मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय २२

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


श्रीगणेशाय नमः ।

जय जगद्‌गुरु पंढरीराया । अपार तुझी वैष्णवी माया ।

ब्रह्मादिकासि नयेचि आया । येतसे प्रत्यया हे गोष्टी ॥१॥

तुझा महिमा वर्णू जर । तरी श्रुति शास्त्रांसि नकळेचि पार ।

तेथें अल्प मति मी किंकर । दीन पामर मुढमति ॥२॥

नाहीं अक्षरें बोललीं शुद्ध । गीर्वाण भाषा नानाविध ।

नाहीं चित्तीं ठसावला बोध । बोलें अबद्ध भलतेंची ॥३॥

दीनदयाळा रुक्मिणीपती । ऐसी साक्ष येतसे चित्तीं ।

कैसीं वचनें होतील सरती । हें मजप्रती कळेना ॥४॥

तूं अंतरसाक्ष चैतन्यघन । चित्तीं देवोनि आठवण ।

आपुली चरित्रें गुप्त ठेवण । मज स्वाधीन तें करिसी ॥५॥

सकळ आज्ञानांमाजी श्रेष्ठ । तो मी मूढमति असें वरिष्ठ ।

आणि आपुलीं चरित्रें वदविसी स्पष्ट । हें नवल मोठें पांडुरंगा ॥६॥

मागें नारदाचा हरावया अभिमान । आस्वला हातीं करविलें गायन ।

अघटित येतसे घडोन । परी तुझ्या इच्छेनें श्रीहरी ॥७॥

मागिले आध्यायाचे शेवटीं निश्चित । श्रीनाथकृत जें भागवत ।

पंडिती टाकितांचि उदकांत । तें उचलोनि घेत भागीरथी ॥८॥

मग श्रेष्ठ संन्यासी ते अवसरीं । गंगेंत प्रवेशोनि घेतलें करीं ।

समस्त येतां मठांतरीं । श्रीनाथ समोर ये तयां ॥९॥

संन्यासी आणि पंडित ब्राह्मण । तयांसि सद्भावें केलें नमन ।

स्वामी म्हणे लाजिरवाणें । बुडविलें थोरपणें आम्हांसी ॥१०॥

मग सर्व उपचार आणोनि त्वरित । पंडितांसि संन्यासी आज्ञापित ।

श्रीनाथ पूजावा यथास्थित । चित्तीं भावार्थ धरोनी ॥११॥

पंडितांसि तों अंतरभावत नाहीं । परी चमत्कार देखोनि लागती पायीं ।

एकनाथ विनवी ते समयीं । हें अनुचित कांहीं न करावें ॥१२॥

मी ब्राह्मणांचा दासानुदास । निज कृपेची धरुनि आस ।

सद्भावें पुजावें या ग्रंथास । तेणें संतोष आम्हांसी ॥१३॥

ऐकोनि नाथाची वचनोक्‍ती । मान्य जाहली सकळांप्रती ।

तो अंबारीसहित हत्ती । आणवीतसे यती ते समयीं ॥१४॥

जडित पाखरासे दूर लेपन । वरति भरजरी वस्त्रें भूषणें ।

ऐसा हत्ती शोभायमान । सत्वर घेऊन ते आले ॥१५॥

संन्यासी नाथासि विनवित । अंबारीत बसा ग्रंथासहित ।

श्रीनाथ प्रति उत्तर देत । हें मी अनुचित करीन ॥१६॥

ग्रंथ ठेवोनि अंबारीत । मिरवा हेचि असे उचित ।

मी सर्वस्वें शरणांगत । रज इच्छित चरणाचें ॥१७॥

धनवंत पंडित होते सात । तयासि संन्यासी आज्ञा करित ।

एक एक दिवस सर्व साहित्य । तुम्ही समस्त करावें ॥१८॥

स्वामींचें वचन सर्वासि मान्य । त्याची उपेक्षा करीसा कोण ।

वाराणसीचे सकळ ब्राह्मण । असती शरण तयासी ॥१९॥

मग सर्वोपचारें पूजोनि ग्रंथ । अंबारींत मांडला निश्चित ।

समुदाय मेळवोनि बहुत । चालिले मिरवत संभ्रमें ॥२०॥

दिंडया पताका बरोबर । टाळ मृदंग वाजती सुस्वर ।

वैष्णव गाती प्रेमादरें । जयजयकारे नाम घोष ॥२१॥

ढोल दमामें वाजंतरें । कोंदलें असें अंबर ।

कौतुक पाहती नारीनर । दाटी समग्र जाहली ॥२२॥

ऐसें मिरवतां झाली राती । मग नाना परीचीं यंत्रे सोडिती ॥

नळे आणि चंद्रज्योती । ऐसी सोडिती पदोपदी ॥२३॥

बुका सुमने नाना परी । परिमळ द्रव्य उधळती वरी ।

महोत्सव काशीपुरी । ते अवसरी मांडिला ॥२४॥

जे स्थळीं छबीना मिरवत येत । तेंथ पंडित साहित्य करित ।

संन्यासी आणि ब्राह्मण जेवित । समुदाय बहुत होतसे ॥२५॥

ऐसा सात दिवसापर्यंत । आनंद उत्साह होतसे तेथें ।

अहोरात्र ग्रंथ मिरवित । ऐश्वर्य वर्णित नाथाचें ॥२६॥

आठ दिवस मिरवीत । आले पूर्व स्थळाप्रत ।

महा उत्साह केला तेथे । आनंद युक्त ते दिवशीं ॥२७॥

पंडितासि संन्यासी आज्ञा करित । तुम्ही श्रेष्ठ ब्राह्मण मिळोनि समस्त ।

श्रीनाथ मुखींचें कीर्तन निश्चित । प्रेम भरित ऐकावें ॥२८॥

ऐसे सांगतां यतिराज । सकळासि संतोष जाहला सहज ।

ब्रह्मासभा करोनि आज । कीर्तन चोज ऐकावे ॥२९॥

सज्ञान पंडित वैष्णव भक्त । ब्राह्मण वैदिक संत महंत ।

नरनारी भाविक समस्त । सभा मठांत मिळाली ॥३०॥

टाळ मृदुंग विणें घोषें । नाद ब्रह्मचि आलें मुसें ।

कीर्तन करितां एकनाथास । अति उल्हास मानसीं ॥३१॥

विठ्ठलनामें करोनि गजर । टाळ्या वाजविती निज करें ।

नादें कोंदोनि गेले अंबर । जयजयकार करिताती ॥३२॥

भक्तिपर जें चरित्र जाण । तेंचि लाविले अनुसंधान ।

त्यामाजी कांहीं अध्यात्म ज्ञान । भक्ति महिमान वाढविती ॥३३॥

कलियुगी नाम तारक निश्चिती । दृष्टांत भागवती सद्गुरु भक्ति ।

महिमा वर्णिती स्वमुखें ॥३४॥

श्रीनाथाचीं प्रसाद वचनें । ऐकतां तटस्थ सभाजन ।

पंडितांसि नाहीं देहभान । समाधिस्थ जाण ते होती ॥३५॥

मग परस्परें ब्राह्मण बोलत । हरिकीर्तन करिती बहुत ।

परी याज ऐसें प्रेम अद्भुत । नाहीं निश्चित कवणासी ॥३६॥

अध्यात्मज्ञान प्रासादिक कविता । त्याहीवरी बहु लीनता ।

धन्य याची मातापिता । नरनारी समस्ता बोलती ॥३७॥

कीर्तन उत्साह चार दिवास झालां । पांचवें दिवसीं गोपाळकाला ।

श्रीहरि लीलेचा भाव दाविला । प्रसाद वांटिला सकळांसी ॥३८॥

काशी क्षेत्रींचे द्विजवर । आबाळ वृद्ध लहान थोर ।

धन्य धन्य म्हणती सर्वत्र । ईश्वरी अवतार साक्षात हा ॥३९॥

संन्यासी म्हणती ते वेळां । श्रीकृष्ण अवतारींची जे लीला ।

ते आम्हीं पाहिली सर्व डोळां । धन्य सोहळा आजिचा ॥४०॥

सकळ पंडितांसि म्हणतसे यती । एकनाथकृत एकादशग्रंथी ।

त्याची स्वहस्तें करावी प्रती । तुम्ही समस्ती मिळोनियां ॥४१॥

अवश्य म्हणोनि तयेक्षणी । एक एक अध्याय घेतला त्यांनीं ।

मग रुक्मिणी स्वयंवरासि नाथानीं । प्रारंभ ते क्षणीं केला असे ॥४२॥

बैसोनि मणिकर्णिकेचे तीरीं । एकाग्र होवोनि निज अंतरीं ।

रामजयंती माझारी । ग्रंथ निर्धारी पूर्ण झाला ॥४३॥

तों एकादश स्कंधाची प्रती । सिद्ध करोनि आणिली पंडितीं ।

ते स्वामी मठांत निजप्रीतीं । नित्य वाचिती सप्रेम ॥४४॥

यतीची आज्ञा घेऊनि त्वरित । स्वदेशासि चालिले एकनाथ ।

अवघे संन्यासी आणि पंडित । आले बोळवित ते समयीं ॥४५॥

श्रीनाथ क्षेत्रवासियां कारणें । सद्भावें करी साष्टांग नमन ।

परस्परें देवोनि आलिंगन । निज प्रीतीनें भेटले ॥४६॥

यावरी बोळवोनी नाथासी । नगरांत प्रवेशले क्षेत्रवासी ।

नाथाचे सद्गुण अहर्निशी । आठविती निजमानसीं सर्वदा ॥४७॥

इकडे पंथ क्रमितां एकनाथ । सर्वदा चित्तीं स्वानंद भरित ।

मार्गी येतां दासोपंत । भेटले अकस्मात तयासी ॥४८॥

व्हावया श्रीदत्तात्रेय दर्शन । बाळपणीं हेत धरिला त्याणें ।

तीव्र मांडिलें अनुष्ठान । निज प्रीतीनें आपुल्या ॥४९॥

तें म्हणाल जरी कैशा रीतीं । तें परिसिजे सभाग्यश्रोतीं ।

सर्व परिवार टाकोनि निश्चिती । अरण्यांत एकांती जातसे ॥५०॥

गळित पत्रें नित्य भक्षित । देहाची आस्था नसेचि किंचित ।

खडकावरी शयन करित । शीत उष्ण साहत निजांगे ॥५१॥

अवचित मनुष्य आले जर । तरी उठोनि पळतसे दूर ।

श्रीदत्तायेयांचे साचार । स्मरण निरंतर करितसे ॥५२॥

ऐसें अनुष्ठान करितां प्रीतीं । तयाची झाली विदेह स्थिती ।

खडकावरी लोळतां निश्चिती । क्षतें पडती सर्वांगा ॥५३॥

वीस वर्षे पर्यंत जाण । या रीतीं केलें अनुष्ठान ।

मग दत्तात्रेयांनीं त्याजकारणें । दीधलें दर्शन साक्षात ॥५४॥

आलिंगन देतांचि साचार । त्याचें झालें दिव्य शरीर ।

अनुग्रह दीधला तेणें वरें । कविता फार करीतसे ॥५५॥

सद्गुरु कृपेनें निश्चिती । प्रारब्धें आली धन संपत्ती ।

थोर थोर लोक मान्य करिती । विशाळ मती देखोनियां ॥५६॥

आंबेजोगाईच्या आंब्यत निश्चिती । दासोपंतांनीं केली वस्ती ।

श्रीएकनाथाची सत्कीर्ती । ऐकिली होती विश्वमुखें ॥५७॥

महायात्रेहोनि परतोनि येतां । भेट जाहाली अवचितां ।

परस्परें आलिंगन देतां । स्वानंद चित्तां होतसे ॥५८॥

उभयतां चरणीं घालोनि मिठी । स्वानंद सुखाच्या बोलती गोष्टी ।

दासोपंतासि आनंद पोटीं । म्हणे जाहली भेटी दैवयोगें ॥५९॥

नाथासि प्रार्थूनि नानापरी । घेऊनि गेले आपुलें घरीं ।

आनंद सुखाच्या उठती लहरीं । सद्भाव उपचारीं पूजिलें ॥६०॥

नित्य करिती मिष्टान्न भोजन । त्याहीवरी भागवत श्रवण ।

रात्री हरि कीर्तन । वेधले जन ऐकतां ॥६१॥

एकमास लोटतांचि तेथ । आज्ञा मागती एकनाथ ।

विनंति करिती दासोपंत । अश्व द्रव्य खर्ची देवोनिया ॥६२॥

श्रीनाथ सर्वदा निराश चित्तीं । न घेचि कांहीं धन संपत्ती ।

मार्ग कठीण आहे म्हणती । अश्वही न घेती यास्तव ॥६३॥

दासोपंतासि ये अवसरीं । म्हणती कृष्णजयंती उत्साह घरीं ।

तरी तुम्ही अवकाश करुनि सत्वरी । प्रतिष्ठान क्षेत्रीं येईंजे ॥६४॥

अवश्य म्हणोनि बोलती उत्तर । परस्परें करिती नमस्कार ।

श्रीनाथें प्रयाण केलें सत्वर । मग प्रतिष्ठान क्षेत्र पावले ॥६५॥

नगरासमीप येतां जाण । उद्धवासि कळलें वर्तमान ।

परम हर्ष त्याजकारणें । जेवीं अवर्षणीं पर्जन्य वोळला ॥६६॥

दिंडया पताका बरोबर । टाळविणें मृदंग घेतले सत्वर ।

बुका तुळसी सुमनहार । सर्वोपचार आणवी ॥६७॥

क्षेत्रवासी नारीनर । भाविक प्रेमळ वैष्णव वीर ।

गात नाचत सप्रेम गजर । नाथासि सामोरे जाताती ॥६८॥

श्रीनाथ स्वरुप देखतांचि नयनीं । आनंद जाहला सकळां लागोनी ।

विठ्ठल नामें गर्जोनि । ध्वनी लोटांगणीं जन येती ॥६९॥

उद्भवें निजप्रीतीं पडिभारीं । मस्तक ठेविला चरणावरी ।

श्रीनाथें आलिंगिला दोहीं करीं । प्रेम अंतरीं न समाये ॥७०॥

ऐशाचपरी क्षेत्रवासी । प्रीतीनें भेटती नाथासी ।

उद्धवें वाहोनि बुका तुळसी । पुष्पहारासी घातलें ॥७१॥

विठ्ठलनामें करोनि घोष । आनंदें गाती वैष्णवदास ।

म्हणती धन्य आजिचा दिवस । जन येतसे भेटावया ॥७२॥

श्रीहरिगुण गात नाचत । श्रीनाथ प्रवेशले नगरांत ।

मंगल वाद्यें पुढें वाजत । घोष नसे मात अंबरीं ॥७३॥

बुका सुमनें मुठी भरोनी । लोक उधळिती तयेक्षणीं ।

ऐशा रीती प्रवेशले सदनीं । तों पांडुरंग नयनीं देखिला ॥७४॥

श्रीनाथें देवा समोर । घातला साष्टांग नमस्कार ।

मग मंगळ आरती करोनि सत्वर । रुक्मिणीवर वोवाळिला ॥७५॥

सकळांसि प्रसाद खिरापती । देतांचि तोष जाहला चित्तीं ।

कुशळ वृत्तांत पुसतां सांगती । आसनीं निजप्रीतीं बैसले ॥७६॥

घटिका रात्र जाहली चार । लोक घरासी गेले समग्र ।

गिरिजाबाई आपुल्या निजकरें । नाथासि उपाहार घालितसे ॥७७॥

रात्रीं कीर्तन करोनि मागुतीं । यावरी निद्रेसि मान देती ।

तों संन्निध आली कृष्णजयंती । तंव उद्धवें यथा पद्धति ।

साहित्य निश्चिती आरंभिलें ॥७९॥

संतर्पणाचि सामग्री घरीं । बहुत केली ते अवसरीं ।

भिंती सारवोनि आंत बाहेरी । चित्रें त्यावरी काढिलीं ॥८०॥

तों पूर्णिमेचे दिवशीं अकस्मात । उत्सवासि आले दासोपंत ।

हें एकनाथासि नसतां श्रुत । आले अकस्मात महाद्वारीं ॥८१॥

तंव नवल देखिले तये वेळीं । श्रीदत्तें हातीं घेतला त्रिशूळ ।

उभे लक्षोनि असती स्थळ । द्वारपाळ या रीतीं ॥८२॥

दासोपंती देखोनि नयनीं । परम आश्चर्य वाटलें मनीं ।

मग उडी टाकिली शिबिकेंतुनी । साष्टांग धरणीं नमस्कारी ॥८३॥

दत्तासि देवोनि आलिंगन । म्हणे आपलें येथें किमर्थ येणें ।

हें ऐकोनि अनसुया नंदन । काय वचन बोलतसे ॥८४॥

एकनाथ नव्हे मानवी भक्त । श्रीपांडुरंग अवतार साक्षात ।

विश्वोद्धार करावया निश्चित । अवतार घेत कलियुगी ॥८५॥

पूर्व पुण्याचा वोल्हावा । असेल जरी कोणासि दैवा ।

तरीच याची घडेल सेवा । भाव जाणावा निश्चित ॥८६॥

आम्ही त्रिशूळ घेऊनि करीं । द्वार रक्षितों निर्धारीं ।

नाथासि जावोनि सांगतों सत्वरी । तुम्हीं भीतरी न यावें ॥८७॥

ऐसें बोलतांचि अवधूत । विस्मित चित्तीं दासोपंत ।

श्रीनाथाचें ऐश्वर्य वाणित । म्हणे महिमा अद्भुत मी नेणें ॥८८॥

श्रीदत्तें नाथासि जाणविली मात । कीं दर्शनासि आले दासोपंत ।

मग उद्धवासहित सामोरे येत । नमस्कार घालिती निजप्रीतीं ॥८९॥

परस्परें लागोनि पायीं । आलिंगन दीधलें ते समयीं ।

मग हातीं धरोनि लवलाहीं । नेलें स्वगृहीं तयासी ॥९०॥

शिबिका अश्व वाहनें समस्त । उद्धवें लविलीं यथास्थित ।

शिधा साहित्य मनुष्यांतें । न्यून किंचित पडेना ॥९१॥

मागें श्रीकृष्ण अवतारीं निश्चित । उद्धवासि देवाचि होती प्रीत ।

सेवेचा पुरला नव्हता हेत । तें आर्त पुरवित आपुलें ॥९२॥

मागिले जन्मीं ऋणानुबंध होता । यास्तव संयोग घडला आतां ।

नाथ सेवेचा स्वार्थ चित्तां । आणिक ममता नसेची ॥९३॥

मग दासोपंतीं करुनि स्नान । नाथाचे पंक्तिस सारिलें भोजन ।

रात्रीं ऐकतां हरिकीर्तन । तों उदयासि अरुण पातला ॥९४॥

पांडुरंग मूर्तीचे उद्वर्तन देख । करोनि केला आभिषेक ।

उपचार पूजोनि अनेक । सप्रेम सुख भोगिती ॥९५॥

मंगळ वाद्यें द्वारीं वाजती । मग गायिली आरती ।

वेद घोष ब्राह्मण बोलती । मग अर्पिती पुष्पांजली ॥९६॥

दिवसां ब्राह्मण संतर्पण । रात्रीं होतसे हरिकीर्तन ।

प्रतिपदे पासोनि जाण । नवरात्र पूर्ण उत्साह ॥९७॥

गोपाळकाला दशमी आंत । लळित केलें यथास्थित ।

दृष्टीसीं देखोनि दासोपंत । आनंदयुक्त मानसीं ॥९८॥

श्रीनाथाची प्रसाद वाणी । साहित्य सोंग संपादणी ।

त्यामाजीं सिद्धांत ज्ञानखाणीं । हें अपूर्व नयनीं देखिलें ॥९९॥

मी दत्त उपासक साक्षात्कारी । ऐसें वाटत होतें अंतरीं ।

नाथाचें ऐश्वर्य देखतां नेत्रीं । निर्विकल्प गात्रीं होतसें ॥१००॥

महोत्साह संपूर्ण झालिया तेथ । द्वादशींस पारणें केलें त्वरित ।

आज्ञा मागोनि दासोपंत । स्वस्थाना जात आपुल्या ॥१॥

आणिक सत्पुरुष कोणी असती । ते भाविक जनासि देती मुक्‍ती ।

अभक्‍त द्वेषी या अधोगती । होतसे निश्चिती त्यांचेंनीं ॥२॥

श्रीएकनाथाचें लिलाचरित्र । तैसें नव्हे साचार ।

द्वैषी दुर्बुद्धि उद्धरलें फार । जगद्गुरु थोर या नावें ॥३॥

संन्यासी आणि पंडितजनी । वाराणसीत छळिलें त्यांणीं ।

त्यांसि कौतुक दावोनी । भक्तीसि तें क्षणीं लाविलें ॥४॥

विद्या आणि विनय पाहीं । सर्वदा वसती याचे देहीं ।

करुणा भूतमात्राचे ठायीं । हेचि नवायी अगाध ॥५॥

भूतमात्री सदयता । ब्राह्मण चरणीं बहुत आस्था ।

हा भार पडिला श्रीकृष्णनाथा । सेवा ऋणी तत्वतां होय ॥६॥

ब्राह्मण होवोनि चक्रपाणी । गंगोदक कावडी भरोनि आणी ।

नेणें तयाची विचित्र करणी । कोणा लागोनी फळेना ॥७॥

आणिक चरित्रें रसाळ गहन । सादर ऐका भाविक जन ।

एकनाथ करोनि गंगास्नान । चालिले परतोन गृहासी ॥८॥

तंव गांववेशींत निश्चित । एक यवन बैसला होता उन्मत्त ।

तो भूमीवरी थुंकतां अकस्मात । तों येतसे नाथ पंथे ॥९॥

गुळणी टाकितां भूमीवर । ते पडिली नाथाचे अंगावर ।

परी क्रोध नयेचि अणुमात्र । न दुखवे अंतर सर्वथा ॥१०॥

जेवीं पृथ्वीचे ठायीं क्षमा पूर्ण । तैशाच रीतीं श्रीनाथ लक्षण ।

कोणी भूमीचें करिती पूजन । मळ मूत्र टाकोन एक देती ॥११॥

परी सुखदुःख मानोनि अंतरीं । क्षमेसि करी जैसी धरित्री ।

परी लोभ क्षोभ न करी कोणावरी । हा स्वभाव निर्धारी असे तिचा ॥१२॥

तैसेच नाथाचे अंगावरी । नेणत थुंकला अज्ञान नर ।

तेणें क्षोभे न पोळे अंतर । परी करुणा फार आली ॥१३॥

म्हणती यासी दोष घडला निश्चिती । हा प्राणी जाईल अधोगती ।

आतां हा अनुताप धरील चित्तीं । तो उपाय निश्चिती योजावा ॥१४॥

ऐसी कल्पना आणोनि चित्तीं । गंगास्नान केलें मागुती ।

परतोनि जावोनि गृहाप्रती । अर्चन करति विष्णूचें ॥१५॥

नैवेद्य वैश्वदेव करोनि जाण । द्विज पंक्‍तीसि सारिलें भोजन ।

मग दोघां मनुष्यांचें अन्न । पात्रीं वाढोनि घेतलें ॥१६॥

अंगावर थुंकला होता यवन । त्याच्या घरासि गेलें घेऊन ।

मग सद्भावें केलें तया नमन । म्हणती प्रसाद सेवणें निजप्रीतीं ॥१७॥

झांकण काढितांचि वरुनी । तों दिव्य अन्न देखिलें नयनीं ।

यवन अनुतापला मनीं । अन्याय आठवोनी आपुला ॥१८॥

म्हणे मी उन्मत्त परम खळ । ब्रह्मद्वेषी अति चांडाळ ।

तुम्हांवरी थुंकलों सकाळीं । विचार अणुमात्र न केला ॥१९॥

तुम्ही सत्पुरुष या नगरांत । मान्य असा कीं सर्वांत ।

हा अपराध क्षमा कीजे समर्थें । म्हणवोनि दंडवत घातलें ॥१२०॥

श्रीनाथें तयासि उचलोन । प्रीतीनें देतसे आलिंगन ।

म्हणती आम्हा पाहोनि केलें असतें वमन । तरी तुजला दूषण घडतें ॥२१॥

न कळतां दोष अकस्मात । तुज हा लागला होता किंचित ।

आतां अनुताप जाहला चित्तांत । याहोनि प्रायश्चित्त आन नसे ॥२२॥

आम्हांवरी थुंकल्याचा पाहीं । आतां सर्वथा तुज दोष नाही ।

ऐसें म्हणोनि ते समयीं । पातले गृहीं आपुल्या ॥२३॥

एके दिवशीं एकनाथ । मध्यान्ह समयीं गंगेसि येत ।

ब्रह्मयज्ञ करोनि निश्चित । चालिले त्वरित घरासी ॥२४॥

वैशाख मास उष्ण तीव्र । गंगेची वाळू तापली फार ।

तया माजी एक पोर । रडतसे थोर आक्रोशें ॥२५॥

तें एकनाथें देखतांचि जाण । दयेनें द्रवलें अंतःकरण ।

म्हणे याचा तत्काल जाईल प्राण । मग कडिये उचलोन घेतलें ॥२६॥

आंगवस्त्रें पुसोनि नेत्र । तयासि बुझावीत सत्वर ।

म्हणती कोणीकडे तुझें घर । सांग सत्वर येसमयीं ॥२७॥

तान्हें बाळक बोलतां नये । हातें दाखवीत घराची सोये ।

कोपटासि येताचि पाहे । तों पातली माय तयाची ॥२८॥

वाळकें देखोनि ते अवसरीं । मातेच्या नांवें शब्द करी ।

नाथासि समजलें निज अंतरीं । म्हणे हे तों महारीण दिसतसे ॥२९॥

खाली ठेवितांचि बाळकासी । धांवत गेलें मातेपासीं ।

श्रीनाथ परतोनि गंगेसी । सचैल स्नानासी करितसे ॥१३०॥

धोत्रें वाळवोनि कृपामूर्ती । कपाळीं लावी द्वारावती ।

मग जावोनि सदनाप्रती । भोजन सारिती संतोषें ॥३१॥

माहारिणींचें पोर साचार । एकनाथें बैसविलें खांद्यावर ।

क्षेत्रवासी धरामर । त्यांसि अणुमात्र विदित नसे ॥३२॥

श्रीपांडुरंगाची इच्छा निश्चिती । नाथाची प्रकट व्हावी कीर्ती ।

यास्तव देवें रचिली युक्ती । ते सादर श्रोतीं परिसिजे ॥३३॥

एक सज्ञान होता ब्राह्मण । गलित कुष्ट झाला त्याज कारणें ।

तेणें पश्चाताप धरोनि मनें । त्र्यंबकेश्वरी अनुष्ठान करीतसे ॥३४॥

महा पापाच्या योगें करुन । शरीरीं रोग उद्भवला दारुण ।

मग देह आरोग्य व्हावया कारण । कामनिक अनुष्ठान करितसे ॥३५॥

अन्न त्यजूनि निःशेषें । कंदमूळ मात्र भक्षीतसे ।

यथाविधि अनुष्ठान ऐसें । द्वादश वर्षें पै केलें ॥३६॥

तों त्र्यंबकेश्वर येवोनि स्वप्नीं । काय सांगे तया लागुनी ।

गोदातीरीं प्रतिष्ठानीं । त्वरें करोनी जाय आतां ॥३७॥

तेथें एकनाथ वैष्णवभक्‍त । ब्राह्मण सेवेसि असे रत ।

सर्वाभूतीं दयावंत । घडलें सुकृत एक त्यासी ॥३८॥

एकदां पायपोळी जाहली फार । त्यांत अनामिकाचें पडिलें पोर ।

तें नाथांनीं समजावोनि सत्वर । खांद्यावरी घेतलें ॥३९॥

मग नेऊनि घातलें मातेपासि । तें महा सुकृत घडलें त्यासी ।

तें पुण्य जरी देईल तुजसी । तरी अरोग होसी तत्काळीं ॥४०॥

इतुका दृष्टांत देखोनि नयनीं । ब्राह्मण जागृत विस्मित मनीं ।

मग प्रतिष्ठानासि येऊनि । लोकां लागोनि पुसतसे ॥४१॥

येथें एकनाथ वैष्णव भक्‍त । कोणे ठिकाणीं असे निश्चित ।

तेव्हां स्नान करीत होते एकनाथ । लोक गंगेत दाखविती ॥४२॥

मग जळांत प्रवेशोनि सत्वरी । वृत्तांत सांगे ते अवसरी ।

तुम्ही अनामिकाचें पोर खांद्यावरी । घेतलें तें पदरीं पुण्य असे ॥४३॥

श्रीत्र्यंबकराज उमाकांत । त्यांणीं निवेदिलें असें मातें ।

तेव्हां हास्यवदनें एकनाथ । काय बोलत तयासी ॥४४॥

आजन्मपर्यंत सुकृत । केलें असे तें देतों तूंतें ।

ब्राह्मण तयासि उत्तर देत । येव्हढें सामर्थ्य मज कैचे ॥४५॥

जे आज्ञा केलीं त्र्यंबकेश्वरें । तितुकेंचि द्यावें साचार ।

मग एकनाथें घेऊनि नीर । घातलें साचार हातीं त्याच्या ॥४६॥

गलित कुष्ट जावोनि सत्वर । सुंदर जाहलें त्याचें शरीर ।

तेव्हां तो करीत नमस्कार । लोक सर्वत्र पाहती ॥४७॥

क्षेत्रवासी नारीनर अवघे करिती नमस्कार । थोरथोर प्रतिष्ठित द्विजवर ।

बोलती उत्तर एकमेकां ॥४८॥

म्हणती नाथाची अघटीत रीत । दुरितांचें करितों सुकृत ।

ऐसें म्हणोनि द्वीज समस्त । जाहले विस्मित मानसीं ॥४९॥

एके दिवसीं भाविक भक्त । नाथासि विनविती उद्धवा सहित ।

एकादश स्कंध जे भागवत । केलें प्राकृत स्वामींनीं ॥१५०॥

आपल्या मुखें त्याचें श्रवण । करावें ऐसा हेत परिपूर्ण ।

श्रोतयांचें अंतर देखोन । अवश्य म्हणे श्रीनाथ ॥५१॥

सुमुहूर्त पाहोनि एके दिवसी । प्रारंभ केला भागवतासि ।

भाविक प्रेमळ क्षेत्रवासी । येती श्रवणासी सर्व तेव्हां ॥५२॥

तृतीय प्रहर दिवस राहे । तेव्हां पुराणासि प्रारंभ होय ।

नाथ मुखींची वाणी अक्षय । श्रोते तन्मय होताती ॥५३॥

आणिक कौतुक जाहलें थोर । तें सादर परिसा भाविक चतुर ।

स्त्रीचें रुप धरोनि सुंदर । गंगा सत्वरें येतसे ॥५४॥

लावण्य वेल्हाळ सुकुमार । वस्त्रें भूषणें अलंकार ।

तिज ऐसी कामिनी सुंदर । न दिसे साचार ते ठायीं ॥५५॥

ऐशारुपें ते विष्णु कुमारी । येवोनि बैसे नाथा समोरी ।

आणिकही स्त्रियां असती परी । इची सरी नये कोणा ॥५६॥

नाथ मुखाची रसाळ वचनें । एकाग्र चित्तीं करीत श्रवण ।

फाकों न देचि मन । विसरे देहभान ते समयीं ॥५७॥

जेव्हां भक्ति रहस्य कथा लागत । तेव्हां गंगेसि प्रेम येतसे बहुत ।

नेत्रीं ढाळती आश्रुपात । लोक समस्त पाहती ॥५८॥

श्रोतयांत दुर्बुद्धि होते कोणी । विकल्प पातला त्यांचे मनीं ।

म्हणे हे सुंदर कामिनी । आली कोठोनी कळेना ॥५९॥

प्रतिष्ठान क्षेत्रांत पाहीं । मागे देखिली नव्हती कधीही ।

नित्य नेमें येतसे समयीं । आस्था जीवी धरोनियां ॥१६०॥

स्त्रियांचा समुदाय टाकून । वेगळीच बैसे आसन घालून ।

सौभाग्यवति वय तारुण्य । बोले न वचन कोणासी ॥६१॥

नाथाकडे पाहोनि निश्चिती । अवधान देतसे निज प्रीती ।

ऐसा विकल्प आणितां दुर्मती । प्रगटली वदंती गांवांत ॥६२॥

कैसी आहे सुंदर कामिनी । ते पाहावी आपुले नयनीं ।

श्रवणाचें मिषें करोनी । आणिकही कोणी मग येती ॥६३॥

ऐसे लोटले बहुत दिवस । ग्रंथही आला समाप्तीस ।

तों कुटिळांचें ऐसें मानस । कीं ठिकाण असें कोठें इचा ॥६४॥

पुराण समाप्त झालिया त्वरेनें । इज मागेंच जावें आपण ।

कोठें आहे ठाव ठिकाण । हें ध्यानांत दुरोन आणावें ॥६५॥

आपुले घरिची घरस्वामिण । कीं माहेरीं आहे कामिन ।

किंवा आहे सासुरवासिण । न पुसतां उठोन येतसे ॥६६॥

ऐसा निश्चय करितां दुर्मती । तों जाहलीसे पुराण समाप्ती ।

गंगेनें नाथासि नमस्कार प्रीतीं । सप्रेम युक्‍ती मग केला ॥६७॥

श्रीनाथ स्वरुप आणोनि ध्यानी । सत्वर निघाली तये क्षणीं ।

तंव कुटाळ चालिले मागोनी । डोळा घालोनी एकमेकां ॥६८॥

मागें पुढें चालती एक । ध्यानासि आणिती कौतुक ।

तों विष्णुकन्या सुलक्षणिक । पातली सुखें गंगातीरीं ॥६९॥

घोटया इतुकें गंगेचें नीर । ते स्थळीं क्षण एक जाहली स्थिर ।

स्वहस्तें आचमन करोनि बरें । अदृश्य सत्वर मग होय ॥१७०॥

जैसी मेघमंडळी सौदामिनी दिसे । ते देखतां निमिषांत लोपतसे ।

तैसेंचि प्रगटोनि निज तेजास । जाहली अदृश्य ते ठायीं ॥७१॥

कुटिळ समजले आपले मनीं । म्हणती हे गोदा समुद्रगामिनी ।

स्त्रीचें रुप प्रत्यक्ष धरोनी । भागवत श्रवणीं येतसे ॥७२॥

आपण मंद बुद्धि साचार । विकल्पें विटाळलें निज अंतर ।

श्रीनाथ विष्णूचा अवतार । मानवी साचार न म्हणावा ॥७३॥

कांच कुदिकेंत अमृत जाण । तें विषय ध्यानें पाहिलें दृष्टीनें ।

तयासि भासलें मद्यपान । तैसेंचि कारण घडलें कीं ॥७४॥

ऐसा पश्चात्ताप धरोनि मनें । मग ते करिती संध्या वंदन ।

आपुल्या घरासि गेले त्वरेनें । विस्मित मन होऊनियां ॥७५॥

दुसरे दिवसीं तृतीय प्रहरीं । श्रवणासि आले नाथाचें घरीं ।

स्वामीसि नमस्कार करोनि सत्वरी । आसनावरी बैसलें ॥७६॥

मग पुस्तक सोडोनिया त्वरित । क्षण एक वाट पाहतसे नाथ ।

म्हणती आमुचा श्रोता नयेचि निश्चित । उशीर बहुत लागला ॥७७॥

विकल्प धरिला होता ज्यांनीं । ते येऊनि लागती नाथाचे चरणीं ।

मग पश्चात्ताप धरोनि मनीं । वृत्तांत ते क्षणीं सांगत ॥७८॥

स्वरुपें सुंदर लावण्यसरिता । येथें नित्य येतसे श्रवणार्था ।

आम्हीं विकल्प आणोनि चित्तां । मागें शोधार्थ मग गेलों ॥७९॥

तंव ते जावोनि गंगेंत । अदृश्य जाहली तेथील तेथें ।

तरी साक्षात गंगा होती निश्चित । समजलें चित्तांत आमुच्या ॥१८०॥

आम्हीं दुर्बुद्धि भाग्यहीन । यास्तव विकल्प धरिला मनें ।

महादुरित घडलें तेणें । परी क्षमा करणें अपराध ॥८१॥

श्रीनाथ चित्तीं आनंदघन । म्हणती तुमचे पदरीं सुकृतपुर्ण ।

साक्षात जाहलें गोदा दर्शन । तेणें दुरीत भग्न झालें कीं ॥८२॥

आतां संशय न धरोनि चित्तांत । श्रवण करावें भागवत ।

तुमचा महिमा न वर्णवेचि सत्य । चरित्र अद्भुत देखिलें ॥८३॥

ऐशा रीतीं समजावोनि त्याला । मग पुराणासि प्रारंभ केला ।

ऐसी देखोनि नाथाची लीला । आनंद सकळां वाटला ॥८४॥

ज्याच्या श्रवणाची धरोनि आर्त्ती । साक्षात गोदा श्रवणासि येती ।

त्याची सत्कीर्ति महीपती । लिहितसे ग्रंथीं निजप्रेमें ॥८५॥

स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत वैष्णक्त भक्त । बाविसावा अध्याय रसाळ हा ॥१८६॥अध्याय॥२२॥ओव्या॥१८६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP