मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अल्‌अहजाब

सूरह - अल्‌अहजाब

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मदीनाकालीन, वचने ७३)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

हे नवी (स.)! अल्लाहचे भय बाळगा आणि सत्याचा इन्कार करणार्‍यांचे व दांभिकांचे आज्ञापालन करू नका. वास्तविकत: सर्वज्ञ व बुद्धिमान तर अल्लाहच आहे. अनुकरण करा त्या गोष्टीचे ज्याचा इशारा तुमच्या पालनकर्त्याकडून तुम्हाला दिला जात आहे. अल्लाह त्या प्रत्येक गोष्टीची माहीती राखणारा आहे जी तुम्ही लोक करता. अल्लाहवर भिस्त ठेवा, अल्लाहच भिस्त ठेवण्यास पुरेसा आहे. (१-३)

अल्लाहने कोणत्याही व्यक्तीच्या उरांत दोन ह्रदये ठेवलेली नाहीत, व तुम्हा लोकांच्या त्या पत्नींना ज्यांच्याशी तुम्ही मातेसमान वर्तन करता त्याने तुमची आई बनविली नाही आणि त्याने तुमच्या मानलेल्या पुत्रांनाही तुमचे खरे मुलगे बनविलेले नाही. या तर त्या गोष्टी आहेत. ज्या तुम्ही लोक आपल्या तोंडाने काढता परंतु अल्लाह ती गोष्ट सांगतो जी सत्याधिष्ठित आहे, आणि तोच योग्य मार्गाकडे मार्गदर्शन करतो. दत्तक पुत्रांना त्यांच्या पित्यांशी संबंधित करून बोलावील जा, ही अल्लाहपाशी अधिक न्यायसंगत गोष्ट आहे, आणि जर तुम्हाला माहीत नसेल की त्यांचे वडील कोण आहेत तर ते तुमचे धर्मबंधू आणि मित्र आहेत. न कळत जो गोष्ट तुम्ही सांगाल त्याबद्दल तुमच्यावर काही आक्षेप नाही परंतु त्या गोष्टीची जरूर विचारणा होईल जिचा तुम्ही ह्रदयापासून निश्चय कराल. अल्लाह क्षमाशील आणि परमकृपाळू आहे. (४-५)

श्रद्धावंतांसाठी प्रेषितांचे स्थान त्यांच्या स्वत:च्या जीवापेक्षा वरचढ आहे. आणि नबीच्या पत्नी त्यांच्या माता आहेत. परंतु अल्लाहच्या ग्रंथानुसार सर्वसामान्य श्रद्धावंत व स्थलांतर करून आलेले, यांच्यापेक्षा नातेवाईक एकमेकाचे अधिक हक्कदार आहेत. तथापि आपल्या मित्रांशी तुम्ही एखादी भलाई (करू इच्छित असाल तर) करू शकता, ही आज्ञा अल्लाहच्या ग्रंथात लिहिलेली आहे. (६)

आणि (हे पैगंबर (स.)) आठवण ठेवा त्या करारमदाराची जो आम्ही सर्व पैगंबरांकडून तसेच तुमच्याकडून देखील करून घेतला आहे, नूह (अ.) व इब्राहीम (अ.) आणि मुसा (अ.) व मरयमपुत्र ईसा (अ.) कडूनदेखील, सर्वांकडून आम्ही पक्के वचन घेतले आहे. (७)

जेणेकरून खर्‍या लोकांना (त्यांचा पानलकर्ता) त्यांच्या सचोटीसंबंधी विचारणा करील, आणि अश्रद्धावंतांसाठी तर त्याने यातनादायक प्रकोप तयार ठेवलाच आहे, स्मरण करा अल्लाहच्या उपकाराचे जे (नुकतेच) त्याने तुम्हावर केले आहे, जेव्हा फौजा तुम्हावर चालून आल्या तेव्हा आम्ही त्याच्यावर एक भयंकत वादळ पाठविले. आणि अशा फौजा रवाना केल्या ज्या तुम्हाला दिसत नव्हत्या, अल्लाह ते सर्वकाही पाहात होता ते तुम्ही लोक त्यावेळी करीत होता. जेव्हा वरून व खालून तुम्हावर शत्रू चाल करून आले, जेव्हा भीतीपोटी डोळे थिजले, काळीज तोंडाशी आले आणि तुम्ही लोक अल्लाहसंबंधी तर्‍हेतर्‍हेचे ग्रह करू लागला, त्यावेळी श्रद्धावंतांची चांगलीच परीक्षा घेतली गेली आणि भयंकरपणे हादरवून सोडले गेले. (८-११)

स्मरण करा ती वेळ जेव्हा दांभिक आणि ते सर्व लोक ज्यांच्या ह्रदयांत रोग होता, स्पष्टपणे सांगत होते की अल्लाह आणि त्याचे पैगंबर (स.) यांनी जे वचन आम्हाला दिले होते ते फसवणुकीशिवाय अन्य काहीच नव्हते. जेव्हा त्यांच्यापैकी एका गटाने सांगितले की, “हे यसरिब (मदीना) च्या लोकांनो, तुमच्यासाठी आता थांबण्याचा कोणताही प्रसंग नाही, परत फिरा.” जेव्हा त्यांचा एक गट असे म्हणून नबी (स.) कडून परवानगी मागत होता की, “आमची घरे धोक्यात आहेत.” वस्तुत: ते धोक्यात नव्हते, खरे तर ते (युद्ध आघाडीपासून) पळ काढू इच्छित होते. जर शहराच्या भोवतीने शत्रू घुसूज्न आले असते आणि त्यावेळी यांना उपद्रवाकडे आमंत्रित केले गेले असते तर हे त्यात सामील झाले असते. आणि मुश्किलीनेच यांना उपद्रवात सामील होण्यात संकोच वाटला असता. या लोकांनी यापूर्वी अल्लाहशी करार केला होता की हे पाठ दाखविणार नाहीत आणि अल्लाहशी केलेल्या कराराची विचारपूस तर होणारच होती. (१२-१५)

हे पैगंबर (स.)! यांना सांगा, जर तुम्ही मृत्यू अथवा ठार होण्यापासून पळ काढला तर हे पळ काढणे तुमच्यासाठी काहीही लाभदायक ठरणार नाही. यानंतर जीवनाचा आनंद लुटण्याची थोडीच संधी तुम्हाला मिळू शकेल. यांना सांगा, कोण आहे जो तुम्हाला अल्लाहपासून वाचवू शकेल जर त्याने तुम्हाला नुकसान पोहचविण्याचे इच्छिले? आणि कोण त्याच्या कृपेला रोखू शकतो जर त्याने तुमच्यावर मेहरबानी करू इच्छिले? अल्लाहच्याविरूद्ध तर हे लोक कोणताही समर्थक व सहायक प्राप्त करू शकत नाहीत. (१६-१७)

अल्लाह तुमच्यापैकी त्या लोकांना चांगलेच जाणतो जे (युद्ध कार्यात) अडथळे आणणारे आहेत, जे आपल्या बंधूना म्हणतात की, “या आमच्याकडे” जे युद्धात जरी भाग घेतात तरी केवळ नावापुरतेच, जे तुम्हाला साथ देण्यात अत्यंत कंजूष आहेत. धोक्याची वेळी आली की तुमच्याकडे अशा प्रकारे बाहुल्या फिरवून फिरवून पाहतात जणू एखाद्या मरणार्‍याला बेशुद्धी येत असावी परंतु जेव्हा धोका टळून जातो तेव्हा हेच लोक फायद्याचे लोभी बनून कात्रीप्रमाणे चालणार्‍या जिभा घेऊन तुमच्या स्वागतासाठी येतात. या लोकांनी मुळीच श्रद्धा ठेवली नाही, म्हणूनच अल्लाहने यांची सर्व कार्ये वाया घालविली. आणि असे करणे अल्लाहसाठी फारच सोपे आहे. हे समजत आहेत की हल्लेखोर टोळ्या अद्याप गेलेल्या नाहीत आणि जर त्यांनी पुन्हा आक्रमण केले तर यांची इच्छा होते कीज त्याप्रसंगी यांनी कोठे तरी वाळवंटात बहू लोकांच्या दरम्यान जाऊन बसावे आणि तेथूनच तुमच्या हालहवालाची विचारणा करीत राहावे. तथापि जर हे तुमच्या दरम्यान राहिले तरीसुद्धा हे युद्धात कमीच भाग घेतील. (१८-२०)

वस्तुत: तुम्हा लोकासाठी अल्लाहचे पैगंबर एक उत्कृष्ट आदर्श आहेत, त्या प्रत्येक माणसासाठी जो अल्लाह व मरणोत्तर जीवनाच्या दिवसाचा उमेदवार असेल आणि बहुतांशी अल्लाहचे स्मरण करीत असेल, आणि खर्‍या श्रद्धावंतांची (अवस्था त्यावेळी अशी होती की) जेव्हा त्यांनी आक्रमक लष्करांना पाहिले तेव्हा त्यांनी पुकारले, “ही तीच गोष्ट आहे जिचे अल्लाह व त्याचा पैगंबर (स.) यांनी आम्हाला वचन दिले होते, अल्लाह व त्याचा पैगंबर (स.) यांचे म्हणणे अगदी खरे होते.” या घटनेने त्यांच्या श्रद्धेला व त्यांच्या समर्पणाला अधिक वृद्धिंगत केले. श्रद्धा ठेवणार्‍यांत असले लोक हजर आहेत ज्यांनी अल्लाहशी केलेल्या कराराला खरे करून दाखविले आहे. त्यांच्यापैकी कोणी आपले नवस पुरे केले आहे तर कोणी वेळ येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांनी आपल्या वर्तनांत कोणतेही परिवर्तन केले नाही. (हे सर्वकाही याकरिता घडले) जेणेकरून अल्लाह खर्‍यांना त्यांच्या सचोटीचा मोबदला देईल आणि दांभिकांना हवे तर शिक्षा करील आणि हवे तर त्यांची तौबा (पश्चात्ताप) कबूल करील. नि:संशय अल्लाह क्षमाशील व कृपाळू आहे. (२१-२

अल्लाहने अश्रद्धावंतांना परतवून लावले, ते कोणताही लाभ प्राप्त केल्याविना आपल्या मनाच्या जळफळाटानिशी असेच मागे परतले, आणि श्रद्धावंतांकडून अल्लाहच लढण्यासाठी पुरेसा ठरला, अल्लाह महान शक्तिमान आणि जबरदस्त आहे. मग ग्रंथधारकांपैकी ज्या लोकांनी या हल्लेखोरांना साथ दिली होती. अल्लाहने त्यांना त्यांच्या गढीतून उतरवून खाली आणले आहे त्यांच्या ह्रदयांत त्याने असा वचक बसाविला की आज त्यांच्यापैकी एका गटाला तुम्ही ठार करीत आहात आणि दुसर्‍या गटाला कैद करीत आहात. त्याने तुम्हाला त्यांच्या जमिनीचे आणि त्यांच्या घरांचे व त्याच्या मालमत्तेचे वारस बनविले आणि तो प्रदेश तुम्हाला प्रदान केला ज्याला तुम्ही कधीही तुडविले नव्हते. अल्लाह प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे. (२५-२७)

हे नबी (स.), आपल्या पत्नींना सांगा, जर तुम्ही हे भौतिक जग आणि त्याचे ऐश्वर्य इच्छित असाल तर या, मी तुम्हाला काही देऊन चांगल्या पद्धतीने निरोप देतो. आणि जर तुम्ही अल्लाह व त्याचे पैगंबर (स.) आणि मरणोत्तर जीवनाच्या घराचे इच्छुक असाल तर जाणून असा की तुम्हापैकी ज्या सत्कर्मी आहेत; अल्लाहने त्यांच्यासाठी मोठा मोबदला तयार ठेवला आहे. (२८-२९)

नबी (स.) च्या पत्नींनो, तुमच्यापैकी जी एखाद्या उघड अश्लील कृतीच्या आहारी जाईला तिला दुहेरी यातना दिली जाईल. अल्लाहसाठी हे फारच सोपे काम आहे. आणि तुमच्यापैकी जी अल्लाह आणि त्याच्या पैगंबर (स.) यांची आज्ञा पाळील आणि सत्कर्म करील तिला आम्ही दुप्पट मोबदला देऊ. आणि तिच्यासाठी आम्ही सन्मानाची उपजीविका उपलब्ध ठेवली आहे. (३०-३१)

नबी (स.) च्या पत्नींनो! तुम्ही सामन्य स्त्रियांप्रमाणे नाहीत. जर तुम्ही अल्लाहचे भय बाळगणार्‍या असाल तर ह्ळू आवाजात बोलत जाऊ नका की विकृत ह्रदयाचा एखादा माणूस लालसेत पडेल, तर स्पष्ट सरळ आवाजात बोला. आपल्या घरांत टिकून राहा आणि गत अज्ञानमूलक काळाप्रमाणे शृंगाराचे प्रदर्शन करीत फिरू नका. नमाज कायम करा, जकात द्या, अल्लाह आणि त्याचे पैगंबर (स.) यांचे आज्ञापालन करा, हे पैगंबरांच्या कुटुंबियांनो तुमच्यापासून अपवित्र दूर करावे आणि तुम्हाला पूर्णपणे पवित्र करावे ही अल्लाहची इच्छा आहे. आठवण ठेवा अल्लाहच्या संकेतांची आणि बुद्धिमत्तेच्या त्या गोष्टींची ज्या तुमच्या घरांत ऐकविल्या जातात. नि:संशय अल्लाह सूक्ष्मदर्शी आणि खबर राखणारा आहे. (३२-३४)

खचितच जे पुरुष आणि ज्या स्त्रिया मुस्लिम आहेत, श्रद्धावंत आहेत, आज्ञाधारक आहेत, सत्यानिष्ठ आहेत, संयमी आहेत, अल्लाहच्या समोर झुकणारे आहेत, दानधर्म करणारे आहेत, उपवास करणारे आहेत, आपल्या शीलांचे रक्षण करणारे आहेत, आणि मोठया प्रमाणात अल्लाहचे स्मरण करणारे आहेत, अल्लाहने त्यांच्यासाठी क्षमा आणि महान मोबदला तयार ठेवला आहे. (३५)

कोणत्याही श्रद्धावंत पुरुषाला आणि कोणत्याही श्रद्धावंत स्त्रीला हा अधिकार नाही की जेव्हा अल्लाह व त्याचे पैगंबर (स.) यांनी एखाद्या बाबतीत निर्णय दिला असेल तर मग आपल्या त्या बाबीत स्वत: निर्णय घेणे त्याच्या अख्त्यारीत असेल आणि जो कोणी अल्लाह व त्याचे पैंगबर (स.) यांची अवज्ञा करील तर तो उघडपणे मार्गभ्रष्टतेत पडेल. (३६)

हे पैगंबर (स.), स्मरण करा तो प्रसंग जेव्हा तुम्ही त्या माणसाला म्हणत होता ज्याच्यावर अल्लाहने आणि तुम्ही उपकार केले होते, “आपल्या पत्नीला सोडू नको आणि अल्लाहचे भय बाळग.” त्यावेळी तुम्ही आपल्या मनात ती गोष्ट लपवून ठेवली होती जिला अल्लाह उघड करू इच्छित होता, तुम्ही लोकांना भीत होता, वस्तुत: अल्लाह या गोष्टीचा जादा हक्कदार आहे की तुम्ही त्याच्या कोपाला भ्यावे. मग जेव्हा जैद (रजि.) ने तिचा उपभोग घेतला तेव्हा आम्ही तिचा (घटस्फोटित स्त्रीचा) तुमच्याशी विवाह केला, की जेणेकरून ईमानधारकांवर आपल्या मानलेल्या पुत्रांच्या पत्नींच्या मामल्यात कोणतीही अडचण राहू नये जेव्हा की त्यांनी त्यांचा उपभोग घेतला असेल. आणि अल्लाहचा हुकूम तर अंमलात येणारच होता. पैगंबर (स.) वर कोणत्याही अशा कार्यात कसलाही अडथळा नाही जे अल्लाहने त्यांच्यासाठी ठरविले असेल हाच अल्लाहचा शिरस्ता. त्या सर्व प्रेषितांच्या बाबतीत राहिला आहे जे पूर्वी होऊन गेले आहेत आणि अल्लाहची आज्ञा पूर्णत: एक ठरलेला निर्णय आहे. (हा अल्लाहचा शिरस्ता आहे त्या लोकांकरिता) जे अल्लाहचे संदेश पोहचवितात आणि त्याच्याच कोपाचे भय बाळगतात आणि एक अल्लाहव्यतिरिक्त कोणच्याही कोपाचे भय बाळगत नाहीत. आणि हिशेब घेण्यासाठी तर अल्लाहच पुरेसा आहे. (३७-३९)

(लोकहो!) मुहम्मद (स.) तुमच्या पुरुषांपैकी कोणाचे पिता नाहीत परंतु ते अल्लाहचे प्रेषित आणि अंतिम प्रेषित आहेत, आणि अल्लाह प्रत्येक वस्तूचे ज्ञान राखणारा आहे. (४०)

हे श्रद्धावंतांनो! अल्लाचे खूप स्मरण करा आणि सकाळ संध्याकाळ त्याचे पावित्र्यगान करीत राहा. तोच आहे जो तुम्हावर कृपा करतो आणि त्याचे दूत तुमच्यासाठी कृपेची प्रार्थना करीत असतात जेणेकरून त्याने तुम्हाला अंधकारातून प्रकाशात आणावे, तो श्रद्धावंतांवर फार मेहेरबान आहे. ज्या दिवशी ते त्याला भेटतील त्यांचे स्वागत सलामने होईल आणि त्यांच्यासाठी अल्लाहने मोठा सन्माननीय मोबदला तयार ठेवला आहे. (४१-४४)

हे नबी (स.)! आम्ही तुम्हाला पाठविले आहे साक्षीदार बनवून, शुभवार्ता देणारा आणि भय दाखविणारा बनवून. अल्लाहच्या अनुज्ञेने त्याच्याकडे आवाहन करणारा बनवून आणि प्रकाशमान दीप बनवून, आनंदवार्ता द्या त्या लोकांना; ज्यांनी (तुम्हावर) श्रद्धा ठेवली आहे, त्यांच्यासाठी अल्लाहकडून महान कृपाप्रसाद आहे. आणि कदापि दबू नका अश्रद्धावंत व दांभिकाशी, काही पर्वा करू नका त्यांच्या यातनेची आणि विश्वास ठेवा अल्लाहवर, अल्लाहच याकरिता पुरेसा आहे की माणसाने आपले मामले त्याच्या स्वाधीन करावे. (४५-४८)

हे श्रद्धावंतांनो! जेव्हा तुम्ही श्रद्धावंत स्त्रियांशी विवाह कराल आणि मग त्यांना स्पर्श करण्याअगोदर फारकत द्याल तर तुमच्याकडून त्यांच्यावर कसलीही ‘इद्दत’ची मुद्त आवश्यक नाही, जिची गणना पूर्ण होण्याची मागणी तुम्ही कराल. म्हणून त्यांना काही धन देऊन भल्या पद्धतीने निरोप द्या. (४९)

हे नबी (स.)! आम्ही तुमच्यासाठी वैध ठरविल्या आहेत तुमच्या त्या पत्नीं ज्यांचे महर तुम्ही अदा केले आहेत, आणि त्या स्त्रिया ज्या अल्लाहने प्रदान केलेल्या दासीपैकी, तुमच्या मालकीत आल्या आणि त्या तुमच्या चुलत बहिणी आणि आते बहिणी व मामे बहिणी आणि मावस बहिणी ज्यांनी तुमच्याबरोबर स्थलांतर केले आहे आणि ती श्रद्धावंत स्त्री जिने स्वत:ला नबी (स,) साठी अर्पण केलेले असेल जर नबी (स.) तिला स्वत:च्या विवाहबंधनात घेऊ इच्छित असतील. ही सवलत केवळ तुमच्यासाठी आहे अन्य श्रद्धावंतांसाठी नाही. आम्हाला माहीत आहे की अन्य श्रद्धावंतांवर त्यांच्या पत्नी व दासींच्या बाबतीत कोणत्या मर्यादा घातलेल्या आहेत. (तुम्हाला या मर्यादांतून आम्ही यासाठी वगळले आहे) जेणेकरून तुमच्यासाठी कोणतीही अडचण राहू नये. आणि अल्लाह क्षमाशील व परमकृपाळू आहे. तुम्हाला अधिकार दिला आहे की आपल्या पत्नीपैकी हवे तिला आपल्यापासून अलग ठेवा आणि हवे तिला आपल्या जवळ ठेवा. आणि हवे तिला अलग ठेवल्यानंतर आपल्या जवळ बोलावून घ्या, याबाबतीत तुम्हाला काहीही हरकत नाही. अशा प्रकारे हे जादा अपेक्षित आहे की त्यांचे डोळे अधिक सुखावतील आणि त्या दु:खी राहणार नाहीत. आणि जे काही तुम्ही त्यांना द्याल त्यावर त्या सर्व संतुष्ट राहतील. अल्लाह जाणतो जे काही तुम्हा लोकांच्या ह्रदयात आहे आणि अल्लाह सर्वज्ञ व सहिष्णू आहे. यानंतर तुमच्यासाठी अन्य स्त्रिया वैध नाहीत, आणि याचीही परवानगी नाही की यांच्या जागी अन्य पत्नी आणाव्यात, मग त्यांचे सौंदर्य तुम्हाला किती का पसंत असेना तथापि दासींची तुम्हाला परवानगी आहे. अल्लाह प्रयेक गोष्टीवर लक्ष ठेवणारा आहे. (५०-५२)

हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, नबी (स.) च्या घरांत विना परवानगी प्रवेश करू नका. जेवणाच्या वेळेवरही नजर राखून असू नका, जर तुम्हाला जेवायाला बोलाविले गेले तर अवश्य या. परंतु जेवण उरकले की निघून जा. गोष्टी करण्यात लागू नका. तुमच्या या कृती नबी (स.) यांना त्रास देतात, परंतु ते संकोचाने काही बोलत नाहीत, आणि अल्लाहला खरी गोष्ट सांगण्यात संकोच वाटत नाही. नबी (स.) च्या पत्नींपासून जर तुम्हाला काही मागावयाचे असल्यास पडद्यामागून मागत जा, ही तुमच्या आणि त्यांच्या ह्रदयाच्या निर्मळतेसाठी अधिक उचित पद्धती आहे. तुमच्याकरिता हे कदापि वैध नाही की अल्लाहचे पैगंबर (स.) यांना तुम्ही त्रास द्यावा, आणि हेदेखील वैध नाही की त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नींशी विवाह करावा. हा अल्लाहजवळ फार मोठा गुन्हा आहे. तुम्ही भले कोणतीही गोष्ट प्रकट करा अथवा गुप्त राखा, अल्लाहला प्रत्येक गोष्टीचे ज्ञान आहे. (५३-५४)

पैगंबर (स.) च्या पत्नींसाठी यात काही हरकत नाही की त्यांचे पिता, त्यांचे पुत्र, त्यांचे बंधू, त्यांचे पुतणे त्यांचे भाचे, त्यांच्या मेलमिलाफातील स्त्रिया आणि त्यांच्या मालकीचे दास-दासी घरांत यावेत. (हे स्त्रियांनो!) तुम्हाला अल्लाहच्या अवज्ञेपासून दूर राहिले पाहिजे. अल्लाह प्रत्येक गोष्टीवर दृष्टी ठेवतो. (५५)

अल्लाह आणि त्याचे दूत प्रेषितांवर दरूद (शुभचिंतन) पाठवितात, हे लोकहो! ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, तुम्हीसुद्धा त्यांच्यावर दरूद (शुभचिंतन) आणि सलाम पाठवा. (५६)

जे लोक अल्लाह आणि त्याचे पैगंबर (स.) यांना त्रास देतात, त्यांचा अल्लाहने जगात आणि परलोकात धिक्कार केला आहे आणि त्यांच्यासाठी नामुष्की आणणारी यातना उपलबब्ध केली आहे. आणि जे लोक श्रद्धावंत निरपराध पुरुषांना व स्त्रियांना इजा पोचवितात. त्यांनी एका मोठया कुभांडाचे व उघड गुन्ह्याचे अरिष्ट आपल्या शिरावर घेतले आहे. (५७-५८)

हे नबी (स.), आपल्या पत्नी व मुली आणि श्रद्धावंतांच्या स्त्रियांना सांगा की आपल्या चादरीचे पदर आपणावर आच्छादून ठेवत जा. ही अधिक योग्य पद्धत होय जेणेकरून त्या ओळखल्या जाव्यात आणि त्रास दिला जाऊ नये. सर्वश्रेष्ठ अल्लाह क्षमाशील व परमकृपाळू आहे. (५९)

जर दांभिक आणि ते लोक ज्यांच्या ह्रदयांत रोग आहे आणि ते जे मदीनेत प्रक्षोभक अफवा पसरविणारे आहेत, आपल्या कारवायापासून परावृत्त झाले नाही तर आम्ही त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यासाठी तुम्हाला उभे करू, मग ते या शहरांत तुमच्यासमवेत मुष्किलीनेच राहू शकतील. त्यांच्यावर चोहोंकडून धिक्काराचा मारा होईल. जेथे कोठे ते सापडतील पकडले जातील आणि भयंकररीत्या ठार मारले जातील. हा अल्लाहचा शिरस्ता आहे जो अशा लोकांच्या बाबतीत पूर्वापार चालत आलेला आहे आणि तुम्हाला अल्लाहच्या परिपाठांत कोणताही बदल आढळणार नाही. (६०-६२)

लोक तुम्हाला विचारतात की पुनरुत्थानाची घटका केव्हा येईल. सांगा, त्याचे ज्ञान तर अल्लाहलाच आहे. तुम्हाला कायखबर कदाचित ती जवळच येऊन ठेपली असेल. कोणत्याही परिस्थितीत ही बाब निश्चित आहे की अल्लाहने सत्याचा इन्कार करणार्‍यांचा धिक्कार केला आहे आणि त्यांच्यासाठी भडकलेली आग तयार ठेवली आहे, ज्यात ते सदैव राहतील. त्याऐवजी ते कोणताही समर्थक व सहायक मिळवू शकणार नाही. ज्या दिवशी त्यांचे चेहरे आगीवर उलथेपालथे केले जातील, त्यावेळी ते खेदाने म्हणतील की, “आम्ही अल्लाह व त्याचे पैगंबर (स.) यांचे आज्ञापालन केले असते!” आणि म्हणतील, “हे आमच्या पालनकर्त्या, आम्ही आमच्या सरदारांचे व आपल्या ज्येष्ठांचे आज्ञापालन केले आणि त्यांनी आम्हाला सरळ मार्गापासून मार्गभ्रष्ट केले. हे पालनकर्त्या, यांना दुप्पट यातना दे आणि यांचा भयंकर धिक्कार कर.” (६३-६८)

हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, त्या लोकांप्रमाणे बनू नका ज्यांनी मूसा (अ.) ला त्रास दिला होता, मग अल्लाहने त्यांनी रचलेल्या गोष्टीपासून त्याला मुक्त केले, आणि तो अल्लाहपाशी प्रतिष्ठित होता. हे श्रद्धावंतांनो, अल्लाहच्या कोपाचे भय बाळगा आणि नेहमी सत्य व रास्त बोला. अल्लाह तुमचे आचरण सुधारील आणि तुमच्या अपराधांना क्षमा करील. ज्याने अल्लाह आणि त्याचा पैगंबर (स.) यांच्या आज्ञा पाळल्या त्याने मोठे यश प्राप्त केले. (६९-७१)

आम्ही या अमानतीला आकाश, पृथ्वी व पर्वतासमोर ठेवले तर ते उचलण्यास तयार झाले नाहीत आणि तिच्याने भयभीत झाले परंतु मानवाने ती उचलली. नि:संशय तो मोठा अत्याचारी आणि अज्ञानी आहे. (या अमानतीचे ओझे उतरवण्याचा अपरिहार्य परिणाम आहे) की जेणेकरून अल्लाहने दांभिक पुरुषांना व स्त्रियांना आणि अनेकेश्वरवादी पुरुषांना व स्त्रियांना शिक्षा द्यावी आणि श्रद्धावंत पुरुषांचा आणि स्त्रियांचा पश्चात्ताप स्वीकारावा, अल्लाह क्षमाशील आणि परमकृपाळू आहे. (७२-७३)

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP