मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरण|
अभंग ११६ ते १२०

पंचीकरण - अभंग ११६ ते १२०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥११६॥
विटाळाचा देह विटाळें वाढला ।
तुवां शुद्ध केला कोणेपरी ॥१॥
पातकाचा देह पातकें वाढला ।
विचारतां आला प्रत्ययासी ॥२॥
अस्थीचा पंजर चर्मै गुंडाळिला ।
विष्ठेनें भरला मळमूत्रें ॥३॥
जंत किडे ओक आंतडीं कांतडीं ।
बाह्यात्कारीं वेडीं भादरलीं ॥४॥
भादरले केश मागुती निघती ।
पुन्हां भादरती लागवेगें ॥५॥
भादरली डोई घेत प्रायश्चित ।
अपानीं घासित मृत्तिकेसी ॥६॥
भादरिली डोई पळाला विटाळ ।
मागुता चांडाळ भादरितो ॥७॥
बरा शुद्ध केला पुन्हां पापी झाला ।
पुन्हां भादरिला सावकाश ॥८॥    
सावकाश कांहीं विचार पाहावा ।
जेणें करीं देवा पाविजे तो ॥९॥
पाविजेतो देवा भक्तिनिवेदनें ।
शुद्ध ब्रह्मज्ञानें रामदासीं ॥१०॥
॥११७॥
पोट भरावया मांडिला उपास ।
झाला कासाविस रामाविणें ॥१॥
राजा पहावया प्रजा धुंडाळितो ।
कासाविस होतो वाउगाची ॥२॥
द्रव्य साधावया निर्द्रव्याचा संग ।
तेथें कैंचें मग द्रव्य मिळे ॥३॥
ब्रह्म साधावया कर्मामागें गेला ।
तंव कर्मै केला कासाविस ॥४॥
सुटका व्हावया बंधनचि केलें ।
तेणें ते सुटले केवीं घडे ॥५॥
केवीं घडे दृढरोगें आरोग्यता ।
कुपथ्यानें व्यथा वाढतसे ॥६॥
एका व्यथा एकीं औषध घेतलें ।
दास म्हणे झालें तयापरी ॥७॥
॥११८॥
चित्त आहे कैसें मळिण तें कैसें ।
शुद्ध होतें कैसें विचारावें ॥१॥
वैद्य ओळखीना रोगहि कळेना ।
औषध मिळेना प्रचितीचे ॥२॥
अनुमानें देव अनुमानें भक्त ।
अनुमानें मुक्त अनुमानी ॥३॥
अनुमानें केलें अनुमाने कल्पिलें ।
निर्फळ जाहलें सर्व कांहीं ॥४॥
सर्व कांहीं बरें प्रचीति आलिया ।
दास म्हणे वायां अप्रचीति ॥५॥
॥११९॥
प्रचीतीचा देव प्रचीतीचा भाव ।
करावा उपाव सप्रचीत ॥१॥
प्रचीतीचा वैद्य प्रचीतीची मात्रा ।
प्रचीतीच्या मंत्रा पाठ कीजे ॥२॥
प्रचीतीनें कोणी एक ते पहावेम ।
जन ओळखावे प्रचीतीनें ॥३॥
प्रचीतीनें इष्ट प्रचीतीनें मित्र ।
प्रचीतीनें सूत्र कोणीएक ॥४॥
कोणी एक काय प्रचीति उपाय ।  
दास म्हणे सोय प्रचीतीची ॥५॥
॥१२०॥
प्रचीतीवेगळें मिथ्या सर्व कांहीं ।
निर्फलचि पाही अप्रचीती ॥१॥
अप्रचीति जेथ फळ कैंचें तेथ ।
निर्फळचि व्यर्थ कासाविस ॥२॥
प्रचीतीची रीज जया अंगीं नसे ।
व्यर्थ हेंचि पिसें लोभाविणें ॥३॥
लोभाविणें लाभ मानिला सुलभ ।
लाभ नाहीं क्षोभ प्रगटला ॥४॥
प्रगटला लोभ केलें निरर्थक ।
प्रचीति सार्थक दास म्हणे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP