मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरण|
अभंग १४६ ते १५०

पंचीकरण - अभंग १४६ ते १५०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१४६॥
ज्याचेनि जितोसि त्यासि चुकलासी ।
व्यर्थचि झालासी भूमिभार ॥१॥
भूमिभार जिणें तुझें गुरुविणें ।
वचनें प्रमाणें जाण बापा ॥२॥
जाणे तूं हें गति गुरुविण नाहीं ।
पडसी प्रवाहीं मायाजाळीं ॥३॥
मायाजाळीं वांया गुंतलासी मूढा ।
जन्मवरी ओढा तडातोडी ॥४॥
कांहीं तडातोडी कांहीं देव जोडी ।
आयुष्याची घडी ऐसी वेची ॥५॥
ऐसी वेंची बापा आपुली वयसा ।
दास म्हणे ऐशा काळीं घाली ॥६॥
॥१४७॥
सर्व काळ गेला संसार करितां ।
तरी सार्थकता कैसी होय ॥१॥
कैसी घडे मुक्ति कैसी घडे भक्ति ।
म्हणोनिया चित्तीं गोष्टि धरी ॥२॥
गोष्टी धरी मनीं स्वहिता-लागून ।
बैसे देवध्यानीं क्षणएक ॥३॥
क्षण एक गेला सुखाचा बोलतां ।
तेणें कांहीं चिंता वोसरेल ॥४॥
वोसरेल चिंता संसाराची माया ।
भजे रामराया दास म्हणे ॥५॥
॥१४८॥
प्रपंचीं असोनि परमार्थ करावा ।
बरा विवरावा निरंजन ॥१॥
निरंजन देव प्रगटे अंतरीं ।
मग भरोवरी करीना कां ॥२॥
करीना कां परि संसार बाधीना ।
परि तो साधेना काय करूं ॥३॥
काय करूं देव लैकिका उपाय ।
धरवेना सोय शाश्वताची ॥४॥
शाश्वताची सोय समाधान होय ।
मोक्षाचा उपाय सद्रुरुचि ॥५॥
सद्रुरुचि गति चुको अधोगति ।
दास म्हणे मति पालटावी ॥६॥
॥१४९॥
संसार करावा सुखें यथासांग ।
परी संतसंग मनीं धरा ॥१॥
मनीं धरा संतसंगतिविचार ।
येणें पैलपार पाविजेतो ॥२॥
पाविजेतो याची प्रचीति पाहावी ।
निरूपणी व्हावी अतिप्रीति ॥३॥
अतिप्रीति तुम्ही निरूपणीं धरा ।
संसारीं उद्धरा असोनियां ॥४॥
असोनियां नाहीं हे माया सर्वही ।
विवंचनि पाही दास म्हणे ॥५॥
॥१५०॥
करूनि अकर्ते होऊनियां गेले ।
तेणें पंथें चाले तोचि धन्य ॥१॥
तोचि धन्य जनीं पूर्ण समाधानी ।
जनीं आणि वनीं सारिखाची ॥२॥
सारिखाचि जेथे तेथे पालटेना ।
नये अनुमाना कोणीएक ॥३॥
कोणीएक लोक देहासि पाहाती ।
अंतरींची गति कोण जाणे ॥४॥
कोण जाणे काय परावे मनीचेम ।
जनास जनींचें कळतसे ॥५॥
कळतसे परी अंतरीं शोधावें ।
मनासि बोधावें दास म्हणे ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP