पंचक - अर्थसार्थपंचक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
पक्षी श्वापद किडा मुंगी ।
पराधीन जिणें जगीं ॥१॥
तैसा नव्हे नरदेही ।
करा भक्तीचा लवलाहो ॥२॥
नीच योनी चारी खाणी ।
अवघे पराधीन प्राणी ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
ज्ञान ध्यान पशु नेणें ॥४॥
॥२॥
पापपुण्य समता घडे ।
तरिच नरदेह जोडे ॥१॥
याचें सार्थक करावें ।
आपणासी उद्धरावें ॥२॥
बहुजन्मांचे शेवटीं ।
नरदेह पुण्यकोटी ॥३॥
रामदास म्हणे आतां ।
पुंढतीं न लागे मागुता ॥४॥
॥३॥
देहआरोग्य चालतें ।
भाग्य नाहीं त्यापरतें ॥१॥
लाहो घ्यावा हरिभक्तीचा ।
नाहीं भरंवसा देहाचा ॥२॥
देह आहे क्षणभंगुर ।
तुम्ही जाणतां विचार ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
अकस्मात लागे जाणें ॥४॥
॥४॥
देशकाळ वर्तमान ।
असे अवघाचि अनुमान ॥१॥
भक्ति करावी देवाची ।
घडि जातसे सोन्याची ॥२॥
काळ वेळची पहातो ।
सदा सन्निध राहातो ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
देहा आहे जाईजणें ॥४॥
॥५॥
पुढें होणार कळेना ।
समाधान आकळेना ॥१॥
मना सावधान व्हावें ।
भजन देवाचें करावें ॥२॥
ऋणानुबंधाचें कारण ।
कोठें येईल मरण ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
भजनें अमरचि होणें ॥४॥

॥ अभंगसंख्या ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP