मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरण|
अभंग २०६ ते २१०

पंचीकरण - अभंग २०६ ते २१०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥२०६॥
रामदासा घडे बहुतां सुकृतें ।
कांहीं पुण्य होतें पूर्वजांचें ॥१॥
स्वप्रींच्या सुखानें सुखावला प्राणी ।
थोर झाली हाणी जागृतीसी ॥२॥
जागृतीस नाहीं स्वप्रींचें तें सुख ।
तेणें झालें दु:ख बहुसाल ॥३॥
बहुसाल खेद मानिला अंतरीं ।
वायां झडकरी जागा झाला ॥४॥
जागा झाला म्हणे वायां अवचिता ।
निजोगी मागुता सुख पाहे ॥५॥
सुख पाहे पुन्हां स्वप्रीं तें ना दिसे ।
भयानक दिसे प्राणीयासी ॥६॥
प्राणीयासी दु:ख जाहलें मागुतें ।
जागा जालिया तें सर्व मिथ्या ॥७॥
मिथ्या सुख दु:ख स्वप्रींचा वेव्हार ।
तैसा हा संसार नाथिलचि ॥८॥
नाथिलचि जाय क्षण आनंदाचा ।
सर्वेची दु:खाचा क्षण एक आहे ॥९॥
क्षण एक मन राघवीं सावध ।
तेणें नव्हे खेद दास म्हणे ॥१०॥
॥२०७॥
सुख पाहो जातां कांहींची ना दिसे ।
संसार हा असे दु;खमूळ ॥१॥
दु:खामुळें जन्म नरा आणि नारी ।
पाहतां संसारीं सुख नाहीं ॥२॥
सुख नाहीं कदा शाश्वतावांचोनी ।
जाणतील ज्ञानी दास म्हणे ॥३॥
॥२०८॥
स्त्रियांचें हो जिणें पराधीन झालें ।
पुरुषें विकीलें आपणासी ॥१॥
आपण विकीलें या पोटाकारणें ।
पराधीन जिणें सहजची ॥२॥
सहजची झालें सर्व पराधीन ।
सत्यचि वचन दास म्हणे ॥३॥
॥२०९॥
वासनेची झाडी कुबुद्धि वांकुदी ।
वाजे हुडहुडी ममतेची ॥१॥
वैराग्याचा वन्ही विझोनियां गेला ।
संचित खायाला पुण्य नाहीं ॥२॥
भक्ति पांघरूण तें माझें सांडलें ।
मज वोसंडीलें संतजनीं ॥३॥
नामसंजीवनी मुखिं नाहीं पाणी ।
निंदेची पोहोणी प्रबळेची ॥४॥
रामदास म्हणे ऐसियाचें जिणें ।
सदा दैन्यवाणें रामोंविण ॥५॥
॥२१०॥
लोभाचे बिराडीं कामी घाली उडी ।
वायांची वेंगडी वळतसे ॥१॥
सदा भक्तीवीण जालें उपोषण ।
झड घाली अन्न खावयासी ॥२॥
माय़ाजाळें आगी सुटली अंतरीं ।
पराघरीं चोरी करीतसे ॥३॥
अंगही चोरितां अंगही सुजलें ।
नाहीं झिजविलें रामालागीं ॥४॥
रामदास म्हणे प्राणी भक्ति उणे ।
तयालागीं सुणें आतळेना ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP