पंचक - वोसणपंचक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
वोसणारे वोसणरे ।
वोसणारे राग वोसणरे ॥१॥
आढळेना आढळेना ।
आढ-ळेना संत आढळेना ॥२॥
उमजेना उमजेना ।
उमजेना पंथ उमजेना ॥३॥
कोण जाणे कोण जाणे ।
कोण जपि रामदास जाणे ॥४॥
॥२॥
चालवेना चालवेना ।
उमजेना पंथ उमजेना ॥१॥
दु:ख वाटे दु:ख वाटे ।
दु:ख वाटे देहबुद्धि लोटे ॥२॥
सुख नाहीं सुख नाहीं ।
सुख नाहीं भवसुख नाहीं ॥३॥
जड जातो जड जातो ।
जड जातो सत्य जड जातो ॥४॥
धरवेना धरवेना ।
रामदास म्हणे पण करवेना ॥५॥
॥३॥
संतापलें संतापलें  ।
संतापलें मन संतापलें ॥१॥
झिजलागे झिजलागे ।
झिज-लागे देह झिजलागे ॥२॥
सोसवेना सोसवेना ।
सोसवेना शीण सोसवेना ॥३॥
धीर नाहीं धीर नाहीं ।
दास म्हणे अंतर पाहीं ॥४॥
॥४॥
त्यागवेना त्यागवेना ।
त्यागवेना भाग्य त्यागवेना ॥१॥
बुद्धि नाहीं बुद्धि नाहीं ।
बुद्धि नाहीं देहबुद्धि नाहीं ॥२॥
धरवेना सोडवेना ।
तोडवेना मन वोढवेना ॥३॥
दास म्हणे दास म्हणे ।
पोटिंचा निश्चय कोण जाणे ॥४
॥५॥
मोकल रे मोकल रे ।
मोकल रे मना मोकल रे ॥१॥
योग्य नाहीं योग्य नाहीं ।
त्याग नाहीं वीतराग नाहीं ॥२॥
भक्ति नाहीं मुक्ति नाहीं ।
देव नाहीं सानुकूळ नाहीं ॥३॥
जप नाहीं तप नाहीं ।
गुण नाहीं निर्गुण नाहीं ॥४॥
ज्ञान नाहीं ध्यान नाहीं ।
लय नाहीं साधन नाहीं ॥५॥
शम नाहीं दम नाहीं ।
बाह्यांतरीं मन नाहीं ॥६॥
इष्ट नाहीं मित्र नाहीं ।
धारिष्ठ नाहीं वरिष्ठ नाहीं ॥७॥
दान नाहीं पुण्य नाहीं ।
कर्म नाहीं स्वधर्म नाही ॥८॥
तीर्थ नाहीं व्रत नाहीं ।
शांति नाहीं विश्रांति नाहीं ॥९॥
न्याय नाहीं नीति नाही ।
दास म्हणे कांहींच नाहीं ॥१०॥
॥६॥
साधिल रे साधिल रे ।
साधिल रे भाव साधिल रे ॥१॥
काम आहे क्रोध आहे ।
मद आहे मत्सर आहे ॥२॥
लोभ आहे दंभ आहे ।
क्षोभ आहे क्षेम आहे ॥३॥
भेद आहे खेद आहे ।
वाद आहे उच्छेद आहे ॥४॥
पाप आहे दोष आहे ।
अंतरीं पहातां द्वेष आहे ॥५॥
अर्थ आहे स्वार्थ आहे ।
मान्य तें करणें अर्थ आहे ॥६॥
जाणवेना जाण वेंना ।
दास म्हणे खूण सांगवेना ॥७॥

॥ अभंगसंख्या ॥३४॥


Last Updated : March 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP