मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय ४२

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


श्रीगणेशाय नमः ॥

एक श्रीहरीचे कृपेविण । व्यर्थ दिसती सकळ साधनें ।

चौदाविद्या अभ्यासिल्या त्याणें । जैसी ज्योतीवांचून ठाण दिवी ॥१॥

श्रीहरिकृपेवीण साचार । चौसष्टीकळा साधिल्या जर ।

जैसें दोरीवांचोनि खांब सूत्र । बाहुलें अणुमात्र हलेना ॥२॥

वेदशास्त्रें आणि पुराणें । व्यर्थचि भगत्कृपेविण ।

जैसें पोटीं नसतां संतान । विवाह करणें पोसण्याचा ॥३॥

करुणारसें करोनि घननीळा । न आळविलें वेळोवेळां ।

तरी व्यर्थचि त्याची कवित्व कळा । शीणच उरला वैखरीसी ॥४॥

कांहींच सामर्थ्य नसोनि अंगीं । जे सद्भावें मीनले पांडुरंगीं ।

कीर्तनीं डुल्लती सप्रेमरंगीं । तरी सत्कीर्ति अंगीं पावले ते ॥५॥

भक्तवत्सल दीनदयाळ । न विचारीच याति कुळ ।

शुद्ध भावाचें देखोनि बळ । पावे तत्काळ तयासी ॥६॥

मागिले अध्यायीं कथा सुंदर । केशव स्वामी भक्त थोर ।

आणि बाजीद यवन साचार । वैष्णव वीर तो झाला ॥७॥

आणि संतोबा पवारें गुरुभक्‍ती । करितां जाहली वैराग्य प्राप्ती ।

त्यावरी मालोपंताचे संकटीं निश्चिती । वैकुंठपती पावला ॥८॥

आतां ऐका प्रेमळसज्जन । कथा रसिक निरुपण ।

एक प्रेमाबायी म्हणवोन । श्री भागवत श्रवण करीतसे ॥९॥

ती भ्रतारहीन असे पाहीं । ज्ञानवैराग्य नेणेचि कांहीं ।

परी भक्‍तिभावें करोनि तिहीं । शेषशायी जोडला ॥१०॥

नाठवे आपुलें आणि परावें । सम विषम नाहींच ठावें ।

सर्वाभूतीं सारिखाचि भाव । एकचि जीव मानीतसे ॥११॥

दया परम सर्वाभूतीं । श्रवनीं कीर्तनीं असे आर्ती ।

याचक क्षुधितां यथाशक्‍ती । करितसे तृप्ती तयांची ॥१२॥

संत साधु वैष्णव प्रेमळ । आलिया मंदिरीं देतसे स्थळ ।

नामस्मरण सर्वकाळ । सप्रेम मेळें करीतसे ॥१३॥

नित्य करोनि गंगास्नान । गोपाळ मूर्तीचें करी अर्चन ।

पंडित भागवत वाचिती जाण । जातसे श्रवण करावया ॥१४॥

ऐकतां श्रीहरीचें चरित्र । अश्रुपात्रें भरले नेत्र ।

गलित होती सकळ गात्रें । भान अणुमात्र असेना ॥१५॥

हरिकीर्तनीं बैसतां पाहीं । सर्वकाळ ती विदेही ।

म्हणवोनि नांव भक्‍तवैष्णवी । प्रेमाबायी ठेविलें ॥१६॥

तंव कोणे एके अवसरीं । साधुसंत पातले घरीं ।

ते क्षुधित असती उदरीं । मग विचार करी मनांत ॥१७॥

म्हणे पुराणश्रवणासि गेलें जर । तरी संतसेवेसि पडेल अंतर ।

तेणेंचि सर्व सुकृत हरे । कैसा विचार करावा ॥१८॥

विष्णुपूजन करितां निश्चित । घरासि आले वैष्णवभक्‍त ।

तरी देवपूजा सांडोनि त्वरित । तयांसि प्रणिपात करावा ॥१९॥

बाहेर आले वैष्णव जन । त्यांचा करोनि सन्मान ।

करीत बैसला देवतार्चन । तरी तें न माने हरीसी ॥२०॥

वेदोक्त मंत्र यथास्थित । ऐकोनियां वैकुंठनाथ ।

म्हणे अपशब्द बोलतो मातें । कैसें यातें करावें ॥२१॥

सुमन पुष्पें वाहतो वरीं । तरी ते दगड येती देवावरी ।

ताडना समान श्रीहरी । पूजा अंतरीं भावीतसे ॥२२॥

एक्या वस्त्रें मस्तक झांकिलें । तंव तळवटीं नग्न झालें ।

जैसें घर मोडोनियां भलें । मांडव केले अंगणांत ॥२३॥

तैसा देवपूजेसि गुंतला । आणि ब्राह्मण अतिथीसीं विमुख झाला ।

तरी तें न मानेचि देवाला । धर्मशास्त्रीं झाला निर्णय ॥२४॥

ऐसें बोलोनि प्रेमबायी । पुराणश्रवणासि न जाय पाहीं ।

साधुसेवेसि कोणी नाहीं । म्हणवोनि गृहीं राहिलीं ॥२५॥

आपुल्या घरीं धंदा करीत । परी पुराणापासीं लागलें चित्त ।

म्हणे मंदिरीं भागवत । असेल वाचित ये समयीं ॥२६॥

मग दाहा वर्षांचा होता बाळ । तयासि सांगे तये वेळ ।

त्वां पुराणासि जाऊनि तत्काळ । कथा सकळ ऐकावी ॥२७॥

यथाविधि करोनि नमन । मग मजपासीं सांगे येऊन ।

ऐकोनि प्रेमाबायीचें वचन । अवश्य म्हणे पुत्र तिचा ॥२८॥

श्रवणालागीं पाठविला बाळ । प्रपंच धंदा सारीत सकळ ।

परी श्रीहरीच्या चरित्राजवळ । वृत्ति तत्काळ वेधली ॥२९॥

जैसी गाय डोंगरीं चरे तृण । परी वत्सापासीं तिचें मन ।

क्षण क्षणां टंवकारुन । हबंरडा हाणून पाहत ॥३०॥

नातरी पक्षिणी पडे आकाशीं । परी तिचें मन पिलियांपासीं ।

कां माता गुंतली कामासी । परी लोभ मानसीं तान्हयाचा ॥३१॥

तैशाच परी प्रेमाबायी । प्रपंच धंदा सारीतसे गृहीं ।

परी श्रीहरि चरित्रीं मन ठेवी । देहभाव जीवीं असेना ॥३२॥

पाकनिष्पत्ति झालियावरी । वैष्णवभक्‍त गंगातीरीं ।

स्नानें करोनि सत्वरी । निज मंदिरीं पातले ॥३३॥

करोनि त्याचें चरण क्षाळण । तें तीर्थ केलें प्राशन ।

गंधाक्षता सुमन चंदन । निज प्रीतीनें अर्पिलीं ॥३४॥

स्वहस्तें पात्रीं वाढोनि अन्न । संकल्प सोडिला कृष्णार्पण ।

तृप्त झालिया वैष्णवजन । तुळसी पान मुखशुद्धी ॥३५॥

तों निजपुत्र श्रवणासि गेला पाहीं । तोही पातला ते समयीं ।

उभयतां पंक्‍तीसि लवलाहीं । भोजन तिहीं सारिलें ॥३६॥

दिवस राहिला एक प्रहर । मग संनिध बोलावूनि निज पुत्र ।

म्हणे तुवां पुराणीं ऐकिलें चरित्र । तें सविस्तर मज सांग ॥३७॥

ऐकोनि प्रेमाबायीचें वचन । पुत्र संनिध बैसे येऊन ।

म्हणे माते म्यां ऐकिलें पुराण । तें सादर श्रवण करीं कां ॥३८॥

नंदयशोदेचें घरीं । श्रीकृष्ण अवतरला गोकुळीं ।

यशोदा स्वयें दधि घुसळी । तों जवळ वनमाळी पातला ॥३९॥

फुंदफुंदों रडे जगज्जीवन । म्हणे मज देयीं स्तनपान ।

यशोदेनें ठेवूनि घुसळण । आडवा श्रीकृष्ण घेतला ॥४०॥

मुखीं घालोनि एक स्तन । आवडीनें चोंखीत जगज्जीवन ।

दुसरा हातीं धरोनि जाण । मातेचें वदन पाहत ॥४१॥

यशोदेचें भाग्य परम । मायातीत परब्रह्म ।

तो सगुणरुपें पुरुषोत्तम । प्रेमें स्तनपान करीतसे ॥४२॥

ऐसे समयीं ते अवसरीं । मनांत विचार करी श्रीहरी ।

म्हणे मातेची प्रीत मजवरी । किंवा संसारीं हें पाहूं ॥४३॥

ऐसें चित्तीं विचारुन । अग्नीसि आज्ञा केली कृष्णें ।

म्हणे तुवां प्रदीप्त होऊन । दूध उतवणें सत्वर ॥४४॥

ऐसें इच्छितां जगन्निवास । तों जातवेद चेतला विशेष ।

दूध उतलें निःशेष । घ्राणासि वास पातला ॥४५॥

कर्पट दुधाची येतां घाणी । तों यशोदेसि कळलें मनीं ।

मग स्तन काढितां मुखांतूनी । चक्रपाणी रडतसे ॥४६॥

तैसाचि टाकोनि घननीळ । यशोदा गेली चुलीजवळ ।

तों दूध उतोनि गेलें सकळ । म्हणवोनि तळमळ करीतसे ॥४७॥

गांठींचा परीस टाकोनि पाहे । किमया करुं गेली माय ।

तों तेथें नास्तिक वाद होय । तैसेचि सोय ते झाली ॥४८॥

क्षीरसमुद्र सांडोनि जाण । शेळीसि घातलें मेळवण ।

स्तनासि हात घालितां जाण । तों दुहोनि नेली आणिकेंची ॥४९॥

जवळी सुरतरु सांडुनी । सिंदीसि घालूं गेली पाणी ।

तों तिचीं पत्रें नेलीं कोणी । केरसुणी करावया ॥५०॥

मुक्ताफळांचा सांडोनि हार । रानांत वेंचूं गेली गार ।

तों तेथें हीन दिसती साचार । व्यर्थचि वेरझार पडियेली ॥५१॥

तैसें श्रीकृष्ण परब्रह्म टाकोनी । प्रपंचाकडे गेली जननी ।

तों दुधाणें रितें देखोनी । तळमळ मनीं करीतसे ॥५२॥

असो इकडे श्रीकृष्ण । चित्तीं जाहला कोपायमान ।

म्हणे मजपरीस जननीचें मन । प्रपंचीं निमग्न असे कीं ॥५३॥

प्रेमपान्हा पाजितां पाहे । प्रपंचाकडे गेली माय ।

तरी ईस जेणें शिक्षा होय । तैसा उपाय करावा ॥५४॥

ऐसें म्हणवोनि त्या अवसरा । कृष्णें लवंडिला घुसळण डेरा ।

शिशु बाळकें आणीत सत्वरा । आपुल्या घरा श्रीहरी ॥५५॥

संचित लोणी होतें कांहीं । तें गाडियांसि वांटिलें सर्वही ।

आपुल्या हातें शेषशायी । भाजनें सर्वही फोडित ॥५६॥

इतुका अन्याय केला कृष्णें । तों यशोदा आली घरांतून ।

तों दहीं लवंडिलें जगज्जीवनें । वांटिलें माखण पोरांसी ॥५७॥

हें यशोदेनें देखोनि नयनीं । परम संताप वाटला मनीं ।

म्हणे याज ऐसा अगोचर कोण । त्रिभुवनींही दिसेना ॥५८॥

लेंकुरें आहेत घरोघरीं । परी हा अनिवार सर्वापरी ।

सांगती गार्‍हाणीं गांविंच्या नारी । तीं ययार्थ अंतरीं मज वाटे ॥५९॥

ऐसें म्हणोनि यशोमती । हातीं घेतली वेताटी ।

देखोनि पळतसे जगजेठी । माता पाठी धांवतसे ॥६०॥

क्षण एक हरि दिसे नयनीं । तयासि धरुं पाहे जननीं ।

तो अदृश्य होय चक्रपाणी । सवेंचि ते क्षणीं दिसत ॥६१॥

यशोदा पाहे लवड सवड । तो हरी लपे भिंती आड ।

गवळणीं म्हणती दीधला लाड । तेव्हां कोड वाटलें ॥६२॥

आम्ही नित्य सांगूं गार्‍हाणीं । कीं खोडी करितो चक्रपाणी ।

ते असत्य वाटे तुजलागोनी । आतां अनुभव मनीं आला कीं ॥६३॥

यशोदा पाहे बिदोबिदीं । तंव कृष्ण लपे सांदोसांदीं ।

गौळणींचीं मिळाली मांदी । परी कृष्ण त्रिशुद्धी नातुडे ॥६४॥

मातेचें भय वागवोनि थोर । भयें पळतसे सारंगधर ।

दोन प्रहर आला दिनकर । उष्ण तीव्र जाहलें ॥६५॥

धावतां पळतां साचार । जननींसि श्रम जाहला फार ।

धर्में करुनि निथळे सुंदर । कैसा विचार करावा ॥६६॥

म्हणे एकदा लागता माझ्या हातीं । मग त्यासि न सोडीं कल्पांतीं ।

हृदयमंदिरीं निश्चिती । बांधोनि श्रीपती ठाकितें ॥६७॥

ऐसें मातेचें अंतर । जाणोनियां करुणाकर ।

म्हणे जननीसि श्रम झाला फार । आतां स्थिर असावें ॥६८॥

यशोदा पाहे चपळ दृष्टीं । तों पुढें देखिला जगजेठी ।

मग सत्वर धरितसे मनगटीं । क्रोध पोटीं न समाये ॥६९॥

मग फरफरा वोढीत चक्रपाणी । यशोदा घेऊनि आली सदनीं ।

मंदिरीं मिळोनि सकळ गौळणी । नंदराणी गोफाटिती ॥७०॥

मग होऊनि यशोदेसमोर । म्हणती तुझा कृष्ण चोर जार ।

आम्ही सांगों निरंतर । तें असत्य उत्तर तुज वाटे ॥७१॥

आज घरीं लवंडिला गोरस । यास्तव धरिलें कृष्णास ।

आतां उखळीं बांधोनि टाकी यास । शिक्षा नसे आन कांहीं ॥७२॥

ऐसें बोलतां व्रजनारी । तों फुंदफुंदों रडे मुरारी ।

अश्रुपात वाहती नेत्रीं । परी मातेसि अंतरीं कींव नये ॥७३॥

दावें सोडोनि लवलाहें । यशोदा कृष्णासि बांधों जाय ।

तंव तें वीतभर उणें राहे । गांठ नये सर्वथा ॥७४॥

मग दुसरें दावें ते अवसरीं । यशोदा आणोनि लावी सत्वरी ।

तों आणिक पाहिजे वीतभरी । म्हणे कैशा परी करावी ॥७५॥

एकमेकांसीं लावितां दोर । परी कदा न पुरती साचार ।

दावीं लाविली नवलक्ष वर । परी उणें वीतभर येतसे ॥७६॥

गौळणी आपुल्याला सदनीं जाउनी । चर्‍हाटें देताति आणोनी ।

म्हणती कृष्णासि उखळीं बांधोनी । शिक्षा जननी लावी वो ॥७७॥

घरची नवलक्ष असतां दावीं । आणि घरोघरचीं आणिलीं सर्वही ।

एकएकासी यशोदा लावी । परी तीं कदाही न पुरती ॥७८॥

वैष्णवि मायेनें भुलविल्या गौळणी । तैशाच रीतीं यशोदा जननी ।

जो का विश्वंभर चक्रपाणी । अवतरे सदनीं नंदाच्या ॥७९॥

ज्याच्या रोमरंध्रीं ब्रह्मांडें । मातील येव्हडें प्रचंड धेंड ।

तयासि यशोदा बांधूं पाहे कोडें । नवल चोखडें हेंच कीं ॥८०॥

अरुप अनाम साचार । ब्रह्मादिकांसि नकळे पार ।

त्यासि बांधावया न पुरे दोर । हें साचार कळेना ॥८१॥

आकाश थोरवाडपणीं । गोचर सर्वांसि दिसतसे नयनीं ।

त्यासि घालावया गवसणी । आणावी कोठुनी कळेना ॥८२॥

क्षीरसागरासि सांडवा । कोणत्या पाषाणें मांडावा ।

अमृतासि पाहुणेर करावा । कोणत्या पदार्थें कळेना ॥८३॥

पृथ्वीचें वजन करावें कोडें । तरी येव्हडें विस्तीर्ण नाहीं पारडें ।

समीर कोणते ठायी कोंडे । ऐसें रोकडें कळेना ॥८४॥

तैशाच रीतीं यशोदा माय । कृष्णासि दोर बांधो जाय ।

परी तो अनंत अपार आहे । यालागीं न समाये चर्‍हांटीं ॥८५॥

परी यशोदा म्हणे माझा कुमर । गौळणीं भविती नंदकिशोर ।

म्हणवोनि नवलक्ष लागोनि दोर । सारंगधर बांधिती ॥८६॥

परी वीतभर उणें दिसतसे दिठी । पदरीं सर्वथा नये गांठी ।

म्हणोनि यशोदा होतसे कष्टी । म्हणे कैसी गोष्टी करुं आतां ॥८७॥

एकदां बंधनामाजी येता । मग मी न सोडितें कृष्णनाथा ।

जाणोनि मातेच्या मनोगता । कृपा भगवंता उपजली ॥८८॥

म्हणे मज बांधावया निश्चिती । कष्टी होतसे यशोदा सती ।

आतां यांची जी मनोवृत्ती । तैसीच निश्चिती होय सुखें ॥८९॥

ऐसें चिंतितां चक्रपाणी । तों दोर पुरला तेच क्षणीं ।

सत्वरी गांठ देतसे जननी । हांसती गौळणी सर्वत्र ॥९०॥

उखळीं बांधितां जगज्जीवन । मातेसि विलोकी दीनपणें ।

म्हणे खोडी न करीं । मी आजपासुन मुक्त बंधन करी ॥९१॥

ऐसे म्हणवोनि पूतनारी । टपटपां आसवें गाळीत नेत्रीं ।

माता टाकोनि तैसेच परी । लागे मंदिरीं निजकार्या ॥९२॥

पूर्व अनुसंधानी साचार । श्रोतीं धरिजे मागील मोहर ।

कीं प्रेमाबायीस निजपुत्रें । ऐसें चरित्र सांगीतलें ॥९३॥

ही कथा ऐकतां तये वेळा । गंहिवरें करोनि कंठ दाटला ।

टपटपां आसुवें वाहती डोळां । म्हणे कोण सांवळां सोडवील ॥९४॥

एकदां लवंडिला गोरस । यास्तव बांधिला कृष्णास ।

माय नव्हे ते आहे लाल । मजला भासे साजणीं ॥९५॥

मग प्रेमयाबायी पुत्रासि म्हणे । संसार निरविला तुजकारणें ।

मी सत्वर गोकुळीं जाऊन । सोडवीन कृष्ण स्वहस्तें ॥९६॥

ऐसा रीतीं बोलोनि वचन । कुडींतूनि तत्काळ सोडिला प्राण ।

घरीं उतरले वैष्णवजन । ते निजदृष्टीनें पाहती ॥९७॥

एकमेकांसि काय बोलती । धन्य प्रेमाबायीची भक्ती ।

हृदयी चिंतोनि कृष्णमूर्ती । झाली पावती निजधामा ॥९८॥

परिमळ तुळशीं सुमनें बरीं । आकस्मात वर्षली तिजवरी ।

हे आश्चर्य देखोनि नेत्रीं । जयजयकारी गर्जती ॥९९॥

देह निर्वाह झालिया निश्चिती । पुत्रानें घातली पुण्यतिथी ।

झाली सत्कीर्ती जनांत ॥१००॥

आणिक चरित्र रसाळ गहन । सादर ऐका भाविक जन ।

एक शिळाबायी म्हणवोन । सुलक्षणा राजकन्या ॥१॥

लहान वय असतां जाण । लेहूं घातली पितयानें ।

पंडित ब्राह्मण घरीं ठेवून । म्हणे अभ्यासी लावणें कन्येसी ॥२॥

पितया सांगतां ऐशा रीतीं । लेहूं शिकविली ते गुणवती ।

शाळग्राम विष्णुमूर्ती । सद्गुरु पूजिती नित्य काळीं ॥३॥

अर्चन करितां एके दिनीं । शिळाबायी पाहतसे नयनीं ।

पंतोजीस म्हणे तेच क्षणीं । माझी विनवणी अवधारा ॥४॥

मज नित्य पूजावयाकारणें । शाळग्राम शिळा एक देणें ।

म्हणोनि सद्भावें करी नमन । निजप्रीतीनें तेधवां ॥५॥

कन्येचा अतिशय देखोनि बहुत । पंतोजीनें केली युक्त ।

चोपडा गोटा पाषाण पाहत । म्हणे शाळग्राम निश्चित हा पूजीं ॥६॥

ऐसी ऐकोनि वचनोक्‍ती । परम संतोष जाहला चित्तीं ।

आसन गवाळें उपकरणें निश्चिती । पाहूनि करिती तैसेंची ॥७॥

प्रातःकाळीं करोनि स्नान । मांडीतसे देवार्चन ।

पंतोजी कैसें करितो अर्चन । त्याजप्रमाणें आपण करी ॥८॥

मंत्र तों नये तिजप्रती । परी भावविश्वास दृढ चित्तीं ।

देखोनि तिची सप्रेम भक्‍ती । तेथेंचि श्रीपती प्रगटला ॥९॥

भक्‍तीची आवडी वैकुंठराया । शहाणपण नावडेचि तया ।

भक्‍तीवांचोनि जे जे क्रिया । तरी साक्षात्कार तया नयेची ॥११०॥

शिळाबायीचा सप्रेम भाव । पाषाणांतचि प्रगटला देव ।

आवडीची पूजा घेत माधव । प्रीती अपूर्व देखोनी ॥११॥

हा मातापितयांसि भाव न कळे । म्हणती लेंकरुं खेळतसे खेळ ।

दिवसंदिवस तये वेळ । उपवर तत्काळ ते झाली ॥१२॥

मग वर पाहूनि मांडळिक भूपती । लग्न केलें सत्वर गती ।

चार दिवस सोहळा झालिया निश्चिती । सासुर्‍यां पाठविती कन्येतें ॥१३॥

देवपुजेची पेटारी । सवें घेतली बरोबरी ।

प्रथम दिवसीं वाटेकरी । आरती करी निजभावें ॥१४॥

तिचा भ्रतार परम खळ । त्याणें दृष्टीसी पाहिलें सकळ ।

देवपूजेची पेटारी आहे जवळ । हा वृत्तांत कळे त्यालागीं ॥१५॥

मग शिळाबायीसि न कळत । पेटारी बाहेर घेऊनि जात ।

अवघीं उपकरणीं विखरोनि त्वरित । डोहांत टाकित नदीच्या ॥१६॥

चित्तीं धरोनि कुबुद्धि । नाश केला तये संधीं ।

म्हणे कांतेची परमार्थ उपाधी । तोडिली व्याधी हे बरें ॥१७॥

मग उदयासि येतां तमारी । स्नान करितसे सुंदरी ।

तों देव पूजेची पेटी । पाहतां सत्वरीं दिसेना ॥१८॥

म्हणोनि चिंताक्रांत होय । म्हणे शाळग्राम झाला काय ।

हा जीव त्यजीन लवलाहें । चित्तीं निश्चय दृढ केला ॥१९॥

म्हणे देवाधिदेवा वैकुंठपती । कांहीं अंतर पडिलें भक्‍तीं ।

टाकूनि गेलासि मजप्रती । वाटती खंती बहु तुझी ॥१२०॥

कंठ जाहला सद्गदित । नेत्रीं वाहती अश्रुपात ।

म्हणे देवपूजा न सांपडतां सत्य । व्यर्थचि जीवित न ठेवीं ॥२१॥

सासुसासरा बहुत सांगती । भ्रतार संबोखीत नाना रीतीं ।

परी अन्न उदक न सेवीच सती । निश्चय चित्तीं दृढ केला ॥२२॥

ऐसें चार दिवस लोटतां निर्धारीं । शिळाबायीसि पावला श्रीहरी ।

तिच्या पंतोजीचें रुप धरी । मग दीधली पेटारी स्वप्नांत ॥२३॥

शिळाबाई सावध होय । तों देवपूजा सन्निध आहे ।

मग स्नान करोनि लवलाहें । अर्चन पाहे करीतसे ॥२४॥

ते भ्रतारानें देखोनि नयनीं । परम आश्चर्य करीतसे मनीं ।

म्हणे एक एक वस्तु एके ठिकाणीं । भिरकावूनि दीधली म्यां ॥२५॥

बुडी देऊनि उदकांत जाण । गोळा करोनि आणिलें कोणें ।

मग परम अनुतापला मनें । म्हणे व्यर्थचि छळण म्यां केलें ॥२६॥

कांतेचा निश्चय अपूर्व । तत्काळ पावला देवाधिदेव ।

भ्रतारासि येतांचि हा अनुभव । मग भक्त वैष्णव तोही झाला ॥२७॥

आणिक चरित्र रसाळ वाणी । श्रोतीं सादर ऐकिजे कानीं ।

मांडलिक राजा हिंदुस्थानीं । कांता सुलक्षणी तयाची ॥२८॥

मत्स्य कच्छ वराह व्यक्ती । नरसिंह वामन भार्गवमूर्ती ।

रामकृष्णादि येतां जयंती । उत्सव प्रीती करीतसे ॥२९॥

मखरें करोनि नानारीतीं । अर्चनीं पूजीत विष्णुमूर्ती ।

अन्न देतसे सर्वांभूतीं । कीर्तन करिती वैष्णव ॥१३०॥

एकादशीस हरिजागर । विष्णुभक्ति वाढविली थोर ।

नामस्मरण सप्रेमभर । दिवसरात्र करीतसे ॥३१॥

नरपाळ मांडलिक नृपवर । तो असे तिचा निजभ्रतार ।

अंतरनिष्ठ वैष्णववीर । बाह्यात्कार नावडे त्यासी ॥३२॥

न करीच विष्णु अर्चन । श्रवणीं नायके हरिकीर्तन ।

वाचेसि न करी नामस्मरण । यास्तव जन निंदी तया ॥३३॥

म्हणती कांता भाविक परम सुशीळ । परी भ्रतार इचा असे खळ ।

व्यर्थ आयुष्य दवडिलें सकळ । चित्तीं घननीळ आठवीना ॥३४॥

ऐशा रीतीं निंदीती जन । परी अंतरनिष्ठ नृपनंदन ।

चित्तीं देवाची आठवण । एकही क्षण न विसंबे ॥३५॥

तंव कोणे एके दिवसीं । राणी म्हणे भ्रतारासि ।

कांहीं विष्णु भक्ति घडावी तुम्हांसी । ऐसें मजसी वाटतें ॥३६॥

ऐकोनि म्हणे नृपनाथ । माझा देह विषयासक्त ।

यास्तव न रुचे भक्तिपंथ । ऐसें बोलत तिजलागीं ॥३७॥

परी अंतरीं प्रेमाचा ओलावा । एकही क्षण न विसरेचि देवा ।

लोकांसि संसारि दिसे बरवा । परी अंतरभावा न जाणती ॥३८॥

एके दिवशीं नृपनाथ । निजला होता मंदिरांत ।

शरीर कानवडें करितां निश्चित । तों राम अवचित वाचेसि ते ॥३९॥

यें कांतेनें ऐकोनि ते अवसरीं । परम संतोष मानीत अंतरीं ।

मग उदयासि येतांचि तमारी । उत्सव मंदिरीं आरंभिला ॥१४०॥

विष्णुपूजन हरिकीर्तन । ब्राह्मणांसि सत्पात्रीं देतसे दान ।

तों राजा पुसे तिजकारण । आज उत्सव पूर्ण कां करिसी ॥४१॥

राणी तयासि उत्तर देत । तुम्ही निद्रित होतां यामिनींत ।

तों मुखांतूनि राम निघत । तें म्यां सावचित्त ऐकिलें ॥४२॥

मग परमसंतोष जाहला अंतरीं । म्हणोनि उत्सव मांडिला घरीं ।

ऐसें सांगतांचि सुंदरीं । नरपाळ करी काय तेव्हां ॥४३॥

म्हणे राम निघाला देहांतून । तरी आतां ठेवावें कासया जिणें ।

ऐसें म्हणोनि नृपनंदनें । सोडिला प्राण तत्काळ ॥४४॥

ऐसें कौतुक होतांचि पूर्ण । सकळ पाहती वैष्णव जन ।

अंतरनिष्ठ राजा म्हणून । कळली खूण सकळासी ॥४५॥

भ्रताराची निष्ठा गाढी । देखोनि राणी प्राण सोडी ।

उभयतांनीं साधूनि घडी । जोडिली जोडी देवाची ॥४६॥

ऐसा भक्‍तीचा निश्चय देख । एका परीस आगळे एक ।

अंतरीं धरोनि वैकुंठनायक । सप्रेम सुख भोगिती ॥४७॥

आणिक कथा रसाळ गोमटी । सादर ऐकतां कर्णसंपुटीं ।

त्यावरी करोनि कृपादृष्टी । पावे संकटीं जगदात्मा ॥४८॥

एक पिलाबायी प्रधान कुमरी । नित्य विष्णूचें अर्चन करी ।

तों भ्रतार स्मरोनि गेला सत्वरी । मग पितयाचें घरीं ते राहे ॥४९॥

पिताही काळें निमोनि गेला । परी दोघे बंधु होते तिजला ।

त्यांणींच तिचा प्रतिपाळ केला । तों कलह वाढला दोघांत ॥१५०॥

दोघांनींही दोन गांव भले । बळकावोनि विभक्‍त झाले ।

तों धाकटया बंधूनें काय केलें । सैन्य ठेविलें झुंजावया ॥५१॥

मग वडील बंधूचा गांव निश्चित । त्याणें लुटूनि केला फस्त ।

पिलाबायीचें देवतार्चन समस्त । वाताहत जाहलें ॥५२॥

नित्य नेम सारिल्याविण । पिलाबायी न घेचि अन्न ।

बंधूसि सांगूनि पाठविलें तिणें । कीं शोध करणें म्हणोनियां ॥५३॥

त्याणेंही तल्लास केला बहुत । परी देवतार्चन न सांपडेचि सत्य ।

मग पिलाबायीस सांगूनि पाठवित । येथें येऊनी त्वरित पाहें तूं ॥५४॥

मग जाऊनि त्याच्या गांवांस । शोध केला बहु वस ।

परी विष्णुमूर्ति कोठेंही नसे । पांच उपवास जाहले ॥५५॥

तिचा निश्चय देखोनि मनीं । तत्काळ पावले चक्रपाणी ।

विप्रवेषें स्वप्नीं येउनी । देवतार्चन आणूनी दीधलें ॥५६॥

ऐसा चमत्कार दृष्टीसि देखिला। मग धाकुटया बंधूसि अनुताप झाला ।

म्हणे म्यां व्यर्थ कलह केला । मग शरण गेला बंधूसी ॥५७॥

म्हणे मी अपराधी पूर्ण । तुम्हांवरी आलों सैन्य घेऊन ।

वाताहत झालें देवतार्चन । जगज्जीवन शिणविला ॥५८॥

ऐसा पश्चात्ताप धरोनि चित्तीं । सख्यत्वें उभयतां भेटती ।

पिलाबायीचे शिष्य होती । अनुग्रह घेती सद्भावें ॥५९॥

नित्य सद्भावें सेवा करितां । साक्षात्कार पावले उभयतां ।

आणिक चरित्र रसाळ कथा । सादर श्रोतां परिसिजे ॥१६०॥

संत राजा नृपवर । साधुसेवेसि अति तत्पर ।

त्याची कन्या होती उपवर । लग्न सत्वर नेमिलें ॥६१॥

लग्न तों जाहलें सत्वर । परी कन्येसि मिळाला अभक्तवर ।

विष्णुमहिमा भक्तिपर । त्यासि अणुमात्र कळेना ॥६२॥

रमाबायी वैष्णव कुमरी । दीधली अभक्‍ताचें घरीं ।

ज्याच्या भक्‍ति लवलेश निर्धारीं । सर्वथा अंतरीं असेना ॥६३॥

श्रीविष्णुचें अर्चन पूजन । कोणी न करिती नामस्मरण ।

मग संतसेवन घडेल कोठून । विषयांध परिपूर्ण सर्वही ॥६४॥

तेणें रमायाबीचें चित्त । सर्वकाळ चिंताक्रांत ।

म्हणे अभक्‍ताची लाधली संगत । कैसी मात करावी ॥६५॥

पितयानें शोध न करोनि अंतरीं । मज दीधलें अभक्‍ताचें घरीं ।

पूर्वजन्मींचा ठेवा निर्धारीं । बळत्कारीं तो आला ॥६६॥

ऐसे लोटता दिवस फार । तंव ते जाहली गरोदर ।

नवमास भरतांचि साचार । सगुण पुत्र जाहला ॥६७॥

पुत्र भ्रतार धन धान्य घरीं । परी सर्वथा चिंतातुर अंतरीं ।

म्हणे कृपावंता वैकुंठविहारी । तुजवीण क्षणभरी कंठेना ॥६८॥

हृदयीं ध्यातें तुझे पाय । आणिक कोणाचा नाहीं आश्रय ।

कधीं करिशील माझी सोय । अभक्‍तासि प्रत्यय दाखवोनी ॥६९॥

ऐसी इच्छा धरिली मनीं । तों एकदा पातली हरिदिनी ।

पशु मारावया लागोनी । भ्रतार सदनीं आणितसे ॥१७०॥

रमाबायी वर्जीतसे त्यासी । म्हणे आजि विष्णुव्रत एकादशी ।

हिंसा कर्म घडतां प्राणियासी । तरी नरकवासी होतसे ॥७१॥

ऐसें शिकविलें नानापरी । परी तो नाइके दुराचारी ।

मांस खाइरियासि निर्धारीं । दया अंतरीं उपजेना ॥७२॥

हरिदिनी एकादशी व्रत । तो दिवसीं पशु मारिला हातें।

रमाबायी चिंताक्रांत । म्हणे कैसी मात करावी ॥७३॥

एक भाविक एक कुटिळ । एक प्रेमळ एक तो खळ ।

जैसा राहु आणि चंद्र शीतळ । मिळणी मिळे अवचितां ॥७४॥

रमाबायीस तैसी परी । झाली असे ते अवसरीं ।

मग मनुष्य पाठवूनि नगरांतरीं । म्हणे समाचार सत्वरी एक आणा ॥७५॥

आपुल्या नगरांत साधुसंत । आज आले असतील निश्चित ।

तरी मज येऊनि सांग त्वरित । ऐसें सांगत तयांसी ॥७६॥

भृत्य सांगतसे पाहून । नगरीं उतरले वैष्णव जन ।

मग रमाबायी विष घेऊन । पुत्राकारणें देतसे ॥७७॥

ऐसें विपरीत करुनि तिणें । पाळणियांत निजविलें तान्हें ।

त्याचे तों तात्काळ गेले प्राण । कळलें वर्तमान सकळांसी ॥७८॥

घरचीं सकळ मनुष्यें जाण। अट्टहासें करिती रुदन ।

परी लेंकुराची माता संतोष मनें । नामस्मरण करीतसे ॥७९॥

तंव राजा राणीसि वचन बोलत । परम कठीण तुझें चित्त।

रुदन न करिसीच किंचित । आश्चर्य वाटत मजलागीं ॥१८०॥

रमा उत्तर देतसे तया । नाशवंताचा शोक कासया ।

शेवटीं जाय नासोनिया । दिसती माया ओडंबर ॥८१॥

कृपेनें अवलोकितां श्रीहरी । विघ्नें निरखती नानापरी ।

जरी संत येतील आपुले घरीं । तरी उपाय सत्वरी सांगतें ॥८२॥

राजा पुसे राणीकारणें । कोणता उपाय सांग त्वरेनें ।

ती म्हणे संताचे चरण धुवोन । तीर्थ पाजणें लेंकुरासी ॥८३॥

तेणेंच बाळक उठेल त्वरित । राजा पुसे कोठे आहेत संत ।

रमा म्हणे देउळांत । उतरले आहेत जाणपां ॥८४॥

राजा विस्मित चित्तांत । घरासि आणिले वैष्णव भक्त ।

मग भाव धरोनि चित्तांत । संतांसि पूजित स्वहस्तें ॥८५॥

घेऊनि त्यांचें चरणामृत । घातलें लेंकुराच्या मुखांत ।

त्याचे प्राण परतले त्वरित । निद्रित जागृत होय ॥८६॥

हा चमत्कार देखतांचि अपूर्व । रायाचा बैसला भक्तिभाव ।

दुर्बुद्धि टाकोनियां सर्व । मग भक्तवैष्णव जाहला तो ॥८७॥

नित्य करीत विष्णु अर्चन । वैष्णव भक्तांचें पूजन ।

श्रवण करीत हरिकीर्तन । नामस्मरण सर्वदा ॥८८॥

रमाबायीचा निश्चय थोर । विष देऊनि मारिला कुमर ।

संकटीं पावला रुक्मिणीवर । चमत्कार थोर दाखविला ॥८९॥

आणिक कथा महारसिक । एक रामराजा परम भाविक ।

तो श्रीरामाचा उपासक । सप्रेम सुख भोगीतसे ॥१९०॥

ध्यानीं मनीं तयासी । चित्तीं वसे अयोध्यावासी ।

रामनाम दिवसनिशी । छंद वाचेसी सर्वदा ॥९१॥

रामाचा प्रताप ज्या ठिकाणी । तेचि कथा ऐकतसे श्रवणी ।

परी सीताहरन नायकेचि कानीं । दुःखित वनीं राम जेथें ॥९२॥

यजमानाचें मनोगत । जाणोनि पुराणिक तेंचि सांगत ।

तों पंडित झालिया व्यथित । मग निजपुत्रातें काय सांगे ॥९३॥

सीताहरण नावडेचि राया । तरी आणिक कथा सांगावी तया ।

पितयासीं आवश्य म्हणोनियां । राजद्वार ठाया तो गेला ॥९४॥

पितयानें दिधली शिकवण । त्या गोष्टीचें नसेचि स्मरण ।

पुस्तक सोडोनि रामायण । सीताहरण वाचीतसे ॥९५॥

श्रीराम असतां पंचवटी । तों राक्षस भाव दाखवीत कपटी ।

कांचनमृग उठाउठी । होऊनि दृष्टीं पडतसे ॥९६॥

तों हात जोडोनि सीतासती । श्रीरामासि करीत विनंती ।

हा मृग वधोनि सत्वर गती । कंचुकी मजप्रती करावी ॥९७॥

जाणोनि पुढील भविष्योत्तर । धनुष्य बाण घेतलें करें ।

मृग वधावया सत्वर । गेला रघुवीर वनासी ॥९८॥

मग रावण होऊनि संन्यासी । पातला भिक्षा घ्यावयासी ।

हिरोनि नेलें जानकीसी । ऐकोनि रायासी क्रोध आला ॥९९॥

पुराणिकें सांगतां सीताहरण । रायासी आवेश आला दारुण ।

मग प्रधानासी काय म्हणे । सकळ सैन्य सिद्ध करा ॥२००॥

ऐसी आज्ञा होतांचि त्वरीत । रायाचें सैन्य आलें तेथ ।

शस्त्रास्त्रें घेऊनि समस्त । आले त्वरित ते ठायीं ॥१॥

रामराय म्हणे ते समयीं । रावणें हरिली सीतादेवी ।

लंकेसि गेला लवलाहीं । तरी चला सर्वही त्यामागें ॥२॥

ऐसें सांगूनि सकळ शूरां । राजा पातला समुद्रतीरा ।

वधावयासि दश शिरा । जळांत सत्वर प्रवेशला ॥३॥

त्याचा भावार्थ पाहूनि थोर । संकटीं पडिले रघुवीर ।

मग सीता घेऊनि कडियेवर । प्रगटले सत्वर तें ठायीं ॥४॥

रामरायासि म्हणे रघुपती । ही सीता रावणें नेली होती ।

मग आम्ही घेवोनि सत्वरगती । सोडवोनि निश्चिती आणिली ॥५॥

बाण लावोनि दशानन । वधोनि टाकिला आपण ।

आतां लंकेसि कासया करितोसि गमन । कांहींच कारण असेना ॥६॥

ऐसें बोलती रघुनंदन । चित्तीं पावला समाधान ।

मग समुद्रा बाहेर येऊन । जानकीजीवन पूजिला ॥८॥

भगवत्प्राप्तीचें लक्षण । येथें मुख्य निश्चय कारण ।

येचविषयीं अनुसंधान । ऐका सज्जन भाविकहो ॥९॥

एक नर हरिदास निश्चिती । होता वाढे जगन्नाथी ।

भजन करीत सप्रेमयुक्ती । स्वरुपीं वृत्ती लावोनियां ॥२१०॥

तयाचे अंगीं निश्चित । चौसष्टी कळा मूर्तिमंत ।

श्रीहरीचे अवतार बहुत । सोंगें आणित निजप्रीती ॥११॥

ईश्वरकृपेचेनि पडिभारें । तयासि होतसे साक्षात्कार ।

सोंगाचे मुखोटे करोनि फार । अवतार चरित्र दाखवी ॥१२॥

इष्टमित्र वैष्णवभक्त । गीत वाद्यें असती संगीत ।

ऐशारीतीं करीतसे लळित । तों चरित्र अद्भुत काय झालें ॥१३॥

नरसिंह अवतार सोंग जाण । निजांगें घेतसे तो आपण ।

दुसरा हिरण्यकशिपु करुन । स्तंभ फोडून निघाला ॥१४॥

प्रल्हादानें करितां स्मरण । निघाला कागदाचा स्तंभ फोडून ।

मग हिरण्यकशिपु आडवा घेऊन । तयासि मारुन टाकिलें ॥१५॥

नखें विदारुनि तये वेळां । स्वहस्तें आंतडीं घातलीं गळा ।

ऐसें सकळांनीं देखोनि डोळां । हाहाकार झाला ते समयीं ॥१६॥

आज मृगजळाच्या पुरांत निश्चिती । कैसा बुडाला ऐरावती ।

नातरी स्वप्नींचीच सैन्यसंपत्ती । तेणें जिंतिली भूपती प्रत्यक्ष ॥१७॥

कां अगस्त्यमुनीच्या सोंगें निश्चित । कैसा प्राशिला सरितानाथ ।

कां लांकडाच्या वज्रें त्वरित । भंगला पर्वत कैशारीतीं ॥१८॥

नातरी दोरीच्या सर्पे निश्चिती । कैसा डंखिला परीक्षिती ।

पाषाणाचा उडोनि मारुती । कैसा गभस्ती गिळियेला ॥१९॥

नातरी चित्रींच्या हुताशनें । कैसें जाळिलें खांडववन ।

तैसेंचि आज आलें घडोन । सकळ जन बोलती ॥२२०॥

एक म्हणती जन्मांतर । उभयतांचें होतें वैर ।

यास्तव सोंग आणूनि थोर । प्राण सत्वर घेतला ॥२१॥

प्रेतवत निमाला प्राणी । तयासि आप्त होती कोणी ।

ते रायासि सांगती जावोनी । आद्यंत करणी जे झाली॥२२॥

यावरी म्हणे नृपवर । प्रेतासि द्या अग्निसंस्कार ।

मग त्याणें साधिलें वैर । तो न्याय साचार विचारुं ॥२३॥

ऐसें सांगतांचि भूपती । मग केली तयाची सद्गती॥

नरहरीसि त्याचे बंधु जपती । सूड म्हणती घेऊं आम्ही ॥२४॥

मग युक्ति करीतसे नृपनाथ । नरहरीसि मागुती सोंग देत ।

तयासि करुनि दशरथ । म्हणे चमत्कार येथ पाहावा ॥२५॥

आणिक सुंदर मुलें पाहोनियां । राम लक्ष्मण केलें तयां ।

एक स्त्री रागीट पाहावोनियां । ती केली कैकया दुर्मती ॥२६॥

गीत वाद्य लावोनि संगीत । हरिदास गाती कीर्तनांत ।

बाळकांड वाल्मीकिकृत । तें अनुसंधान निश्चित लाविलें ॥२७॥

भद्रासनीं बैसतां रघुनाथ । तों कैकया म्हणे दशरथातें ।

त्वां दीधलें भाक वचनातें । आठवण चित्तांत करी राया ॥२८॥

इतुकेंच मागतें तुज लागोनी । कीं रामलक्ष्मण पाठवावें वनीं ।

आणि माझा भरत सुलक्षणी । राज्यासनीं बैसवावा ॥२९॥

जाणोनि कैकयीचें मनोगत । वनवासा चालिला रघुनाथ ।

तों दशरथाचें सोंग दीधलें ज्यातें । त्याणें आकांत मांडिला ॥२३०॥

कैकयीप्रती काय बोलत । तूं आपलें राज्य घेई समस्त ।

परंतु माझा रघुनाथ । नको वनांत पाठवूं ॥३१॥

ऐशी ऐकोनियां वार्ता । श्रीराम नमस्कारी दशरथा ।

सवें घेवोनि लक्ष्मण सीता । होय निघता वनासी ॥३२॥

ऐसें देखोनि ते अवसरीं । शोक करीतसे वेषधारी ।

गडबड लोळे धरणीवरी । म्हणे जातोसि दुरी रघुनाथा ॥३३॥

श्रीराम माझा जिवलग प्राण । श्रीराम माझें गुप्त ठेवण ।

श्रीराम माझा विसावण । जातसे टाकून याकाळीं ॥३४॥

श्रीराम माझा परब्रह्ममूर्ती । श्रीरामावांचोनि मजप्रती ।

शून्य दिसती दशदिशा ॥३५॥

श्रीराम माझें आत्मस्वरुप । त्यावरी कैकयी धरिला कोप ।

आणिला अभिशाप मजवरी ॥३६॥

श्रीरामचंद्र तुजवांचुनी । मज तों संसारीं नसेचि कोणी ।

मायबाप बंधुबहिणी । श्रीरामवांचोनी मज नाही ॥३७॥

कैकयीची ऐकोनि दुर्बुद्धी । श्रीराम वनासि गेला आधीं ।

आतां परतोनि येईल कधी । हे मज त्रिशुद्धी कळेना ॥३८॥

श्रीराम प्राणाचाही प्राण । वनासि गेला मज टाकून ।

आतां काय वागवूं जिणें । म्हणोनि प्राण सोडिला ॥३९॥

ऐशी सोंग संपादणी । केली असे तये क्षणीं ।

लोक जवळ पाहतीं येउनी । तों श्वास परतोनी न येची ॥२४०॥

अंगासि हात लावोनि पाहत । तों उष्णता नसे किंचित ।

म्हणती श्रीरामस्वरुपीं ठेवूनि चित्त । सायुज्य मुक्ती पावला ॥४१॥

सोंगा सारिखी संपादणी । ते आज साक्षात देखिली नयनीं ।

म्हणवोनि वैष्णव मुनी । पुष्पें सुमनें वर्षती ॥४२॥

संत साक्षात जेव्हां असती । तेव्हां विकल्पीं द्वेषी निंदितीं ।

निमोनि गेलिया करिती स्तुती । ऐशीच रीती जनाची ॥४३॥

अहो भक्तलीलामृत ग्रंथ । हाचि क्षीराब्धि जाणावा निश्चित ।

तो देवाधिदेव लक्ष्मीकांत । वास्तव्य येथ करीतसे ॥४४॥

जो अनंतशायी जगज्जीवन । असंख्य अपार त्याचे गुण ।

महीपति त्याचा बंदीजन । गातसे सद्‌गुण कीर्तनी ॥४५॥

स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत भाविक भक्त । बेचाळिसावा अध्याय रसाळ हा ॥२४६॥ओव्या॥॥२४६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP