मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अल्‌हिज्र

सूरह - अल्‌हिज्र

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने ९९)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

अलिफ. लाऽऽम. रा. ही वचने आहेत ईश्वरी ग्रंथाची व स्पष्ट कुरआनची. (१)

दुरापास्त नाही, जेव्हा ते लोक ज्यांनी आज (इस्लामचे आवाहन स्वीकारण्यास) इन्कार केला आहे, पश्चात्ताप करून सांगतील की, आम्ही इस्लामचा स्वीकार केला असता तर बरे झाले असते! सोडा यांना, खाऊ-पिऊ द्या, मौज-मजा करू द्या आणि खोटया आशेच्या संभ्रमात राहू द्या, लवकरच यांना कळून चुकेल. आम्ही यापूर्वी ज्या कोणा वस्तीला नष्ट केले आहे तिच्यासाठी एक विशिष्ट कार्यकालावधी लिहिली गेली होती. कोणताही जनसमूह आपल्या निश्चित वेळेपूर्वी नष्टही होऊ शकत नाही आणि त्यांनतर सुटूही शकत नाही. (२-५)

हे लोक म्हणतात, “हे अशा माणसा, ज्यावर हे स्मरण अवतरले आहे तू खचितच वेडा आहेस. जर तू खरा आहेस तर आम्हासमोर दूतांना घेऊन का येत नाहीस?” आम्ही दूतांना असेच अवतरीत नसतो. ते तेव्हा अवतरतात तेव्हा सत्यानिशी अवतरतात आणि मग लोकांना सवड दिली जात नाही. उरले हे स्मरण, तर हे आम्ही अवतरले आहे आणि आम्ही स्वत: याचे संरक्षक आहोत. (६-९)

हे पैगंबर (स.), आम्ही तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या बर्‍याचशा जनसमूहात प्रेषित पाठविले आहेत. कधी असे घडले नाही की त्यांच्याजवळ एखादा प्रेषित आला आणि त्यांनी त्याची चेष्टा उडविली नाही. अपराष्यांच्या ह्रदयांत तर आम्ही या स्मरणाला अशाच प्रकारे (कांबीप्रमाणे) आरपार करतो. ते यावर श्रद्धा ठेवीत नसतात. अशा प्रवृत्तीच्या लोकांची हीच पद्धत पूर्वापार आली आहे. जर आम्ही त्यांच्यावर आकाशाचे एखादे दार उघडले असते, आणि ते दिवसाढवळ्या आकाश रोहण करू लागले असते, तरीदेखील त्यांनी हेच सांगितले असते की आमच्या डोळ्यांची फसगत होत आहे किंबहुना आमच्यावर जादू केली गेली आहे. ही अमची किमया आहे की आकाशात आम्ही बरेचशे मजबूत गड बनविले, ते पाहणार्‍यांसाठी (तार्‍यांनी) सुशोभित केले. आणि प्रत्येक धि:कारित शैतानापासून त्यांना सुरक्षित केले. कोणताही शैतान त्यात मार्ग प्राप्त करू शकत नाही याखेरीज की त्याने काही कानोसा घ्यावा आणि जेव्हा तो कानोसा घ्यावा आणि जेव्हा तो कानोसा घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक प्रदीप्त ज्वाला त्याचा पाठलाग करते. (१०-१८)

आम्ही भूतलाचा विस्तार केला, तिच्यात पर्वत रोवले, तिच्यात प्रत्येक जातीची नवस्पती यथायोग्य मोजमाअ केलेल्या प्रमाणांनिशी उगविली आणि तिच्यात उदरनिर्वाहाची साधने उपलब्ध केली, तुमच्यासाठीही व त्या पुष्कळशा निर्मितीसाठीदेखील ज्यांना उपजीविका देणारे तुम्ही नाही. कोणतीही वस्तू अशी नाही जिचे खजिने आमच्याजवळ नाहीत. आणि ज्या वस्तूलादेखील आम्ही उतरवितो एका ठराविक प्रमाणात उतरवितो. फलदायी वार्‍यांना आम्हीच पाठवितो, मग आकाशातून पावसाचा वर्षाव करतो, आणि त्या पाण्याने तुम्हाला तृप्त करतो, या दौलतीचे खजिनदार तुम्ही नाहीत. जीवन आणि मरण आम्ही देतो आणि आम्हीच सर्वांचे वारस होणार आहोत. पूर्वी जे लोक तुमच्यापैकी होऊन गेले आहेत त्यांनाही आम्ही पाहून ठेवले आहे आणि नंतर येणारेदेखील आमच्या नजरेत आहेत. खचितच तुमचा पालनकर्ता त्या सर्वांना एकत्र करील, तो बुद्धिमानही आहे व सर्वज्ञदेखील. (१९-२५)

आम्ही मानवाला कुजलेल्या मातीच्या सुक्या गार्‍यापासून निर्माण केले आणि त्यपूर्वी जिन्नांना आम्ही अग्नीच्या ज्वालेपासून निर्माण केले होते. मग आठवा तो प्रसंग जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने देवदूतांना सांगितले की, “मी सेंद्रीय शुष्क मृत्तिकेपासून एक मनुष्य निर्माण करीत आहे, जेव्हा मी त्याला पूर्णपणे बनवीन आणि त्यामध्ये आपल्या आत्म्यातून काही फुंकेन तर मग तुम्ही सर्व त्याच्या समोर नतमस्तक व्हा. त्याप्रमाणे सर्व दूत नतमस्तक झाले. ‘इबलीस’ खेरीज त्याने नतमस्तक होणार्‍यांची साथ देण्यास नकार दिला. पालनकर्त्याने विचारले, “हे इब्लीस! तुला काय झाले, तू नतमस्तक होणार्‍यांची साथ दिली नाहीस?” त्याने सांगितले, “माझे हे काम नव्हे की मी त्या मनुष्यापुढे नतमस्तक व्हावे ज्याला तू सेंद्रिय शुष्क मातीपासून निर्माण केले आहे.” पालनकर्त्याने फर्माविले, “बरे, तर चालता हो येथून कारण तू बहिष्कृत आहेस आणि आता बदल्याच्या दिवसापर्यंत तुझ्यावर धिक्कार आहे.” त्याने विनंती केली, “माझ्या पालनकर्ता! जर अशी गोष्ट आहे तर मग मला त्या दिवसापर्यंत सवड दे जेव्हा सर्व माणसे पुन्हा उठविली जातील.” फर्माविले, “बरे, तर तुला सवड आहे त्या दिवसापर्यंत ज्याची वेळ आम्हाला माहीत आहे.” तो म्हणाला, “माझ्या पालनकर्त्या! जसे तू मला भरकटविलेस तसेच आता मी पृथ्वीत त्यांच्यासाठी आकर्षणे निर्माण करून त्या सर्वांना भरकटवून टाकीने, तुझ्या त्या दासांखेरीज ज्यांना तू त्यांच्यापैकी निवडक केलेले असशील.” फर्माविले, “हा रस्ता आहे जो थेट माझ्यापर्यंत पोहचतो. निस्संदेह जे माझे खरे दास आहेत त्यांच्यावर तुझी तर मात्रा केवळ त्या भरकटलेल्या लोकांवरच चालेल जे तुझे अनुकरण करतील. आणि या सर्वांसाठी नरकाची धमकावणी आहे.” (२६-४३)

हा नरक (ज्याची धमकी इब्लीसच्या अनुयायांना दिली गेले आहे) याची सात दारे आहेत, प्रत्येक दारासाठी त्यांच्यापैकी एक भाग खास केला गेला आहे. याउलट ईशपरायण लोक बागेत आणि झर्‍यांच्यामध्ये राहतील. आणि त्यांना सांगितले जाईल की प्रवेश करा यात सुखरूपपणे आणि निर्भयपणे व बिनधोकपणे, त्यांच्या ह्रदया जी काही थोडी फार खोट-कपट असेल ती आम्ही काढून टाकू. ते आपापसांत भाऊ-भाऊ बनून समोरासमोर तखतांवर बसतील. त्यांना तेथे कोणत्याही कष्टाला सामोरे जावे लागणार नाही आणि ते तेथून निष्काशीत केले जाणार नाहीत. (४४-४८)

हे पैगंबर (स.)! माझ्या दासांना खबर द्या की मी फार क्षमाशील आणि परम कृपाळू आहे, परंतु याबरोबरच माझा प्रकोपदेखील अत्यंत दु:खदायी आहे. (४९-५०)

आणि यांना जरा इब्राहीम (अ.) च्या पाहुण्यांची कहाणी ऐकवा. जेव्हा ते आले त्याच्या येथे आणि म्हणाले, “सलाम असो तुम्हांवर,” तेव्हा त्याने सांगितले, “आम्हाला तुमचे भय वाटते.” त्यांनी उत्तर दिले, “भिऊ नका, आम्ही तुम्हाला एका मोठया ज्ञानी मुलाची खुशखबर देत आहोत.” इब्राहीम (अ.) ने सांगितले, “तुम्ही या म्हातारपणी मला संततीची सुवार्ता देता काय? थोडे विचार तरी करा की कसली सुवर्ता तुम्ही मला देत आहात?” त्यांनी उत्तर दिले. “आम्ही तुम्हाला सत्याधिष्ठित सुवार्ता देत आहोत, तुम्ही निराश होऊ नये.” इब्राहीम (अ.) ने सांगितले, “आपल्या पालनकर्त्याच्या कृपेपासून निराश तर केवळ पथभ्रष्ट लोकच होत असतात.” मग इब्राहीम (अ.) ने विचारले, “हे अल्लाहच्या दूतांनो! ती कोणती मोहीस आहे ज्यास्तव आपले आगमन झाले आहे?” ते म्हणाले, “आम्ही एका अपराधी जनसमुहाकडे पाठविले गेली आहोत. केवळ लूत (अ.) चे कुटुंबीय याला अपवाद आहेत, त्या सर्वांना आम्ही वाचवू, त्याच्या पत्नीव्यतिरिक्त की जिच्यासाठी (अल्लाह फर्मावितो की) आम्ही नियोजित केले आहे की ती पाठीमागे राहणार्‍यांत समाविष्ट असेल.” (५९-६०)

मग जेव्हा हे दूत लूत (अ.) पाशी पोहचले, तर त्याने सांगितले, “आपण अनोळखी दिसता.” त्यांनी उत्तर दिले, “नाही, तर आम्ही तीच गोष्ट घेऊन आलेलो आहोत जिच्या येण्यात हे लोक शंका घेत होते. आम्ही तुम्हाला खरे सांगतो की आम्ही सत्यानिशी तुमच्यापाशी आलेलो आहोत. म्हणून आता काही रात्र उरली असता आपल्या कुटुंबियांना घेऊन निघून जा आणि स्वत: त्यांच्या मागोमाग चला. तुमच्यापैकी कोणीही मागे वळून पाहू नये. बस्स, सरळ चालत जा जिकडे जाण्याची तुम्हाला आज्ञा दिली जात आहे.” आणि त्याला आम्ही आमचा हा निर्णय पोहचविला की उजाडताच यांचे समूळ उच्चाटन केले जाईल. (६१-६६)

इतक्यात शहराचे लोक हर्षोन्मादित होऊन लूत (अ.) च्या घरावर चालून आले. लूत (अ.) ने सांगितले, “बंधूनो! हे माझे पाहुणे आहेत, माझी फजिती करू नका, अल्लाहच्या कोपाचे भय बाळगा, मला अपमानित करू नका.” ते म्हणाले, “आम्ही वारंवार तुम्हाला मनाई केली नाही काय की सार्‍या जगाचे मक्तेदार बनू नका?” लूत (अ.) ने (जेरीस येऊन) सांगितले, “जर तुम्हाला काही करावयाचेच असेल तर या माझ्या मुली हजर आहेत.” (६७-७१)

तुझ्या जीवाची शपथ हे पैगंबर (अ.). त्यावेळी त्यांच्यावर एक प्रकारची धुंदी चढली होती ज्यामध्ये ते अनियंत्रित होत चालले होते, सरतेशेवटी तांबडे फुटताच एका भयंकर स्फोटाने त्यांना गाठले आणि आम्ही त्या वस्तीला उलथेपालथे करून टाकले आणि त्यांच्यावर भाजलेल्या मातीच्या दगडांचा वर्षाव केला. (७२-७४)

या घटनेत मोठे संकेत आहेत त्या लोकांसाठी जे द्रष्टे (ज्ञानी) आहेत. आणि तो प्रदेश (जेथे ही घटना घडली होती) हमरस्त्यावर स्थित आहे. यांच्यात बोध-सामग्री आहे त्या लोकांसाठी जे श्रद्धावंत आहेत. (७५-७७)

आणि ऐका वाले अत्याचारी होते, तर पहा की आम्हीदेखील त्यांच्यावर सूड उगविला, आणि या दोन्ही जनसमूहांचे उध्वस्त प्रदेश खुल्या रस्त्यावर स्थित आहेत. (७८-७९)

हिज्रच्या लोकांनीदेखील पैगंबरांना खोटे ठरविले आहे. आम्ही आमची वचने त्यांच्यापाशी पाठविली, आमची वचने त्यांना दाखविली परंतु ते सर्वांकडे दुर्लक्षच करीत राहिले. ते पर्वत कोरून घरे बनवीत असत आणि आपल्याठायी अगदी निर्धास्त आणि समाधानी होते. सरतेशेवटी एका भयंकर स्फोटाने सकाळ होताच त्यांना गाठले. आणि त्यांची संपत्ती त्यांच्या काहीही उपयोगी पडली नाही. (८०-८४)

आम्ही जमीन आणि आकाशांना आणि त्यांच्यात अस्तित्वात असलेल्या सर्वांना सत्याशिवाय इतर कोणत्याही आधारावर निर्माण केले नाही. आणि निर्णयाची घटका निश्चितच येणार आहे, मग हे पैगंबर (स.)! तुम्ही (या लोकांच्या अशिष्टतेवर) सभ्यतेने दुर्लक्ष करीत रहा. निश्चितच तुमचा पालनकर्ता सर्वांचा निर्माता आहे आणि तो सर्वकाही जाणतो. आम्ही तुम्हाला सात वचने अशी दिली आहेत जी पुनरोक्ती करण्यास योग्य आहेत, आणि तुम्हाला महान कुरआन प्रदान केला आहे. तुम्ही त्या ऐहिक सामग्रीकडे दृष्टीक्षेपदेखील करू नका, जी आम्ही यांच्यापैकी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना देऊन टाकली आहे, आणि यांच्या स्थितीवरदेखील आपले मन दु:खी होऊ देऊ नका. यांना सोडून श्रद्धावंतांकडे वळा. आणि न मानणार्‍यांना सांगा, “मी तर उघडउघड सूचना देणारा आहे.” ही त्याच प्रकारची सूचना आहे जशी आम्ही त्या फूट पाडणार्‍या लोकांकडे पाठविली होती, ज्यांनी आपल्या कुरआनला तुकडेतुकडे केले आहे. तर शपथ आहे तुझ्या पालनकर्त्याची आम्ही जरूर त्या सर्वांना विचारू की तुम्ही काय करीत होतात? (८५-९३)

तर हे पैगंबर (स.), तुम्हाला ज्या गोष्टीची आज्ञा दिली जात आहे ती पुकारून सांगा आणि अनेकेश्वरवाद्यांची अजिबात पर्वा करू नका. तुमच्यातर्फे आम्ही त्या चेष्टा करणार्‍यांचा समाचार घेण्यास पुरेसे आहोत,

जे अल्लाहबरोबर अन्य इतरांना देखील ईश्वर ठरवितात, लवकरच त्यांना माहीत होईल. (९४-९६)

आम्हाला माहीत आहे ज्या गोष्टी हे तुमच्यावर रचतात, त्यामुळे तुमचे अंत:करण दु:खी होत आहे. (त्याचा इलाज असा आहे की) आपल्या पालनकर्त्याच्या स्तुतीबरोबर त्याचे पावित्रगान करा, त्याच्या ठायी नतमस्तक व्हा, आणि त्या शेवटच्या घटकेपर्यंत आपल्या पालनकर्त्याची भक्ती करीत रहा जिचे आगमन निश्चित आहे. (९७-९९)

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP