मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरण|
अभंग ५६ ते ६०

पंचीकरण - अभंग ५६ ते ६०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥५६॥
विश्रांतीचें स्थळ स्वरूप केवळ ।
द्बत तळमळ जेथें नाहीं ॥१॥
जेथें नाहीं काया नाहीं मोहमाया ।
रंक आणि राया सारिखाची ॥२॥
सारिखेचि सदा सर्वदा स्वरूप ।
तेंचि तुझें रूप जाण बापा ॥३॥
जाण बापा स्वयें तूंचि आपणासि ।
सोहंस्मरणासी विस-रतां ॥४॥
विसरतां सोहं स्मरण आपुले ।
मन गुंडाळल मायाजाळीं ॥५॥
मायाजाळीं तुझा तूंच गुंतलासी ।
यातना भोगिसी म्हणूनियां ॥६॥
म्हणूनियां होई सावध अंतरीं ।
सोहं दृढ धरीं दास म्हणे ॥७॥
॥५७॥
स्वरूपाची भेटी तेथें नाहीं तुटी ।
वायांचि हिंपुटी होत आशा ॥१॥
होतसां हिंपुटी नसतां वियोग ।
असतां संयोग सर्वकाळ ॥२॥
सर्वकाळ ऐक्यस्वरूपीं आलिंगन ।
जेथें मी तूंपण हारपलें ॥३॥
हारपले दु:ख द्बैताचें पाहतां ।
सुखरूप आतां समाधान ॥४॥
समाधान चळे ऐसें न करावें ।
विवेके भरावें स्वस्वरूपीं ॥५॥
स्वस्वरूपीं नाहीं संयोग वियोग ।
सर्वकाळ योग सज्जना चा ॥६॥
सज्जनाचा योग सर्वकाळ आहे ।
विचारूनि पाहे अनुभवें ॥७॥
अनुभवें झाली आम्हाम तुम्हां भेटी ।
तुटीविणें भेटी दास म्हणे ॥८॥
॥५८॥
तुम्हां आम्हां मुळीं झाली नाहीं भेटी ।
तुटीविण भेटी इच्छितसां ॥१॥
इच्छितसां योग नसतां वियोग ।
तुम्हां आम्हां योग सर्वकाळ ॥२॥
सर्वकाळ तुम्ही आम्ही एक स्थळीं ।
वायां मृगजळीम बुडू नका ॥३॥
बुडू नये आतां सावध असावें ।
रूप ओळ्खावें जवळीच ॥४॥
जवळीच आहे नका धरूं दुरी ।
बाह्य अभ्यंतरीं असोनियां ॥५॥
असोनि सन्निध वियोगाचा खेद ।
नसोनियां भेद लावूं नये ॥६॥
लावूं नये भेद मायिक संबंधीं ।
रामदासीं बुद्धि भेटी झाली ॥७॥
॥५९॥
नमन लंबोदरा शारदा सुंदरा ।
सद्रुरुमाहेरा संतजना ॥१॥
संतसंग करी नि:संग होईजे ।
स्वरूप पाविजे आपुलेंची ॥२॥
आपुलें स्वरूप आपणा नेणवे ।
तयासि जाणवे राम केवीं ॥३॥
राम केवीं कळे नाकळे वेदासी ।
संगें तयापाशीं पाविजेना ॥४॥
पाविजेना जंव हा देहसंबंधू ।
राघवाचा बोधू देहातीत ॥५॥
देहातीत संत जाणती अनंत ।
प्रकृतीचा प्रांत निजानंद ॥६॥
निजानंद पूर्वक्षाचें  बोलणें ।
सिद्धांतासि उणें आणविलें
॥७॥
आणविलें उणें शब्दसमुद्रासी ।
नि:शब्द ते ग्रासी मौन्यमुद्रा ॥८॥
मौन्यमुद्रा ध्यान आणि ती समाधि ।
अविद्या उपाधि मावळली ॥९॥
मावळली सर्व दासाची आशंका ।
ज्ञान विनायका देखतांची ॥१०॥
॥६०॥
प्रथम ते नमूं संत साधुजन ।
जयां आत्मज्ञान प्रांजळीत ॥१॥
प्रांजळीत ज्ञान आत्मनिवेदन ।
हेंचि समाधान योगियांचें ॥२॥
योगियांचें गुज तेंचि सर्व बीज ।
एकचि सहज आदि अंत ॥३॥
आदिअंत सदा निर्मळ निश्चळ ।
जैसें ते केवळ चिदाकाश ॥४॥
चिदाकाश बाह्य अंतरीं कोंदलें ।
तैसें तें एकलें स्वस्वरूप ॥५॥
स्वस्वरूपीं मिथ्या मायेचें पडळ ।
जैसें तें आभाळ नाथिलेंची ॥६॥
नाथिलोंचि दिसे साचाचिये परी ।
ऐसी बाजि-गिरी सत्य वाटे ॥७॥
सत्य वाटे स्वप्र जैसें निजलिया ।
तेंचि चेवलिया मिथ्याभूत ॥८॥
मिथ्याभूत माया साच तो ईश्वर ।
श्रोतीं हा विचार विवरावा ॥९॥
विवरावा ऐसें राम-दास म्हणे ।
सद्रुरुवचनें चोजविलें ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP