मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरण|
अभंग १७१ ते १७५

पंचीकरण - अभंग १७१ ते १७५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१७१॥
मायिकाची भक्ति उधाराची मुक्ति ।
तैसी नाहीं स्थिति राघवाची ॥१॥
राघवाची कृपा सद्य मोक्षफळ ।
तुटे तळमळ चमत्कारें ॥२॥
चमत्कारें आतां जो कोणी पाहीना ।
त्याचा पंथ उणा कोटिगुणें ॥३॥
कोटिगुणें उणें जिणें त्या नराचें ।
तेथें विचाराचें वोस घर ॥४॥
वोस घरीं कोण कासयासि धांवे ।
वयर्थचि शिणावें कामाविण ॥५॥
कामा विण काम राहे आत्माराम ।
जेथेंचि विश्राम पाविजेल ॥६॥
पाविजेल परी विवरीत जावें ।
सर्वहि सांडावें ओळखोनी ॥७॥
ओळखतां त्याग सर्वंचा घडेल ।
मार्ग सांपडेल योगियांचा ॥८॥
योगियांचा पंथ योगीच जाणती ।
तिन्हींची प्रचीति एक जेथें ॥९॥
एक जेथें आत्मा शास्र गुरुवाक्य ।
पाहे महावाक्य विवरूनी ॥१०॥
विवरूनि ब्रह्मीं ब्रह्म अहमस्मि ।
राम आहे रामीं रामदास ॥११॥
॥१७२॥
सप्रचीत वल्ली मिथ्या कोण करी ।
धन्य जो विवरी विवेकानें ॥१॥
विवेकानें जन भेटतां संकट ।
त्याची खटपट सुखरूप ॥२॥
सुखरूप संत सत्या साभिमानी ।
तयांसीच मनीं येरां नाहीं ॥३॥
येरां नाहीं गति सत्यावांचुनियां ।
असत्याचे पायां कोण पडे ॥४॥
कोण पडे आतां संदेहाच्या डोहीं ।
कोणाविण नाहीं चाड आम्हां ॥५॥
आम्हां नाहीं चाड ते कोणाएकाची ।
दृढ राघवाची कास धरूं ॥६॥
कास धरूं जेणें पावन हो केलें ।
तेथें माझें झालें समाधान ॥७॥
समाधान झालें प्रत्ययासीं आलें ।
धन्य तीं पाउलें राघवाचीं ॥८॥
राघवाचीं पदें मानसीं धरीन ।
विश्व उद्धरीन हेळामात्रें ॥९॥
हेळामात्रें मुक्त करीन हा जन ।
तरीच पावन राघवाचा ॥१०॥
राघवाचा दास मी झालों पावन ।
पतित तें कोण उरों शके ॥११॥
उरों शके ऐसें कल्पांतीं घडेना ।
जो कोणी पुसेना त्यासि उणें ॥१२॥
उणें न सांगतां माझ्या सूर्यवंशा ।
कोणाची दुराशा नाहीं आम्हां ॥१३॥
नाहीं आम्हां उणें राघवाच्या गुणें ।
ब्रीदचि राखणें पावनाचें ॥१४॥
पावनाचेंबीज आम्हां प्राप्त झालें ।
प्रचीतीस आलें कांहींएक ॥१५॥
कितीएक जन ज्ञानें उद्धरिले ।
कृतकृत्य झाले तात्काळचि ॥१६॥
तात्काळचि मोक्ष हें ब्रीद रामाचें ।
होत आहे साचें येणें काळें ॥१७॥
येणें काळें मोक्ष जरि मी देईन ।
दास म्हणवीन राघवाचा ॥१८॥
राघवाचा वर पावलों सत्वर ।
जनाचा उद्धार करावया ॥१९॥
करावया समर्थ राम सूर्यवंशीं ।
मज कासयासिंरोग जातां ॥२०॥
रोग जातां राग येईल समर्था ।
हे तों कांहीं सत्ता माझी एक ॥२१॥
माझी सर्व सत्ता जानकीजीवना ।
आतां मी लेखिना ब्रह्मादिकां ॥२२॥
ब्रह्मादिक मायें जनकापासूनी ।
तयासी व्यापूनी राम आहे ॥२३॥
राम आहे जनीं राम आहे वनीं ।
राम निरंजनीं सारिखाची ॥२४॥
सारिखाचि राम सृष्टि पाहों जातां ।
तोचि पाहा आतां निरंजन ॥२५॥
निरंजन रामा कां हो अंतरतां ।
मोहुनियां जातां एकीकडे ।
एकीकडे जातां तेथें तोहि राम ।
सांडोनियां राम बरें पाहा ॥२६॥
बरें पाहा तुम्ही आतांचि पावाल ।
पावनचि व्हाल रामरूपें ॥२७॥
रामरूपें सर्व रूपें निवारिलीं ।
आसतचि झालीं नाहीं ऐसीं ॥२८॥
नाहीं ऐसीं रूपें भिंती चित्राकार ।
तैसा हा आकार स्वप्र जैसा ॥२९॥
स्वप्रींचा आकार कल्पनेसी भासे ।
रामरूप ऐसें निर्विकल्प ॥३०॥
निर्विकल्प राम कल्पितां होईजे ।
मिळोनि जाईजे रामरूपीं ॥३१॥
रामरूपीं सर्व साधन जाहलें ।
पावनचि केलें पावनानें ॥३२॥
पावन हो राम जो कोणी पावेल ।
रामचि होईल निजव्यासें ॥३३॥
निजव्यास निजवस्तूचा धरावा ।
श्रवण करावा साक्षात्कार ॥३४॥
साक्षात्कार होतां सत्य निर्गुणाचा ।
मग या गुणाचा पांग नाहीं ॥३५॥
पांग नाहीं ऐसें नेमस्त जाणावें ।
शीघ्रचि सुटावें संवसारीं ॥३६॥
संसारीं सुटिजे संसार करितां ।
सर्वहि भोगितां भोगातीत ॥३७॥
भोगातीत जैसा श्रीकृष्ण दुर्वासा ।
आत्मज्ञानी ऐसा सर्वकाळ ॥३८॥
सर्वकाळ देही असतां विदेही ।
रामदासीं नाहीं जन्ममृत्यु ॥३९॥
॥१७३॥
जाणे सुख दु:ख राम माझा एक ।
येरें तीं मायिक वैभवाचीं ॥१॥
वैभवाची सखीं वोरगोनी जाती ।
आत्माराम अंतीं जिवलग ॥२॥
जीवलग नाहीं श्रीरामावांचूनी हाचि माझे मनी दृढ भाव ॥३॥
भाव अनन्याचा आहे वरपंगाचा ।
रामेंविण कैंचा अंत-रंग ॥४॥
अंतरींची व्यथा श्रीराम सर्वथा ।
जाणवल्या चिंता दूर करी ॥५॥
करितां प्रतिपाळ शरण आलियाचा ।
राम त्रैलोक्याचा मायबाप ॥६॥
मायबाप बंधु सज्जन सोयरा ।
एका रघुवीराविण नाहीं ॥७॥
नाहीं मज कोणी श्रीराम असतां ।
सत्वर वाहतां उडी घाली ॥८॥
उडी घाली मज अनाथाकारणें ।
राम सर्व जाणें अंतरींचे ॥९॥
अंतरींचे गुज राम सर्व बीज ।
रामदाजीं निज प्रगटलें ॥१०॥
॥१७४॥
छत्रसिंहासनीं अयोव्येचा राजा ।
नांदतसे माझा मायबाप ॥१॥
माझा मायबाप त्रैलोकीं समर्थ ।
सर्व मनोरथ पूर्ण करी ॥२॥
पूर्ण प्रतापाचा कैवारी देवांचा ।
नाथ अनाथांचा स्वामी माझा ॥३॥
स्वामी माझा राम योगियां विश्राम ।
सांपडलें वर्म थोर भाग्य ॥४॥
थोर भाग्य त्याचें राम ज्याचे कुळीं ।
संकटीं सांभाळी भावबळें ॥५॥
भावबळें जींहीं धरिला अंतरीं ।
तया क्षणभरी विसंबेना ॥६॥
विसंबेनां कदा आपुल्या दासासी ।
रामीं रामदासीं कुळस्वामी ॥७॥
॥१७५॥
सोडवी जो देव तोचि देवराव ।
येरें सर्व नांव नाथिलेंची ॥१॥
नाथिलेंचि नांव लोकांमध्यें पाहें ।
ठेवी जेथ आहे प्रतापाचें ॥२॥
प्रतापाचें नांव एका राघवासी ।
रामीं रामदासीं देवराव ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP