मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अल्‌कमर

सूरह - अल्‌कमर

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने ५५)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

पुनरुत्थानाची घटका जवळ येऊन ठेपली आणि चंद्र दुभंगला. परंतु या लोकांची स्थिती अशी आहे की मग कोणती का निशाणी पाहू नये, पराङमुख होतात आणि म्हणतात की ही तर नित्याचीच जादू आहे. यांनी (यालाही) खोटे ठरविले आणि आपल्या मनोवासनांचे अनुसरण केले. प्रत्येक बाबीला अखेरीस एक शेवट गाठावाच लागणार आहे. (१-३)

या लोकांसमोर (पूर्वीच्या राष्ट्रांचे) ते अहवाल आलेले आहेत ज्यात दुराचारापासून दूर ठेवण्यासाठी विपुल बोधसामुग्री आहे, आणि अशी बुद्धिमत्ता जी उपदेशाचा उद्देश पराकोटीने पूर्ण करते. पण धमकावण्या यांच्यावर परिणामकारक ठरत नाहीत. म्हणून हे पैगंबर (स.), यांच्याकडून निमुख व्हा, ज्या दिवशी साद घालणारा एक अत्यंत अप्रिय गोष्टीकडे हाक मारील, लोक भयभीत दृष्टीने आपल्या कबरीतून अशाप्रकारे निघतील जणूकाही विखुरलेले टोळ आहेत. पुकारणार्‍याकडे धावत सुटले असतील आणि तेच इन्कार करणारे (जे जगात याचा इन्कार करीत होते) त्यावेळी म्हणतील की हा दिवस तर फार कठीण आहे. (४-८)

यांच्यापूर्वी नूह (अ.) च्या राष्ट्राने खोटे ठरविले आहे, त्यांनी आमच्या दासाला खोटे ठरविले आणि सांगितले की हा वेडा आहे, आणि तो भयंकर रीतीने झिडकारला गेला. सरतेशेवटी त्याने आपल्या पालनकर्त्याचा धावा केला की, “मी जेरीस आलो आहे. आता तू यांच्यावर सूड उगव.” तेव्हा आम्ही मुसळधार पावसाने आकाशाची दारे उघडली. आणि जमिनीला फाडून तिला स्रोतांत परिवर्तित केले, आणि हे सर्व पाणी ते कार्य पूर्ण करण्यास मिळाले जे निश्चित झाले होते. आणि नूह (अ.) ला आम्हीएका फळ्या व खिळे धारीवर स्वार केले, जी आमच्या देखरेखीत वाहत होती. हा होता बदला त्या माणसाखातर ज्याचा अनादर केला गेला होता. त्या नावेला आम्ही एक निशाणी बनवून ठेवले, मग आहे काय कोणी उपदेश घेणारा? पाहून घ्या, कसा होता माझा प्रकोप आणि कशा होत्या माझ्या धमकावण्या. आम्ही या कुरआनला उपदेशासाठी सुलभ साधन बनविले आहे, मग आहे काय कोणी उपदेश घेणारा? (९-१७)

‘आद’ने खोटे ठरविले तर पाहून घ्या कसा होता माझा प्रकोप आणि कशा होत्या माझ्या धमकावण्या. आम्ही एका निरंतर अशुभ दिवशी भयंकर वादळी वारा त्यांच्यावर पाठविला, जो लोकांना उचलून उचलून अशाप्रकारे फेकत होता जणूकाय ती मुळापासून उपटलेली खजुरीची खोडे असावीत. तर पाहून घ्या कसा होता माझा प्रकोप आणि कशा होत्या माझ्या धमकावण्या. आम्ही या कुरआनला उपदेशासाठी सुलभ साधन बनविले आहे, मग आहे काय कोणी उपदेश घेणारा? (१८-२२)

समूदनी ताकीदींना खोटे ठरविले आणि म्हणू लागले, “एकटाच एक मनुष्य जो आमच्यापैकीच आहे, काय आम्ही आता त्याच्या पाठीमागे चालावे? याचे अनुसरण आम्ही जर कबूल केले तर याचा अर्थ असा होईल की आम्ही बहकलो आहोत आणि आमची अक्कल मारली गेली आहे. काय आमच्या दरम्यान हाच एक मनुष्य होता ज्याच्यावर ईश्वर-स्मरण उतरविले गेले? नव्हे, तर हा पराकोटीचा लबाड व दुराभिमानी आहे.” (आम्ही आपल्या पैगंबराला सांगितले) “उद्याच यांना कळेल की कोण पराकोटीचा लबाड आणि दुराभिमानी आहे. आम्ही उंटिणीला यांच्यासाठी उपद्रव बनवून पाठवीत आहोत. आता जरा धीराने पहा यांचा शेवट काय होतो. यांना बजावून सांग की पाणी यांच्या व उंटिणीच्या दरम्यान वाटले जाईल आणि प्रत्येक आपल्या पाळीच्या दिवशी पाणवठयावर येईल.” सरतेशेवटी त्या लोकांनी आपल्या माणसाला हाक दिली आणि त्याने या कामाचा विडा उचलला आणि उंटिणीला ठार केले. मग पहा की कसा होता माझा प्रकोप आणि कशा होत्या माझ्या धमकावण्या. आम्ही त्यांच्यावर केवळ एकच विस्फोट सोडला आणि ते कुंपणवाल्यांच्या तुडविलेल्या कुंपणाप्रमाणे भुसा बनून राहिले. आम्ही या कुरआनला उपदेशासाठी सुलभ साधन बनविले आहे. आता आहे कोणी उपदेश स्वीकारणारा? (२३-३२)

लूत (अ.) च्या राष्ट्राने ताकीदींना खोटे ठरविले आणि आम्ही दगडफेक करणारा वारा त्यांच्यावर पाठविला, केवळ लूत (अ.) च्या घरचे लोक त्यापासून सुरक्षित राहिले. त्यांना आम्ही आपल्या मेहरबानीने रात्रीच्या शेवटच्या प्रहरी वाचवून बाहेर काढले. असा मोबदला देत असतो आम्ही त्या माणसाला जो कृतज्ञता दर्शवीत असतो. लूत (अ.) ने आपल्या राष्ट्राला आमच्या पकडीपासून खबरदार केले परंतु ते सार्‍या ताकीदींना संशयास्पद समजून बोलण्यात उडवीत राहिले. मग त्यांनी त्याला आपल्या पाहुण्यांच्या संरक्षणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. सरतेशेवटी आम्ही त्यांचे डोळे मिटविले की घ्या आता माझ्या प्रकोपाचा व माझ्या धमकीचा आस्वाद. सकाळीसकाळीच एका अटळ प्रकोपाने त्यांना गाठले. घ्या आस्वाद आता माझ्या प्रकोपाचा आणि माझ्या तंबीचा. आम्ही या कुरआनला उपदेशासाठी सुलभ साधन बनविले आहे. तर आहे कोणी उपदेश स्वीकारणारा? (३३-४०)

आणि फिरऔन लोकांपाशीसुद्धा धमक्या आलेल्या होत्या परंतु त्यांनी आमच्या सर्व संकेतांना खोटे ठरविले. सरतेशेवटी आम्ही त्यांना पकडले ज्याप्रमाणे एखादा जबरदस्त सामर्ध्यवान पकडीत असतो. (४१-४२)

काय तुमचे अश्रद्धावंत काही त्या लोकांपेक्षा उत्तम आहेत? अथवा दिव्य ग्रंथात तुमच्यासाठी काही क्षमा लिहिलेली आहे.? अथवा या लोकांचे असे म्हणणे आहे की आम्ही एक मजबूत जथा आहोत, स्वत:चे रक्षण करून घेऊ? लवकरच हा जथा पराभूत होईल आणि हे सर्व पाठ दाखवून पळताना दिसतील किंबहुना यांना निपटण्यासाठी मूळ वायद्याची वेळ तर पुनरुत्थान आहे आणि ती मोठी आपत्ती व अधिक कटू घटका आहे. हे गुन्हेगार लोक वास्तविकत: गैरसमजुतीत गुरफटलेले आहेत आणि यांची अक्कल नष्ट झालेली आहे. ज्या दिवशी हे तोंडघशी फरफटले जातील त्या दिवशी यांना सांगितले जाईल की आता चाखा नरकाच्या ज्वाळांची गोडी. (४३-४८)

आम्ही प्रत्येक वस्तू एका योजनेनिशी निर्माण केली आहे. आणि आमची आज्ञा केवळ एकच आज्ञा असते व पापणी लवेतोपर्यंत ती अंमलात येते. तुम्हासारख्या अनेकांना आम्ही नष्ट करून टाकले आहे. मग आहे का कोणी उपदेश स्वीकारणारा? जे काही त्यांनी केलेले आहे ते सर्व दप्तरांत नोंदलेले आहे, आणि प्रत्येक लहानमोठी गोष्ट लिहिलेली आहे. (४९-५३)

अवज्ञेपासून अलिप्त राहणारे खचितच उद्यानात आणि कालव्यांत असतील, खर्‍या प्रतिष्ठेची जागा, महान सत्ताधिकारी बादशहाच्या समीप. (५४-५५)

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP