मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अर्‌रूम

सूरह - अर्‌रूम

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने ६०)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

अलिफ लाऽऽम मीऽऽम. ‘रोमन’ लोक जवळच्या भूमीवर पराभूत झाले आहेत आणि आपल्या या पराभवानंतर काही वर्षांच्या आत ते विजयी होतील. अल्लाहचाच अधिकार आहे अगोदरसुद्धा व नंतरदेखील, आणि तो दिवस असा असेल जेव्हा अल्लाहने प्रदान केलेल्या विजयावर मुसलमान आनंद व्यक्त करतील. अल्लाह मदत करतो, ज्याला इच्छितो आणि तो जबरदस्त व दयावान आहे. हे वचन अल्लाहने दिले आहे. अल्लाह कधीही आपले वचन भंग करीत नसतो. परंतु बहुतेक लोक जाणत नाहीत. (१-६)

लोक ऐहिक जीवनाचा केवळ दर्शनी पैलू जाणतात आणि मरणोत्तर जीवनाविषयी ते स्वत:च गाफिल आहेत. यांनी कधी आपल्या स्वत:शी मनन-चिंतन केले नाही काय? अल्लाहने पृथ्वी व आकाशांना आणि त्या सर्व वस्तू ज्या त्यांच्या दरम्यान आहेत, सत्याधिष्ठित व एका ठराविक मुदतीसाठीच निर्माण केल्या आहेत. परंतु बहुतेक लोक आपल्या पालनकर्त्याच्या भेटीचा इन्कार करणारे आहेत. आणि हे लोक कधी पृथ्वीवर हिंडले-फिरले नाहीत काय की जेणेकरून यांना त्या लोकांचा शेवट पाहावयास मिळाला असता, जे यांच्यापूर्वी होऊन गेले आहेत? ते यांच्यापेक्षा अधिक शक्तीशाली होते, त्यांनी जमिनीची खूप मशागत केली होती आणि त्यांनी तिला इतके वसविले होते की जितके यांनी वसविलेले नव्हते. त्यांच्यापाशी त्यांचे पैगंबर दिव्य संकेत घेऊन आले, मग अल्लाह त्यांच्यावर अन्याय करणारा नव्हता परंतु ते स्वत:च आपल्यावर अन्याय करीत होते. सरतेशेवटी ज्या लोकांनी वाईट कृत्ये केली होती त्यांचा शेवट फार वाईट झाला या कारणास्तव की त्यांनी अल्लाहच्या संकेतांना खोटे ठरविले होते आणि ते त्यांची थट्टा करीत होते. (७-१०)

अल्लाहच सृष्टीचा प्रारंभ करतो मग तोच तिची पुनरावृत्ती करील, मग त्याच्याकडेच तुम्ही परतविले जाल. आणि जेव्हा ती घटका उद्भवेल त्यादिवशी गुन्हेगार थक्क होतील. त्यांच्या मानलेल्या भागीदारांपैकी कोणीही त्यांचा शिफारशी असणार नाही, आणि ते आपल्या भागीदारांचा इन्कार करणारे बनतील. ज्या दिवशी ती धट्का उद्धवेल त्या दिवशी (सर्व मानवमात्र) वेगळ्य़ा गटांत विभागले जातील. ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली आहे व ज्यांनी सत्कृत्ये केली आहेत ते एका बागेत आनंदीत व प्रफुल्लित ठेवले जातील, आणि ज्यांनी इन्कार केला आहे आणि आमच्या संकेतांना व मरणोत्तर जीवनाच्या भेटीला खोटे ठरविले आहे ते प्रकोपांत हजर ठेवले जातील. (११-१६)

म्हणून पावित्र्यगान करा अल्लाहचे जेव्हा तुम्ही संध्याकाळी करीत असता व जेव्हा सकाळी करीत असता. आकाशांत व पृथ्वीवर त्याच्यासाठीच स्तुती आहे. आणि (पावित्र्यगान करा त्याचे) तिसर्‍या प्रहरी आणि जेव्हा दुपारची वेळ होते. तो जीविताला मृतांतून काढतो. व मृताला जीवितातून काढून आणतो. आणि जमिनीला तिच्या मृत्यूनंतर जीवन प्रदान करतो. अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा (मृतावस्थेतून) काढून आणले जाल. (१७-१९)

त्याच्या संकेतचिन्हांपैकी हे आहे की त्याने तुम्हाला मातीपासून निर्माण केले. मग अकस्मातपणे तुम्ही लोक (पृथ्वीवर) पसरत चालला आहात. (२०)

आणि त्याच्या संकेतचिन्हांपैकी ही आहे की त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नीं बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा. आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करुणा उत्पन्न केली, निश्चितच यात बरीच संकेतचिन्हे आहेत, त्या लोकांसाठी जे मनन व चिंतन करतात. (२१)

आणि त्याच्या संकेतचिन्हांपैकी आकाशांची व पृथ्वीची उत्पत्ती, आणि तुमच्या भाषा व तुमच्या रंगांची भिन्नता आहे. निश्चितच यात बरीच संकेतचिन्हे आहेत बुद्धिमान लोकांसाठी. (२२)

आणि त्याच्या संकेतचिन्हांपैकी तुमचे रात्री व दिवसा झोपणे आणि तुमचे त्याच्या कृपाप्रसादाचा शोध घेणे होय, निश्चितच यात बरेच संकेत आहेत त्या लोकांसाठी जे (ध्यानपूर्वक) ऐकतील. (२३)

आणि त्याच्या संकेतांपैकी ही आहे की तो तुम्हाला विजेची चमक दाखवितो, भीतीबरोबरच आशा पल्लावीत करणारी, आणि आकाशातून पाण्याचा वर्षाव करतो, मग त्याच्याद्वारे तो भूमीला तिच्या मृत्यूनंतर जीवन प्रदान करतो. निश्चितच याच्यात बरेच संकेत आहेत. त्या लोकांसाठी जे बुद्धिचा उपयोग करतात. (२४)

आणि त्याच्या संकेतांपैकी हे आहे की आकाश व पृथ्वी त्याच्या आज्ञेने स्थायी आहेत. मग ज्याक्षणी तो तुम्हाला भूमीतून पुकारील केवळ एकाच हांकेत अकस्मात तुम्ही निघून याल. आकाशांत आणि पृथ्वीत जे जे आहेत त्याचे दास आहेत. सवच्या सर्व त्याच्या आज्ञाधीन आहेत. तोच आहे जो सृष्टीचा प्रारंभ करतो, मग तोच तिची पुनरावृत्ती करील आणि हे त्याच्यासाठी अधिक सुलभ आहे. आकाश आणि पृथ्वीत त्याचे गुणवैशिष्ठय सर्वात वरचढ आहे, आणि तो जबरदस्त आणि बुद्धिमान आहे. (२५-२७)

तो तुम्हाला खुद्द तुमच्या स्वत:चेच उदाहरण देतो. तुमच्या त्या दासांपैकी जे तुमच्या मालकीचे आहेत, काही दास असेसुद्धा आहेत का की जे आम्ही दिलेल्या मालमत्तेत तुमचे समान वाटेकरी म्हणून आहेत? आणि तुम्ही त्यांना असे भिता का आपापसात आपल्या तुल्यबळांना भिता? अशा प्रकारे आम्ही संकेत उघड करून प्रस्तुत करतो, त्या लोकांसाठी जे बुद्धिचा उपयोग  करतात. परंतु हे अत्याचारी काहीही न समजता-उमजता आपल्या कल्पनांच्या मागे लागले आहेत. आता त्या इसमाला कोण मार्ग दाखवू शकतो ज्याला अल्लाहने मार्गभ्रष्ट केले आहे? अशा लोकांचा तर कोणीही सहायक बनू शकत नाही. (२८-२९)

मग (हे पैगंबर (स.) आणि पैगंबरांच्या अनुयायांनो) एकाग्र होऊन आपले लक्ष या धर्माच्या दिशेत स्थिर करा. दृढ राहा त्या प्राकृतिक स्वभावावर ज्यावर सर्वश्रेष्ठ अल्लाहने मानवजातीला निर्माण केले आहे. अल्लाहने केलेली रचना बदलली जाऊ शकत नाही, हाच अगदी रास्त आणि योग्य धर्म आहे परंतु बहुतेक लोक जाणत नाहीत. (दृढ राहा या गोष्टीवर) अल्लाहकडे रुजू होत असताना, आणि भय बाळगा त्याच्या प्रकोपाचे, व नमाज कायम करा, आणि बनू नका त्या अनेकेश्वरवाद्यांपैकी, ज्यांनी आपापला धर्म वेगळा बनविला आहे आणि गटागटात विभागले गेले आहेत, प्रत्येक गटापाशी जे काही आहे त्यात तो मग्न आहे. (३०-३२)

लोकांची स्थिती अशी आहे की जेव्हा त्यांना एखादा त्रास होतो तेव्हा ते आपल्या पालनकर्त्याकडे रुजू होऊन त्याचा धावा करतात, मग जेव्हा तो आपल्या कृपेचा काही आस्वाद देतो तेव्हा अकस्मात त्यांच्यापैकी काही लोक अनेकेश्वरवाद अवलंबू लागतात जेणेकरून आम्ही केलेल्या उपकाराबद्दल कृतघ्नता दाखवावी. बरे, मौज करा. लवकरच तुम्हाला कळून चुकेल. काय आम्ही एखादी सनद आणि प्रमाण यांच्यावर उतरविला आहे की जो साक्ष देत असेल त्या अनेकेश्वरवादाच्या सत्यतेची जे हे करीत आहेत? (३३-३५)

जेव्हा आम्ही लोकांना कृपेचा आस्वाद देतो तेव्हा ते त्याच्यावर फुलून जातात आणि जेव्हा त्यांनी आपण केलेल्या कृत्यामुळे त्यांच्यावर एखादे संकट येते तेव्हा ते अकस्मात निराश होऊ लागतात. काय हे लोक पाहात नाहीत की अल्लाहच उपजीविका विपूल करतो ज्याची इच्छितो आणि संकुचित करतो (ज्याची इच्छितो)? निश्चितच यात पुष्कळ संकेत आहेत त्या लोकांसाठी जे श्रद्धा ठेवतात. म्हणून (हे श्रद्धावंता) नातेवाईकास त्याचा हक्क दे आणि गरीब व वाटसरूला (त्याचा हक्क), ही पद्धत उत्तम आहे त्या लोकांसाठी जे अल्लाहची इच्छित असतात. आणि तेच सफल होणार आहेत. जे व्याज तुम्ही देता जेणेकरून लोकांच्या मालमत्तेत मिसळून त्याची वाढ व्हावी. अल्लाहच्या जवळ ते वाढत नाही. आणि जी जकात तुम्ही अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्याच्या इच्छेने देता, ती देणारेच वास्तविकत: आपल्या मालमत्तेत वाढ करतात. (३६-३९)

अल्लाहच आहे ज्याने तुम्हाला निर्माण केले, मग तुम्हाला उपजीविका दिली, मग तो तुम्हाला मृत्यू देईल. मग तो तुम्हाला जिवंत करील. काय तुम्ही मानलेल्या भागीदारांपैकी कोणी असा आहे जो यापैकी कोणतेही काम करू शकेल? पवित्र आहे तो आणि फार उच्च व श्रेष्ठतम आहे तो त्या अनेकेश्वरवादापासून जे हे लोक करीत आहेत. खुष्की व समुद्रावर उपद्रव माजले आहेत, लोकांच्या आपल्या हातांच्या कमाईने जेणेकरून चव चाखवावी त्यांना त्यांच्या काही कृत्यांची, कदाचित ते परावृत्त होतील. (हे पैगंबर (स.)) यांना सांगा की पृथ्वीवर भ्रमण करून पहा की पूर्वी होऊन गेलेल्या लोकांचा शेवट कसा झाला आहे, त्यांच्यापैकी बहुतेक अनेकेश्वरवादीच होते. तर (हे पैगंबर (स.)) आपले लक्ष दृढतेने स्थिर करा या रास्त धर्माच्या दिशेने, यापूर्वी की तो दिवस येईल जो टाळण्याचा कोणताही  मार्ग अल्लाहकडून शिल्लक राहणारा नाही. तादिवशी लोक फुटून एक दुसर्‍यापासून विभक्त होतील. ज्याने द्रोह केला आहे त्याच्या द्रोहाचे अरिष्ट त्याच्यावरच आहे, आणि ज्या लोकांनी सत्कार्य केले आहे ते स्वत:साठीच (कल्याणाचा मार्ग) विस्तृत करीत आहेत जेणेकरून अल्लाह श्रद्धावंतांना व सत्कृत्ये करणार्‍यांना आपल्या कृपेने मोबदला देईल. निश्चितच तो अश्रद्धावंतांना पसंत करीत नाही. (४०-४५)

त्याच्या संकेतांपैकी ही एक आहे की तो वारे पाठवीत असतो शुभवार्ता देण्यासाठी आणि तुम्हाला आपल्या कृपेने उपकृत करण्यासाठी आणि यासाठी की नौका त्याच्या आज्ञेने चालाव्यात आणि तुम्ही त्याची कृपा शोधावी आणि त्याचे कृतज्ञ बनावे. आणि आम्ही तुमच्यापूर्वी पैगंबरांना त्यांच्या जनसमूहांकडे पाठविले आणि ते त्यांच्यापाशी उज्ज्वल संकेत घेऊन आले. मग ज्यांनी अपराध केला, त्यांचा आम्ही सूड घेतला. आणि आम्हावर हा ह्क्क होता की आम्ही श्रद्धावंतांची मदत करावी. (४६-४७)

अल्लाहच आहे जो वार्‍यांना पाठवितो आणि ते ढग उचलतात आणि मग तो या ढगांना आकाशात पसरवितो जसे इच्छितो आणि त्यांना तुकडीत विभागतो, मग तू पाहतोस की पावसाचे थेंब ढगातून ठिबकू लागतात, हा पाऊस जेव्हा तो आपल्या दासांपैकी ज्यांच्यावर इच्छितो वर्षवितो, तेव्हा ते अकस्मात हर्षभरित होतात. वस्तुत: त्याच्या कोसळण्यापूर्वी ते निराश होत होते. पहा, अल्लाहच्या कृपेचे परिणाम की मृत पडलेल्या जमिनीला तो कशाप्रकारे जीवित करतो. नि:संशय़ तो मृतांना जीवन प्रदान करणारा आहे व तो प्रत्येक गोष्टीवर समर्थ आहे. आणि जर आम्ही एक असा वारा पाठविला की ज्याच्या प्रभावाने त्यांना आपली शेती पिवळी आढळली तर ते द्रोह करीत बसतात. (हे पैगंबर (स.)) तुम्ही मृतांना ऐकवू शकत नाही. त्या बहिर्‍यांनादेखील आपली हाक ऐकवू शकत नाही. जे पाठ हिरवून चालू लागले असतील आणि तुम्ही आंधळ्यांनादेखील त्यांच्या पथभ्रष्टतेतून काढून सरळमार्ग दाखवू शकत नाही. तुम्ही तर फक्त त्यांनाच ऐकवू शकता जे आमच्या संकेतांवर श्रद्धा ठेवतात व आज्ञापालनार्थ मान तुकवितात. (४८-५३)

अल्लाहच तर आहे ज्याने दुर्बल अवस्थेपासून तुमच्या निर्मितीस प्रारंभ केला, मग त्या दुर्बलतेनंतर तुम्हाला शक्ती प्रदान केली. मग त्या शक्तीनंतर तुम्हाला दुर्बल व वृद्ध केले. तो जे काही इच्छितो निर्माण करतो. आणि तो सर्वकाही जाणणारा व प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे. आणि जेव्हा ती घटका उद्धवेल तेव्हा अपराधी शपथा घेऊन घेऊन सांगतील की आम्ही एका घटकेपेक्षा अधिक थांबलो नाही. अशाच प्रकारे ते लौकिक जीवनातही धोका खात असत परंतु ज्यांना ज्ञान व श्रद्धेने उपकृत केले गेले होते, ते म्हणतील की अल्लाहच्या लेखात तर तुम्ही उत्थापनाच्या दिवसापर्यंत पडून राहिला आहात, तर हाच तो उत्थापनाचा दिवस (रोजे हश्र) आहे, परंतु तुम्ही जाणत नव्हता. तर तो दिवस असेल ज्यात अत्याचार्‍यांना त्याचे निमित्त पुढे करणे काहीच लाभदायी ठरणार नाही आणि त्यांना माफी मागण्याबद्दलही सांगण्यात येणार नाही. (५४-५७)

आम्हीं या कुरआनात लोकांना भिन्नभिन्न प्रकारे समजाविले आहे, मग तुम्ही कोणताही संकेत आणा, ज्या लोकांनी मानण्यास नकार दिला आहे. ते हेच म्हणतील की तुम्ही असत्यावर आहात. अशाप्रकारे मोहर लावतो अल्लाह त्या लोकांच्या हृदयावर जे ज्ञानरहित आहेत. म्हणून (हे पैगंबर (स.)) संयम बाळगा. निश्चितच अल्लाहचे वचन सत्य आहे. आणि कदापि तुम्ही दुबळे आढळू नये त्या लोकांना जे विश्वास ठेवीत नाहीत. (५८-६०)

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP