मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अल्‌फत्‌ह

सूरह - अल्‌फत्‌ह

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मदीनाकालीन, वचने २९)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

हे पैगंबर (स.), आम्ही तुम्हाला उघड विजय प्रदान केला जेणेकरून अल्लाहने तुमच्या पुढील व पाठीमागील उणिवांना माफ करावे आणि तुमच्यावर आपली देणगी परिपूर्ण करावी व तुम्हाला सरळमार्ग दाखवावा आणि तुम्हाला जबरद्स्त सहाय्य प्रदान केले. तोच आहे ज्याने श्रद्धावंतांच्या ह्रदयांत ‘सकीनत’ (शांती) उतरविली जेणेकरून आपल्या श्रद्धेसमवेत त्यांनी आणखी एक श्रद्धा वाढवावी. पृथ्वी व आकाशांचे सर्व लष्कर अल्लाहच्या अधिकारात आहे आणि तो सर्वज्ञ व बुद्धिमान आहे. (त्याने हे काम अशासाठी केले आहे) जेणेकरून श्रद्धावंत पुरुष आणि स्त्रियांना सदैव राहण्यासाठी अशा स्वर्गामध्ये दाखल करावे ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील आणि त्यांच्या वाईट गोष्टी त्यांच्यापासून दूर केल्या जातील. अल्लाह जवळ हे मोठे यश आहे आणि त्या दांभिक पुरुष आणि स्त्रियांना आणि अनेकेश्वरवादी पुरुष आणि स्त्रियांना शिक्षा द्यावी जे अल्लाहच्या संबंधाने वाईट कल्पना बाळगतात. वाईटाच्या फेर्‍यात ते स्वत:च आले, अल्लाहचा प्रकोप त्यांच्यावर झाला आणि त्याने त्यांचा धिक्कार केला आणि त्यांच्यासाठी नरक उपलब्ध करून दिला जे फारच वाईट स्थान आहे. पृथ्वी आणि आकाशांचे लष्कर अल्लाहच्याच अधिकारांत आहेत आणि तो जबरदस्त व बुद्धिमान आहे. (१-७)

हे पैगंबर (स.), आम्ही तुम्हाला साक्ष देणारा, शुभवार्ता देणारा, आणि खबरदार करणारा बनवून पाठविले आहे जेणेकरून हे लोकहो तुम्हॊ अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर श्रद्धा ठेवावी आणि त्याला (अर्थात पैगंबराला) साथ द्यावी. त्याचा आदर-सन्मान करावा आणि सकाळ-संध्याकाळ अल्लाहचे पावित्र्यगान करीत राहावे. (८-९)

हे पैगंबर (स.), जे लोक तुमच्याशी ‘बैअत’ (प्रतिज्ञा) करीत होते वास्तविकत: ते अल्लाहशी ‘बैअत’ करीत होते. त्यांच्या हातावर अल्लाहचा हात होता. आता जो ती प्रतिज्ञा भंग करील त्याच्या प्रतिज्ञाभंग करण्याचे अरिष्ट त्याच्या स्वत:वरच येईल, आणि जो त्या प्रतिज्ञेचे पालन करी जी त्याने अल्लाहशी केलेली आहे, अल्लाह लवकरच त्याला महान मोबदला प्रदान करील.(१०)

हे पैगंबर (स.), ग्रामीण अरबांपैकी जे लोक पाठीमागे सोडलेले होते ते आता येऊन जरूर तुम्हाला संगतील की, “आम्हाला आपली मालमत्ता व कुटुंबाच्या चिंतेने गुंतवून ठेवले होते. आपण आमच्यासाठी क्षमेची प्रार्थना करावी.” हे लोक आपल्या जिभांनी त्या गोष्टी सांगतात ज्या यांच्या ह्रदयांत नाहीत. यांना सांगावे, “अच्छा, अशीच गोष्ट असेल तर कोण तुमच्या बाबतीत अल्लाहचा निर्णय रोखण्याचा जरासुद्धा अधिकार बाळगतो, जर तो तुम्हाला काही नुकसान पोहचवू इच्छित असेल अथवा लाभ प्रदान करू इच्छित असेल? तुमच्या कृत्याची तर अल्लाहच खबर राखणारा आहे. (परंतु खरी गोष्ट ती नव्हे जी तुम्ही सांगत आहात) तर तुम्ही असे समजला की पैगंबर व श्रद्धावंत आपल्या कुटुंबियांत कदापि परतून येऊ शकणार नाहीत आणि ही कल्पना तुमच्या मनाला फार चांगली वाटली आणि तुम्ही फार वाईट कल्पना लढविल्या व तुम्ही अत्यंत दुष्ट अंत:करणाचे लोक आहात. (११-१२)

अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर जे लोक श्रद्धा ठेवत नसतील अशा अश्रद्धावंतांसाठी आम्ही भडकत असलेला अग्नी तयार ठेवला आहे. आकाशांच्या व पृथ्वीच्या बादशाहीचा स्वामी अल्लाहच आहे, ज्याला हवे त्याला माफ करील व हवे त्याला शिक्षा करील आणि तो क्षमाशील व परम कृपाळू आहे. (१३-१४)

जेव्हा तुम्ही गनीम माल प्राप्त करावयास जाऊ लागाल तेव्हा हे पाठीमागे सोडण्यात आलेले लोक तुम्हाला जरूर सांगतील की आम्हालासुद्धा आपल्या बरोबर येऊ द्या. हे इच्छितात की अल्लाहच्या आदेशाला बदलून टाकावे. यांना स्पष्ट सांगा की, “तुम्ही कदापि आमच्याबरोबर येऊ शकत नाही, अल्लाहने अगोदरच हे फर्माविले आहे,” हे म्हणतील की, “नव्हे, तर तुम्ही आमच्याशी मत्सर बाळगत आहात.” (वस्तुत: ही गोष्ट मत्सराची नव्हे) तर हे लोक सत्य गोष्ट क्वचितच समजतात. या पाठीमागे सोडलेल्या ग्रामीण अरबांना सांगा की, “लवकरच तुम्हाला अशा लोकांशी लढावयाला पाचारण केले जाईल जे मोठे बलवान आहेत. तुम्हाला त्यांच्याशी युद्ध करावे लागेल अथवा ते आज्ञाधारक बनतील. त्यावेळी जर तुम्ही युद्धाच्या आज्ञेचे पालन केले तर अल्लाह तुम्हाला चांगला मोबदला देईल, आणि जर तुम्ही पुन्हा तसेच तोंड फिरविले जसे पूर्वी फिरविले आहे तर अल्लाह तुम्हाला यातनादायक शिक्षा देईल. परंतु जर आंधळा व लंगडा आणि रुग्ण; युद्धासाठी आले नाहीत तर काही हरकत नाही. जो कोणी अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांचे आज्ञापालन करील, अल्लाह त्याला त्या स्वर्गात दाखल करील ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील, आणि जो तोंड फिरवील त्याला तो दु:खदायक यातना देईल.” (१५-१७)

अल्लाह श्रद्धावंतांवर प्रसन्न झाला जेव्हा ते वृक्षाखाली तुमच्याशी बैअत (प्रतिज्ञा) करीत होते. त्यांच्या ह्रदयांची स्थिती त्याला माहीत होती, म्हणून त्याने त्यांच्यावर ‘सकीनत’ (शांती) उतरविली. त्यांना बक्षीस म्हणून निकटचा विजय प्रदान केला आणि बराचसा गनीमचा माल त्यांना प्रदान केला ज्याला ते (लवकरच) प्राप्त करतील. अल्लाह जबरदस्त आणि बुद्धिमान आहे. अल्लाह तुम्हाला पुष्कळ गनीमच्या मालाचे वचन देतो जो तुम्ही प्राप्त कराल. तूर्त तर हा विजय त्याने तुम्हाला प्रदान केला आणि लोकांचे हात तुमच्याविरूद्ध उठण्यापासून रोखले, जेणेकरून श्रद्धावंतांसाठी एक संकेत बनून राहावा आणि अल्लाहने तुम्हाला सरळ मार्गाकडे मार्गदर्शन करावे. याच्या व्यतिरिक्त दुसर्‍या अन्य गनीम मालांचासुद्धा तो तुमच्याशी वायदा करतो-ज्यासाठी तुम्ही अद्याप समर्थ झालेले नाही आणि अल्लाहने त्यांना वेढून ठेवले आहे. अल्लाह प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे. (१८-२१)

हे अश्रद्धावंत लोक जर यावेळी तुमच्याशी लढले असते तर निश्चितच त्यांनी पाठ फिरविली असती आणि कोणीही संरक्षक आणि सहायक त्यांना प्राप्त झाला नसता. हा अल्लाहचा प्रघात आहे जो पूर्वापार चालत आलेला आहे, आणि तुम्हाला अल्लाहच्या शिरस्त्यांत कोणतेही परिवर्तन आढळणार नाही. तोच आहे ज्याने मक्केच्या खोर्‍यात त्यांचे हात तुमच्यापासून व तुमचे हात त्यांच्यापासून रोखले, वस्तुत: त्याने तुम्हाला त्यांच्यावर वर्चस्व प्रदान केलेले होते आणि जे काही तुम्ही करीत होता अल्लाह ते पाहत होता. तेच लोक तर आहेत ज्यांनी द्रोह केला आणि तुम्हाला ‘मसजिदे हराम’ (काबा मस्जिद) पासून रोखले आणि कुर्बानीच्या उंटांना त्यांच्या कुर्बानीच्या स्थळी पोहचू दिले नाही. जर (मक्केत) असे श्रद्धावत पुरुष व स्त्री उपस्थित नसते ज्यांना तुम्ही जाणत नाही, आणि अशी भीती नसती की अजाणपणे तुम्ही त्यांना चिरडून टाकाल आणि त्यामुळे तुमच्यावर आळ येईल (तर युद्ध रोखले गेले नसते, ते यासाठी रोखले गेले) जेणेकरून अल्लाहने आपल्या कृपाछत्रांत हवे त्याला सामावून घ्यावे. ते श्रद्धावंत वेगळे झाले असते तर (मक्कावासीयांपैकी) जे अश्रद्धावंत होते त्यांना आम्ही जरूर कठोर शिक्षा दिली असती. (हेच कारण आहे की) जेव्हा या अश्रद्धावंतांनी आपल्या ह्रदयांत अज्ञानपूर्ण दुराभिमान बाळगला तेव्हा अल्लाहने आपल्या पैगंबरांवर व श्रद्धावंतांवर ‘सकीनत’ (शांती) उतरविली, आणि श्रद्धावंतांना ईशपरायणतेच्या वचनावर कायम ठेवले की तेच त्याचे अधिक हक्कदार व त्यास पात्र होते. अल्लाहला सर्व गोष्टींचे ज्ञान आहे. (२२-२६)

प्रत्यक्षात अल्लाहने आपल्या पैगंबराला खरे स्वप्न दाखविले होते जे तंतोतंत सत्याधिष्ठित होते. अल्लाहने इच्छिले तर तुम्ही जरूर ‘मसजिदे हराम’ मध्ये पूर्ण शांततेने प्रविष्ट व्हाल, आपल्या डीकीचे मुंडन करवाल आणि केस कापवाल आणि तुम्हाला कोणतेही भय असणार नाही, तो ती गोष्ट जाणत होता जी तुम्ही जाणत नव्हता, म्हणून ते स्वप्न साकार होण्य़ापूर्वी त्याने हा निकटचा विजय विजय तुम्हाला प्रदान केला. (२७)

तो अल्लाहच आहे ज्याने आपल्या पैगंबराला मार्गदर्शन आणि सत्य धर्मानिशी पाठविले आहे जेणेकरून सर्व धर्म-प्रकारांवर त्याचे वर्चस्व बहाल करावे आणि या सत्यतेवर अल्लाहची ग्वाही पुरेशी आहे. मुहम्मद (स.) अल्लाहचे प्रेषित आहेत, आणि जे लोक त्यांच्यासमवेत आहेत ते अश्रद्धावंतांच्याविरूद्ध कठोर आणि आपापसांत दयाळू आहेत. तुम्ही जेव्हा पहाल, त्याना वांकताना व नतमस्तक होताना (रुकुअ व सजदा करताना) आणि अल्लाहची कृपा व त्याच्या प्रसन्नतेच्या शोधार्थ निमग्र पहाल. नतमस्तक  होण्याचे परिणाम त्यांच्या चेहर्‍यावर विद्यमान आहेत ज्यांच्यामुळे ते वेगळे ओळखले जातील. असे आहे की जणू एक शेती आहे जिने प्रथम अंकुर बाहेर काढले, मग त्याला बळकटी दिली, नंतर त्याची रोपे झाली मग आपल्या तनावर उभे राहिली. शेती करणार्‍यांना ते खुश करते जेणेकरून अश्रद्धावंताचा त्याच्या बहरण्याने जळफळाट होईल. या जनसमूहाचे लोक ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे आणि ज्यांनी सत्कृत्ये केली आहेत अल्लाहने त्यांना क्षमा व महान मोबदल्याचे वचन दिले आहे. (२८-२९)

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP