मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय २८

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


श्रीगणेशाय नमः ॥

नाहीं अंगी चातुर्य बळ । नव्हे बुध्दिमंत कवि कुशळ ।

म्हणवी संतांचा लडिवाळ । चिंतेनें काळ सारितो ॥१॥

नाहीं अक्षर वळलें शुध्द । छप्पन्न भाषा नानाविध ।

बोलतां नये गींर्वाण शब्द । बरळे अबध्द हे वाचा ॥२॥

क्षेत्रवासही नाहीं साचा । वस्तीकर कुग्रामींचा ।

आश्रय अचूक लेखकाचा । तोही साच नसेचि ॥३॥

शरीर आरोग्य नसेचि पाहें । क्षणक्षणा रोग उद्भवे ।

सर्व प्रकारें पांगुळ आहे । विठ्ठल माये जाणसी तूं ॥४॥

तुझा भरंवसा धरोनि मनें । ग्रंथासि प्रारंभ केला जाण ।

वागवोनी दीनाचा अभिमान । शेवट करणे श्रीहरी ॥५॥

प्रभंजनाच्या योगेकरून । डोले तृणाचें बुझावणें ।

त्याचें अंगीं कर्तेपण । स्वतंत्र कोठोन असेल ॥६॥

कां कळसुत्री हालवोनि दोरी । बाहुलें नाचवी नानापरीं ।

तेवी बैसोनि हृदयमंदिरीं । आठवण श्रीहरी देशील ॥७॥

तुझी कृपा नसतां निश्चित । तरी हे शब्द न मानिती संत ।

जैसें सुगंधविण कस्तुरीतें । कोण पुसतें बाजारीं ॥८॥

मयूर पिच्छासि वेगळाले । सर्वांगासि असती डोळे ।

तेवीं तुझें कृपेविण सकळ । शब्द निष्फळ भासती ॥९॥

यालागीं आपुल्या कृपावरें । भक्त चरित्रें वदवीं सविस्तर ।

जेणें श्रोतयाचें अंतर । प्रेम पाझरें ऎकतां ॥१०॥

मागिले अध्यायीं कथा सुंदर । सेवक होऊनि रुक्मिणीवर ।

हिंडोनिया घरोघर । उगविला उधार तुकयाचा ॥११॥

गांवकरियांची ऎकोनि मात । विस्मित होय प्रेमळ भक्त ।

म्हणे काय करितो पंढरीनाथ । हे मज निश्चित कळेना ॥१२॥

मग मूथ घालोनि बैलावर । तेथोनि निघे वैष्णव वीर ।

मार्गीं चालतां सप्रेमभर । करित गजर नामाचा ॥१३॥

नामरूपीं जाहले चित्त । म्हणोनि जडला देहातींत ।

तो मार्गी एक ठक आडवा येत । तुकयासि बोलत तेधवा ॥१४॥

त्याणे पितळेचि कडी घडोनि बरी । सोन्याचा मुलामा केला वरीं ।

तुकयासि दावी ते अवसरीं । म्हणे घ्याल तरी मी देतो ॥१५॥

ऎकोनि म्हणे भक्त प्रेमळ । इतुकें द्रव्य नाहीं जवळ ।

उधार उकळिला होता सकळ । तो काढोनि तत्काळ दाखविला ॥१६॥

मग ठक बोले वचन । आहे तें माझे आंगीं लावणें ।

राहिलें ते हळूच घेईन । तुम्हां कारणें जाणतों मी ॥१७॥

वचन ऎकोनि देखा । मोजोनियां तयांसि दीधला पैका ।

ठक गेला मार्गे आणिका । येतसे तुका घरासि ॥१८॥

चित्तीं संतोष मानीत पाहीं । म्हणे सावकारासि द्यावें कांहीं ।

धान्यासि जाहाली महागायी । खर्चासि नाहीं तें आलें ॥१९॥

कपट भाव कोणाचे मनीं । हें तो सर्वथा नेणे स्वप्नीं ।

जनार्दनचि भरला जनीं । निश्चय मनीं दृढ केला ॥२०॥

जैसा धर्मराज कुंतीसुते । त्रिभुवन धुंडोनि पाहतां त्यांतें ।

एकही नष्ट न दिसे त्यांते । तैसीच स्थित तुकयाची ॥२१॥

संतोष मानुनि निज अंतरीं । तुकाराम पातले घरीं ।

वृत्तांत कळतांच सत्वरी । आले घरीं लोक तेव्हां ॥२२॥

दावणीसि बांधूनि ढॊरें । तुका बैसे त्या समोर ।

काय आणिले दावी सत्वर । सावकार ऎसे बोलती ॥२३॥

म्हणे द्रव्य देवोनि म्यां सत्वरी । विकत सोनें घेतलें घरीं ।

हे तुम्ही घ्या कर्जावारी । खर्चासि घरीं कांहीं द्या ॥२४॥

ऎसें म्हणोनि भाविक भक्त । कडीं काढोनि त्यांसि दावित ।

देखोनियां परीक्षवंत । मग ते हांसत गदगदां ॥२५॥

सुलाखूनि दाविती ते वेळे । तों तयामाजी दिसे पितळ ।

सावकार पिटिती कपाळ । कांता हळहळ करी तेव्हां ॥२६॥

म्हणती मरमर पापिया । चित्तीं आठविसी पंढरीराया ।

त्याणें निरसिली तुझी माया । नको त्या निर्दया भजूं आतां ॥२७॥

पंडित म्हणोनि मति मूढा । हातीं धरोनि आणिला वेडा ।

कां परीस देऊनि घेतला खडा । विवेक रोकडा तुज नाहीं ॥२८॥

ठकाच्या विश्वासें साचार । आमुचें तुवां बुडविलेंस घर ।

कैसा चालविसी संसार । आम्हांसि साचार कळेना ॥२९॥

ऎसें बोलोनि त्या अवसरा । पिशुन गेले आपुल्या घरा ।

मंदिरीं चिंता करिती दारा । आतां या संसारा काय करूं ॥३०॥

दोघी कांता तुकयासि पाहीं । वडिलांचें नांव रखुमाबायी ।

धाकटी म्हणती अवलायी । उपनांव जिजायी दुसरें ॥३१॥

धाकटी अवली साचार । जाणे तार्किक विचार ।

म्हणे कैसा चालेल संसार । चिंतातुर मानसीं ॥३२॥

भ्रतारासि लागलें पिसें । भजन करितो रात्रंदिवस ।

धंदा करितां नयेचि यश । आटता यास काळ आला ॥३३॥

तरी आपुल्या नांवें देऊनि खत । भांडवल काढोनि द्यावें यातें ।

नफा मिळेल तो निश्चित । संसारातें लाविन मी ॥३४॥

ऎसें म्हणोनि ते अवसरीं । गेली सावकाराचें घरीं ।

म्हणे माझी पत असेल जरी । तरी द्रव्य पदरीं घालावें ॥३५॥

अवलायीचे बंधु धनवंत । यास्तव भीड पडली त्यांतें ।

वाणी म्हणे लागेल तें । न्यावें त्वरित जिजायी ॥३६॥

रौप्यमुद्रा दोन शत । घेऊनि तयासि दीधलें खत ।

जिजायी आली मंदिरांत । काय बोलत पतीतें ॥३७॥

म्यां तरी आपुल्या आंगावर । सावकाराचें फोडिलें घर ।

तुम्हीं व्यवसायांबरोबर । जावें दूर उदिमासी ॥३८॥

मीठ भरोनि तये क्षणीं । बालेघाट प्रांतीं चालिले वाणी ।

तुम्ही त्यांसवें जावोनी । आणा मेळवोनी द्रव्य कांहीं ॥३९॥

रौप्यमुद्रा दोन शत । तुकयापासीं तेव्हां देत ।

ते घेऊनि वैष्णव भक्त । निघे त्वरित त्यां सवें ॥४०॥

अवली तुकयासि सांगे जातां । भांडवल जतन करा आतां ।

अभिशाप येईल माझिया माथा । असें सर्वथा न करावें ॥४१॥

तुम्हीं लागलां हरिस्मरणीं । यास्तव पाते जन धरी कोणी ।

मग म्यां आपुल्या नांवें खत देउनी । कर्ज काढोनी आणिलें ॥४२॥

याचकांसि वांटाल भांडवल हें । तरी माझा स्वभाव विदित आहे ।

ऎसें बोलोनियां पाहे । कांता जाय घरासी ॥४३॥

असो तुका ते अवसरीं । मीठ भरोनि वृषभावरी ।

व्यवसायांच्या बरोबरी । गेला सत्वरी तेधवां ॥४४॥

बालेघात प्रांतीं ते वेळे । मीठ विकोनि भरला गूळ ।

शहरासि चालिले वाणी सकळ । भक्त प्रेमळ तयांसवें ॥४५॥

धुळींत मुक्ताफळ पडिलें जाण । कोण ओळखे त्याजकारणें ।

नातरी पितळा माजी कांचन । परीक्षकाविण कळेना ॥४६॥

पाषाणांत परीस खरा । कोण जाणे चमत्कारा ।

गारांमाजी सांपडे हिरा । वैष्णव वीर तेविं झालें ॥४७॥

नातरी कोकशास्त्राच्या पुस्तकांत । बांधिलें जैसें वेदांत ।

काय वन-सभेंत महापंडित । महत्त्वा विरहित ज्या रीतीं ॥४८॥

कां अमित मिळाले तस्कर । त्यांत धनवंत सावकार ।

नातरी जारिणींत साचार । सांपडे सुंदर पतिव्रता ॥४९॥

वेडियांत योगी महापुरुष । कां मद्यामध्यें अमृत जैसें ।

निंदकामाजी प्रेमळ दिसे । मान्य तयास कोण करी ॥५०॥

तेवीं असत्य व्यवसायांचा मेळा । त्यांत भक्तिज्ञान वैराग्य पुतळा ।

तुकयासि निंदिती वेळोवेळां । अनुताप कळा ज्यां नाहीं ॥५१॥

एकमेकासी बोलती देखा । आपुले संगतीसि आला तुका ।

व्यवहार करूंचि नेणे लटिका । मिळेल पैका कैशा रीतीं ॥५२॥

सांडोनि प्रपंच तळमळ । चित्तीं आठवे वैकुंठपाळ ।

भजन करितो सर्वकाळ । उठतें कपाळ आमुचें ॥५३॥

ऎशा रीतीं व्यवसायी । कुचीत करिती आपुले ठायीं ।

परी तुका तो देहींच विदेही । हर्ष शोक नाही आणुमात्र ॥५४॥

असो हें भाषण ये समयीं । शहरासि गेले व्यवसायी ।

तेथें गूळ विकूनि सर्वही । द्रव्य लवलाही घेतले ॥५५॥

तयांसवेंचि वैष्णवभक्त । आपुला माल विकिला तेथ ।

द्रव्य घेऊनियां समस्त । परतोनि त्वरित चालिले ॥५६॥

मार्गी चालतां ते अवसरी । व्यवसायासी उतरले बाजारीं ।

चरित्र वर्तलें ते अवसरीं । ते सादर चतुरीं परिसावें ॥५७॥

काष्ठाचा नांगर गळ्यांत । खांडश्मश्रु वाढविली बहुत ।

ब्राह्मण आला मालें मागत । करा साहित्य म्हणतसे ॥५८॥

शेटे सावकार म्हणती तया । उदंड येती मागावया ।

आम्हांपासी नाही द्यावया । जाय लवलाह्यां येथुनी ॥५९॥

कृपण बोलती ऎशारीतीं । कोणी चवल-पावला देती ।

हें तुकयानें देखोनि निश्चिती । तयाप्रती पुसतसे ॥६०॥

सांग आद्यंत वर्तमान । ऎकोनि बोले तो ब्राह्मण ।

पाटिलकीचें असतां वजन । टाइजीं हिरोन घेतले ॥६१॥

दिवाणांत लांच देऊनि सहज । बंदिखानीं घातलें मज ।

पंचाइतीं पाडिला उमज । त्यांणीं लाज जर रक्षिली ॥६२॥

राजा अविवेकी बहुत । मी ब्राह्मण दुर्बळ अनाथ ।

तीन शतें हरकी लाविली मातें । पन्नास तयातें दीधले ॥६३॥

बाकी राहिले यास्तव देख । कुटुंबासहित मागतों भीक ।

सवें प्यादा दीधला एक । हा तरी सुख पडो नेदीं ॥६४॥

विप्रवाणी ऎकोनि ऎसी । दया उपजली तुकयासी ।

मग अश्वासिले ब्राह्मणासि । चिंता मानसी करूं नका ॥६५॥

दोनशे पन्नास मुद्रा सत्वर । देऊनि तोषविला द्विजवर ।

पाहोनि अघटित विचार । वाणीं सर्वत्र हासंती ॥६६॥

म्हणे धडाचि कांट्यावरी घालिताहे । याच्या सोबतीसि राहूं नये ।

जिजायीस सांगतां पाहे । मोकलील धाय ते घरीं ॥६७॥

रांडा पोरांसि खावया नाहीं । धन वाटितो भलतेचि ठायीं ।

ऎसें म्हणोनि व्यवसायी । जाती सर्वही तेधवां ॥६८॥

विप्र कार्याचे निमित्ते । तेथें राहिला वैष्णव भक्त ।

प्यादिया हातीं निश्चित । द्रव्य दिवाणांत पाठविलें ॥६९॥

नापिक बोलावूनि विष्णुदासें । ब्राह्मणाचें तेथें उतरिलें केश ।

बोलावूनि त्याच्या कांतेस । स्वयंपाकास घातली ॥७०॥

पदरींची सामग्रीं देऊन । जेवविले दहा ब्राह्मण ।

उभयतां संतोष मनें । आशीर्वचन बोलती ॥७१॥

देवाधिदेव रुक्मिणीवर । तुज सांभाळो निरंतर ।

तूज ऎसा विष्णु भक्त उदार । पृथ्वीवर दिसेना ॥७२॥

बारा वर्षे मालें मागतां जाण । आम्हांसि न मिळें इतके धन ।

तुझें ईश्वर करो कल्याण । ऎसें तो ब्राह्मण बोलिला ॥७३॥

तुका आनंदयुक्त मने । सत्कर्मी लागलें धण ।

परीं घरीं अवलीयेचे भय दारुण । म्हणे काय जावोन सांगावे ॥७४॥

जाणोनि तुकयाचें अंतर । काय म्हणत सारंगधर ।

म्हणे नका मुद्दल साचार । यानें समग्र वेंचिलें ॥७५॥

व्यसवायी सांगतां जाऊन । अवली होईम क्रोधायमान ।

मग तुकयासि करील ताडण । सावकार ऋण मागतील ॥७६॥

याचा चुकवावया आघात । काय करितसे पंढरीनाथ ।

तुकयाचें रूप धरूनि त्वरित । रुपये देत सावकारा ॥७७॥

मुद्दल व्याज देऊनि त्वरित । मागोनि घेतलें खत ।

पांच होन अवलीतें । द्याजी म्हणत नेऊनी ॥७८॥

सावकार म्हणे ते अवसरीं । तुम्हीं नेऊनि द्यावें घरीं ।

देव म्हणे कोपेल मजवरी । भय अंतरीं वाटतें ॥७९॥

म्हणे बहुत दिवस जाऊनि पाहीं । कांहींच जोड केली नाहीं ।

रोखा आणि होन लवलाहीं । नेऊनि ये समयीं तुम्हीं द्या ॥८०॥

ऎसें म्हणोनि तिये क्षणीं । सत्वर गेला कैवल्यदानी ।

होन आणि खत घेऊनि वाणी । गेला सदनीं अवलीच्या ॥८१॥

सकळ वृत्तांत सांगितला । ते म्हणे तो कोठें गेला ।

सवेंचि म्हणे असेल बैसला । चित्तीं विठ्ठला आठवोनि ॥८२॥

ऎसें विंदान केलें देवें । परी कोणासि न कळेचि लाघव ।

मायामोहें भ्रमला जीव । कोणासि देव दिसेना ॥८३॥

कित्येक दिवस लोटतांचि देखा । घरासि आला वैष्णव तुका ।

जाहला वृत्तांत सांगती बायका । विचार निका कळेना ॥८४॥

वाणी सांगती गार्‍हाणें । नफा मुद्दल तुकयानें ।

याणें द्रव्याचें देऊनि दान । बंदिवान सोडविला ॥८५॥

एक म्हणती देवें वरिलें ऋण । एक म्हणती सत्य वचन ।

ढोंग करोनि जिजाईनें । लौकिक जाण राखिला ॥८६॥

अवली म्हणे कपटी काळा । याची सर्वथा न कळे लीला ।

वेड लाविलें भ्रताराला । नाहीं राहिला लौकिक ॥८७॥

वाणियांनीं सांगीतला वृत्तांत । हें जघन्य जाहलें लोकांत ।

भांडवल पुढें न देती ते । मागील वृत्तांत जाणोनी ॥८८॥

तों पुढें वरग पडिलें कठिण । दो पायल्यांची जाहली धारण ।

पर्जन्य निःशेष गेला तेणें । चार्‍याविण बैल मेले ॥८९॥

संसारदुःख बहुत जाण । पुढें देखिलें तुकयानें ।

तें श्रवण करितांचि प्रीतीनें । संकटें दारुण निरसती ॥९०॥

वाताहत होतांचि धन । लौकिकीं दिसे भाग्यहीन ।

जे राखीत होते सन्मान । स्वमुखें हेळण ते करिती ॥९१॥

कठीण काळ येताचि खरा । जनांत उडाला पातेरा ।

कोणी येऊं न देती घरा । दुःख अंतरां होय तेणें ॥९२॥

घरीं अन्न किंचित नसे । पोरांसि पडती उपवास ।

उसने कोणीच न दे त्यास । दुष्काळ बहुत देखोनी ॥९३॥

त्याची विपत्ती देखोनियां । कोठें जातसे मागावया ।

तंव श्रोते आशंकित होऊनियां । प्रश्न वक्तयाते करिती ॥९४॥

तुकयासि विरक्ति बाणलियावरी । तरीं कां जातसे घरोघरीं ।

ऎसा प्रश्न केला चतुरीं । तरी तेचि परी अवधारा ॥९५॥

माशी भक्षिल्या होत वमन । परी पित्त उसळें क्षण क्षण ॥

मग बोटें घालूनि काढितां जाण । अरोग तेणें होय काया ॥९६॥

तैशाच रीतीं साधक जन । संसारासि विटविती मन ।

लोकनिंदा होय जेणें । तेचिकारण योजिती ॥९७॥

मागें एकदोन वेळां निश्चित । संकटीं रक्षिलें पंढरीनाथें ।

ते कीर्ती प्रगटतां जनांत । म्हणतील संत मजलागीं ॥९८॥

ते निरसावयालागीं जाण । लोक निंद्य व्हावे आपण ।

सर्व पदार्थी विटवावें मन । हिंडे म्हणोन घरोघरीं ॥९९॥

सोइरे धाइरे मित्र आप्त । तयांसि म्हणे वैष्णव भक्त ।

मुलें माणसें उपवासि मरत । उपाय त्वरित करावा ॥१००॥

पिशुन म्हणती ते अवसरीं । दुष्काळ पडिला असे भारी ।

ऎसेंचि जाहलें घरोघरीं । किती विस्तारीं सांगावें ॥१०१॥

सावकारापासी मागतां ऋण । ते म्हणती ऊठ येथुन ।

आधीं घेतलें तें दे आणून । मग घेऊन जा पुढतीं ॥२॥

एक तुकयासि पाहती दृष्टी । कपाळासि घालिती आंठी ।

म्हणती आपल्या संसाराला लावोनि कांटी । आमुच्या पाठीं लागसी कां ॥३॥

ऊठ तेथुनि चांडाळा । आम्हासि आणिला कंटाळा ।

हातीं धरोनि ते वेळा । भक्त प्रेमळा भवंडिती ॥४॥

मग इष्ट मित्र सोइरे सज्जन । काकुळती येत त्यांजकारणें ।

कांहीं कर्ज काढोनि देणें । सत्वर वारीन तुमचें ॥५॥

दुष्काळीं वांचवाल आतां । तरी तुम्हींच आमची माता पिता ।

करुणा दाविली समस्तां । परी दया सर्वथा त्यांसि नये ॥६॥

ऎकोनि लोकांची दुरुत्तरें । लज्जित तुकयाचें अंतर ।

मग एकांति जाऊनि साचार । म्हणे कैसा विचार करूं आतां ॥७॥

पांडुरंग आणिता ध्यानांत । तों ऎवज आठवला मनांत ।

घरीं गोण्या ताट मूठ होतें । तें विकिलें त्वरित वाणियासी ॥८॥

त्याचें आठ शेर धान्य । आलें तेव्हां महा प्रयत्नें ।

करोनियां पातळ तरण । कुटुंब रक्षण करीतसे ॥९॥

तेंही धान्य तेव्हां सरलें । इष्टमित्रीं उपेक्षिलें ।

न जावेंचि ऎसें जाहलें । कोठे वहिलें सर्वथा ॥११०॥

जातां धनवंतांच्या घरां । ते उठवोनि लाविती सत्वरा ।

लौकिकीं उडाला पातेरा । संसार मातेरा जाहला कीं ॥११॥

जनांत पावला अपमान । कंटाळले सोइरे सज्जन ।

महाकाळ पडिला पूर्ण । जाहली धारण शेराची ॥१२॥

तेंही न मिळेचि कोणाप्रती । प्राणी मृत्युसदनासि जाती ।

बहुत आटिलें तुकयाप्रती । म्हणे कैसी गती करूं आतां ॥१३॥

कलियुगी अन्नमय प्राण । ऎसें बोलती सर्वत्र जन ।

दो चौंदिवशीं मिळे तरण । भाजीपान भक्षिती ॥१४॥

तुकयाची ज्येष्ठ कांता । निवर्तली अन्न अन्न करितां ।

तेणें लज्जा वाटे चित्ता । म्हणे संसार वृथा गेला कीं ॥१५॥

सोयरे धायरे ग्रामवासी । काय बोलती तुकयासी ।

आतां सावध होऊनि मानसी । सांगतों तुजसी तें ऎक ॥१६॥

तूं सर्वकाळ विठ्ठलाचें । सप्रेम नाम जपतोसि वाचें ।

त्यास्तव निर्मूळ संसाराचें । होतसे साचे जाण पां ॥१७॥

आमुचें नायकसी साचार । म्हणवोनि घात जाहला थोर ।

पुढेंही देखसी चरित्र । दुष्टोत्तरें बोलती ॥१८॥

जैसें खांडुक झालें हाडावर । त्यावरी फासण्याचे मार ।

परी तुका शांतीचा पूर्ण सागर । लोकांसी उत्तर बोलतसे ॥१९॥

होणार तें न चुकेचि सर्वथा । व्यर्थ कासया वाणी वेंचितां ।

बरें जे न भजती पंढरीनाथा । ते काय मरतां वांचती ॥१२०॥

महादुष्काळीं अन्नाविण । प्राणी उदंड पावले मरण ।

ते काय करिती हरिस्मरण । निमित्ताकारणें कोणत्या ॥२१॥

ऎशा रीतीं वैष्णववीर । तयांसि दीधलें प्रत्युत्तर ।

पुढें वर्तलें काय चरित्र । तें ऎका सादर निजकर्णी ॥२२॥

तुकयाचा ज्येष्ठ पुत्र जाण । संतोबा त्याचें नामाभिदान ।

त्याचे ठायीं प्रीती गहन । तो मृत्यूसदन पावला ॥२३॥

प्रपंच दुःख महाभारी । ज्याचेनि घेत सुखारी ।

तो निमोनि गेलिया निर्ध्दारी । खेद अंतरीं बहु झाला ॥२४॥

कांता पुत्र जाहलीं शांत । तेणें दुःखित वैष्णवभक्त ।

म्हणे जळो या प्रपंचाची मात । त्याग समस्त करावा ॥२५॥

प्राणियासि संसारी बैसतां आंच । हें महामूळ अनुतापाचें ।

संत सज्जन ते विषयींचे । दृष्टांत साचे अवधारा ॥२६॥

हालाहल घेतांचि शंकराचें । दहन होय सर्वांगाचें ।

येव्हडी तयासि बैसतां आंच । मग श्रीरामाचें भजन करी ॥२७॥

त्रितापें प्राणी पोळला जरी । तरी अनुताप होय अंतरीं ।

पांडवां विपत्ति नानापरी । यास्तव श्रीहरि चित्तीं वसे ॥२८॥

हिरण्यकशिपें नानारीतीं । छळिलें जेव्हां प्रल्हादाप्रती ।

मग अनुतापें हांक मारितां निश्चिती । खांबांत श्रीपती प्रगटला ॥२९॥

असो हे दृष्टांत अनेक । प्राणी भोगिती त्रिविध नरक ।

मग पश्चात्तापें करूनि देख । मोक्षसुख पावती ॥१३०॥

तुकयासि जाहली तैसी गती । संसारीं पाहिली नाना विपत्ती ।

ते सकळित सांगतों यथामती । तरी सादर श्रोती परिसिजे ॥३१॥

तेरावें वर्षी पितयानें । संसार गळा घातला जाण ।

तेथें दक्षता येतां दिसोन । समाधान वडिलासी ॥३२॥

सतरावे वर्षी तत्त्वतां । क्रमोनि गेलीं मातापिता ।

वडील बंधूची कांता । तेही अवचितां निमालीं ॥३३॥

अठरावे वर्षी जाणा । सावजी गेला तीर्थाटणा ।

त्याच्या वियोगे करूनि जाणा । शोक निज मना वाटत ॥३४॥

विसव्यांत पुत्रकांता स्वयमेव । देखोनि संसारीं धरिली हांव ।

येथूनि मन विटवावें । मग देवाधिदेवें काय केलें ॥३५॥

एकविसाव्यांत विपरीत काळ । तुकयासि पातला तत्काळ ।

तेव्हां निघतांचि दिवाळें । सोइरे सकळ हांसती ॥३६॥

अज्ञान प्रकृती ते स्त्री निश्चित । तेही निमाली अन्नअन्न करीत ।

महामोह पुत्र समस्त । लौकिकीं विपरीत हे वार्ता ॥३७॥

पूर्वार्ध संपलें ऎशा रीतीं । दुःखें देखिलीं नानारीतीं ।

संसाराची आस्था होती । तेही भ्रांती निरसली ॥३८॥

अविद्या रात्रीं सरोनि जातां । ज्ञानसूर्य प्रकटे अवचितां ।

आनंद सर्वथा न समाये ॥३९॥

समुद्र मंथितां तये वेळां । विबुधांसि श्रम जाहला ।

शेवटीं अमृतां पाहतां डोळां । आनंदला शचीनाथ ॥१४०॥

कीं करितां दधि कडसणी । कष्ट वाटती तये क्षणीं ।

शेवटीं नवनींत पाहतां नयनीं । घर चारिणी संतोषे ॥४१॥

नातरी कृषिकर्माची खटपट । ते तरी बहुतचि दिसती कष्ट ।

शेवटी पीक येतां घनदाट । चित्तीं कुणबट संतोषती ॥४२॥

कां इक्षुदंड गाळितां साचार । तयासि आयास लागती फार ।

शेवटी रूपासि येतां साकर । चवी खाणार जाणती ॥४३॥

तैसें प्रथमारंभीं साधकासि दुःख । परी परीणामीं तें अनुपम सुख ।

तें अनुभवें जाणती सम्यक । ज्यांणीं विवेक जागविला ॥४४॥

असोत आतां भाषणें बहुत । दृष्टांत देणें कविचे मत ।

आतां अनुसंधानीं लावूनि चित्त । ऎका निज भक्त भाविकहो ॥४५॥

दारा पुत्र हातांचि नास । अनुताप जाहला तुकयास ।

मग एकांतीं जाऊनि उदास । विचार मनास करितसे ॥४६॥

म्हणे संसाराची भरोवरि । करो पाहील आजवरी ।

तो अधिकचि दुःखाच्या परी । त्या कोठवरी आठवूं ॥४७॥

कोळसा उगाळितांचि निश्चित । तो अधिकचि काळें दिसे आंत ।

तेवीं संसारीं दुःखाचें पर्वत । अनुभवें प्रचीत आली कीं ॥४८॥

कीं ढेकणांचे बाजेवरी । निद्रा निवांत लागेल जरी ।

तरीच सौख्य या संसारीं । स्वप्नदृष्टीं देखिजे ॥४९॥

नातरी बचनागाचें महुरपणा । प्रथमारंभींच पाहोनि घेणें ।

परी परिणामीं न टळेचि मरण । सत्य जाण त्रिवाचा ॥१५०॥

संसारीं असतां देव जोडे । ऎसा निश्चय दृढ घडे ।

तरी शुकदेव कां होऊनि वेडे । बैसती कडेकपाटीं ॥५१॥

माझें आयुष्य तो किती । तेही वेंचिलें संसार भ्रांती ।

आतां उरल्याकाळीं निश्चिती । रुक्मिणीपती भजावा ॥५२॥

ऎसा निश्चय करोनि चित्तीं । जातसे भांबनाथ पर्वतीं ।

जेवीं पतिव्रता निघतां सती । त्याग करिती सर्वस्वे ॥५३॥

मायबाप पुत्र वित्त । नाठवी जैसे मनांत ।

भेटावया प्राणनाथ । उडी अग्नींत घालितसे ॥५४॥

तैशाच परी वैष्णव तुका । पर्वतावरी जावोनि देखा ।

अंतरीं आठवोनि वैकुंठनायका । करुणा अनेका भाकित ॥५५॥

ध्यानासि जाणोनि पांडुरंग मूर्ती । लाविलीं दोन्हीं नेत्र पातीं ।

म्हणे देवाधिदेवा रुक्मिणींपती । माझी विनंती अवधारीं ॥५६॥

कैसें करावें तुझें ध्यान । हें मी सर्वथा कांहींच नेणें ।

कैसें पहावें तुज कारणें । हें मज दाखवणें याचकासी ॥५७॥

कैसी करावी तुझी स्तुती । सेवा करूं निश्चिती ।

कोणत्या भावें रुक्मिणीपती । भेटसी मजप्रती सांग ॥५८॥

गीतीं गाऊं कैशा रीतीं । ध्यानासि कैसी आणावी मुर्ती ।

जनांत रहावें कवणें स्थितीं । हें मजप्रती सांग तूं ॥५९॥

तूं तरी अलक्ष्य अगोचर । तरी कैसा लक्षासि आणूं मी पामर ।

यमधर्म वरुण कुबेर । तयांसि पार नाकळें तुझा ॥१६०॥

चंद्र सूर्य तारागण निश्चिती । भ्रमणा करिती तुज भोंवतीं ।

इंद्रादि देव पार नेणती । तेथें मी किती मशक ॥६१॥

ब्रह्मा तुझें पोटींचे बाळ । शोधीत गेला नाभि कमळ ।

परी त्यासि सर्वथा अंत न कळे । मग स्तवीत तत्काळ तुज देवा ॥६२॥

तुझ्या दर्शनाची धरूनि आर्त्ती । स्मरण करिती शंकरपार्वती ।

तयांसि तूं दुर्लभ वैकुंठपती । तेथे माझी आर्ती केविं पुरे ॥६३॥

ऎशा कल्पना आणोनि चित्तीं । मनीं आठविली पांडुरंग मूर्ती ।

देखोनि त्याची सप्रेम भक्ती । करी श्रीपती काय तेव्हां ॥६४॥

सप्त दिवसापर्यंत जाण । नेत्र झांकिले एकाग्र मनें ।

नसेचि फळ अथवा जीवन । नामस्मरण करितसे ॥६५॥

शरीर वाचा एकाग्र मन । करुणा भाकी निजप्रीतीनें।

तो कौतुक दावी रुक्मिणीरमण । तें परीसा सज्जन भाविकहो ॥६६॥

कृष्णवर्ण अति विशाळ । सर्परूप धरूनि घननीळ ।

तुकया भोंवता ते वेळ । महाकाळ फिरे जैसा ॥६७॥

विशाळ फडी उभारोनी । धुधुक्कार टाकी तये क्षणी ।

तुका भय न धरीच मनीं । नेत्र झांकोनी तटस्थ ॥६८॥

तो आकाशवाणी आकस्मात् । तुकयासि बोले निज गुह्यार्थ ।

महासर्प होऊनियां येथ । रुक्मिणीकांत आले कीं ॥६९॥

तरी तूं नेत्र उघडोनि आतां । दृष्टीसीं पाहे प्रेमळ भक्ता ।

चित्तीं भय न धरीं सर्वथा । ऎसी वार्ता ऎकिली ॥१७०॥

ऎसी वार्ता ऎकोनि निश्चित । चित्तीं म्हणतसे प्रेमळ भक्त ।

सर्परूप धरिलें भगवंतें । मी न पाहें निश्चित त्या लागीं ॥७१॥

जनीं भरला जनार्दन । ऎसें बोलती श्रुति पुराण ।

विश्व देखती अवघे जन । ते कैसेनि तरले म्हणावे ॥७२॥

जळ अवघेंचि असे एक । परी चातक न घेती भूमीचें उदक ।

तेंवीं मी पांडुरंग उपासक । रूपें अनेक न पाहें ॥७३॥

जें ध्यान वर्णिलें श्रुतींपुराणीं । संतीं साठविलें हृदय भुवनीं ।

तैसा होईल कैवल्यदानी । पाहेन नयनीं मग मी तया ॥७४॥

ऎसा अंतर्भाव तुकयाचा । जाणोनि नाथ वैकुंठींचा ।

बाहेर प्रगट होय साचा । प्रेम भक्तीचा बांधला जो ॥७५॥

तत्काळ चतुर्भुज घनःश्याम । शंख चक्र गदा पद्म ।

निज भक्तांचे देखोनि प्रेम । तो आत्माराज प्रगटला ॥७६॥

तुका उघडी नेत्र पातीं । तों पुढें उभा रुक्मिणीपती ।

दिव्य कुंडले कानीं तळपती । मकराकृती सुढाळ ॥७७॥

तो देवाधिदेव पंढरीरायें । तुका उचलोनि घेतला कडिये ।

जैसी तान्हयापासीं निज माये । संबोखित आहे निज प्रीतीं ॥७८॥

म्हणे तूं माझा लडिवाळ । आतां उघडोनि पाहें डोळे ।

तुज न विसंबे सर्वकाळ । ऎसें घननीळ बोलिले ॥७९॥

तुकयाची विदेह स्थित । मागुतीं जाहला समाधिस्थ ।

मग सावध करि रुक्मिणीकांत । म्हणे पाहे निश्चित मजकडे ॥१८०॥

मग नेत्र उघडोनि ते समयीं । पाहे तों सगुण शेषशायी ।

पहिल्यापरी विशेष कांहीं । लाभ ये ठायीं देखिला ॥८१॥

अलक्ष्य चिंतित होता कोडें । त्याहूनि विशेष गुण रूपडे ।

तुका बैसोनि वाडें-कोडॆं । निज निवाडें पाहत ॥८२॥

ऎका मागील अनुसंधान । संसारी उदास होऊनि जाण ।

तुकयानें सेविलें अरण्य । न कळे ठिकाण कोणासी ॥८३॥

त्याचा धाकटा सहोदर । कान्हया नाव त्या साचार ।

तो गिरिगव्हरें थोर । धुंडीत साचार अहर्निशीं ॥८४॥

चित्तीं निश्चय केला पूर्ण । होईल तुकयाचे दर्शन ।

तरीच सेवीन मी अन्न । निश्चय पूर्ण हा केला ॥८५॥

श्रीरामाच्या वियोगे करून । भरतें मांडिलें निर्वाण ।

तैसा कान्हयाचा निश्चय पूर्ण । मजकारणें भासत ॥८६॥

अघोर वन महापर्वत । धुंडिले सप्त दिवसपर्यंत ।

मग भांबनाथासि अकस्मात । कान्हया येत तेधवां ॥८७॥

तों देव भक्त दोघेजण । पाहूनि जाहलें समाधान ।

देहींच विदेही होउन । तन्मय पूर्ण तो झाला ॥८८॥

आयास न करितां साचार । दृष्टीसीं पाहीला रुक्मिणीवर ।

झळकत दिव्य पीतांबर । मकराकार कुंडलें ॥८९॥

मुगुटीं फांकती रत्न किरळा । तेणे वासरमणी लोपोनि गेला ।

कौस्तुभ वैजयंती रुळे गळां । तुका घेतला कडियेवरी ॥१९०॥

देवभक्तांची जाहली मिळणी । कान्हया देखे नेत्र भरोनि ।

मग साष्टांग दंडवत घातलें धरणीं । वाहती नयनीं अश्रुपात ॥९१॥

तों तुकयासि म्हणे करुणाकर । इच्छा असेल तो माग वर ।

ऎकोनि म्हणे भक्त चतुर । तुमचा विसर न व्हावा ॥९२॥

माता न विसंबे तान्हयासी । कीं हरिणी जैसी पाडसासी ।

तैशाच रीतीं हृषीकेशी । मज दीनासी सांभाळी ॥९३॥

यावरी म्हणे जगज्जीवन । तुम्हांसाठीं मज रूपासि येणें ।

युगायुगीं अवतार घेणें । अन्य कारण काय असें ॥९४॥

मी पुंडलिकाचियेसाठीं । उभा राहिलों भीमातटीं ।

भाविक भक्तांसि देतसे भेटी । करद्वय कटीं ठेविलें ॥९५॥

तुझा पुर्वज विश्वभंर । त्याणें माझी भक्ति केली फार ।

मग तयासि देऊनि वर । देहूसि साचार राहिलों ॥९६॥

ऎसें बोलतां शेषशायी । तुका सत्वर लागला पायीं ।

कान्हया म्हणे ते समयीं । धन्य नवायी अगाध ॥९७॥

मग उजळोनि मंगळारती । ओवाळिला रुक्मिणीपती ।

पुढिले अध्यायीं रसोत्पत्ती । सादर संतीं परिसिजे ॥९८॥

ऎकतां संतांचे चरित्र । तयासि भेटेल राजीव नेत्र ।

सात्विक बुध्दि होऊनि पवित्र । आत्मवत जगत्र भासेल कीं ॥९९॥

तुकयाची संसार स्थिती । सप्रेम भावें गाती ऎकती ।

तयांसि तुष्टोनि रुक्मिणीपती । संसार विपत्ती होऊं नेदी ॥२००॥

जैसी तैसी आर्षवाणी । संत सादर ऎकती श्रवणीं ।

जेवीं बाळक बोले बोबडे वचनी । तेंचि पडताळोनी पुसे माता ॥२०१॥

तैशा रीतीं मी अज्ञान । न्युन अधिक कांहींच नेणें ।

परी तुम्हीं आपुल्या कृपादानें । सरतीं वचनें करावीं ॥२॥

बुध्दीमतींसि उन्मेष लहरी । तुम्ही देतसां सर्वोपरी ।

महीपतीसि करूनि निमित्तधारी । ग्रंथ विस्तारीं वाढवितां ॥३॥

स्वस्तिश्री भक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परीसोत वैष्णवभक्त । अठ्ठाविसावा अध्याय रसाळ हा ॥२०४॥ अ० ॥ २८ ओव्या ॥ २०४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP