मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरण|
अभंग १०१ ते १०५

पंचीकरण - अभंग १०१ ते १०५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१०१॥
निरूपण सार अद्बैत करावें ।
तेणें उद्धरावें निश्चयेंसी ॥१॥
निश्चयेंसि पाहे आपुली वोळखी ।
तोचि एक सुखी जनांमध्यें ॥२॥
जनांमध्यें सुखी परत्रसाधनें ।
संसारबंधनें तया नाहीं ॥३॥
तया नाहीं देहबुद्धीची अहंता ।
देहीं विदेहता वस्तुरूप ॥४॥
वस्तुरूप होय मीपण त्यागितां ।
शाश्वत भावितां दास मुक्त ॥५॥
॥१०२॥
निरूपणें भक्ति निरूपणें ज्ञान ।
अनुताप पूर्ण निरूपणें ॥१॥
निरूपणें योग योगाचा संयोग ।
निरूपणें त्याग घडतसे ॥२॥
घडतसे सर्व कांहीं निरूपणें ।
बाणती लक्षणें सज्जनांचीं ॥३॥
सज्जनांचीं मतें सज्जन जाणती ।
येर ते नेणती जाणपणें ॥४॥
जाणत्या नेणत्या होय समाधान ।
करावें मनन दास म्हणे ॥५॥
॥१०३॥
पूर्ण समाधान होय निरूपणें ।
परी जाणपणें बुडविलें ॥१॥
बुडविलें देहातीत समाधान ।
देह अभिमान वाढविला ॥२॥
वाढविला तर्क वायां निरूपणीं ।
जाणावें पापिणी काय केलें ॥३॥
केलें काय ऐसें जाणत जाणतां ।
स्वरूपीं अहंता कामा नये ॥४॥
कामा नये देहबुद्धीचें जाणणें ।
दास निरूपणें सावधान ॥५॥
॥१०४॥
गीतेचें लक्षण हेंचि हें प्रमाण ।
श्रवण मनन सर्वकाळ ॥१॥
सर्वकाळ सारासारविचारणा ।
वस्तूची चाळणा निरंतर ॥२॥
निरंतर ध्यास लागला अंतरीं ।
धारणाहि धरी निर्गुणाची ॥३॥
निर्गुणासंगतीं निर्गुण होईजे ।
प्रत्त्यावृत्ति कीजे निरूपणें ॥४॥
निरूपणें होय अलभ्याचा लाभ ।
साधन सुलभ दास म्हणे ॥५॥
॥१०५॥
निरूपणाऐसें नाहीं समाधान ।
आणिक साधन आढळेना ॥१॥
भक्ति ज्ञान घडे वैराग्य आतुडे ।
भावार्थ सांपडे निरूपणें ॥२॥
शांति दया क्षमा नैराश्यता मनीं ।
आतुडे जन्मनी तेणें गुणें ॥३॥
रिद्धि सिद्धि दासी होती निरूपणें ।
श्रवण मननें निजध्यासे ॥४॥
भ्रांतीचा संदेह तुटे एकसरां ।
दास म्हणे करा निरूपण ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP