मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय ३५

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


श्रीगणेशाय नमः ।

अनाथबंधु नाम तुझें श्रीहरी । हे सत्यचि वाटे मज अंतरी ।

पाय जोडोनि विटेवरी । भीमातीरीं उभा आससीं ॥१॥

ठाण साजिरें सुकुमार । जघनीं ठेविले दोन्ही कर ।

ऐसें ध्यान दिगंबर । पाहतांचि विरे देहभाव ॥२॥

मूर्ति सुकुमार साजिरी । बुका उधळिला असे वरी ।

दृष्टि ठेविली नासाग्रीं । टोपी शिरीं विराजत ॥३॥

भाविक भक्‍त येती भेटी । ते तुज सप्रेम धरिती पोटी ।

तुळसीहार घालिती कंठीं । इतुके न संतुष्टी तूं देवा ॥४॥

नाना पातकी चोर । ब्रह्मद्वेषीं गोहत्यार ।

त्यांचा दर्शनेचि होय उद्धार । दीधला वर पुंडलिका ॥५॥

वैकुंठासि जावया निर्धारी । साधका सायास पडती भारी ।

म्हणवोनि मृत्युलोकांवरी । क्षेत्र पंढरी वसविली ॥६॥

तिहीं लोकींचीं नाना तीर्थे । मध्यान्हीं चंद्रभागेसि येत ।

यास्तव विमानीं बैसोनि नित्य। विबुध येत स्नानासी ॥७॥

ऐसा अनुपम क्षेत्रमहिमा । आणिक द्यावयासि नाहीं उपमा ।

मज ग्रंथनिरुपणीं देईं प्रेमा । आत्मारामा जगद्‌गुरु ॥८॥

आयतीच घडोनिअयं ओवी । माझ्या हृदयीं ठेविसी बरवी ।

ते मी पात्रावरी लिहीं । अटक कांहीं पडेना ॥९॥

तूं आपल्या दासांचीं चरित्रें । स्वयें वदविसी राजीवनेत्र ।

निमित्तासि मज केलें पात्र । परी अवघें सूत्र तुझ्या हातीं ॥१०॥

मागिल्या अध्यायीं कथा कायी । तुकाराम गेले लोहगांवीं ।

कीर्तन करोनि ते ठायीं । लोक सर्वही वेधले ॥११॥

बहुत प्रयत्‍नें एक मास । राहविले त्यांनीं विष्णुदास ।

रात्रंदिवस कीर्तन-घोष । परी उबग कोणास न वाटे ॥१२॥

तुका तो सर्वदा निराश चित्तीं । सारिखीं जयासि सोनें माती ।

ब्राह्मण संतर्पण लोक करिती । यथाशक्‍ती आपुलिया ॥१३॥

धर्म स्थापना राखावया जगीं । संत अवतरले कलियुगीं ।

पाप पुण्य नलगेचि अंगीं । सप्रेम रंगी रंगले ॥१४॥

तेथें एक विधवा म्हातारी ब्राह्मणीन । तुकोबासि विनवी कर जोडून ।

माझे घरीं करोनि भोजन । करावें कीर्तन ये ठायीं ॥१५॥

देखोनि तिचा सप्रेम भाव । अवश्य म्हणे भक्‍त वैष्णव ।

ते म्हणे साहित्य करीन बरवें । मग ते दिनीं यावे निश्चित ॥१६॥

मग तिणें करोनि मोलमजुरी । दाहा ब्राह्मणाचें साहित्य करी ।

तों विघ्न वोढवलें ते अवसरीं । तें सादर चतुरीं परिसावें ॥१७॥

शेजारियाचा वाडा निश्चित । तेथें बाहेर भींतीसीं खोपट होतें ।

पर्जन पडतांचि बहुत । जाहली भिंत पडावया ॥१८॥

मग तुकयापासीं येऊनि ब्राह्मणी। रुदन करीत तये क्षणीं ।

म्हणे भिंत पडेल आजिचे दिनीं । कैसी करणी करुं आतां ॥१९॥

तुमच्या भोजना निमित्त । घरीं केलें सर्व साहित्य ।

तुका तिजला अभय देत । म्हणे चित्त स्वस्थ असों दे ॥२०॥

आम्ही जेविल्या वांचोन याहीं । भिंत सर्वथा पडत नाहीं ।

विघ्न निरसील विठाबायी । संदेह नाहीं सर्वथा ॥२१॥

गांवींचें लोक पाहावयासि येत । भिंत लवंडली परी न पडे सत्य ।

देखोनियांते आश्चर्य करित । नवल अद्भुत देखोनी ॥२२॥

चार दिवस लोटलिया करी । ब्राह्मणी स्वहस्तें स्वयंपाक करी।

मग तुकयासि आणूनि मंदिरीं । सर्वोपचारी पूजिलें ॥२३॥

ब्राह्मणां समवेत वैष्णवभक्‍त । सद्भावें जेऊनि जाहले तृप्त ।

मग ब्राह्मणीसि तुका म्हणत । जेवुनि त्वरित घेयीं कां ॥२४॥

तिचें भोजन झालियावरी । वास्तभाव काढविली बाहेरी ।

मंदिरींहूनि निघतां सत्वरी । तों भिंत माघारीं रिचवत ॥२५॥

मग गांवकरीयांस सांगोन । तीस दुसरें घर देवविलें जाण ।

ते ठायीं रात्रीं केलें कीर्तन । प्रेमें करोन तेधवां ॥२६॥

संत जाती ज्याचें घरीं । त्याची विघ्नें पळती दुरी ।

सुदर्शन घेऊनि श्रीहरी । नानापरी रक्षीतसे ॥२७॥

एक मास लोटतांचि तेथें । सत्वर निघे वैष्णवभक्त ।

जेथें मान्यता वाढली बहुत । तरी तेथें विरक्त न राहती ॥२८॥

तुकयाची सत्कीर्ति थोर । दिवसंदिवस वाढली फार ।

जैसा शुक्लपक्षीचा चंद्र । होतसे थोर तेजस्वी ॥२९॥

चांदणें देखोनि प्रकाशमान । संतुष्ट होती इतर जन ।

परी तस्कराचें संतापे मन । त्यांज कारणें असह्य ॥३०॥

तैसी तुकयाची सत्कीर्ती । ऐकोनि भाविकांसि विश्रांती ।

निंदक कुटिळ जे दुर्मती । ते संतापती मनांत ॥३१॥

विद्या वय रुप जाण । याति कुळाचा अभिमान ।

त्यास नावडे संत वचन । जैसें पयःपान ज्वरितासी ॥३२॥

एक रामेश्वर भट ब्राह्मण । वाघोलींत असतसे जाण ।

त्यासि चहूं शास्त्रांचें अध्ययन । राजमान्य असे तो ॥३३॥

त्याणें तुकयाची सत्कीर्ति पूर्ण । परस्परें केली श्रवण ।

ऐकोनि द्वेष उपजला मनें । म्हणे पाखंड पूर्ण माजविलें ॥३४॥

यासि उपाय योजावा निका । देशधडी करावा तुका ।

त्याचा अपमान होईल देखा । तैसेंच करुं कां ये समयीं ॥३५॥

ऐसें म्हणवोनियां मनांत । भीड खर्चिली दिवाणांत ।

म्हणे तुका शूद्र जातीचा निश्चित । आणि श्रुति मथितार्थ बोलतो ॥३६॥

हरि कीर्तन करोनि तेणें । भाविक लोकांसि घातलें मोहन ।

त्यासि नमस्कार करिती ब्राह्मण । हें आम्हांकारणें अश्लाघ्य ॥३७॥

सकळ धर्म बुडवोनि निश्चित । नाममहिमा बोले अद्भुत ।

जनांत स्थापिला भक्तिपंथ । पाखंड मत हे दिसे ॥३८॥

ऐसें सांगतां रामेश्वरीं । चित्तीं क्षोभला ग्रामाधिकारी ।

मग देहूच्या पाटिलासि ताकीद करी । कीं तुक्यासि बाहेरी दवडावा ॥३९॥

चिठ्ठी देखोनि ग्रामवासी । दाखविते जाहले तुकयासी ।

मग एक अभंग त्या समयासी । करुणारसीं बोलिले ॥४०॥

आतां आम्हीं काय करावें । कवण्या देशांतरा जावें ।

गांवांत वस्तीसि राहावें । आश्रय देवें न दिला ॥४१॥

कोपले पाटील गांविचे लोक । आतां कोण आम्हांसि घालील भीक ।

यांच्या संगतीचें कायसें सुख । वैकुंठनायक शोधावा ॥४२॥

ऐसें म्हणवोनि वैष्णव वीर । विठ्ठल नामाचा करोनि गजर ।

म्हणे वाघोलीसि जावोनि सत्वर । रामेश्वर पाहावा ॥४३॥

ऐसें म्हणवोनि प्रेमळ भक्त । तैसाचि निघे अति त्वरित ।

रामेश्वर बैसले स्नानसंध्येंत । तयांसि दंडवत घातलें ॥४४॥

सप्रेम नामाच्या गजरें जाण । ते स्थळीं मांडिलें हरिकीर्तन ।

कवित्व बोले प्रसाद वचन । संकोच मनीं न धरितां ॥४५॥

यावरि रामेश्वर काय बोलत । तूं तरी यातीचा शूद्र निश्चित ।

कवित्व बोलसी कीर्तनांत । त्यांत अर्थ उमटत श्रुतीचे ॥४६॥

अधिकार नसतां बोलसी कैसें । शास्त्रविरुद्ध आम्हांसि दिसे ।

तरी वक्तया आणि श्रोतयांस । रौरव असे यातना ॥४७॥

तरी आजपासूनि हे कविता । तुवां न बोलावी सर्वथा ।

ऐसी ऐकोनियां वार्ता । वैष्णवभक्ता संतोष ॥४८॥

मनांत म्हणे वैष्णवभक्त । मज आज्ञा केली पंढीरीनाथें ।

म्हणोनि वल्गना केली बहुत । खर्चिली व्यर्थ हे वाणी ॥४९॥

मग रामेश्वरासि बोले पुढती । तुम्ही ब्राह्मण ईश्वर मूर्ती ।

आज्ञा केली जे मजप्रती । तरी न बोले पुढती सर्वथा ॥५०॥

तुम्हीं आज्ञा केली जाण । तरी आतां कवित्व न करीं लेखन ।

परी मागें जाहलें जें निर्माण । तरी वाट कोण तयाची ॥५१॥

ऐसें पुसतां वैष्णवभक्त । मग रामेश्वर उत्तर देत ।

लिहिलें कवित्व आपुल्या हातें । बुडवीं उदकांत नेउनी ॥५२॥

अवश्य म्हणे ते अवसरीं । तुमची आज्ञा वंदिली शिरीं ।

मग देहूसि येऊनि सत्वरी । देउळा भीतरीं प्रवेशे ॥५३॥

पांडुरंग मूर्तीस देखोन । अश्रुपातें भरलें लोचन।

साष्टांग घातलें लोटांगन । प्रेमें करुन तेधवां ॥५४॥

मग जोडोनियां दोन्ही कर । उभा श्रीमूर्ती समोर ।

म्हणे सर्व कर्ता रुक्मिणीवर । मी तरी पामर मूढमती ॥५५॥

तुझ्या आज्ञेनें विठाबायी । अबद्ध वांकुडें वदलों कांहीं ।

आतां उदकांत बुडवावें तेंही । शेषशायी तुझी इच्छा ॥५६॥

ऐसें म्हणवोनि प्रेमळ भक्त । लिहिल्या वह्या घेतल्या समस्त ।

मग इंद्रायणीच्या डोहांत । नेऊन बुडवित स्वहस्तें ॥५७॥

वस्त्रांत गांठोडें बांधोनि जाण । त्यामाजीं घातले पाषाण ।
विठ्ठलनामें करुनि गर्जन । देतसे सोडोन उदकांत ॥५८॥

भाविक प्रेमळ जे निश्चितीं । परम हळहळ करिती चित्तीं ।

कुटिळ मान तुकविती । संतोष मानिती चित्तांत ॥५९॥

म्हणती कवितां करोनि जगी । महंती आणिली आपुले आंगी ।

परी ते सर्वथा न टिकेचि जगीं । रंग पतंगी उडाला ॥६०॥

विद्वान ब्राह्मण रामेश्वर खरा । जैसा अप सूर्यचि दुसरा ।

त्यानें असत्याचा मोडिला थारा । आमुच्या अंतरा सुख वाटे ॥६१॥

जैसें जैमिनीनें भारत केलें । तें द्वैपायनें संपूर्ण बुडविलें ।

कीं जैनमत उदकांत सोडिलें । शंकराचार्ये जैशा रीतीं ॥६२॥

जैमिनीनें कवित्वांत निश्चित । एक अश्वमेध राखिला ग्रंथ ।

आणि अमरकोश जैन मत । आचार्य ठेवित प्रीतीनें ॥६३॥

आणि तुकयाचें कांहींच राखिलें नाहीं । अवघ्याचि वह्या बुडविल्या डोही ।

ऐसें कुटिळ बोलती सर्वही । विष्णुमहिमा जीवीं न कळतां ॥६४॥

तुक्याचें तों संतोष चित्त । असे हर्ष शोकविरहित ।

म्हणे भगवत्सत्ता प्रमाण येथ । मी अतिशय व्यर्थ कां करुं ॥६५॥

ऐसे म्हणवोनि चित्तास । सप्रेम भजन करितसे ।

उदकांत वह्या बुडविल्या त्यास । पांच दिवस लोटले ॥६६॥

तंव कुटिळ ब्राह्मण आणिक याती । मिळोनि तुकयापासीं येती ।

नाना दुरुत्तर तयासि बोलती । तीं ऐकोनि भक्‍त भाविकहो ॥६७॥

तुकयासि म्हणती ते समयी । तुवां मागें खतें घातलीं डोहीं ।

तेव्हां प्रपंच बुडविला सर्वही । अनुताप जीवी धरोनिया ॥६८॥

मग कवित्व केलें परमार्थ लेखन । तेंहीं उदकीं बुडविलें जाण ।

आणिक असता तरी प्राण । ठेविता जाण सर्वथा ॥६९॥

प्रपंच बुडविले दोन्ही । आणि मुख दाखविसी लोकांलागोनी ।

ऐसी दुरुत्तरें बोलोनी । कुटिळे सदनीं ते गेले ॥७०॥
ते तीक्ष्ण शब्द लागतां पाहे । तुकयाचें दुखंड झालें हृदय ।

म्हणे प्राण घ्यावा जरी लवलाहे । तरी आत्महत्या होय संसारीं ॥७१॥

येर्‍हवीं आपसुखें तों न जाय प्राण । यासि उपाय करावा कवण ।

तरी आतां अन्नउदक वर्जोनि जाण । बैसावें धरणें देवद्वारीं ॥७२॥

देवालयाच्या द्वारासमोर । वृंदावनीं होती पाथर ।

वैष्णव तुका तिजवर । बैसे सत्वर जाऊनिया ॥७३॥

पस्तावा जाहला चित्तास । ते अभंग असती एकुणतीस ।

म्हणे माझे भक्‍तीचा जाहला कळस । वस्तीसि दोष आला कीं ॥७४॥

हरिकीर्तन एकादशी । जागरण केलें जें सायासीं ।

शेवटीं फळ आलें त्यासी । तळमळ चित्तासी लागली ॥७५॥

अहा सेवा केली सहज । त्याची साक्ष आली मज ।

लोकांत मुख दावितां मज । वाटती लाज ऐसें झालें ॥७६॥

जीवाचा त्याग केलाच नाहीं । तोवरी देवा बोल कायी ।

आतां तुझी जोड विठाबायी । किंवा नाहींच करी न जीवा ॥७७॥

मागें मनांत आलें ऐसें । एकांती जाऊनि वनांत बैसें ।

घडोन आलें अनायासें । वर्जावया नसे कोणी ॥७८॥

माझें खरें जाहलियावर । मग मी पुढें बोलेन उत्तर ।

आतां कवित्व करावें जर । तरी लज्जा साचार मज नाहीं ॥७९॥

निवाडयाचा दिवस शेवटला । तोचि अनायासें आतां आला ।

अनुभवावीण परिपाक भला । रित्या शब्दाला कोण पुसे ॥८०॥

आतां मज न धरवे धीर । कैसे निजीव होईल स्थिर ।

तुम्हीं ऐकीले नाहींत बोल तर । व्यर्थचि भूसफोल उपणिलें ॥८१॥

सकळ उपाय त्वां विठ्ठलें । अवघे करावे ते केले ।

आतां वाट पहावया भलें । नाहीं उरलें सर्वथा ॥८२॥

आताम भक्तिमार्गासि आला शेवट । पायांकडे मी जाहलों नीट ।

शब्दासि रुची न ये स्पष्ट । विश्वीं बोभाट हा झाला ॥८३॥

जात्यावरील लटक्या ओव्या । परी त्या खर्‍या मापें घ्याव्या ।

तैसी गती पंढरीराया । वाटे माझिया जीवासी ॥८४॥

आतां नेम झाला हाचि कळस । कासया व्यर्थ उपणूं भूस ।

लेखणी न धरीं अनायासें । निश्चय मानसीं हा केला ॥८५॥

आम्हीं बोलतों करुणा उत्तरें । तुम्ही जाहला पाठमोरे ।

अवघे फंद तुमचे खरे । निश्चय निर्धारें हा केला ॥८६॥

अनंत भक्‍त पांडुरंगे । तुवां रक्षिले असती मागें ।

आतां एक्या जीवाचा आला उबग । न करिसी भवभंग कां माझा ॥८७॥

तुम्हीं चित्तापासोनि श्रीहरी । निकर धरिलासे मजवरी ।

आतां भक्‍तिचें दुकान न करीं । निश्चय अंतरीं हा केला ॥८८॥

करुणा भाकितां पांडुरंगा । तयावरी येतसां रागां ।

कठोणोत्तरें लागतसां मागां । ऐसा स्वभाव पैं गा तुझा असे ॥८९॥

तुमचा दास मी नव्हें कैसा । हे सांगावें पंढरीशा ।

कोणासाठी प्रपंच आशा । सांडोनि दुर्दशा हे केली ॥९०॥

माता न पुरवितां आळ । देशधडी जाहलें बाळ ।

कीर्ति सांगावी कोणाजवळ । प्रेम सकळ विसरले ॥९१॥

कैसी आतां करावी स्तुति । कैसी वाखाणूं सत्कीर्ति ।

मुख दाखवावें जनाप्रती । उरली रीती हें नाही ॥९२॥

आवघ्याच माझ्या वेंचल्या शक्‍ती । बळ बुद्धि कांहींच न चले युक्‍ती ।

आतां करिशील तें होईल निश्चिती । रुक्मिणीपती श्रीविठ्ठला ॥९३॥

ऐशा रीतीं करुनि स्तवन । नेत्र झांकिलें तुकयानें ।

सद्गुणरुपीं गोविलें लोचन । चरणीं मन स्थिर केलें ॥९४॥

देवळा समोर वृंदावन । तेथें शिळेवरी केलें शयन ।

न घे फळमूळ अथवा जीवन । समूळ देहभान सांडिलें ॥९५॥

लोकीं अपमान बहुत होतां । समाचार सर्वथा न घेचि कांता ।

अधींच परमार्थी द्वेष होता । त्यावरी कथा हे झाली ॥९६॥

वरदळ भावार्थी जे कां जन । ऐकत होते हरिकीर्तन ।

विकल्पें विटाळे त्यांचें मन । विघ्न दारुण देखोनी ॥९७॥

जैसें पक्कदशेसि येतां फळ । त्यासि देंठ सोडी तत्काळ ।

तैसें स्नेह होतसे खुळ । कृपा कल्लोळें श्रीहरींच्या ॥९८॥

तुकयासि आग्रह वरच्यावर । येऊनि करिती भाविक नर ।

परी कोणासी न बोले प्रत्युत्तर । निश्चळ न ढळे सर्वथा ॥९९॥

उपवास करितां जावा प्राण । यास्तव देवद्वारीं घेतले धरणें ।

मेला कीं जीत कोणाकारणे । निश्चय बाणे सर्वथा ॥१००॥

असो इकडे श्रोते चतुर । वाघोलींत ब्राह्मण रामेश्वर ।

त्यासि भक्तद्रोह घडला थोर । म्हणवोनी ईश्वर क्षोभला ॥१॥

रावण कुंभकर्ण श्रीराम द्वेषी । तेही नेले मोक्षपदासी ।

परी मुक्ती नाहीं भक्‍त द्वेषियांसी । जे रौरवांसी अधिकारी ॥२॥

भक्‍तांसि रक्षावया श्रीहरी । गदा चक्रे वागवीत करीं ।

बुद्धिचा प्रेरक होउनि अंतरीं । अपाय करी अभक्‍ता ॥३॥

भक्‍ताचा द्वेष करितां पाहे । तेणे निज पुण्याचा होतसे क्षय ।

तेथें सकळ दुरितांचा मेळा होय । वस्तीसि ठाय लक्षूनी ॥४॥

रामेश्वर तपस्वी ब्राह्मण । जैसा का सूर्यनारायण ।

चहूं शास्त्रीं अध्ययन । राजमान्य सर्वापरी ॥५॥

परी विष्णुभक्‍ताचा करितां द्वेष । तेणेंचि निजपुण्याचा जाहला नाश ।

एके दिवसीं पुण्यास । आला दर्शनास शिवाच्या ॥६॥

नागनाथ म्हणवोनि दैवत पाही । जागृत असे तये ठायी ।

रामेश्वराची आस्था सर्वही । त्याच्या पायीं जडली असे ॥७॥

द्वादशी प्रदोष सोमवार । पर्वकाळ पाहोनि थोर ।

पुणियासि आले रामेश्वर । तों काय चरित्र वर्तले ॥८॥

तेथें अनगडशासिद्ध म्हणवोनि थोर । अनुष्ठानी होता फकीर ।

त्याच्या बागांत रामेश्वर । नेणतां सत्वर प्रवेशले ॥९॥

दोघे विद्यार्थी असती जवळ । प्रातः स्नानाची जाहली वेळ ।

स्वच्छ निर्मळ देखोनि जळ । आंत तत्काळ प्रवेशले ॥११०॥

स्नान करितां रामेश्वर । आनगडशासिद्ध होता दूर ।

त्याने कानी ऐकतां प्रयोगमंत्र । मग शापोत्तर बोलतसे ॥११॥

म्हणे माझें निमाज करावयाचे जीवन । ते डव्हाळोनि टाकिले त्याने ।

त्याच्या देहाचे होईल अग्न । जळावांचोन सर्वदा ॥१२॥

ऐसा शाप वदतां फकीर । उदकावांचोनि पोळे रामेश्वर ।

मग विद्यार्थियासि बोले उत्तर । म्हणे कैसा विचार करुं आतां ॥१३॥

उदकांतूनि निघतांचि पाहे । अधिकचि देहाचा अग्न होय ।

त्यासि उपाय करावा काय । म्हणोनि धाय मोकलीत ॥१४॥

मग विद्यार्थी बोलती पाहीं । फकीराने प्रयोग केला काहीं ।

तयासि शरण लवलाहीं । येच समयीं चलावें ॥१५॥

मग म्हणतेस रामेश्वर । मी तों उत्तमयाति द्विजवर ।

आणि यवन हीन जातीचा फकीर । मी न जाय साचार त्यापासीं ॥१६॥

अहंता धरोनि निज मनें । ऐसा निश्चय केला त्यानें ।

परी उदकांतूनि निघतांचि जाण । होतसे अग्न देहाचा ॥१७॥

चार घटिका लोटलिया वरी । मग तैसाचि निघतसे बाहेरी ।

वोलीं धोत्रें आंगावरी । निथळत बरीं ठेवितसे ॥१८॥

विद्यार्थी हातीं घेऊनि झारी । पाणी घालिती वरच्यावरी ।

म्हणे आतां परतोनि जावें घरीं । तरी व्यथा शरीरीं दारुण ॥१९॥

याजपासोनि वांचे न आतां। ऐसें तंव न दिसे सर्वथा ।

विपत्तीचें मरण आलें तत्वतां । म्हणवोनि चिंताक्रांत मनीं ॥१२०॥

निजतां उठतां चालतां पाहे । सर्वदा अग्न जाळिताहे ।

केलें अनुष्ठान कामा न ये । जाहलें काय तें कळेना ॥२१॥

देखोनि रामेश्वराची विपत्ती । त्रिविध जन काय बोलती ।

फकीरें प्रयोग केला म्हणती । अन्यथा मती हे नव्हे ॥२२॥

सज्ञान बोलती प्रतिवचन । तुकयाचे अभंग बुडविलें यानें ।

यास्तव क्षोभला रुक्मिणीरमण । निमित्तास कारण अनगडशा ॥२३॥

अंबरीष राजा विष्णुभक्त पूर्ण । दुर्वासें शापितां त्याजकारणें ।

मग पाठीसी लागे सुदर्शन । तैसेंच कारण हें झालें ॥२४॥

ऐशा रीतीं बोलती सर्व । परी कोणासि न सुचे उपाय ।

म्हणती रामेश्वरा ऐसा भूदेव । पीडिला पाहाहो व्यथेनें ॥२५॥

शरीरीं रोग होतां दारुण । नावडे घरदार पुत्र धन ।

मग आळंदीसि येऊनि त्यानें । घेतलें धरणें ज्ञानदेवीं ॥२६॥

आजान वृक्षासि बांधोनि गळती । त्याजखालीं बैसे दिसराती ।

म्हणे देहासि आली महाविपत्ती । नकळे संचितीं काय आहे ॥२७॥

भक्तद्वेषियासि जाहलें ऐसें । इकडे चरित्र वर्तलें कैसें ।

अन्न उदक त्यजितां तुकयास । मग पंढीरानिवास काय करी ॥२८॥

बाळरुप धरोनि श्रीहरी । तुका आश्वासीत निजकरीं ।

म्हणे मी पाठिराखा कैवारी । असतां शिरीं काय चिंता ॥२९॥

माझें नाम जपतां निरंतरी । म्हणवोनि प्रल्हाद गांजिला नानापरी ।

हिरण्यकशिपु आमुचा वैरी । तो द्वेष निर्धारी करी त्याचा ॥१३०॥

पर्वतीं लोटितां त्याजकारणें । म्यां अनंत हस्तें उचलिला जाण ।

बुडवूं न शके समुद्रजीवन । म्यां कासव होऊन उचलिला ॥३१॥

हिरण्यकशिपु महाखळ । अग्नींत टाकिला प्रल्हाद बाळ ।

परी कृशानु वाटे तया शीतळ । कृपा कल्लोळें माझिया ॥३२॥

महा वारण जे उन्मत्त । दैत्यें सोडिले तयावरते ।

तयांसि प्रल्हाद सिंह दिसत । मग ते होत रानभरी ॥३३॥

मग सर्प डसवितां निश्चिती । तयांसि प्रल्हाद दिसे खगपती ।

पोटीं पाय त्यांसि निघती । मग सत्वर शिरती वारुळीं ॥३४॥

माझ्या भक्‍तासि यावया मरण । महा विष पाजिलें त्यानें ।

प्रल्हाद करितां नामस्मरण । अमृतासमान तें होय ॥३५॥

त्यानें हांक मारितांचि सत्वरी । मी खांबांत प्रगटलों नरहरी ।

दैत्य विदारुनि नखावरी । दासासि सत्वरी रक्षिलें ॥३६॥

ऐसीं माझीं चरित्रें अद्भुत । गाईलीं ऐकिलीं तुवां बहुत ।

ते असत्य सर्वथा नव्हेचि मात । पुराणीं गर्जत पंवाडें ॥३७॥

तुझ्या वह्या धरोनि पोटीं । मी उदकांत बैसलों जगजेठी ।

तेंही चरित्र देखसी दृष्टीं । मग तुकयासि पोटीं धरियेला ॥३८॥

ऐसें म्हणवोनि ते अवसरीं । देव अंतर्धान पावले सत्वरी ।

कीं तुकयाच्या हृदयकमळा भीतरी । तो मिलिंद श्रीहरी गुंतला ॥३९॥

भाविक कोणी कुटिळ नर । तुकयासि पाहती वारंवार ।

तों श्वासोच्छ्‌वास नयेचि फार । काष्ठवत शरीर पडियेलें ॥१४०॥

ज्या अंगावर केलें शयन । तेथोनि अंग हलोंचि नेणें ।

खिरपणीचें आलें मरण । निंदक जन बोलती ॥४१॥

एक म्हणती त्याची कांता । दुष्काळीं मेली अन्न अन्न करितां ।

तैसेंचि तुकयासि जाहलें आतां । क्षुधेनें मरतां प्राण जाती ॥४२॥

भाविक म्हणती ते अवसरीं । तुकयासि रक्षित आहे श्रीहरि ।

अन्न उदकावीण शरीरीं । तेज निर्धारीं दिसतसे ॥४३॥

जरी साह्य नसता जगजीवन । तरी मागेंच गेले असती प्राण ।

नामस्मरणाची उमटे ध्वनी जाण । ऐक जाऊन संनिध ॥४४॥

ऐशा रीतीं बोलती जन । परी तुका तो आनंदयुक्त मनें ।

बाहेर दिसे लोकांकारणें । घेतलें धरणें देवद्वारीं ॥४५॥

ऐसें लोटतां तेरा दिवस । काय करी जगन्निवास ।

रात्रीं दृष्टांत बहुतांस । दाखवितसे जगदात्मा ॥४६॥

म्हणे तुकयाचे अभंग निश्चित । म्यां कोरडेचि रक्षिले जळांत ।

आतां वह्या तरंगोनि वरत्या येत । तरी काढाव्या त्वरित जावोनी ॥४७॥

ऐसा दृष्टांत देखतां रातीं । प्रभातसमयीं लोक येती ।

तों उदकावरी वह्या दिसती । जेवीं तुंबे तरती जळांत ॥४८॥

मग नामघोषें पिटोनि टाळी । आनंदली भक्‍तमंडळी ।

म्हणती तुकयासि पावला वनमाळी । अनुपम नव्हाळी दिसत ॥४९॥

त्या माजीं कोणी पोहणारे होते । त्यांनीं उडया टाकिल्या डोहांत ।

वह्या काढिल्या हातोहात । म्हणती पंढरीनाथ पावला ॥१५०॥

मग देउळासि येऊनि सकळ जन । तुकयासि सांगती वर्तमान ।

तुझा भक्‍तिभावार्थ पूर्ण । रुक्मिणीरमण पावला ॥५१॥

नेत्र उघडोनि प्रेमळ भक्‍त । पाहे तंव यथार्थ दिसत ।

मग सात अभंग केली स्तुत । करुणा बहुत त्यां माजी ॥५२॥

म्हणे रुक्मिणीकांता श्रीविठ्ठला । म्यां तरी थोर अन्याय केला ।

लागोनि जनाचिया बोला । श्रमविलें तुजला निश्चित ॥५३॥

तुझें तों चित्त दों ठायीं । वांटलें असें विठाबायी ।

माझा सांभाळ केला देहीं । आणि कागद डोहीं रक्षिलें ॥५४॥

शरीर अन्न उदकाविण । तेरा दिवस वांचलें जाण ।

आणि कोरडे कागद उदकीं राहणें । हें अघटित विंदान दाविलें ॥५५॥

अनाथनाथा विश्वंभरा । मी तरी पतितचि आहे खरा ।

महा अन्याय केला दुसरा । धरणें दारां बैसलों ॥५६॥

होणार तें होऊनि गेलें पाहे । ते गोष्टी सर्वथा परतोनि नये ।

आतां तुजवरि विठठलमाये । भार न वाहे सर्वथा ॥५७॥

अवघे मिळोनि हे दुर्जन । कापितील जरी माझी मान ।

परी तुज होईल जेणें शीण । तें न करी कारण सर्वथा ॥५८॥

चुक पडली एक वेळा । म्यां तुज कष्टविलें घनसांवळा ।

अन्याय आठवोनि वेळोवेळां । सद्गदित गळा होतसे ॥५९॥

जळांत उभा राहोनि श्रीपती । कोरडया वह्या राखिल्या प्रीतीं ।

बिरुदावळी संत वर्णिती । सत्य प्रतीती त्वां केली ॥१६०॥

तुज संकट घालायासि पाहीं । मज सर्वथा अधिकार नाहीं ।

परी लौकिक रक्षावया देहीं । विचार जीवीं न केला ॥६१॥

किंचित अन्याय करितां पाहे । मारुं पाहती बापमायें।

त्यांची उपमा देतांचि नये । सदय हृदय तूं एक ॥६२॥

पुरेपुरे हा संसार आतां । दुस्तर कर्म नावरे सर्वथा ।

करी चित्ताची स्थिरता । रुक्मिणीकांता जगद्गुरु ॥६३॥

अनंत बुद्धीचे तरंग फार । चित्तीं उठती वारंवार ।

याचा संग धरितां साचार । बद्ध अंतर होतसे ॥६४॥

आतांचि निवारुनि चिंता आस । माझें हृदयीं करी वास ।

सदा सेवीन सप्रेम रस । आणिक उद्देश कांहीं नको ॥६५॥

कोरडया वह्या निघतां निश्चित । तेव्हां सात अभंग केली स्तुत ।

तो सप्रेम रस अति अद्भुत । सेविती संत धरणीवरी ॥६६॥

तेरा दिवस बुडवितां शेखीं । कोरडया वह्या निघाल्या उदकीं ।

त्या तरी लुटूनि नेल्या भाविकीं । प्रख्यात लोकीं व्हावया ॥६७॥

कोरडे कागद उदकांत । स्वयें रक्षिले रुक्मिणीकांतें ।

हे देशोदेशी प्रगटली मात । प्रीतीनें प्रत उतरिती ॥६८॥

जैसीं पुष्पें असती एके स्थळीं । परी सुवास धांवे नभमंडळीं ।

तैसी तुक्याची कीर्ति भूमंडळी । होय ते वेळीं प्रख्यात ॥६९॥

असो इकडे अनुसंधान । अळंकापुर क्षेत्र पावन ।

तेथें रामेश्वर भट्ट बैसलें धरणें । होतसे अग्न देहाचा ॥१७०॥

अजान वृक्षासि लावोनि गळती । त्याखालीं बैसे दिवसराती ।

वोलींच वस्त्रें आंगावरतीं । सर्वदा असती तयाच्या ॥७१॥

चित्तीं कामना धरोनि थोर । आराधिला श्रीज्ञानेश्वर ।

म्हणे सिद्धाचा शाप होय दूर । ते कृपा सत्वर मज करी ॥७२॥

ह्या दुःखें करोनि निश्चित । मी तरीं पीडा पावलों बहुत ।

तूं विष्णु अवतार साक्षात । विश्वोद्धारार्थ कलियुगीं ॥७३॥

रामेश्वर भट्ट ऐशा रीतीं । ज्ञानेश्वराची करितसे स्तुती ।

तों त्यासि दृष्टांत दाखविला रातीं । तो सादर संतीं परिसिजे ॥७४॥

सकळ भक्तांत श्रेष्ठ थोर । प्रेमळ नामा वैष्णववीर ।

तुका तयाचा अवतार । आला जगदुद्धार करावया ॥७५॥

त्याची निंदा घडतां द्वेष । तेणें सुकृताचा जाहला नाश ।

पदरीं सांचले अविनाश दोष । देह दुःखास कारण हे ॥७६॥

आतां सद्भाव धरोनि अंतरीं । तयासि शरण जाशील जरी ।

तरी महारोग होऊनि दुरी । भवसागरीं तरशील ॥७७॥

विष्णुभक्ताचा द्वेष करितां । तें पाप न जाय तीर्थीं न्हातां ।

तरी तुकयासि शरण जाय आतां । तरीच हे व्यथा निरसेल ॥७८॥

ज्ञानदेवें स्वप्न निश्चिती । दाखविलें रामेश्वराप्रती ।

मग सत्वर येऊनि जागृतीं । अनुताप चित्तीं धरियेला ॥७९॥

कांहीं न बैसतां आंच संसारताप । प्राणियासि नव्हेचि अनुताप ।

अनुतापेंवीण न जाय पाप । सत्य संकल्प हे वाणीं ॥१८०॥

शंकरें घेतलें हलाहल । तेणेंचि त्याचें सर्वांग जळे ।

मग श्रीराम भजन करितां निश्चळ । जाहला शीतळ धूर्जटी ॥८१॥

असो आतां भाषण बहुत । दृष्टांत योजितां वाढेल ग्रंथ ।

रामेश्वरासि पश्चात्ताप सतत । जाहला दृष्टांत देखोनी ॥८२॥

मग एक पत्र दे लेहून । विद्यार्थियांपासीं दिधले त्यानें ।

म्हणे तुम्हीं देहूसि जाऊन । वृत्तांत सांगणें तुकयासी ॥८३॥

मनांत म्हणे रामेश्वर । आतांचि दर्शना गेलों जर ।

तरी दुसरा अपाय करील ईश्वर । अन्याय थोर म्यां केला ॥८४॥

कोरडे कागद उदकांतुनी निघाले हे कीर्ति ऐकिली श्रवणीं ।

त्यावरी ज्ञानदेवें येउनी । दृष्टांत स्वप्नीं सांगितला ॥८५॥

हा चमत्कार देखोनि बहुत । पत्र लिहिलें भीतभीत ।

तुकयाची बहुत करुनि स्तुत । देहूसि त्वरित पाठविलें ॥८६॥

रामेश्वराचे विद्यार्थी । साकल्य वृत्तांत तुकयासि सांगती ।

अनगडशा सिद्धें शापिलें म्हणती । उपाय पुसती यासि काय ॥८७॥

रामेश्वराचा वृत्तांत । ऐकोनि तुकयासी करुणा येत ।

म्हणे सुशीळ ब्राह्मण पंडित । त्यासि हें विपरीत कां झालें ॥८८॥

शत्रुमित्र समान तुकया । मागील विरोध नाठवेचि तया ।

विश्वीं पाहे पंढरीराया । ब्रह्मरुप काया करील कीं ॥८९॥

रामेश्वराच्या करुणा वचनें । दयेनें द्रवला वैष्णव जन ।

मग एक अभंग दीधला लेहून । निज कृपेनें आपुल्या ॥१९०॥

ते विद्यार्थियांनीं घेऊनि हातीं । आळंदीसि आले सत्वर गती ।

मग सद्गुरुपासी पत्र देती । वृत्तांत सांगती निज मुखें ॥९१॥

तुक्यानें लिहिलें पत्र । तें वाचोनि पाहे रामेश्वर ।

त्याचा अर्थ संकळित साचार । तो ऐका चतुर भाविकहो ॥९२॥

आपुलें चित्त असतां शुद्ध निश्चिती । तरी शत्रु ते मित्र होती ।

व्याघ्र सर्प जवळी येती । परी ते न खाती सर्वथा ॥९३॥

विष घेतां होय अमृत । घात करितां होय हित ।

अपशब्द हेळणा कोणी बोलत । ते शब्द विनीत वाटती ॥९४॥

दुःख प्रयोग करितां सबळ । तें सर्व सुखाचें देईल फळ ।

अग्निज्वाळा होतील शीतळ । दीनदयाळ तुष्टतां ॥९५॥

एक भाव सकळां अंतरीं । प्राणियांसि आवडे जीवाचिये परी ।

तरी कृपाकटाक्षें लक्षी लहरी । अनुभव अंतरीं होय तेणें ॥९६॥

ऐशाच रीतीं अभंग एक । रामेश्वरें वाचितां देख ।

तों अद्भुत वर्तलें कौतुक । तें ऐका भाविक निजकर्णी ॥९७॥

शीतळ होती अग्निज्वाळा । हे ओवी वाचितांचि त्याजला ।

अनगडशा सिद्धें शाप दीधला । तो अग्नि शमला तत्काळ ॥९८॥

सिद्धाच्या शापें रामेश्वर । पोळत होता निरंतर ।

तो दाह राहिला समग्र । प्रत्यय थोर हा आला ॥९९॥

मग अनुताप धरोनियां मनें । तुकयासि घाली लोटांगण ।

अश्रुपातें भरले लोचन । म्हणे धन्य महिमान संताचें ॥२००॥

उपनिषद आणि वेदांत । आम्हीं पढिन्नलों समस्त ।

परी कोरडे कागद उदकांत । राखावया सामर्थ्य मज नाहीं ॥१॥

ऐसा जो जगद्गुरु देखा । तोचि भवसागर तारी तुका ।

ऐसा भावार्थ धरोनि निका । सप्रेम सुखा भोगीतसे ॥२॥

रामेश्वर येती दर्शनासी । हें अंतरीं कळलें तुकयासी ।

म्हणे आपण सामोरें जाऊनि त्यासी । द्विजवरासी भेटावें ॥३॥

ऐसें म्हणवोनि ते अवसरीं । मग तेथूनि निघाले सत्वरी ।

मार्गी अर्ध वाटेवरी । परस्परें भेटती ॥४॥

तुकयासि म्हणे रामेश्वर । तुम्ही परमभक्त वैष्णववीर ।

हें मी नेणतां पामर । वह्या साचार बुडविल्या ॥५॥

जगदुद्धाराकारणें । मृत्युलोकीं अवतार घेणें ।

ऐसें नेणोनि महिमान । केलें छळण व्यर्थ आम्हीं ॥६॥

ऐसें बोलतां रामेश्वर । काय म्हणे वैष्णववीर ।

मी तरी हीन यति पामर । कृपा निरंतर इच्छितसे ॥७॥

ऐसें ऐकोनियां उत्तर । काय म्हणती रामेश्वर ।

तुम्ही अभंग लिहिला निजकरें । तो अनुग्रह साचार मज आला ॥८॥

आतां हा समागम सोडोनि पाहीं । परतोनि गृहासि जाणेंचि नाही ।

ऐसा निश्चय करोनि जीवी । पुढती पायीं लागतसे ॥९॥

पुढीले अध्यायी रस अद्भुत । वदविता श्रीरुक्मिणीकांत ।

महीपतीसि देऊनि अभयहस्त । स्वयें ग्रंथार्थ आपण वदे ॥२१०॥

स्वस्ति श्रीभक्तीलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोति भाविक भक्‍त । पस्तिसावा अध्याय रसाळ हा ॥२११॥अ० ३५॥ओव्या २११॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP