मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय ४८

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

कलीचा प्रारंभ होता निश्चित । तेव्हां अद्भुत वाढलें दुरित ।

मग महर्षि होवोनि भयभीत । बदरिकाश्रमातें पातलें ॥१॥

भूमंडळीं दैवतें फार । त्यांणीं टाकिले चमत्कार ।

पाषाणांत लपोनि सत्वर । सोशिती मार अविंधांचा ॥२॥

महातीर्थें जीं समस्त । तीहीं जाहलीं उदकवत ।

तरणोपाय नसेचि जनांत । मग अवतरले संत भूमंडळीं ॥३॥

नामसंकीर्तन देखा । भवसागरीं घातलीं नौका ।

श्रवणमात्रें सकळ लोकां । सायुज्यसुखा भोगविती ॥४॥

योग याग जपहवनें । कलियुगीं न होती ही साधनें ।

करितांचि चरित्रें । तरी भवरोग । परिहरे तयांचा ॥५॥

मग अवतार घेवोनि वैष्णववीर । भक्तीसि लाविती नारीनर ।

त्यांचीं श्रवण करितांचि चरित्रें । तरी भवरोग परिहरे तयांचा ॥६॥

संतचरित्रें गाता ऎकतां । संतोष वाटे रुक्मिणीकांता ।

तयासि न विसंबेचि सर्वथा । बाळकासि माता ज्यापरी ॥७॥

मागिले अध्यायाचे शेवटीं जाण । नारायणभट्ट निराश ब्राह्मण ।

त्यासि परीस देतां जगज्जीवन । मग उदकांत तेणें टाकिला ॥८॥

कसोनि पाहतां जगन्निवास । मग प्रसन्न जाहले कीं तयास ।

टाकोनियां ब्राह्मण वेष । दर्शन तयास दीधलें ॥९॥

यावरी ऎका भाविकजन । कथा रसिक अति पावन ।

श्रवणेंचि श्रोतयांचें मन । तन्मय होऊन राहातसे ॥१०॥

एक रत्नाकर म्हणोनि व्यवसायीं । बागलाण देशांत असे पाहीं ।

कष्ट करितां नना उपायीं । पुरवठा कांहीं पडेना ॥११॥

घरीं खावयासि नाहीं अन्न । वस्त्रपात्र न मिळेचि जाण ।

लोकंचें बहुत जाहलें ऋण । न मिळेचि धन उदमातें ॥१२॥

संसारीं विपत्ती सेखोनि । मग रत्नाकर बैसले अनुष्ठानीं ।

अहोरात्र नामस्मरणीं । उपोष्णीं निराहार ॥१३॥

चौदा दिवस लोटतां ऎसें । तों दृष्टांती देव सांगती त्यास ।

तूं व्यवसाय टाकोनि सर्वस्व । माझ्या भजनास लाग आतां ॥१४॥

आणि प्रपंच हातवटीं करिसील कांहीं । तरी सर्वथा पुरवठा येणार नहीं ।

ऎसें सांगतां शेषशायी । जागृतीसि पाहीं मग आला ॥१५॥

मग आपुल्या घरीं येवोनि त्याणें । कांतेसि सांगितले वर्तमान ।

म्हणे देवें मजला दाखविलें स्वप्न । कीं व्यवसाय न करणें सर्वथा ॥१६॥

वैराग्य घेतांचि साचार । मी प्रसन्न होईल रुक्मिणीवर ।

ऎसा दृष्टांत दीधला थोर । कैसा विचार करावा ॥१७॥

म्हणें आपुला व्यवसाय टाकितां जाण । सोयरे हांसतीक आपणाकारणें ।

भिक्षा मागोनि उदरपोषण । तरी लाजीरवाणें लोकांत ॥१८॥

ऎकोनि कांतेचे उत्तर । पारणें करीत रत्नाकर ।

व्यवसाय करीत निरंतर । परी पोट न भरेचि सर्वथा ॥१९॥

देशीं दुष्काळ पडिला पाहीं । धान्यासि जाहली महागायी ।

स्वस्त धारण जयेठायीं । खेपेसि लवलाही जातसे ॥२०॥

चार बैल बरोबर । घेवोनि गेला रत्नाकर ।

तेथें धान्य मिळालें गोणीभर । तें घेवोनि सत्वर येतसे ॥२१॥

एकला येकट वैष्णवभक्त । वृषभ हाकीत अरण्यांत ।

तों देवें कसवटी लाविली बहुत । ते ऎका निजभक्त भाविकहो ॥२२॥

श्वापदरूप दाखवोनि श्रीहरी । बैल बुजोनि पळाले चारी ।

वाट विसरोनियां सत्वरीं । रानभरी ते झाले ॥२३॥

गोणी होती एकावर । तेही खालीं पडिली सत्वर ।

संकटीं पडिले रत्नाकर । म्हणे कैसा विचार करूं आतां ॥२४॥

संसार चोंडाळें केलें कष्टी । अधिक अधिक येतसे तुटी ।

करुणासागर जगजेठी । पाव संकटीं मज आतां ॥२५॥

ऎसें म्हणवोनि प्रेमळ भक्त । नेत्रीं वाहती अश्रुपात ।

तों वाटसराच्या रूपें त्वरीत । रुक्मिणीकांत पातले ॥२६॥

चारी बैल आणिले बळोनी । एकावर सत्वर घातली गोणी ।

रत्नाकरासि मार्गी लाऊनि । अदृश्य ते क्षणीं जाहलें ॥२७॥

मागें पाहतां सभोवतें । तों वाटसरू न दिसेचि तेथें ।

मग अनुताप जाहला मनांत । म्हणे द्वारकानाथ कष्टविला ॥२८॥

मग घरासि येऊनि ते अवसरीं । ब्राह्मण बोलावूनि आणित सत्वरी ।

वस्तभाव होती जें मंदिरीं । ती द्विजांसि सत्वरीं वांटिली ॥२९॥

वृषभ गोण ताटमूठ जाण । वस्त्रपात्र आणि धनधान्य ।

अवघेंचि घेवोनि गेलें ब्राह्मण । उपाधीं संपूर्ण निरसिली ॥३०॥

शुध्द सात्विक वैराग्यलक्षण । करूं लागला श्रीहरीभजन ।

अयाचित वृत्ती करून । उदरपोषण होतसे ॥३१॥

न करी कोणाचें उपार्जन । राव रंक समसमान ।

सप्रेम गातसे भगवद्गुण । लोक श्रवण करिताती ॥३२॥

निष्काम बुध्दि वैषणववीर । कीर्ती प्रगटली दूरच्या दूर ।

मानूं लागले थोर थोर । प्रतिष्ठा फार वाढली ॥३३॥

रत्नाकराचा अनुग्रह घेती । बहुतां जनांसि लागली भक्ती ।

थोर थोर राजे तेही मानिती । प्रगट सत्कीर्ती जाहली ॥३४॥

निरपेक्ष देखोनि वैष्णववीर । धनसंपत्ति देताति फार ।

नित्य पंक्तिसि सह्स्त्र पात्र । अन्न व्यवहार क्षुधितांसी ॥३५॥

दृष्टीसीं पाहतां रत्नाकार । खळासि तत्काळ फुटे पाझर ।

दाखविले नाना चमत्कार । निजकृपावरें श्रीहरीच्या ॥३६॥

चित्तीं विचारी वैष्णवभक्त । पृथ्वीची तिर्थें पहावी समस्त ।

तेथें असती साधुसंत । दर्शनेंचि मुक्ती होय जीवां ॥३७॥

ऎसी इच्छा धरोनि मानसीं । मग चालिले वाराणसी ।

स्नान करोनि भागीरथीसी । मग विश्वेश्वरासी वंदिलें ॥३८॥

गया प्रयाग पाहोनि सत्वर । दानें तोषविले द्विजवर ।

सवें यात्रा सहस्त्रवर । जयजयकार होतसे ॥३९॥

विष्णुजन हरिकीर्तनीं । बहुतांसि भक्ति लाविली त्याणीं ।

मग कुरुक्षेत्रासि आले तेथूनीं । सुस्ना नमनीं अनुतापें ॥४०॥

दिंड्या पताका निशाणभेरी । वाद्यें वाजती मंगल तुरीं ।

तैसेच आले हस्तनापुरीं । सप्रेम अंतरीं सर्वदा ॥४१॥

लोक बोलती परस्परें । रत्नाकर ईश्वरी अवतार ।

करावया जगदुध्दार । जाहला साचार मृत्युलोकीं ॥४२॥

ऎसें बोलोनि परस्परें । दर्शनासि येती नारीनार ।

महाक्षेत्र हस्तनापुर । तेथें उत्सव थोर मांडिला ॥४३॥

जन्मअष्टमी पुण्यतिथी । मखरीं स्थापिली श्रीविष्णुमूर्ती ।

त्यापुढें कीर्तन आपण करिती । ऎकतांचि वृत्ती वेधतसे ॥४४॥

निपजोनि नाना पक्वान्नें । होतसे ब्राह्मण संतर्पण ।

शहरांत काढिली मिरवण । धन्य सुदिन लोक म्हणती ॥४५॥

सप्तरंगी पताका भरजरी । गरुडटके निशाणभेरी ।

यंत्रें सुटती नानापरी । तों कौतुक सत्वरी काय झालें ॥४६॥

अमर वासेच्या वरूनि जाण । ऎसी चालिली मिरवण ।

अविंध राजा तें देखोनि । समाधान पावला ॥४७॥

सुवर्णमुद्रा पांच शत । देवापुढें आणोनि ठेवित ।

वर्षासन नेमोनि देत । खर्च बहुत म्हणवोनीं ॥४८॥

श्रीहरीच्या कृपेंकरून । भक्तीसि लागले सर्वजन ।

मग द्वारकसि चालिले तेथून । श्रीकृष्ण दर्शन घ्यावया ॥४९॥

मार्गी चालतां सुपंथी । पदोपदीं गातसे कीर्ती ।

कोणी देती अथवा न देती । परी हर्ष खंती ते नाहीं ॥५०॥

ऎशारितीं क्रमितां पंथ । तों भडोच नगरासि आले त्वरित ।

तेथील अधिकारी अविंध उन्मत्त । देखोनि मनांत संतापला ॥५१॥

म्हणे हा तों जातीचा हिंदु फकीर । गफुर मांडिला असे फार ।

मग मांस पाठविले तबकभर । म्हणे प्रसाद साखर घ्या तुम्हीं ॥५२॥

रत्नाकरासि म्हणती दूत । रायें मिठाई पाठविलें तुम्हांतें ।

रितें पात्र करोनि त्वरित । द्यावें निश्चित आम्हांसी ॥५३॥

ऎसी ऎकांताचि मात । चिंताक्रांत वैष्णवभक्त ।

मग श्रीहरीचा धावां करित । म्हणे संकटीं त्वरित पाव देवा ॥५४॥

दांभिक अथवा निष्काम चित्तीं । मी तुझा म्हणवित असें श्रीपती ।

संकटनिवारी भलत्यारीतीं । करीतसे ग्लांती निजप्रेमें ॥५५॥

मग रुमाल काढितां तबकावरूनी । तों मोगर्‍याचीं पुष्पें देखिलीं नयनीं ।

सकळांसि वाटोनि तये क्षणीं । संतोष मनीं पावला ॥५६॥

कांहीं तबकांत राहिलीं सुमनें । तीं रायासि पाठवूनि दिधलीं त्याणें ।

ऎसा चमत्कार पाहोन । अनुतापला यवन मानसीं ॥५७॥

म्हणे हा साक्षात्कारी विष्णुभक्त । उगीच छळणा केली व्यर्थ ।

मग सद्भावें येऊनि पायीम लागत । म्हणे अपराध समस्त क्षमा करी ॥५८॥

रौप्यमुद्रा सहस्त्रवरी । आणोनि ठेविल्या चरणावरी ।

म्हणे शिबिकेचा खर्च निर्धारीं । हा निरंतरी घेत जावा ॥५९॥

बडोद्याचा अधिकारी जाण । त्यासि वरात दीधली लेहून ।

कृपा करितां जगज्जीवन । तरी महाविघ्नें निरसती ॥६०॥

मग समुदायासि वैष्णववीर । द्वारकापुरासि गेले सत्वर ।

तेथेंही अद्भुत वर्तलें चरित्र । तें एका सादर भाविकहो ॥६१॥

गोमती समुद्र संगम होत । मध्यें वाळूचा सांचला पर्वत ।

न वाहात म्हणवोनि प्रवाह । तेणें उदक समस्त नासलें ॥६२॥

गोमतीचें हिरवें पाणी । किडे पडिले त्या ठिकाणी ।

मुखामाजी घालितां कोणी । तरी दुर्गंध घाणी येतसे ॥६३॥

क्षेत्रवासी चितांक्रांत । कांहीं उपाय नचलेचि तेथ ।

रत्नाकराची कीर्ती अद्भुत । जाहलीसे श्रुत त्यांलागी ॥६४॥

पुजारी विनविती त्या अवसरीं । तूं तरी विष्णुभक्त साक्षात्कारी ।

समुद्र गोमतीचा प्रवाह करीं । सत्कीर्ती चराचरीं प्रगटेल ॥६५॥

ऎसें संकट घालितांचि त्यांणीं । रत्नाकर संकोचित जाहले मनीं ।

मग देवासन्मुख उभे राहुनी । सप्रेम विनवणी करीतसे ॥६६॥

म्हणे द्वारकापति यादवराया । उपाधीं जनांत वाढविली वायां ।

मी नेणेंचि भूतभविष्यक्रिया । तुझिया पायां चिंतितसे ॥६७॥

ऎसी दृष्टांत होतां त्यासी । संतोष जाहला रुक्मिणीपती ।

म्हणे तूं गोमतीत स्नान करितां निश्चिती । मग प्रवाहें वाहती होईल ॥६८॥

ऎसा दृष्टांत होतां त्यासी । संतोष जाहला निजमानसीं ।

मग प्रहररात्रीं गोमतीसी । रत्नाकर स्नानासि चालिले ॥६९॥

दृष्टी पहावया चमत्कार । क्षेत्रवासी चालिले बरोबर ।

स्नानासि निघतां वैष्णववीर । तों तीर्थे समग्र तेथें आली ॥७०॥

गोमतीसि चढतांचि पाणी । सिकता ते गेली निघोनी ।

ऎसें कौतुक देखोनि नयनीं । विस्मित मनीं लोक झाले ॥७१॥

स्नान करितांचि भक्तप्रेमळ । अक्षयी पाणी जाहलें निर्मळ ।

प्रवाह चालिला सर्वकाळ । कृपेनें घननीळ तुष्टला ॥७२॥

हें देखोनि क्षेत्रवासी नर । म्हणती हा ईश्वरी अवतार ।

ऎसे बोलोनियां उत्तर । सद्भावें नमस्कार घालिती ॥७३॥

मग देउळीं जाऊनि वैष्णवदास । श्रीहरीसि विनवितसे ।

म्हणे सर्व कर्ता तूं द्वारकाधीश । आज दीधलें यश अनाथासी ॥७४॥

एक पक्ष राहोनि तये ठायीं । मग स्वस्थळासि चालिले पाहीं ।

आपुल्या दासाचें शेषशायी । न्यून कदाहीं पडों नेदी ॥७५॥

आणिक माधवदास वैष्णवभक्त । सुरतेमाजी होते राहत ।

भजन करीत सप्रेमयुक्त । सगुण मूर्तीते आठवोनी ॥७६॥

जयासि आपुले आणि परावें । समविषम नाहीं ठावें ।

सर्वभूतीं सारिखा भाव । आत्मवत जीव मानीत असे ॥७७॥

राजा रंक आणि दान । यांसि लेखीं समसमान ।

जैसी मृत्तिका तैसें धन । निराश मने सर्वदा ॥७८॥

एकादशी हरिजागर । विष्णुअर्चन निरंतर ।

भक्तीसि लाविले बहुत नर । जगदुध्दार मांडिला ॥७९॥

दर्शनासि येती भाविकजन । साखर ठेविती पुढें आणून ।

ते मूठमूठ सकळांकारणें । प्रसाद वांटून देतसे ॥८०॥

शेर आदशेर पावशेर । आदमण अथवा मणभर ।

जे समयीं जैसी येईल साखर । ते वाटितां मूठभर पुरे सकळां ॥८१॥

ऎसा चमत्कार पाहोनि नयनीं । लोक आश्चर्य करिती मनीं ।

म्हणती सर्व सिध्दियाजलागोनी । कर जोडोनी तिष्ठती ॥८२॥

एक म्हणती साबरीमंत्र । शिकोनी सर्वांसि पुरवितो साखर ।

एक म्हणती मिथ्याचार । त्याचा ईश्वर साह्यकारी ॥८३॥

त्रिविध लोक नानारीतीं । कोणी निंदिती कोणी स्तविती ।

परी माधवदासासि हर्ष खंती । नयेचि चित्तीं सर्वथा ॥८४॥

म्हणे जनीं जनार्दन भरला हरी । याचा खेद कासया अंतरी ।

ऎसें चित्तासि समाधान करी । सप्रेम अंतरी सर्वदा ॥८५॥

तंव एक कुटाळ होता दुर्मत । त्याणें राख भरिली मडक्यांत ।

तोंड बांधोनि आपुल्या हातें । हरिमंदिरांत आणितसे ॥८६॥

माधवदासासि म्हणे तये क्षणीं । साखर आणिली त्यांत भरोनी ।

हे आपुल्या हातें सोडोनी । सकळां लागोनी वांटावी ॥८७॥

अवश्य म्हणवोनि वैष्णवभक्त । नैवेद्य दाखवित आपुल्या हातें ।

साखर काढोनि सर्वासि देत । तों कुटिळ मनांत अनुतापला ॥८८॥

लोकांसि सांगतसे स्वमुखें । म्यां मडक्यांत भरोनि आणिली राख ।

त्याची साखर जाहली देख । हेंचि कौतुक वाटतें ॥८९॥

मग पश्चातापें करोनि मनीं । नमस्कार घालीत प्रीतीं करूनी ।

म्हणे माझा अपराध क्षमा करोनि । निरंतर चरणीं ठेविजे ॥९०॥

ऎसी ग्लांती करोनि पाहीं । झाला स्वामीचा संप्रदायी ।

प्रपंचभान टाकोनि सर्वही । भक्तीसि पाहीं लागला ॥९१॥

ऎसें कौतुक देखोनी । आश्चर्य करिती अवघे जन ।

मग गांवींचा राजा त्याजलागुन । वर्तमान जाऊन सांगती ॥९२॥

तोही परम होता खळदुर्जन । सत्य न भासे त्याजकारणें ।

मग डेर्‍यांत महासर्प घालोन । तोंड बांधोन ठेवितसे ॥९३॥

माधवदास पाठवूनि भृत्य । बोलावूनि आणिला मंदिरांत ।

भुजंग घातला डेरियांत । तो पुढें ठेवित आणोनियां ॥९४॥

म्हणे तुमचे हातची घ्यावी साखर । ऎसी इच्छा वाटती फार ।

तरी आपुल्या हातें वांटा सत्वर । इतुकें नृपवर बोलिला ॥९५॥

कृत्रिमभाव रचिला याणी । हें विष्णुभक्त नेणेचि स्वप्नीं ।

मडकें सोडीत तये क्षणी । तों साखर नयनीं दिसतसे ॥९६॥

श्रीहरीसि नैवेद्य दाखवून । मूठ मूठ वांटित सकळांकारणें ।

ऎसा चमत्कार देखोन । राजा मनीं अनुतापला ॥९७॥

विष्णुभक्तासि नमस्कार । सद्भावें घालीत नृपवर ।

पुजा करोनि सर्वोपचार । वस्त्रें अळंकार लेववी ॥९८॥

शिबिकेंत बैसवोनि माधवासी । नेऊनि घालीत विष्णुमंदिरासी ।

म्हणे कांहीं इच्छा असेल मानसीं । तरी ते मजपासी सांगिजे ॥९९॥

ऎकोनि म्हणे वैष्णव भक्त । कांहींच इच्छा नसे मनांत ।

सकळ पदार्थ नाशवंत । संग्रह व्यर्थ कासया ॥१००॥

निष्काम देखोनि मन । मग घरासि गेला नृपनंदन ।

प्रतिष्ठा बहुत वाढली जाण । मग द्वारकेसि गमन करीतसे ॥१०१॥

परी दैवन सोडिच निश्चिती । सवें यात्रा निघाली बहुत ।

भजन करीत प्रेमयुक्त । पंथ क्रमित तेधवां ॥२॥

पुढें महाअरण्य देखिलें दृष्टीं । तेथें महावृक्षांची जाहली दाटी ।

तों व्याघ्राच्या रूपें जगजेठी । प्रकट दृष्टीं दिसतसे ॥३॥

दृष्टीसी देखोनियां पंचानन । भयें कांपती सकळ जन ।

जीवाचें भय वागवून । गेले पळोन तेधवां ॥४॥

माधवदासाचा सप्रेमभाव । सर्वांभूतीं एकचि देव ।

व्याघ्रा सन्मुख घेतली धांव । भक्त वैष्णव चालिला ॥५॥

जीवाचें भय धरोनि अंतरीं । आड लपाले यात्रेकरी ।

एकांत देखोनि ते अवसरीं । मग काय करी जगदात्मा ॥६॥

व्याघ्राचा वेष टाकोनि निश्चितीं । चतुर्भुज रूप धरीत श्रीपती ।

दिव्य कुंडलें कानीं तळपती । पीतांबराची दीप्ती पडतसे ॥७॥

विष्णुचें ध्यान श्रीभगवतीं । व्यासें वर्णिलें जैशा रीतीं ।

माधवदास सगुण मुर्ती । तैशाच रीतीं पाहतसे ॥८॥

निजभक्तासी हृदयकमळीं । आलिंगुनि धरितसे वनमाळी ।

मग मिठी चरण कमळीं । आनंद मेळीं बैसले ॥९॥

ब्रह्मानंद न समाये अंतरीं । म्हणे व्याघ्ररूप कां धरिलें हरी ।

तामस सोंग त्वां धरिलें वरी । मग यात्रेकरी पळाले ॥११०॥

मग देव तयासि उत्तर देत । भेटीसी पाहिजे एकांत ।

यास्तव व्याघ्ररूप धरोनि निश्चित । अधीर जनांतें पळविलें ॥११॥

तूं तरी निधडा वैष्णववीर । प्रेमें भजसी निरंतर ।

मग मी सांडोनि द्वारकापुर । मार्गावर भेटलों ॥१२॥

तरी आतां ऎक निजभक्ताराया । परतोनि जावें आपुल्या ठाया ।

आज्ञा नाहीं द्वारकेसि यावया । पाळी माझिया वचनास ॥१३॥

तुझा सद्भाव देखोनि अंतरीं । येथेंचि प्रगट जाहलों मी हरी ।

भेट दीधली मार्गावरी । आतां जा माघारीं परतोनियां ॥१४॥

ऎसें वदोनि रुक्मिणीरमण । तत्काळ पावले अंतर्धान ।

कीं निजभक्ताचें हृदयभुवन । ते स्थळीं जावोन सुरवाडले ॥१५॥

इकडे देह लोभ धरोनि अंतरीं । पळोनि गेले यात्रेकरी ।

दूर लपाले पर्वतावरी । त्यांसि श्रीहरी अंतरला ॥१६॥

सोडितां वैष्णवाची संगती । तयासि भेटे रुक्मिणीपती ।

परम भय पावोनि चित्तीं । मग काय बोलती परस्परें ॥१७॥

व्याघ्रें मारिला माधवदास । देवें रक्षिलें आपणास ।

एक म्हणती पाहवें त्यास । तरी मृत्यु आपणास येईल ॥१८॥

तों माधवदास ते अवसरीं । यात्रेकर्‍यांसि हाका मारी ।

म्हणे व्याघ्र पळोनि गेला दुरी । तुम्ही सत्वरी या आतां ॥१९॥

ऎकोनि विस्मित सकळजन । म्हणती कैसा वांचला त्यापासून ।

एक म्हणती त्याजकारणें । साह्य श्रीकृष्ण असे कीं ॥१२०॥

डेरियांत सर्प घातला थोर । त्याची त्याणें केली साखर ।

त्याचें काय करीक व्याघ्र । परस्परें बोलती ॥२१॥

ऎसें म्हणवोनि तये वेळ । पातले माधव दासाजवळ ।

व्याघ्र नव्हेचि तो घननीळ । भक्त प्रेमळ सांगतसे ॥२२॥

संगती म्हणती जोडुनी कर । वृत्तांत सांगावा सविस्तर ।

ऎकोनि म्हणे भक्त चतुर । तें नये साचार बोलतां ॥२३॥

कासव पिलियांसि तत्त्वतां । कृपेनें पाहे तयांची माता ।

तयासि अनुभव आणिकें पुसतां । परी मुखें सांगतां नये कांहीं ॥२४॥

कां बाळकासि साखर चारितां बरवी । अंतरीं तयासि कळतसे चवी ।

परी मुखें सांगता नये कांहीं । जाणे अनुभवी चित्तांत ॥२५॥

चातक चंद्रामृत सेविती । तेणेंचि तयांसि होतसे तृप्ती ।

त्यासि इतर पक्षी अनुभव पुसती । तरी सांगतां रीती ते नये ॥२६॥

तेवीं श्रीहरीकृपेनें महिमान । जाणती भाविक प्रेमळ जन ।

आजि श्रीहरीनें दिधले दर्शन । अनुभव जाणें मीच माझा ॥२७॥

पुढें द्वारकेसि जावया पाहीं । मज श्रीहरीची आज्ञा नाहीं ।

ऎसें सांगोनि ते समयीं । सुरतेसि लवलाहीं चालिलें ॥२८॥

यात्रा गेली द्वारकापुरा । माधवदास सत्वर पातले घरा ।

भजनीं प्रेमा लावोनि बरा । जगदुध्दार आठविती ॥२९॥

विष्णुपूजन हरिकीर्तन । भक्तीसि लाविले बहुतजन ।

विश्वोध्दार करावया पूर्ण । वैष्णवजन अवतरले ॥१३०॥

आतां विठ्ठल पुरंदर निष्ठावंत । बेदर प्रांतांत होते राहत ।

त्यांचें चरित्र अतिअद्भुत । ऎका निजभक्त भाविकहो ॥३१॥

पुत्रकलत्र असती त्यास । परी संसारीं असोनि उदास ।

पांडुरंगाची उपासना असे । तोचि निदिध्यास लागला ॥३२॥

संसार धंदा करितां जाण । सर्वकाळ विठ्ठलाचें चिंतन ।

असत्य सर्वथा न बोले वचन । दया परिपूर्ण सर्वांभूती ॥३३॥

समयीं आलिया अतिथी । अन्न देतसे यथाशक्ती ।

दुर्बळ संसार बहुतांरीतीं । परी सत्वशीळ चित्तीं सर्वदा ॥३४॥

आषाढी कार्तिकी यात्रेसीं । जात असे पंढरीसी ।

नेमें वारी धरिली ऎसी । निश्चय मानसीं दृढ त्याचा ॥३५॥

तंव कोणे एके अवसरी । पातली कार्तिकीची वारी ।

विठ्ठल पुरंदरासि शरीरीं । नवज्वर सत्वरी जाहला ॥३६॥

तेणें जर्जर जाहली काया । शक्ति नाहींच चालावया ।

म्हणवोनि आठवीत पंढरीराया । म्हणे कोणत्या उपाया करूं आतां ॥३७॥

पंढरीसि जावोनि एकवेळे । देहाचें पडावे मोटळे ।

यास्तव करीतसे तळमळ । त्रितापें जळे शरीर हें ॥३८॥

निद्रा न लागे करितां शयन । पंढरीसि लागले पंचप्राण ।

म्हणे यात्रेसि उदेलें महाविघ्न । दुरितें करून आपल्या ॥३९॥

तीन दिवस तीन राती । तळमळ केली ऎशा रीतीं ।

परी सर्वथा अरोग्य नव्हे कांती । मग विचार चित्तीं दृढ केला ॥१४०॥

म्हणे हें नाशिवंत शरीर आहे । याचा भरवसा मानितां पाहे ।

अंतरतील विठोबाचे पाय । मग जीवित्व काय ठेवोनी ॥४१॥

मरणाचि आलें असेल जर । तरी घरीं निजतां न होय अमर ।

आतां येवोनि निघावें सत्वर । मग जे होणार तें हो सुखें ॥४२॥

ऎसा निश्चय करोनि थोर । चालिला विठ्ठल पुरंदर ।

सवें कोणीच नसे दुसरें । मग कांता बरोबर निघाली ॥४३॥

अश्व पाठाळ नसोचि कांहीं । ज्वरहीं बहुत वाढला देहीं ।

पाऊल टाकितां ते समयीं । प्राणांत जीवीं होतसे ॥४४॥

ऎशा रीतीं पंथ क्रमितां । दोन मजली आलीं उभयतां ।

मग रात्रीं जवळ बैसोनि कांता । प्राणनाथा पाहतसे ॥४५॥

तों शरीरीं जाळ बहुत असे । परी उत्तर न बोलवेचि तयास ।

प्राण होतसे कासाविस । देहभान नसे सर्वथा ॥४६॥

ऎसी अवस्था देखोनि तिनें । मग अट्टाहासें करीत रुदन ।

म्हणे याचें उत्तम न दिसे चिन्ह । रुक्मिणीरमण कोपला ॥४७॥

तंव भ्रतार सावध होऊनि किंचित । कांतेलागीं उत्तर बोलत ।

मज बाजेवरी घालोनि त्वरित । पंढरीनाथ दाखवी ॥४८॥

चार मोलकरी पाहोनि सत्वर । शरीर घालावें खाटेवर ।

दृष्टीसीं पाहतां पंढरपुर । मग पडेल उतार शरीरासी ॥४९॥

ऎकोनि पतीचें उत्तर । कांता जाहली चिंतातुर ।

पदरीं ऎवज नसे तिळभर । कैसा विचार करावा ॥१५०॥

वाटखर्चीस ऎवज नाहीं । आणि मोलकर्‍यांसि द्यावे कायीं ।

ऎसें म्हणवोनि ते समयीं । चिंता जीवीं करीतसे ॥५१॥

कांहीं उपाय न सुचेचि तेव्हां । मग पांडुरंगाचा मांडिला धावां ।

म्हणे पंढरीनाथा देवाधिदेवा । पाव केशवा मज आता ॥५२॥

तुं अनाथबंधु करुणाघन । ऎसें बोलती संतसज्जन ।

नाममात्रें निरसिसी विघ्नें । तें असत्य वचन होईल ॥५३॥

मागें राहिलें निजमंदिर । आणि चार मजली पंढरपुर ।

ज्वरें व्यापिला निजभ्रतार । कैसा विचार करूं देवा ॥५४॥

हे ना तैसी जाहलीपरी । रुक्मिणीकांता धांव श्रीहरी ।

विठ्ठल पुरंदर तुझा निर्धारीं । वारकरी म्हणवितो ॥५५॥

ऎशा रीतीं तें भामिनी । रुदन करीतसे तये क्षणीं ।

तिचा धावां ऎकोनि कानीं । चक्रपाणी पावले ॥५६॥

ऎवट कुणबी होऊनी श्रीहरी । तिच्या बिर्‍हाडासि येतसे सत्वरीं ।

म्हणे बाई कष्टीं कां होतीस अंतरीं । सांग लवकरी मजपाशीं ॥५७॥

ती म्हणे बापा ऎक वचन । भ्रतार व्यथित होता जाण ।

दोन मजली आला चालोन । परी आतां निदान मांडिलें ॥५८॥

ज्वरें शरीर व्यापिलें भारी । पुढें न चाले पाऊलभरी ।

यात्रा निघोनि गेली दुरी । उपाय तरी सांग आतां ॥५९॥

ऎसा वृत्तांत ऎकोनि सत्वर । काय म्हणती सारंगधर ।

आमुचें गांव पंढरपुर । जाणें सत्वर मज तेथें ॥१६०॥

आणिक तिघे सांगाती जाण । बाहेर उतरले ते आपण ।

आम्हीं तुझा शब्द ऎकोन । आलों धावोन पाहावया ॥६१॥

तुझा भ्रतार बैसवोनि डोलींत । नेवोनि घालूं पंढरींत ।

आतां न होवोनि चिंताक्रांत । स्वस्थ मनांत असावें ॥६२॥

ऎसें बोलतां करुणाकर । चित्तीं आश्रय वाटला फार ।

म्हणे एवढा करिसील परोपकार । तरी पुण्य अपार घडे लोकीं ॥६३॥

प्रातःकाळ होतांचि जाण । लाघव करीतसे जगज्जीवन ।

आपणाचि चार रूपें धरून । डोली घेवोन पातलें ॥६४॥

विठ्ठल पुरंदरासि बैसवोनि आंत । खांदा घेतसे रुक्मिणीकांत ।

निज भक्ताचा भार समस्त । मस्तकीं धरीत जगदात्मा ॥६५॥

अष्टांग योग साधितां हटीं । परी लौकरी न पडेचि त्यांच्या दृष्टीं ।

तों भक्ताचा भार घेतसे जगजेठीं । नवल पोटीं मज वाटे ॥६६॥

नाना याग तपें व्रतें । करितां नातुडें जगन्नाथ ।

तो भाविकाचें काम अंगें करित । अनाथनाथ दीनबंधु ॥६७॥

जो कां निर्गुण निर्विकार । श्रुतिशास्त्रांसि नकळेचि पार ।

तो सगुणरूप धरोनि साकार । वागवितसे भार भक्ताचा ॥६८॥

सृष्टींकर्ता जो विधाता । श्रीहरी तयाचा जनिता ।

तो मनुष्यरूपें विश्वपिता । बैसवित निजभक्तां खांद्यावरी ॥६९॥

योगमाया स्मरोनि चित्तीं । लाघव दाखवितसे श्रीपती ।

ऎक्याचि वेळे पंढरीसि येती । जातां गमस्ती अस्तमाना ॥१७०॥

तो चंद्रभागेच्या तीरीं निश्चित । यात्रा उतरली असे बहुत ।

विठ्ठलनामें गर्जती संत । कीर्तनीं डुलत निजप्रेमें ॥७१॥

तो घोष ऎकोनियां श्रवणीं । विठ्ठल पुरंदर संतोषे मनीं ।

जेवीं आयुष्य हींनाचिये श्रवणीं । संजीवनी मंत्र जोडे ॥७२॥

प्रेमळ भाविक वैष्णवजन । करितां नामसंकीर्तन ।

दिंड्या पताका उभारून । संभ्रमें करून मिरवती ॥७३॥

ऎशा क्षेत्रामाजि निश्चित । डोली उतरली वैकुंठनाथें ।

मग पालकांठ्या आणोनि देत । सर्व साहित्य तें केलें ॥७४॥

मग देउळीं जावोनि रुक्मिणीकांत । आपुलें तीर्थ आणोनि देत ।

विठ्ठल पुरंदराच्या मुखीं घालित । तों उतार किंचित पडियेला ॥७५॥

मग उभयतां स्त्रीपुरुषां धरोनि करीं । देउळीं नेतसे ते अवसरीं ।

आपुलें दर्शन करवीतसे हरी । नारळ करीं देवोनियां ॥७६॥

दृष्टीसीं देखतां घनसांवळा । अश्रुपात वाहती डोळां ।

प्रेमें सद्गदित जाहला गळा । मग आलिंगून धरिला दोहीं बाहीं ॥७७॥

चरणीं मस्तक ठेवोनि पाहे । म्हणें दैवयोगें देखिलें पाय ।

चित्तीं आनंद न समाये । सद्गदित होय निजप्रेमें ॥७८॥

मग राही सत्यभामा रुक्मिण । यांचेंही घेतलें दर्शन ।

कीर्तन करिती संतसज्जन । त्यांचेही दर्शन करविलें ॥७९॥

बिर्‍हाडासि आणोनि तत्त्वतां । बैसविलीं पुरुषकांता ।

म्हणें घरानि जावोनि आतां । प्रातःकाळ होता येईन ॥१८०॥

ते म्हणती तुझें नांव कायी । तें सांगोनि द्यावें लवलाहीं ।

तुझे व्हावया उतरायी । पदार्थ कांहीं दिसेना ॥८१॥

यावरी म्हणे वनमाळी । माझें नाम पांडुरंगकोळी ।

मुलें माणसें आहेत सकळीं । येच स्थळीं राहतसें ॥८२॥

विठ्ठल पुरंदर म्हणे त्यातें । आम्ही आषाढीकार्तिकीस येतसां येथें ।

तेव्हां स्मरण धरोनि चित्तांत । भेटीं आम्हातें देईजे ॥८३॥

ऎसें ऎकोनि जगन्निवास । काय म्हणतसे तयांस ।

मी तुमच्या सन्निध सर्वदा असें । परी ओळख तुम्हास नसे माझीं ॥८४॥

जेव्हां स्मरण कराल अंतरीं । मी सत्वर येईन ते अवसरीं ।

ऎसें म्हणवोनि श्रीहरी । गेले सत्वर तेधवां ॥८५॥

ऎसा सात दिवस उत्साह जाहला । पौर्णिमेस पाहिला गोपाळ काला ।

शक्ति आली शरीराला । अरोग जाहला निजभक्त ॥८६॥

उभयतां देउळीं जाऊन । घेतलें पांडुरंगाचें दर्शन ।

सजळ अश्रु भरलें लोचन देवासि पुसेनि चाललीं ॥८७॥

पुंडलिकासि पुसोनि जाणा । घातलीं क्षेत्रप्रदक्षिणा ।

पाडु कोळियाचा उपकार जाणा । क्षणक्षणा आठवें ॥८८॥

स्मरण करितां निज अंतरीं । त्याचरूपें प्रगट जाहले श्रीहरी ।

बोळवीत जातसे ते अवसरीं । वैकुंठविहारी जगदात्मा ॥८९॥

मग विठ्ठल पुरंदर म्हणे त्यासी । आम्हांसि भेटावे आषाढ मासीं ।

अवश्य म्हणे हृषीकेशी । अगत्य पंढरीसी तुम्ही यावें ॥१९०॥

ऎशा रीतीं बोलोनि त्यातें । परतोनि आले राउळांत ।

निजभक्ताचा होऊनि अंकित । कौतुक दावित नानारीतीं ॥९१॥

मग विठ्ठल पुरंदर ते अवसरी । कांतेसहित पातलें घरीं ।

ध्यानींमनीं बैसला श्रीहरी । आठवें पंढरी क्षणक्षणा ॥९२॥

खातापितां गमन करितां । निजतां बैसतां विश्रांति घेतां ।

प्रपंच धंदा काम करितां । पंढरीनाथा भजतसें ॥९३॥

विठ्ठलस्मरण करितांचि प्रीतीं । तदाकारचि जाहली वृत्ती ।

आषाढमासी पंढरीसी मागुतीं । आनंदयुक्त येतसे ॥९४॥

पंढरीसि येवोनि तयेवेळीं । उभयतां धुंडिती पांडुरंग कोळी ।

ठावठिकाण पाहतां सकळीं । तया काळीं दिसेना ॥९५॥

म्हणे माझें जीवींचा प्राणमित्र । वागवोनि आणिलें खांद्यांवर ।

तो पंढरी टाकोनि गेला दूर । म्हणवोनि साचार न भेटे ॥९६॥

स्त्रीपुरुष दोघेजण । क्षेत्रांत पाहती धुंडोन ।

परी कोठें नलगेचि ठिकाण । तों गेलासे दिन अस्तमान ॥९७॥

प्रहर रात्र लोटून जातां । तोंवरी उपवासी उभयतां ।

संकट पडिलें पंढरीनाथा । म्हणे दर्शन आतां यांसि द्यावें ॥९८॥

मग साक्षात रूप धरोनि सगुण । तयासि दीधलें दर्शन ।

म्हणे पांडुरंग कोळी मीच होऊन । आणिलें उचलोनि तुजलागीं ॥९९॥

दृष्टींसीं देखोनी कैवल्यदानी । परम संतोष जाहला मनीं ।

देवासि आलिंगन देऊनी । मिठी चरणीं घातली ॥२००॥

मग विठ्ठल पुरंदर देवासी म्हणे । नाशवंत शरीर हें जाय जेणें ।

तुवां खांद्यावरीं आणिलें वागवून । काय उत्तीर्ण तुझें होऊ ॥२०१॥

ऎकोनि म्हणती पांडुरंग । नाशवंताचा करितां त्याग ।

तरी अविनाश कैसें जोडेल मग । ऎसें सांग मजलागीं ॥२॥

तुवां काया वाचा आणि मनें । मजसीं लाविलें अनुसंधान ।

तरी आतां पाकनिष्पत्ती करून । भोजन करणें सत्वर ॥३॥

साधुसंतांचे माहेर पंढरी । तीर्थ उपवास नसे ये क्षेत्रीं ।

ऎसें सांगोनि श्रीहरी । राउळांतरीं मग गेले ॥४॥

जयाचें चित्तीं जैसा भाव । तैसा होतसे देवाधिदेव ।

निजभक्ताच्या संकटास्तव । अपूर्व लाघव दाखविलें ॥५॥

जीवासि पडतां जड भारी । जो नेमासि न टळे निर्धारी ।

तयासि दर्शन देतसे हरी । इतरांसि नेत्रीं दिसेना ॥६॥

दुर्योधन छळितां पांडवांस । तयासि पातला वनवास ।

परी ते न सांडिती सत्वास । चित्तीं कृष्णपरेश आठविती ॥७॥

दरिद्रें सुदामा ब्राह्मण । बहुत पीडिला असे जाण ।

परी तो आठवी श्रीहरीचे चरण । दरिद्र विच्छिन्न मग झालें ॥८॥

प्रल्हादासि पिता नानाप्रकारें । गांजितां भजनासि न पडे अंतर ।

निश्चय देखोनि सारंगधर । खांबांत सत्वर प्रगटले ॥९॥

असोत आतां भाषणें फार । ज्वरें तापलें असतां शरीर ।

यात्रेसि निघाला पुरंदर । म्हणवोनि रुक्मिणीवर भेटले ॥२१०॥

पुढिले अध्यायीं चरित्र गहन । श्रोतीं देइजे अवधान ।

महीपतीचीं आर्ष वचनें । सज्जनीं मान्य करावीं ॥११॥

स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ भाविक भक्त । अठ्ठेचाळिसावा अध्याय रसाळ हा ॥२१२॥ अध्याय ॥४८॥ ओव्या ॥२१२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP