मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय २३

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


श्रीगणेशाय नमः ॥

संत चरित्रें ऐकतां श्रवणीं । तेणें महादोषांची होय धुनी ।

धन्य ते जीवनमुक्त प्राणी । जे एकाग्र होऊनि बैसती ॥१॥

निजभक्त कथा ऐकतां साचार । तयासि सुकृत घडतसे फार ।

भोग भोगिता नाना प्रकार । परी ते न विसरे कल्पांतीं ॥२॥

कर्म कांडांचीं तपें व्रतें । तींहीं आचरतां पुण्य घडतें ।

परी सौख्य भोगितां तें निश्चित । सरोनि जात क्षणमात्रें ॥३॥

आवडीनें ऐकतां भागवत कथा । तें तरी सुकृत न सरेचि सर्वथा ।

तरी ते प्राणी अंतीं तत्त्वता । सायुज्यता भोगिती ॥४॥

संत कथेची आवडी मोठी । धरोनि ऐकती कर्णसंपुटी ।

तो पडिला जरी महासंकटीं । तरी स्वये जगजेठी रक्षी तया ॥५॥

मागिले अध्यायीं कथा श्रवणीं । ऐकिली तुम्हीं सभाग्य जनीं ।

कीं गंगेनें स्त्रीचें रुप धरोनी । ऐकिलें कानीं भागवत ॥६॥

कीं विकल्प द्वेषी होते नर । त्यांसही दाखविला चमत्कार ।

अनुतापें द्रवलें त्यांचें अंतर । मग करिती नमस्कार एकनाथा ॥७॥

यावरी कथा ऐकिजे चतुरीं । एक उदमी होता नाथाशेजारीं ।

तो अभाविक अनाचारी । नाथाचें घरीं कदा नये ॥८॥

कधींही कोठें नायके पुराण । श्रवण न करी हरि कीर्तन ।

संनिध गंगा असोनि जाण । करितसे स्नान उष्णोदकें ॥९॥

स्नान संध्या पितृतर्पण । हेंही नये त्याजकारणें ।

दोन वेळा करी भोजन । कुटुंब रक्षण करितसे ॥१०॥

श्रीनाथें देखोनि तयाची चर्चा । चित्तीं बहुत उपजली दया ।

म्हणती हा नरदेह प्राणी लाधलिया । अधोगती वायां जाईल कीं ॥११॥

आमुचा शेजार लाधलियावरी । सद्वासना उपजे अंतरीं ।

कांहीं परमार्थ मोहोरे धरी । तो उपाय सत्वरी करावा ॥१२॥

ऐसें म्हणोनि चित्तासी । मार्गीं जातां सांपडविलें त्यासी ।

स्वमुखें नमस्कार वाचेसी । म्हणोनि तयासी बोलत ॥१३॥

नाथाच्या भिडेस्तव साचार । उभा राहिला क्षणभर ।

श्रीनाथ बोलती उत्तर । काय परिवार असे तुम्हां ॥१४॥

काय व्यवसाय करता निश्चिती । कुटुंब रक्षण कवणे रीतीं ।

ऐकोनि गृहस्थ नाथाप्रती । काय वचनोक्ती बोलत ॥१५॥

पुत्रकलत्र असती घरीं । राहतसों तुमचे शेजारी ।

एका व्यवसायाची करितो चाकरी । खिस्त निर्धारी घालितसे ॥१६॥

मुशारा देतसे जें वेतन । काळ क्षेप करितसों तेणें ।

यावरी श्रीनाथ काय म्हणे । आतां एक मागणें असे तुम्हां ॥१७॥

तो तरी विषयांध कृपण फार । चित्तीं भय उपजलें थोर ।

यास्तव न बोले प्रति उत्तर । जाणोनि अंतर नाथ वदती ॥१८॥

तुम्हां पासोनि धनवित्त कांहीं । आम्हांसि प्राप्तीचीं इच्छा नाहीं ।

क्षणभर अवकाश करोनि पाहीं । कीर्तनास गृहीं येत जा ॥१९॥

गृहस्थ म्हणे मज रिकामपण । नसेचि संसाराचिये भेणें ।

यावरी श्रीनाथ काय म्हणे । सांगतों वचन तें ऐका ॥२०॥

श्रीविष्णु सहस्त्रनामांतील जाण । एक श्लोक सांगतो तुम्हां कारणें ।

तितुका निज सुखें पाठ करणें । कृतकृत्य तेणें आम्हीं असो ॥२१॥

ऐकोनी श्रीनाथाची वाणी । तेव्हां भीड पडली त्याचें मनीं ।

मग पात्रावरी अक्षरें लेहुनी । तयाकडूनी वाचविती ॥२२॥

पद्मकरें कुरवाळितां पाहीं । बुद्धि पालट ते समयीं ।

श्लोकाचीं अक्षरें धरोनि जीवीं । पाठ लवलाहीं मग केला ॥२३॥

मग दुसरे दिवशीं येवोन तत्त्वतां । दुसरा श्लोक पुसतसे नाथा ।

ऐसें कांहीं दिवस लोटितां । सहस्त्र नाम तत्त्वता पाठ केलें ॥२४॥

श्रीनाथ सांगती तये क्षणीं । इतुका नेम धरावा मनीं ।

स्नान करोनि आसनीं । एकाग्र ध्यानीं बैसावें ॥२५॥

तेव्हां कोणासि न बोलावें वचन । सहस्त्र नामाचा पाठ करणें ।

ऐकोनि गृहस्थ अवश्य म्हणे । तितुकें आचरण करितसे ॥२६॥

तेणें बुद्धीचा पालट जाहला कांहीं । देव दर्शनासि येतसे गृहीं ।

नाथ चरण वंदोनि ते समयीं । मग कार्यासि लवलाहीं जात घरां ॥२७॥

ऐसे लोटतां दिवस पार । तों तयासि जाहला नवज्वर ।

आयुष्य सरतां साचार । यमाकिंकर मग आले ॥२८॥

आधीं वाचा खुंटली होती । यास्तव संबंधीं प्रायश्चित्त देती ।

स्नान घालितांचि तया प्रती । तों स्मरण चित्तीं जाहलें ॥२९॥

विष्णु सहस्त्रनामाचा पाठ । करुं लागला धडधडाट ।

तेव्हां सकळ जाहले संतुष्ट । म्हणती अदृष्ट धन्य याचें ॥३०॥

ऐकतां नामस्मरनाचा ध्वनी । यम दूत गेले पळोनी ।

मग विष्णु दूतीं सन्मान करुनी । वैकुंठ भुवनीं त्यासि नेलें ॥३१॥

जरी श्रीनाथें कृपा केली नसती । तरि तो जाता अधोगती ।

यास्तव कलियुगामाजी निश्चिती । अवतार संतीं घेतला ॥३२॥

करितां संताचा शेजार । तयासि घडे साक्षात्कार ।

क्षेत्रवासी जे नारीनर । ते परस्परें बोलती ॥३३॥

संत तेचि देवाधिदेव । सर्वथा नसती भिन्नभाव ।

नावेक वेष धरोनि मानव । लाघव अपूर्व दाविती ॥३४॥

अरोधें विरोधें श्रीएकनाथ । भक्‍तीसि जन लाविलें बहुत ।

छेदोनि सर्व पाखंडमत । वाढविला अद्भुत नाम महिमा ॥३५॥

गिरिजाबाई सुक्षेत्र जाण । प्रथम प्रसवली कन्या रत्‍न ।

गोदुबाई नामामिधान । तिज कारणें ठेविलें ॥३६॥

तिचे पाठीवर पुत्र जाहला । हरि नाम ठेविलें तयाला ।

थोर होतांचि व्रतबंध केला । पढो लागला ब्रह्मशाळे ॥३७॥

तयाचे पाठीवर कन्या पाहीं । तिचें नाम गंगाबाई ।

दीधली असे कवणें ठायीं । वृत्तांत तोही अवधारा ॥३८॥

एक चिंतोपंत नामें निर्धारीं । गृहस्थ होता प्रतिष्ठान क्षेत्रीं ।

गोदुबाई ज्येष्ठ कुमरी । त्याचें घरीं दीधली॥३९॥

आणि कर्णाटक देशांत । जुना सोयरा नांदे गृहस्थ ।

गंगाबाई त्याच्या पुत्रातें । देवोनि त्वरित लग्न केलें ॥४०॥

गंगाबाईस पुत्र जाण । पुंडाजी त्याचें नामाभिधान ।

तोही करीत विष्णु भजन । निजप्रीतीनें आपुल्या ॥४१॥

असो हरिपुत्र एकनाथास । त्याची प्रज्ञा बहु विशेष ।

सकळ विद्यांचा अभ्यास । केला असे तयानें ॥४२॥

तो षट्रशास्त्रीं जाहला निपुण । वरिष्ठ ब्राह्मण करिताति मान ।

हरि पंडित नामाभिधान । त्याज कारणें बोलती ॥४३॥

प्रतिष्ठानीचे थोर थोर विप्र । तयासि स्तविती वारंवार ।

म्हणती पितया परीस साचार । प्रज्ञा थोर पैं याची ॥४४॥

एकनाथ सत्पुरुष होऊनि जनीं । महाराष्ट्र गातसे गाणी।

तीं स्त्रीया शूद्र ऐकतां मनीं । तन्मय होउनी राहती ॥४५॥

प्राकृत वाणीं नाथ गावोन । भोंदिले अवघे भाविक जन ।

तेणें लोपली होती संस्कृत पुराणें । तो जीर्णोद्धार याणें केला कीं ॥४६॥

मृत्तिके पासोनि होय सुवर्ण । त्याचें श्रीमंत करिती भूषण ।

तैसाचि हरी पंडित जाण । जाहला पित्याहोन विशेष ॥४७॥

कां पाषाणा पासोनि सत्वरा । निपजे जैसा दिव्य हिरा ।

तैसाचि हरि पंडित खरा । आमुच्या अंतरा बिंबलें ॥४८॥

नातरी गांभीर्ये दिसतो सागर । परि पाणी असे बहुत क्षार ।

तयाचा पुत्र तेजस्वी चंद्र । अमृत तुषार त्या माजी ॥४९॥

तेवीं एकनाथाचें उदरीं जाण । हरि पंडित निपजलें रत्‍न ।

षट्‌शास्त्री निपुण ब्राह्मण । आम्हासि मान्य सर्वस्वें ॥५०॥

ऐशा परि ते द्विजवर । दृष्टांत देवोनि थोर थोर ।

नाथासि निंदिती वारंवार । स्तविती साचार पुत्रासी ॥५१॥

आधींच विद्याभिमान चित्तीं । त्याही वरी निंदकाची संगती ।

विकल्पें अंतर विटाळलें निश्चिती । म्हणे वारंवार कीति ऐकावें ॥५२॥

म्हणें मी षट्‌शास्त्री निपुण पंडित । आणि पिता ग्रंथ वाचितो प्राकृत ।

प्रतिष्ठित ब्राह्मण क्षेत्रांत । लज्जा तयांत मज वाटे ॥५३॥

ऐसें म्हणोनि निज अंतरीं । म्हणे देहत्याग करावा सत्वरीं ।

जावोनि राहावें काशीपुरीं । विचार निर्धारीं केला असे ॥५४॥

हरि पंडितासि तिघे पुत्र । दोघे घेतले बरोबर ।

कांतें सहित साचार । काशीपुर पावला ॥५५॥

धाकुटा पुत्र सुलक्षण । राघोबा तयासि नामाभिधान ।

नाथा जवळी राहीला जाण । निज प्रीतीनें आपुल्या ॥५६॥

मायबापाची न करी खंती । आज्या जवळी अहोरातीं ।

लहान काम करिता प्रीतीं । उल्हास चित्तीं तयाच्या ॥५७॥

कीर्तन करितां नाथाप्रती । टाळ घेतसे आपल्या हातीं ।

गाऊं लागतसे निजप्रीतीं । आश्चर्य करिती जन लोक ॥५८॥

गोपाळ कालियांत साचार । दावित हावभाव प्रकार ।

श्रीनाथाचें वचन निरंतर । पाठांतर करीतसे ॥५९॥

एकांत पाहोनि एके दिनीं । विनयें मस्तक ठेविला चरणीं ।

श्रीनाथांचा अनुग्रह कानीं । लहानपणीं संपादिला ॥६०॥

सद्गुण देखोनि ऐशारीतीं । परस्परें लोक स्तविती ।

म्हणती श्रीनाथाची महंती । हाचि निश्चिती आवरील ॥६१॥

अधिष्ठान आवरावया योग्य जाण । उत्तम दिसती यांचीं लक्षणें ।

पिता आपुल्या विद्याभिमानें । पांडेतपण करीतसे ॥६२॥

ऐसे भाविक ते अवसरीं । बोलत असती आपुलें घरीं ।

इकडे हरी पंडित काशीपुरीं । सहपरिवारीं राहिला ॥६३॥

षट्‌शास्त्री वक्ता ब्राह्मण । यास्तव मिळालें बहुत धन ।

महाक्षेत्रांत वाडा बांधोन । काशीवास तेणें मग केला ॥६४॥

इकडे प्रतिष्ठान क्षेत्रीं एकनाथ । श्रीहरि कीर्तन नित्य करित ।

भक्‍तांसि लाविले जन समस्त । आज्ञा वंदित नाथाची ॥६५॥

एकदां एकांतीं बैसोनि आपण । विचार करिती निज मनें ।

सर्व क्षेत्रवासी जन । श्रीकृष्ण भजन करिताती ॥६६॥

परी कर्मठतेचा अभिमान बहुत । हरि पुत्रासि राहिला निश्चित ।

दीपका तळीं अंधार बहुत । तैसीच मात हे झाली ॥६७॥

तरी आपण निजांगें जावोनियां तेथें । तयासि घेऊनि यावें येथें ।

इतुकेन आपुलें अवतार कृत्य । करावें समाप्त निज निष्ठा ॥६८॥

पाणियांत कठीण राहिली गार । तैसाचि दिसतो हा विचार ।

तरी कांहीं दाखवोनि चमत्कार । लाविजे निजपुत्र भक्तीसी ॥६९॥

ऐसा निश्चय करोनि अंतरीं । श्रीनाथ गेले काशी पुरीं ।

स्नान करोनि मणिकर्णिकातीरीं । मग विश्वेश्वरी भेटले ॥७०॥

हरि पंडिताचें घरीं । चालोनि येतसे सामोरी ।

नमस्कार करोनि सत्त्वरीं । प्रीति पडिभारी भेटले ॥७१॥

आसन घालोनियां पाही । पितयासि बैसवी त्या ठायीं ।

पूजा उपचार करोनि सर्वही । संतोष जीवीं पावला ॥७२॥

पूसिले कुशळ वर्तमान । या वरी सारिलें भोजन ।

श्रीनाथ घरीं आले चालोन । जाहलें समाधान यास्तव ॥७३॥

तें स्थळीं क्रमिले दिवस फार । तोंवरी सेवेंत असे पुत्र ।

पूर्वी भागवत करितां जाहलें चरित्र । तें लोक सर्व सांगती ॥७४॥

महंत संन्यासी मठांतरीं । तो हरि पंडितासि बोध करी ।

श्रीनाथ आज्ञेनें सत्वरी । तुम्हीं निरंतरी वर्तावे ॥७५॥

हा नव्हेचि जाण मानवी नर । साक्षात विष्णुचा अवतार ।

आम्हीं ही छळणा केली फार । परी लीला अपार पैं याची ॥७६॥

यावरी म्हणे तरी पंडित । मी काय आज्ञे विरहित ।

ऐसें म्हणोनि त्वरित । येत सदनांत आपुल्या ॥७७॥

बहुत दिवस लोटतां जाण । श्रीनाथ पुत्रासि एकांती म्हणे ।

आतां उत्तर वय आमुचें पूर्ण । संनिध प्रयाण पैं असे ॥७८॥

उरलें आयुष्य तुझे संगती । क्रमावें ऐसा हेत चित्तीं ।

तुजवीण न गमे येथें निश्चिती । वाटतसे खंती चित्तांत ॥७९॥

तूं तरी सत्पुत्र एकुलता एक । आम्हासि जोड नसेचि आणिक ।

आतां प्रतिष्ठानाशि येतां देख । वाढेल लौकिक बहुत तेणें ॥८०॥

क्षेत्रीं घरवाडा बांधिला थोर । तरी तेथें ठेवावे दोघे पुत्र ।

तेथील अधिष्ठान साचार । तुवां निरंतर आवरावें ॥८१॥

श्रीनाथ वाणी ऐकोनि पाहे । मग हरि पंडित म्हणतसे काय ।

एक मागणे स्वामीस आहे। परी तें न होय तुमचेनी ॥८२॥

तुम्हीं न करावें परान्न भोजन । आणि प्राकृत न वाचिजे पुराण ।

ह्या दोन गोष्टी कराल मान्य । तरी होईल येणें आमुचें ॥८३॥

श्रीनाथ तों स्वसंतोष भरित । सर्वथा न करी आग्रह किंचित ।

म्हणती जैसें तुझें मनोगत । तैसेंच निश्चित आम्ही वर्तो ॥८४॥

निज पुत्रासि देतां वचन । तयासि जाहलें समाधान ।

उभयतां निघाले तेथून । निजप्रीतीनें आपुल्या ॥८५॥

स्वछंदेंचि क्रमितां पंथ । पावले प्रतिष्ठान क्षेत्रांत ।

लोकासि आनंद वाटला बहुत । सामोरे येत भेटावया ॥८६॥

श्रीनाथ आगमन नेत्र कमळीं । होतां भाविकांसि दिवाळी ।

नमस्कार करोनि तयेवेळीं । खेळीमेळी भेटले ॥८७॥

ऐसे प्रवेशले निज सदनीं । भाविकांसि आस्था असे मनीं ।

कीं कीर्तन होईल आजिच्या दिनीं । परी निवांत आसनीं बैसले ॥८८॥

दुसरे दिवसी हरि पंडित । पुराण सांगे संस्कृत ।

भाविक सज्ञानी मिळाले बहुत । प्रारंभ होत ते दिवसीं ॥८९॥

श्रीनाथ निवांत घालोनि आसन । श्रवण करितसे निजप्रीतीनें ।

परी नाथ मुखीचीं ऐकावीं वचनें । हा हेत पूर्ण अवघियांचा ॥९०॥

परी हरि कीर्तन प्राकृत ग्रंथा । हें वर्जोनि आणिलें हरि पंडिता ।

परान्न सेवीत नाहीं आतां । फांकली वार्ता नगरांत ॥९१॥

परी भाविकांसि चिंता वाटे दारुण । म्हणती प्राक्‍तन आमुचें फुटकें हीन ।

म्हणोनि प्राकृत ग्रंथ नाथें वर्जोन । संस्कृत पुराण ऐकती ॥९२॥

स्त्रिया शूद्र इतर जाती । उमज न पडेचि तयांप्रती ।

पुराण होतां उठोनि जाती । नित्य नेम वर्जिती ते एक ॥९३॥

श्रीनाथ पुराण होते वाचित । तेव्हां वाडा भरोनि निघत ।

दाहा पांच राहती नित्य । भणभणीत दिसत स्थळ तेव्हां ॥९४॥

सकळांचें अंतर जाणे नाथ । म्हणती भक्तीसि पडिलें अंतर बहुत ।

तंव आणिक चरित्र वर्तलें तेथ । तें ऐका निजभक्त भाविकहो ॥९५॥

प्रतिष्ठान क्षेत्रीं साचार । तेथें धनवंत होता एक द्विजवर ।

त्याच्या कांतेनें साचार । रुक्मिणीवर नवसिला ॥९६॥

कीं आम्हांसि पावसी जगज्जीवना । तरी मी घालीन सहस्त्र भोजना ।

ऐसा संकल्प करितांचि जाणा । तो वैकुंठराणा पावला ॥९७॥

पुढें पूर्वप्राक्तनें निश्चित । धन तों जाहलें वाताहत ।

भ्रतारही तिचा मरोनि जात । दरिद्रही येत तिजलागीं ॥९८॥

देह संरक्षणार्थ साचार । नित्य पावीजे अन्नवस्त्र ।

मग पाणी देवोनि घरोघर । पैसे चार मेळवीतसे ॥९९॥

ऐशा रीतीं ते ब्राह्मणी । काळक्षेप करीतसे प्रतिष्ठानीं ।

नाथाच्या घरीं नित्य येवोनी । पुराण कानीं ऐकतसे ॥१००॥

तों एक सज्ञान भाविक ब्राह्मण । तयासि सांगे जीवींची खूण ।

म्यां नवस केला मागें जाण । कीं सहस्त्र भोजन घालावें ॥१॥

प्रारब्धाची विचित्र गती । वाताहत झाली सर्व संपत्ती ।

त्याहीवरी वैधव्य पातलें अंतीं। अन्न वस्त्र निश्चिती मिळेना ॥२॥

घरोघरीं देवोनियां पाणी । काळक्षेप करीं ये ठिकाणी ।

परी देवाचें ऋण आठवे मनीं । तें कैसें घडोनि येईल ॥३॥

ऐसें ऐकोनि तिचें उत्तर । काय म्हणतसे तो द्विजवर ।

एक ब्रह्मनिष्ठ जेविला जर । तरी पुण्यासि पार असेना ॥४॥

ज्यासि वेदाक्षर नयेचि साचार । आणि नुसताचि शिकला गायत्री मंत्र ।

ऐसे ब्राह्मण जेविले शंभर । आणि एक बरोबर वैदिक ॥५॥

असे ग्रंथत्रयांची ज्यासि आवृत्त । ऐसे ब्राह्मण जेविले शत ।

त्यांमाजी एक ग्रहपंडित । अर्थ वेदांत जाणता ॥६॥

वेदांत ज्ञानियाहोनि शत गुणी । जरी एक ठेविला अनुष्ठानी ।

जो बोलिला ऐसा आचरे कोणीं । त्याच्या दर्शनी दोष जाय ॥७॥

तयाहोनि शत गुणी निश्चित । एक पूजितां इंद्रियजित ।

जो शमदम साधनें आचरत । शुचिष्मंत सर्वदा ॥८॥

ऐसे इंद्रिय जित शत । धरीं जेवितां जें सुकृत ।

त्यांतल्या एक विष्णुभक्त । जो मत्सर रहित द्वेष न करी ॥९॥

जयासि शत्रूमित्र समान । जनार्दन रुप भासती जाण ।

त्या एकनाथासि घालितां भोजन । तरी लक्ष ब्राह्मण जेविले ॥११०॥

ऐसें सांगता गृहस्थ प्रीती । ब्राह्मणीं संतोष पावली चित्तीं ।

मग तें जावोनि सदनाप्रती । साहित्य निश्चिती करीतसे ॥११॥

एकनाथ लीलावतारी । भोजनासि आणावा आपुलें घरीं ।

पक्वानें घालावी नानापरी । हेत अंतरीं धरियेला ॥१२॥

दुबळा संसार दुबळी ब्राह्मणी । धन धान्य कांहींच नसे सदनीं ।

मग लोकांचे वाहोनि पाणी । द्रव्य प्रतिदिनीं सांचवीतसे ॥१३॥

गहूं तांदुळ डाळ घृतं । घेऊन ठेवीत मंदिरांत ।

वडे पापडही स्वहस्ते । वळवटे बहुत ती केली ॥१४॥

शाखा पत्रें गूळ जाण । साहित्य ठेवीत सर्व आणून ।

मग त्या गृहस्थासि सवे घेऊन । गेली आमंत्रण द्यावया ॥१५॥

तों हरिपंडित पुराण सांगत । श्रीनाथ सवें श्रवण करित ।

तें समाप्त होय तोपर्यंत । बैसले निवांत ते समयीं ॥१६॥

पुराण जाहलिया निश्चित । हरिबा उठोनि जात घरांत ।

गृहस्थ येऊनि ब्राह्मणी सहित । विनंति करित श्रीनाथा ॥१७॥

सांगितलें साद्यंत वर्तमान । इथें राहिले सहस्त्र भोजन ।

तुम्हीं मूठभरी भक्षितां अन्न । तरी लक्ष ब्राह्मण जेविलें ॥१८॥

देखोनि निजभावार्थ । श्रीनाथ स्वमुखें आज्ञा करित ।

हरिबा गेलासे मंदिरांत । जावोनि विचारा ॥१९॥

ऐसी ऐकोनिया मात । उभयतां गेलीं भीत भीत ।

घरांत बैसला हरिपंडित । तयासि वृत्तांत सांगीतला ॥१२०॥

मग क्रोधयुक्त होऊनि मनीं । ब्राह्मणीस झिडकरी तयेक्षणीं ।

महायात्रा केली त्याणीं । परान्न तैंहूनी वर्जिलें ॥२१॥

कठिण शब्द ऐकतां कानीं । निराशा वाटली तिचें मनीं ।

नाथापासी मागुतीं येऊनी । हात जोडोनी उभी असे ॥२२॥

तयाच्या चित्तासि नाहीं येत । आणि माझी तों आर्त आहे बहुत ।

प्रेमें वाहती अश्रुपात । कंठ सद्गदित जाहला ॥२३॥

श्रीनाथासि संकट बहुत । इचें तों प्रेमभरित आर्त ।

मग पुत्रापासी जावोनि त्वरित । म्हणती इचा हेत पूर्ण करी ॥२४॥

हरिपंडित म्हणतसे ताता । दीधलें वचन सांभाळी आतां ।

मी जाणोनि तुमच्या मनोगता । आलों मागुता या क्षेत्रीं ॥२५॥

श्रीनाथ वचन पुत्रासि बोलत । तूं स्वहस्तें करी पाक निष्पत्त ।

आपण उभयता जेवूं तेथ । तेणें पुरेल आर्त पैं इयेचें ॥२६॥

तुजसी दीधलें भाक वचन । तयासि अंतर न पडेचि येणें ।

आणि इचाहि नवस होईल पूर्ण । अनाथ दीन म्हातारी ॥२७॥

नाथाच्या भिडेस्तव जाण । हरिपंडित अवश्य म्हणे ।

एकनाथ बाहेर बैसले येऊन । मग विनवित ब्राह्मणी काय तेव्हां ॥२८॥

वडे पापड वळवटातें । केलें असे म्यां आपुल्या हातें ।

षण्मास जपत होतें निश्चित । ते सायास व्यर्थ गेले कीं ॥२९॥

तूं भावाचा भुकेला साचार । लीलाविग्रही अवतार ।

आतां माझा जेणें हेत पुरे । तोचि विचार सांगा स्वामी ॥१३०॥

ऐसी तिची सप्रेम ग्लांती । देखोनि नाथ संतोष चित्तीं ।

म्हणती त्वां वळवट केलें प्रीतीं । तें आपुले हातें पाक करी ॥३१॥

आम्ही पंचप्राणाहुती घेतल्यावर । मग तूं आपले घरचे वाढी प्रकार ।

ऐकोनि श्रीनाथाचें उत्तर । मग आनंद थोर तिसी झाला ॥३२॥

एकनाथ म्हणतसे पडिपाडे । जैसी तुझी असेल आवड ।

तेंचि आम्हांसि लागे गोड । आणिक चाड असेना ॥३३॥

ऐसी ऐकतां अमृतवाणी । उल्हास जाहला तिचें मनीं ।

मग आपुल्या सदनासि जाऊनी । शाखा निसोनी ठेविल्या ॥३४॥

मग उषःकाळीं उठोनि जाण । केलें सडा संमार्जन ।

पात्रें धुवोनि ठेविलीं तिणें । मग केलें स्नान गंगातीरी ॥३५॥

एकट दुर्बळ म्हातारी । पाणी वाहोनि ठेविलें घरीं ।

कवाड आडकोनि ते अवसरीं । गेली घरीं नाथाच्या ॥३६॥

हरिपंडितासि करोनि नमन । म्हणे सर्व साहित्य आलें करोन ।

आतां आपण तेथवर येऊन । मनोरथ पूर्ण करावा ॥३७॥

श्रीनाथ पुत्रासि आज्ञा करिती । तुवां करावी पाक निष्पत्ती ।

आम्ही मागूनी निश्चिती । सत्वर गती येतसों ॥३८॥

मग हरिपंडित सत्वर । जाय ब्राह्मणीच्या बरोबर ।

स्नान करोनियां सत्वर । स्वयंपाक साचार करीतसे ॥३९॥

जो जो पदार्थ स्वयें करणें । अवगत असे याजकारणें ।

तितुकें साहित्य देई आणोन । निजप्रीतीनें आपुल्या ॥१४०॥

सर्व अनुकूळ देवोनि त्यासी । मग आपण निघाली स्वयंपाकासी ।

अंतरभाव कळला नाथासी । म्हणती बोलवूं यावयासी कोणी नसे ॥४१॥

जैसा विदुराचिये घरीं । न बोलावितांचि जाय श्रीहरी ।

तैशाच परी ते अवसरीं । पातले घरीं एकनाथ ॥४२॥

तिणें स्नानासि दीधलें जीवन । तों वैश्वदेव केला हरिपंडितानें ।

आपुले हातें करुनि त्याणें । पात्रें दोन वाढिलीं ॥४३॥

सद्यस्तप्त वाढितां घृत । ब्राह्मणीसी बोलावी श्रीनाथ ।

भोक्ता जनार्दन म्हणवूनि निश्चित । संकल्प तिज हातीं सोडविला ॥४४॥

मग ध्यानांत आणूनि पांडुरंग मूर्ती । नैवेद्य दाखविला निजप्रीतीं ।

श्रीनाथ आपोशन करितां निश्चिती । प्राणाहूती घेतल्या ॥४५॥

पित्रापुत्रा दोघेजण । जेवावयासि बैसले जाण ।

म्हातारी घरांत जावोनि आपण । पदार्थ घेऊन येतसे ॥४६॥

अन्न आणोनि परातभर । ठेविलें श्रीनाथासमोर ।

पुरणपोळिया अरुवार । वाढीत निजकरे आपुल्या ॥४७॥

वडे तेल वरिया निर्द्धारीं । स्वहस्तें वाढिल्या नवक्षीरी ।

श्रीनाथ कांहींच अनमान न करी । जेवीत लवकरी लगबगे ॥४८॥

ऐसें कौतुक देखोनि थोर । तिसी संतोष जाहला फार ।

जेवी भिल्लीणीचीं बोरें भक्षित रघुवीर । तैसाचि विचार हा झाला ॥४९॥

ऐसें कौतुक देखोनि तेथ । रागें भरला हरिपंडित ।

आरक्‍त नयन वटारीत । दांत खात करकरां ॥१५०॥

म्हातारी तेव्हां जोडोनि कर । उभी राहिली नाथासमोर ।

म्हणे कृपा करोनि अनाथावर । मनोरथ साचार पुरविला ॥५१॥

हरिपंडित म्हणे चित्तांत । ऐसेंच होतें मनोगत ।

तरी माझे कासया भाजविले हात । क्रोध निश्चित नावरे ॥५२॥

म्हातारीकडे पाहूनि निश्चित । आरक्त नयन वटारित ।

करकरांत अधर असे चावित । अंग कांपत थरथरां ॥५३॥

देवासि भक्ताचें अन्न गोड । आणि भक्‍तासी प्रीति जडली दृढ ।

एकमेकांचे आर्त गोड । कोणी त्याज वाकडे न पाहे ॥५४॥

क्रोध हाचि उन्मत हस्ती । आवरितां नावरेचि निश्चित ।

मग विवेक अंकुश करोनि युक्‍ती । आकळिला पंडितीं ते वेळे ॥५५॥

म्हणे पितयाची अमर्यादा करितां तरी । महादोष पडतसे माथा ।

ऐसा आठव धरोनि चित्तां । होय जेविता निजप्रीतीं ॥५६॥

असो यापरी एकनाथ । स्वानंदरसीं होतसे तृप्त ।

मग गंगाजळ प्राशूनि त्वरित । तेथेंचि आंचवत संसारा ॥५७॥

बैसावयासि म्हातारीनें । आधींच घातलें होतें आसन ।

विडे करोनि ठेविले होते दोन । आणि तुळसीपत्र विष्णुतीर्थ ॥५८॥

मुखशुद्धि घेतलीया जाण । श्रीनाथ पुत्रासि काय म्हणे ।

आपुलीं उच्छिष्ट पात्रें दोन । काढी त्वरेनें ये समयीं ॥५९॥

म्हातारी एकटी प्रकट असे । दुसरें तो येथें कोणी नसे ।

तिजला स्नान करावयास । होईल अट्टहास पुढती ॥१६०॥

श्रीनाथें सांगतांचि ऐसें । मान देत पितृवचनास ।

हरिपंडितें घालोनि कास । मग पत्रावळीस उचलित ॥६१॥

नाथाचें पात्र उचलोनि सत्वरी । ठेविलें आपुलें पात्रावरीं ।

तों दुसरेंही आणिक दिसे नेत्रीं । आश्चर्य अंतरीं करितसे ॥६२॥

म्हणे म्हातारीनें घरांतून । स्वामीप्रती आणिलें अन्न ।

तें दुसरें पात्र असेल जाण । या करितां उचलोन ठेविलें ॥६३॥

तों तिसरेही दिसे तया तळीं । एकसारिख्याची पत्रावळी ।

विस्मित जाहला हृदय कमळीं । उचली तत्काळ लगबगे ॥६४॥

ऐसीं सहस्त्रावधीं उचलीं पात्रें । परी तीं न सरती साचार ।

मग पश्चात्ताप जाहला थोर । घालती नमस्कार नाथासी ॥६५॥

जोडोनियां बद्धांजळीं । उभा राहिला तयेवेळीं ।

अश्रु दाटले नेत्रकमळीं । अष्टभाव जवळी ते आले ॥६६॥

म्हणे जय जयाजी पुराण पुरुषा । अव्यक्त निरंजना अविनाशा ।

लीला अवतारी सर्वेशा । वैकुंठाधीशा जगद्गुरु ॥६७॥

तुझा महिमा नेणेंचि मी पामर । अमर्यादा घडली थोर ।

तूं साक्षात विष्णु अवतार । निश्चय अंतर पाझरलें ॥६८॥

लीलाचरित्र आवरोनि आतां । मजवरी कृपा करावी ताता ।

ऐसा अनुताप धरोनि चित्तां । मग चरणीं माथा ठेविला ॥६९॥

श्रीनाथ आपुल्या कृपावरें । तयासि आश्वासीत करें ।

म्हणे बापा श्रमलासि थोर । तरी आणीक पात्रें न निघती ॥१७०॥

ऐसें अभय देतां श्रीनाथें । उच्छिष्टें सावरिली हरि पंडितें ।

सहस्त्र पात्रें उचलोनि ठेवित । मग ब्राह्मणीसि बोलत काय तेव्हां ॥७१॥

तुझें भाग्य अघटित जाण । श्रीनाथासि दीधलें आमंत्रण ।

सत्य घडलें लक्ष भोजन । अनुभव परिपूर्ण मज आला ॥७२॥

मग अष्टभावें दाटोनि म्हातारी । नाथासि सद्भावें नमस्कारी ।

म्हणे कृपा करोनि अनाथावरी । पावन निर्धारीं त्वां केलें ॥७३॥

हरिपंडित पितयासि म्हणे । मी षट्‌शास्त्रीं जाहलों निपुण ।

त्या विद्येच्या अभिमानें करोन । तुमचें महिमान नेणेंचि ॥७४॥

आतां कृपा करोनि स्वामी समर्थे । जेथें असेल शुद्ध भावार्थ ।

तेथें आपण भोजनासि जावें निश्चित । आणि प्राकृत ग्रंथही वाचावे ॥७५॥

ऐसें म्हणोनि ते अवसरीं । उभयतां गेले आपुलें घरीं ।

म्हातारी अन्न घेऊनि पात्रीं । भोजनासि सत्वरी बैसली ॥७६॥

धन्य धन्य तिची भक्ती । जेथें एकनाथ पावले तृप्ती ।

त्याचें उच्छिष्ट महीपती । सेवितसे प्रीतीं निजप्रेमें ॥७७॥

स्वस्ति श्री भक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत भाविक भक्त । तेविसावा अध्याय रसाळ हा ॥१७८॥२३॥ओव्या॥१७८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP