचे चरण ॥ हें देखोनि पद्मावतीरमण ॥ आलिंगित तयांसी ॥५२॥जयदेव म्हणे सेवकांसी ॥ संत आले नगरासी ॥ जाऊनि सांगा रायासी ॥ यांचा सन्मान करावा ॥५३॥ऐसें वचन ऐकूनी ॥ रायासी सांगितलें सेवकांनीं ॥ रायें येऊनि तेचि क्षणीं ॥ नमन केलें तयांसीं ॥५४॥नानापरी उपचारें ॥ पूजा केली नृपवरें ॥ भोजन घालोनि सत्वरें ॥ तयांसी विनंति करीतसे ॥५५॥म्हणे तुमची इच्छा असेल जोंवरी ॥ तों काळ क्रमावा माझें घरीं ॥ ऐसें ऐकोनि ते अवसरीं ॥ अवश्य राहूं म्हणती ते ॥५६॥रात्रीं विचार दोघे करिती ॥ शेवटीं कैसी होईल गती ॥ उपचार कांहीं न रुचती ॥ ऐसें बोलती परस्परें ॥५७॥निर्दय अविंधांचे गांवीं ॥ चाळवूनि मनुष्य पोषिती पाहीं ॥ शेवटीं करिती ममई ॥ तैसें होईळ वाटतें ॥५८॥नळिकेवरी येऊनि बैसला ॥ रावा जैसा पिंजर्यांत पडिला ॥ तैसें आजिं आपणांला ॥ झालें ऐसें वाटतें ॥५९॥उंडीस देखोनि मासा भुलला ॥ गिळितां कंठीं गळ टोंचला ॥ तैसें आजि आपणांला ॥ होईळ ऐसें वाटतें ॥१६०॥रात्रंदिवस निरंतर ॥ चिंता करिती वेषधर ॥ कृश झालें शरीर ॥ जैसा क्षयरोग लागला ॥६१॥तंव कोणे एके दिवशीं ॥ राजा पुसे जयदेवासी ॥ एक विनंती पायांसी ॥ आहे माझी स्वामिया ॥६२॥वरकड संत धरासी येती ॥ स्वामी तयांस दुरून नमिती ॥ यांजला लोटांगणें क्षितीं ॥ दंडवत कां तुम्हीं घातलें ॥६३॥नानापरींचे उपचार ॥ मीही करितों निरंतर ॥ परी कृश झाले शरीर ॥ दिवसेंदिवस तयांचें ॥६४॥जयदेव म्हणे नृपनाथा ॥ विषयभागे नावडती संतां ॥ विरक्तांसी माया ममता ॥ विषतुल्य वाटत ॥६५॥आणीक यती वैष्णवजन ॥ परी हे विरक्त सर्वांहून ॥ तुझें भाग्य उत्तम जाण ॥ म्हणोनि येथें राहिले ॥६६॥आतां जरी ते जाऊं म्हणती ॥ तरी आज्ञा द्यावी तयांप्रती ॥ स्वइच्छेनें द्रव्य मागती ॥ तितकें तयांसी अर्पावें ॥६७॥अवश्य म्हणे नृपवर ॥ स्वामींस केला नमस्कार ॥ एके दिवशीं वेषधर ॥ आज्ञा मागती जावया ॥६८॥म्हणती आम्हीं तीर्थवासी ॥ आतां जाऊं स्वस्थळासी ॥ राजा म्हणे तयांसी ॥ काय इच्छा मज सांगा ॥६९॥ऐसें म्हणतां नृपवर ॥ काय बोलती वेषधर ॥ दोन रथ भरूनि सत्वर ॥ द्रव्य द्यावें आम्हासीं ॥१७०॥राजा म्हणे आज्ञा प्रमाण ॥ स्वामी मागती तें देईन ॥ वस्त्रें अलंकार भूषण ॥ वेषधरांसीं अर्पिलीं ॥७१॥द्रव्य देऊन दोन रथ ॥ समागमें दिधले दूत ॥ कर जोडोनि विनवित ॥ बजु विनीत होऊन ॥७२॥मग जयदेवासी पुसोनि त्वरित ॥ वेषधारी झाले मार्गस्थ ॥ दूर गेले अरण्यांत दूत ॥ करिती प्रश्न त्यांजला ॥७३॥म्हणती आमुचे राजमंदिरीं ॥ साधुसंत येती भारीं ॥ सर्वांपरीस तुम्हांवरी ॥ कृपा विशेष स्वामीची ॥७४॥हे आशंका आमचे चित्तीं ॥ म्हणोनि स्वामीस करितों विनंती ॥ ऐकोनि वेषधारी म्हणती ॥ दुतांप्रति तेधवां ॥७५॥म्हणती मागें पूर्वाश्रमीं ॥ आम्हीं आम्ही तुमचे स्वामे ॥ एक राजा होता दुष्टकर्मीं ॥ तयापासीं राहिलों ॥७६॥यांचें नांव जयदेवप्रधान ॥ आम्ही होतों सेवकजन ॥ कांहीं अपराध होतां जाण ॥ राजा यावरी क्षोभला ॥७७॥क्रोधें आम्हांसी आज्ञा करी ॥ यासी अरण्यांत न्यावें दूरी ॥ शिरच्छेद करावा सत्वरी ॥ ऐसें आम्हांसी सांगितलें ॥७८॥ऐसी आज्ञा होतांचि त्वरित ॥ आम्हीं यासे नेला अरण्यांत ॥ याचा न करूनि प्राणघात ॥ करचरण तोडिले ॥७९॥टाकूनि दिधला पेवांत ॥ परतोनि गेलों नगरांत ॥ आम्हीही झालों विरक्त ॥ तया दिवसापासोनि ॥१८०॥राजसेवा टाकोनि त्वरित ॥ आम्ही झालों विष्णूभक्त ॥ तीर्थाटनें करीत करीत ॥ तुमचे नगरा पातलों ॥८१॥राजमंदिरीं येतांचि जाण ॥ परस्परांसी बाणली खूण ॥ जयदेवासी दिधलें जीवदान ॥ तेणें उपकारें दाटला ॥८२॥आम्हीं वांचविलें त्यालागुनी ॥ म्हणोनि आला लोटांगणीं ॥ रायासी उपदेश करूनी ॥ आमुची सेवा करविली ॥८३॥ऐसें बोलतां तये क्षणीं ॥ थरथरां कांपे मेदिनी ॥ असत्यापरी पाप कोणी ॥ थोर नसे सृष्टींत ॥८४॥पृथ्वी उकलोनि सत्वर ॥ तयामाजी गेले वेषदह्र ॥ सेवकांसी चमत्कार ॥ वाटला फार तेधवां ॥८५॥म्हणती अनर्थ झाला थोर ॥ आतां करावा विचार ॥ शिक्षा करील नृपवर ॥ म्हणूनि भय वाटलें ॥८६॥एक म्हणती निर्भय जाऊन ॥ सत्य सांगावें वर्तमान ॥ ऐसें म्हणोनि सेवकजन ॥ आले परतोन नगरासी ॥८७॥येऊणि जयदेवास्वामी जवळी ॥ वर्तमान सांगितलें सकळी ॥ जयदेवाचे नेत्रकमळीं ॥ अश्रुपात लोटले ॥८८॥म्हणे हे कृष्णा पतितपावना ॥ भक्तवत्सला रुक्मिणीरमणा ॥ माझे शत्रूंसी जगज्जीवना ॥ अधोगतीसी कां नेलें ॥८९॥विरोधी भक्त तुझा रावण ॥ त्यासी दिधलें सायुज्यसदन ॥ माझे शत्रूसी मनमोहना ॥ अधोगतीसी कां नेलें ॥१९०॥शिशुपाळें अन्याय केले शत ॥ त्यासी झालासी कृपावंत ॥ माझिया शत्रूसी अधोगति त्वरित ॥ कां दिधली दयाळा ॥९१॥कंस चाणूर पूतना ॥ यांसी नेलें मोक्षसदना ॥ माझे शत्रूसी मधुसूदना ॥ अधोगतीसी कां नेलें ॥९२॥ऐसें ऐकूनि करुणावचन ॥ संतोषला जगज्जीवन ॥ तत्काळ येऊनि श्यामघन ॥ जयदेवासी भेटला ॥९३॥चतुर्भुज रूप सगुण ॥ प्रसन्न झाला नारायण ॥ जयदेवाचे करचरण ॥ तत्काळ फुटले तेधवां ॥९४॥पुष्पक धाडोनि सत्वर ॥ वैकुंठासी नेले वेषधर ॥ भक्तमहिमा बहु थोर ॥ ब्रह्मादिकां कळेना ॥९५॥जयदेवासी म्हणे रुक्मिणीपती ॥ धन्य धन्य तुझी भक्ती ॥ क्षमा दया आणि शांती ॥ तुझे अंगीं वसती कीं ॥९६॥शत्रू मित्र सारिखे जयासी ॥ तयाआधीन मी हृषीकेशी ॥ ऐसें म्हणूनि वैकुंठवासी ॥ अदृश्य झाला तेधवां ॥९७॥जयदेवासी चरण कर ॥ फुटले देखोनि नृपवर ॥ चित्तासी वाटला चमत्कार ॥ जोडोनि कर पुसतसे ॥९८॥मागील वृत्तांत जो झाला ॥ तो जयदेवें रायासी सांगितला ॥ जय जयकारें ते वेळां ॥ वैष्णवनामें गर्जती ॥९९॥रायें शिबिका पाठवूनी ॥ पद्मावती आणविली ते क्षणीं ॥ जे पतिव्रता लावण्यखाणी ॥ इंदिरेचा अवतार ॥२००॥वस्त्रें भूषणें अलंकार ॥ पद्मवतीसी दिधले मुक्ताहार ॥ गुरुमातेसी नमस्कार ॥ भावें नृपवर धालीतसे ॥१॥जाऊनियां एकांतसदनीं ॥ कांतेसी सांगे तये क्षणीं ॥ पद्मावती जयदेवराणी ॥ गुरुमाता आमुची ॥२॥ आपुल्या अंगें हिची सेवा ॥ रात्रंदिवस करावी तुवां ॥ भ्रतारवचन ऐकोनि तेव्हां ॥ अवश्य म्हणे नितंबिनी ॥३॥रायें विचारूनि अंतरीं ॥ तत्काळ सेवक केले दुरी । जयदेवाची चाकरी ॥ अंगें आपुल्या करीतसे ॥४॥तंव कोणे एके दिवशीं ॥ राजस्त्रियां बैसल्या सभेसी ॥ पद्मावती सद्गुणराशी ॥ मुख्य स्थानीं शोभत ॥५॥सरितांत श्रेष्ठ भागीरथी ॥ कीं पतिव्रतांत सावित्री सती ॥ नातरी सकळ मंत्रांत गायत्री ॥ मुख्य मंडन शोभतसे ॥६॥सुगंधामाजी कस्तूरी ॥ कीं अलंकारांत गळसरी ॥ तैसी पद्मावती नारी ॥ मुख्यासनीं बैसलीसे ॥७॥तों अकस्मात दूत येऊन ॥ तेथें सांगती वर्तमान ॥ राजस्त्रियेचा बंधु सुजाण ॥ शांत झाला ये काळीं ॥८॥चित्तीं धरून निजपती ॥ त्याची स्त्री निधाली सती ॥ ऐकूनि तटास्थ झाल्या युवती ॥ नवल करिती सर्वही ॥९॥पद्मावती बैसली निवांत ॥ देखोनि सकळांसी नवल वाटत ॥ राजकांता विनवित ॥ कर जोडूनि तेधवां ॥२१०॥म्हणे चित्तीं धरूनि निजपती ॥ पतिव्रता निघाली सती ॥ ऐसें ऐकोनि तुमचे चित्तीं ॥ नवल कांहीं वाटेना ॥११॥त्यजोनियां माया ममता ॥ सती निघाली पतिव्रता ॥ सप्त जन्म तोचि भर्ता ॥ ते निजकांता पावत ॥१२॥ऐकोनि म्हणे पद्मावती ॥ ऐसें कासया निघावें सती ॥ पुढें जातां निजपती ॥ कधीं भेटेल कळेना ॥१३॥भ्रताराचें ऐकोनि मरण ॥ आपण तत्काळ द्यावा प्राण ॥ सूर्य मावळतां जैसे किरण ॥ अस्त होती तयासवें ॥१४॥ऐसें बोलतां पद्मावती ॥ राजकांता विस्मित चित्तीं ॥ म्हणे अनुभवाविण बोलती ॥ असत्य वाटलें तयांसी ॥१५॥अनुभवाविण ब्रह्मज्ञान ॥ शरीर जैसें प्राणाविण ॥ बोलणें ईश्वरकृपेविण ॥ वृथा तैसें दिसत ॥१६॥घरधन्यावांचूनि घर ॥ कीं नासिकेवांचूनि वक्र ॥ महत्त्वावाचोनि कारभार ॥ वृथा जैसा दिसत ॥१७॥वंध्या कांता दिसे उत्तम ॥ कीं धनंलुब्धाचें वृथा प्रेम ॥ वृक्षावांचोनि दुरूनि ग्राम ॥ बुभुक्षित दिसतसे ॥१८॥निजभक्तांवांचूनि देव ॥ कीं सेनेविण जैसा राव ॥ साधन नसतां शुद्धभाव ॥ वृथा जैसे निष्फळ ते ॥१९॥पद्मावती बोलतां तैसी ॥ असत्य वाटलें राजकांतेसी ॥ बोलावून प्रधानासी ॥ विचार तयासी सांगितला ॥२२०॥म्हणे ऐक एक वचन ॥ असत्य बोलें मजकारण ॥ जयदेवस्वामी मेले म्हणोन ॥ वार्ता पाठवी नगरांत ॥२१॥तंव कोणे एके दिवशीं ॥ राजा चालिला वनक्रीडेसी ॥ शिबिकेंत बैसवून जयदेवासी ॥ अरण्यांत पैं गेले ॥२२॥तंव प्रधानें काय केलें ॥ नगरांत मनुष्य पाठविलें ॥ व्याघ्रें जयदेवा मारिलें ॥ ऐसें सांगा म्हणोनि ॥२३॥अशुद्ध वस्त्रें भिजवून ॥ मागें पाठवी प्रधान ॥ ऐसी वार्ता ऐकोन ॥ राजकांता रडतसे ॥२४॥कपट धरूनि अंतरीं ॥ रडत आली राजसुंदरी ॥ जेथें पद्मावती सुकुमारी ॥ धांवोनि आली त्या ठाया ॥२५॥म्हणे बाई अनर्थ जाहला ॥ जयदेवस्वामी व्याघ्रें मारिला ॥ पद्मावती पुसे तिजला ॥ सत्य सत्य म्हणोनि ॥२६॥येरी म्हणे त्रिवार सत्य ॥ जयदेवा मारिले यथार्थ ॥ पद्मावतीनें ऐकोनि मात ॥ प्राण सोडिले तत्काळ ॥२७॥सूर्यास्त होतांचि जाण ॥ सवेंचि मावळती जैसे किरण ॥ कीं दीपक विझवितां त्वरेन ॥ प्रभा लोपे तत्काळ ॥२८॥पौर्णिमा झालियापाठीं ॥ जैशा चंद्राच्या कळा तुटती ॥ कीं पुष्पें चोळितां निजहस्तीं ॥ सुवास जाय तत्काळ ॥२९॥तैसें जयदेवाचें मरण ॥ ऐकोनि तत्काळ दिधला प्राण ॥ राजा नगरासी आला फिरून ॥ तो अनर्थ जाहला ॥२३०॥प्रधानासी पुसोनि मात ॥ ऐकिला सकळ वृत्तांत ॥ म्हणे कांतेसी मारावें त्वरित ॥ तरी स्त्रीहत्या घडेल कीं ॥३१॥तरी अग्निकाष्ठीं भक्षून ॥ आतां आपुलाचि द्यावा प्राण ॥ नगराबाहेर महा अग्न ॥ प्रदीप्त केला तत्काळ ॥३२॥जयदेवस्वामीसी नमस्कार ॥ करावया आला नृपवर ॥ म्हणे स्वामिया अनर्थ थोर ॥ मजपासूनि घडला कीं ॥३३॥अंतरसाक्ष जयदेव पूर्ण ॥ कळलें सकळ वर्तमान ॥ रायासी दिधलें आश्वासन ॥ म्हणे प्राण न द्यावा ॥३४॥पद्मावतीचे प्रेताजवळी ॥ जयदेव आले तये वेळीं ॥ टाळ वीणा घेऊनि करकमळीं ॥ राधाविलास आरंभिला ॥३५॥चोवीस अष्टपद्या प्रसिद्ध जनीं ॥ जयदेवें गाइल्या तये क्षणीं ॥ मग साबडी नामें गाऊनी ॥ हरिरंगणीं नाचतसे ॥३६॥केशवा नारायणा मुकुंदा ॥ भक्तवत्सला आनंदकंदा ॥ गोकुळपालका जगद्वंद्या ॥ पाव आतां सत्वर ॥३७॥गजेंद्राची ऐकोनि करुणा ॥ सत्वर पावलासी जगज्जीवना ॥ प्रर्हादरक्षका मनमोहना ॥ पाव आतां सत्वर ॥३८॥द्रौपदीलजानिवारणा ॥ पांडवरक्षका मधुसूदना ॥ गोपीजनमानसरंजना ॥ पाव आतां सत्वर ॥३९॥अनाथनाथा रुक्मिणीवरा ॥ भीमातीरवासी दिगंबरा ॥ पतितपावना जगदुद्धारा ॥ पाव आतां सत्वर ॥२४०॥ऐसी करुणा ऐकोन ॥ सत्वर पावला नारायण ॥ जयदेवासी आलिंगून ॥ काय वरदान देतसे ॥४१॥तुझ्या अष्टपद्या अखंड गाती ॥ कीं आवडीकरूनि ऐकती ॥ तयांपासीं लक्ष्मीपती ॥ कर जोडोनि उभा असे ॥४२॥ऐसें देऊनि वरदान ॥ काय करीत जगज्जीवन ॥ पद्मावतीसी आलिंगून ॥ सावध केली तेधवां ॥४३॥प्रेत उठतांची सत्वर ॥ जाहला एकचि जयजयकार ॥ विमानीं बैसोनि सुरवर ॥ पुष्पवृष्टि करिताती ॥४४॥सकळां संतोष जाहला थोर ॥ प्रेमें गर्जती वैष्णववीर ॥ जयदेवस्वामीसी नमस्कार ॥ भावें नृपवर घालीतसे ॥४५॥जयदेवचरित्रअतिउत्तम ॥ गाती ऐकती भाविक जन ॥ त्यांसी संकटीं रुक्मिणीरमण ॥ स्मरतां पावेल तत्काळ ॥४६॥जो व्यासावतार परिपूर्ण ॥ शत्रु मित्र जयासी समान ॥ त्याचें चरित्र अति पावन ॥ मतीसारिखें बोलिलों ॥४७॥ग्वाल्हेरदेशीं अति उत्तम ॥ नाभाजी नागर ब्राम्हण ॥ जो वैष्णवांमाजी शिरोमण ॥ अवतार पूर्ण विधीचा ॥४८॥भक्तचरित्र अति अद्भुत ॥ त्यानें वर्णिलें यथार्थ ॥ त्याचीं पदें पाहूनि निश्चित ॥ ग्रंथ महाराष्ट्र लिहिला ॥४९॥सायखेडियाचें बाहुलें ॥ नाचवी त्या सूत्रें नाचलें ॥ जयदेव आख्यान बोलिलें ॥ माझिया मुखें तैसेंचि ॥२५०॥श्रीभीमातीरवासी रुक्मिणीरमण ॥ पुंडलीकासी दिधलें वरदान ॥ तो भक्तकैवारी जगज्जीवन ॥ वक्ता जाण ये ग्रंथीं ॥५१॥पुढिले अध्यायीं अति विशेष ॥ वैष्णव भक्त तुलसीदास ॥ वक्ता वदविता श्रीनिवास ॥ परिसा सावकाश भाविक हो ॥५२॥दोन्ही कर ठेवूनि जघनीं ॥ उभा राहिला चक्रपाणी ॥ महीपती त्याच्या वरदानीं ॥ गुणकीर्तनीं वर्णीतसे ॥५३॥ स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल भगवंत ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ द्वितीयाध्याय रसाळ हा ॥२५४॥श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP