मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय ४०

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


श्रीगणेशाय नमः ॥

सरितां कोरडया करोनि समस्त । त्याही भरिजेतील अमृतें ।

परी देवभक्तांचीं चरित्रें । यांचा अंत कळेना ॥१॥

पृथ्वीवरील तृणांचे मोड । यांची गणती होईल कोडें ।

परी वैकुंठपतीचे गुण अवघड । वर्णितां वेडें मन होय ॥२॥

सांगडी वांचोनि पोहणार । पावेल उदधीचा पैलपार ।

परी क्षीराब्धिजावराची सत्कीर्ति थोर । नये साचार वर्णिता ॥३॥

का प्रभंजनाची मोट बांधोनी । तेही ठेविजेल आपुलें सदनीं ।

परी तुझे पवाडे सारंगपाणी । वर्णितां वाणी कुंठित ॥४॥

अठराही भार वनस्पती । यांच्या पत्रांची होईल गणति ।

परी तुझे पंवाडे वैकुंठपती । वर्णितां मती पुरेना ॥५॥

हव्यास धरोनि महाकवी । कीर्ति वर्णिती शेषशायी ।

परी तुझी महिमा जे आघवी । कळलीच नाहीं तयांस ॥६॥

वेद शास्त्रें आणि पुराणें । अखंडीत गाती तुझे गुण ।

परी ऐसाचि आहेसि म्हणवोन । निश्च्य कोणें न केला ॥७॥

अवघेच आपुलालिया मतीं । तुझी अखंड करिती स्तुती ।

त्यांत एक मूढ महीपती । असोंदे श्रीपती तुज ठावे ॥८॥

रान पाल्याच्या करोनि माळा । गोपाळ घालिती तुझिया गळा ।

त्यांची देखोन सप्रेमकळा । मिरविशी घननीळा तें लेणें ॥९॥

तैशाच रीतीं श्रीहरी । हीं आरुष वचनें अंगीकारी ।

तेणें श्रोतयांचे अंतरीं । प्रेम लहरी कोंदाटे ॥१०॥

तुवां अघटित केलें पंढरीराया । सप्रेम भाव देऊनि तुकया ।

कळिकाळ त्याचा निवारुनियां । केली काया ब्रह्मरुप ॥११॥

जगदुद्धार व्हावयासि देखा । मृत्युलोकीं पाठविला भक्त सखा ।

त्यासि आपुले साम्यतेसि आणूनि देखा । देवा भक्तसुखा भोगिसी तूं ॥१२॥

मागील अध्यायीं चरित्रें बरी । तुकयासि जातां अळंकापुरीं ।

पक्षी बैसले अंगावरी । अघटित परी हें दिसे ॥१३॥

मग चिंचवडी देवांसि होता श्रुत । त्याणीं तुकयासि पाचारिलें त्वरित ।

तेव्हां मांडी चिरोनि वैष्णव भक्तें । कापूस आंत दाखविला ॥१४॥

अस्थिमांस रुधिर जाण । हें कांहींच न दिसे त्यांजकारणें ।

म्हणती मनुष्य न म्हणावें याजकारणें । परब्रह्म सगुण दिसताहे ॥१५॥

मग परम विस्मित होऊनि पाहे । तुकयासि पुसिलें लवलाहे ।

म्हणती पंच भूतांचा तों झाला लय । तरी दिसतसे काय दृष्टीसीं ॥१६॥

ऐसा संशय वाटतसे चित्तां । तरी कृपा करोनि सांगिजे आतां ।

मग एक अभंग बोलिले तत्वतां । तों ग्रंथ आतां लिहितों मी ॥१७॥

अभंग ॥ अणुरेणुहूनी थोकडा । तुका आकाशा येव्हडा ॥१॥

गिळूनि सांडिले कलेवर । भव भ्रमाचा आकार ॥२॥

गिळूनि सांडीली त्रिपुटी। दीप उजळिला घटीं ॥३॥

तुका म्हणे आतां । उरलो उपकारा पुरता ॥४॥

ओव्या ऐसें म्हणतां वैष्णव भक्त । देव समजले चित्तांत ।

म्हणती मनुष्य न म्हणावें यातें । परब्रह्म साक्षात दिसताहे ॥१८॥

अनंत जन्मींचे सुकृत । पदरीं होतें सुनिश्चित ।

यास्तव तुकयाचें साक्षात । दर्शन होत आपणासी ॥१९॥

ऐशापरी करोनि स्तुती । वैष्णवभक्तासि नमस्कार करिती ।

ते स्थळीं क्रमोनि एक राती । देहुग्रामा प्रती मग आले ॥२०॥

यावरी वैकुंठवासी श्रीहरी । निजभक्तासी विचार करी ।

तुकया वांचोनियां अवसरीं । मज निर्धारी कंठेना ॥२१॥

विश्वोद्धार करावया निश्चित । मृत्यलोकीं पाठविलें त्यातें ।

कीर्तन करितो दिवसरात । सगुणीं प्रीत लावोनियां॥२२॥

माझ्या नामाच्या प्रतापें निश्चित । कळीकाळ जाहले त्याचें अंकित ।

आतां कोण आणील त्यातें । ऐसें पुसत जगदात्मा ॥२३॥

काळाची सत्त अणुमात्र । न चलेच कांहीं तयावर ।

मृत्युलोकीं राहावें निरंतर । ऐसेंचि अंतर तुकयाचें ॥२४॥

आपुल्या निजधामासि यावया पाहीं । ऐसें मनोगत तयाचें नाहीं ।

काळाची सत्ता त्याजवर नाहीं । तरी उपाय कांहीं योजावा ॥२५॥

ऐसें पुसतां लक्ष्मीपती । तेव्हां सकळ भक्त पायीं लागती ।

हात जोडोनियां निश्चिती । विचार सांगती श्रीहरीतें ॥२६॥

म्हणती मृत्युलोकापासूनि जाण । जेणें तुकयाचें विटेल मन |

ऐसा उपद्रव कांहीं दाखवून । घेऊन येणें ये स्थळीं ॥२७॥

ऐसा विचार सांगतां भक्‍ती । अवश्य म्हणतसे वैकुंठपती ।

म्हणे जेथें तुकयाची जडली प्रीती । तेथें उपद्रव निश्चितीं करावा ॥२८॥

लोहगांवीचे द्विजवर । स्त्रिया शूद्र लहान थोर ।

कीर्तन ऐकती दिवसरात्र । सप्रेम अंतर करुनियां ॥२९॥

तरी काळांतरें करुनि त्यांसी । अवघेच करावें वैकुंठवासी ।

मन विटवावे प्रपंचासी । तेव्हां माझिया पदासि पावतील ॥३०॥

तुकयाची सेवा करितां जाण । अवघेचि जाहले संपत्तिवान ।

प्रपंचीं विटवावें त्याचें मन । जगज्जीवन चिंतित असें ॥३१॥

तों इकडे देहुगावींहूनि लोहगावकर । तुकयासि घेऊनि गेले सत्वर ।

एकमास पर्यंत जाण साचार । कीर्तन गजर होतसे ॥३२॥

तो श्रीहरि इच्छेनें तत्त्वतां । परचक्रें लुटोनि नेली संपदा ।

जयांसि बोध ठसावला होता । ते हळहळ सर्वथा न करिती ॥३३॥

प्रपंच परमार्थी ज्यांचें चित्त । ते तरी उद्विग्न दिवसरात ।

म्हणती परचक्रें हरिली संपत । कैसी मात करावी ॥३४॥

तये समयी वैष्णवभक्त । स्वमुखे तयांसि उपदेशीत ।

त्रितापांचें आवर्त । यांची खंत न करावी ॥३५॥

होणारे तेंचि झालें आतां । याची हळहळ कासया वृथा ।

आपुला देह नव्हे तत्त्वतां । धन संपदा धरुं कोणाची ॥३६॥

अभंग ॥ गेलियाची हळहळ कोणी । नका मनीं धरुं कांहीं ॥१॥

पावलें तें म्हणों देवा । सहज सेवाया नाव ॥२॥

जळतां आंगीं पडतां खाण । नारायण भोगिता ॥३॥

तुका म्हणे नलगे मोल । देवा बोले आवडती ॥४॥

ओव्या ॥ ऐशा परी वैष्णवभक्‍त । स्वमुखें अभंग बोलिले तेथे ।

सवेंचि म्हणे पांडुरंगातें । आतां वैकुंठाप्रती मज नेयीं ॥३७॥

मृत्यूलोकीं ठेविशील मजकारणें । तरी असो निजक्ताची आण ।

ऐसें उदास बोलोनि वचन । आले परतोन देहूसी॥३८॥

लोहगांवींच्या लोकांप्रती । आधींच तुकयाची होती आर्ती ।

परचक्रें नेतां धन संपत्ती। मग वैराग चित्तीं उपजलें ॥३९॥

म्हणती गेली तरी संपदा जावो । नश्वर संसार अवघा वावो ।

कीर्तनाचा घ्यावया लाहो । देहूगांवी पाहावो ते येती ॥४०॥

आणिक गांवोगांवीचे जन । दुरोनि येती घ्यावया दर्शन ।

तुकयाचें ऐकतांचि कीर्तन । तटस्थ होऊन राहती ॥४१॥

दिंड्यापताका नानारीतीं । टाळ विणें मृदुंग वाजती ।

चौदा ध्रुपदी मागें असती । गाऊं लागती निजप्रेमें ॥४२॥

प्रासादिक अभंग नित्य नूतन । ऐशारीती होतसे कीर्तन ।

काय निघेल मुखातून । इच्छिती श्रवण सर्वांचे ॥४३॥

इकडे वैकुंठपती श्रीहरी । लक्ष्मीपती विचार करी ।

आतां मृत्यूलोकासि जाऊनि निर्धारीं । तुकयासि सत्वरी आणावें ॥४४॥

तों इंदिरा म्हणे देवाधिदेवा । पार्षदां हातीं विमान पाठवा ।

तुका दिव्य देही करोनि बरवा । येथें आणावावा त्यां हातीं ॥४५॥

समुद्रतनया सांगतां ऐसें । काय म्हणतसे आदि पुरुष ।

देहासहित तुकयास । आणावें ऐसें मजवाटे ॥४६॥

येच विषयीं तुज आतां । एक सांगतों पुरातन कथा ।

कृष्ण अवतारीं निजधामासि येतां । तेव्हां उद्धव परता न होय ॥४७॥

त्याचीं सगुणीं जडली प्रीती । यास्तव बहुत करीतसे खंती ।

मग म्यां उपदेशुनियां भागवतीं । बदरिकाश्रमाप्रती पाठविलें ॥४८॥

मग निजधामासि येतां आम्हांतें । मागें कलीनें लोक पीडिले बहुत ।

दुरितें आचरती समस्त । भक्‍ति पंथ लोपला ॥४९॥

राहिले सत्कर्म आचार । राहिले यज्ञयाग साचार ।

भागवत धर्म लोपले समग्र । कोणीच परत्र न साधिती ॥५०॥

मग आम्हीं आज्ञापिलें उद्धवा प्रतीं । तूं अवतार धरावा क्षितीं ।

गावोनि माझी सगुण कीर्ती । जगदुद्धार निश्चिती करावा ॥५१॥

तेव्हां तो बोलिला स्वमुखें मात । आतां गर्भवासासि कंटाळलें चित्त ।

मी न जाय मृत्युलोकांत । वैकुंठा प्रत सांडुनी ॥५२॥

ऐसी आळ घेतांचि जाण । ते म्यां पुरविलीं जगज्जीवनें ।

अयोनि संभव शिंपल्यांत घालोन । भीमरथी नेऊन सोडिला ॥५३॥

दामशेट शिंपी गोणाई कांता । ही पंढरीसि होती उभयतां ।

तेथें आमुची सेवा करितां । प्रसन्न तत्वतां त्यांसि झालों ॥५४॥

पुत्र मागतां मजकारण । मग दृष्टांतीं सांगीतलें जाऊन ।

उद्धव अवतार जाण । दीधला सगुण पुत्र तुम्हां ॥५५॥

स्नानासि जातां चंद्रभागेंत । वाहात येईल शिंपला निश्चित ।

त्यांत बाळतें घेऊनिवो सांगत । पाळावें त्वरित निजलोभें ॥५६॥

ऐसें स्वप्न देखोनीं दृष्टीं । चित्तीं हर्षला दामशेटीं ।

मज आठवोनी हृदय संपुटीं । चंद्रभागेतटीं बैसला ॥५७॥

तो उद्धव अवतार साक्षात । वाहात आला शिंपल्यांत ।

वोटींत घेऊनि त्वरित । निजमंदिरांत प्रवेशला ॥५८॥

कांतेसि म्हणे ते समयीं । प्रसन्न होऊनि शेषशायी ।

सगुण पुत्र दीधला पाहीं । तरी वोसंगा घेई आपुल्या ॥५९॥

दामशेटीची ऐकोनि वाणी । गोणाईस पान्हा दाटला स्तनीं ।

निजपुत्रासि आडवें घेऊनि । पाजीत जननी तेधवां ॥६०॥

बारा दिवस लोटतां निश्चित । नामदेव नाम ठेविलें त्यातें ।

सातवें वर्ष लागतां त्वरित । नैवेद्य देवळांत आणिला ॥६१॥

मी पुंडलीकाची देखोनि प्रीती । पांडुरंग अवतार घेतला क्षितीं ।

लोकांसि दिसे पाषाण मूर्ती । परी नामयासी प्रीती जडली असे ॥६२॥

नैवेद्य जेवीं म्हणतां जाण । अश्रुपातें भरलें लोचन ।

मग आम्हीं जेविलों निजप्रीतीनें । नैवेद्यासि अन्न आणिलें ॥६३॥

साता वरुषांत येतां निश्चिती । नामयानें बोलविली पाषाण मूर्ती ।

आणिक चरित्रें नानारीतीं । तीं संकळित तुजप्रती सांगतों ॥६४॥

ज्ञानदेवें मागोनि मजपासीं । तीर्थासि नेलें नामयासी ।

माझा वियोग न साहवे तयासि । उकसा बुकसीं स्फुंदत ॥६५॥

अविंधें उपद्रव केला फार । गाय वधिली नामयासमोर ।

मग सप्रेमें धांवा करितां थोर । तेव्हां पावलों सत्वर तयासी ॥६६॥

धेनु जीववोनि क्षणमात्रें । नामयासि आश्वासि लेंकरें ।

परतोनि येतां वैष्णववीर । मारवाडांत चरित्र एक झालें ॥६७॥

नामा ज्ञानदेव निश्चित । उभयतां जाहलें तृषाकांत ।

मग घुंगुरुट होऊनि योगिनाथ। जीवन सेवितां तेधवां॥६८॥

नामयासि नयेचि ते युक्ती । मग माझा धांवा करितसे प्रीती ।

तेव्हां कौतुक दाविलें कैशारीतीं । तेही तुजप्रती सांगतो ॥६९॥

कूपांतील खोल होते पाणी । तें उंचबळोनि आलें तये क्षणीं ।

हें ज्ञानदेवें दृष्टीसी देखोनि । लागला चरणीं नामयाच्या ॥७०॥

आंवढया नागनाथीं नामयानें । शिवरात्रीं मांडिलें हरिकीर्तन ।

श्रवणासि मिळाले बहुतजन । म्हणवोनि ब्राह्मण शोभले ॥७१॥

नामयासि म्हणती तत्त्वतां । देवालया मागें करावी कथा ।

ऐसी ऐकोनि विप्रवार्ता । विक्षेप चित्ता वाटला ॥७२॥

विष्णुदास उद्विग्न होऊनि पाहे । शिवालया मागें उभा राहे ।

म्यां पाषाण देऊळ फिरविलें पाहें । अद्यापि आहे तैसेचि तें ॥७३॥

घरीं नसतां अन्नवस्त्र । राजाई कष्टी होतसे थोर ।

मग म्यां होन दीघले गोणीभर । ते लुटविलें सत्वर नामयानें ॥७४॥

एकदा नामा करितां कीर्तन । संतां देखतां बोलिला पण ।

कीं शतकोटि अभंग प्राकृत करीन । मग प्रासादिक वचन बोलत ॥७५॥

ज्या ज्या देशीं जातसे तीर्था । तिकडे तैशीच केली कविता ।

ज्याच्या शब्दांची गणती घेता । नाहीं सर्वथा मजविण ॥७६॥

चाळीस लक्ष चौर्‍हयांणव कोटि । नवलक्ष लळित असे शेवटीं ।

परी आणिलाच नाहीं वैकुंठीं । काळाची दृष्टीं न पडतां ॥७७॥

शत कोटीचा पण राहिला निका । यास्तव नामयाचा अवतार तुका ।

त्याणें ब्रह्मरुपकाया केली देखा । नामसंकीर्तन सुखा भोगितसे ॥७८॥

मी पूर्वीं उद्धवासि बोलिलों निश्चित । कीं अवतार घेयीं मृत्युलोकांत ।

जन्म मरण सर्वथा नसेचि तूतें । तो सत्यवचनार्थ करावा ॥७९॥

पहिल्या अवतारीं शिंपल्यांत । अयोनिसंभव नामा होत ।

आतां तुकयासि आणावें देहासहित । काळाचा आघात चुकवोनि ॥८०॥

ऐसें निजभक्तां सन्निध निश्चितीं । लक्ष्मीसि सांगे वैकुंठपती ।

मग जयजयकारें वैष्णव गर्जती । आनंद चित्तीं न समाये ॥८१॥

दिव्य विमानीं तये वेळीं । बैसोनि उतरले भूमंडळी ।

निजभक्तांसहित वनमाळी । देहु क्षेत्राजवळी पातले ॥८२॥

तुकयासि भेटोनि जगज्जीवन । हृदयीं धरिलें निजप्रीतीनें ।

म्हणती तुजवाचोनि आम्हां कारणें । वैकुंठभुवन वोस दिसे ॥८३॥

तुवां कीर्तन घोष करुनि बरवा । सत्कीर्ति केली भक्त वैष्णवा ।

हाच तरणोपाय सकळ जीवा । साधनारंभ करावा नलगेची ॥८४॥

फाल्गुन शुद्ध एकादशी । न्यावयासि आले वैकुंठवासी ।

तंव रुक्मिणी लागतसे चरणासी । म्हणे विनंती पायांसी एक असे ॥८५॥

इंद्रायणीचे तीरीं जाण । आणावी वैकुंठींची रचना ।

तुकयासि येथें द्यावें भोजन । निजभक्त जनां समवेत ॥८६॥

जेवीं ज्ञानदेवाचे समाधि बळें । नामयानें अघटित घेतली आळ ।

मग दाखविले अभिनव सोहळे । तैसेंचि ये वेळे करावे ॥८७॥

हें इंदिरेचें मनोगत जाणोन । अवश्य म्हणे जगज्जीवन ।

मग योगमायेचें करोनि चिंतन । अद्भुत विंदान दाखविलें॥८८॥

विश्वकर्मा येऊनि सत्वर । मायेचें निर्मिलें वैकुंठपुर ।

अष्टसिद्धि जोडोनि कर । साहित्यासि निरंतर तिष्टती ॥८९॥

मोतियांचे चौरंगमाळा । अभिनव तेथें मांडिला सोहळा ।

सुरवर येऊनि तयेवेळां । कौतुक डोळां पाहती ॥९०॥

गोपाळ नाचती बागडी । आनंद करिती कडोविकडी ।

त्यास प्रेमसुखाची गोडी । अनुभवें फुडी कळों येत ॥९१॥

हें सुखदृष्टीसी देखोन । राहिलें योगियांचे ध्यान ।

आंवरुनिया मुद्रासन । रुप सगुण विलोकिती ॥९२॥

म्हणती धन्य तुकयाचा प्रेमा । स्वाधीन केलें पुरुषोत्तमा ।

त्याचा पार न कळेचि निगमा । त्या आत्मयारामा भुलविलें ॥९३॥

उद्धव अक्रूर अंबऋषी । जे दिव्यदेही वैकुंठवासी।

तेही आले त्या स्थळासी । तुकयाचे पंक्ती बैसावया ॥९४॥

सिद्ध सनकादिक थोर । नारद तुंबरु शुक योगींद्र ।

एके पंक्तीसि सारंगधरें । बैसविलें साचार तयांसि ॥९५॥

निजभक्तांची करावया पूजा । उल्हास वाटे गरुडध्वजा ।

सर्वोपचारें आणोनि वोजा । भक्ताचिया काजा सादर ॥९६॥

गंधाक्षता दिव्य सुमनें । भक्तांसि पूजीत जगज्जीवन ।

लक्ष्मी वाढितसे दिव्य अन्न । जें ब्रह्मादि सुरगण इच्छिती ॥९७॥

संकल्प सोडितां जगन्नाथ । ब्रह्मरसें तृप्त जाहलें संत ।

करशुद्धि घेतांचि निश्चित । तांबूल अर्पित निजहस्तें ॥९८॥

विबुध येऊनि कौतुकें । पुष्प वर्षाव करिती देख ।

म्हणती धन्य हा मृत्युलोक । येथें वैकुंठनायक उतरला ॥९९॥

एकादशी पासोनि निश्चित । ऐसा पांच दिवस सोहळा होत ।

परी हें एक तुकयावांचोनि सत्य । नाहीं श्रुत कवणासी ॥१००॥

अवघे होऊनि एकाग्र चित्त । तुकयाचें कीर्तन ऐकती नित्य ।

परी देवाच्या लीला अघटित । नाहीं विदित तयांसी ॥१॥

शिमगियाचा वरिष्ठ सण म्हणती । परी कोणी न खेळे धूळमाती।

नटनाटय सोगें न आणिती। वैराग्य चित्तीं बाणलें ॥२॥

चित्तीं सत्य भासलें एक । तयासि असत्य नावडेचि देख ।

अवघेच भाविक प्रेमळ लोक । कीर्तन सुखें ऐकती॥३॥

शांति विरक्ति बाणली तयां । सार्वभूतीं करिती दया ।

सप्रेम भजती पंढरीराया । जगद्गुरु तुकयाचे नियोगें॥४॥

तुका नामयाचा अवतार । प्रख्यात जाहला पृथ्वीवर ।

दर्शनासि येती नारी नर । यात्रा फार भरे तेथें ॥५॥

जगदुद्धार व्हावया लागोनी । अवतरला भक्त शिरोमणी ।

धन्य तें तीर इंद्रायणी । देहु धरणी पुण्य क्षेत्र ॥६॥

भक्तां पासीं वसतसे देव । देवाचे पायीं तीर्थें सर्व ।

तीर्थापासीं भक्त वैष्णव । सर्वदा पाहाहो नांदती ॥७॥

याहूनि पुण्यक्षेत्र थोर नाहीं । ऐसाचि निश्चय माझें जीवीं ।

तेथें तुकयाचे भक्‍तीस्तव पाहीं । शेषशायी पातले ॥८॥

असो हुताशनी जाहलिया निश्चिती । फाल्गुन वद्य प्रतिपदेच्या रातीं ।

तुकयासि म्हणे वैकुंठपती । माझी वचनोक्‍ती ऐक एक ॥९॥

आजचे रात्रीं चारीप्रहर । आनंदें करावा कीर्तनगजर ।

मग चलावें आम्हाबरोबर । वैकुंठपुर पाहावया ॥११०॥

ऐसें बोलोनि भक्‍तसखा । निज लोभें हृदयीं धरिला तुका ।

म्हणे तुझी सत्कीर्ति ऐकतां देखा । उद्धार लोकां होईल ॥११॥

अनंत अवतार थोर विभूती । असंख्य आहेति त्रिजगतीं ।

परी माझे साम्यतेसि यावया क्षितीं । तुजवीण निश्चिती दिसेना ॥१२॥

तुवां शरीर प्राणांचें जाण । मजलागीं दीधलें बळीदान ।

कामक्रोध बंदीं घालोन । चंचळ मन आवरिलें ॥१३॥

आत्मपद प्राप्त झालियावरी । तेही स्थिती सांडिली दुरी ।

राखोनि देव भक्‍तपणाची उरी । भजनीं बरीं प्रीति धरिसी ॥१४॥

तूं अवतार अवतारींचा निश्चिती । जिवलग मित्र सांगाती ।

उतरायी व्हावें कवणें रीतीं । तो पदार्थ मजप्रती दिसेना ॥१५॥

आम्हीं महासिद्धि पुढें करितां । तुवां तयासि हाणितल्या लाता ।

मुक्‍ति न घेसी सायुज्यता । यासि मी आतां काय करुं ॥१६॥

मागें भक्‍त जाहले थोर । पुढेंहीं भविष्य होणार ।

परी तुज ऐसें निरपेक्ष अंतर । न दिसे साचार कवणाचें ॥१७॥

आतां देहासहित वैकुंठभुवनीं । उदईक नेतो तुजलागुनी ।

ऐसें बोलतां चक्रपाणी । तुका चरणीं लोळतसे ॥१८॥

म्हणे देवा एक मात । वैकुंठीं एकदेशी करिशील निश्चित ।

कीर्तन करावें दिवसरात । ऐसा हेत चित्तांतरीं ॥१९॥

एथें भूवैकुंठ महीवर । विख्यात असतां पंढरपुर ।

कासया नेतोसि दुरिच्यादुर । मी नयें साचार तयेठायीं ॥१२०॥

जाणोनि तुकयाचें अंतर । पुढती बोले करुणाकर ।

एकदा चलावे तेथवर । तेणेंचि सत्कीर्ति थोर प्रगटेल ॥२१॥

माझें ऐश्वर्य क्षीरसागरीं । तेंही दाखवितों ये अवसरीं ।

जैसा मी व्यापक चराचरीं । तैसीच परी तुझी असे ॥२२॥

ये लोकीं निरंतर असतां । तरी लोकांची पूर्ण न बैसेल आस्था ।

यालागीं आग्रह सांडूनि तत्त्वतां । चाल भक्‍तनाथा सत्वर ॥२३॥

ऐसें विनवितां पांडुरंग । तुकयासि वचन मानलें मग ।

कीर्तनासि प्रारंभ केला आंगें । टाळ मृदंग वाजती ॥२४॥

विठ्ठल नाम तये वेळीं । जयजयकारें पिटिली टाळी ।

घोष न समाये निराळीं । कीर्तन कल्लोळीं गर्जतां ॥२५॥

सप्रेम भजनाचेनि रसें । देहभान नाठवे कोणास ।

नाद ब्रह्मचि वोतलें मुसें । एकाग्र मानस श्रोतयांचें ॥२६॥

मग स्वमुखें अभंग ते समयीं । तुकाराम वदलें कांहीं ।

ते ग्रंथीं साहित्यासि लिहितों पाहीं । संशय कांहीं न धरावा ॥२७॥

अभंग ॥ घोंटावीन लाळ ब्राह्मज्ञान्या हातीं । मुक्तां आत्मास्थिती सांडवीन ॥१॥

ब्रह्मरुप काया होतसे कीर्तनीं । भाग्य तरी ऋणी देव केला ॥२॥

सांडवीन तपोनिधी अभिमान । यज्ञ आणि दानें लाजवीन ॥३॥

तीर्थ भ्रामकांसी आणीन आळस । कडु स्वर्गवास करीन भोगें ॥४॥

धन्य म्हणवीन इहलोकींच्या लोकां । भाग्यें आम्हीं तुका देखीयेला ॥५॥

मरणां हातीं सुटली काया । विचारेया निश्चयें ॥१॥

नासोनीयां गेली खंती । सहज स्थिती भोगाची ॥२॥

न देखेसे झाले श्रम । आलें वर्म हातासी ॥३॥

तुका म्हणे कैंची कींव । कोठें जीव निराळा ॥४॥

प्रेतरुप झाला शरीराचा भाव । लक्षीयेला ठाव स्मशानींचा ॥१॥

रडती रात्रंदिवस काम क्रोध माया । म्हणती हाया हाया नेम धर्म ॥२॥

वैराग्याच्या शेणी शरीरीं लाविल्या । ब्रह्माग्न चेतविला ब्रह्मत्वासी ॥३॥

फिरविला घट फोडीला चरणी । महावाक्यध्वनी बोंब झाली ॥४॥

तिळांजळी दीली कुळनामरुपांसी । ज्याचें शरीर अर्पियेलें ॥५॥

तुका म्हणे रक्षा झाली आपोआप । उजळला दीप पांडुरंगा ॥६॥

आपुलें मरण म्यां पाहिलें डोळा । तों जाहला सोहळा अनूपम ॥१॥

आनंद भरला तिन्ही त्रिभुवनीं । सर्वात्मकपणीं भोग झाला ॥२॥

एक देशीं होतों अहंकारें आधीला । त्याच्या त्यागें झाला सुकाळ हा ॥३॥

फीटले सूतक या जन्ममरणांचें । मी माझ्या संकोचें दुरीं झालों ॥४॥

नारायणें दीला वस्तीसी पैं ठाव । धरोनीयां भाव ठेलोंपायीं ॥५॥

तुका म्हणे दीलें ऊमटलें जगीं । घेतलें तें अंगीं लाऊनीयां ॥६॥

ओव्या ॥ ऐसें तुकयाचे सिद्धांत वचन । ऐकोनि श्रोते विस्मित मन ।

विमानारुढ विबुध होऊन । सप्रेम कीर्तन ऐकती ॥२८॥

कपिल मुनि ऐसें केवळ । ब्रह्मज्ञानाचेनि खळ पुतळे ।

तुक्याचें कीर्तन ऐकतां प्रेमळ । तेही लाळ घोंटिती ॥२९॥

म्हणे शब्दजाळ सांडोनि जाण । निश्चळ एकाग्र असिजे मन ।

सर्वदा ऐकावें हेंचि कीर्तन । तरीच धन्य संसारीं ॥१३०॥

जो तिहीं देवांचा अवतार आहे । जीवनमुक्‍त जगद्गुरु दत्तात्रेय ।

तोहीं आत्मस्थिति सांडोनि पाहे । कीर्तनीं राहे सादर ॥३१॥

तपोनिधियांत श्रेष्ठ पाहीं । शंकरावांचूनि दुसरा नाहीं ।

तोही शिवपण विसरोनि सर्वंही । कीर्तन लवलाही ऐकत ॥३२॥

जे यज्ञ दानें करोनि भलें । स्वर्ग सुख भोगीत बैसले ।

तैही कीर्तन ऐकतां समजले । मग लज्जित जाहलें अंतरीं ॥३३॥

गुरुसि पुरंदर म्हणतसे । मन विटलें स्वर्ग सुखास ।

मृत्युलोकी राहूनि बहुत दिवस । कीर्तनरस सेवावा ॥३४॥

वायुवेग भ्रमणा ज्याचीं । तीर्थे पाहिलीं तिहीं लोकींची ।

तेही तुकयाचे कीर्तनाची । सेविती रुची प्रीतीनें ॥३५॥

म्हणती नामसंकीर्तन करोनियां । त्याणें ब्रह्मरुप केली काया ।

धन्य धन्य वैष्णव तुकया । पंढरीराया वश्य केलें ॥३६॥

स्वर्गस्थ सनकादि निश्चिती । ऐशा वचनें करिती स्तुती ।

श्रोतयांची सकळ वेधली वृत्ती । धन्य भाग्य म्हणती आमुचें ॥३७॥

अनंताम जन्मींचें सात्त्विक पुण्य । आपुले गांठीसि होतें जाण ।

यास्तव तुकयाचें झालें दर्शन । बोलती सज्जन मृत्युलोकीं ॥३८॥

धन्य आमुचें भाग्य निश्चित । यास्तव देखिला वैष्णवभक्‍त ।

जो श्रुतिशास्त्रांचा मथितार्थ । तो प्रांजळ गुह्यार्थ ऐकतों ॥३९॥

श्रोतयांचें एकाग्र मन । सर्वांगाचे केलें कान ।

काय निघेल मुखांतून । तेथेंचि मन वेधलें ॥१४०॥

तुकाराम ते अवसरीं । सप्रेम गजरें कीर्तन करी ।

अभंग बोलिले कैशापरी । तो सादर चतुरीं परिसिजे ॥४१॥

अभंग । डोळे भरिलें रुपें । चित्त पायांच्या संकल्पें ॥१॥

अवघी घातली वांटणीं । प्रेम राहिलें कीर्तनीं ॥२॥

वाचा केली माप । राशी हरिनाम अमुप ॥३॥

भरोनियां घ्यावा भाग । तुका झाला पांडुरंग ॥४॥

ओव्या ॥ ऐशापरी किर्तन गजर । जाहला तेव्हां चारीं प्रहर ।

उदयासि येतांचि दिनकर । मग रुक्मिणीवर ओवाळिला ॥४२॥

विठ्ठल नामाचेनि गजरें देखा । सप्रेम भावें नाचतसे तुका ।

देहभान नसे सकळ लोकां । नृत्य करितां सुखा भोगिती ॥४३॥

शेवटील अनुग्रह केला थोर । जयाचेनि होय जगदुद्धार ।

तेंही प्रासादिक ग्रंथीं लिहितों अक्षर । तरी पाठांतर करावीं ॥४४॥

अभंग ॥ ऐका हो भाविक जन । कोण कोण व्हाल तें ॥१॥

तार्किकांचा टाका संग । पांडुरंग स्मरावा ॥२॥

नका पाहूं मतांतरें । बुडाल खरें येणेंची ॥३॥

कलीमाजी दास तुका । जातो लोकां सांगोनी ॥४॥

ओव्या ॥ इतुकीं अक्षरें बोलूनि जाण । विठ्ठल नामे केली गर्जना ।

मग तुकयासि म्हणे वैकुंठराणा । वैकुंठभुवना चाल आतां ॥४५॥

तुवां अवतार घेऊनि साचार । केला अवघा जगदुद्धार ।

आतां पाहावें वैकुंठपुर । पुष्पक थोर आणिलें ॥४६॥

ऐसें बोलतां जगजेठी । तुक्यानें चरणीं घातली मिठी ।

मग तेथूनि चालिले उठाउठी । सत्कीर्ति सृष्टी ठेवुनी ॥४७॥

तुकारामें ते अवसरीं । कांतेसि सांगोनि पाठविलें घरीं ।

आम्हीं जातसों वैकुंठपुरीं । परी बरोबरी तुम्हीं यावे ॥४८॥

मागे तुकयानें निज कांतेला । अकरा अभंग उपदेश केला ।

तयांमाजी शब्द दिधला । तो सत्य केला पाहिजे ॥४९॥

यास्तव परलोकीं जातां निश्चितीं । बोलाविलें अवलीप्रती ।

उत्तर दिधलें कैशारीती । तें सादर संतीं ऐकीजे ॥१५७॥

मी पांचा महिन्यांची गरोदर । घरीं म्हैस दुभती थोर ।

पोरवाडा लहान लेंकुरें । मागें संसार कोण करी ॥५१॥

इतुका निरोप येतांचि तत्त्वतां । आश्चर्य वाटले वैष्णवभक्त ।

म्हणे अझून घरची ममता । मायेची कथा अनिवार ॥५२॥

वैकुंठ बोला वैष्णवभक्त । परी जिजायी नयेचि सांगातें ।

तरी तिचाही अन्याय नसे यांत । पूर्वींल प्रघात अवधारा ॥५३॥

मागें स्वच्छेनें वैष्णवभक्त । कोणत्याही क्षेत्रीं गमन करीत ।

जरी पुसिलें कोणी अकस्मात । तरी म्हणती आम्हीं वैकुंठाप्रत जातो ॥५४॥

यास्तव अवलीचा अन्याय नाहीं । म्हणे पिसा जातसेल कोणे गांवीं ।

यालागीं सांगूनि पाठविलें पाहीं । रिकामपण नाहीं यावया ॥५५॥

मग सभाग्य श्रोते हरी कीर्तनीं । तयांसि बोलिले निर्वाण वचनीं ।

आतां आम्हीं चालिलों वैकुंठभुवनीं । न येऊं परतोनी सर्वथा ॥५६॥

अभंग ॥ घरीची दारीची भजा पांडुरंगा । वडिलांसी सांगा दंडवत ॥१॥

मधाचीया गोडी माशी घाली उडी । गेलीया ती घडी पुन्हां नये ॥२॥

गंगेचा हा ओघ सागरासी गेला । मागें नाहीं आला कदाकाळीं ॥३॥

ऐसी या गोष्टीची बरी राखा सोय । गेला तुका नये परतोनी ॥४॥

ओव्या ॥ ऐशारीतीं बोलोनि उत्तर । देवासि केला नमस्कार ।

नामघोषे करोनि गजर । चालिले बाहेर ते समयीं ॥५७॥

सकळ श्रोतयांसि ते अवसरीं । प्रेम अवस्था दाटली अंतरीं ।

उदास वचन ऐकोनि सत्वरी । अश्रुपात नेत्रीं वाहाताती ॥५८॥

परी देहासीं जाती वैकुंठभुवन । ऐसा निश्चिय न कळेचि कवणा ।

गमन करिती तीर्थाटणा । ऐसी भावना सकळांची ॥५९॥

एकमेकांसी लोक बोलती । आमुचा उबग आला चित्तीं ।

चालिले हिमाचळ पर्वती । कैसी गती करावी ॥१६०॥

एक म्हणती तुकाराम । पाहावया चालिला बदिरकाश्रम ।

आपुले खोटें कर्म । भक्‍तीचें वर्म कळेना ॥६१॥

एक म्हणती तुकयाकारणें । वैराग्य जाहलें जैंपासुन ।

सकळ गांवांसि नामाभिधान । वैकुंठभुवन एक म्हणे ॥६२॥

कोणी विचार करिती मानसीं । तुका जातसे वाराणसीं ।

आग्रह करोनि राहवावें त्यासी । सद्भावें पायांसी लागोनियां ॥६३॥

एक म्हणती रामेश्वर ब्राह्मण । पंडितां माजी वक्‍ता निपुण ।

तुकयासि तो राहवील विनीत होऊन । इतरांचें वचन न ऐकती ॥६४॥

कीर्तनांत बैसले नारीनर । ते ऐसेंचि बोलती परस्पर ।

तों तुकाराम करी कीर्तन गजर । देउळा बाहेर निघाले ॥६५॥

इंद्रायणी तीरीं येऊन । अभंग वदले प्रिती करुन ।

तेही ग्रंथीं लिहितों जाण । करा श्रवण भाविकहो ॥६६॥

अभंग ॥ सर्व सुख आम्हीं सर्वकाळ । तोडियेलें जाळ मोहपाश ॥१॥

याजसाठीं आम्हीं सांडिले भ्रतार । रतलों या पर पुरुषासीं ॥२॥

तुका म्हणे आतां गर्म नये धरुं । औषध करुं फळ नोहे ॥३॥ ॥१॥

बहुतांच्या आम्ही न मीळोम मतासी । कोण कैसी यासी भावनेच्या ॥१॥

विचार करीतां वायां जाय वेळ । लटिकें तें मूळ फजीतीचें ॥२॥

तुका म्हणें तुम्ही करा खटपट । नका जाऊं वाटे आमुचीया ॥३॥ ॥२॥

त्याचे सुख नाहीं आलें अनुभवा । कठीण हें जीवा तोंवरीच ॥१॥

मागील्याचे दुःख लागों नेदी अंगा । अंतरही संगा होऊं नेंदी ॥२॥

तुका म्हणे सर्व विषयीं संपन्न । जाणती महिमान श्रुती ऐसें ॥३॥

वाळोजन मज म्हणोत सिंदळी । परी हा वनमाळी न विसंबे ॥१॥

सांडोनि लौकीक जालीये उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥२॥

नायके वचन बोलतां या लोका । म्हणे झाले तुका हरिरत ॥३॥ ॥४॥

आधील्या भ्रतारा काम नोहे पुरा । मग व्यभिचारा टेंकलीसे ॥१॥

रात्रंदिवास मज पाहिजे जवळी । क्षण त्या वेगळी न गमे घडी ॥२॥

नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रतलें अनंत तुका म्हणे ॥३॥ ॥५॥

हाचि नेम आतां न फिरे माघारीं । बैसलें शेजारीं गोविंदाच्या ॥१॥

घर रीघी झालें पट्टराणी बळें । वरीले सांवळें परब्रह्म ॥२॥

बळीयाचा अंग संग झाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥

हाचि नेम आतां माघारीं । बैसले शेजारी गोविंदाच्या ॥१॥

घर रिघी झालें पट्टराणी बळे । वरीलें सांवळे परब्रह्म ॥२॥

बळीयाचा अंग संग झाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥॥६॥

नाहीं माझें काम आतां तुम्हांसवें । होतें गुप्त ठावें केलें आतां ।

व्यभिचार माझा पडीला ठाऊका । न सरत लोकांमाजी झालों ॥२॥

न धरावा लोभ कांहीं माझेवीशीं । झालें देव पीसी तुका म्हणे ॥३॥ ॥७॥

विसरलें कूळ आपुला आचार । पति भावे दीर वरसोय ॥१॥

सांडीला लौकीक लाज भय चिंता । रतलें अनंता चित्त माझें ॥२॥

मज आतां वायां आळवाल झणी । तुकां म्हणे कांनी बहिरी झालें ॥३॥ ॥८॥

न देखें बोले नाईकें आणीक । बैसला तो एक हरीचित्तीं ॥१॥

सासुरें माहेर मज आतां नाहीं । केलें एक दोहीं मिळोनियां ॥२॥

आळ आला होता आम्ही भांडखोरी । तुका म्हणे खरी केली मात ॥३॥ ॥९॥

दुजा असा बळी कोण आहे आतां । हरि या अनंता पासोनियां ॥१॥

बळीयाचे आम्हीं झालो बळीबंता । करुं सर्व सत्ता सर्वांवरी ॥२॥

तुका म्हणे आम्हां जीवींच्या उदारा । झालों प्रीतीकरा गोविंदाच्या ॥३॥ ॥१०॥

क्षणभरही आम्हीं सोशिलें वाईट । साधीले अवीट निजसुख ॥१॥

सांडी मांडी मागें केल्या भरोभरी । अधिकची परी दुःखाचिया ॥२॥

तुका म्हणे जाणें येणें नाहीं आतां । राहिलें अनंताचिया पायी ॥३॥ ॥११॥

आम्हीं आम्हां आतां वडील वाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥१॥

फावला एकांत एकविध भाव । हरी आम्हा सवें सर्व भोगी ॥२॥

तुका म्हणे अंग संग एके ठायीं । असो जेथें नाहीं कोणी दुजें ॥३॥ ॥१२॥

एका जीवें आतां जिणें झालें देहीं । वेगळीक कांहीं नव्हे आतां ॥१॥

नारायणा आम्हां नाहीं वेगळीक । पूर्वील हे भाक सांभाळीली ॥२॥

तुका म्हणे झालें सायासाचें फळ । टळलीं हे वेळ काळ दोन्हीं ॥३॥ ॥१३॥

हसूं रुसूं आतां वाढवूं आवडी । अंतरींची गोडी अवीट ते ॥१॥

सेवा सुखें करुं आनंद वचन । आम्हीं नारायण एकाएकी ॥२॥

तुका म्हणे आतां झालें उदासीन । आपुल्या आधीन केला पती ॥३॥ ॥१४॥

मजसवें आतां येऊं नका कोणी । सासुरवासीणी बाईयानों ॥१॥

न साहवे तुम्हां याजनाची कुट । बोलती वाईट वोखटें तें ॥२॥

तुका म्हणे झालों उदास मोकळ्या । विचरों गोवळया सवें आम्हीं ॥३॥ ॥१५॥

शिकविलें तुम्हीं तें राहे तोंवरी । मज आणि हरी वियोग जों ॥१॥

प्रसंगें नाहीं या देहाची भावना । तेथें या वचना कोण मानी ॥२॥

तुका म्हणे चित्तीं बैसला अनंत । दिसों नेदी नित्य अनित्य तें ॥३॥ ॥१६॥

सांगतों तें तुम्हीं ऐकावें हें कानीं । आमुचें नाचणीं नाचूं नका ॥

जोंवरी तुम्हां मागिल्याची आस । तोंवरी उदास होऊं नये ॥२॥

तुका म्हणे काय वायावीण धिग । पतीना गोविंद दोन्ही ठाय ॥३॥ ॥१७॥

आज वरी तुम्हां आम्हां नेणतपणें । कौतुक खेळणें संग होता ॥१॥

आतां अनावर झालें अवगुणाची । करुं नये तेंची करीं सुखें ॥२॥

तुका म्हणे कूळां बुडविलीं दोन्हीं । कुळें एक मनीं नारायण ॥३॥ ॥१८॥

सासुरीया वीट आलासे अंतरा । इकडे माहेरा स्वभावेंची ॥१॥

सांडवर कोणी न धरीती हातीं । प्रारब्धाची गती भोगूं आतां ॥२॥

न व्हावी ते झाली आमची भंडायी । तुका म्हणे कायी झालें आतां ॥३॥ ॥१९॥

मरणाही आधीं राहीलों मरुनी । मग केलें मनीं होतें तैसें ॥१॥

आता तुम्हीं पाहा आमुचें नवल । नका वेंचूं बोलवाया वीण ॥२॥

तुका म्हणे तुम्हीं भयाभीत नारी । कैसी सांग सरी तुम्हां आम्हां ॥३॥ ॥२०॥

परपुरुषाचें सुख व्हावें जरीं । उतरोनि करीं घ्यावें शीर ॥१॥

संसारासि आग लाविजेल हातें । फिरोनि मागूतें पाहूं नये ॥२॥

तुका म्हणे व्हावें तयापरी धीट । पतंग कां नीट दीपसोई ॥३॥ ॥२१॥

आयिकावें परी ऐसें नव्हे बायी । न सांडावी सोयी भ्रताराची ॥१॥

नव्हे अराणुक लौकिकापासून । आपल्या आपुण गोविलें तें ॥२॥

तुका म्हणे मन कराल कठीण । त्या या निवडून मजपासीं ॥३॥ ॥२२॥

आहाच वाहाच अंतवर दोन्ही । न लगती गडणी ऐशा आम्हां ॥१॥

भिऊं नये तेची भेडवासी कोणा । आवरोनि मना बंद द्यावा ॥२॥

तुका म्हणे कांहीं अभ्यासावांचोनी । नव्हे ते करणी भलतीची ॥३॥ ॥२३॥

न राहे रसना बोलतां आवडीं । पायीं दिली बूडी माझ्या मनें ॥१॥

मानेल त्या तुम्हीं ऐकावें स्वभावें । मी तों माझ्या भावें अनुसरलें ॥२॥

तुका म्हणे तुम्हीं फिरावें बहूती । माझी तो हे गती झाली आतां ॥३॥ ॥२४॥

न बोलतां तुम्हां कळो नये गुज । म्हणवोनी लाज सांडियेली ॥१॥

आतां तुम्हां पुढें जोडितसें हात । नका कोणी अंत पाहूं माझा ॥२॥

तुका म्हणे आम्हीं बैसलों शेजारी । करील ते हरी पाहूं आतां ॥३॥ ॥२५॥

सकळही माझी बोळवण करा । परतोनि घरां जावे तुम्हीं ॥१॥

कर्म धर्म तुम्हां असावें कल्याण । घ्या माझें वचन आशीर्वाद ॥२॥

वाढवोनीं दीलें एकाचिये हातीं । सकळ विश्रांती झाली तेथें ॥३॥

आतां मज जाणें प्राणनाथासवें । मी तों माझ्या भावें निरवोनीयां ॥४॥

वाढवितां लोभ होईल उशीर । अवघींच स्थीर असा ठायीं ॥५॥

धर्म अर्थ काम झाला एके ठायीं । मेळविलें तेंही हातोहातीं ॥६॥

तुका म्हणे आतां झाली हेचि भेटी । उरलीया गोष्टी बोलावया ॥७॥ ॥२६॥

आम्ही जातों आतां कृपा असों द्यावी । सकळां सांगावी विनंति माझी ॥१॥

वाडवेळ झाला उभा पांडुरंग । वैकुंठीं श्रीरंग बोलावितो ॥२॥

अंतकाळीं विठो आम्हासी पावला । कुडी सहित झाला गुप्त तुका ॥३॥ ॥२७॥

ओव्या ॥ इतुकें अभंग बोलतां उत्तर । तो अद्भुत कौतुक वर्तले थोर ।

विमानरुढ होऊनि सुर । जयजयकार ते करिती ॥६७॥

परमानंद मानूनि चित्तीं । नारद तुंबर गायन करीती ।

सवें घेऊनियां पार्वती । कैलासपती तो आला ॥६८॥

ब्रह्मा विष्णु रुद्र तिन्ही । कौतुक पाहताति विमानीं ।

अप्सरा गंधर्व गाती गाणीं । नाद गगनीं न समाये ॥६९॥

सिद्ध सनकादिक थोर । दत्तात्रेय कपिलादि ऋषीश्वर ।

यक्ष गुह्यक आणि किन्नर । पाहावया साचार ते आले ॥१७०॥

मागिले युगींचे थोर थोर भक्‍त । आणि कलियुगींचे अवघे संत ।

दिव्यदेही बैसूनि विमानांत । तुक्यातें लक्षित निजदृष्टीं ॥७१॥

तो चिंतनीं चिंतिता पंढरीराया । ब्रह्मरुप तुक्याची भासे काया ।

चैतन्य पुतळा दिसतसे तयां । निरसलें माया ओडंबर ॥७२॥

म्हणती नामधारक हा वैष्णववीर । घेऊनि मृत्युलोकीं अवतार ।

कीर्तन करुनि साचार । विश्वोद्धार पैं केला ॥७३॥

तंव पुरंदरासहित सुर । नामघोषें गर्जती थोर ।

पुष्पक प्रकाशें कोंदलें अंबर । तेंजें दिनकर उणा दिसे ॥७४॥

तुक्या समागमे होते जन । प्रकाशें त्यांचे झांकले नयन ।

जैसी गगनीं दिसे सौदामिन । तेव्हां झांकती नयन सर्वांचे ॥७५॥

तेवीं विमानाप्रती । सकळांची लागलीं नेत्रपातीं ।

तेव्हां तुका बैसोनि विमानाप्रती । वैकुंठाप्रती चालिला ॥७६॥

भाविक प्रेमळ वैष्णव संत । तयासि निराळा पंथ दिसत ।

घंटानाद कोंदला गगनांत । गंधर्व गात नामघोषें ॥७७॥

पुष्पक होताचि दूर । लोक उघडोनि पाहती नेत्र ।

तों तुका न दिसे क्षितीवर । तेव्हां शोक फार मग करिती ॥७८॥

म्हणती आमुच्या हातींचें भलें । देखत देखताचि रत्‍न गेलें ।

जिजाईसि सांगती मुलें । मग पिटीत वक्षस्थळ ते आली ॥७९॥

यात्रा मिळाली होती फार । आणि गावींचे नारीनर ।

इतुक्याचा उसळला शोक सागर । तो ग्रंथीं कोठवर ल्याहावा ॥१८०॥

जेवीं गोकुळांतूनि जातां कृष्णासी । शोक करिती वजवासी ।

तैसीच गति झाली त्यांसी । तुका दृष्टीसीं न पडतां ॥८१॥

दृष्टीसीं पाहावें सगुण रुपडें । सकळांच्या नेत्रांसि लागली चाड ।

भिरभिरा पाहती चहूंकडे । परि तुका न पडे दृष्टींसीं ॥८२॥

शके पंधराशें एकाहत्तर जाण । विरोधी संवत्सर नामाभिधान ।

फाल्गुन वद्य द्वितीया इंदुपूर्ण । आलासे दिन चार घटिका ॥८३॥

जगद्गुरु तुका वैष्णव भक्त । तये समयीं होतसे गुप्त ।

भाविक प्रेमळ वैष्णव भक्‍त । शोक बहुत ते करिती ॥८४॥

प्रयाण समयींचे अभंग निश्चित । गंगाजी मवाळे वाचितसे पोथी ।

अश्रुपातें शिंपिली क्षिती । प्रेम त्रिजगतीं न समाये ॥८५॥

अवली रडतसे ते समयीं । मजही बोलावूं पाठविले बायी ।

परी असत्य भासलें तें समयीं । यास्तव गृहीं राहिलें ॥८६॥

त्याच्या वैराग्य ज्वाळांच्या आहया । लागतां जळाली माझी काया ।

देखत देखतचि लवलाह्या । टाकोनियां गेला कीं ॥८७॥

निदान कळलें असतें जर । तरी धरोनि जातें त्याचा पदर ।

मी तरी गर्भिणी अज्ञान पोर । कुटुंब संसार कैशारीतीं ॥८८॥

ऐसें म्हणवोनि तयेक्षणी । मूर्च्छा येऊनि पडलीं धरणीं ।

महादेव विठोबा कुमर दोन्ही । रुदन ते क्षणीं करीताती ॥८९॥

परतोनि येईल वैष्णव भक्‍त । यास्तव लोक वाट पाहत ।

बैसले आस्तमान पर्यंत । मग गेले सदनांत आपुल्या ॥१९०॥

तुक्याच्या दर्शना लागोनी । यात्रा आली होती दुरोनी ।

तेही वोसरली तये क्षणीं । फांकली त्रिभुवनीं सत्कीर्ति ॥९१॥

देशोदेशीं फांकली मात । तुक्यासीं पावला पंढरीनाथ ।

वैकुंथासि नेलें देहासहित । नवल अद्भुत हें वाटे ॥९२॥

ज्यांनीं देखिलें ते यथार्थ म्हणती । विकल्पी ते असत्य मानिती ।

वैष्णवी मायेची अनिवार भ्रांती । सर्वांप्रती अनावर ॥९३॥

असो इकडे देहुग्रामात जाण । तुका पावला वैकुंठ भुवन ।

ते स्थळीं वैष्णव चौदाजण । निश्चयी धरुन बैसले ॥९४॥

षट्‌शास्त्री ब्राह्मण रामेश्वर । आणि कान्हया तुक्याचा सहोदर ।

गंगाजीं मावाळ कडुसकर । कोंडोबा विप्र लोहकर्‍या ॥९५॥

संताजी तेली जगनाडया देख । जो तुक्यापासीं होता लेखक ।

नवजण वैष्णव होते आणिक । ज्यांणीं सद्विवेक गाजविला ॥९६॥

ऐसे असती चौदाजण । ते घरासि न जाती परतोन ।

म्हणती एकदां सद्गुरु दाखवी चरण । तरीच प्राण रक्षूं हा ॥९७॥

कान्हया तुक्याचा सहोदर । त्याणेंही शोक केला फार ।

अभंग बोलिला करुणास्वरें । ते ऐका सादर भाविक हो ॥९८॥

अभंग ॥ दुःखें दुभागलें हृदय संपुट । गंहीवरे कंठ दाटताहे ॥१॥

ऐसें काय केलें सुमित्रा सखा या । दीधलें टाकूनियां वनामाजी ॥२॥

आक्रंदती बाळें करुणावचनीं । त्या शोकें मेदिनीं उलों पाहे ॥३॥

काय तें सामर्थ्य नव्हतें तुजपासीं । संगे न्यावयासी अंगभूतें ॥४॥

तुज ठावें आम्हां नाहीं कोणी सखा । उभयलोकीं तुका तुजवीण ॥५॥

कान्हा म्हणे तुझ्या वियोगें पोरटीं । झालों देरे भेटी बंधुराया ॥६॥॥१॥

भुक्ति मुक्ति तुझें जळो ब्रह्मज्ञान । दे माझ्या आणून भावा वेगीं ॥१॥

ऋद्धिसिद्धि मोक्ष ठेवि गुंडाळोनी । दे माझ्या आणून भावावेगीं ॥२॥

नको आपुलिया नेऊं वैकुंठासीं । दे माझ्या भावासी आणूनियां ॥३॥

तुकया बंधु म्हणे न देसील जरी । हत्या होईल शिरीं पांडुरंगा ॥४॥॥२॥

सख्यत्वाने गेलों करीत सलगी । नेणेंचि अभागी महिमा तुझा ॥१॥

पावलों आपलें केलेला हो र्‍हास । निदैवापरीस काय करी ॥२॥

कष्टविलासी म्यां चांडाळें संसारीं । अझुनियां तरी उपदेशीं ॥३॥

उचित अनुचित सांभाळीलें नाहीं । कान्हा म्हणे कायीं बोलों आतां ॥४॥॥३॥

असो आतां काय करोनियां ग्लांतीं । कोणा काकुळती येईल येथें ॥१॥

करुं कांही दिवस आहे तों सायास । झोंबुं त्या लागास भावाचिया ॥२॥

रडतां रडती बापुडें म्हणती । परी ते न येती कामा कोणी ॥३॥

तुका बंधु म्हणे पडिली यावनीं । विचारतो मनीं बोलीलाहो ॥४॥॥४॥

चरफडें चरफड शोकें शोक होय । कार्य मूळ आहे धीरापासीं ॥१॥

कळतसे ऐसें मजहो पाहतां । करावी तें चिंता मिथ्या खोटी ॥२॥

न चूके होणार सांडितां शूरत्वा । फुकटचि होईल सत्वा होईल हानी ॥३॥

तुकया बंधु म्हणे दिला बंद मना । वांचोनी निधाना न पाविजे ॥४॥॥५॥

नलगे चिंतां आतां अनुमान पाहतां । आलें मूळ भ्राता गेला जेथें ॥१॥

घरभेद्या जेथें आहेत सुकान । धरितों कवळून पाय दोन्ही ॥२॥

त्याचे त्याच्या मुखें पडियलें ठावें । नलगे सांगावें मागें पुढें ॥३॥

तुकया बंधु म्हणे करील भेटी भावा । सोडिन तेधवां विठोबासी ॥४॥॥६॥

धींद धींद तुझ्या करीन धींदडया । ऐसें काय वेडया जाणीतलें ॥१॥

केली तरी भेटी माझीया भावास । नाहीं तरी नास आरंभिला ।

मरावें मरावें आलें या प्रसंगा । बरें पाडुंरंगा कळे साचें ॥३॥

तुकया बंधु म्हणे तुझी माझी उरी । उडाली न धरी भीड कांहीं ॥४॥॥७॥

ओव्या ॥ कान्हया तुकयाचा सहोदर । ऐसी करुणा भाकितसे फार ।

आणिक तेरा वैष्णव वीर । बैसले साचार ते ठायीं ॥९९॥

तीन अहोरात्र पर्यंत वरी । बैसले इंद्रायणीचे तीरीं ।

तुकयाचें ध्यान लागलें अंतरीं । जीव संसारीं त्रासला ॥२००॥

कोणी दशदिशा विलोकित । कोणी पाहती आकाश पंथ ।

तों पंचमीच्या प्रातःकाळीं निश्चित । वर्तलें चरित्र तें ऐका ॥१॥

तुक्याचें हातीं साचार । टाळ असे निरंतर ।

आणि गोदडी होती अंगावर । ते पडिली सत्वर ऊर्ध्वपंथें ॥२॥

तेव्हां निश्चय कळला त्यांसी । कीं सद्गरु झालें वैकुंठवासी ।

मग स्नान करोनि इंद्रायणीसी । देवालया पासीं पातले ॥३॥

टाळ गोदडी पाहावयासि जाण । दुरोनि दुरोनि येती भाविक जन ।

म्हणे हेंचि तुक्याचें दर्शन । सजळ नयन अश्रुपातें ॥४॥

रामेश्वर ब्राह्मण निश्चित । तयासि कान्हया विचारित ।

आतां कोणती नेमावी पुण्यतीथ । असेल शास्त्रार्थ तो सांगा ॥५॥

रामेश्वर म्हणे वचन ऐका । क्रिया कर्मा विरहित तुका ।

देह निर्वाह न होतां देखा । श्रीविष्णु लोका प्रती गेला ॥६॥

फाल्गुन वद्य द्वितीयेसी । सद्गुरु जाहले वैकुंठवासी ।

परी टाळ गोदडी पंचमीसी । निरोप आपुल्यासि हा आला ॥७॥

या करितां आज पंचमी सुदिन । करावें ब्राह्मण संतर्पण ।

मेळवोनियां वैष्णव जन । हरिकीर्तन आरंभा ॥८॥

देहनिर्वाह झाला असता । तरी क्रियाकर्मासि अधिकार होता ।

त्या जगद्गुरुची लीला सर्वथा । नये बोलतां मज लागीं ॥९॥

अभंग ॥ पंडित वैदिक अथवा दशग्रंथीं । सरी न पावती तुकयाची ॥१॥

शास्त्रेंही पुराणें गीता नित्य नेम । वाचितां तें वर्म न कळे तयां ॥२॥

मागें कवीश्वर झालें थोर थोर । कोणें कलेवर नेलें सांगा ॥३॥

म्हणे रामेश्वर सकळिकां पूसोनी । गेला तो विमानीं बैसोनीयां ॥४॥

ओव्या ॥ जे कां अनावर वैष्णवी माया । ते सर्वथा बाधूं न शके तुक्या ।

देहींच विदेहत्व पावोनियां । केली काया ब्रह्मरुप ॥२१०॥

जो मृत्यु लोकांत साचार । तुका नामयाचा अवतार ।

जनासि दाखवोनि लीला सत्वर । केला जीर्णोद्धार भक्ति पंथ ॥११॥

ऐसें बोलतां रामेश्वर । संत गर्जती जयजयकार ।

फाल्गुन वद्य पंचमीस साचार । उत्साह थोर आरंभिला ॥१२॥

मिष्टांन्ने करोनि नाना रीतीं । देवळीं बैसविल्या द्विज पंक्ती ।

पूजा उपचार करोनि प्रीतीं । भोजनें त्यांप्रती घातलीं ॥१३॥

पंचमी षष्टीपर्यंत । कीर्तन करिती वैष्णव भक्त ।

मग सप्तमीस झालें लळित । आनंदयुक्त ते समयीं ॥१४॥

महादेव विठोबा नामाभिधान । हे तुक्यासि पुत्र दोघेजण ।

कांता गरोदर होती जाण । नवमास पूर्ण ते झाले ॥१५॥

मग भक्तिज्ञान वैराग्य पुतळा । अवलीसि सगुण पुत्र झाला ।

नारायण नाम ठेविलें त्याला । आनंद वाटला संतांसी ॥१६॥

तो दिवसें दिवस झाला थोर । दर्शानासि आला शिवाजी नृपवर ।

गांव मोकासे दीधले चार । मग बांधिलें शिखर विठोबाचें ॥१७॥

धन संपदा येतां बरी । वैराग्य जाहलें ते अवसरीं ।

घर लुटवी विप्रांकरीं । द्वारकापुरी मग गेले ॥१८॥

कांता पुत्रांचा करोनि त्याग । महायात्रेसि गेले मग ।

अकरा कावडी आणूनि निजांगें । रामेश्वर सांग पूजिला ॥१९॥

तुक्याचे अभंग साचार । बहुत केलें पाठांतर ।

नारायण बाबा वैष्णव वीर । कीर्तन गजर करीतसे ॥१२०॥

महादेव विठोबा वडील निश्चिती । परी ते तयाचे आज्ञेत असती ।

परी तुक्याचे बरें निश्चिती । पडली महंती यांजकडे ॥२१॥

तुकाराम तों स्वदेहासीं । झाले असती वैकुंठवासी ।

परी अद्यापि दर्शन सायासीं । देती भाविकांसी निजकृपें ॥२२॥

प्रथमारंभा माजी जाण । करुणा भाकिली कान्हयानें ।

तयासि स्वप्नीं दीधलें दर्शन । निजकृपेनें आपुल्या ॥२३॥

आणिक कानडा वाणी लिंगाईत । सुदऊंबर्‍यामाजी होता राहात ।

त्याणे तुक्याची सेवा केली बहुत । संसारीं विरक्त होऊनियां ॥२४॥

गबासेट त्याचें नामाभिधान । परम सुशील असे जाण ।

प्रपंच व्यवहार सर्व टाकून । सत्संग तेणें धरियेला ॥२५॥

मग एकांत समयीं एके दिनीं । तुकयासि विनवी कर जोडोनी ।

म्हणे माझ्या अंतसमयीं कृपें करोनी । दर्शन स्वामींनीं देईजे ॥२६॥

देखोनि तयाचा सप्रेम भावार्थ । अवश्य म्हणे वैष्णव भक्त ।

मग वैकुंठासि गेलिया देहासहित । निदिध्यास वाणियातें लागला ॥२७॥

एकांतीं संतांसि सांगे गुज । कीं तुकारामानें नेम केला मज ।

कीं अंतःकाळीं भेट देईन तुज । सन्निध काज तें आलें ॥२८॥

कांहीं दिवस लोटतां पाहे । तयाचा आला अंतसमय ।

मग देहूसि मनुष्य लवलाहें । पाठवित आहे सत्वर ॥२९॥

रामेश्वर भट थोर ब्राह्मण । तुक्याचा सहोदर कान्हया जाण ।

धाकटा पुत्र नारायण । इतुक्यांस घेऊन येतसे ॥१३०॥

आसनीं बैसवोनि वैष्णववीर । पूजा केली सर्वोपचारें ।

तों तुकाराम तेथें आले सत्वर । वाणी नमस्कार करितसे ॥३१॥

बुका लावूनि आपुल्या करें । कंठीं पुष्पाचा घातला हार ।

म्हणें कृपा करोनि पतितावर । दर्शन साचार दीधलें ॥३२॥

ऐशा स्वमुखें बोलतां गोष्टीं । ऐकोनि लोकास आश्चर्य पोटीं ।

परी वाणियानें हार घातला कंठीं । तो सकळांचे दृष्टीं दिसतसे ॥३३॥

भिंती काष्ठाचा आधार । सर्वथा नसतां अधांत्रीं दिसतो हार ।

वैष्णवीं केला जयजयकार । नामघोष गजर तेधवां ॥३४॥

विठ्ठल स्मरण करितां जाण । मग देह सोडिला तयानें ।

अवघेचि म्हणती धन धन्य । लाधले दर्शन तुक्याचें ॥३५॥

जैसे रामकृष्णादि अवतार जाण । संपले ऐसें पुराणीं वचन ।

परी भक्तांसि साक्षात देती दर्शन । रुप सगुण धरोनियां ॥३६॥

तेवीं तुकाराम गेलें वैकुंठासीं । हे लीला दाखविली जनासी ।

परी दर्शन होतसे भाविकांसी । साक्षी बहुतांसी हे आली ॥३७॥

निळोबा गोसांवी पिंपळनेरकर । आणिक बहिणाबाई गंगाधर ।

यांसि स्वप्नी येऊनि वैष्णववीर । अनुग्रह साचार दीधला ॥३८॥

तो लीलावतारी विश्वसखा । सद्‌गुरु आम्हांसि जोडला तुका ।

हृदस्थ सर्वदा राहोनि देखा । ग्रंथ पीठिका उभारिली ॥३९॥

अहो भक्तलीलामृत ग्रंथ सुंदर । हाचि पूर्णिमेचा निशाकर ।

भाविक चकोर लक्षूनि सत्वर । अमृत तुषार सेविती ॥४०॥

कुबुद्धि विकल्पि तस्करांस । नावडे याचा दिव्य प्रकाश ।

म्हणवोनि द्वेषें निंदिती यास । नाहीं विश्वास अंतरीं ॥४१॥

दुरिताचा अंकुर विकल्प जाण । तेणें नाडिलें बहुताकारणें ।

जरी पदरी सांचलें असले पुण्य । तरी विश्वास तेणें ठसावें ॥४२॥

भक्तलीलामृताचे भोक्ते । संतसज्जन प्रेमळ भक्‍त ।

जो अनाथ बंधु रुक्मिणीकांत । त्यांजवळ तिष्ठत सर्वदा ॥४३॥

बुद्धिमतीसि उन्मेष लहरी । हृदयस्थ बैसोनि देतसे हरी ।

महीपतीसि करोनि निमित्तधारी । ग्रंथ विस्तारी वाढविला ॥४४॥

स्वस्ति श्रीभक्‍तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत भाविकभक्‍त । चाळिसावा अध्याय रसाळ हा ॥२४५॥

अ० ४०॥ ओ० २४५॥अभंग ५४॥एवंसंख्या २९९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP